कलगीतुरा- भाग ४

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
12 May 2014 - 12:50 pm

याआधीचे भाग खालील लिंकमध्ये वाचणे.
कलगीतुरा- भाग १
कलगीतुरा- भाग २
कलगीतुरा-भाग ३

"तर मित्रांनो, उद्धवजी आणि राजजी त्यांचे विचार मांडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपणा सर्वांची उत्सुकता आता ताणलेली आहे. जास्त "ताणण्याआधी" आपण एक अगदी छोटीशी विश्रांती घेऊ या. कुठेही जाऊ नका." वाशाने "ताणण्याआधी" या शब्दावर जोर दिला.

पुन्हा जाहीराती सुरू झाल्या. "कार्यक्रमाच्या पुढील भागाचे प्रायोजक आहेत, (जिंगल ऐकू येते) घराला गारपण देणारी माणसं,घराला गारपण देणारी माणसं " .
उन्हाळा असल्यामुळे पंखे, कूलर बनविणारी एक कंपनी पुढचा भाग प्रायोजीत करणार होती त्याची ही जाहीरात. आजकाल जाहीरातीत पण ढापाढापी चालते तर.

जाहीराती संपल्या आणि पुन्हा एकदा वाशाची एन्ट्री झाली.
"नमस्कार. गुळाचे खाणार त्याला चंपक देणार. पुन्हा आपले स्वागत आहे…”
आयला ? ही काय चंपकलाल अँड सन्सची टॅग लाइन आहे की काय ? आणि ती म्हटली नाही तर चंपकशेठनी वाशाला नोकरीवरून काढून टाकीन असा ढोस दिलाय की काय? प्रत्येक वेळी एंट्रीला ही टॅग लाइन बोलत असतो.

“तर आता पहीला प्रश्न कुणाला विचारायचा याचा पण आपण छापा काटा करू या " वाशा.
"ए वाशा,कानाखाली जाळ काढीन. आल्यापासून बघतोय झुकते माप तिकडेच आहे. छापा काटयात पण सेटींग? साल्या तुझी ही जुनी खोड आहे. कॉलेजमधे पण संगीतखुर्चीच्या वेळी पोरी बरोबर खुर्चीच्या जवळ आल्या की तू म्युझिक बंद करायचा आणि आम्हाला आउट करायचा. काही नाही छापा काटा.आपल्याला रोकठोक आवडतं.विचार पहीला प्रश्न मला" राजसाहेब भडकले.
च्याआयला? वाशा आणि राजसाहेब कॉलेजमधे एकत्र शिकत होते? म्हणजे वाशाची राजसाहेबांबरोबर कॉलेजला असल्यापासून जानपहचान आहे? एव्ह्ढया बाता मारतो पण ही गोष्ट कधी बोलला नाही भिकारxx !
"सेटींग कुणाचं कुणाशी आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे " उद्धवजींनी पण फटाके फोडायला सुरूवात केली.
"आम्ही काहीही केलं की तुम्हाला सेटींगचाच वास येणार. आम्ही पा xx (इथे कू s s क असा आवाज येतो.) नाही तरी तुम्हा लोकांना वास येतो. " राजजीं.
"काही ऐकू नका त्याचं” – उद्धवजी;"करा नाणेफेक. आपली नाण्याच्या ज्या बाजूला तीन सिंह असतात ती बाजू. खरं म्हणजे तीन वाघ पाहीजे होते. मधे बाबा, एका बाजूला मी आणि दुसर्या बाजूला आदित्य असं प्रतिक -"
"पण तुमच्याबरोबर अजून एक चौथा वाघ होता की.. " वाशाने काडी टाकली. साला वस्ताद आहे.
"तो वाघ नव्हता. बेडूक होता. अशी अनेक बेडकं टुणकन उडया मारून पळाली." उद्धवजी.
"मी बेडूक? अरे आज जे काय कमावलय ते स्वतःच्या जिगरीवर. आयत्या बिळावर नागोबा नाही.विधानसभेत तेरा आमदार, नाशकात सत्ता, पुण्यात, मुंबईत ढीगाने नगरसेवक. एकटयाच्या करीश्म्यावर केलंय हे.. आपण कधीच आपली औकात दाखवून दिली आहे." राजजीं.
"हो. बाबांचीच सगळी नक्कल. पार बोलण्यापासून तर कुंचल्यापर्यंत. "उचल्या" कुठला ! "
"आणि तू फोटोग्राफीच्या टीप वाघांकडून घ्यायचास तेंव्हा? तुला काय म्हणू ? टीपल्या ? "
"ठीक आहे, ठीक आहे. नाणेफेक न करता आपण पहील्या प्रश्नाकडे वळू या.तमाम जनतेच्या वतीने मी तुम्हा दोघांना असे विचारतो की तुम्ही दोघे बंधू पुन्हा एकत्र कधी येणार? " वाशाने कळीचा प्रश्न विचारला.
"झाली सूरू चावून चावून चोथा झालेली चर्चा. आमच्या पक्षाच्या मुखपत्रात कुणी टाळी बिळी साठी हात पुढे करतोय वगैरे छापले असेल तर ती जबाबदारी माझी नाही." उद्धवजी.
"माझे तरी काय खेटर अडलेय. आपला हात टाळी देण्यासाठी नाही. अफवा पसरविणारांच्या कानफटात वाजवण्यासाठी आहे." राज.
"आम्हाला दोन्ही काँग्रेस आणि इतर चिल्लर गाडायला आणखी कुणाचीही गरज नाही. त्यासाठीआम्ही पाच पांडव पुरेसे आहोत.” उद्धवजी.
"काय पण एक एक जमवलेहेत. पाच पांडव म्हणे. एक यंव करु, टयंव करू, दाऊदच्या मुस्क्या बांधू अशा नुस्त्या बढाया मारणारे, दुसरे र ला र आणि ठ ला ठ जोडून पुचाट कविता पाडणारे, तिसरे - "
"असू दे." उद्धवजी राजना मधेच तोडत - " पत्थरके घरोमें रैनेवाले दुसरोंके घरोंपे काच नही फेका करते जानी .. तुझ्या भोवती काय नग आहेत माहीती आहे आम्हाला."
"अरे डायलॉग तरी नीट पाठ करून ये. डायलॉग असा आहे -" राजजी अमिताभ बच्चनची ती प्रसिद्ध पोज घेतात (उजवा हात कमरेवर आणि डाव्या हाताचा पंजा हालवत थोडे वाकून “हाँय?” अशी सुरूवात करून डायलॉग बोलण्याची ती प्रसिद्ध पोज )." शिशे के घर में रहनेवाले, दुसरोंके घरोंपे फत्तर नही फेका करते जानी ssss!! "
"नाही, डायलॉग असेल बरोबर. पण पोज जानी राजकुमारची नाही वाटत. नीट नकला करायला शिक. बाबा पवारसाहेबांची कशी नक्कल करायचे सभेत. तसं शिक जरा .." उद्धवजी.
"बरं आता आपण दुसर्या मुद्द्याकडे वळू या. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासासाठी तुमच्या पक्षाच्या काय योजना आहेत ते आमच्या दर्शकांना सांगणार का? " वाशा.
"आमच्या खूप योजना आहेत. पण घरभेदयांनीच मराठी माणसाचे पाय ओढावेत हा या शिवरायांच्या भूमीला पुरातन शाप आहे." उद्धवजी.
"मी घरभेदी ? ज्या विठ्ठलावर माझी भक्ती होती, त्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी होती. ते मला माझ्या विठ्ठलापर्यंत पोहोचू देत नव्हते.." राज.
"अरे विठ्ठल म्हणवतोस आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खूपसतोस ? अरे, घरी वडे तळले तर ते म्हणायचे एकटे एकटे काय खाताय - "
"हो ऐकलेय मी ते. बिचारे. ऐकून खूप वाईट वाटायचे." राजजी.
"पुर्ण ऐकून घे. (सद्गतीत स्वरात)- ते म्हणायचे, त्या माझ्या बछडयाला पण एक दोन वडे नेऊन दया." उद्धवजी गहीवरतात.
"आणि मी काय कमी केलेय काय? (दुप्पट गहीवरून)- गरिब नवाझ चिकन सेंटरमधून चिकन आणायचो, तेंव्हा करीमला सांगायचो, अरे एका किलोत जरा एक दोन पिस जास्त टाक. माझ्या विठ्ठलाला डॉक्टरांनी चिकन सूप दयायला सांगितलेय. आमचे सैनिक वाटीत पार बांद्र्याला चिकन सूप घेऊन यायचे. (उसळून) - पण विठ्ठलाभोवती बडवे होते ना. तेच ते चिकन सूप फस्त करायचे."
"शी शी शी. बडवे काय, चिकन सूप काय. अरे उपमा तरी धड वापर! बडव्यांच्या अठरा पिढयांमध्ये कुणी चिकन खाल्ले असेल काय ? " उद्धवजी.
"तर मंडळी, चर्चा अशीच चालू राहील. आपण घेऊ या एक छोटीशी विश्रांती. हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो." वाशाने रंगात आलेला कलगीतुरा थांबवला.

लगेच जाहीराती सुरू झाल्या.
मी खिडकीबाहेर बघितले. रस्त्यावर पार सामसूम. कार्यक्रमाचा टी आर पी सॉल्लिड वाढलेला दिसत होता. गॅलरीत गोगटया थेरडयाचा जळून जळून पार कोळसा झालेला दिसत होता. मी त्याला अजून जळवायचे ठरवले. मी त्याला ऐकू जाईल अशा आवाजात हिला म्हटले," अगं, बाणेरच्या त्या रो हाऊसची काय किंमत असेल गं? दोन कोटी असली तरी हरकत नाही. एकदम पॉश रो हाऊस घेऊन टाकू. इथल्या काही दळभद्री लोकांमुळे या सोसायटीत रहायची अजिबात इच्छा नाही." गोगटया तिकडून माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होता.
"दोन कोटी? मग बाबा, अॅमनोरात क्रिस्टल टॉवरमध्ये टॉपचा टेरेस फ्लॅट बघू या की " - चिंगी. "माझ्या मैत्रिणीचे वडील तिथे सेल्स ऑफिसमधे आहेत. थांबा, मी तिला फोन करून विचारते."
"मी पण मित्राला फोन करून येतो"- आमचा बंडया. " वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीची काय फी आहे ते विचारतो. मला पण फ्युचरमधे आयपीएल मध्ये खेळायचेय." हा आत्ताशी सातवीला नाही तर आयपीएलची स्वप्न बघतोय.
दोघेही त्यांच्या रूममध्ये पळाले. सेल फोनवर बोलताना त्यांना प्रायव्हसी लागते.
मी ही संधी साधून हीला म्हटले, " अगं तुझी खूप इच्छा आहे ना त्या मलाबार ज्वेलरच्या जाहीरातीत करीना कपूरने जसा हिर्‍यांचा हार घातलाय तसा तूला पण घ्यायचाय? दहा कोटींचा चेक आला की लगेच तसा हार घेऊन टाकू."
"अय्या खरंच? तुम्ही कित्ती चांगले आहात हो ?" असे म्हणून हीने माझे एव्ह्ढया वर्षांनी चक्क चुंबन घेतले. तिकडे गोगटया थेरडा गॅलरीतून पहात होता. तो ४४० व्होल्टचा धक्का बसल्यासारखा गॅलरीत कोलमडला. चडफडत शेवटी "एव्ह्ढी मोठी पोरं झालीत तरी अजून थेरं करताहेत. काही लाजलज्जा ?" असं पुटपुटत तोंड वेंगाडून घरात पळाला.म्हटलं जळ लेका. मी अजून हीला जवळ घ्यायचा प्रयत्न करणार तितक्यात चिंगी आली.
"बाबा, अ‍ॅमनोरात क्रिस्टल टॉवरमधे वरचे फ्लॅट शिल्लक नाहीयेत."
"मग जाऊ दे. आपण रो हाऊसच बघू." मी. तेव्ह्ढयात आमचा बंडया पण आला.
"अहो मी काय म्हणते… "- ही," बंडयाला आपण अमेरीकेत पाठवू या का ग्रॅज्युएशनला? माझ्या मामांच्या मेव्हण्याच्या मावशीचा मुलगा अमेरिकेत एमआयटी आहे तिथे शिकतोय म्हणे."
"एमआयटीतच जायचेय तर पार अमेरिकेत कशाला जायला पायजे? कोथरुडला आहे की? " मी.
ह्या पुण्यातल्या शिक्षणसंस्था जगात कुठे शाखा काढतील याचा काही नेम नाही. उदया चंद्रावर सुद्धा काढतील.
"अहो कोथरूडची एमआयटी नाही बाबा. अमेरिकेतली एमआयटी म्हणजे मॅसाच्युटेस इंस्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी. बोस्टनला आहे ती. खूप जुनी आहे. जगात पहिल्या पाच नंबरात आहे.माझ्या एका मित्राचा मोठा भाऊ तिथे शिकतोय. त्याने तिथे एक अमेरीकन पोरगी पण पटवलीय." आमचा बंडया उर्फ शेंडेफळ.
या कारटयाचे कौतुक करावे की कानफटात दयावी तेच कळेना. अमेरीकन पोरगी पटवलीय हे सांगायची काय गरज होती का? आगाऊ कार्टा !
ही मात्र लेकाकडे कौतुकाने आणि माझ्याकडे काय बावळट आहे अशा नजरेने बघत होती. जसे काय हीला खूप माहीती. मागे दिवाळीला आम्ही काँप्युटर घेतला तेंव्हा हीने लगेच हीच्या खास मैत्रिणीला फोन लावला होता."अगं ऐकलंस का? आम्ही काँप्युटर घेतलाय. हो हो,कलरच घेतलाय. कंपनी? हिंदुस्तान पेट्रोलियम…. अगं केव्ह्ढयाने किंचाळतेहेस? हे एच पी काय म्हणत होते. मला नाही माहीत बाई एच पी नावाची दुसरी कुठली कंपनी आहे ते. आमच्या निखिलचे मॅथ्सचे सर म्हटले की निखिलला मॅथ्सच्या ऑलिंपियाडला बसवायचेय तर काँप्युटर हवाच ." हे मात्र मैत्रिणीला जळवायला. वास्तविक बंडयाचे मॅथ्स म्हणजे सगळ्यांना डोकेफोड आहे.
"आणि ऐकनागं, आम्हाला काँप्युटर बरोबर तीन महीन्याचे इंटरनेट पॅकेज पण फुकट मिळालेय. हे म्हणत होते की आता बँकेची कामे घरबसल्या होतील. बरं झालं बाई. पैसे हवे असले की बँकेत नको जायला की एटीएम मध्ये नको जायला. घरच्या घरी पाहीजे तेंव्हा पैसे काढता येतील."
मी, बंडया आणि चिंगी जेवत होतो. हीने असं म्हटल्यावर आमच्या घशातच घास अडकला. मला खात्री आहे की हिच्या त्या खास मैत्रीणीची लेव्हल सेम असेल तर तिने नवर्याच्या मागे असाच काँप्युटर घ्यायचा लकडा लावला असेल. आणि चुकून लेव्हल थोडी वरची असेल (ती शक्यता कमीच. यांच्या सगळ्या ग्रुपला शाहरूखखान आवडतो. काय ते बकरीसारखं बॅ बॅ करत बोलतं!), तर निश्चित ती मुर्च्छा येऊन पडली असेल.

जाहीराती संपल्या. पुन्हा वाशाची एंट्री झाली.
"नमस्कार मंडळी. पुन्हा आपले स्वागत. चर्चा अतिशय रंगात आलेली आहे. तर उद्धवजी आणि राजजी, तमाम मराठी तरुणांसाठी आपला काय संदेश आहे ? "
"स्वतःच्या हिमतीवर ऊभे रहा." उद्धवजी.
"मराठी तरुणांनी माझा आदर्श घ्यावा." राजजी.
"तू काय केले रे मराठी तरुणांसाठी? " उद्धवजी.
"मागे भय्यांना चोपले नाही? "
"मग आम्ही काय बांगडया भरून होतो काय? मागे बेस्ट बस कुणी फोडल्या?"
"मी मागे मायकेल जॅक्सनला नाचवलेय मराठी तरुणांसाठी!"
"आम्ही - "
एव्हढयात लाईट गेले. श्श्या ! मस्त प्रोग्रॅम रंगला होता. ह्या एमएसइबीला आत्ताच लाईट घालवायची दुर्बुद्धी सुचली.
एनीवे, मला एव्ह्ढी काय चुटपुट लागून राहीली नाही. कार्यक्रम बंद पडला तरी मला काही फरक पडणार नव्हता. दहा कोटी आता १०० टक्के फिक्स झाले होते. संपुर्ण शरीरात आनंदाची लहर सळसळत होती. वाशा आणि कांतीशेठबद्दल अपार कृतज्ञता दाटुन आली होती.हीला म्हटले मी काय जेवणार नाही. रात्री दहा वाजताच अत्यंत समाधानाने मी झोपी गेलो.
गाढ झोपेत असताना अचानक बेलच्या आवाजाने जाग आली. घडयाळात पाहीले तर पहाटेचे चार वाजले होते. एव्ह्ढया पहाटे कोण आले तडमडायला असा विचार करुन मी दार उघडले. दारात कांतीशेठ. चेहरा पार काळा निळा होऊन सुजलेला, तोंडातून रक्त येत होते. मी घाबरून मोठयाने किंचाळलो. "कांतीशेठ? आत्ता येव्ह्ढया पहाटे? आणि ही काय हालत झालीहे. सगळं ठीक आहे ना?"
"अरे दिगूशेठ, मला वाचव. पुरता बरबाद झालो मी. माझा जीव वाचव. मला पहीला आत घे." गयावया करत कांतीशेठ रडू लागला.
त्याला मी आत घेतले. प्यायला पाणी दिले. तो थोडा शांत झाल्यावर त्याला विचारले ," कांतीशेठ,काय झाले ते सांगा पाहू. कुणी येणार नाही इथे. न घाबरता सांगा."
"अरे काय सांगू दिगुशेठ, हे सगळा हालत तो तुझा दोस्त वाशामुळे झ्याला." कांतीशेठ.
"काय ?" मी मोठयाने किंचाळलो. "ही तुमची हालत वाशामुळे झाली? त्याने मारले की काय तुम्हाला?" मी.
"नाय, त्याने नाय मारले मला. ते उद्धवजी आणि राजजींची दोन तगडी माणसे, कदमभाऊ आणि शिशिर शिंदे को कोण हाय ते, त्यांनी मातोश्रीवर नेऊन उद्धवजी आणि राजजींसमोर मला लय बडवला." कांतीशेठ ओक्साबोक्सी रडू लागला.
"अरे पण का? वाशाने असे काय केले की तुम्ही एव्ह्ढा मार खाल्ला? " मला काय कळेना.
"सांगते, सगळे सांगते." आणि कांतीशेठ सांगू लागला.

....(क्रमश: ).....

कथाविडंबनविनोदलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

12 May 2014 - 1:21 pm | आत्मशून्य

बबन ताम्बे's picture

12 May 2014 - 4:05 pm | बबन ताम्बे

धन्यवाद आत्मशून्य !

प्यारे१'s picture

12 May 2014 - 1:42 pm | प्यारे१

पु भा प्र

बबन ताम्बे's picture

12 May 2014 - 4:07 pm | बबन ताम्बे

श्री.प्रशांत आवलेजी,
पुढील (शेवटचा) लेख लवकरच येतोय.

पैसा's picture

12 May 2014 - 1:49 pm | पैसा

सॉलिड धमाल येते आहे! एकापेक्षा एकेक भारी प्रकार आहेत!

बबन ताम्बे's picture

12 May 2014 - 4:08 pm | बबन ताम्बे

थँक्स.
पुढील (आणि शेवटचा) भाग लवकरच येतोय.

मस्त झालेत सगळे भाग... वाचत आहे.

शेवटचा भाग देखील लवकर टाका ही नम्र विनंती.

बबन ताम्बे's picture

12 May 2014 - 5:47 pm | बबन ताम्बे

थँक यु शिद. पुढील भाग नक्कीच लवकर येईल.