कलगीतुरा-भाग ३

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
5 May 2014 - 12:25 pm

या आधीच्या भागांची लिन्क खाली देत आहे.
कलगीतुरा- भाग १
कलगीतुरा- भाग २

बघता बघता तो दिवस उजाडला. जसजशी वेळ जवळ येत चालली तसतशी उत्कंठा शिगेला पोहचली. संध्याकाळी साडे सात वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. पण सकाळपासूनच टी. व्ही. वर सतत कार्यक्रमाच्या जाहीरातींचा मारा चालला होता. मला कार्यक्रमापेक्षा प्रचंड उत्सुकता होती कांतीशेठच्या या व्हेंचर (की अ‍ॅडव्हेंच्रर?) चा आत्तापर्यंतचा ताळेबंद काय झाला असेल! मला रहावेना म्हणून मी कांतीशेठला फोन लावला. कांतीशेठने फोनवर "हेलो" म्हटले आणि दुसर्या फोनवर " नो नो. नथिंग लेस, नथिंग मोअर. बिचमधल्या एडवर्टाइजला एक सेकन्दाच्या बीस लाख रुपीया. .." असे बोलत होता. मी पुन्हा "कांतीशेठ !!" असे या बाजूने ओरडलो.
"अरे दिगूशेठ ? हॅ हॅ हॅ, अरे शंभर कोटीचा प्रॉफिट ज्यवळ आलाय. लय एडवरटाइज मिळाले. अजून पण लय डिमांड हाय. साऱखा फोन च्यालू हाय. तू काय कालजी करू नको. तू दस कोटीचा प्लानींग सुरू कर आता. तुझ्या दोस्त वाशाला पण सांग प्लानींग करायला. लय भारी दोस्त हाय तुझा. बरं चल, ठेवू का फोन? अजून बराच धंदा बाकी हाय."
"बरं बरं ! हॅ हॅ हॅ. कांतीशेठ, चालू दया तुमचं. काय नाय सहज फोन केला. थँक्स, बाय ." आपली उगाच मधे आडकाठी कशाला ?

मी पण आता हवेत गेलो. दहा कोटी निश्चित झाले होते. दहा कोटी? मी एका वर कीती शून्य असतात हे मोजायला लागलो. पण टोटल लागेना. शेवटी कांतीशेठवरच जे देईल त्यावर भरोसा ठेवू असा विचार केला.
वाशाबद्दल तर खूप आदर वाटायला लागला. मी अपार कृतज्ञतेने त्याला फोन केला.
"हेल्लो. कोण वाशा? अरे कांतीशेठचा फोन होता. आपले दोघांचे दहा कोटी फिक्स झाले. ..."
"मग? होणारच ! आपलं कामच असं असतं! कांतीशेठ्नी केलंय काय? सगळा गाइडंस आपला आहे."
"खरंच वाशा. आज तुझ्यामुळे.." मी सद्गतीत झालो. माझ्याच्याने पुढे बोलवेना.
"अरे दोस्तासाठी नाही करायचे तर कुणासाठी करायचे ? आँ ? चल आपण बाणेरला शेजारी शेजारी लक्झरीअस रो हाऊस घेऊन टाकू आता. ते पण डबल पार्किंग असलेलं. पुढं मस्त गार्डन आणि टेरेसवर मस्त बार ! भन्नाट लाइफ जगू आता आपण. बरं आता कार्यक्रम सुरू व्हायला फक्त पाच मिनिट राहीलीत. बोलू या आपण नंतर.." असे म्हणून वाशाने फोन ठेवला.

मी सहज रस्त्यावर नजर टाकली. सगळे रस्ते ओस पडले होते. घराघरात टी. व्ही. चालू होते.
वाशाचा आणि माझा फोनवरचा संवाद चिरंजीवांनी ऐकला आणि किचनमधे जाऊन आईला सांगितला. ही आणि चिंगी आनंदाने चित्कारत, ओरडतच माझ्याकडे आल्या.
"अय्या दहा कोटी? बरं झालं बाई, त्या मलाबार ज्वेलरच्या जाहीरातीत करीना कपूरच्या गळ्यात जसा हार आहे, तसा हार घ्यायची माझी खूप इच्छा होती. सप्तश्रुंगी देवीने माझं गार्‍हाणं ऐकलं.."
"पप्पा, मी आता सगळ्या टॉप ब्रँडचा एक एक ड्रेस घेणार कॉलेजला जायला. आणि जायला यायला
अ‍ॅक्टीव्हा .अ‍ॅपलचा चाळीस हजाराचा मोबाईल पण घ्यायचाय......" चिंगी.
"पप्पा, मलाही सगळे ब्रँडेड कपडे आणि शूज घ्यायचेत. मागच्या वेळी तुम्ही आदिदास ऐवजी आदिबास ह्या कुठल्यातरी नकली ब्रँडचे शूज घेतले. मला माझे सगळे मित्र चिडवत होते..."
"अरे गपा ये." मी वैतागलो, " आधी टी.व्ही. लावा पाहू. प्लानिंग आपण सावकाश करू. करायचय. सगळ्यांसाठी करायचय".
माझ्या आश्वासनानंतर चिडिचूप शांतता झाली. चिंगीने टी.व्ही. सूरू केला.

टी. व्ही. वर अजूनही जाहीराती चालू होत्या. मी खिडकीकडे नजर टाकली. गोगटया थेरडा गॅलरीत येऊन बसला होता. आमचं चांगलं कधी याला पहावत नाही. आजही त्याने घरात टी.व्ही. न लावता आमची (झालीच तर) फजीती बघण्यासाठी गॅलरीत ठाण मांडले. मी ठरवले आज याला जळवायचाच.

साडे सातला काहीच सेकंद राहीले. टी.व्ही. स्क्रीन वर जाहीरात सुरू झाली - "रणसंग्राम अर्थात सुंदोपसुंदी " या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, चंपकलाल अँड सन्स, गुळाचे ठोक भावाचे व्यापारी, गुळ आळी. गुळाचे खाणार त्याला चंपक देणार."
चंपकलाल अँड सन्स? ही तर वाशाची कंपनी !
नंतर छोटया अक्षरात टी.व्ही. च्या स्क्रीन वर काही तरी अक्षरे आली आणि रेडीओवर जसं फास्ट बोलतात तसे फास्ट बोलून ती अक्षरे दोन सेकंदात गायब झाली.
एकदाचे काऊंटडाऊन सुरू झाले. तीन, दोन, एक, शून्य....
ढॅण्टया ढँण... केबीसी टाइप म्युझिक, सेट पण तसाच जबरदस्त.
सगळ्यात आधी अँकरची एन्ट्री. कॅमेरा झॅकपाक कपडे घातलेल्या अँकरच्या जसजसा जवळ जायला लागला तसतसा चेहरा ओळखीचा वाटायला लागला. आणि मी "वाशा ...? ", ही "वासू भाऊजी...?", चिंगी आणि बंडया " वासू अंकल..?" असं एकदम ओरडलो.

"नमस्कार मंडळी. रामराम, सलाम आलेकूम, सत्श्रीआकाल, गूड इव्हीनींग. " वाशानी जोरदार सुरवात केली.
"तुम्ही ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहात आहात, तो क्षण समीप आलेला आहे. मी श्री. वासूदेव तिरमारे, बी.कॉम, पेशाने अकाऊंटंट, चंपकलाल अँड सन्स, आपणा सर्वांचे मनपूर्वक, खरं म्हणजे मनसेपुर्वक स्वागत करीत आहे.." वाशाच्या कोटीला सेटवरच्या प्रेक्षकांची जोरदार दाद मिळाली. टाळ्यांचा कडकडाट झाला.
"आपल्याकडे इथे दोन बाजूंना दोन पोडीयम आहेत. एक उजवीकडे आणि एक डावीकडे. तर उजवीकडे कुणी उभं रहायचं आणि डावीकडे कुणी उभं रहायचं याचा निर्णय आपण नाणेफेक करून घेऊ या. त्याआधी एक अगदी छोटासी विश्रांती घेऊ या. हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो. तर थोडया वेळाने पाहू या, नाणेफेक. कुठेही जाऊ नका ..."
मला खात्री पटली या सगळ्या आयडीया वाशाच्याच असणार. कॉलेजमधे असताना फन फेअर, गॅदरींग, नाटके यातील अनुभव त्याला आत्ता कामाला आला. फक्त हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो ही नक्कल त्याने करायला नको होती. रसभंग होतो त्यामुळे.

जाहीराती सूरू झाल्या. "नाणेफेकीचे प्रायोजक आहेत, अलाणे आणि फलाणे सन्स.एकदा आमचे लोणचे खाऊन तर पहा ...".

जाहीराती संपल्या आणि पुन्हा एकदा वाशाची टाळ्यांच्या कडकडाटात एन्ट्री झाली.
"नमस्कार. गुळाचे खाणार त्याला चंपक देणार. पुन्हा आपले स्वागत आहे. तर प्रथम येत आहेत....(वाशाचा पॉज), उद्ध्वजी ठाकरे. जोरदार स्वागत झाले पाहीजे मित्रांनो.."
उजव्या बाजुने स्टेजवर उद्ध्वजी अभिवादन करत येताना दिसले. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. नेहमी पेपरमधे फोटो बघतो त्यापेक्षा तरुण दिसत होते. कपाळावर केशसंभार पण जास्त दिसत होता.
"आता येत आहेत... (मोठा पॉज).. राजसाहेब ठाकरे ! त्यांचं जोरदार मनसे स्वागत करू या ..."
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रा़जसाहेबांची एंट्री झाली.
"श्री. उद्धवसाहेब आणि राजसाहेब, डिबेटींग सूरु होण्याआधी आपण तुमची जागा मुक्रर करू या. त्यासाठी आपण टॉस करू या ..."
"अरे आईच्या भाषेत बोल की. मराठीत बोलायला काय लाज वाटते? नाणेफेक म्हण.." राजसाहेब कडाडले.
वाशा गडबडला. पण लगेच सावरला. " हो हो... हॅ हॅ हॅ, तर नाणेफेक करून आपण कुणी कोणत्या बाजूने डिबेटींग, सॉरी, वादविवाद घालायचा, सॉरी करायचा, ते आपण ठरवू या. तर उद्धवजी, आपला काय? छापा की काटा? "
"आपला ज्या बाजूला तीन सिंह दिसतात तो. खरं वाघ पाहीजे होते " उद्धवजी.
"व्वा व्वा. राजजी आपला? "
"आता आम्हाला काय चॉइस (जीभ चावतात. पण पर्यायी मराठी शब्द सुचत नाही) राहीलाय काय? ज्या बाजूला पैशाचा आकडा असतो ती आमची बाजू.."
"व्वा व्वा व्वा. आता हे नाणं मी उंच फेकतो. "
वाशाने नाणे फेकले आणि खाली पडल्यानंतर जाहीर केले.
"छापा !! उद्धवसाहेब, उजव्या बाजूला तुम्ही आणि राजसाहेब, तुम्ही डाव्या बाजूकडील माईकवर."
दोघेही स्थानापन्न होतात.

...(क्रमशः)....

कथाविडंबनविनोदलेख

प्रतिक्रिया

आतिवास's picture

5 May 2014 - 6:21 pm | आतिवास

वाचते आहे. आवडतंय.

बबन ताम्बे's picture

5 May 2014 - 7:55 pm | बबन ताम्बे

धन्यवाद.
:-)

चौथा कोनाडा's picture

5 May 2014 - 9:18 pm | चौथा कोनाडा

हा ही भाग भन्नाट! आवडला! संवाद मस्तच !
>>फक्त हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो ही नक्कल त्याने करायला नको होती.<< झकास टोला !
पुभाप्र.

बबन ताम्बे's picture

6 May 2014 - 7:24 pm | बबन ताम्बे

धन्यवाद.
पुढचा भाग लवकरच येतोय.

मितान's picture

6 May 2014 - 9:54 am | मितान

वाचतेय...
आवडतंय..

बबन ताम्बे's picture

6 May 2014 - 7:26 pm | बबन ताम्बे

थँक यु.
असेच प्रोत्साहन मिळो . :-)

पैसा's picture

6 May 2014 - 7:55 pm | पैसा

हे काय गौडबंगाल आहे विचार करतेय! *scratch_one-s_head*

बबन ताम्बे's picture

6 May 2014 - 8:30 pm | बबन ताम्बे

कोणते गौडबंगाल? कळले नाही.

बबन ताम्बे's picture

6 May 2014 - 8:37 pm | बबन ताम्बे

अच्छा, गुळाचे "गौडबंगाल" म्हणायचेय का तुम्हाला?
ती चंपकलाल अँड सन्सची टॅग लाईन आहे. वाशा उर्फ वासुदेव तिरमारें स्वतःच्या कंपनीची (म्हणजे प्रॉडक्टची - गुळाची) जाहीरात करताहेत. :-)

पैसा's picture

6 May 2014 - 8:53 pm | पैसा

या चिरकुट मंडळींनी हे दोन वाघ सिंव्ह एकत्र कुठून आणले? कथा म्हटली तरी जाम उत्सुकता आहे! *biggrin*

याचे उत्तर लवकरच मिळेल. :-)