कलगीतुरा- भाग ५

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
19 May 2014 - 12:04 pm

या आधीच्या भागांची लिंक खाली देत आहे.
कलगीतुरा- भाग १
कलगीतुरा- भाग २
कलगीतुरा- भाग ३
कलगीतुरा- भाग ४

"त्यादिवशी तू तुझ्या दोस्ताला माझ्याकडे घेऊन आला. त्याचे कमिशन ठरल्यानंतर त्यानी तुला लगेच कटवला. मला म्हटला दिग्याला मी लगेच कटवला कारण तीन तिघाडा काम बिघाडा नको. आणि बोलला की प्रपोजल लय चांगला हाय पण एक गोची हाय." कांतीशेठ.
"काय? कसली गोची? " मी.
"सांगते", असे म्हणून कांतीशेठने फ्लॅशबॅकमधे नेले.
वाशाने मला कटवल्यानंतर कांतीशेठला पटवायला सुरवात केली.
"अरे कांतीशेठ, गोची अशी आहे की तुला उद्धव आणि राज ठाकरेंना समोरासमोर टी. व्ही. वर डिबेटींगला आणायचेय ना? ते कदापी शक्य नाही."
"अरे बापरे! पण का?"
"कारण की माझी त्यांच्याशी तोंडओळखदेखील नाही". वाशा.
"काय? " कांतीशेठ हातभर ऊडाला. "साला तो तुझा दोस्त तर म्हणत होता की तुझ्या लय मोठ मोठया ओळखी हायेत?
"ते आमच्या फ्रेंड सर्कलमधे भाव मारायला मी सांगतो. प्रत्यक्षात माझी कुणाही मोठया राजकारणी पुढार्‍यांशी ओळख नाही." वाशा.
"अरे बापरे. मग तर घोटाळाच झ्याला. मी एव्ह्ढा चांगला बिझीनेसचा प्लान केला-" कांतीशेठ.
"अजिबात वाया जाणार नाही. तू काय काळजी करू नकोस.मी आहे ना!" वाशाचा मुळ स्वभाव जागा झाला. "प्रपोजल एकदम चांगले आहे. मी अकाउंटचा माणूस आहे. मला यात खूप पोटेंशियल दिसतेय. आपण उद्धव आणि राज ठाकरेंना समोरासमोर टी. व्ही. वर डिबेटींगला आणू शकत नाही. पण त्यांचे डमी आणू शकतो."
"डमी?" कांतीशेठ किंचाळला.
"हो. ते झेंडा पिक्चरमधले कलाकार आहेत ना? ज्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंची हुबेहूब भूमिका वठवली, ते माझे कॉलेजला असल्यापासूनचे दोस्त आहेत. त्यांना आपण टी.व्ही.वर समोरासमोर आणू." वाशा.
"नाय, नाय" कांतीशेठ घाबरून गेला. "येच्यात लय रिस्क हाय."
"अरे तिच्यायला ? धंदयात रिस्क घ्यावीच लागते. आमचा चंपकशेठ पण तुझ्यासारखाच डरपोक. गुळ कसा खपवायचा हे त्याला मी शिकवले. आयला तुम्ही म्हणजे तुमच्या कम्युनीटीला कलंक आहात." वाशाने कांतीशेठची निर्भत्सना केली.
"अरे तसा नाय. पण त्यांना कळले तर? " कांतीशेठ.
"काही होणार नाही. कार्यक्रम सुरू करायच्या आधी टी. व्ही. स्क्रीनवर एक डिस्क्लेमर टाकायचा की प्रस्तुत कार्यक्रम काल्पनिक आहे. याचा प्रत्यक्ष व्यक्ती आणि घटनांशी काहीही संबंध नाही. असल्यास योगायोग समजावा." वाशा.
"तरी पण.." कांतीशेठ अजून पण तयार होइना.
"आता कसला पण? तुला सांगतो कांतीशेठ, मागे चंपकशेठचा गुळाचा धंदा पार बसला होता. त्याने मला सल्ला विचारला.मी त्याला एक जबरदस्त ब्राईट आयडीया दिली.आम्ही एक लकी ड्रॉ स्किम जाहीर केली.फक्त दहा किलो गुळावर एक फ्लॅट फ्री.दहा किलो गुळावर एक कुपन मिळणार.त्याचा महिन्याने लकी ड्रॉ काढून विजेत्याला फ्लॅट बक्षिस देणार.इतकी क्लिक झाली ही आयडीया की चंपकशेठचा गुळ हातोहात संपला.परत कोल्हापूरवरून दोन ट्रक गुळ मागवावा लागला.काही काही लोकांनी तर दोन दोन,तीन कुपन मिळवण्यासाठी वीस वीस,तीस तीस किलो गुळ घेतला. एका रियल इस्टेट एजंटनी तर घरातल्या दहा मेंबरांच्या नावाने दहा कुपन,म्हणजे शंभर किलो गुळ घेतला."
"काय सॉल्लीड आयडीया हाय.मग लकी ड्रॉ मधे कोणाला फ्लॅट मिळाला?" कांतीशेठ.
"यडा झाला का? फ्लॅट बीट सगळे झूट होते.मी एक दिवस पेपरमधे फोटो देऊन टाकला.या दिग्याला पांढरा खादीचा ड्रेस आणि पांढरी टोपी घालून एका काल्पनिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनवले आणि त्याच्या हस्ते लकी ड्रॉचे बक्षिस घेताना माझा सरदारजीच्या वेषात फोटो काढला.बाजूला चंपकशेठ आणि गर्दी दिसण्यासाठी चंपकशेठच्या सासुरवाडीची सगळी लोकं आणून बसवली.फोटोच्या खाली ओळ छापली, अमुक अमुक तारीख रोजी संपन्न झालेल्या लकी ड्रॉ मधे विजेते ठरलेले श्री. बिलंदरसिंग नवटाक यांना गुळापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबरशेठ बावळे यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक फ्लॅट प्रदान करण्यात आला. खी..खी..खी... येतंय कोण मरायला विचारायला?"
"पण कुणी विचारले कसे नाही की आम्हाला लकी ड्रॉला बोलवला नाही?" कांतीशेठने शंका विचारली.
"विचारले ना. तीन चार लोकांनी विचारले. चंपकशेठला सांगायला सांगितले की त्यांना म्हणावं की सगळ्यांना पोस्टाने निमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या. आता तुम्हाला निमंत्रण पत्रिका मिळाल्या नाहीत त्यात आमचा काय दोष? "
"सॉल्लीड डोकं हाय राव तुम्हाला. मानला. " कांतीशेठवर वाशाचा चांगलाच प्रभाव पडला.
“चंपकशेठ तेंव्हापासून आपल्याला फार मानतो." वाशा.
"लय भारी. मग चंपकशेठनी पगार बिगार चांगला वाढवला असेल.." कांतीशेठ.
"हॅ. एक नंबरचा कंजूष. दर सणाला फुकट गुळ घेऊन जा म्हणतो. एव्ह्ढंच.पण आपल्याला काय जास्तीची हाव नाही. जे मिळतंय त्यात आपण सुखी आहोत. आता आपलं पण दहा कोटी कमिशन ठरलंय, मग तू शंभर नाही तर दोनशे कोटी कमव, आपण एक पैसा जास्ती मागणार नाही. मराठी माणूस आहे. दिलेला शब्द मोडणार नाही. तर तू काय काळजी करू नको कांतीशेठ. आपण डिस्क्लेमर टाकू,म्हणजे प्रश्नच नाही. त्या दोन कलाकारांना मी पटवतो. तसेही मराठी कलाकार थोडक्या मानधनात तयार होतात. स्क्रिप्ट आपण एका दैनिकात एक जण रोज टांगडिंग नावाच्या राजकीय सदराचा रतीब घालत असतो, त्याच्याकडून लिहून घेऊ.तालीम आपण आमचे गुळाचे गोडाउन सध्या रिकामेच आहे, तिथे घेऊ.अँकरींग मीच करीन.सोसायटीच्या गणपतीच्या वेळी फॅन्सी ड्रेस काँपीटीशन,डोळे बांधून गाढवाला शेपूट काढणे या स्पर्धांचं अँकरींग मीच नेहमी करतो. त्यामुळे अनुभव गाठीशी आहे.चल आता फटाफट कामाला लाग. आपण जोरदार पब्लिसिटी, मार्केटींग करू. दिग्या मला म्हटला की तुझे शंभर कोटींचे टारगेट आहे ना? अरे शंभर काय, दोनशे कोटी मिळव." कांतीशेठला वाशाने जबरदस्त कॉन्फीडन्स दिला.

"मग मी सगळी तयारी केली." कांतीशेठ फ्लॅशबॅकमधून बाहेर आला. "पेपर, टी.व्ही चॅनेलवर जाहीरातींचा धमाका उडवून दिला.प्रोग्रामच्या आधीच सॉलीड पब्लिसिटी झाली. मोठया मोठया ब्रँडच्या चिक्कार जाहीराती मिळाल्या. लय पैसा जमले.प्रत्यक्ष प्रोग्राम सुरू झाला तेंव्हा सॉलीड टीआरपी चढला. अजून जाहीराती मिळाल्या.”
"हो ते मी पहातच होतो. स्क्रिप्ट सॉलीड लिहीले होते. संवाद एकदम खटकेबाज होते. त्या दोन कलाकारांनी पण हुबेहुब भूमिका वठवल्या. वाशा पण मस्त अँकरींग करत होता.कार्यक्रम सॉलीड रंगात आला होता आणि मधेच आमच्याकडचे लाईट गेले. नंतर काय झालं? " मी उत्सुकतेने विचारले.
'अरे त्याचवेळी टी. व्ही.स्टुडीओच्या भायेरून आरडाओरडा आणि जोरजोरात घोषणा ऐकू यायला लागल्या. नंतर खळ्ळ खटयाक असे स्टुडीओच्या काचा फुटल्याचे आवाज यायला लागले.आम्ही सॉलीड घाबरलो. मग पंधरा वीस जण आतमधे घुसले आणि त्यातल्या एका माणसाने विचारले की या कार्यक्रमाचा म्होरक्या कोण आहे. कुणीतरी माझ्याकडे बोट दाखवले.तुझा दोस्त वाशा,ते डमी कलाकार,सगळे पळाले आणि मी त्यांना आयताच सापडलो. मला त्यांनी पकडले आणि आमच्या साहेबांची बदनामी करतोस असे म्हणून तिथेच बदडले. मग त्यांनी मला उचलले आणि डायरेक्ट मातोश्रीवर नेले. "
"अरेरे. मग? मग काय झाले? "
"मातोश्रीवर प्रत्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे बसले होते. मला त्यांच्या लोकांनी त्यांच्या समोर नेले."
कांतीशेठने पुन्हा फ्लॅश्बॅकमधे नेले.

"साहेब हाच तो हरामखोर. आपली परवानगी न घेता टी.व्ही. वर याने कार्यक्रम दाखवला."
"अस्सं. काय रे ए औकातीच्या!" राजसाहेब गरजले."तुला काय आम्ही एकमेकांचे दुश्मन वाटलो काय? मारे प्रोग्रॅममधे आमची भांडणे दाखवलीत? आम्ही सभेत एकमेकांच्या विरोधात बोलतो.पण ते पब्लिकला दाखवायला.ती आमची स्ट्रॅटेजी आहे."
"प्रत्यक्षात आम्ही एक आहोत." उद्ध्वजी."त्याला काटा खुपसला तर मला वेदना होतात."
"आणि त्यांना वेदना झाल्या की मला काटा खुपसल्यासारखे होते." राजजी.
"ठीक आहे.आता काटाकाटी बास्स.याच्याकडे पाहू या. कारे ए हरामखोरा,तुझी डेअरींगच कशी झाली असलं काय दाखवायची? ते पण आमची परवानगी न घेता? चक्क तू आमचा तात्त्विक मतभेद आणि पॉप्युलॅरीटी एन्कॅश केली?" उद्धवजी.
"पण आपले प्रसिद्धी खाते झोपले होते का? त्यांना कसे कळले नाही असले काही चालले आहे ते " राजजींनी पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुखाकडे पाहीले.
"आम्हाला वाटले ही पण तुमची स्ट्रॅटेजी असेल. म्हणून आम्ही लक्ष दिले नाही." प्रसिद्धी प्रमुख.
"खामोश!" उद्धवजी गरजले." अरे काय चाललंय काय? स्ट्रॅटेजी म्हणे. वडे तळा घरी बसून. ए कांतीशेठ,यात किती कमाई झाली तुला ते सांग."
"पंचवीस कोटी."
“मी असे म्हटल्याबरोबर उजव्या बाजूला रामभाऊ कदम होते आणि डाव्या बाजूला शिशिरभाऊ शिंदे होते. कदमभाऊंनी उजवीकडून आणि शिशिरभाऊंनी डावीकडून मला जोरदार पंचवीस लाथा आणि बुक्क्या घातल्या.” कांतीशेठ फ्लॅशबॅकमधून बाहेर आला परत रडत सांगू लागला.”साला लय तगडे माणूस. अजून मार बसायला नको म्हणून शेवटी खरे ते सांगून टाकले. मग उद्धवजी म्हणाले की ठीक आहे, नाहीतरी दोन्ही काँग्रेसशी इलेक्शनमधे मुकाबला करायचा म्हणजे पैशाची गरज आहेच. ते म्हंटले की त्यांच्याशी आपण बाकी सगळ्यात स्पर्धा करू शकतो, पण पैशाची स्पर्धा नाही करू शकत. आपले तीन जूने सरदार पैशावाले होते पण ते पण काँग्रेसच्या वळचणीला गेले. मला म्हटले की सगळा प्रॉफीट आमच्या दोघांमधे वाटून टाक. तरच तुझी सुटका करू. मला दुसरा काय उपाय नव्हता. मी सगळ्या प्रॉफीटचा चेक त्यांना देऊन टाकला आणि पळून आलो."
"अरेरेरे !" मी हळहळलो.
"त्या टी.व्ही. कंपनीनी पण माझ्याकडे पाच कोटींची भरपाई मागितलाय.त्यांच्या स्टुडीओचा लय नुकसान झालाय.पुरा बरबाद झालो मी.माझा दुकान बिकान,प्रॉपर्टी,जमीनजुमला सगळा विकायला लागेल आता." कांतीशेठ मुसमुसून रडायला लागला.
"आणि मी दिलेले साठ हजार? त्याचे काय झाले?" मी काळजीने विचारले.
"त्या डमी कलाकारांची फी दयायची बाकी होती. पाच पाच लाख ठरले होते.ते पण मला मारायला ऊठले.माझ्याजवळ तुझे साठ हजारच शिल्लक होते.शेवटी निरूपाय होऊन ते त्यांना देऊन टाकले.आता काय बचला नाय." कांतीशेठ.
माझ्या कानांत तुतारी, रणदुदुंभ्या वाजू लागल्या. कानशिले गरम झाली, मराठी माणसा जागा हो अशी आरोळी कानाशी घुमली आणि "कांतीशेठ,हरामखोर,मी तूला सोडणार नाही" असे म्हणून त्वेषाने मी त्याच्यावर झेप घेतली आणि त्याचा गळा गच्च धरून दाबायला सुरवात केली.

"अहो, सोडा, सोडा. माझा गळा काय दाबताय? काय जीव घेताय काय माझा? " ही ओरडली आणि मला जोरात ढकलले. मी बेडवरून धाडकन खाली पडलो आणि झोपेतून जागा झालो.
अरे बापरे, म्हणजे हे सगळे स्वप्न होते तर ! कांतीशेठ, त्याचे बिझिनेस प्रपोजल, दहा कोटींचे कमिशन, वाशाच्या बढाया, प्रत्यक्ष टी.व्ही.वरचा दोन भावांचा कलगीतुरा, वाशाचे अँकरींग, हिला करीना कपुरसारखा रत्नहार घेण्याचे वचन आणि त्यामुळे खूष होऊन हीने घेतेलेले चुंबन आणि गोगटयाचा जळफळाट, शेवटी कांतीशेठने मातोश्रीवर दोघा भावांसमोर खाल्लेला मार आणि मी धरलेला त्याचा गळा, सगळे सगळे खोटे होते तर!
मी भानावर आलो तर हीचा गळा काढणं सुरू झालं. मी म्हटलं अगं मला स्वप्न पडलं तर दुप्पट गळा काढायला लागली."बाई गं! मनी वसे ते स्वप्नी दिसे. माझं नशीबच फुटकं! पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणे.हा माणूस माझ्या जिवावर उठलाय.आज स्वप्नात गळा दाबला, उदया जागेपणी गळा दाबून मारून टाकेन." हीचा आरडाओरडा ऐकून एव्ह्ढया पहाटे गोगटया थेरडयाच्या आणि बापट, अय्यर फॅमिलीच्या घरातले लाईट लागलेच. तिन्ही फॅमिली बाहेर गॅलरीत आल्या. नेहमीप्रमाणे पाँईंट ऑफ काँटॅक्ट म्हणजे गोगटया. बापटीनीने नाक खूपसायच्या आत अय्यरनीने तोंड खूपसले.
"ओ गॉगटे अंकलं, क्या म्याट्टर हुवा?"
"होनेका क्या? कल रातको दस बजेको मै गॅलरीके अंदरसे रस्ते के उप्परपर टेहळणी कर रहा था.." गोगटया त्याच्या स्पेशल हिंदीत माहीती दयायला लागला.
"गोगटे काका, अय्यरना मराठी समजते. कशाला हिंदीची वाट लावताय? नीट सांगा काय झालं ते." बापटीनीने गोगटयाला झापले.
"अहो काय होणार? दिग्या गेला वाटतं. काल रात्री दहा वाजता मी गॅलरीत जेवणानंतर शतपावली करत होतो,तर हा दिग्या मला समोरच्या भैयाच्या टपरीवर गोल्ड फ्लेक्सची आख्खी दोन पाकीटे घेताना दिसला.एवढी फुकाफुक केल्यावर छातीचा पिंजरा नाही होणार तर काय होणार? आला असेल हार्ट अ‍ॅटॅक, बाकी काय?" आईशपथ या गोगटयाच्या! मी सिगरेटी फुंकतो त्यात याच्या बापाचे काय जातेय? डायरेक्ट यानी मला वर पोहचवला? या थेरडयालाच गळा दाबुन ठार मारावेसे वाटले. पंचवीस वर्षापूर्वी याच्या भाचीला नकार दिल्यापासून हा कायम माझ्या वाईटावर टपलेला असतो. त्यावेळी तिर्थरुपांनी दोन फोटो समोर टाकले होते.एक हिचा आणि दुसरा गोगटयाच्या भाचीचा.ही दिसायला गोगटयाच्या भाचीपेक्षा उजवी होती, म्हणून मी हीच्या फोटोवर त्यावेळी बोट ठेवले होते.(अर्थात तीही चूकच होती. आम्ही फक्त तेंव्हा हिचा एकच गुण बघितला.लग्नानंतर हळुहळु..... जाऊ दया.) तेव्हापासून ह्या गोगटयानी अक्षरशः माझा छळ मांडलाय.
मला गोगटयाची मुक्ताफळे ऐकून असह्य झाले आणि मी त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात ओरडलो,"मी जिवंत आहे. मला मारणारा अजून जन्माला यायचाय. हीला स्वप्न पडले की घरात चोर घुसले आणि त्यांनी सगळं लुटून नेलं. म्हणून ही रडतेय." ही मात्रा बरोब्बर लागू पडली. गोगटया लगेच घाबरुन घराची दारंखिडक्या नीट बंद आहेत की नाहीत हे बघायला आत पळाला. बाकीचे पण पळाले. मग हीला सगळं स्वप्न तपशीलवार सांगीतले. पण हिचा काय विश्वास बसेना. पण जेंव्हा मी सांगीतले की अगं स्वप्नात मी तुला त्या मलाबार ज्वेलर्सच्या जाहीरातीत करीना कपूरच्या गळ्यात जसा रत्नहार आहे तसा घेणार होतो, तेंव्हा कुठे तिचा विश्वास बसला. हेटाळणीच्या स्वरात माझे वाभाडे काढत म्हणाली, "हो,नक्कीच.हे स्वप्नच होते.बसला विश्वास माझा.प्रत्यक्षात तुम्ही काय घेताय असा रत्नहार? असलं काही मिळायला कसलं आलंय आमचं नशीब! तुमच्याबरोबर सात जन्म काढले तरी मला असा हार मिळणार नाही हे मी लिहून देते." हटतिच्यायला! त्यावेळीच गोगटयाच्या भाचीच्या फोटोवर बोट ठेवले असते तर ही आणि तो गोगटया, दोघांच्याही कटकटीतून सुटका झाली असती. पण आता काय उपयोग.आलिया भोगासी. शेवटी बर्‍याच दिवसांचा पेंडींग इश्शू, म्हणजे पीएनजी मधे जाऊन नवीन कानातलं, नंतर तळ्यातला गणपती, मग भेळ पाणीपुरी आणि शेवटी दुर्वांकुरमधे जेवण या अटींवर तह करून प्रकरण मिटवले आणि डोक्यावर थंड पाणी शिंपडून पुन्हा झोपी गेलो.

.....(समाप्त)......

कथाविडंबनविनोदलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

19 May 2014 - 12:22 pm | आत्मशून्य

बबन ताम्बे's picture

19 May 2014 - 12:51 pm | बबन ताम्बे

धन्यवाद आत्मशून्यजी.

पैसा's picture

19 May 2014 - 1:43 pm | पैसा

मस्त आहे!

बबन ताम्बे's picture

19 May 2014 - 8:13 pm | बबन ताम्बे

धन्यवाद !

याचा शेवट स्वप्नात केला नसता तर अधिक मजा आली असती!
छान लिहिले आहे.

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
शेवट स्वप्नात केला नसता तर अधिक मजा आली असती याबाबत सहमत! पण वैयक्तिकरित्या मला असे वाटते की कीतीही लेखनस्वातंत्र्य घेतले तरी कुणाच्या भावना न दुखवण्याचे तारतम्य ठेवावेच लागेल, नाही का?

चौथा कोनाडा's picture

19 May 2014 - 10:45 pm | चौथा कोनाडा

मस्त ! धमाल आली शेवटचाही भाग वाचायला ! भरपूर प्रसंग कौशल्याने विणले आहेत ! सिनेमाचे स्क्रिप्ट वाचत आहोत असे वाटले ! मजा आली !
पुलेशु !

बबन ताम्बे's picture

20 May 2014 - 11:20 am | बबन ताम्बे

श्री. चौथा कोनाडा ,
आवर्जून प्रतिसादाबद्द्ल थँक यु.