युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ५ भाग शेवटचा...........!!

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Mar 2013 - 8:43 am

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)
युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २
युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ३
युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ४

हिमलरने ऑशविट्झला १७ जुलै १९४२ च्या संध्याकाळी भेट दिली. या भेटीदरम्यान त्याने तेथे असलेल्या अधिकार्‍यांना ज्यूवंशसंहार हे आता राईशचे अधिकृत धोरण आहे हे उघडपणे सांगितले. हे एवढेच जाहीर करून तो थांबला नाही त्याने लगेचच पोलंडच्या सर्व ज्यूंना ठार मारायचे आदेश दिले. त्यातील काहींना, जे काम करू शकत होते, त्यांच्याकडून मरेतोपर्यंत काम करून घ्यायचाही आदेश देण्यात आला होता. अर्थात त्यांची उपयुक्तता संपल्यावर त्यांना गॅस चेंबर्समधे ठार मारण्यात येणार होते. हिमलरने २८ जुलैला त्याच्या रोजनिशीमधे लिहिले, ‘जिंकलेल्या पूर्व युरोपमधून ज्यू जमात नष्ट करायचे काम चालू झाले आहे. ही अत्यंत अवघड जबाबदारी फ्युररने माझ्या खांद्यावर टाकली आहे.’ या कामात त्याला अर्थातच एक अत्यंत निर्दय पण कार्यक्षम सहकारी लाभला होता राईनहार्ड हायड्रिश. हिटलर याला कौतूकाने ‘पोलादी ह्रदयाचा’ माणूस म्हणायचा. त्याचे कैदी त्याला थंड, भावनाशून्य नजरेचा माणूस असे ओळखायचे. अत्यंत देखणा व बुद्धिमान असा हा अधिकारी त्याच्या अतिरेकी विचारांमुळे झपाट्याने नाझी सरकारात अशा पदावर पोहोचला की जर हिटलरचे तिसरे राईश राहिले असते तर हा हिटलरचा वारस म्हणून जाहीर झाला असता यात शंका नाही.

राईनहार्ड हायड्रिश....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हालं नावच्या गावात राईनहार्ड हायड्रिशचा एका उच्चभ्रू घरात जन्म झाला होता. त्याचे आई वडील एक उत्कृष्ठ संगीतकार होते. स्वत: हायड्रिश उत्तम व्हायोलीन वाजवायचा. तो एक उतकृष्ठ खेळाडू होता. विद्यार्थीदशेत तो एक आदर्श विद्यार्थी होता असे म्हणायला हरकत नाही. या अशा सभ्य व चारित्र्यसंपन्न आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊनही तो १९२२ साली नाझी ठगांच्या टोळीत सामील झाला तेव्हा त्याचे वय होते फक्त सोळा. याच वेळी त्याची रस्त्यावरच्या गुंडगिरीशी पहिली ओळख झाली. अठराव्या वर्षी त्याची ओळख एडमिरल कॅनारिसशी झाली व तो जर्मनीच्या नौदलात भरती झाला. १९३० साली तो चिफ सिग्नल अधिकारीपदापर्यंत पोहोचला. याच सुमारास एका लफड्यामुळे त्याची ही नौदलातील कारकिर्द संपूष्टात आली. त्याच्यापासून एका मुलीस दिवस राहिले. ही मुलगी एका उद्योगपतीची मुलगी होती. तो तिच्याशी लग्नही करू शकत नव्हता कारण त्याचे लिना फॉन ओस्टाऊ नावाच्या मुलीशी अगोदरच लग्न ठरले होते. शेवटी त्याला अपमानास्पद परिस्थितीत ‘जर्मन अधिकार्‍याला अशोभनीय’ अशा या कृत्याबद्दल ती नोकरी १९३१च्या फेब्रूवारीत सोडावी लागली. लिनाच्या ओळखीने त्याने एस्. एस् प्रमूख हिमलरची भेट घेतली आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. हिमलरवर त्याच्या थंड निर्दयी स्वभावाचा फारच प्रभाव पडल्यामुळे त्याने त्याला लगेचच एस्. एसचे गुप्तहेरखाते स्थापन करण्याची जबाबदारी स्विकारण्याची सुचना केली. जी संघटना त्याने स्थापन केली त्याचे नाव होते ‘जिशाहस्टडिन्स्ट किंवा SD’. ही संघटना पुढे तिच्या निर्दयी कत्तलींमुळे व दशहतीमुळे अत्यंत कुप्रसिद्ध झाली.

मागे उल्लेख झालेल्या ‘सुर्‍यांची रात्र’ या प्रकरणात एस् ए संघटनेला धडा शिकवण्यात आला व मोठ्या प्रमाणात त्या संघटनेचे सदस्य ठार करण्यात आले, त्यात हायड्रिशची कामगिरी बघून हिटलर व गोबेल्स या दोघांचेही त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.. १९३९ मधे डऊ, गेस्टापो व क्रिपो या तिनही दलांचे एकत्रिकरण करण्याचे ठरल्यावर या नवीन संघटनेचे (राईश्सिशाहाईटस्हॉप्टआप्ट -RHS) प्रमुखपद त्याला देण्यात आले. यानंतर हिटलरने त्याला पोलंडवर आक्रमण करण्यासाठी प्रबळ कारण उभे करण्याची कामगिरी दिली. पोलंडच्या सिमेवर ग्लेविट्झ येथे जो बनाव रचून पार पाडण्यात आला त्याच्या मागे हायड्रिशचीच RHS होती. युद्ध सुरू झाल्यावर हायड्रिशने जिंकलेल्या प्रदेशाची साफसफाई करण्याचे काम अंगावर घेतले. पोलंडमधील थंडीच्या ऐन कडाक्यात त्याने ज्यू जमातीच्या असहाय्य माणसांना हलवून मरणाच्या दाढेत ढकलले. जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यावर त्याला ऑबग्रूपेनफ्युरर या पदावर बढती देण्यात आली. याच वेळी त्याने आईनझास्ट्ग्रूपेन ही निमलष्करी संघटना बांधली. ही संघटना खास नरसंहारासाठी बांधण्यात आली होती व तिने अंदाजे दहा लाख लोक यमसदनास पाठविले.

हायड्रिशला त्याच्या कामगिरीमुळे ‘‘मुडदेफरास’’ असे टोपणनाव मिळाले. ३१ जुलै १९४१ रोजी हायड्रिशला गोअरींगकडून ज्यूंचे निकाली शिरकाण करायचा आदेश मिळाला आणि जास्तीत जास्त ज्यू ठार करायच्या कामात त्याला साथ लाभली ती त्याच्यापेक्षाही भयंकर अशा अ‍ॅडॉल्फ आईकमन आणि ओडिलो ग्लोबोस्निक या दोन माणसांची. हायड्रिशला हिटलरला खूष करायची आयतीच संधी चालून आली. त्याला नाहीतरी हिमलरपेक्षा तो या कामाला जास्त लायक आहे हे हिटलरकडे सिद्ध करायचे होतेच. (त्याच्या मते ‘हिमलर मृदू स्वभावाचा होता आणि तो पाहिजे तितका निर्दय होऊ शकत नसे’.) १९४१ मधे हिटलरने हायड्रिशला बोहेमिया आणि मोराव्हियाचा प्रशासक म्हणून नेमले आणि तो त्या प्रदेशाचा सर्वेसर्वा झाला. हे झेक प्रांत आता हिटलरच्या पूर्णपणे हातात आले होते. अर्थात हायड्रिशने तेथे प्रशासन करण्याऐवजी छावण्यांचे रुपांतर कत्तल्खान्यात करून दशहतीचे साम्राज्य उभे केले. लवकरच त्याचे नाव बदलून तो ‘प्रागचा खाटीक’ या नावाने ओळखला जाणार होता.

या निर्दय नाझीच्या कारवायांनी हद्द ओलांडल्यावर मात्र ब्रिटीशांनी चार झेक भुमिगत स्वातंत्र्यसैनिकांना त्याचा काटा काढण्यासाठी प्रशिक्षित केले व विमानातून झेकोस्लोव्हाकियामधे उतरवले. यांची नावे होती यान खुबिच, जोसेफ वालचिक, अ‍ॅडॉल्फ ओपालका, व जोसेफ गॅबचिक. यांनी प्रागमधे हायड्रिशच्या मर्सिडीसवर गनिमी हल्ला चढवला. या हल्ल्यात गॅबचिकची स्टेनगन अडकल्यामुळे त्याला ती झाडता आली नाही पण खुबिचने मात्र त्या गाडीवर हातबाँब फेकण्यात यश मिळवले. त्यात त्या गाडीच्या पत्र्याला मोठे भोक पडून हायड्रिश जबर जखमी झाला. त्याला घाईघाईने इस्पितळात नेण्यात आले तेथील डॉक्टरने नंतर सांगितले की त्याची प्लिहा फुटली आहे. बरगड्यामधे त्या बाँबचे छर्रे घुसले होते व मागची खुर्चीचे अस्तर त्याच्या पाठीत घुसले होते. मृत्यूशी झगडत सात दिवसानंतर हा नराधम मृत्यू पावला.

हायड्रिशचे शाही इतमामाने८ जूनला बर्लिनमधे दफन करण्यात आले त्यावेळी एका वाद्यवृंदाने वॅगनेरचे गॉटडेमाहूंग ही धून वाजविली व हिटलरने स्वत: फुले वाहिली. खाजगीत मात्र हिटलर हायड्रिश ज्या निष्काळजीपणामुळे ठार झाला त्याची निंदा करत असे. हिटलर म्हणत असे, ‘हा असला मुर्खपणा जर्मनीच्या काय कामाचा ? ज्या चार शूरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती त्यांच्याशी गद्दारी झाली पण ते नाझींच्या हातात जिवंत लागले नाहीत. दोघे लढता लढता हुतात्मा झाले तर दोघांनी पकडले जाण्यापेक्षा मृत्यू बरा म्हणून आत्महत्या केल्या. या चार मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी गेस्टापोंनी त्यांची शिरे धडावेगळी करून सुळावर खोचली व त्यांच्या नातेवाईकांना व मित्रांना रांगेने त्याच्या समोरून जायला सांगितले. हायड्रिशच्या आत्म्याला हा सभारंभ बघून निश्चितच शांतता लाभली असेल.

हे सगळे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. दुसर्‍या दिवशी म्हणजे १० जूनला SDच्या काही तुकड्यांनी लिडाईस गावाला वेढले व गावातील सर्व गावकर्‍यांची धरपकड केली. १७३ पुरूष आणि मुलांना जागेवरच गोळ्या घालण्यात आल्या तर १९८ स्त्रिया व ९८ मुलांना छळछावण्यात ठार मारण्यासाठी पाठविण्यात आले. गावातील सर्व इमारती बेचिराख करण्यात आल्या व या गावाचे नाव नकाशावरुन पुसून टाकण्यात आले. तेरा मुलांना जीवदान देण्यात आले कारण त्यांचे केस सोनेरी होते. त्यांना जर्मनीमधे आर्यांबरोबर वाढविण्यास पाठवले गेले. दुसर्‍या लाझाकी नावाच्या गावात १७ पुरूष व १६ स्त्रियांना ठार मारण्यात आले तर १४ लहान मुलांना विषारी वायूने ठार मारण्यात आले. झेक जनतेला भुमिगत कारवाया करण्याची काय शिक्षा मिळते हे कळावे व त्यांनी शरणागती पत्करावी म्हणून हा सूड घेतला गेला असे स्पष्टीकरण प्रसिद्धीस देण्यात आले.

वॉर्सा घेट्टो.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९ एप्रिल १९४३ रोजी, सोमवारी पहाटे अंदाजे सहा वाजता वॅफेन-एस्. एस् च्या ८५० सैनिकांनी ज्यूंच्या वॉर्सा गेट्टोमधे प्रवेश केला. त्याना हिमलरच्या आदेशानुसार ही वसाहत खाली करून जमिनदोस्त करायची होती. आधी पोहोचलेल्या युक्रेन, लॅटिव्हिया व लिथुआनियाच्या निमलष्करी दलांमुळे या गेट्टोमधील ज्यूंना पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली होतीच. ज्यूंच्या लढाऊ संघटनेने (नजइ) हा गेट्टो लढवायचा ठरवले. जर्मन सैन्याला हा सशस्त्र उठाव अनपेक्षित होता. पहिल्याचा दिवशी जर्मन वॅफेन-एस्. एस् चे १२ सैनिक हातबाँब व मोलोटोव्ह कॉकटेलच्या मार्‍यात बळी पडले व एका रणगाड्यालाही आग लावण्यात ज्यूंना यश आले. आजवर ज्यूंचा सशस्त्र विरोध न अनुभवलेल्या जर्मन सैनिकांना हा जबर धक्का होता. त्यांनी वॉर्सचा एस्. एस् च्या प्रमुखांची ताबडतोब उचलबांगडी केली आणि स्वत: जनरल योगन स्ट्रूपने त्याची जागा घेतली. जनरल स्ट्रूपने त्याच्या अहवालात लिहिले, ‘ज्यू बंडखोरांनी प्रत्येक जागा लढविली. शेवटच्या क्षणी ते भुयारी मार्गातून आमच्या हातातून निसटून जात.’ या प्रकारे ज्यू बंडखोरांनी तो गेट्टो चार आठवडे लढवला. बोळाबोळातून हातगाईची लढाई लढण्यात आली.
वॉर्सा घेट्टो बंड.........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शेवटी जर्मन सैन्याच्या संख्याबळापूढे व शस्त्रास्त्रांसमोर त्यांचे काही चालेना. जिवावर उदार होऊन ज्यूंनी ही लढाई लढली खरी पण शेवटी जनरल स्ट्रूपचे सैन्य गेट्टोच्या मध्यभागी पोहोचले. स्ट्रूपने २७ एप्रिल रोजी जनरल क्रुगरला त्याच्या अहवालात लिहिले, ‘आमच्या हातात पडण्यापेक्षा ज्यू लढवय्ये आग लावलेल्या इमारतीमधे परतत होते. जळणार्‍या इमारतींच्या खिडक्यातून हिटलरला शिव्याशाप देत ते खाली उड्या मारत होते व मरत होते.’ या उठावाचा नेता मोर्डेखाय एनिलेविझ व त्याचे सहकारी १८-मिला स्ट्रीटवर एका बंकरमधे वेढले गेले. ८ मे रोजी त्या सगळ्यांनी शरणागती पत्करायचे नाकारून मरणाला कवटाळले. या उठावनाट्याचा शेवट फार भयानक झाला. १६ मे ला रविवारी रात्री साडे आठ वाजता स्ट्रूपने वॉर्साचे सिनेगॉग उध्वस्थ केले. तोपर्यंत त्याने ५५००० ज्यू नागरिक व जे पोलीश नागरिक ज्यूंबरोबर लढले त्यांना पकडले किंवा ठार मारले होते. स्ट्रूपचे फक्त १६ सैनिक ठार झाले व ८४ सैनिक जखमी झाले. पण या उठावामुळे अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या उठावांसाठी प्रेरणा मिळाली. जर्मन सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी शस्त्रास्त्रे असणार्‍या या बंडखोरांची कत्तल झाली, ती होणारच होती पण पराभवालाही विजयाची किनार होती आणि ती म्हणजे याने ज्यू जनतेचा स्वाभिमान जागृत झाला. तेही लढू शकतात हा आत्मविश्वास त्यांच्यात आला.

हंगेरीतील ज्यू नागरिकांची हकालपट्टी करून त्यांना ऑशविट्झला पाठवायचे काम मार्च १९४४ या दिवशी चालू झाले. ले. जनरल आईकमनच्या देखरेखीखाली एक विशेष दल स्थापन करण्यात आले व या दलाने आठ आठवड्यातच ४३७००० ज्यूंना ऑशविट्झला रवाना केले. या माणसाची मनोवृत्ती कशी होती हे त्याच्या खालील उद्गारावरून दिसून येते, ‘चाळीस लाख ज्यूंच्या कत्तलीमधील माझ्या महत्वाच्या सहभागासाठी मी आनंदाने मरणाला सामोरे जाईन.’ १९६१ साली युद्धातील गुन्हे शाबीत झाल्यावर त्याने त्याच्या रोजनिशीत लिहिले,
‘मी एका भेसूर मृत्यूयंत्राचा साक्षीदार होतो; एखाद्या घड्याळातील दाते असलेली चक्रे फिरतात त्याप्रमाणे या यंत्राची चाके सतत घरघरत होती. मी हे यंत्र तंदुरूस्त ठेवणार्‍यांनाही बघत होतो. या यंत्राला ते चावी देत व फिरते ठेवत. या यंत्राचा मिनिटाचा काटा सेकंदाच्या काट्याला मागे टाकून पुढे जात असे जणू काही मृत्यू आयुष्याला मागे ढकलून पुढे घुसत होता. आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भेसूर असे मृत्यूचे तांडवाचा मी प्रत्यक्ष बघत होतो.’

आईकमनला पकडून त्याच्यावर खटला चालवून त्याला सुळावर चढविण्यात आले खरे पण या न्यायातून बरेच जण सुटलेच. युद्धाच्या काळात एकूण ७००० सैनिकांनी ऑशविट्झ येथे तुरूंगरक्षकाचे काम केले. यांच्याबरोबर २०० स्त्रीरक्षकही कामाला होत्या. या सगळ्यांपैकी फक्त ८०० जणांवर युद्धानंतर खटला भरला गेला. इतरांचे काय झाले हे सांगायची गरज नाही ते काळाच्या उदरात गडप झाले. अर्थात गडप होताना त्यांनी कैद्यांचे लुटलेले सामानही नेले. रशियन सैन्याची ऑशविट्झच्या दिशेने आगेकूच सूरू झाली तशी नाझींनी कैद्यांना ऑशविट्झमधून हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या. या कैद्यांना पश्चिम दिशेला अत्यंत कडाक्याच्या थंडीत चालवत नेण्यात आले. शून्याखाली असलेल्या तापमानात या कैद्यांपैकी १५००० कैदी मृत्यूमुखी पडले. या दुर्दैवी जिवांचे हाल येथेच संपले नाहीत. जे ज्यू सुटका होऊन घरी गेले त्यांचा जमीनजुमला स्थानिक जनतेने बळकावला होता. त्यांनी आपल्या मालमत्तेवर हक्क सांगितल्यावर त्यांचे तेथेही मुडदे पाडण्यात आले. उदाहरणार्थ येडवाब्नेची घटना. याच गावात पोलीश जनतेने त्यांच्याच ज्यूदेशबांधवांना जर्मन सैनिकांशी हातमिळवणी करून देशोधडीस लावले व त्यांच्या हत्याकांडात भाग घेतला. ही घटना अजूनही चर्चेत असते व बर्‍याच वर्षानंतर म्हणजे २०११ साली पोलंडच्या पंतप्रधानांनी या घटनेबद्दल ज्यूंची माफीही मागितली.

ऑशविट्झच्या बाबतीत अजून एका विषयावरची चर्चा आपली पाठ सोडणार नाही ती म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या विमानदलांनी ऑशविट्झवर हल्ला चढवून ती छावणी नष्ट करायला पाहिजे होती की नाही हा ! १९४४ साली अमेरिकेच्या व ब्रिटनच्या वायुदलाला हे सहज शक्य होते कारण त्यांनी हवाईमार्गाने वॉर्साच्या उठावात इटलीवरून पोलीश बंडखोरांना मदत टाकायची तयारी चालवलीच होती. या छावण्यांमधे काय चालले आहे याची या दोन्ही देशांना पूर्ण कल्पना होती. हेही खरे आहे की असा हल्ला दोस्त राष्ट्रांच्या हवाईदलांनी केला असता तर जमिनीत पुरलेल्या भट्ट्या नष्ट झाल्या नसत्या पण याच बरोबर हेही खरे आहे की ऑशविट्झकडे जाणार्‍या व कैद्यांना नेणार्‍या रेल्वेचे मार्ग त्यांना निश्चितच उध्वस्त करता आले असते किंवा तसा प्रयत्न तरी करता आला असता. युद्धाच्या शेवटास दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी नाहीतरी फ्रान्समधील अशाच गोष्टींना आपले लक्ष केले होते. १० ते १५ जूलै १९४४ च्या दरम्यान अमेरिकास्थीत वॉर रेफ्यूजी बोर्डाने सादर केलेल्या एका अहवालात वॉर्सामधे विमानांनी उठावासाठी शस्त्रास्त्रे टाकावीत व छत्रीधारी सैनिक उतरावावेत अशी मागणी केली होती पण ती दोस्तांच्या सेनादलापर्यंत पोहोचलीच नाही.

ऑशविट्झसारख्या छावण्यांवर बाँबफेक करताना आतील कैद्यांची काळजीही होतीच पण त्या काळात बर्‍याच विचारवंतांचे असे म्हणणे होते की ज्यूंना मदत करायची असेल तर जर्मनीचा त्वरित पराभव करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा फुटकळ बाँबफेकीने ते काम होणार नाही. जर्मनीच्या पराभवास हातभार लागेल अशाच ठिकाणी ही विमाने वापरली पाहिजेत उदा. त्यांची लष्करी मुख्यालये, तळ व औद्योगिक वसाहती. अमेरिकेतील ज्यू संघटनेनी अमेरिकेच्या युद्धमंत्रालयाकडे हंगेरीतून ऑशविट्झला जाणारा कोशीच-प्रेस्कॉव्ह रेल्वे मार्ग बाँबफेक करून उध्वस्त करण्याची मागणी लावून धरली. २६ जूनला या मागणीला या मंत्रालयाकडून उत्तर आले, ‘आपल्या या मागणीमागची मानवतावादी भुमिका आम्ही समजू शकतो. पण चर्चेअंती आम्हाला असे वाटते की अ‍ॅक्सिस राष्ट्रांचा लवकरात लवकर पराभव होणे हीच आत्ताची प्राथमिक गरज आहे. यानेच त्यांना सगळ्यात जास्त मदत होईल.’ हे उत्तर मिळेतोपर्यंत हंगेरीच्या उरलेल्या ज्यु जनतेला वाचविण्यासाठी फक्त पंधराच दिवस उरले होते. प्राथमिक हवाई पहाणी, हवामानचा अहवाल आणि इतर तयारी यामधे एवढे दिवस सहजच लागणार होते. दुसरे म्हणजे कोशीच-प्रेस्कॉव्ह हा एक मार्ग होता. असे अजून सात मार्ग होते जे जर्मनांना वापरता येत होते. थोडक्यात नुसता हाच रेल्वेमार्ग उद्वस्त करून चालणार नव्हता. एका इतिहासकाराने हेच म्हटले आहे, ‘जरी कोशीच-प्रेस्कॉव्ह रेल्वेमार्ग उध्वस्त झाला असता तरी ज्यूंना इतर मार्गांनी ऑशविट्झला पोहोचवता आले असतेच. या नरसंहाराच्या आठवण ठेवण्यासाठी जे वस्तूसंग्रहालय ऑबरसाल्झबर्ग येथे उभे केले गेले आहे, त्याच्या प्रवेशद्वारावर जे लिहिले आहे ते जणू हेच सुचवते ‘सर्व रस्ते ऑशविट्झला जातात.’

नॉर्मंडीच्या किनार्‍यावर दोस्तांचे सैन्य नुकतेच उतरले होते आणि दोस्त राष्ट्रांच्या चिफ ऑफ स्टाफचे लक्ष अजून त्या आघाडीवर केंद्रीत होते. ९ जूलै उजाडली तरी अजून काँ (उरशप) पडले नव्हते त्यामुळे ऑशविट्झला चिफ ऑफ स्टाफच्या पातळीवर प्राधान्य मिळणे शक्यच नव्हते. असे असले तरीही त्या छळछावण्यातील कैद्यांचाच या अशा हल्ल्यासाठी आग्रह होता हे विशेष. ऑशविट्झ जवळील आय्.जी फॅबेन या कारखान्यावर हल्ला होऊन त्यात ४० ज्यू कामगार व १५ एस्. एसचे सैनिक ठार झाले तेव्हा मेलेल्या ज्यूंची संख्या जास्त असूनही ऑशविट्झमधे दिवाळी साजरी करण्यात आली होती. फ्रान्समधे आमिया नावाचा एक तुरूंग होता ज्यात जर्मनीने फ्रान्समधील अनेक स्वातंत्र्यसैनिक कैद करून ठेवले होते. याच्यावर ब्रिटिश एअर फोर्सने (ब्रिटीश मॉस्किटो विमानांनी हा हल्ला चढवला होता) एक धाडसी हल्ला करून यातील २५८ कैद्यांना सुटकेची संधी उपलब्ध करू दिली होती. यात १०० कैदीही मृत्यूमुखी पडले होते. ८ नोव्हेंबरला वॉर रेफ्यूजी बोर्डाने ऑशविट्झवर अशाच प्रकारच्या हल्ल्याची मागणी केली. पण या सगळ्याला आता फार उशीर झाला होता. २८ नोव्हेंबरला गॅस चेंबर्समधे ज्यूंच्या शेवटच्या तुकडीस ठार मारण्यात आले. पोलंडवर आता धुक्याचे व बर्फाचे आवरण पसरले होते व शेकडो मैल दूर असलेल्या विमानतळांवरून उड्डाण करून लक्ष्यावर पोहोचायच्या संधी फारच कमी असणार होत्या. बरं परत लक्ष्यावर पोहोचल्यावर अचूक बाँबफेकीसाठी दृष्यमानताही अनुकूल नव्हती. युद्ध संपल्यावर अनेक तथाकथीत विचारवंतांनी ब्रीटिशांनी हॅव्हिलँड - DH-98 MoSquito ही विमाने वापरून हा अचूक हल्ला करायला पाहिजे होता असे प्रतिपादन केले होते. पण त्यावेळी ही सुचना कोणीही केली नव्हती व समजा केली असती तर काय झाले असते हे अमेरिकेच्या वायुदलाचे संशोधक इतिहासकार डॉ. किचन्स याने या हल्ल्याच्या शक्यतेबाबत टिप्पणी केली त्यात स्प्ष्ट होते. ‘सहाशे मैल दूर असलेल्या तळांवरून उड्डाण करायचे, रेडिओ शांतता पाळायची, आल्प्सच्या पर्वतरांगा पार करायच्या, कमी उंचीवरून इतर विमानांबरोबर अंदाजे उडायचे, जर्मन विमानविरोधी तोफांना चुकवत जास्त इंधन भरलेली विमाने घेऊन अचूक बाँबींग करून त्या पाच भट्ट्या नष्ट करायच्या हे म्हणजे परमेश्वराकडे कृपेची भीक मागितल्यासारखेच होते.’

अमेरिकन वायुदलाच्या आकडेवारीनुसार त्यांनी विमानातून टाकलेल्या स्फोटकांपैकी फक्त चौतीस टक्के बाँब लक्षाच्या एक हजार फूटांच्या वर्तूळात पडायचे. याचा अर्थ असा होतो की कितीही अचूक बाँबफेक केली तरी आसपासच्या निष्पाप कैद्यांना मरावे लागले असते. याच कारणासाठी अमेरिकेतील आणि ब्रिटनमधी काही ज्यू संघटनांनी अशा हल्ल्यास विरोध दर्शवला. हे सगळे स्पष्टीकरण देण्याचे उद्दिष्ट, हा हल्ला न करण्याचा निर्णय म्हणजे फार मोठा गुन्हा होता असे काही जणांचे मत होते ते चूक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करणे हे आहे. दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑशविट्झची वरुन कढलेली अनेक प्रकाशचित्रे सर्वत्र प्रकाशित झाली असतील. ही सगळी दोस्त राष्ट्रांच्या विमानातून २५ ऑगस्ट १९४४ या दिवशी काढलेली आहेत. ही प्रकाशचित्रे मोठी केल्यावर यात सर्व भट्टयांच्या जागा स्पष्ट दिसतात व काही प्रकाशचित्रात त्या भट्ट्यांच्या बाहेर मृत्यूला भेटायला जाणार्‍या कैद्यांच्या रांगाही दिसून येतात. या प्रकाशचित्रांमुळे हा गैरसमज पसरला आहे की या ठिकाणांवर हल्ला करणे सहज शक्य होते. पण लक्षात घ्या, ही प्रकाशचित्रे प्रथम मोठी केली गेली १९७८ साली. १९४४ साली प्रकाशचित्रे एवढी मोठी करायचे तंत्रज्ञानच उपलब्ध नव्हते. छायाचित्रणाचा गुप्तहेरखात्यातील तज्ञ कर्नल स्टनले याने या विषयावर मत प्रदर्शन केले आहे. तो म्हणतो, ‘या १९७८ सालातील मोठ्या केलेल्या छायाचित्रांमधे त्या छावण्यामधे कुठे काय चाललेले आहे हे स्पष्ट दिसते. पण १९४५ साली आमच्याकडे ही सुविधा उपलबब्ध नव्हती.’

वॉर्साच्या उठावाला मदत म्हणून बावीस वेळा शस्त्रास्त्रे पुढील सहा आठवडे हवाईमार्गाने टाकण्यात आली. ती मदत तशी ब्रीटिश एअर फोर्सला महागच पडली. १८१ पैकी ३१ विमाने परत आली नाहीत. ब्रिटिश परराष्ट्र खात्याचा या असल्या नुकसान करणार्‍या मदतीला स्पष्ट विरोध होता. परराष्ट्रखात्यातील अनेक अधिकार्‍यांच्या टिपण्यांमुळे त्यांना नंतर खाली मान घालायला लागली. उदाहरणार्थ अर्माईन ड्यू याने रशियन लालसेनेनी रुमानियाच्या ज्यूंना जी वागणूक दिली त्या संबंधात असलेल्या फाईलवर शेरा मारला, ‘या आक्रोश करणार्‍या ज्यूंसाठी फार कार्यालयीन वेळ वाया जातो आहे.’ अर्थात हे काही एकमेव उदाहरण नाही.

अमेरिकन युद्धखात्याचा उपसचिव जॉन मॅक्लॉय याने या छळछावण्यातील भट्ट्यांवर व गॅस चेंबर्सवर हल्ला करण्याची विनंती धुडकावून लावली. त्यासाठी त्याने कारण दिले, ‘आमची विमाने आता निर्णयात्मक लढाईत जमिनीवरच्या फौजांना संरक्षण पुरवण्यात गुंतली आहेत. आमच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे आहे. जर या छळछावण्यातील भट्ट्या व गॅस चेंबर्सवर विमानांनी हल्ला करायचा ठरवला तर आम्हाला ही विमाने या कामगिरीवर वळवावी लागतील. ज्याच्यात विजयाची शक्यता नाही तेथे आम्ही ते करू शकत नाही. शिवाय असा हल्ला झाल्यावर जर्मन सुडाने पेटून ज्यूंचा अधिक छळ करतील’ या पार्श्वभूमीवर मोनोविट्झ येथील रबराच्या कारखान्यावर केलेल्या हल्ल्यातत्या कारखान्याचे जबरदस्त नुकसान करण्यात आले. यासाठी दोस्तांच्या विमानांनी (अमेरिकेचे पंधरावे एअर फोर्स) फॉग्गीआ येथून उड्डाण केले होते. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या १२७ विमानांपैकी फक्त एक नष्ट झाले. जॉन मॅक्लॉय जे म्हणाला त्याबरोबर विरूद्ध ही कामगिरी होती. जर्मनीच्या या नुकसानीमुळे ऑशविट्झमधे आनंदी आनंद पसरला व त्यांचा आशावाद वाढला. एका कैद्याने, एरी हॅजेनबर्ग याने त्याबद्दल म्हटले, ‘आम्हाला वाटले त्यांना (दोस्तांना) आमच्याबद्दल सर्व माहिती आहे आणि ते आमच्या सुटकेचे प्रयत्न करतील. आम्ही बाँबहल्ल्यात आमची सुटका करून घेऊ. काहीजण तरी या नरकातून वाचतील आणि आमची कहाणी भविष्यात जगाला सांगतील.’’

कुठलाही तर्क लावला तरी युद्ध हरायला लागल्यावर, जर्मनीने उपलब्ध असलेली सामुग्री म्हणजे रेल्वेचे जाळे, सैन्यदले आणि इतर मनुष्यबळ हे युद्धाच्या कामी लावायला पाहिजे होते. पण त्यांनी बरीच शक्ती ज्यूंच्या नाशासाठी गुंतवली. आपण वर बघितले की दोस्तरष्ट्रांनी आपले एकही विमान ठरलेल्या व्यापक उद्दीष्टापासून हलविले नाही. जर हिटलरने ज्यूंचा उपयोग या युद्धात करून घेतला असता तर ? पण दुर्दैवने हिटलरच्या अनेक नाझी पुढार्‍यांचे म्हणणे याच्या उलट होते. त्यांना पूर्वेची लढाई हरण्याआधी ज्यूंच्या नाशाची घाई झाली होती. ज्यू इतिहासकार सॉल फ्रिडलेंडरने याची कारणमिमांसा करताना लिहिले, ‘ज्यू द्वेष जेवढा वाढेल तेवढा दोस्तराष्ट्रांच्या एकजूटीला खिंडार पडण्याची शक्यता जास्त अशी हिटलरची कल्पना होती. या कल्पनेच्या मागचे कारणही मजेशीर होते. या युद्धात एकत्र लढणार्‍या समाजवाद आणि भांडवलशाही यांच्या साखळीतील ज्यू एक छूपी पण कमकुवत कडी होती असे त्याचे म्हणणे होते. ही तोडता आली तर ही साखळी कायमची तुटेल अशी त्याला खात्री होती.’ युरोपची भूमी जिंकण्याआधी आपल्या घरातील शत्रूंचा बिमोड करून हिटलरला आपली पिछाडी निर्धोक करायची होती, हे ही एक कारण या हिंसाचारामागे होतेच.

रशियाच्या आघाडीवर दाणादाण उडाल्यावरही नाझी जर्मनी ज्युंच्याच मागे होती. जनरल पोलसच्या जर्मन फौजांनी रशियाच्या आघाडीवर शरणागती पत्करल्यावर थोड्याच दिवसांनी गोबेल्सने स्पोर्टपालास्ट येथे एक मोठे भाषण दिले. (या भाषणाला खास निवडलेला श्रोतृवर्ग जमा करण्यात आल होता). त्यात त्याने भाषण करण्याच्या ओघात एक चूक केली व लगेचच दुरूस्त केली पण त्याने जो संदेश जर्मनीमधे जायचा होता तो गेलाच. रशियन फौजांच्या मागे ज्यूंची दले आक्रमण करत आहेत. सुडाने पेटलेल्या या ज्यूंना आम्ही बिलकूल घाबरत नाही. त्यांचे शिरकाण.....पराभव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे वाक्य संपल्यावर त्या जमवलेल्या गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला व ‘ज्यू चालते व्हा’ अशा आरोळ्या उठल्या. हे भाषण रेडीओवर लाखो जर्मन नागरिकांनी ऐकले व ज्यूंचे काय करायचे आहे हे त्यांना हिटलरच्या जवळच्या माणसाकडून कळाले.

गोबेल्सचे स्पोर्टपालास्टमधील भाषण.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिटलरने स्वत: या ज्यूंच्या सरसकट कत्तलीच व पूर्वेच्या आघाडीवरच्या विजयाचा संबंध यावर कधीच वक्तव्य केले नसल्यामुळे आपण त्याच्या विचारांचा फक्त अंदाज करू शकतो. पराभवाच्या छायेत असताना ज्यूंच्या हत्याकांडाला जोर चढला याचे कारण इतिहासातील स्वत:चे स्थान काय असेल याबद्दलच्या हिटलरच्या विचारात दडलेले असू शकते. या महायुद्धात जर्मनीचा जरी पराभव झाला तरी त्याचा असा विश्वास होता की युरोपच्या सर्वसामान्य जनतेत तो युरोप ज्यूमुक्त करणारा माणूस म्हणून ओळखला जाईल. तसे इतिहासात ओळखले जाणे हे त्याचे स्वप्न होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीच्या विजयाची त्याच्या लेखी काहीच किंमत नसावी. पहिल्या महायुद्धात ज्यू जनता इतर जर्मन नागरिकांप्रमाणे देशासाठी शौर्याने लढली, त्यांनी अनेक आयर्न क्रॉस मिळवले होते हे हिटलरला माहित नव्हते असे म्हणणे धाडसाचे होईल. त्याला स्वत:ला जो आयर्न क्रॉस मिळाला होता त्यासाठी त्याची शिफारस ज्याने केली तो त्या रेजिमेंटचा उपप्रमुख ज्यूच होता. त्याचे नाव होते सेकंड लेफ्टनंट ह्युगो गटमॅन. स्वत: हिटलरने १९३३ साली सत्तेवर आल्यावर जर ज्यू द्वेषाला मुठमाती दिली असती व ज्यूंना जर्मनीच्या प्रवाहात सामील करून घेतले असते तर १९३९ सालापर्यंत हे लाखो देशभक्त, बुद्धीमान, कष्टाळू नागरिक जर्मनीसाठी काहीही करायला तयार झाले असते. मुख्य म्हणजे ज्यू अणूशास्त्रज्ञांनी जर्मनीसाठी आपले संशोधन उपयोगात आणले असते. मुळच्या समाजवादी पक्षाला हे करणे सहज शक्य होते पण हिटलरच्या नाझीवादाला हे करायचेच नव्हते हेच खरे !......

माणसाच्या मनात चांगल्या वाईटाचा सारखा संघर्ष चालू असतो. कधी चांगल्याचा विजय होतो तर कधी वाईटाचा. ही लेखमालिका लिहिताना या संघर्षाबद्दल माझ्याच मनात संघर्ष होत होता. जे आपल्या सर्वांना पडले असतील ते सर्व प्रश्न मलाही सतत पडत होते....त्यातून मनात एक चित्र निर्माण झाले जे मी स्क्रीनवर उतरवले. ते येथे टाकून ही लेखमालिका संपवतो...........

संघर्ष......अर्थात Conflict........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी.
मी हे का लिहिले हे मला वाटते आत्तापर्यंत आपल्याला कळाले असेलच... त्याला अनेक कारणे आहेत पण सत्तेवर येण्यासाठी एखाद्या समुहाला वेठीशी धरुन पुढारी सिंहासनाची पहिली पायरी चढतात आणि मग त्यांना मागे फिरणे अशक्य होते. ज्या सिंहासनावर ते बसतात त्याच्या मागे काळाची एक अथांग पोकळी आहे हे ते तोपर्यंत विसरलेले असतात. त्या काळाच्या गर्गेत सिंहासनासकट कोसळल्यावर उरतो तो फक्त इतिहास आणि त्याचे विष्लेशण..........
असो.

इतिहासविचारलेख

प्रतिक्रिया

आमचेही हुस्श आणि काही टिप्पण्या.
मालिकेचा उद्देश, माहिती पोचवणे,हिंसक घटनांची तीव्रता जाणवून देणे निदान माझ्यापुरता तरी सफल झालेला आहे.
तिसरे राईश राहिले असते तर हा हिटलरचा वारस म्हणून जाहीर झाला असता यात शंका नाही.

हायड्रिश, हिमलर्....खुद्द गोअरिंग... सर्वांतच स्पर्धा होती काय वारस बनायची?(मी बाकी दोघांची नावे इतरत्र वाचलेली आहेत त्यासंदर्भात.)
मागे उल्लेख झालेल्या ‘सुर्‍यांची रात्र’ या प्रकरणात एस् ए संघटनेला धडा शिकवण्यात आला
हे प्रकरण प्रकाशित झालेले आठवत नाहिये. गंमत म्हणजे SA व SS दोन्ही नाझींसाठीच काम करायच्या.
त्यातल्या SAला ह्यांनीच स्वतः नष्ट केले.
.

जास्तीत जास्त ज्यू ठार करायच्या कामात त्याला साथ लाभली ती त्याच्यापेक्षाही भयंकर अशा अ‍ॅडॉल्फ आईकमन आणि ओडिलो ग्लोबोस्निक या दोन माणसांची.
आइकमन महाधूर्त. युद्धानंतरही दोनेक दशके तो कुणाच्या हाती लागलाच नाही. शिवाय ज्यूंना छळछावण्यात आणण्यासाठी बळाचा कमी बुद्धीचा अधिक वापर करी. कित्येकदा स्वतःहून ज्यू त्याच्याकडे येत; कारण तो त्यांना त्यांचा सहानुभूतीदार असल्याचे सांगे. सारं कसं आयडियाशीर.
.

गावातील सर्व इमारती बेचिराख करण्यात आल्या व या गावाचे नाव नकाशावरुन पुसून टाकण्यात आले.
ही खास मध्ययुगीन मानसिकता. तेव्हा; खरं तर रोमन साम्राज्यच्या काळापासून समाजात धाक बसवण्यासाठी काही निरपराधांना उगीच मारुन टाकले जाइ. विसाव्या शतकातही पुन्हा तेच पहायला मिळाले.
.
तेरा मुलांना जीवदान देण्यात आले कारण त्यांचे केस सोनेरी होते
"सोनेरी केस" उत्तम.
या उठावाचा नेता मोर्डेखाय एनिलेविझ व त्याचे सहकारी १८-मिला स्ट्रीटवर एका बंकरमधे वेढले गेले.
काय योगायोग! मोर्डेखाय नाव नेहमीच ज्यू घटनांच्या कालगणनेत ज्यू अडचणीत असताना लढलेलं दिसतं.
मोर्डेखाय(किंवा मोर्देसाय्/मर्दखय) ह्याच नावाच्या नेत्यानं इसवीसनापूर्वी आठशे वर्षे ज्यूंचे अहश्वेरोश ह्या पर्शियन सम्राटाच्या राज्यात शिरकाण होण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता.नाहीतर हिटलरपूर्वीच त्यांचा वंशविच्छेद वाढून ठेवला होता. त्याच्या स्मृतीनिमित्त "पुरिम" हा ज्यूंचा मोठा सणही साजरा होतो. असो. अवांतर होतय.

१९४४ साली अमेरिकेच्या व ब्रिटनच्या वायुदलाला हे सहज शक्य होते कारण त्यांनी हवाईमार्गाने वॉर्साच्या उठावात इटलीवरून पोलीश बंडखोरांना मदत टाकायची तयारी चालवलीच होती.
मला वाटते पोलंड हे जर्मनीच्या पूर्वेस आणि रशियाच्या पश्चिमेस येते.म्हणजे रशिया आणी जर्मनी ह्या दोघांची मगरमिठी त्या देशाला दोन बाजूने पडलेली आहे.पोलंड अधिक सलग ये-जा करण्याचा भूभाग लागून आहे तो रशियाचा. इतर कोणत्या फ्रान्स इंग्लंड वगैरे दोस्त राष्ट्राचा नाही. त्यामुळे पोलंड सीमेचे आख्खे डिपार्टमेंट रशियाकडेच राहू द्यावे असा काहिसा अलिखित करार दिसतो. लेखात लिहिलय तसं फ्रान्समधल्या नॉर्मंडीच्या किनार्‍यावरून, पश्चिम बाजूने इंग्लंड -अमेरिकेने यावे; पोलंड वगैरे बाजूने रशियाने यावे अशी ती मोहिम होती असे वाटते. एकदा रशियालाच "तिकडचे तुम्ही पाहून घ्या" असा संदेश दिल्यावर अँग्लो सॅक्सन युतीला काही करणे अवघडच होते.
एक मुद्दा :- इटालितून तशी मदत येणे शक्य दिसते म्हणताय. पण त्यातल्याही मर्यादा तुम्हीच सांगितल्यात.(आल्प्स रांगा वगैरे.) एक उपाय दिसतो तो हाच की युक्रेन व USSRचे इतर प्रांत घेत घेत, पोलंडमध्ये रशियाने घुसणे. व त्यांनीच काही करणे. पण धमाल म्हणजे रशियाने वेळोवेळी मदत करण्याच्या बहाण्याने पोलंडला चोक मारलेला कींवा त्यांचा गेम केलेलाच दिसून येतो.(१९३९ला पूर्व पोलंड बळकावणे.नंतर १९४४-१९४५च्या आसपास मुद्दाम "आम्ही येतोच, तुम्ही उठाव करा" असा संदेश राष्ट्रवादी पोलिश संघटनेला देउन त्यांना नाझींच्या हाती मरु देण्याची वाट पहाणे वगैरे. हे पोलिश बंड नाझींनी चिरडून काढल्यावर मग आरामात रशिया आत घुसला; म्हणजे मग आख्खा पोलंड त्यांना निर्विरोध ताब्यात घेता आला; स्वतंत्र न करता!)

युद्धात एकत्र लढणार्‍या समाजवाद आणि भांडवलशाही यांच्या साखळीतील ज्यू एक छूपी पण कमकुवत कडी होती
हे समजले नाही.
.
पहिल्या महायुद्धात ज्यू जनता इतर जर्मन नागरिकांप्रमाणे देशासाठी शौर्याने लढली, त्यांनी अनेक आयर्न क्रॉस मिळवले होते हे हिटलरला माहित नव्हते असे म्हणणे धाडसाचे होईल.
थोडी दुरुस्ती. ज्यू सैनिक जर्मन लष्करात नव्हतेच असे नाही. ज्यू उद्योगपतींनी वायमर प्रजासत्तकाच्या काळात आर्थिक नाड्या आवळल्या नाहितच असेही नाही. त्यांच्या आर्थिक हितसंबंधांसाठी काही ज्यू उद्योगपतींना आर्थिक नाड्या आवळल्या होत्याच. १९३९ मध्ये जर्मनीने लगतचे प्रांत जिंकेपर्यंत पहिल्या महायुद्धातील जर्मन प्रमुख कैसर विल्यम जिवंत होता. त्यानेच हिटलर ला जी तार पाटह्वली त्यातही ह्याचा उल्लेख आहे. पण म्हणून सरसकट हरेक ज्यू बायका पोराची कत्तल समर्थनीयही होत नाही.असो.
.
तुमच्या मालिकेने अस्वस्थ व्हायला झाले हे खरेच.

हरिप्रिया_'s picture

27 Mar 2013 - 12:09 pm | हरिप्रिया_

खरच तुमच्या मालिकेने अस्वस्थ झाले :(

अवांतर : मी नुकताच The Grate Escape(१९६३) पहिला. ते कथानक खर आहे का? ह्या साठी उत्सुकता, कि कोणीतरी का होईना त्या निष्ठूर लोकांच्या तावडीतून सुटू शकत होत. तेवढीच थोडी समाधानाची गोष्ट...

सुबोध खरे's picture

27 Mar 2013 - 2:09 pm | सुबोध खरे

भूतान च्या राजाविरुद्ध बंड केल्यामुळे तेथील एका खेड्यातील सर्व पुरुषांना ठार मारले आणि सर्व स्त्रियांना वेश्या बनवले गेले. हि बातमी ऐकून वाटलेली घृणा याची परत आठवण झाली.
केवळ माणूसच इतकी घृणास्पद कृत्ये करू शकतो

मैत्र's picture

27 Mar 2013 - 4:00 pm | मैत्र

दर वेळी पुढचा भाग आला की वाचायची उत्सुकता अजून काय क्रौर्य समजणार आहे या ताण देणार्‍या विचारावर मात करत राहिली. बरंच काही वाचलं होतं ऑशवित्झ आणि क्रॅकोव्ह बद्दल.. पण तुमचं वर्णन, त्यावरचे भाष्य आणि घटनांचे परस्परसंबंध हे जबरदस्त अपील(मराठी?) झालं..
आपण कीडे मुंग्या सुद्धा मारणार नाही इतक्या सहजतेने आणि नेटाने लक्षावधी माणसे वंश आणि धर्माच्या कारणाने मारण्यात आली. मरणार्‍यांना त्रास होऊ नये म्हणून नाही तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माणसे सहजतेने निकालात लावता यावीत म्हणून संशोधन करून या छळछावण्या उभारल्या..
मी अनेक जर्मन लोकांना भेटलो आहे. काही चांगले मित्र आहेत. कोणी असं वागू शकतं यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं.. बर्‍याच जर्मन लोकांना या नरसंहाराबद्दल अतिशय घृणा आहे आणि गिल्टही..
संधी असूनही माझी ऑशवित्झ आणि बर्लिनजवळच्या छावण्या / होलोकास्ट म्युझियम पाहण्याचं धाडसच झालं नाही. आणि हे सगळं आत्ता ६०-७० वर्षापूर्वी घडलं हेही अनाकलनीय.
शुद्ध आणि उच्च वंश म्हणून इतरांची घृणा आणि द्वेष करणार्‍यांनी रानटी / असंस्कृत barbaric असं विकृत वर्तन केलं..

"माणसाच्या मनात चांगल्या वाईटाचा सारखा संघर्ष चालू असतो. कधी चांगल्याचा विजय होतो तर कधी वाईटाचा. ही लेखमालिका लिहिताना या संघर्षाबद्दल माझ्याच मनात संघर्ष होत होता. जे आपल्या सर्वांना पडले असतील ते सर्व प्रश्न मलाही सतत पडत होते..."

उत्तम शेवट.. धन्यवाद जयंत काका .. पूर्ण लेखमालिकेबद्दल..

संघर्ष विक्रुति कडे वळला कि नाश अटळ.

सृष्टीलावण्या's picture

31 May 2013 - 1:39 pm | सृष्टीलावण्या

1) कठीण आणि टोकाचे हवामान/भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशातील बहुतांशी माणसे जात्याच कोरड्या व्यक्तिमत्त्वाची असतात आणि धार्मिक अथवा राजकीय उन्मादाने ती खुनशी बनतात. उदा. युरोप, अरबस्थान, अफगाणीस्थान इ.
2) पहिल्या महायुद्धानंतर ऱ्हुर प्रांत हातातून गेल्याने आणि इतर जाचक आर्थिक निर्बंधांमुळे जर्मनीत एका पावाच्या लादीसाठी पोतेभर मार्क (चलन) द्यायची वेळ आली होती. अश्या वेळी ज्यू धनिकांचे ऐश्वर्यात लोळणे आणि संपत्तीचे बेफाम प्रदर्शन ह्यांनी जनमत ज्यूंच्या विरूद्ध गेले.
3) गेल्या शतकात भारत आणि इतर काही मोजके देश सोडले तर ज्यू द्वेष हा सर्वत्र/सरसकट आढळून येत होता.

बॅटमॅन's picture

31 May 2013 - 3:19 pm | बॅटमॅन

कठीण आणि टोकाचे हवामान/भौगोलिक परिस्थिती असलेल्या प्रदेशातील बहुतांशी माणसे जात्याच कोरड्या व्यक्तिमत्त्वाची असतात आणि धार्मिक अथवा राजकीय उन्मादाने ती खुनशी बनतात. उदा. युरोप, अरबस्थान, अफगाणीस्थान इ.

असहमत! आफ्रिकेत हवामान काय कमी टोकाचे आहे? निग्रो लोक कुठे इतके खुनशी आहेत? युरोपातही हवामान सर्वत्र टोकाचे नाहीच, विशेषतः दक्षिण युरोपात तर आजिबातच नाही. तिबेटमधील हवामानाइतके टोकाचे हवामान तर क्वचित कुठेतरी असेल. तिबेटी लोक कुठेयत खुनशी?

मुद्दा इतकाच की हवामान आणि माणसाचा स्वभाव यांची गल्लत करू नये. क्रूरकर्मे आपल्याकडे झालेच नाहीत असे नाही. विविध राजकीय गोष्टींमुळे असे होत असते.

सृष्टीलावण्या's picture

31 May 2013 - 3:43 pm | सृष्टीलावण्या

त्यासाठी धार्मिक वा राजकीय उन्मादही लागतो असे मी लिहिले आहे.

निग्रो लोक कुठे इतके खुनशी आहेत?

सोमालिया, नायजेरिया, झिम्बाब्वे...

युरोपात बोस्निया, सर्बिया इ.

आपल्याकडेही राजस्थानात कन्याशिशु वाईट पद्धतीने मारतातच.

नरेश माने's picture

23 Jul 2015 - 9:03 pm | नरेश माने

संपुर्ण लेखमाला वाचली.इतिहासातल्या एका काळ्या पर्वाची भरपुर माहिती मिळाली.

जयंतजी खूप अभ्यासाने आणि कष्टाने आपण हा लेखनप्रपंच केलेला आहेत. थोडक्या जागेत बरीच मोठी माहिती दिली गेलेली आहे. यासाठी खूप खूप आभार. ही लेखमाला यापूर्वी वाचलेली नव्हती. परंतु आता मात्र वेळ देऊन वाचणार. माझ्या वडिलांना तर खूप आवडेल वाचायला. त्यांचे दुसर्‍या महायुद्धावर वाचन बरेच आहे.
असो, आफ्रिका, कंबोडीया येथील हुकुमशहा / क्रूरकर्म्यांविषयी आणि त्यांचा स्वतःच्या देशावार, जगावर पडलेल्या प्रभावावर देखील लिहिते झालात तर फार आवडेल. कारण त्याविषयी वाचन किंवा माहिती फारशी नाही.

ब़जरबट्टू's picture

24 Jul 2015 - 1:12 pm | ब़जरबट्टू

संपुर्ण लेखमाला वाचली.. जेव्हापण वाचलीय, अस्वस्थ झालोय..
:(