कलगीतुरा - पूर्वार्ध

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
28 Apr 2014 - 12:17 pm

आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता. कुणी कुणाचा वडा तळूण काढला, कुणी दुस-याला बेडकाची उपमा दिली, कुणी मौत का सौदागर म्हटले, कुणी इटलीला पार्सल पाठवून दया म्हटले. पेपरमधे, टी. व्ही. वर रोज अश्या हेडलाईन्सचा धुमाकुळ चालला होता.शेवटी वैतागून मी टी. व्ही. बंद केला आणि खिडकीतून प्रचाराची गंमत पहात ऊभा राहीलो. तेव्ह्ढयात रस्त्यावरून कांतीशेठ खुषीत डुलत डुलत येताना दिसला. कांतीशेठ खुषीत डुलत डुलत येताना दिसला की समजायचे याच्या डोक्यात एखादी भन्नाट आयडीया आली असणार आणि ती माझ्या गळ्यात उतरवायला बघणार. हा विचार मनात येतोय ना येतोय तोवर दाराची बेल वाजली. दार उघडले तर दारात कांतीशेठ हजर !

"अरे केम छो भाया..." कांतीशेठ आडव्या केळ्यासारखा या टोकापासून त्या टोकापर्यंत हसत म्हणाला.
"अरे कांतीशेठ ? आव आव. बैसो. मजामा छे." मी. मला एव्ह्ढेच गुजराती येते.
"अरे चाय बीय सांगना वैनींना? मस्त एक बिजनेसची आयडीया भेजामंदी आलीय. पयला तुझ्याकडे आले बाते करायला." कांतीशेठ एकदम हर्षभरीत उत्साहाने सांगायला लागला. बिझनेस म्हटल्यावर मी जरा सावध झालो. मागच्या वेळी असेच याने मला मनी ग्रोवर स्किमचे गाजर दाखवले आणि झोपवले.
"नाय नाय कांतीशेठ. बिझनेस आपला प्रांत नाही.ते आपल्याला जमणार नाही..." मी यावेळी कांतीशेठला अजिबात बधायचे नाही असे ठरवले.
"तुमी घाटी लोग असेच मागे रहाणार आणि समदा बिजनेस गुजराती मारवाडी लोकांनी कॅप्चर केला म्हणणार. साले कदी सुधरनार तुमी घाटी लोग? अरे लाखो करोडोंचा बिजीनेसचा प्रपोजल घेऊन आलेय मी..." कांतीशेठचं मराठी म्हणजे पुल्लींग, स्त्रीलींग याचा काही संबंध नसतो.

लाखो करोडोंचा बिजीनेस हे ऐकल्यावर आमची सौ. बाहेर आली आणि माझ्यावर वसकन ओरडली, " अहो ऐकून तर घ्या ना ते काय म्हणताहेत ते? ऐकून घ्यायच्या आधीच तुमची झाली म्यांव म्यांव सुरू..."
घरचाच असा आहेर मिळाल्यावर कांतीशेठला दुप्पट चेव आला.

"त्याचं काय हाय वैनी.." कांतीशेठनी आता माझ्यावरून फोकस काढला. फोकस बदलताना तुम्हा घाटी लोगांमधी बायडीच जास्ती हुशार असते असा चेह-यावर भाव. " आत्ताची निवडणूक हायना वैनी, तेच्यात पैसा कमवायला लै चांस हाय बगा."
"तो कसा? ". हिने आणि मी एकाच सूरात विचारले.
"जरा इचार करनी. दोन चुलत भाऊ दररोज एकमेकांवर चिखलफेक करतेय. नाय नाय ते एकमेकाला बोलते. आणि पब्लिकला पण ते जाम आवडतेय ..."
"अछा मग? " माझा इंटरेस्ट जायला लागला. पण अर्थात कांतीशेठ माझ्याकडे बघून बोलत नव्हताच मुळी. त्याने माझ्याकडे साफ दुर्लक्ष केले.
"कसं हाय वैनी. ते अमेरिकेत जसे प्रेसिडेंटचे केंडीडेट डिबेटींगला टी. व्ही. वर येते आणि एकमेकांशी वाद घालते ना , तशे आपण या दोन भावांना टी.व्ही. वर डिबेटींगला आणू....".
"काय?". मी जोरात ओरडलो. " नाय नाय कांतीशेठ, हे शक्य नाही. ते टाळी प्रकरण तुम्हाला माहीतीच आहे. फोनवरून सुद्धा त्या दोघांनी टाळी दिली नाही तर समोरासमोर डिबेटींग? "
"अरे ते पॉसिबल नाय ते मला माहीती हाय. म्हणून तर मी तुझ्याकडे आले ! तू त्या दोघांना टी. व्ही. वर समोरासमोर आणायचे".

आता मात्र मला चक्कर यायला लागली. पिपात मेल्या उंदीर.... अशी आमची जिंदगानी. सोसायटीचा वॉचमनदेखील भाव देत नाही.आणि इथे हा कांतीशेठ उदयाच्या महाराष्ट्राच्या दोन भावी छत्रपतींना टी.व्ही. वर समोरासमोर आणायची मुत्सद्देगिरीची कामगिरी माझ्यावर सोपवतोय? गडकरी, मुंडेंसारख्या थोर सेनानींना जे जमले नाही ते करायला हा माझ्यासारख्या यःकिंचीत मानवाला सांगतोय? माझी पाचावर धारण बसली.

"अरे घाबरू नको रे. जमेल तूला ते. तुझा तो दोस्त वाशा हाय नी? तू सांगत होता त्याची मोठमोठया पोलिटीकल लोगांमधे उठबस हाय, मोठमोठया लीडरशी वळखी हाय? तर तू तेला पकड आणि एव्ह्ढं त्या दोन भावांना टी.वी. वर डिबेटींगसाठी राजी करायला सांग...."
माझा दगड झालेला बघून ही पुढे झाली. " काय वो शेठजी, तुम्ही म्हणता तसे यांनी केले तुमचे काम. पण यात आमचा काय फायदा होनार?"
"हां. आत्ता मुद्द्याचं बराबर बोलला वैनी. काय हाय, मी सोताची कांतीशेठ एन्टरटेनमेंट्स नावाची टीवी प्रोग्राम कंपनी सूरू करतोय. एका पॉप्युलर टी.वी. चॅनेलशी पण बोललोय या प्रपोजलबद्दल. त्यांना आयडीया एकदम
पसंद पडलीय. प्राईम टाईमचा एक घंटयाचा स्लॉट आपल्याला दयायला ते तयार हायेत. तुमी लिहून घ्या वैनी, आपल्या प्रोग्रामचा टीआरपी सगळ्यात टॉप असनारे! इतक्या जाहीराती मिळणारेत बगा की तो एक तास आपल्याला मालामाल करणार हाय." कांतीशेठच्या डोळ्यात तेज चमकायला लागले.
"तर वैनी, तुमी माझे बिझिनेस पार्टनर. जर सायबांनी त्या दोन भावांना राजी केले ना, तर झालेल्या प्रॉफीटमधला दस टका वाटा तुमचा...." मगाशी हा मला अरेतुरे करत होता. आता एकदम सायेब ! " इचार करा वैनी, कमीतकमी एक कोटी प्रॉफीट जरी पकडला तर दहा लाख तुमचे. हे कमीतकमी. जास्तीत जास्त म्हणजे शंभर कोटींचा प्रॉफीटचा आमचा टारगेट हाय. आता तुमीच काढा शंभर कोटींचा दस टका..".
ही स्वप्नात हरवली आणि मला दहा टक्के म्हणजे दहा कोटी असा हिशोब केल्यावर गरगरायला लागले.
"तर सायेब " कांतीशेठने मला हलविले, "तर करताय ना आपलं काम? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बिझिनेस पार्टनर म्हटल्यावर तुमची पण थोडीफार इन्व्हेस्ट्मेंट लागेल. काय हे, चांगल्या कामाला पैसाबी चांगलाच लागते. जे काय तुमच्या मगदुराप्रमाणे साठ-सत्तर हजार रुपये गुंतवता येतील ते गुंतवा. तेच्यावर पन रिटर्न मिळेल. मग किती पैसे गुंतवताय ? "
"पैसे..." मी का कू करू लागलो.
"तीन वर्षांचा पगारवाढीचा अ‍ॅरीअर्स तुमाला मिळालाय.. माहीती हाय मला." याला कसे कळले? मी चमकून हीच्याकडे पाहीले.
"हां हां, वैनींकडे रागावून नका बघू. ते दिवशी वैनींनी महीन्याच्या किराण सामानाची यादी दिली त्यात नेहमीपेक्षा तीन चार आयटेम जास्ती होते. अर्धा किलो फरसान, अर्धा किलो आलू भूजीया वगैरे. मी लगेच वळखला की सायेबांचा दोस्त लोगांना घरी पार्टी दयायचा प्लान दिसतोय. वैनींकडे चौकशी केल्यावर कळला की ही अ‍ॅरीअर्सची पार्टी हाय. एक सांगू का सायेब ? हे दोस्त बिस्त सब झूट असते. बु-या वक्तला कोण जवळ येत नाय."
"नाही तर काय? " ही फणका-याने म्हणाली..." कंपनीत सहा महीने संप होता तेंव्हा पगार येत नव्हता. कस्सेबस्से दिवस काढले. तेंव्हा एकसुद्धा मित्र ढुंकून विचारायला आला नाही. आणि मित्र पार्टी मागताहेत आता."

बोंबललं. पार्टी कॅन्सल !

"तर सायेब आणि वैनी, च्यांगल्या कामाला देर कशाला ? ठरलं तर मग. सायेब तुमी तुमचा दोस्त वाशाला पटवा. त्याला पण आपण त्याच्या कामाचे घसघशीत कमिशन देऊ. आता शुभारंभ म्हणून साठ हजार रुपये देताय ना? "
मी आणि ही हिप्नोटाइझ झाल्या सारखा बेडरूममधे गेलो, जॉइंट अकाऊंटचे चेकबूक कपाटातुन काढले आणि दोघांनी साठ हजाराच्या रकमेवर सह्या ठोकल्या. कांतीशेठ पुन्हा आडव्या केळ्यासारखा हसला आणि चहा न घेताच चेक घेऊन पसार झाला.

कथाविनोदसाहित्यिकलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

28 Apr 2014 - 12:40 pm | खटपट्या

चांगलंय !! आवडलं !!!

बबन ताम्बे's picture

28 Apr 2014 - 2:20 pm | बबन ताम्बे

धन्यवाद.
पुढील भाग लवकरच येतोय.

बबन ताम्बे's picture

30 Apr 2014 - 9:34 pm | बबन ताम्बे

पुढील भाग टाकला आहे. लिंक देत आहे.

कलगीतुरा - पूर्वार्ध 2

शुचि's picture

30 Apr 2014 - 9:49 pm | शुचि

६०,०००

:ऑ .... बाप रे!!! तेच रिटायरमेन्ट मध्ये घातले असतेत तर :(
.
.
असू दे वाचते आहे.

पैसा's picture

30 Apr 2014 - 11:14 pm | पैसा

छान लिहिलंय!

चौथा कोनाडा's picture

1 May 2014 - 7:31 am | चौथा कोनाडा

मस्त ! आवडली कथा. लिखाणाचा ओघ छान आहे.

बबन ताम्बे's picture

5 May 2014 - 4:29 pm | बबन ताम्बे

सर्व वाचकांना धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2020 - 5:58 pm | चौथा कोनाडा

मस्त, फर्मास ... !