युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 2:00 pm

न पुसला जाणारा कलंक!
१९३९-१९४५
गॅसचेंबरकडे..............
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आजकाल पहाट शत्रू म्हणूनच उजाडते. असे वाटते की उगवणारर्‍या सूर्याने आमच्या विध्वंसासाठी आमच्या शत्रूशी हातमिळवणी केली आहे की काय !
- प्रायमो लेव्ही – "If this is a man" या पुस्तकात १९४६ मधे.

हिटलरने युरोपमधील ज्यूंच्या शिरकाण करायचा आदेश हाईनरीश हिमलरला केव्हा दिला हा बर्‍याच इतिहासकारांनी वादाचा मुद्दा बनवला असेलही पण ती वेळ व काळ हा काही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणावर एखादा उद्योग चालवावा त्याप्रमाणे ही 'फेनिश्टूंगस्लागर' म्हणजे मानवनिर्मूलन केंद्रे चालवण्यात येत. यात अर्थातच ज्यू व इतर कैद्यांना ठार करण्यात येई. इतिहासकार इआन करशॉच्या शब्दात सांगायचे झाले तर, ज्यूं ही जमात पृथ्वीतलावरून नाहीशी करण्याच्या तत्वज्ञानाचा हिटलर सगळ्यात मोठा पुरस्कर्ता होता. हे त्याचे तत्वज्ञान काही नवीन जन्माला आले नव्हते. हिटलरने ज्यू जमात नष्ट करण्याची धमकी युद्ध सूरू व्हायच्या अगोदरच म्हणजे ३० जानेवारी १९३९ सालीच दिली होती. त्याने राईशस्टॅग समोर भाषण करताना सांगितले -
‘माझ्या आयुष्यात मी नेहमीच दूरदर्शीपणा दाखवला आहे आणि माझ्या कटू व कठोर भविष्यवाणीसाठी माझ्यावर नहेमी कडवट टिकाही होते. आज परत एकदा मी भविष्यात डोकावणार आहे. युरोपमधील व उर्वरित जगातील ज्यू वित्तपुरवठादारांनी या जगाला जर महायुद्धात लोटले तर त्याचे परिणाम फार भीषण होतील. यात ज्यू साम्यवाद जिंकणार नाही याची खात्री बाळगा. झालाच तर युरोपमधे ज्यूंवंशाचा नायनाटच होईल.’

या भाषणामधे म्हटल्याप्रमाणे दुसरे महायुद्ध ज्यू साम्यवाद्यांनी सुरू केले नाही तर ही धमकी देणार्‍या हिटलरनेच पोलंडवर आक्रमण करून सूरू केले हे आपल्याला माहित आहेच. ही धमकी त्याने नंतर अनेक भाषणांमधे वेगवेगळ्या स्वरूपात जाहीरपणे दिली. त्याच्या प्रशासकीय बैठकींमधे तर त्याने त्याच्या अधिकार्‍यांना ही धमकी अमलात आणण्यासाठी काय करावे लागेल याचे सविस्तर मार्गदर्शनही केले. ज्यूंना ठार मारण्यासाठी विषारी वायुच्या उपयोगाचा उल्लेख त्याने लिहिलेल्या माईन कांफ या पुस्तकातही आढळतो. या पुस्तकात त्याने लिहिले होते,
‘वीस हजार एक भ्रष्टाचारी हिब्रूंना विषारी वायूने ठार केले असते तर हे महायुद्ध झालेच नसते व पहिल्या महायुद्धातील असंख्य जर्मन सैनिकांचे प्राण वाचले असते.’

हिमलर........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिटलर आणि हिमलर यांना या कामासाठी स्वयंसेवकांची बिलकूल चणचण भासली नाही. ज्यूद्वेष हा जर्मनीमधेच होता असे मानायचे कारण नाही. फक्त तेथे त्याची तीव्रता नाझी विचारसरणीमुळे जास्त होती एवढेच. बिस्मार्क आणि नंतर वायमार राजवटीत संघटीत कामगार वर्गामधे हा ज्यूद्वेष जास्त दिसत नसे पण या द्वेषाची मूळे जनतेच्या इतर स्तरात खोलवर रूजली होती. उदाहरणच द्यायचे झाल्यास जर्मनीमधे १९७९ साली हरमन हालवर्ट नावाच्या एका ठगाने ज्यूं विरूद्ध एक संघटना स्थापन केली व तो पुढच्याच वर्षी चक्क जर्मनीच्या लोकसभेवर (राईशस्टॅग) निवडून गेला. विशेष म्हणजे या ठगाला त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या ज्यू मित्रांनीच जास्त मदत केली होती व त्याला ज्यू विरूद्ध गरळ ओकल्याबद्दल न्यायालयाने शिक्षाही ठोठवली होती. हा सगळा ज्यू द्वेष त्या काळात ज्यूंची लोकसंख्या जर्मनीच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त एक टक्का असताना सुद्धा होत होता हे लक्षात घेतले पाहिजे. या ज्यूद्वेषाला १८८० ते १८९० या दहा वर्षात ज्युलियस लांगभेन सारख्या लेखकांनी खतपाणी घालून वाढायला हातभार लावला. हा माणूस ज्यूं समुदायाचा उल्लेख त्याच्या लेखात व भाषणात प्लेग, वीष, सापाची गरळ अशी विशेषणे लावूनच करायचा. जगप्रसिद्ध जर्मन संगीतकार वॅगनेर याच्या कॉझीमा नावाच्या विधवेने बायरऑईथ येथे अशीच एक ज्यू विरोधी संघटना स्थापन केली. हिचा जावई एक ब्रिटीश माणूस होता. त्याचे नाव होते हॉउस्टन स्टिवर्ट चेंबरलेन. याने वंश व जात आधारित राजकारणावर विपूल लेखन केले व त्यातच त्याने आर्य विरूद्ध ज्यू यांच्यातील संघर्षाच्या कल्पनेचा विस्तार केला. खरे तर हा एवढा ज्यू द्वेष जनमानसात भरलेला असताना ज्यूंवर हल्ले व्हायला पन्नास वर्षे जावी लागली हेच आश्चर्य म्हणायला पाहिजे. दुर्दैवाने ते काम हिटलरच्या हातून पार पाडायचे दैवाच्या मनात होते.

फ्युरर..........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिटलर तरूणपणी चित्रकला शिकण्यासाठी व्हिएन्नामधे ज्या वातावरणामधे रहात होता तेथे त्याच्या मनात ज्यूद्वेषाची मुळे रुजली आणि तो ही ज्यूंचा द्वेष करायला लागला. ‘हिटलर’ विषयावरच्या एका तज्ञाने लिहिले आहे, ‘चित्रकलेच्या पाठशाळेत रहात असताना त्याच्या वसतीगृहात ज्या प्रकारची वर्तमानपत्रे वाचायला मिळत व ज्या प्रकारची पत्रके वाटली जात ती त्याच्या वाचनात येत असत व त्यावरून तो त्याची मते बनवत असे. रिचर्ड वॅगनेरच्या ऑपेरांना तो असंख्यवेळा जात असे. त्यानेही त्याची ही मते ठाम होण्यास मदत झाली असणार.’ ही सगळी सुरवात होती. जर्मनीच्या पहिल्या महायुद्धातील पराभवाचा राग कोणावर तरी काढायचा व आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनतेचा हा राग ज्यूंकडे वळविण्यात राजकारण्यांना यश आले व हा ज्यू द्वेष उफाळून आला. त्याने हिसंक वळण घेतले. जर्मन जनतेत स्थान मिळवण्यासाठी कावेबाज हिटलरने सामान्य जनतेत असलेल्या या ज्यू द्वेषाचा मोठ्या चतुराईने उपयोग करून घेतला.
बर्‍याच जणांचा असा समज आहे की नाझी जर्मनीमधे वंशविच्छेदाची किंवा जनसमुहाच्या कत्तलींची मोहीम ज्यूंपासून सुरू झाली. पण ती खरी सुरू झाली जर्मन वंशाच्या नागरिकांपासूनच. नाझीपक्षाच्या धोरणानुसार जगायला नालायक असलेल्या (लिन्सउनवेअर्टस लिबन) २१२००० जर्मन व ८००० इतर अशा शारिरीक दुर्बल, वेड्या, नागरिकांना सक्तीने स्वेच्छामरण देण्यात आले. जे वेडे होते त्यांना विषारी धुराच्या शॉवरखाली ठार मारण्यात आले. औशविट्जमधे नंतर जे हत्याकांड घडले त्याचे प्रेरणास्थान हे येथे आहे. १९३८ साली ९ नोव्हेंबरच्या रात्री जो क्रिस्टलनाख्टचा प्रयोग राबविण्यात आला व त्यानंतर सहा महिन्यात हजारो ज्यू छळछावण्यात मारले गेले हे जरी खरे असले तरी नाझी युरोपमधील ज्यूंचे शिरकाण करणार हे उशीरा म्हणजे १३३९ साली लक्षात आले. तोपर्यंत या ज्यूंविरूद्ध दंगली स्थानिक आहेत आणि एक ना एक दिवस त्या शमतील अशाच भ्रमात सर्व जग होते.
अवांतर माहिती
क्रिस्टलनाख्ट :
याचा शब्दश: अर्थ होतो काचांची रात्र
९ आणि १० नोव्हेंबरच्या रात्री नाझी एस् एस्च्या ठगांनी व गुंडांनी जर्मनी व ऑस्ट्रियामधील ज्यूंच्या व्यवस्थांवर हल्ले चढविण्यास सुरवात केली. एस् एस्ने हे हल्ले चालू केल्यावर यात इतर जर्मन नागरिकही सामील झाले हे नाकारता येत नाही. या हल्ल्यात ज्यूंची दुकाने फोडण्यात आली व घरे जाळण्यात आली. या दंगलींमधे सगळ्या रस्त्यावर काचाच काचा झाल्या होत्या म्हणून याला नाव पडले क्रिस्टलनाख्ट. थोडक्यात आपले खळ्ळ्ळ....खट्ट.... यात एक्क्याण्णव ज्यूंना ठार मारण्यात आले तर तीस हजार ज्यूंना पकडून छावण्यांमधे डांबण्यात आले. एक हजार ज्यूंची प्रार्थनास्थळे (सिनेगॉग) जाळण्यात आली. हे सगळे जर्मन सरकारच्या नाकाखाली चालले होते....

नशीबाने हे लक्षात येईपर्यंत जर्मनीतील अर्ध्या ज्यू लोकसंख्येने अगोदरच स्थलांतर केले होते. त्यातील १०००००० अमेरिकेत, ६३००० अर्जेंटिनामधे, ५२००० ब्रिटनमधे, ३३४०० पॅलेस्टाईनमधे, २६००० साऊथ आफ्रिकेत व ८६०० ऑस्ट्रेलियात विस्थापित झाले. बरेच ज्यू पोलंड, फ्रान्स व नेदरलँड येथे ही गेले पण दुर्दैवाने ते देशही त्यांच्यासाठी सुरक्षित नव्हते.
१९३९ साली सुरू झालेल्या महायुद्धात नाझींनी पोलंड जिंकल्यावर ज्यूंना मोठ्या प्रमाणावर गेट्टोमधे डांबण्यास सुरवात केली. या बंदिस्त व अस्वच्छ वस्त्यांमधे ज्यू रोगराईने व कुपोषणाने मरतील असा त्यांचा अंदाज होता. इतक्या कमी जागेत एवढे लोक डांबल्यावर रोगराई झपाट्याने पसरून आपले काम चोख करेल अशी त्यांची खात्रीच होती. उदाहरणार्थ वॉर्सामधे ३३८००० ज्यू (वॉर्साची एक तृतीयांश लोकसंख्या) फक्त शहराच्या अडीच टक्के जागेत कोंबण्यात आली. असे ३०० गेट्टो व ४३७ छावण्या उभ्या केल्या गेल्या होत्या. या छावण्या विनापरवानगी सोडून गेले तर मृत्यूदंडाचीच शिक्षा मिळे व ती अंमलात आणायला ज्यूंच्या श्रेष्ठ नागरिक संघटनेला (ज्यूडेनरात) सांगण्यात येई. १९४१ सालच्या ऑगस्ट पासून वॉर्साच्या गेट्टोत दर महिन्याला पाच हजार पाचशे ज्यू मृत्यूमुखी पडायला लागले.
फ्रान्सचे विशी सरकार मादागास्कर येथील सगळ्यात मोठा गेट्टो चालवत असे. हिटलरच्या मनात युद्ध संपवल्यावर येथे,

युगांडा व सायबेरीयामधे युरोपमधील ज्यू जनता हलवायची योजना घोळत होती. युगांडातील गलिच्छ वातावरण, सायबेरियाची पायपीट आणि मादागास्कर येथे होणारा पीतज्वर व त्याने त्वरित होणारे मृत्यू हे त्याचे मुख्य कारण होते. फेब्रूवारी 1941 मधे मार्टिन बोरमनने ज्यूंची मादागास्करपर्यंत वाहतूक कशी करायची याबद्दल हिटलरबरोबर चर्चा केली. त्यात हिटलरने कामगार मंत्री रॉबर्ट लेज याने कामगारांच्या सहलींसाठी बांधलेल्या क्रूज बोटींचा विचार करायला सांगितला होता. हे जहाज दोस्तांच्या युद्धनौका बुडवतील व त्यातील जर्मन नौसैनिक मृत्यूमुखी पडतील या काळजीने त्यानेच हा विचार बदलला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या जहाजांवर असणार्‍या ज्यूंची त्याला अजिबात दयामाया व काळजी वाटत नव्हती. समजा ही योजना अमलात आणली गेली असती व ही जहाजे दोस्तांच्या तावडीतून सुटून जर मादागास्करला पोहोचली असती तर तेथे ज्यूंचे अजून एक मोठे हत्याकांड पार पडले असते यात शंका नाही.

या सगळ्या कटकटीतून सुटका होण्यासाठी हिमलरने एक विशेष आदेश ( क्र. 14 एफ13) काढून एस्. एसच्या तुकड्या ज्यूंचे व जगायला नालायक ठरवलेल्या इतर जनतेचे शिरकाण करायला छळछावण्यांमधे पाठवल्या. या कार्यक्रमाला ओळखण्यासाठी साठी त्याने एक शब्द गेस्टापोंकडून उसना घेतला, ‘सोंडरबेहांडलूंग !’ याचा अर्थ होतो 'अतिमहत्चाच्या व्यक्तींना देण्यात येणारी विशेष वागणूक.' गेस्टापो संघटना हा शब्द त्यानी ठार मारलेल्या लोकांसाठी वापरत असे. ही खास वागणूक फक्त जर्मनीपुरती मर्यादित राहिली नाही. ऑपरेशन बार्बारोसाच्या काळात एस्. एस् चे चार ग्रूप वेअरमाख्टच्या मागोमाग रशियात शिरले. यांचे कामच जगण्यास नालायक असलेल्या ज्यू, साम्यवादी कार्यकर्ते यांचा निकाल लावायचे होते. या चार तुकड्यामधे सगळी मिळून म्हणजे कारकून, भाषांतरकार, दुभाषे, रेडिओ चालवणारे, सचिव स्त्रिया इत्यादि धरून फक्त तीन हजार माणसे होती. त्यांनी त्यांच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणात कत्तली केल्या. ११ जुलै १९४१ च्या अंतापर्यंत हिमलरने यांची संख्या वाढवत वाढवत चाळीस हजारवर नेली. यात त्याने कमांडोस्टॅब, जर्मन पोलिस, बाल्टीक आणि युक्रेनमधील नाझी पक्षाला सहानभूती दाखवणारे कार्यकर्ते अशा अनेक लोकांना सामील करून घेतले. या ठगांनी सहा महिन्यात अनेकविध मार्ग वापरून १०००००० लोकांना ठार केले. याची त्यांना शरम तर वाटलीच नाही उलट या हत्याकांडांची अंगावर शहारे आणणारी छायाचित्रे त्यांनी जर्मनीमधे त्यांच्या मेसमधे विकायला ठेवली होती.

१९६४ साली पुर्वाश्रमीच्या एका एस्. एस् सैनिकाने जर्मन न्यायालयासमोर तेवीस वर्षापूर्वी रशियात काय होत होते ते सांगितले. त्यावेळी तो म्हणाला,
‘‘या लोकांना ठार मारायचे काम बंदुकीच्या गोळ्यांनी केले जाई. सुरवातीला बहुतेक वेळा या कैद्यांना त्यांनीच खोदलेल्या खड्ड्याच्या कडेला उभे करण्यात येई कारण गोळ्या घातल्यावर त्यांना त्या खड्ड्यात ढकलायला सोपे जाई. नंतर नंतर तेही कष्ट व वेळ वाचविण्यासाठी या कैद्यांना खड्ड्यातच झोपायला सांगून त्यांना बाजूने डोक्यात गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. बियालिस्टॉक, नोव्होग्राड व बारानोवीस येथे कैद्यांची पहिली तुकडी मारून झाली की त्यांची प्रेते वाळू व शाडूने झाकली तरी जायची पण नंतर नंतर तेही बंद करण्यात आले व पुढच्या तुकडीतील कैद्यांना त्या खड्ड्यातील नुकत्याच मेलेल्या कैद्यांच्या प्रेतांवर झोपावे लागे. माती टाकली तरी प्रेतांचे अवयव नवीन मारायला आणलेल्या कैद्यांना दिसतच असत.’

हिटलरच्या युद्धात खरे तर त्याला ज्युंचा खूपच उपयोग करून घेता येण्यासारखा होता परंतू १९४१च्या जुलै व आक्टोबरच्या आसपास जेव्हा रशियन ज्यूंसंहार टोकाला पोहोचला त्याच काळात हिटलरने जेथे जेथे राईशची सत्ता पोहोचेल तेथील ज्यूंना ठार मारायचे ठरवले होते. या निर्णयाचा अचूक काळवेळ सांगणे कठीण आहे कारण नाझींनी ज्यूंच्या या सर्वनाशाचे बरेच पुरावे नष्ट केले आहेत. उदाहरणार्थ १९४३ मधे ४ ऑक्टोबरला हिमलरने त्याच्या वरिष्ठ एस्. एस् अधिकार्यांना सांगितले, ‘ज्यूंची कत्तल ही जर्मनीच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेले पान आहे. असे कधी झाले नाही व पुढेही कधी होणार नाही.’ यामुळे हिटलरने ज्यूंच्या विनाशाचा आदेश केव्हा दिला, किंवा त्याने तो दिलाच नाही, त्याच्या आदेशाचा क्रमांक काय होता, किंवा त्या आदेशाची नोंद कुठे सापडत नाही यासारखे संभ्रमात टाकणारे प्रश्न उपस्थित करण्यात अर्थ नाही. हिटलर व हिमलर हे दोघेच या हत्याकांडाचे शिल्पकार होते व त्यासाठी भविष्यात त्यांनाच जबाबदार धरले जाईल.

१९४१ या वर्षी ऑक्टोबरमधे ज्यूंना युरोप सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली व त्याच सुमारास जर्मनीमधून ज्यूंना हाकलून द्यायचे काम सुरू झाले. पुढच्याच महिन्यात पोलंडमधील ‘उछ येथे विषारी गॅस तयार करणार्‍या व्हॅन्सचा ज्यूंना मारण्यासाठी प्रथम उपयोग करण्यात आला व नंतर तोच प्रयोग ‘खेलमनो’ येथे करण्यात आला. १९३९ मधे या प्रकारच्या गॅस व्हॅन्सचा उपयोग जर्मनीमधे वेड्यांच्या इस्पितळातील ७०००० रुग्णांना ठार मारण्यासाठी केला गेला होता त्यामुळे या प्रकारच्या वाहनांची निर्मिती अगोदरच झाली होती. ही मुळ कल्पना स्टॅलिनची. १९३० साली बंडखोरांना ठार करण्यासाठी मॉस्कोच्या बाहेर हे ट्रक उभे करण्यात येत. या ट्रकमधे माणसे कोंबून त्या गाडीच्या एंजिनमधून बाहेर येणारा (कार्बन मोनोऑक्साईड) विषारी वायू त्यातच सोडण्यात येई. राईनहार्ड हायड्रिशने या गॅस व्हॅनचा उपयोग ज्यूंना ठार मारण्यासाठी करायची कल्पना मांडली. जनतेला काय चालले आहे हे कळू नये म्हणून या ट्रक्सवर ‘फर्निचर वाहतूक’ अशी जाहिरात लिहिलेली असे. 1959 साली त्या मोहीमेत सहभागी झालेला रसायनशास्त्रज्ञ डॉ. थिओडर लेडिग याने त्या व्हॅनमधे माणसे कोंबल्यावर काय काय होत असे ते सांगितले,
‘‘मला असे सांगितले गेले की त्या व्हॅनमधे जाणारे लोक रशियन होते आणि तसेही त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात येणार होते. त्यांना ठार मारण्यासाठी काही जलद पद्धती असेल का याची चौकशी अधिकार्यांनी केली होती......मला अजून आठवते आहे. त्या व्हॅनमधे एका बारीक भोकातून बघता यायचे. नंतर त्यांना बघण्यासाठी खिडक्याही बसवण्यात आल्या.. त्या व्हॅनचा अंतर्भाग दिव्याने उजळलेला असे...सगळे झाल्यावर ते ती लॉरी उघडत. काही प्रेते बाहेर पडत तर उरलेली इतर कैद्यांकडून बाहेर काढली जात. ती प्रेते काळी निळी पडलेली असत. कार्बन मोनोऑक्साईडच्या विषप्रयोगाने त्यांच्या कातडीचा रंग बदलत असे.’

गावोगावी होत असलेल्या या हत्याकांडांमधे अजून म्हणावा तसा सफाईदारपणा आला नव्हता पण लवकरच त्यातही जर्मनीमधे संशोधन झाले. १९४१ साल संपायच्या आत रशियन युद्धकैदी आणि अपंगांना नाझी एस्.एस् ‘झायक्लॉन बी’ या विषारी वायूने ठार मारायला लागली. ऑक्टोबरमधे सर्बियामधे साम्यवादी बंडखोरांचा सूड उगवण्याच्या नावाखाली ज्यूंच्याच कत्तलीच करण्यात आल्या.

१२ डिसेंबरला हिटलरने अमेरिकेविरूद्ध युद्धाची घोषणा केली त्यावेळी त्याने नाझी पक्षाच्या पदाधिकार्यांच्या समोर भाषण केले होते. त्याबद्दल गोबेल्सने लिहून ठेवले आहे,
‘हिटलरने ज्यूंचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पुरता नायनाट करायचे निश्चित केले आहे.’ याच भाषणात हिटलरने १९३९ या वर्षी जानेवारीमधे केलेल्या राईशस्टॅग समोरच्या भाषणाचा दाखला देत म्हटले, ‘मी मागे म्हटल्याप्रमाणे युद्ध सुरू झालेले आहे. आता हे युद्ध ज्यूंचा वंशसंहार होऊनच थांबेल.’ या भाषणानंतर हिमलरने हिटलरबरोबर झालेल्या बैठकीनंतर एका टाचणात लिहिले, ‘ज्यूंचा प्रश्न : साम्यवाद्यांसारखा यांचाही पूर्ण नायनाट करायचा आहे. जेथे जेथे ज्यू सापडतील तेथे त्यांना ठार मारायचे किंवा त्यांना अशा ठिकाणी डांबायचे की तेथे ते नैसर्गिक कारणाने मरायला पाहिजेत हे धोरण आता बदलल आहे. ज्यूंना ठार मारण्यासाठी आता खास छावण्या उभ्या करायच्या आहेत.’ हे धोरण ‘फायनल सोल्युशन’ या नावाने ओळखले जात असे - म्हणजे ज्यूंच्या प्रश्नावरचा शेवटचा उपाय. लुब्लिनपाशी सॉबीबॉर ही छावणी जिंकलेल्या पोलंडमधे उभी केली गेली तर वायव्य दिशेला असणार्या ट्रेब्लिंका यथे दुसर्‍या छावणीचे काम दुसर्‍याच महिन्यात सुरू झाले.
पोलंडमधे त्या काळात दोन लाख ज्यू होते आणि त्यांना दोन वर्षात ठार मारायचे काम एवढे सोपे नव्हते......

क्रमश:................
जयंत कुलकर्णी.
पुढील भागात अत्याचारांची वर्णने आली आहेत. कमकुवत मनाच्या वाचकांनी आपल्या जबाबदारीवर वाचावे ही विनंती !
हे माझ्या आगामी पुस्तक "युद्धाचे वादळ" मधील एक प्रकरण आहे त्यातच एक स्वतंत्र कथा म्हणून सुधारणा केली आहे.

हे ठिकाणलेखमाहिती

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Feb 2013 - 2:12 pm | श्री गावसेना प्रमुख

हिटलर पेक्षाही कृरकर्मे ही होतेच ना,बरोबर आहे की नाही जयंत राव,मग ईतीहास हिटलरलाच का टार्गेट करतो

पक पक पक's picture

19 Feb 2013 - 2:19 pm | पक पक पक

असहमत्...

जयंत कुलकर्णी's picture

19 Feb 2013 - 10:46 pm | जयंत कुलकर्णी

टार्गेट म्हणजे ? जे झाले तेच तथाकथित इतिहासकार लिहितात. मी स्टॅलिनाबद्दलही एका लेखात लिहिले होते. इथेच कुठेतरी सपडेल तुम्हाला. ही लेखमाला वाचल्यावर आपल्याला कळेल की जे घडले तेच लिहिले गेले आहे......

पक पक पक's picture

19 Feb 2013 - 2:18 pm | पक पक पक

खतर्नाक.....

पैसा's picture

19 Feb 2013 - 5:21 pm | पैसा

पहिलेच छायाचित्र पाहून अंगावर काटा आला. वाचू नये असं वाटतं पण माणूस असा कसा वागू शकतो हे सगळ्यांना माहित असलेच पाहिजे. पशु तरी कसं म्हणावं? पशु त्यांना भूक लागते तेव्हाच दुसर्‍या पशुचा जीव घेतात...

५० फक्त's picture

19 Feb 2013 - 6:50 pm | ५० फक्त

श्रीगाप्रंना सहमती, उगा एखाद्यालाच टारगेट करणे हा इतिहासाचा आणि तथाकथित इतिहासकारांचा आवडता खेळ आहे.

जयंत कुलकर्णी's picture

19 Feb 2013 - 7:08 pm | जयंत कुलकर्णी

//तथाकथित इतिहासकार////
:-) आवडले !

५० फक्त's picture

20 Feb 2013 - 7:55 am | ५० फक्त

सर, इथं हा शब्द लिहिताना त्याच्या अर्थाविषयी माझा गोंधळ आहे, इतिहासकार म्हणजे - इतिहास करणारा / घडवणारा या अर्थानं घेतला जावा की इतिहासाचं संकलन करुन त्याचं कागदोपत्रीकरण करणारा.

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2013 - 8:32 am | जयंत कुलकर्णी

अरे बाबा, इतिहासकार म्हणजे इतिहास घडवणारा नाही. त्याचा दुसरा अर्थ सर्वसामान्यपणे अभिप्रेत असतो.....इतिहास लिहिणारा...पण आपण माझा उपहास मनावर घेऊ नये कारण तो एवढ महत्व देण्यायोग्य नाही...जेवढे माझे लिखाण...
:-)

धन्यवाद, इतिहास म्हणजे 'असं असं घडलं' असा एक अर्थ शाळेत असताना ऐकला होता. त्या अर्थानं इतिहासकार म्हणजे 'असं असं घडलं याची नोंद करणारा तो' असंच ना. म्हणजे जे घडलं त्या घडण्याचा कर्ता करविता किंवा निमित्तमात्र व्यक्ती / घटना, मागं पडतं असंच इतिहासाच्या वृत्तांतात होतं असं काय वाटायला लागलंय.

मन१'s picture

19 Feb 2013 - 7:10 pm | मन१

त्रासदायक धागा ह्या मनस्थितीत वाचायला नको होता.
.
मागे एका धाग्यवर तुमची प्रतिक्रिया होती :- "युद्ध लेखमाला काही काळासाठी स्थगित करतोय. लेखांचा त्रास होतोय." तेव्हा तुम्ही म्हटलेली ती गोष्ट ठळकपणे आता जाणवून गेली. "काय त्रास असतो" हे समजले.
ह्यापुढे "पुढील भाग हिंस्र आहे" असा डिस्क्लेमर लेखाच्या आधीच टाकलात तर बरे होइल.

राही's picture

19 Feb 2013 - 11:40 pm | राही

कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स विषयी काहीही आता वाचवत नाही.औश्वित्झ्,त्रेब्लिन्का,डाखाउ,बुखेन्वाल्ड्,सॉबिबॉर,अ‍ॅन फ्रॅन्क्,गेस्टापो,हिम्लर्...छे, नकोच.दुसर्‍या महायुद्धाविषयीचे कोणतेही लेखन छळछावण्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि भराभर पाने उलटत ते वाचावे लागते. इतका छळ,इतकी वेदना,इतकी ससेहोलपट,इतके क्रौर्य ज्ञात आणि नोंदीकृत इतिहासात दुसरे नसेल. ब्रेन्वॉश्ड लोकांचे समुदाय कोणत्या थराला जाऊ शकतात, जातात याचे हे मूर्तिमंत उदाहरण. पण इतिहासापासून आपण काहीच बोध घेत नाही हे सार्वकालिक सत्य आहे.

सहज's picture

20 Feb 2013 - 8:06 am | सहज

प्रतिसादाशी संपूर्ण सहमत. कधी कोणी सत्ताकारणी आपल्या हेतुसांठी कोणत्या समुदायाला टार्गेट करेल.

म्हणुनच मग जिथे घाउक द्वेष दिसतो तिथे प्रतिसाद द्यायची गरज भासते.
म्हणूनच शांतताप्रेमी, सेक्युलर लोकांना फोरम मधे न येण्याचा कंटाळा परवडणारा नसतो.
म्हणूनच आवडत नसले तरी राजकारण-समाजकारण विषयांवर काथ्याकूट करणे / होणे गरजेचे असते.

+१ सहजजी, तुमच्या प्रतिसादाशी संपुर्ण सहमत.

अर्धवटराव's picture

20 Feb 2013 - 9:45 pm | अर्धवटराव

म्हणजे काय?
या शब्दांवर श्लेष, उपहास अभिप्रेत आहे का?

अर्धवटराव

बर्‍याचदा युद्धे वांशीक हिंसाचार बरोबर घेवुन येतात...

राही's picture

20 Feb 2013 - 10:35 am | राही

साय्लेंट मेजॉरिटी ही एक कुकल्पना आहे. मेजॉरिटीने साय्लेंट असू नयेच. पण मेजॉरिटी आक्रमक, लढवय्यीही परवडणारी नाही. अशा वेळी अभिव्यक्त माय्नॉरिटी महत्त्वाची ठरते. कठिण प्रस्तरावर वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पाणी बरसत राहिले तर तो प्रस्तर झिजतो. अभिव्यक्त माय्नॉरिटी तशीच असते.

इनिगोय's picture

20 Mar 2013 - 11:40 am | इनिगोय

प्रतिसाद आवडला.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Feb 2013 - 11:41 am | श्री गावसेना प्रमुख

हे खरय ना,
पोल पॉट कंबोडीयन नेता ह्याच्यावर १७ से २५ लाख लोकांच्या हत्येचा आरोप

जोसेफ स्टलीन( 2.5 million to 10 million लोकांची हत्या)

चीन जपान युद्धात जपान ने चीनचे शहर जिंकल्यावर 250,000 to 300,000 लोकांचा खून व २०,००० स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला

लाल टोपी's picture

20 Feb 2013 - 3:42 pm | लाल टोपी

लेखमालीका मोठ्या काळामध्ये विभागली गेल्यामुळे आधीच्या भागांचे धागे दिल्यास सलगपणे वाचायला सोपे जाईल. शक्य असल्यास ते द्यावे ही विनंती

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2013 - 3:48 pm | जयंत कुलकर्णी

लिंक्स देत आहे.

लाल टोपी's picture

20 Feb 2013 - 6:07 pm | लाल टोपी

धन्यवाद जयंतजी..

लाल टोपी's picture

20 Feb 2013 - 6:05 pm | लाल टोपी

अमानुष आणि क्रुरतेची परीसीमा गाठणा-या तत्वांचा पाठपुरावा करुन इतिहासाचे काळे पान लिहिणा-या हिट्लरला 'उगीचच बदनाम' केले जाते आहे असे वाटणे पटत नाही.

चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याची केव्ह्ढी मोठी किंम्मत चुकवावी लागली आहे.

असा हिटलर, हिमलर परत होऊ न देण्याचा निर्धार सगळ्यांनी करायला पाहिजे.

ऐक शुन्य शुन्य's picture

20 Feb 2013 - 9:29 pm | ऐक शुन्य शुन्य

हिटलर, हिमलर, लादेन किंवा महात्मा गांधी, नेल्सन मंडेला हे त्याकाळच्या परिस्थितीने तयार केले होते...