बरेच काही उगवून आलेले...[भाग १]

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
22 Sep 2008 - 7:47 am

झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित - लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं 'कहीं दूर जब दिन ढल जाये' आठवतं किंवा पावसात 'ओ सजना'/'रिमझिम गिरे सावन' डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट सारे प्रवासी घडीचे किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्‍याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना 'स्मरणाचा उत्सव जागून' विसरलेलं काही पुन्हा आठवावं - ही जोडी तशी रंजक आहे.

अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे - 'बरेच काही उगवून आलेले...'

...

दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची - बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं - दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत.

शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर 'रम्य बाल्य ते जिथे खेळले' पासून त्या तरूतळी 'तसव्वुर-ए-जानाँ किये हुए' करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय जुना फोटो पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.

ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडे दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेने लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं 'मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.

झाडांबद्दल लिहित असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. 'आठवणींच्या चिंचा गाभुळ' ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर हिरवी सावली धरणारे माड मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरे पहावे ते किनार्‍याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्‍याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई.

Reddy

...

इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्‍यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राई समोर आली.

Sears tower Snow-fall 050

पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची 'गंधरेखा' वाचली, तेव्हा - एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका - या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.

एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका

झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;
आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.

झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.

एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका

ग्रेसच्या बर्‍याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या - वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्‍या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनागुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण 'पाहतों मी ज्यात माझें', असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.

...

शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्‍या-पावसात करकरणारं 'कराल' झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध 'द लोन सायप्रस' आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं 'देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें' उभं असणारं 'घोस्ट ट्री'. ब्राईस कॅन्यनमध्ये 'खडकावरील अंकुरा'सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. 'शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां' होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी भरून गेलेले डोंगर. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली 'माझ्या मना बन दगड' म्हणून चक्क दगड बनलेली झाडं. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.

पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात 'फिएरी फर्नेस' म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.

Day 6 Arches 1 054

एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्‍या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.

झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड

झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते
ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते

झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे

झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी

झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे
रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे

वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते
गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते

...

(अखेरचा भाग या गुरूवारी)
[हाच लेख येथेही वाचता येईल.]

वाङ्मयकविताप्रवासस्थिरचित्रप्रकटनआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

22 Sep 2008 - 8:12 am | प्राजु

आपला झाडांवरचा हा लेख वाचून मला इंदिरा संतांच्या "बाभळी" कवितेची आठवण झाली.
अमेरिकेत झाडांवर झळकणारे फॉल कलर्स पाहून मलाही एक कविता सुचली होती..
लेख अतिशय आवडला... चित्रेही सुंदर.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2008 - 8:20 am | प्रभाकर पेठकर

अतिशय सुंदर लेख. कवितांचे आणि माझे अगदी वाकडे नसले तरी स्वतःला सुचत नाहीत हे कटू वास्तव आहे. पण कवितांचा माझ्या कुवतीनुसार आस्वाद जरूर घेतो.
वृक्ष-वल्लीं वरील हा लेख अगदी वाचनिय झाला आहे.

माझ्या दहिसरचे वर्णन, माझ्या 'विद्या-मंदिर' शाळेचे चित्र पाहून मन भरून आले.

गुरूवारच्या प्रतिक्षेत.

मुक्तसुनीत's picture

22 Sep 2008 - 8:49 am | मुक्तसुनीत

नंदन जे झाडांवरचे गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
नंदन जे झाडांवरचे गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा
झाडांवरचे जे नंदन गातो..

मागे बनीने म्हण्टल्याचे आठवते आहे ? एक खूप श्रीमंत माणूस रहातो क्यालिफोर्नियाच्या "त्या" भागात. ही जाणीवेची श्रीमंती - जिला ज्ञानेश्वराने जाणीवेची राणीव म्हण्टले आहे कुठे तरी - अशी खानदानी आहे की तिचे उठवळ प्रदर्शन नाही होत कधी. "साठिषण्मासीं परंतु" ज्या शलाका येतात ना, तेव्हा मात्र एकदम डवरून येते हे झाड.

या श्रीमंत लेखाच्या सुरवातीचा परिच्छेद वाचत होतो आणि वाचून झाल्यावर श्वास कोंडल्यासारखे झाले. एखाद्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एका गोष्टीवर इतके नेमके बोट ठेवले असावे , की बस्स. नंदनच्या या सुरेख लेखावरची दाद अशी शब्दबंबाळ द्यावी लागावी यातली विसंगती मला दिसते. पण काय करणार , त्याच्यासारखे आपण सारे थोडेच श्रीमंत आहोत ? :-)

नंदन असेच लिहीत जा कधीतरी. अति वाट पाहायला लावणेही चूकच ; कसे म्हणता ?

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 8:57 am | विसोबा खेचर

या श्रीमंत लेखाच्या सुरवातीचा परिच्छेद वाचत होतो आणि वाचून झाल्यावर श्वास कोंडल्यासारखे झाले. एखाद्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एका गोष्टीवर इतके नेमके बोट ठेवले असावे , की बस्स. नंदनच्या या सुरेख लेखावरची दाद अशी शब्दबंबाळ द्यावी लागावी यातली विसंगती मला दिसते. पण काय करणार , त्याच्यासारखे आपण सारे थोडेच श्रीमंत आहोत ?

अगदी खरं! मुक्तराव तुझ्याशी सहमत आहे रे! :)

तात्या.

धम्मकलाडू's picture

22 Sep 2008 - 6:22 pm | धम्मकलाडू

नंदन जे झाडांवरचे गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
नंदन जे झाडांवरचे गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा
झाडांवरचे जे नंदन गातो..

नंदनचा लेख सुरेख आहेच पण ही प्रेमकविता ही सुरेख आहे. पूर्ण करा ना कविता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लिखाळ's picture

29 Sep 2008 - 7:59 pm | लिखाळ

नंदन,
अतिशय उत्तम लेख. लेखाची कल्पना, मांडाणी आणि सर्वच आवडले. पुढचा भाग लवकरच वाचतो.

>>ही जाणीवेची श्रीमंती - जिला ज्ञानेश्वराने जाणीवेची राणीव म्हण्टले आहे कुठे तरी - अशी खानदानी आहे की तिचे उठवळ प्रदर्शन नाही होत कधी. "साठिषण्मासीं परंतु" ज्या शलाका येतात ना, तेव्हा मात्र एकदम डवरून येते हे झाड. <<
उत्तम लेखाला उत्तम प्रतिसाद.

--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

नंदनसायबा,

मिपाच्या वैभवात भर घालणारा, अतिशय सुंदर शब्दात मांडलेला, झाडांशी मैत्री करणारा लेख आवडला. आज सकाळी सकाळीच इतका सुरेख लेख वाचून केवळ आजच्या दिवसाचीच नव्हे, तर सबंध आठवड्याचीच सुरवात अत्यंत प्रसन्न झाली आहे!

सायबा, इतक्या सुरेख लेखाकरता मुंबईला आलास की बक्षिस म्हणून, कौतुक म्हणून, तुला समर्थ भोजनालयात एक पार्टी माझ्यातर्फे लागू! :)

येत्या गुरुवारी म्होरल्या भागाची वाट पाहात आहे!

बाकी, शाळेचा फोटू पाहून जीव एवढास्सा झाला! गेल्या आता त्या शाळा...!

अवांतर -

लेख अधिक रंगतदार करण्याकरता, सर्वांगसुंदर करण्याकरता रेग्यांच्या/बोरकरांच्या दिलेल्या काव्यपंक्ति वाचून मिपाच्या या धोरणातल्या,

एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.

जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....

या दोन कलमांचा फार सुंदर उपयोग केला आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते!

जियो...!

(नंदनसायबाचं मैतर लाभलेला एक भाग्यवान!) तात्या.

आता जाता जाता थोडेसे ह घा.. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

तुका रे मेल्या खय कळता त्या मराठी साहित्यात?! :)

आपला,
(शिंदुदुर्ग जिल्ह्यातला) तात्या देवगडकर. :)

यशोधरा's picture

22 Sep 2008 - 9:15 am | यशोधरा

इतक्या सुंदर शब्दांत गुंफलेल्या लेखाला दाद द्यायला तितकेच सुंदर शब्द कुठून आणायचे नंदन? लिहीत जा रे..

प्रमोद देव's picture

22 Sep 2008 - 9:18 am | प्रमोद देव

"मन करा रे प्रसन्न" ह्या उक्तीची प्रचिती देणारा ताजातवाना सचित्र लेख!

पद्मश्री चित्रे's picture

22 Sep 2008 - 9:34 am | पद्मश्री चित्रे

खूप छान लिहिलं आहे..
"मन करा रे प्रसन्न" ह्या उक्तीची प्रचिती देणारा लेख-
>>अगदी खरं

मनीषा's picture

22 Sep 2008 - 9:47 am | मनीषा

लेख खूप आवडला ... फोटो सगळेच अप्रतीम... शांतादुर्गेच्या तळ्याचा , आणि , माड असलेल्या समुद्र किनार्‍याचा खूप आवडला .

रेग्यांची आणि बोरकरांची कविता सुरेखच आहेत

झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें....... किती छान लिहीलं आहे

आणि बोरकरांची कविता तर सुंदरच आहे ..

विनायक प्रभू's picture

22 Sep 2008 - 10:13 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
एका माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात लागणारा ऑक्सिजन एक झाड पुरवते. तरीसुद्धा त्यांची तोड सुरुच आहे बर्याच वेळी कारण नसताना.
आजपर्यंत सुमारे १०००० हजार रोपे लावुन त्यांना जगवलेला
वि.प्र.

आनंदयात्री's picture

22 Sep 2008 - 10:34 am | आनंदयात्री

बाहेर धो धो पाउस पडत असतांना वर्गात शिकवणार्‍या बाई आठवल्या, शेवटी आवाज प्रचंड वाढल्यावर शिकवणे शेवटपर्यंत एकु येत नसे, मग चालु होई कवितेचे पाठांतर !!
सुरेख याद जागवलीस :)

मेघना भुस्कुटे's picture

22 Sep 2008 - 11:10 am | मेघना भुस्कुटे

फार वाट पाहायला लावणे चूकच. पण असले काही हाताला लागणार असेल, तर ही वाट पाहणेही कबूल आहे. कुणी काही लिहिल्याबद्दल आभार मानावे, असे प्रसंग अपवादानेच येतात. त्यांतला हा एक. आभार नंदन.

भाग्यश्री's picture

22 Sep 2008 - 10:50 pm | भाग्यश्री

अगदी अगदी ! आभार नंदन ! मस्तच लेख..

(विजेने चिरफळ्या उडालेलं,तरीही पालवी फुटलेलं झाड पाहून काटा आला.. )

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2008 - 1:45 pm | स्वाती दिनेश

नंदन ,फार सुंदर लेख.लेखाचे शीर्षकही फार आवडले.
लेखाच्या विषयामुळे कृत्रिम होईल अशी भीती व्यक्त केली आहेस पण अजिबात कृत्रिमता नाही.
हिरवी सावली धरणारे माड,लेकुरवाळे फणस - हे फार आवडलं.
गुरूवारची वाट पाहत आहे,:)
स्वाती

विसुनाना's picture

22 Sep 2008 - 2:42 pm | विसुनाना

मृदू आणि भावूक लेखन.
लेख अत्यंत आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2008 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मृदू आणि भावूक लेखन.
लेख अत्यंत आवडला.

प्रियाली's picture

22 Sep 2008 - 6:27 pm | प्रियाली

लेख अतिशय सहज आणि ओघवता झाला आहे. दहिसरपासून अमेरिकेपर्यंतची झाडे डोळ्यासमोरून हलली. :)

मुंबईला माझ्या घराबाहेर करंज्याचे झाड आहे. एप्रिलमधे त्याला नवी पालवी आणि शुभ्र फुलांचा बहर येतो. पावसात पानं पाण्या वार्‍याने सळसळत असतात. सदैव सळसळत्या चैतन्याची सोबत आणि जिवंतपणाची आठवण करून देणारे झाड आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.

चित्तरंजन भट's picture

22 Sep 2008 - 6:44 pm | चित्तरंजन भट

उत्तम लेखन. लेखकाच्या वाचनाची आणि व्यासंगाची सहजरीत्या जाणीव करून देणारे. अभिनंदन नंदन!
चित्तरंजन

भोचक's picture

22 Sep 2008 - 6:58 pm | भोचक

नंदन, तू इतकं छान कसं लिहू शकतोस? तुझ्या लेखनाचा चक्क हेवा वाटतो रे. फारच सुंदर.

चतुरंग's picture

22 Sep 2008 - 7:18 pm | चतुरंग

काही लेखन वाचल्यानंतर काही काळ काहीच बोलू नये, लिहू नये, वाचू नये अशी मनाची अवस्था होते ना घायाळ, थिजलेली, तशी झाली माझी.
लेख दोनदा वाचला. आणखीही काही वेळा वाचणार आहे आणखी सवडीने.

आमच्या दहावीच्या वर्गावर असलेल्या पत्र्यांवर तडतडणारा, झोड उठवणारा पाऊस जेव्हा कान बहिरे करुन टाकी आणि मराठीचा तास असला तर एस्.डी.कुलकर्णी सर आम्हाला घेऊन दारा खिडक्यातून आजूबाजूच्या निसर्गाचे, झाडांचे ते रौद्र रुप पहायला लावत तेव्हा त्यांचे ते निशःब्द शिकवणे आता अंगावर काटा आणते! त्याची आठवण करुन दिलीस.
आणि काय लिहू? त्यापेक्षा झाडाचेच एक चित्र टाकणे जास्त संयुक्तिक ठरावे.

नायग्राच्या अमेरिकन बाजूला ग्रँड रॅपिड्स वर पडलेले एक झाड त्याही अवस्थेत खोडातून नवी पालवी घेऊन पुन्हा फुटले ते असे

चतुरंग

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 10:40 pm | विसोबा खेचर

सुंदर चित्र रे रंगा..!

एकाकी झाड आवडलं!

रेवती's picture

22 Sep 2008 - 7:38 pm | रेवती

यापेक्षा जास्त शब्द नाहीत!
गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत.

शाळेतले दिवस आठवले, पाऊस आठवला आणि ते पाणी डोळ्यात आले.

रेवती

चित्रा's picture

22 Sep 2008 - 8:44 pm | चित्रा

नंदन,

फारच सुरेख लिहीले आहे. मस्त म्हणण्यापलिकडचे.

फारच छान!
चित्रा

सर्वसाक्षी's picture

22 Sep 2008 - 9:43 pm | सर्वसाक्षी

नंदन,

वाचुन प्रश्न पडला, अधिक दाद कशाला द्यावी?
या लेखाला की जोपासलेल्या व्यासंगाला?

एक अप्रतिम निसर्गलेख! धन्यवाद.

साक्षी

घाटावरचे भट's picture

22 Sep 2008 - 10:42 pm | घाटावरचे भट

अफलातून लेख!!! असंच अजून लिवा!!! लै ग्वाड वाटतया वाचाया!!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

दत्ता काळे's picture

23 Sep 2008 - 10:43 am | दत्ता काळे

अप्र तिम वाचनिय लेख

ऋषिकेश's picture

23 Sep 2008 - 4:30 pm | ऋषिकेश

नि:शब्द केलंस गड्या!
-(.....) ऋषिकेश

नंदन's picture

24 Sep 2008 - 7:46 am | नंदन

तुम्हां सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.

मनीषा, 'शुभ्र काही जीवघेणे' हा खरंच डोक्यात काही काळ रूतून रहावा असा शब्दप्रयोग आहे. अमरेन्द्र धनेश्वरांचे याच नावाचे एक संगीतातील व्यक्तींबाबत पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. स्वातीताई, शीर्षकाचे श्रेय द. भा. धामणस्करांना. त्यांचा या नावाचा कवितासंग्रह आहे. झाडांवरच्या कवितांचा. पुढच्या भागात मुख्यत्वे त्याबद्दलच लिहीन. चतुरंगराव, झाडाचा फोटो आवडला. जगण्याच्या चिवट इच्छेचं अजून एक उदाहरण.

साहित्यात झाडांवर झालेल्या मानवी भावभावनांच्या रोपणाबद्दलचा आणि द. भा. धामणस्करांच्या काव्यसंग्रहाबद्दलचा दुसरा (थोडा रुक्ष वाटू शकेल असा) भाग उद्या प्रकाशित करेन. विस्तारभयास्तव काही झाडांबद्दल लिहिता आले नाही, त्यापैकी काहींचे फोटोज येथे आहेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

24 Sep 2008 - 7:49 am | मुक्तसुनीत

>>> अमरेन्द्र धनेश्वरांचे याच नावाचे एक संगीतातील व्यक्तींबाबत पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

नंदन तुम्हाला अंबरीष मिश्र तर म्हणायचे नव्हते ? मोठा फरक आहे दोन लेखकांत :-)

नंदन's picture

24 Sep 2008 - 7:57 am | नंदन

चुकलो, अंबरीश मिश्र म्हणायचे होते - घोटाळा झाला :(
बेगम अख्तर, पार्श्वनाथ आळतेकर, सआदत हसन मंटो, शोभा गुर्टू, सज्जाद हुसैन आदी दिग्गजांबद्दल त्यांनी लिहिले आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

24 Sep 2008 - 8:19 am | धनंजय

गुजगोष्टी करता करता बोरकरांची गुणगुण ओठांवर ठेवून गेला आहे हा भाग.
अशा क्रमशःबद्दल कोण तक्रार करू शकेल?

बेसनलाडू's picture

24 Sep 2008 - 8:33 am | बेसनलाडू

फार म्हणजे फारच आवडला.
(वृक्षवल्लीप्रेमी)बेसनलाडू

सर्किट's picture

24 Sep 2008 - 12:39 pm | सर्किट (not verified)

असेच म्हणतो.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मनिष's picture

24 Sep 2008 - 3:36 pm | मनिष

नंदन -- हा लेख म्हणजे खरच एक सुंदर मेजवानीच होती. शीर्षकावरून द. भा. धामणस्कर यांच्य पुस्तकाची आठवण झाली, मी मागे त्यावर इथे एक लेख लिहिला होता - त्याची आठवण झाली. ह्या झाडांच्या हिरव्या आठवणी खूप आवडल्या - पुढच्या भागाची वाट पाहतोय! :)

- मनिष
tI दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राईचा फोटो सुरेख!

शाल्मली's picture

24 Sep 2008 - 7:27 pm | शाल्मली

लेख फारच सुंदर लिहिला आहे.

पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे

मध्यंतरी आमच्या इथे असाच एक जमिनीशी सलगी केलेला गोटू दिसला होता.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
--शाल्मली

वाचक's picture

24 Sep 2008 - 8:21 pm | वाचक

खरे तर अतिपरिचयात अवज्ञा झालेली झाडे आणि काही काव्यपंक्ती सुद्धा.
असे लेख वाचले की त्यांचे महत्त्व नव्याने जाणवते.

'पावसाळ्यातील गडद अंधार्‍या वर्गाची' आठवण तर अक्षरशः जीव घेउन गेली.

नंदन - तुमची साहित्यिक जाण तर चांगली आहेच पण संवेदनशीलताही तितकीच तरल आहे हे वाचून खूपच जाणवत.

मृदुला's picture

25 Sep 2008 - 1:41 am | मृदुला

लेख आवडला. काही अनुभवून काही आठवणे, विशेषत: कविता हाच एक उच्च अनुभव असतो. त्याचे इतके सुंदर वर्णन वाचायला आवडले.

सुवर्णमयी's picture

25 Sep 2008 - 1:57 am | सुवर्णमयी

नंदन, लेखन अतिशय आवडले, सुरेख.
सोनाली

सहज's picture

28 Sep 2008 - 6:08 pm | सहज

नंदन सुरेख लेख!

धनंजय म्हणतात तसे क्रमशः इतके छान कधीच वाटले नव्हते. वाट पहात आहे. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2008 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन,
अप्रतिम लेख !!!

यशोधरा's picture

17 Jun 2010 - 1:26 pm | यशोधरा

पुन्हा एकदा लेख वाचला नंदन... समर्पक दाद द्यायला शब्दच नाहीत माझ्याकडे.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jun 2010 - 1:32 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

यशोताई, तुझ्यामुळे आज परत वाचला गेला हा भाग. परत आवडला हे सांगायलाच नको. नंदनने नियमितपणे लिहावे ही अपेक्षा आहेच. तो लिहिणार नाहीच हे ही आता गृहित धरले आहे. :(

बिपिन कार्यकर्ते

राजेश घासकडवी's picture

17 Jun 2010 - 8:19 pm | राजेश घासकडवी

तुमच्यामुळे हा लेख वाचायला मिळाला.

लेखाचं सौंदर्य वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. सापडतात ते पुरेसे पडत नाहीत. इतकं प्रगल्भ लेखन वाचायला मिळणं विरळा. जालावर तर नाहीच नाही. चित्रं, काव्य, आठवणी यांचं भुलवून टाकणारं कोलाज.

सहज's picture

18 Jun 2010 - 1:32 pm | सहज

लेखाचा पुढचा भाग कुठे आहे?

सुनील's picture

18 Jun 2010 - 5:57 pm | सुनील

मुखपृष्ठावरील दुव्यामुळे हा निसटून गेलेला सुरेख लेख वाचायला मिळाला. तात्यांची आभार आणि नंदनरावांचे अभिनंदन!

लेखाचा पुढचा भाग प्रसिद्ध झालेला दिसला नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा's picture

30 Oct 2015 - 11:51 pm | यशोधरा

झाला आहे. इथे आहे. - http://www.misalpav.com/node/3748

मारवा's picture

30 Oct 2015 - 2:49 pm | मारवा

मिपा क्लासिक -४-अ

प्यारे१'s picture

30 Oct 2015 - 5:59 pm | प्यारे१

कालातीत लेखांपैकी एक!
नंदन मालकांचे शब्दप्रभुत्वाबद्दल काय बोलावं.
___/\___.

मितान's picture

30 Oct 2015 - 6:51 pm | मितान

अप्रतिम !!!!

शिव कन्या's picture

31 Oct 2015 - 12:20 am | शिव कन्या

सदाबहार.