युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Mar 2013 - 2:47 pm

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)
युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २
युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - ३

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आज जर तुम्ही ऑशविट्झला भेट दिलीत व तेथील वस्तूसंग्रहातील वस्तूंच्या समोर उभे राहिलात तर तुमच्या मनात भावनांचा हलकल्लोळ माजेल. अशी कितीही पुस्तके वाचून तो अनुभव तुम्हाला येणार नाही. कैद्यांच्या काढून घेतलेल्या पादत्राणांच्या डोंगरांवरवर चढण्यासाठी शिड्या लागत. (2004 मधे जेव्हा पादत्राणांच्या 43000 जोड्या साफ करण्यात आल्या तेव्हा काही बुटांमधे लपवलेले हंगेरियन चलनही सापडले.) दाढीचे ब्रश, टूथब्रश, चष्मे, कृत्रीम अवयव, लहान मुलांचे कपडे, कंगवे या वस्तूंचे ढीग आणि दहा लाख कपडे आज तेथे बघण्यासाठी ठेवले आहेत.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ज्यूंच्या बर्‍याचशा वस्तू अगोदरच जर्मन सैनिकांनी लांबवल्या होत्या. या ज्या वस्तू आहेत त्या रशियन सैन्य यायच्या अगोदर जानेवारी 1945 मधे सोडून दिलेल्या आहेत. सात टन मानवी केसही जर्मनांनी येथे सोडून दिले नाहीतर ते जर्मनीमधे वस्त्रोद्योगात वापरले गेले असते. हजारो सुटकेस तेथे पडलेल्या आहेत ज्यावर त्यांच्या मालकांची नावे व जन्मतारखा खडूने लिहिल्या आहेत. उदा. ‘क्लेमेंट हेडविग 8/10/1898.’ जेव्हा बाबागाड्या बाहेर काढायची वेळ आली तेव्हा त्यांच्या पाच रांगा करण्यात आल्या. या पाच रांगांना स्टेशनपर्यंत पोहोचायला एक तास लागला. 1943 मधे हिमलरने एस्. एस् च्या ओस्वाल्ड पोल नावाच्या एका अधिकार्‍याला पत्र लिहून ज्यूंच्या जप्त केलेल्या वस्तूंबाबत विचारणा केली. त्याने ज्यूंच्या घड्याळातील हिर्‍यांचे काय होणार याबद्दल चिंता व्यक्त केली कारण असे लाखो खडे नाझींच्या गोदामात पडले होते आणि ते जर्मनीमधे घड्याळे तयार करणार्‍या कारखान्यांना देता येतील अशी त्याची कल्पना होती. त्याच सुमारास त्याने पाच ज्यू जवाहिर्‍यांचे प्राण वाचवले कारण यांच्याकडे हिर्‍याचे दागिने करायचे कौशल्य होते. या जवाहिर्‍यांना जर्मनीतील सर्वश्रेष्ठ नाईट क्रॉसचे (ओकची पाने आणि हिरे) रेखांकन करायचे काम देण्यात आले. हे पदक फक्त सत्तावीस लोकांना दिले गेले.

हिटलरचा वास्तूशास्त्रज्ञ अल्बर्ट स्पीअर न्युरेंबर्गच्या खटल्यातून सुटला खरा पण 14 सप्टेंबर 1942 रोजी त्यानेच बिर्केनाऊ येथे माणसांचे कत्तलखाने व राहण्यासाठी झोपड्या लवकरात लवकर उभ्या करण्यासाठी एकशे सदतीस लाख राईशमार्क मंजूर केले. चार गॅस कोठड्या 1943 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झाल्या आणि त्यांना 1 ते 4 अशी नावे देण्यात आली. 1944 च्या अंतापर्यंत येथे 437000 हंगेरीयन ज्यू आणण्यात आले आणि काही आठवड्यातच ठार करण्यात आले. या गॅस चेंबर्स व प्रेते जाळायच्या भट्ट्या तयार करण्यासाठी अनेक जर्मन खाजगी कंपन्यांना पाचारण करण्यात आले होते. टोफ एंड सन्स या कंपनीचा इंजिनियर कर्ट प्रुफर याला त्याच्या या भट्ट्यांचा इतका अभिमान होता की त्याने त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानाचे पेटंट घ्यावे असे कंपनीला सुचवले व घेतले. फ्रान्समधून येथे पाठवण्यात आलेला पॉल स्टाईनबर्ग लिहितो, ‘त्या प्रेते जाळायच्या भट्ट्यांमधून येणार्‍या ज्वाळा तीस फूटाची उंची गाठत व लांबून दिसत. जळलेल्या मासाचा वास साडेतीन मैलावर असलेल्या बूनापर्यंत येत असे.’ कधी कधी एखादी भट्टी नादुरूस्त झाल्यावर किंवा प्रेते जास्त झाल्यावर ती बाहेर उघड्यावर खड्ड्यात जाळावी लागत. त्यावेळेचे वर्णन करताना हेस लिहितो, ‘या खड्ड्यातील अग्नी कायम प्रज्वलीत ठेवावा लागे व त्यात साठणारी चरबी वाहून जाईल अशी व्यवस्था करायला लागे. हवा लागण्यासाठी आपण सरपण खाली वर करतो तसे हे प्रेतांचे ढीग खालीवर करावे लागत.’ युद्धाच्या शेवटी या तुरूंगातून वाचलेल्या 7500 कैद्यांची सुटका करण्यात आली. यात सहाशे अनाथ मुले होती ज्यांना त्यांच्या आईवडीलांची नावेही माहीत नव्हती.

ऑशविट्झमधे ज्या पागांमधे बेचाळीस घोडे मावत त्यात 400 ते 800 कैदी कोंबण्यात येत. या वातावरणात संसर्गजन्य रोग व उवा फैलावत. त्या खोल्यांमधे उंदीर व घूशी येत पण त्यांची संख्या वाढत नसे कारण त्यांचा कैदी लगेचच फडशा पाडत. पाच फूट रूंद व तेवढीच उंची असलेल्या खोल्या कैद्यांना कोंडण्यासाठी बांधलेल्या होत्या. काही चळवळ्या कैद्यांना याच्यात उपाशी कोंडून ठेवून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येई. या सगळ्या भयंकर वातावरणात काही अलोट धैर्याची उदाहरणेही सापडतात. एका फ्रांन्सीझेक नावाच्या बायका मुले असलेल्या कैद्याची या कोठडीतील जागा कोल्बे नावाच्या एका धर्मगूरूने स्वत:हून घेतली व त्याच्या बदल्यात ती शिक्षा भोगली. या शिक्षेच्या शेवटी दहा कैद्यांपैकी फक्त कोल्बेच जिवंत राहिला होता म्हणून त्याला शेवटी विषाचे इंजेक्शन देऊन मारण्यात आले. या पादर्‍याला 1982 मधे संतपद देण्यात आले.

डखाऊच्या जवळ एक छोटा तुरूंग होता. त्यातून व्हिक्टर फ्रँकेल नावाच्या एका कैद्याला काही काळासाठी ऑशविट्झला पाठवण्यात आले होते. तेथील सगळा प्रकार बघून तो भयभीत झाला. त्याच्या आठवणीत त्याने लिहिले,
‘मी माझा ऑशविट्झचा मुक्काम कधीच विसरू शकत नाही. एक दिवस रात्री मला शेजारच्या कैद्याच्या व्हिवळण्याने जाग आली. त्याला बहुदा स्वप्न पडत असावे. त्याला उठवण्यासाठी मी माझा हात पुढे केला पण झटक्यात तो मागेही घेतला. जेथे वास्तव स्वप्नांपेक्षा भयंकर असते त्या वास्तवात त्याला आणून त्रास द्यायला नको हा मी त्यावेळी केलेला विचार आजही मला स्पष्ट आठवतो.’

या तुरूंगात वास्तव भीषण होते हे खरे आहे. प्रायमो लेव्ही लिहितो, ‘क्षणाक्षणाला आम्ही घाबरून दचकून उठायचो. अत्याचारांच्या कल्पनेने आमचे हातपाय थरथर कापत असत व आम्हाला न समजणार्‍या भाषेतून आम्हाला कधी कसली आज्ञा होईल याची कल्पनाच नसायची.’

फ्रँकेल म्हणतो, ‘कैद्यांमधे सर्व थरातील माणसे होती व जगण्याच्या इर्षेने सभ्यता पायदळी तुडवली जात होती. जगण्यासाठी भल्याबुर्‍या मार्गाचा सर्रास वापर केला जात होता. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चोर्‍यामार्‍या, लाच, मित्रांचा विश्वासघात यांचा वापर करताना श्रद्धेला मातीत घातले जात होते.. ....खरे सांगायचे झाले तर आमच्यातील एकही सभ्य माणूस जिवंत राहिला नाही.’ प्रायमो लेव्ही ऑशविट्झमधून नशिबानेच जिवंत बाहेर पडला. त्याने त्याच्या एका पुस्तकात म्हटले आहे, तेथे कमकूवत माणसाशी ओळख वाढविण्यात वा मैत्री करण्यात अर्थ नव्हता कारण अशा माणसाचा शेवट काहीच आठवड्यात खड्यात किंवा मुठभर राखेत होणार हे निश्चित होते. यानंतर नोंदवहीत काट मारलेल्या नावानेच त्याचे अस्तित्व राहणार !’ या साठी त्याने एक उदाहरणही दिले,
‘मी त्या तुरूंगातील इस्पितळात असताना माझ्या वरच्या फळीवरच्या कैद्याला शेवटची घरघर लागली होती. त्याने माझा आवाज ऐकल्यावर त्याने उठून बसायचा निकाराचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात तो पडला व डोके खाली या अवस्थेत लटकू लागला. त्याचे हात कडक झाले होते व डोळे पांढरे. तो खाली पडतोय हे बघताच खालच्या माणसाने त्याला हाताने सावरायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की तो मेलेला होता. त्याने आपला हात काढून घेतल्यावर ते कलेवर खाली पडले. कोणाला त्याचे नावही माहीत नव्हते.’

मानवी मुल्यांच्या जवळपास जाणारे कुठलेही कृत्य त्या आवारात अशक्य होते. फ्रँकेल लिहितो,
‘नवीन आलेल्या कैद्यांना संडास किंवा तत्सम खड्डे साफ करण्याचे काम सांगायची नाझींची आवडती प्रथा होती. मानवी विष्ठेने भरलेले गाडे घेऊन हे कैदी खडबडीत रस्त्यावरून जाऊ लागले की त्यातील घाण त्यांच्या अंगावर, तोंडावर उडे. ही उडालेली घाण साफ करायचा प्रयत्न केला की रक्षक त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव करत. मानहानी करून माणूस म्हणून जगायची त्याची इच्छाच नष्ट करायचे हे प्रयत्न होते.’

या भयानक अनुभवतून गेलेल्या व नंतर नोबेल पारितोषिक मिळालेला एली वायझेल 1983 मधे म्हणाला, ‘ऑशविट्झने कल्पना आणि ज्ञान या दोन गोष्टी अस्तित्वात आहेत का नाहीत याची शंका उत्पन्न केली. उरल्या आहेत फक्त कटू आठवणी. मेलेले आणि जिवंत यांच्या मधे एक अथांग पोकळी उरली जिचे आकलन जगातील सर्व बुद्धिवंतांनाही शक्य नाही.’

स्मारक........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जी माणसे मारायची होती त्यांना कसे वागवावे, त्यांचे काय करावे, याबद्दल या नरसंहाराच्या सुरवातीला नाझींच्या विचारांमधे बराच गोंधळ होता. एका क्षणी हिटलरच्य मनात या ज्यू कैद्यांना आग्नेय पोलंडमधे पाठवायचे होते पण नंतर तो भूभाग जर्मन वंशांच्या जनतेसाठी वसाहती स्थापन करण्यासाठी निश्चित करण्यात आला. ज्यूंना उपासमारीने मारले तर रोगराई पसरेल आणि त्यामुळे उर्वरित जर्मन नागरिकांनाही ते रोग जडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बर्‍याच तज्ञांचे मत पडले. या बाबतीत कसलीही ठाम योजना नव्हती तर वेळ पडल्यावर ज्याला जे जे सुचेल ते तो करत होता. शेवटी जानेवारी 1942 मधे बर्लिनमधील वान्झी तलावाकाठी, एका प्रासादात, दिवसभर चाललेल्या बैठकीत याचा तुकडा पाडण्यात आला. अर्थात या बैठकीने ज्यूंच्या हत्याकांडाच्या योजनेचे उदघाटन झाले असे म्हणता येणार नाही कारण ते अगोदरच डिसेंबरमधे चालू झाले होते. ही बैठक कैद्यांच्या वाहतूकीचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली असेही म्हणता येणार नाही कारण संबंधीत अधिकार्‍यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते. या बैठकीत मिश्रवंशाच्या ज्यूंचा प्रश्नही चर्चेला आला नाही. सदतीस वर्षाचा पोलीस प्रमूख राईनहार्ड हायड्रिश याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली हे जाहीर करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. सर्व उपस्थीत व हायड्रिश यांची ही सामुहिक जबाबदारी आहे व तिसर्‍या राईशचे हे धोरण आहे याबद्दल कोणाच्याही मनात कसलीही शंका उरायला नको म्हणून ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत जे काही ठरले होते त्याचा वृत्तांत लिहिताना या नीच धोरणावर सभ्यतेचा मुलामा देणारी भाषा वापरण्यात आली होती. हाच वृत्तांत इतिहासामधे ‘वान्झी प्रोटोकॉल’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे नाव व भाषा त्या बैठकीत वापरली गेली नव्हती. हे नाव नंतर पडले. या बैठकीत काय घडले याचा अंदाज आपण बांधू शकतो कारण अ‍ॅडॉल्फ आईकमन याने या बैठकीबद्दल बोलताना म्हटले आहे, ‘त्या बैठकीमधे सर्व उपस्थित रोखठोकपणे बोलत होते.’ त्या बैठकीचा इतिहासकार त्या बैठकीबद्दल लिहितो, ‘हा वान्झी प्रोटोकॉल’ ज्यूंबद्दलचे नाझी जर्मनीचे आगामी धोरण काय राहणार आहे याची एक चुणूक होती.’

आईकमन......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या बैठकीच्या वृत्तांतात स्पष्टच म्हटले होते की अंदाजे एकशे दहा लाख ज्यूंचा प्रश्न या योजनेद्वारे कायमचा निकालात काढण्यात येईल. यासाठी युरोपमधील सर्व ज्यूंच्या लोकसंख्येचा बारीक विचार केला गेला होता. उदाहरणार्थ युक्रेनमधील २९९९६८४ (एकोणत्तीस लाख नव्वाण्णव सहाशे चौराऐंशी) ज्यूं हिशेबात धरले गेले होते त्याच बरोबर अल्बेनियामधील २०० ज्यूही या हिशेबात धरले गेले होते. आयर्लंड या युद्धात अलिप्त होता तरीही त्या देशातील ४००० ज्यूंची या यादीत हजेरी लावण्यात आली होती. युद्धानंतर (जर जर्मनीने ब्रिटनवर आक्रमण केले असते तर ) जर्मनीने आयर्लंडच्या सार्वभौमत्वाची काय किंमत ठेवली असती हे यावरून दिसून येते. या कागदपत्रात ज्यू कोणाला म्हणायचे याचाही सविस्तर उहापोह केला होता. उदाहरणार्थ, चौथ्या भागात सहाव्या परिच्छेदात पहिल्या पिढीतील मिश्रवंशाचा विवाह दुसर्‍या पिढीतील मिश्रवंशाच्या व्यक्तीशी झाला तर काय समजायचे व त्या जोडप्याचे काय करायचे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांना होणार्‍या मुलांमधे ज्यू रक्त जास्त प्रमाणात असणार त्यामुळे अशा जोडप्यांची रवानगी गेट्टोमधेच करावी, असे त्यात सुचवले आहे.

वान्झी प्रोटोकॉल अस्तित्वात आल्यावर वंशसंहाराचे औद्योगिकरण झपाट्याने झाले. या बैठकीचा वृत्तांत स्वत: आईकमनने लिहिला. या बैठकीला एकूण २७ वरिष्ठ अधिकारी हजर असले तरी बोलण्याचे पुषकळसे काम हायड्रिशनेच केले. बैठक झाल्यावर त्यांनी मद्यपान केले व सिगारचा आनंद घेतला. रोझमन म्हणला, ‘वान्झी प्रोटोकॉल नंतर वंशसंहारचे धोरण अधिकृत झाले.’ आकडेपण हेच सांगतात. वान्झीची बैठक व्हायच्या अगोदर फक्त (एकूण मारण्यात आलेल्या संख्येच्या ) दहा टक्के ज्यू मारले गेले. त्यानंतर एका वर्षात त्याचे प्रमाण वाढून पन्नास टक्के झाले. आईकमनने १९६१ साली त्याच्या मुलाखतीत सांगितले, ‘सगळेच जण या बैठकीत झालेल्या ठरावांच्या बाजूने होते. मला आश्चर्य वाटले जेव्हा ते ज्यूंचा कायमचा निकाल लावण्याची मागणी अहमिकेने मांडू लागले तेव्हा.’ त्यातील जे तज्ञ होते त्यांनी युद्धप्रयत्नांवर विपरीत परिणाम न होता हा नरसंहार कसा अमलात आणता येईल याचीही चर्चा केली. त्या गॅसचेंबर्समधे झायक्लॉन-बीच्या वड्या टाकणारे वैद्यकीय कर्मचारी जितके या हत्याकांडांना जबाबदार आहेत, तितकीच ही सगळी नोकरशाहीही जबाबदार आहे किंबहूना जास्तच. प्रशासनातील उच्चशिक्षित अधिकारी ज्यातील काही डॉक्टरेट मिळवलले होते आणि खालच्या थरातील कामगार वर्ग या दोन्ही वर्गाची पारंपारिक मानवी सभ्यता, नितिमत्ता त्यांना सोडून गेली होती. या सुशिक्षित वर्गाला तर सामाजिक दबावाखाली त्यांचे मन असंवेदनशील झाले होते असा दावा करणेही शक्य नाही कारण मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय राहिला, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा जो नरसंहार झाला तो शास्त्रज्ञ, इंजिनियर, समाजशास्त्रज्ञ, लोकसंख्याशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ सारख्या अनेक सुशिक्षित लोकांच्या मदतीशिवाय शक्य झाला नसता हे सत्य आहे. समाजशास्त्रज्ञांच्या पाठिंब्याशिवाय तर हे टोकाचे अतीरेकी सामाजिक अभियोजन (Social Engineering) होऊच शकले नसते. दुर्दैवाने या सगळ्या मंडळींनी कामाचे असे वातावरण तयार केले होते की ज्यात नितिमत्ता काडीलाही शिल्लक नव्हती. जर्मनीमधे नितिमत्ता नसणार्‍यांची एक नवीन जातच तयार झाली. त्या जातीच्या उच्चशिक्षित विद्वानांनी ‘लोकसंख्येचा ताळेबंद’ ‘जगायला नालायक असलेल्या जमाती’ ‘खायला भार असलेल्यांचा निकाल’ ‘वंशविच्छेद’ अशा विषयावर आपले शोधनिबंध प्रसिद्ध केले होते. या सगळ्यांचा उपयोग करून हिटलरचा जनरल प्लॅन-ओ.एस.टी तयार केला गेला ज्याच्यात पूर्व युरोपमधे जर्मन वंशाचे सैनिक, शेतकरी आणि सेवा पुरवणार्‍या जनतेच्या वसाहती स्थापनेचे हिटलरचे स्वप्न पूरे करायच्या अनेक योजना होत्या.

हिटलर त्याच्या अनेक भाषणांमधे किंवा बैठकींमधे ज्यूंमुळे युरोपची दोन हजार वर्षाची संस्कृती धोक्यात कशी येणार आहे याचे आख्यान लावायचा पण या संस्कृतीचे केंद्रस्थानी असलेल्या किंबहुना या संस्कृतीचे उगमस्थान असलेल्या ख्रिश्चनधर्माशीही त्याचे तीव्र मतभेद होते. गोबेल्सच्या डायरीतील २९ डिसेंबर १९३९ या दिवसाची ही नोंद पहा:
‘फ्युरर अत्यंत धार्मिक आहे हे नि:संशय ! पण त्याच वेळी तो ख्रिश्चनधर्माच्या विरोधातही आहे. ख्रिश्चनधर्मात अस्तंगत होण्याची सर्व लक्षणे दिसत आहेत असे त्याचे स्पष्ट मत आहे. बरोबरच आहे ते! कारण शेवटी तो धर्म ज्यू वंशाचाच आहे. या दोन्ही धर्मात प्राण्यांना अजिबात किंमत दिली जात नाही व त्यांच्याबद्दल या धर्मामधे प्रेमही नाही म्हणूनच शेवटी हे दोन्ही धर्म नष्ट होणार हे निश्चित. स्वत: फ्युरर पक्का शाकाहारी आहे......मनूष्य प्रजातीबद्दल त्याला एवढे प्रेम नाही जेवढे प्राण्यांबद्दल आहे.....मनूष्याने स्वत:ला प्राण्यांपेक्षा फार श्रेष्ठ समजू नये....समजण्याचे काहीच कारण नाही...’

युरोपचे भवितव्य आता कुठल्याप्रकारच्या माणसाच्या हातात होते हे वाचकांच्या लक्षात आले असेल. या माणसाने जगातील दोन धर्म नष्ट होणार असे भविष्य वर्तवले होते कारण त्यांच्या धर्मात प्राण्यांना हीन मानले जात होते आणि या माणसाला मनूष्य प्रजातीबद्दल आदर नव्हता. ज्यू धर्मियांनी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले म्हणून ( खरे तर येशूला रोमन सैनिक जे ज्यू नव्हते त्यांनी सुळावर चढवले होते) ख्रिश्चनधर्मीयांनी ज्यूंच्या वंशसंहाराकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले. यदाकदाचित हिटलरला या युद्धात विजय मिळाला असता तर रोमन साम्राज्यातही झाले नसतील असे हाल ख्रिश्चनधर्मीयांचे युरोपमधे झाले असते. हिटलरच्या प्राणी प्रेमाबद्दल तर बोलायलाच नको. ऑपरेशन बार्बारोसामधे रशियाच्या युद्धभुमीवर जवळ जवळ पाच लाख घोडे ठार झाले........
क्रमशः..............

इतिहासलेख

प्रतिक्रिया

इरसाल's picture

19 Mar 2013 - 4:52 pm | इरसाल

लेख मात्र सुरेख झालाय.

मोदक's picture

19 Mar 2013 - 5:07 pm | मोदक

:-(

मन१'s picture

19 Mar 2013 - 5:32 pm | मन१

.

वेताळ's picture

19 Mar 2013 - 6:42 pm | वेताळ

कसे हे लोक देवाने जन्माला घातले असतील?

आदूबाळ's picture

19 Mar 2013 - 6:50 pm | आदूबाळ

भयानक विषयावर सुंदर लेख!

काही वर्षांपूर्वी "लाईफ इज ब्यूटिफुल" नावाचा छळछावणीच्या पार्श्वभूमीवरचा अप्रतिम चित्रपट पाहिला होता. त्यातला शेवटचा प्रसंग मनावर ओरखडा पाडून गेला आहे.

प्रचेतस's picture

20 Mar 2013 - 10:00 am | प्रचेतस

हे सर्वच भयानक असूनही तुमची लेखनशैली वाचताना खिळवून ठेवत आहे.
पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत.

'क्रूसेड्स' मालिका पण पूर्ण करा ही विनंती.

गणामास्तर's picture

20 Mar 2013 - 10:50 am | गणामास्तर

असेचं म्हणतो..

मनराव's picture

20 Mar 2013 - 6:20 pm | मनराव

>>मनूष्याने स्वत:ला प्राण्यांपेक्षा फार श्रेष्ठ समजू नये....समजण्याचे काहीच कारण नाही...<<<
चोक्कस........

सुबोध खरे's picture

27 Mar 2013 - 1:49 pm | सुबोध खरे

व्हिक्टर फ्रँकेलचे पुस्तक Man's Search for Meaning मध्ये अशा भयानक नरसंहाराचा प्रत्यक्ष अनुभव लिहिलेला आहे. तो स्वतः एक मनोविकार तज्ञ होता.आपले लेख वाचून परत एकदा मन सुन्न झाले. अशा लेखातून येणाऱ्या सुन्नतेतूनच सकारात्मक जीवनाची प्रेरणा मिळते लिहिते राहा.