युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Feb 2013 - 8:41 am

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)

" प्रशासकांच्या वतीने मी आपले स्वागत करतो ! आपण येथे सुट्टीवर आलेला नसून कामासाठी आपल्याला येथे आणण्यात आलेले आहे हे कृपया ध्यानात ठेवा. ज्याप्रमाण आमचे सैनिक आघाडीवर तिसर्‍या राईशच्या विजयासाठी आपले प्राण अर्पण करत आहेत त्या प्रमाण नवीन युरोपसाठी तुम्हाला येथे काम करायचे आहे. ते कसे करायचे हे तुम्हावर अवलंबून आहे. आम्ही तुमची काळजी घेऊ व केलेल्या कामाचा मोबदलाही देऊ. युद्धानंतर आपण केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन काय करायचे ते ठरवले जाईल.
"आता सर्वांनी कृपया आपले सर्व कपडे काढावेत व खुंट्यांना अडकवावेत. त्या खुंटीखाली जो क्रमांक लिहिला आहे तोही ध्यानात ठेवावा म्हणजे नंतर गोंधळ होणार नाही. आपले स्नान झाल्यावर बाहेर आपल्यासाठी चहा/कॉफी/सूप ठेवलेले आहे. आपली कागदपत्रे ही तयार ठेवा म्हणजे आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे काम देता येईल.
ज्यांना मधूमेह आहे व साखर चालत नाही अशांनी आंघोळीनंतर संबंधीत अधिकार्‍यांना भेटावे....................."

वरील स्वागतपर भाषण खालील अधिकारी करत असे. नंतर यांची रवानगी गॅस शॉवरच्या न्हाणीघरात होत असे.
फ़्रान्झ हेसलर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

न पुसला जाणारा कलंक - २
पोलंडमधे त्या काळात दोन लाख ज्यू होते आणि त्यांना दोन वर्षात ठार मारायचे काम एवढे सोपे नव्हते. त्यासाठी नाझी जर्मनीला नेहमीच्या सैनिकांना गुंतवून ठेवणे परवडणारेही नव्हते. त्यासाठी त्यांनी ' 'Reserve Police Battalion 101' या दलाची मदत घेतली. यात विशेष ते काय असे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे पण ही बटालियन मध्यमवयीन, साध्या नोकरदार माणसांची होती. केवळ नाझींचा दबाव, जर्मन माणसांचा आज्ञा पाळायचा स्वभाव, या कारणांनी यांत्रीकपणे या माणसांनी या हत्याकांडात भाग घेतला व ८३००० ज्यूंना ठार मारले. या बटालियनमधील २१० पोलिसांच्या ज्या १९६० साली मुलाखती घेतल्या गेल्या त्यातून वरील कारणे स्पष्ट झालीच पण असेही आढळून आले की बरेचजण सैन्यात भरती होणे व जर्मनीच्या बाहेर जाणे टाळण्यासाठी या पोलिसदलात सामील झाले होते. जर्मन समाजातील सर्व थरातील माणसे या पोलिसदलात होती आणि कोणावरही ज्यूंना मारण्याची जबरदस्ती करण्यात आली नव्हती ना या कामात भाग घेण्यास नकार देण्यासाठी शिक्षा झाली होती. फारच थोड्या जर्मन नागरिकांचा या हत्याकांडाला पाठींबा होता पण त्याच वेळी बहुसंख्य नागरिकांनी या प्रकरणाकडे डोळेझाक केली किंवा विरोध केला नाही हेही नाकारता येत नाही. दुर्दैवाने जेव्हा या बटालियनला या कामासाठी पाचारण करण्यात आले तेव्हा यातील नव्वद टक्के माणसांनी होकार दिला. इतिहासकार ख्रिस्तोफर ब्राऊनिंग याने या बटालियनबद्दल लिहिले, ‘सुरवातीला या हत्याकांडात भाग घेताना या माणसांना मळमळणे, चक्कर येणे असे प्रकार झाले पण नंतर ते सराईत मुडदेफरास झाले.’

पोलंडमधील लुब्लिनच्या आग्नेय दिशेला पन्नास मैलांवर असलेल्या युझेफ नावाच्या खेडेगावाच्या बाहेर जंगलात पंधराशे ज्यूंना ठार मारण्यात आले. त्यासाठी त्या कैद्यांचे चाळीसजणांचा एक असे गट केले. १३ जुलै १९४२ रोजी जेव्हा यांना ठार मारायची वेळ आली तेव्हा या बटालियनच्या पाचशे सैनिकांपैकी फक्त बारा जणांनी या हत्याकांडात भाग घेण्यास नकार दिला. टक्केवारीत बोलायचे झाले तर ही संख्या अडीच टक्केही नव्हती. सतरा तास चाललेल्या या हत्याकांडात जेवणाची सुट्टी, धुम्रपानाची सुट्टी या कारणांखाली अजून पंचेचाळीस सैनिकांनी या कामासाठी दांडी मारली. उरलेल्या नव्वद टक्के सैनिकांनी, त्यांनी या कामास नकार दिला असता तरी चालले असते हे माहित असतानाही शांतपणे निरपराध ज्यू माणसांवर, स्त्रियांवर व लहान मुलांवर व बालकांवरही गोळ्या चालवल्या. यातील काही सैनिकांनी त्यांनी ते काम केले नसते तर दुसर्‍या कोणीतरी केले असते असे कारण दिले. त्यांनी लहान मुलांवर गोळ्या चालवायचे काम पटले नाही असे सांगितले खरे पण त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. या सैनिकांनी बायका मुलांवर गोळ्या चालवल्या हेच सत्य आहे. ज्यांच्यावर त्यांनी गोळ्या चालवल्या त्यात पहिल्या महायुद्धात त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून भाग घेतलेले ज्यू सैनिकही होते. या निवृत्त सैनिकांनी हात जोडून त्यांना पूर्वीच्या त्या दिवसांची आठवण देऊन त्यांना जीवदान देण्याची विनंती केली पण त्यांनाही या सैनिकांनी सोडले नाही. आया त्यांच्या मुलांना सोडत नाहीत हे बघून या नाझी सैनिकांनी अशा मायलेकरांना एकत्रित गोळ्या घातल्या. ब्रेमरहेवन येथील पस्तीस वर्षाचा एक कामगार या बटालियनमधे होता त्याने म्हटले, ‘ती मुले आईवाचून राहू शकणार नव्हती म्हणून त्यांना या जगातून जायला मी मदतच करत होतो.’

मुले........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या हत्याकांडादरम्यान बटालियनच्या काही सैनिकांमधे या हत्याकांडाप्रती तिरस्काराच्या प्रतिक्रिया उमटल्या पण त्यांनी त्यांच्या नैतिकतेवर काही परिणाम झाला नाही. ‘पहिल्यांदा आम्ही कशाही गोळ्या झाडायचो. त्यातच एखाद्याने डोक्यावर गोळी झाडली तर कवटी व मेंदूचे तुकडे इतस्तत: उडायचे. नंतर आम्हाला बंदूकीची संगीन मानेवर रोखून गोळ्या झाडायला सांगण्यात आले.’ त्यांनी या मुलाखतीत ज्यू ज्या धैर्याने मृत्यूला सामोरे जात होते त्याचेही वर्णन केले. ‘गोळ्यांच्या आवाजाने त्यांना त्यांचे काय होणार आहे याची कल्पना येऊनसुद्धा ते अविश्वसनीय धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जात असत.’ या सामान्य जर्मन माणसांनी अशा हत्याकांडात का भाग घेतला याला गुंतागुंतीची मानसशास्त्रीय कारणे होती तसेच त्यातील काही जण नाझी अतिरेकीही होते. या कारणांमधे सामाजिक विघटन, ध्रुवीकरण, नोकरीत बढती, सरळ साधा दिनक्रम, क्रोर्य....अशा अनेक कारणांचा समावेश केला गेला पण नाझी जर्मनीच्या बाहेरही याची कारणे अस्तित्वात होती.

काही इतिहासकारांचे असेही म्हणणे आहे की रशियाच्या आघाडीवर होणारी धुळधाण व अमेरिकेचे पर्ल हार्बरनंतर युद्धात उतरणे याने निराश होऊन नाझी जर्मनीने ज्यूंचे शिरकाण आरंभले, पण त्यात तथ्य नाही. काही हत्याकांडे याच काळात घडली पण या घटनांनी ती सुरू झाली असे समजणे मुर्खपणाचे होईल. सत्य हे आहे की नरसंहार जलद गतीने पार पाडण्यासाठी नाझी वैज्ञानिक सतत नवनवीन पद्धती शोधून काढण्यात मग्न होते. अशाच एका प्रयत्नात त्यांनी ‘झायक्लॉन बी’ नावाचा विषारी वायूचा उपयोग शोधून काढला होता. जेथे हुकुमशाहीचे राज्य असते तेथे प्रशासनातील कोणालाही हुकुमशहाला खूष करूनच प्रगती करता येते. आजही आपण हे बघतोच. जर्मनीमधेही हेच चालले होते. हिटलरला खूष करण्यासाठी ज्यूंना ठार मारायचे विविध प्रकार त्याचे मंत्री सुचवत असत. ज्याचा उपाय सगळ्यात अघोरी व जलद त्यांची प्रगती निश्चित होत असे. हिटलरच्या कार्यालयातून दररोज शेकड्याने आदेश बाहेर पडत असत व त्या आदेशांवर त्याची सहीही असे. पण ज्यूंच्या कत्तली व नरसंहार इतका भयानक होता की हिटलरने स्वत: त्यापासून दूर रहायचेच पसंत केले. त्या संदर्भात असलेल्या कुठल्याही आदेशावर त्याचे नाव येणार नाही याची त्याने पुरेपुर काळजी घेतली असणार. काही वेळा तो या नरसंहाराची जबाबदारीही नाकारत असे. हिटलरच्या कुठल्याही सेनाधिकार्‍याचा, मंत्र्याचा, ज्यूंच्या हत्याकांडातील सहभागाने तोटा झाला असे आढळत नाही. उलट अशांची प्रगतीच होत असे. उदाहरणार्थ ले. जनरल रेनहार्ड हाईड्रिशची ज्यू द्वेषामुळेच पदोन्नती झाली होती. याने व एस्. एस्चा प्रमुख हिमलरनेच ज्यूंच्या कत्तलींचे प्रमाण वाढविण्याचा व ज्यू स्त्रिया व मुले यांनाही न सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी लगेचच लिथुआनियामधे सूरू झाली.

ज्यूंना त्यांनीच खोदलेल्या खड्ड्याच्या कडेला उभे करून त्यांच्या कत्तली बर्‍याच ठिकाणी होत होत्या. पोलंडमधे व्हिलिनियस जवळ पोनारी येथे ५५०००ज्यूंना ठार मारण्यात आले. कोव्हनो जवळ फोर्ट यथे १००००, किव्हच्या खोर्‍यात बाबी यार येथे ३३७७१, रिगाजवळील रूंबूला येथे ३८००० व काऊनास येथे ३०००० ज्यूंच्या निर्दयपणे कत्तली केल्या गेल्या. जर्मन एस्. एस् च्या यासाठी स्थापन केलेल्या विशेष दलांनी (’आईनझास्ट्ग्रूपेन’) एकूण पंधरा लाख ज्यूंची कत्तल केली. या कत्तली मानवसंहार करायच्या अधुनिक पद्धती विकसित होण्याआधीच्या आहेत. यानंतर या नरसंहाराच्या पद्धतींमधे बर्‍याच सुधारणा करण्यात आल्या. त्याचा हिशेब वेगळा आहे. हे आकडे आपल्याला कसे माहीत आहेत? असा प्रश्न विचारता येऊ शकतो. पण या कत्तलींचा अचूक अहवाल ’आईनझासग्रूपेन’ने मुख्यालयांना पाठवला होता त्यात हे आकडे दिलेले आहेत. हे अहवाल हिटलरच्या नजरेखालून निश्चितच गेले असणार. हिटलर या आकड्यांचा उल्लेख त्याच्या बैठकींमधे करायचा म्हणून आपण हे खात्रीने सांगू शकतो. २५ ऑक्टोबर १९४१ रोजी हाईड्रीश व हिमलरबरोबर भोजन करत असताना हिटलर म्हणाला, ‘त्यांना (ज्यूंना) मी केव्हाही दलदलीत पाठवू शकतो याबद्दल कोणाच्या मनात कसलीही शंका नको...... आपल्या आक्रमणापाठोपाठ आपण ज्यूंचा नाश करतोय ही दशहतही पसरली पाहिजे.’ एस्. एस्ने हिटलरला प्रिपेटच्या दलदलींमधे असंख्य ज्यू स्त्रिया व त्यांची मुले बुडून मेली हा अहवाल दिला होता. वरच्या वाक्यातील दलदलींचा उल्लेख बहुदा त्या घटनेला उद्देशून असावा.

वेअरमाख्टला त्यांच्या मागोमाग ’आईनझासग्रूपेन’ त्यांनी जिंकलेल्या देशांमधे का आली आहे आणि ते काय काम करत आहेत याची पूर्ण कल्पना होती व वेअरमाख्टने त्यांना या कामात सहकार्यही केले. युद्धानंतर झालेल्या इतिहास संशोधनात ज्यूंच्या कत्तलींमधे वेअरमाख्टचा हात नव्हता, ते फक्त सैनिक होते असा एक पद्धतशीर समज पसरवण्यात आला त्यात लिडेल हार्ट सारखे इतिहासकारही फसले. बाबी यार येथे ’आईनझासग्रूपेन’ने पार पाडलेल्या ज्यूंच्या नरसंहारानंतर फिल्ड मार्शल वाल्थर फॉन राईशनाऊ याने ज्यूंसारख्या, माणूस म्हणून घ्यायला नालायक असलेल्या जमातीला कडक व योग्य शिक्षा मिळाल्याबद्दल विजयोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले; फिल्ड मार्शल रूनस्टेडने अशाच अर्थाच्या एका आदेशावर सही केली होती. या वंशसंहाराच्या दुष्कर्मात फिल्ड मार्शल लीब, फिल्ड मार्शल मानस्टाईन यांचाही सहभाग होताच. माईनस्टाईनने एका आदेशात लिहिले, ‘ज्यू-साम्यवादी यांना या पृथ्वीतलावरून नष्टच केले पाहिजे.’ जनरल हॉपनरने शत्रूचा नाश करा असे जे आदेश काढले होते त्यात ज्यू आणि साम्यवादी बंडखोरांचा शत्रू म्हणून उल्लेख करण्यात आला होता. आपल्याला नको असलेल्या जनसमुहाचा क्रौर्याने काटा काढायचा दांडगा अनुभव जर्मनीच्या गाठीशी होताच. फ्रँको-प्रशियन युद्धात त्यांनी संशयास्पद असलेल्या बंडखोरांचा असाच निकाल लावला होता (Franc-tireurs). १९०४-१९०८ या काळात आफ्रिकेतील जर्मन वसाहतीतील (सध्याचा नाबिबीया) हेरेरो टोळ्यांचा नाश, दुसर्‍या महायुद्धात नको असलेले बेल्जियम नागरिक व शरण आलेल्या फ्रान्सच्या ३००० काळ्या सैनिकांची कत्तल ही त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणता येतील.

आईनझासग्रूपेनच्या या नरसंहाराच्या पद्धतींमधे सुधारणेला खूपच वाव होता. मुख्य म्हणजे त्यात बराच दारूगोळा खर्च व्हायचा, क्वचित एखादा कैदी जिवंत रहायची शक्यता असे आणि कधी कधी यात भाग घेणार्‍या जर्मन सैनिकांनाच याचा उबग यायचा. या सगळ्या त्रूटी दूर करायचे हिमलरच्या मनात होतेच. १९४१ च्या शेवटी शेवटी नाझी हायकमांडने या जनसंहारासाठी आधुनिक व अधिक कार्यक्षम पद्धती शोधायचे आदेश दिले. यातून त्या भयानक ‘झायक्लॉन-बी’ या विषारी वायूचा यासाठी उपयोग शोधण्यात झाला. ३ सप्टेंबर १९४१ रोजी पोलंडमधे असलेल्या औशविट्झ नावाच्या छळछावणीत १२ क्रमांकाच्या इमारतीत २५० कैद्यांना (हे पोलंडचे नागरिक होते) हा वायू वापरून ठार मारण्यात आले. झायक्लॉन-बी हा सायनाईड गॅस होता व आत्तापर्यंत कपड्यांच्या व खोल्यांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येई. हत्याकांडाच्या बाकीच्या पारंपारिक पद्धती वापरात असल्यातरी नाझींनी झायक्लॉन-बी हा विषारी वायूच ज्यूंच्या वंशसंहारासाठी वापरण्याचे निश्चित केले होते. त्याबद्दल हाईड्रिश म्हणला, ‘ज्युंच्या वंशसंहारासाठी झायक्लॉन-बी सर्वोत्तम आहे.’ हिटलरच्या खाजगी ग्रंथालयात १९३१ साली प्रकाशित झालेले विषारी वायूवर असलेले एक पुस्तक होते त्यात प्रुसिक अ‍ॅसिडबद्दल माहिती होती. हेच बाजारात झायक्लॉन-बी म्हणून विकले जात होते. अर्थात यावरून हा गॅस या कामासाठी वापारावा असे हिटलरने सांगितले असावे असे अनुमान काढणे धाडसाचे ठरेल पण त्याला झायक्लॉन-बी हे काय प्रकरण आहे हे माहीत होते निश्चित.
या विषारी वायूच्या नावाच्या पहिल्या शब्दाचा म्हणजे झायक्लॉनचा अर्थ इंग्रजीमधे होतो सायक्लॉन व मराठीत होतो चक्री वादळ व बी पासून जर्मन भाषेत प्रुसीक एसीडचे नाव चालू होते.

आगमन व निवड....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
औशविट्झ छावणीचा प्रमुख रुडॉल्फ हेस याने रक्तपात थांबवण्यासाठी (म्हणजे ठार मारताना रक्त सांडू नये म्हणून) या वायूचा या कामासाठी उपयोग करायची कल्पना सुचवली. हा स्वत: नाझी पार्टीचा पहिल्यापासून सदस्य होता. त्याने नाझी पार्टीचे सदस्यत्व घेतले १९२२ च्या नोव्हेंबरमधे व त्याचा सभासद क्रमांक होता ३२४०.२२ झायक्लॉनच्या वापराने ज्यू संहाराचा वेग वाढला. औशविट्झ-बिरकेनाऊ येथे अकरा लाख माणसे मारण्यात आली त्यातील नव्वद टक्के माणसे ज्यू धर्माची होती. औशविट्झ हे एक असल्या छावण्यांचे व तुरूगांचे प्रमुख कार्यालय होते व त्यात ३०००० कैदी ठेवण्यात येत. बिरकेनाऊ हा जवळच असलेला चारशे पन्नास एकरांवर पसरलेला मोठा तुरूंग होता व त्यात एकावेळी १००००० कैदी ठेवले जात. ते गुलामासारखी कामे करत व शेवटी मरत. औशविट्झच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले बोधवाक्य ‘अर्बैट मख्ट फ्रेई’ म्हणजे ‘काम करून स्वातंत्र्य’ म्हणजे नाझींचा एक क्रूर विनोद होता. त्या छावण्यामधे काम हे ठार मारण्यासाठी देण्यात येई आणि त्या छावण्यांच्या इतिहासात जर्मनांनी एकाही माणसाला जिवंत सोडल्याचे उदाहरण नाही.

जर्मनांच्या ताब्यातील युरोपमधे ज्यूंना गुंडाळल्यानंतर त्यांना रेल्वेने औशविट्झमधे किंवा पूर्वेला असणार्‍या इतर छावण्यांमधे आणले जाई. त्यांना अंदाजे १५ ते २५ किलो वजनाचे सामान बरोबर घ्यायला परवानगी असे. हे त्यांना फसविण्यासाठी केले जाई. सामान बरोबर घ्यायला परवानगी दिल्यामुळे या ज्यूंना असे वाटे की त्यांना दूर पूर्वेत दुसर्‍या वसाहतीत हलविण्यात येत आहे. त्यामुळे ते शांतही रहात व गडबड करत नसत. मरण्यापेक्षा दुसरीकडे रहायाला गेलेले बरे अशी त्यांची मानसिकता अगोदरच तयार झालेली असे. त्यांचा प्रवास हा गुरांच्या गाड्यांतून होत असे. सरासरी अकरा दिवसाच्या प्रवासात अर्थातच काहीही खायला मिळत नसे व स्वच्छतागृहांचा प्रश्नच नव्हता. ही गुलामांची गाडी बिरकेनाऊच्या सायडिंगला आली की तेथे या कैद्यातून काम करण्यायोग्य अशा कैद्यांची निवड (साधारणत: पंधरा टक्के) करण्यात येत असे. उरलेले कैदी व दुबळे, आजारी, म्हातारे, मुले, गर्भार स्त्रिया यांना ताबडतोब गॅसभट्ट्यांकडे नेत असत व ठार मारत असत. बिरकेनाऊमधे २३००० बालकांना ठार मारण्यात आले. ही सगळी बालके गाडीतून उतरल्या उतरल्या एका तासात ठार करण्यात आली. ज्यांना निवडून कामाला लावण्यात आले त्यांचेही आयुष्य सहा महिन्याहून जास्त नव्हते. या कैद्यांना अनेक प्रकारे मरण येत असे. भूक, शिक्षा, मारहाण, आत्महत्या, छळ, दमछाक, टायफॉईड, ताप, हिरड्यांचे रोग, टायफस, क्षयरोग व शास्त्रीय प्रयोगासाठी वापर अशी अनेक कारणे तयार होती. ओस्वाल्ड पापा काडूक हा रक्षक ज्यू मुलांना मारायला नेतांना त्यांना फुगे द्यायचा. त्याला पापा हे टोपणनाव त्याला मुले आवडायची म्हणून पडले होते. दर मिनिटाला दहा मुलांना त्यांच्या ह्रदयात फिनॉलचे इंजेक्शन देऊन ठार मारण्यात येई.

ज्या ज्यू कैद्यांची गॅसने मारण्यासाठी निवड करण्यात येई त्यांना लगेचच जमिनीखाली असलेल्या तथाकथीत स्नानगृहांमधे शॉवरखाली आंघोळीसाठी म्हणून नेण्यात येई. या सर्व न्हाणीघरांवर सर्व युरोपियन भाषेत ’शॉवर’ असे ठळकपणे लिहिलेले असे तर काही न्हाणीघरात छतावर खोटे खोटे शॉवरही बसवले होते. आत जाताना त्यांना घाई करण्यात येई. त्यासाठी आंघोळ झाल्यावर बाहेर जी कॉफी करून ठेवली आहे ती गार होईल असे कारण सांगितले जात असे. कपडे काढायच्या खोल्यांमधे त्या दुर्दैवी जिवांना कपडे खिळ्यांना अडकवायला सांगण्यात येई व ते कुठल्या खिळ्याला अडकवले आहेत हे नीट लक्षात ठेवायलाही सांगितले जाई. एकदा का ते त्या खोल्यांमधे शिरले की बाहेरचे जड लोखंडी दरवाजे झटकन लाऊन घेण्यात येत. छतावर असलेल्या भोकातून मग झायक्लॉनच्या वड्या आत टाकण्यात येत. दहा पंधरा मिनिटात आतला सगळा खेळ खलास झालेला असे.

गॅसशॉवर.........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

छावण्यातील या विषारीवायूची स्नानगृहे चालवण्याचे काम कैद्यांतूनच निवडलेल्या काही ज्यू कैद्यांच्या तुकड्यांवर सोपवण्यात आले होते. त्यांना ’सोंडरकमांडो’ असे म्हणत. एस्. एस् सोंडरकमांडो वेगळे आणि हे वेगळे हे लक्षात ठेवले पाहिजे. या तुकड्यांकडे त्या भट्ट्या व स्नानगृहे चालवणे, त्यांची साफसफाई करणे अशा जबाबदार्‍या देण्यात आल्या होत्या. जेव्हा इटालियन रसायनतज्ञ प्रायमो लेव्हीने औशविट्झमधे पाऊल टाकले तेव्हा त्याला सांगण्यात आले, ‘येथून फक्त धुराड्यातूनच बाहेर पडता येते’’ लेव्ही नंतर म्हणाला, ‘त्यावेळी आम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही पण तो लवकरच आम्हाला कळणार होता.’ हे झायक्लॉन आत टाकायचे काम जर्मन वैद्यकीय कर्मचारी करत पण हे सोडल्यास इतर सर्व काम सोंडरकमांडोच करत. अजून एक काम त्यांना करून दिले जात नसे ते म्हणजे ते हवाबंद दरवाजे लावायचे काम ! आत जाणार्‍या ज्यूंच्या रांगेतील माणसांना ते शांत करत असत. खोटे नाटे सांगत. ते त्यांना ही आंघोळ झाली की त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत कामाला पाठवण्यात येणार आहे असे सांगून त्यांना त्या आंघोळीसाठी तयार करत असत. रांगेतील गोंधळ घालणार्‍या तरूणांना ते दूर नेत व तुरूंगरक्षकांच्या ताब्यात देत. त्यांना लगेचच सायलेन्सर लावलेल्या पिस्तूलांनी ठार मारण्यात येई. ते वयोवृद्ध ज्यूंना कपडे काढायला मदत करून त्यांना धरून गॅसच्या कोठड्यांकडे नेत. रांगेतील माणसांना रबरी दंडूक्यांनी शिस्त लावत त्यांना ते मरणाच्या दाढेत नेत. विषारी वायू आपले काम करत असताना ही माणसे आत गेलेल्या माणसांचे सामान तपासत व त्यातील मौल्यवान वस्तू काढून घेत. नाझी सैनिकांना ज्या वस्तूंचे महत्व वाटत नसे त्या जाळून टाकायचे कामही यांनाच करावे लागे. जन्मभराच्या आठवणींची छायाचित्रे, धार्मिक पुस्तके, प्रार्थनेच्या शाली, खेळणी, गोंडस बाहुल्या या सगळ्या वस्तूंची जाळून विल्हेवाट हेच लावत. कैद्यांची दुसरी तुकडी आंघोळीसाठी येण्याअगोदर ती मृत्यूची स्नानगृहे प्रेते बाहेर काढून साफ करायचे काम यांना करावे लागे. बर्‍याच खोल्या मानवी विष्ठेने भरलेल्या असायच्या त्याचीही साफसफाई यांनाच करावी लागत असे. या सगळ्या कोठड्या चकाचक करून तयार ठेवाव्या लागत कारण पुढच्या तुकडीतील कैद्यांना कसलाही संशय यायला नको. त्या कोठड्यातील गॅसचा व विष्ठेचा वास जाण्यासाठी स्त्री कैद्यांच्या सामानात सापडलेल्या अत्तरांच्या बाटल्यांचा वापर केला जाई. ते प्रेतांच्या तोंडातील सोन्याचे दात शोधत, तोंडात लपवलेली सोन्याची नाणी काढत, प्रेतांच्या डोक्यावरचे केस काढत, त्यांच्या बोटातील अंगठ्या काढत, कृत्रिम अवयव बाजूला करत आणि शेवटी ती प्रेते एखाद्या चिंध्या फेकाव्यात तसे फोर्कलिफ्ट्मधे टाकत. कधी कधी पंधरा ते वीस प्रेतांचे असे ढीग लळत लोंबत हलवले जात. वरच्या मजल्यावर सोंडरकमांडोज पिचफोर्क घेऊन ती प्रेते जाळण्यासाठी भट्टीत ढकलत.
भट्ट्या.........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या भट्ट्या त्यांना सतत पेटत्या ठेवाव्या लागत; त्यातून निघणारा धूर चाळीस पन्नास फूट धुराड्यातून वर जात असे. यानंतर न जळलेल्या कवट्या, पायाची हाडे यांचे ते तुकडे करत व राखेत मिसळत. ही राख हातगाड्यातून जवळील एका तलावात टाकण्यात येई. जास्त असेल तर ट्रकने सोला नदीत टाकण्यात येई. एका गॅस चेंबरमधे साधारणत: नव्वद मिनिटात २००० ज्यू मारले जात. ऑशविट्झमधे असे सहा गॅस चेंबर चोवीस तास चालवले जात होते. या कामासाठी दहा नाझी एस्. एसचे सैनिक व वीस सोंडरकमांडोज यांची तुकडी तैनात केली जात असे. या कामावर ज्यांची नेमणूक होई त्यांना खास भत्ते मिळत. या भत्यांसाठी एस्. एस् सैनिक जादावेळ काम करून जास्त अन्न, दारू, सुट्ट्या असे फायदे उपटीत. काही वेळा चोवीस तासात २०००० ज्यूंना ठार मारण्याची कामगिरी या तुकड्यांनी पार पाडली होती आणि हे फक्त ऑशविट्झमधे.....बाकी ठिकाणी असेच काहीतरी होत असणार.........

क्रमशः

जयंत कुलकर्णी.
चालू ठेउ का नको हे कृपया सांगावे......

इतिहासकथालेख

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Feb 2013 - 8:48 am | श्री गावसेना प्रमुख

इतक भयानक आहे की......वाचायलाही अवघड आहे सत्य असल तरी.

मनीषा's picture

21 Feb 2013 - 8:54 am | मनीषा

अमानुष, भयंकर !
युद्धस्य कथा रम्या: ... असे कधीच म्हणणार नाही आता.

प्रचेतस's picture

21 Feb 2013 - 9:21 am | प्रचेतस

भीषण आहे.
पण लेखमाला चालू राहू द्या.
इतिहास जरी क्रूर असला तरी तो समजून घ्यावाच लागतो.

सहमत आहे, लिहित रहा.

शैलेन्द्र's picture

21 Feb 2013 - 9:45 am | शैलेन्द्र

अतिशय भीषण.. समाज म्हणून वागताना माणूस किती वाईट वागु शकतो हे पाहून माणूस असल्याबद्दलही अभिमान वाटणे बंद होतय..

इस्त्रायलने अशा लोकांना वेचुन वेचुन का मारलं ते ह्यामुळे कळतं. कितीही कडु असले तरी हे लिखाण चालुच ठेवावे हि विनंती.

मृत्युन्जय's picture

21 Feb 2013 - 11:37 am | मृत्युन्जय

छळछावण्यांबद्दल बरेच वाचले आहे. पण प्रत्येकवेळेस वाचताना काहितरी अजुन क्रूर वाचायला लागते. किळस येते. माणुस माणसाशी असा कसा वागु शकतो असे वाटते. हिंदु - मुस्लिम दंगे होता त्यातही लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, जीव घेतात, बायकांवर बलात्कार करतात. ते ही पशुवतच कृत्य. तरीही छळछावण्या त्याहुन क्रुर वाटतात.

बाकी या छळछावण्यांचा वापर फक्त ज्युंसाठीच केला गेला असे नाही. सामान्य पोलिश नागरिकही यात भरडले गेले.

दोन महिन्यांपूर्वी "डखाऊ"ला जाऊन आलो. आद्य छळछावणी. अंगावर काटा आला. पुढे २ दिवस डिस्टर्बड होतो.

लिहिणे चालू ठेवा...

मन१'s picture

21 Feb 2013 - 1:57 pm | मन१

त्रासदायक असला तरी प्रवास सुरु ठेवा.
अमानवीपणाकडे एकदा प्रवास सुरु झाला की काय होते हे सर्वांनाच कळू द्या.
निदान मानवजात स्वतःचा विवेक आता तरी खुंटिला टांगणार नाही.

पैसा's picture

21 Feb 2013 - 10:12 pm | पैसा

नाही सहन होत. पण तुम्ही लिहा.

जुइ's picture

22 Feb 2013 - 12:04 am | जुइ

अंगावर काटा आला. तरी तुम्ही लिहा.

बांवरे's picture

22 Feb 2013 - 1:37 am | बांवरे

अमानुष आहे हे सगळे.
मन घट्ट करून वाचत गेलो.

५० फक्त's picture

22 Feb 2013 - 8:00 am | ५० फक्त

दोन क्रुरतांमध्ये चांगली कोणती वाईट कोणती,आपण कोण ठरवणार.

Dhananjay Borgaonkar's picture

22 Feb 2013 - 12:16 pm | Dhananjay Borgaonkar

काका, लिखाण आजिबात बंद करु नका.
पु.भा.प्र.

सस्नेह's picture

22 Feb 2013 - 4:35 pm | सस्नेह

जयंतकाका कृपया मालिका सुरु ठेवावी. हेही वाचले पाहिजे..

लाल टोपी's picture

22 Feb 2013 - 8:26 pm | लाल टोपी

कोणतेही विशेषण अपुरे वाटावे असे कृत्य पण मालिका जरुर पुढे लिहा ज्यांना हिटलर वंदनीय,पूजनीय,सलाम करण्यायोग्य वाटतो त्यांना हे कळणे खरोखरच आवश्यक आहे

नका लिहु हेच सुचवलं असतं पण माणुसकी कोणत्या पातळी पर्यंत खालावू शकते याच भान आलच पाहिजे...

जर्मन समाजातील सर्व थरातील माणसे या पोलिसदलात होती आणि कोणावरही ज्यूंना मारण्याची जबरदस्ती करण्यात आली नव्हती ना या कामात भाग घेण्यास नकार देण्यासाठी शिक्षा झाली होती. फारच थोड्या जर्मन नागरिकांचा या हत्याकांडाला पाठींबा होता पण त्याच वेळी बहुसंख्य नागरिकांनी या प्रकरणाकडे डोळेझाक केली किंवा विरोध केला नाही हेही नाकारता येत नाही.

निशब्द!