आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
4 Sep 2013 - 11:21 am

फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत. त्यांना तू सद्बुद्धी दे. अथवा आम्हाला एक राजा दे जो धर्म नीति सदाचार सत्य वगैरे वगैरे गोष्टींचं रक्षण करील आणि अधर्मानी वागणार्‍यांना दंड करेल." मग म्हणे ब्रह्मदेवानी आपल्या दैवी शक्तीनी माणसांसाठी एक राजा निर्माण केला. मग काय? आम्हाला "आमच्यातलाच एक" "ऑलमोस्ट देव" मिळाला !!! रिजॉईस !!!!!!

बस चीफ..... कर दिया ना बेडा पार आपने? तेव्हाच जर तुम्ही त्यांच्या मागे लाथ घालून "ऊठ सूठ कसले माझ्याकडे येता रे हात हलवत? गप गुमान तुमची कामं आधीसारखी सचोटी, नीती सदाचार आणि पावित्र्यानी करा....नाहीतर सरळ कैलासावर तक्रार करीन आणि संपवायला सांगीन सगळं" असं ठणकावून सांगितलं असतंत तर आज ही वेळ आली नसती. हे बाकी खरं आहे हो की गेल्या हजारो वर्षांत हजारो राजांनी मानवजातीचं कल्याण केलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या धुरंधर नेत्यांनी मानवजातीला वेगळी दिशा दाखवली. अहो पण सर तुम्हाला कल्पना नव्हती का हो की तुमचं सो कॉल्ड सर्वोत्तम क्रियेशन असं भुक्कड, आळशी, ऐतखाऊ कर्मदरिद्री निघेल? काहीच आयडिया नाही आली??? तेव्हाच "दुसरा कोणी राजा येऊन तुमचं भलं करणार नाही... आधी तुमची वर्तणूक सुधारा, जे वाईट वागत आहेत त्यांना शासन करा, तुमच्या नेत्याला पडेल ती मदत करा पण त्याच्यावर अवलंबून राहू नका" असं का सांगितलं नाहीत?

नाही हो - डायरेक्ट ब्रह्मदेवाला कॉल लावण्याचा अजिबात हेतू नाही ह्या लेखाचा.....तसा तो लागणारही नाही....आणि लागलाच तर आमचा नंबर बघून साहेब तो कट करतील आणि मग लाईट गेल्यावर एमएसईबी वाले करतात तसा हुकवरून काढून ठेवतील. डोक्यात विषय आहे भलताच बट कुड नॉट हेल्प !

परवाच्याच वर्तमानपत्रांत ही बातमी वाचली. आणि डोक्याला शॉटच बसला. सचिनची २०० वी कसोटी भारतात व्हावी म्हणून इतका अट्टाहास? जर का ही बातमी खरी असेल (आणि खोटी असायची शक्यता धूसरच आहे) तर आता मात्र हद्द झाली व्यक्तिपूजेची ! आमचं सचिनप्रेम जगजाहीर आहे. अक्षरशः देव्हार्‍यात ठेवलाय आम्ही त्याला. नतमस्तक आहोत त्याच्या अद्भुत कौशल्यापुढे, अचाट कर्तृत्वापुढे, त्याच्या विनम्र व्यक्तिमत्वापुढे. समोर आला तर पायावर लोटांगण घालण्याशिवाय दुसरं काही सुचणार नाही इतका पूजनीय आहे तो आम्हाला. त्यानी आम्हाला दिलेला आनंद, दिलेली प्रेरणा केवळ कल्पनातीत आहे. येस! आहे तो आमचा देव! आम्ही आमच्या नातवंडांना (तोपर्यंत जगलो वाचलो तर) त्याच्या पराक्रमाच्या कथा रंगवून रंगवून सांगू. होईल... त्याला हवा तेव्हा तो रिटायर होईल...... त्याला हवा तसा तो रिटायर होईल. आणि केव्हाही, कसाही तो निवृत्त झाला तरीही जग त्याला एक जगज्जेता सिकंदर फलंदाज म्हणूनच ओळखेल. मग हा सगळा घाट कश्यासाठी? एका महान खेळाडूच्या अनेक विक्रमांपैकी एक साजरा करण्याचा "इव्हेंट" करण्याचा प्रयत्न कशासाठी? त्याची २०० वी कसोटी भारतातच व्हायला हवी (आणि व्हायलाच हवी) ह्याची इतकी काळजी का? सचिन तेंडुलकर नावाच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचा गणपतीसारखा वाजत गाजत, सांस्कृतिक कार्यक्रम करून "उत्सव" कशासाठी? प्रत्येक गोष्टीचं "प्रॉडक्ट" करून ते विकायची ही विकृत सवय का लागलिये आम्हाला? आता मला सांगा.... ब्रह्मदेवानी तेव्हाच छडी उगारायला नको होती?

सच्याची २०० वी कसोटी हे एक उदाहरण. पण आमची माणसाचा देव करण्याची सवय मुळातच खूप जुनी. इतकी जुनी की ती सगळी उदाहरणं आठवावीशी पण वाटत नाहीत. मग तो एखादा राजा असो, राष्ट्रपिता असो अथवा आधुनिक भारताचा शिल्पकार असो. एखादा मनुष्य आपल्या कर्तृत्वानी महानतेला पोचल्यावर लगेच त्याला मखरात बसवून लांगूलचालनाची आरास करून त्याची पूजा मांडायची काय गरज? निदान ही उदाहरणं तर खरोखरंच महान लोकांची झाली. आम्हाला देव्हार्‍यात बसवायला चार बरे सिनेमे केलेला एखादा अभिनेता, आंतरराष्ट्रीय स्तरावर बर्‍यापैकी यश मिळवलेला खेळाडू, एखादा शे दोनशे कोटींची "नेट वर्थ" असलेला "कार्यसम्राट" वगैरे वगैरे नेता (ह्यांनाच आम्ही "जनतेचे सेवक" असंही म्हणतो) - कोणीही चालतो. आणि हे देव किमान एखादी पिढी सकारात्मकरित्या प्रभावित करणारे (खरंतर घडवणारेचं) असतील तर एक वेळ ते ही मान्य... पण दर आठ पंधरा दिवसांनी देव बदलण्याची ही वृत्ती आमच्यात आली कुठून? "सचिनची २०० वी कसोटी भारतात", "शाहरुख - सलमानची अखेर दिलजमाई", "पूरग्रस्त भागांतील लोकांना युवराजांचा मदतीचा हात"... ह्या बातम्या इतक्या महत्त्वाच्या ठरतातच का?

माणसांनी बजबजलेल्या आपल्या देशात "स्पर्धा" आपल्या पाचवीला पुजलेली आहे. मॅटर्निटी होमपासून वैकुंठापर्यंत सगळीकडे रांग लावायला लागते. आणि मग त्या रांगेत आपला नंबर आधी कसा लागेल ह्याची धडपड आहेच. हे कमी म्हणून की काय मास प्रॉडक्शन करणारी आमची शिक्षणपद्धत आहे. "हा पहिला, हा दुसरा, हा चौतिसावा" वगैरे बाळकडू आम्हाला मिळतं. आणि मग सो कॉल्ड "यशस्वी" ठरण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागतं. कोणी क्रिकेट खेळत असेल तर जीव तोडून फील्डिंग करून भागत नाही - ढिगानी रन्स किंवा पोत्यानी विकेट्स काढाव्या लागतात, नुसता कसदार अभिनय करून चालत नाही तर तुमच्या नावावर गल्ला जमवावा लागतो, नुसतं हुशार असून भागत नाही तर तुमच्या अकलेलाही मार्कांची पावती लागते. नुसती समाजासाठी विकासकामं करून चालत नाही तर मतांच्या गठ्ठ्यांनीच तुमची तळमळ तोलली जाते. आणि मग ज्या कोणाला ते जमतं तो आमच्यासाठी "देव" होतो. आमच्या स्वप्नांची, आकांक्षांची पूर्ती आम्ही त्यांच्या यशात बघतो आणि हे देखील विसरून जातो की तो देखील आपल्यातलाच एक आहे.

सच्या... तूही आमच्यातलाच एक आहेस रे! आणि तू तर कधीच वेगळा वागला नाहीस. आम्हाला माहिती आहे की तुला विश्वास आहे की तू स्टेन, मॉर्केलला त्यांच्या शेजारून सणसणत जाणार्‍या तुझ्या स्ट्रेट ड्राईव्हचा प्रसाद देऊ शकशील, आफ्रिकेतल्या मैदानांवर तिसरी धाव पूरी करण्यासाठी जिवाच्या आकांतानी पळू शकशील, तिथल्या वेगवान विकेट्सवर सुद्धा आपल्या कट्स, पुल्स आणि ड्राईव्हज् चा नजराणा तुझ्या चाहत्यांना देऊ शकशील. म्हणूनच तू अजून निवृत्ती घेतलेली नाहीस. एकदा.. फक्त एकदा तुझ्या भोवतीच्या ह्या स्वार्थी बडव्यांना सांग रे की "अरे ब्रॅडमन शंभरची सरासरी व्हावी म्हणून परत नाही खेळला... गावसकरनी "माझ्या घरच्या लोकांसमोर मला शेवटचा सामना खेळूद्या ना" म्हणून टुमण नाही लावल....माझ्या २०० व्या कसोटीचं काय घेऊन बसलात? आणि Send off ची कसली तयारी करताय फोकलीच्यांनो...... मी बाप आहे तुमचा.....आफ्रिकेतल्या कसोटी होऊदेत मग बोलू.... आधी त्यांच्या थोतरीत देतो आणि मग तुमची तोंडं बंद करतो."

कारण काय आहे ना सच्या....... १९८ काय आणि २०० काय... त्यानी ना तुला फरक पडणार आहे ना आम्हा भक्तांना. पण जवळच्या माणसाला जसं खंगून झिजून गेलेलं बघवत नाही ना ... तसंच तुझ्या झळाळत्या कारकीर्दीला पणतीतल्या वातीसारखं फडफडून विझून गेलेलं बघवणार नाही रे. आमच्या सच्याची कारकीर्द संपावी ते शानसे...ऑलिम्पिक ज्योत विझताना जशी शेवटपर्यंत धगधगत प्रेक्षकांची मानवंदना घेत निरोप घेते तसा आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"

समाजजीवनमानक्रीडाचित्रपटप्रकटनशुभेच्छाबातमीमत

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

4 Sep 2013 - 1:18 pm | बाबा पाटील

आवडेश......

सौंदाळा's picture

4 Sep 2013 - 1:24 pm | सौंदाळा

हे जर खरं असेल तर असे वाटते की ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश दिल्यावर घ्यायला पाहिजे होती, दिल्लीला. मस्त मौका होता.

ब़जरबट्टू's picture

4 Sep 2013 - 1:24 pm | ब़जरबट्टू

आवडले,
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
+१०००००००

पैसा's picture

4 Sep 2013 - 1:40 pm | पैसा

लेख प्रचंड आवडला आहे. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आता क्रिकेट हा गावस्करच्या काळात होता तसा खेळ राहिलेला नाही. तेव्हा महिना महिना प्रवास करून बोटीने इंग्लंडला जाणारे खेळाडू होते. रणजी मॅचेस खेळायला लोकल ट्रेनमधून जाणारे खेळाडू होते. आता सगळ्याच गोष्टी ७० एम एम करायची पद्धत आहे. क्रिकेट हा खेळ राहिलेला नाही. निव्वळ पैसे छापायची टांकसाळ आहे. प्रत्येकजण जेवढे खाता येईल तेवढे खात असतो. तरी कोणाचं पोट भरत नाही.

तसे सचिनच्या काळात खेळलेले लारा आणि पॉण्टिंग तेवढेच, कदाचित काकणभर सरसच होते हे कबूल करायला आम्हा भारतीयांना का जमत नाही? लारा म्हणतो की "सचिन सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे." तसे लाराबद्दल सचिन का म्हणू शकत नाही?

जे.पी.मॉर्गन's picture

4 Sep 2013 - 2:00 pm | जे.पी.मॉर्गन

पैसाताई,

सचिननी कोणाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करावी अशी देखील अपेक्षा नाही. पण मुळात सचिनच काय, पण कुठल्याही क्रिकेटपटू / सिनेकलाकार / राजकारण्याला आपण इतकं larger than life का बनवतो हेच समजत नाही. एक गोष्ट कबूल की आफ्रिकन / ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखे आपले खेळाडू सार्वजनिक वाहनांतून प्रवास करू शकणार नाहीत. पण त्यांच्यावर कोणी टीका केली तर लगेच आपल्याला इतकं का झोंबतं? लगेच निषेध व्यक्त करून माफी मागायची मागणी कशासाठी? सचिन एक ऑल टाईम ग्रेट फलंदाज आहे - पीरियड.

तोच प्रकार संजय दत्तला " भावनिक पाठिंबा देण्यासाठी" गर्दी करणार्‍यांचा. भयंकर चीड येते ह्या लांगूलचालनाची.

जे.पी.

दादा कोंडके's picture

5 Sep 2013 - 6:52 pm | दादा कोंडके

लेख आणि वरच्या दोन प्रतिसादांसाठी +१११११

अद्द्या's picture

4 Sep 2013 - 2:00 pm | अद्द्या

आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"

आणि तेवढ्यात कोणी तरी म्हणेल . नाही .
सैतान नाही हा . नाही तर आम्हाला लहान मुलांसारखा लोळवून मारल्यानंतर पण असा वागला नसता हा .

देवच आहे .

लई भारी लेख साहेब .

पिंपातला उंदीर's picture

5 Sep 2013 - 4:41 pm | पिंपातला उंदीर

सचिन आणि फेडेरर यांच्या फॅन साठी एक चांगला लेख

http://www.espncricinfo.com/magazine/content/story/668181.html

जे.पी.मॉर्गन's picture

5 Sep 2013 - 6:10 pm | जे.पी.मॉर्गन

अमोल,

भारी लेख आहे रे. सचिन किंवा फेडरर च्या मनात काय चाललंय ते त्यांनाच ठाऊक. त्याआधी बालगंधर्वांपासून कपिल देव पर्यंत अगणित कलाकार आणि खेळाडूंना काय वाटलं असेल ते सुद्धा त्यांनाच ठाऊक. कदाचित एड स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे खरंच त्या खेळाचं / कलेचं प्रेम, त्यानी येणारी धुंदी आणि नशाच असेल जी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्यासाठी क्रिकेट / टेनिसच आयुष्य आहे. लहानपणापासून दुसरं काही केलेलंच नाही. मग त्यांना हा "ब्रेक-अप" त्रासदायकच ठरणार.

जे.पी.

दहशतवादी आणि निष्पाप जीवांची हत्या करणारे पण ह्या व्यक्ती पूजे मुळेच आपापले स्थान टिकवून आहेत.

उपास's picture

5 Sep 2013 - 6:03 pm | उपास

तळमळ जाणवलीच.. कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट आण व्यक्तिचा देव करण्याची उफराटी सवय लागलेय आपल्या समाजाला... त्यात फेक्स वर चेहरे रंगवून घेणारे पण आले आणि फेसबुक वर 'लाईक'ची भिक मागणारे पण आले. कालच बातमी वाचली पेपरात की नवी मुंबईत बाळासाहेबांच्या वेषात गणपती बनवलाय.. डोक्याला हात लावला..चीड, संताप ह्यापेक्षा कीव येते अशा प्रकारांची..!!
असो, पण सच्च्याची एकदिवसीय सामन्यातली निवृत्ती मात्र अजून चांगली हवी होती असं मनात येतच!

अग्निकोल्हा's picture

6 Sep 2013 - 1:33 pm | अग्निकोल्हा

आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"

++सुपरलाइक.

आशिष दा's picture

6 Sep 2013 - 1:50 pm | आशिष दा

बडे बडे देशोमे अलग अलग खेलोमे ऐसे बहोत बडे बडे प्लेयर होके गये
पण कोणी खेळा पेक्षा मोठा नाही समजला गेला. आमचं भारतीयांचं मात्र वेगळच !
काय तर म्हणे खेळाडू म्हणतो मी कधी जायचं मी ठरवणार !!
आम्ही एकदा दैवत्व बहाल केलं कोणाला म्हणजे मग नाय नो नेव्हर... काही म्हणजे काही बोलायचं नाही देवाच्या विरुद्ध

हकु's picture

7 Jun 2016 - 8:29 pm | हकु

दोनशे वी कसोटी ही घरच्या मैदानावर व्हावी अशी इच्छा नक्की कोणाची होती?
सचिन च्या चाहत्यांची की स्वतः सचिन ची?