विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Aug 2012 - 11:24 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-१

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-३

कृष्णदेवराय व विजयनगरवर काढलेले पोस्टाचे तिकिट.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विजयनगरास भेट देणारे परदेशी प्रवासी.

श्रीरंग राजाने त्याचे हे मोडकळीस आलेले राज्य (ते आता साम्राज्य राहिले नव्हते) सांभाळायचे प्रयत्न केले पण दक्षिणेतील त्याचे सरदार आता ताकदवान झाले होते व सर्वांनाच आता सत्ताधीश व्हायची स्वप्ने पडू लागली होती. त्यातच त्यांच्या त्यांच्यात लाथाळ्या सुरू झाल्या कारण शासनकर्ताच राहिला नव्हता. श्रीरंग या अनागोंदीला एवढा वैतागला की त्याने त्याचे राज्य सुरळीत करण्यासाठी दिल्लीश्वराची (शहाजहान) मदत मागितली. नशिबाने की दुर्दैवाने शहाजहानच तसल्याच धामधूमीत सापडला असल्यामुळे त्याने या विनंतीकडे दुर्लक्ष केले. श्रीरंगाचे राज्य खरे खिळखिळे केले ते गोंवळकोंड्याच्या आणि विजापूरच्या एकत्रित आक्रमणामुळे. या दोन राजांनी विजयनगरची आपापसात वाटणीही करून टाकली होती. विजयनगरचा घाटाखालचा भाग गोंवळकोंड्याला जोडायचा व घाटावरचा विजापूरला जोडायचा असा त्यांचा करारच झाला होता.

विजापूरच्या या आक्रमणाचा प्रमूख होता शहाजीराजे भोसले. बेलोरजवळील गुडियत्तम व चंगम येथून ही फौज श्रीरंगावर चालून गेली. त्यानेही बर्‍याच शौर्याने या सेनेशी लढा दिला पण शेवटी त्याचा पराभव झाला. तो होणारच होता. म्हैसूरच्या पलिकडचा भाग विजापूरच्या ताब्यात होताच आता शहाजीने जींजीपर्यंतचा प्रदेशही काबीज करून विजापूरच्या राज्यास जोडला. एवढी मानहानी झाल्यावर त्याने म्हैसूरच्या राजाची मदत मागितली. म्हैसूरच्या या राजाने श्रीरंगाच्या विरोधी असलेले सरदार व विजापूरच्या सैन्याचा एरोडे येथे पराभव केला. तेव्हा श्रीरंग अक्केरीस होता. तेथून त्याचा काहीच पत्ता लागत नाही. तो अज्ञातवासात निघून गेला. श्रीरंगाच्या राणीने शिवाजीमहाराजांकडे पूढे मदत मागितली व त्यांनी तिच्या उदरनिर्वाहासाठी काही मदत केली असे म्हणतात पण याला काही ठाम पुरावा नाही.

एका हिंदू साम्राज्याचा अंत एका हिंदू सरदाराच्या हातून व्हावा या सारखे दुर्दैव नाही असेच म्हणावे लागेल. नशिबाने याच सरदाराच्या हातून दुसर्‍या हिंदू साम्राज्याचा पाया घातला जात होता.

शहाजीराजांनी प्रथम अहमदनगरच्या दरबारी, नंतर १६२५ साली विजापूर, परत अहमदनगर, नंतर मोगल बादशहा (१६३०), नंतर परत अहमदनगर (१६३२) अशा चाकर्‍या केल्या. १६३६ तो विजापूरच्या दरबारात स्थीर झाला व शेवटपर्यंत तो तेथेच राहिला. पण १६४७ साली त्याने परत गोवळकोंड्याची चाकरी पत्करायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. या सगळ्या प्रयत्नात त्याच्यावर स्वामीद्रोही असा शिक्का बसला व त्याला दोनदा तुरूंगात खितपत पडावे लागले. अर्थात एक नोकरी सोडून दुसरी चांगली नोकरी पकडायची यापेक्षा याला जास्त महत्व देता येत नाही.

दुसर्‍या वेळी जेव्हा तो तुरूंगात गेला तो या श्रीरंगराजाला मदत केली या कारणावरून. शहाजी राजे जरी विजापूरकरांच्या तर्फे कर्नाटकवर स्वार्‍या करत होते तरीही ते एक हिंदू होते. त्यांनी हिंदूंच्या कत्तली व ससेहोलपट स्वत: बघितली होती. हे सगळे थांबवायचे असल्यास परत एक विजयनगर तयार करायला पाहिजे हे त्याला वाटणे अस्वाभाविक नाही. शहाजीराजे कर्नाटकात आले ते रणदुल्लाखानच्या हाताखाली विजयनगरचे उरलेसुरले सरदारांचा समाचार घ्यायला. हे करत असताना शहाजीने कुठल्याही हिंदू सरदाराला देशोधडीस लावले नाही. त्याचा भर त्यांना फक्त मांडलिक करून घेणे व महसूल कबूल करून घेणे याच्यावरच होता. याच्या उलट मुसलमानांचे धोरण असे. गोवळकोंड्याचा सरदार मीरजुमला याने विजयनगरचे लचके तोडण्याचे काम प्रथम चालू केले. स्वत: दुर्बल असल्यामुळे श्रीरंगाने त्याविरूद्ध विजापूरकरांची मदत मागितली जी त्याला ताबडतोब मिळाली कारण विजापूरकरांना या राजकरणात हस्तक्षेप करून विजयनगर जमेल तितके हडप करायचे होतेच. विजापूरचा मुस्तफाखान विजयनगरचा सफाया करणार हे लक्षात घेता शहाजीने कुतुबशहास पत्र लिहून त्याच्या पदरी येण्याची इच्छा व्यक्त केली. याचे कारण असे होते की शहाजीला विजयनगरच्या राजकारणातून बाहेर पडायची अजिबात इच्छा नव्हती. शक्य असेल तर त्याला विजयनगर स्वत:च्या ताब्यात घेऊन तेथे सत्ता स्थापन करण्यात जास्त रस होता. पण हे झाले नाही कारण मिरजुमल्याला शहाजी कुतुबशहाच्या पदरी आल्यास तो डोईजड व्हायची जास्त भिती होती. त्याने शांतपणे हे पत्र विजापूरकरांच्या हवाली केले व शहाजीला तुरूंगवास घडला.

मिरजुमलाही गोवळकोंड्याशी प्रामाणिक नव्हताच. शहाजीप्रमाणे त्यालाही विजयनगरची सत्ता नाहीशी झाल्यामुळे निर्माण झालेली पोकळी स्वत:च्या पराक्रमाने व स्वत:च्या स्वतंत्र राज्याने भरून काढायची होती. त्या काळात विजनगर मोडकळीस आल्यावर विजापूर, अहमदनगर व गोवळकोंड्यांच्या सरदारांमधे विजयनगरच्या मोहिमेवर जाण्यात शर्यत असायची कारण जरी हे सरदार या सुलतानांच्या पदरी चाकरी करत होते तरी ते अत्यंत ताकदवान होते व सगळ्यांनाच आपले स्वतंत्र राज्य असावे अशी महत्वाकांक्षा होती. त्यात एकमेव हिंदू सरदार होता तो म्हणजे शहाजी. शहाजीने आपल्या दोन मुलांच्या मदतीने या कैदेतून कशी सुटका करून घेतली हा या लेखाचा विषय नाही..पण दक्षिणेत शहाजीराजांनी तेथील हिंदू सरदारांमधे, नायकांमधे, पाळेगारांना मदत करून जी पुण्याई जमा केली होती त्या पुण्याईवर राजाराम महाराजांच्या काळात मराठेशाही तरून गेली.

उदाहरणार्थ रणदुल्लाखानने बेदनूरचे सर्व राज्य जिंकले होते पण जेव्हा शहाजीची या प्रदेशात नेमणूक झाली तेव्हा शहाजीने ते राज्य वीरभद्रनायकास सन्मानाने परत दिले. त्याच्याच वंशावळीत सोमशेखरनायकाची पत्नी चेन्नमा पूढे आपल्या लहान मुलाला सिंहासनावर बसवून ते राज्य हाकत होती. त्याच काळात जेव्हा राजाराम महाराजांनी मोगलांनी रायगड घेतल्यावर दक्षिणेकडे पलायन केले तेव्हा मोगलांची सेना पाठीवर घेऊन राजाराम महाराज याच बेदनूर प्रांतात शिरले होते. या राणीने राजाराममहाराजांना आश्रय दिला एवढेच नाही तर त्यांना लपवून ठेवले व पाठलाग करणार्‍या मोगलांच्या सेनेस कापून काढले. यानंतर राजाराममहाराज जींजीला पोहोचू शकले. त्या राणीने त्या काळात मराठ्यांसाठी केवढा धोका पत्करला असेल याची कल्पना आज आपण कदाचित करू शकत नसू, पण ते धाडस भल्याभल्यांना त्यावेळी दाखवता आले नाही हेही खरे आहे.

विजयनगरचे राज्य लयास गेले याला अजून एक कारण होते ते म्हणजे त्यांच्या शत्रूची ओळख त्यांना नीट पटली नव्हती. हा प्रश्न शहाजीला आला नाही कारण त्यांचे आयुष्यच मुसलमान सरदारांबरोबर गेले होते. शेवटची लढाई यांच्याबरोबरच होणार हे जाणून त्यांनी शिवाजीला आपली जहागिरी राखण्याच्या नावाखाली दूर पुण्याला ठेवले व त्यांच्या समवेत दादोजी कोंडदेव सारखे प्रामाणिक व हुषार कारभारी ठेवले.
शिवाजीने लहानपणी विजयनगरास भेट दिली व त्यामुळे त्याच्यात हिंदूत्वाचे स्फुल्लींग पेटले असे काही म्हणतात पण ते खरे आहे असे वाटत नाही. शिवाजी बारा वर्षापर्यंत बंगरूळास होता त्यावेळी अर्थातच तो हे सगळे राजकारण उघड्या डोळ्याने पहात असणार. एक लक्षात घ्यायला लागेल की १०-१२ वर्षाची पोरे त्या काळात सध्याच्या तुलनेने मोठी समजली जात असत. सरदारांची तर निश्चितच व त्यांच्यावर सत्ताधारी होण्यासाठी संस्कार केले जात. शहाजीचे शिवाजीवर अत्यंत प्रेम होते व त्यास पुण्याला ठेवण्यामागे त्याचा काहीतरी विचार निश्चित असणार. तो जो काही विचार असेल तो डोळ्यासमोर झालेल्या विजयनगरच्या नाशामुळे डोक्यात आला असेल हे मानायला काही हरकत नसावी..

हा लेख शहाजीराजांवर नसल्यामुळे आपण या पितापुत्रांना येथेच सोडून आपल्या मूळ विषयाकडे वळू.. विजयनगरचा इतिहास तर मी आता सांगितला. आता आपण परदेशी प्रवाशांनी काय वर्णने लिहिली आहेत ते बघूयात. या कामी मला रॉबर्ट स्वेलच्या पुस्तकाची मदत होणार आहेच पण इतरही काही संदर्भ जमा केले होते त्याचाही उपयोग होणार आहे.

इब्न बतूत: १३३४.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या प्रवाशाबद्दल मी एक संपूर्ण लेख मालिका लिहिली आहे. तीही नजरेखालून घालावी. हा प्रवासी मोरोक्कोवरून टॅंजिए नावाच्या बंदरातून निघाला व त्याने सगळे जग पालथे घातले. त्याच्या या प्रवासात १३३३ ते १३४२ (अंदाजे) या काळात हिंदुस्थानात आला होता. तो स्वत: एकदाही विजयनगरास गेला नाही परंतू महंमद तुघलकाच्या पुतण्यानी, बहाउद्दीन गुश्ताप याने जे बंड केले त्याचे पारिपत्य करणार्‍या सेनेबरोबर हा दक्षिणेत आला. त्यात त्याने पहिल्या हरिहरचा उल्लेख एक प्रबळ हिंदू राजा असा केला आहे.

निकोलो दि कोंती १४२०.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हा इटालियन प्रवासी इब्न बतूत नंतर जवळजवळ नव्वद वर्षांनी हिंदुस्तानात आला होता. व्हेनिसमधील एका घरंदाज व व्यापारी घराण्यातील या माणसाला प्रवासाची अत्यंत आवड होती. त्याने कुटुबांच्या व्यापारात लहानपणीच दमास्कस येथील व्यापारात सहभाग घेतला होता. केवळ जिज्ञासा म्हणून तो व त्याचे कुटुंबीय १४१९ साली पूर्वेच्या प्रवासास निघाला. पुढची पंचवीस वर्षे त्याने प्रवासात घालविली. अरबस्थानात कल्हाट नावाच्या शहरात राहून तो फारसी भाषेत पारंगत झाला. फारसी शिकल्यामुळे त्याला त्याच्या पुढच्या प्रवासात खूपच फायदा झाला. कोंतीने हे प्रवास वर्णन स्वत: लिहिलेले नाही. हे कागदावर उतरायला एक घटना कारणीभूत ठरली. ईजिप्तमधून जाताना कैरोच्या बाहेर त्याला मुसलमानांच्या काही टोळ्यांनी पकडले व धर्मांतर करण्यास भाग पाडले. या प्रकरणात त्याच्या बायका पोरांचा जीव गेला. तो वाचला कारण त्याने मुसलमान धर्म तात्पूरता स्विकारला. पण हे त्याच्या मनात कायम डाचत होते. घरी पोहोचल्यावर पाच वर्षांनी ही खंत त्याने चवथा पोप युजीन याला बोलावून दाखिवली. त्याने अर्थातच त्याला किरकोळ प्रायश्चित्त दिले व त्याला त्याचे प्रवासवर्णन कथन करायला सांगून पोग्गिओ ब्रसिओलिनी नावाच्या लेखनिकास उतरवून घेण्याचा आदेश दिला. अनेक दिवस हे काम चालले होते. हे मूळ लॅटीन भाषेत आहे.

कोंती हिंदूस्थानात उतरला तो खंबायत येथे आला तेथून त्याच्या कानावर आलेल्या विजयनगरच्या वैभवाची किर्ती ऐकून त्याची हे शहर बघायची इच्छा अनावर झाल्यामुळे त्याने मोठ्या धाडसाने हेल्ली (म्हणजे कुठले हे कळत नाही) नावाच्या बंदरात उतरून विजयनगराला भेट दिली. विजयनगर १४२० साली प्रत्यक्ष पहाणार्‍या एखाद्या माणसाने केलेले वर्णन आज आपल्याला उपलब्ध आहे हे आपले भाग्यच म्हणायचे.
डोंगरासमान भासणारे दगड....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विजयनगरात शिरल्या शिरल्या त्याने त्याचे वर्णन केले (तो विजयनगरला बिजनेगालिया असे म्हणतो) “ हे भव्य शहर एका डोंगरावर वसले आहे. (खरे तर तसे नाही पण आपण तेथे गेल्यावर आपल्याला तसा भास होतो हे खरे आहे. याचे कारण तेथे अस्ताव्यस्त पडलेले प्रचंड दगड हे आहे). शहराचा घेर अंदाजे साठ मैल असून त्याची तटबंदी पार डोंगरांना भिडलेली आहे. अशा या शहरात नव्वद हजार नागरीक राहतात जे केव्हाही हातात शस्त्रे घेऊ शकतात.”

तेथील लोकजीवनाचे वर्णन कराताना तो म्हणतो “या प्रदेशातील पुरूष कितीही लग्ने करतात. त्यांच्या स्त्रियांना तो मेल्यावर त्याच्या प्रेताबरोबर जाळून घ्यावे लागते. हिंदुस्थानातील इतर कुठल्याही राजापेक्षा विजयनगरचा राजा शक्तिशाली आहे. त्याच्या बारा हजार बायका आहेत व त्यातील चार हजार तो जाईल तेथे जातात या त्याच्या स्वयंपाकगृहात काम करतात. यातील काही सुंदर स्त्रिया घोड्यावर असतात तर काही मेण्यात. यातील काही राजाच्या पत्नी होतात पण त्यांनाही राजा मेल्यावर सती जावे लागते व त्या हा त्यांचा बहुमान मानतात. ( याने बहुदा कुठलातरी सभारंभ बघितलेला असावा ज्यात या दासदासी मिरवणूकीने जात असाव्यात).”

.....वर्षातून एकदा त्यांच्या देवतांच्या मूर्तींची मिरवणूक निघते. या मूर्ती सजवलेल्या रथात ठेवलेल्या असतात व त्याच्या भोवती सुंदर स्त्रियांचा गराडा पडलेला असतो. त्या एकसुरात सुरेलपणे मंत्रघोष करत असतात. वातावरण इतके भारलेले असते की काही जण त्या रथाच्या पुढे स्वत:ला झोकून देतात. रथाखाली मरण आले तर त्यासारखे पूण्य नाही असे ते समजतात. काही भक्त त्यांच्या शरिरातून दोरखंड ओवून रथ ओढतात तर काही जण स्वत:ला त्या दोरखंडाने त्या रथाला टांगून घेतात. या प्रकारे आलेल्या मरणाची त्यांना तमा नसते. (बगाड ज्यांनी बघितले आहे त्यांचा या अघोरी प्रकारावर विश्वास बसायला हरकत नाही.)

वर्षातून तीनदा येथे मोठे उत्सव असतात. त्यादिवशी या शहरातील आबाल वृद्ध नदीत स्नान करून नवीन कपडे परिधान करून या उत्सवात सामील होतात. तीन दिवसाच्या या उत्सवात नाच गाणी मेजवान्यांना उत आलेला असतो. यातील एका उत्सवात ते मंदीरात व मंदीराच्या भिंतींवर असंख्य तेलाच्या दिव्याची आरास करतात. हे दिवे दिवस रात्र जळत ठेवतात. रात्री ते दृष्य फारच विलोभनीय दिसते.

अशा अनेक ओवर्‍यांमधे तेलाचे दिवे तेवत असतील....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

(खरेच ज्यानी हंपीच्या देवळांना भेट दिली आहे त्यांनी हे दृष्य डोळ्यासमोर आणावे. सगळ्या देवळांवर दिवे तेवत आहेत. आतील दिव्यांमुळे गाभारे उजळून त्यातून तो मंद प्रकाश बाहेर पडत आहे..त्या दिव्यांच्या प्रकाशाच्या सावल्यांचा खेळ....व्वा...मस्तच !) तिसरा उत्सव तर नऊ दिवस चालतो. या उत्सवात सगळीकडे जाडजूड सोट्यांवर रंगबेरंगी रेशमी झेंडे फडकत असतात. या झेंड्यांवर सोन्याने जरीकाम केलेले असते त्यामुळे तेही प्रकाशात चमचम करत असतात. या काठ्यांच्या टोकावर एक माणूस बसलेला असतो. हा त्या नागरिकांसाठी परमेश्वराची पार्थना करत असतो. त्याच वेळी जनता खालून त्याला संत्री, लिंबे अशा अनेक प्रकारची फळे फेकून मारत असतात. वरचा माणूस शांतपणे या फळांचा मार सहन करत असतो. (हा महानवमीचा उत्सव असावा. नवरात्रीमधे येणार्‍या नवमीला महानवमी म्हणतात व विजयनगरमधे ही नवमी फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर साजरी करायची परंपरा होती.)

एक शांत कोपरा.... एकही रेषेचा कोन जराही चुकलेला नाही. रात्री असाच प्रकाश बाहेर पडत असेल..(या येथेच डोळे मिटून बसल्यावर मी ठरवले होते की विजयनगरवर मी कधीतरी लिहेन)
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अजून एका उत्सवात शेवटच्या तीन दिवसात, उत्सवात सामील होणार्‍या सर्व नागरीकांवर (राजा व राणी सकट) केशराचे पाणी शिंपडले जाई. (ही बहुतेक होळी असावी) या केशराच्या पाणाचे हंडे रस्त्याच्या कडेला भरून ठेवले असत व सगळेच त्याचा आनंद लुटतात.

असे अनेक गाभारे उजळून निघत असतील...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कोंतीने नंतर विजयनगरमधे सापडणार्‍या हिरे माणकाबद्दल लिहिले आहे की विजयनगरपासून काही अंतरावर दर्‍यांमधे अगणित हिरे माणके सापडतात व ते वर आणण्यासाठी जे प्रकार चालायचे त्याला त्याने सिंदबादच्या कहाण्या जोडून दिल्या आहेत. ( या खरे तर गोवळकोंड्याच्या हिर्‍याच्या खाणी असाव्यात).
“विजयनगरमधे वर्षाचे बारा भाग पाडले जातात वे त्यांची नावे राशींप्रमाणे दिली आहेत.....या काळात हिंदुस्तानमधे मोठे धोंडे फेकायची यंत्रे आहेत व टंकसाळीत भरपूर नाणीही पाडली जातात...

हिंदुस्थानमधील लोकांचे गोर्‍यालोकांबद्दल चांगले मत नाही. ते स्वत:ला फार शहाणे समजतात असे यांचे मत आहे....."

सध्या विमानतळांवर असेच खांब मधे दोर्‍या लावून वापरतात. फक्त ते लोखंडी/एल्युमिनियमचे असतात. हे कदाचित उत्सवाला गर्दी आटोक्यात आणण्यासाठी किंवा शिस्त लावायला वापरत असावेत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पुढच्या भागात आपण अब्दूर रझाकबद्दल वाचणार आहोत... हा इराणच्या बादशाहाचा दूत होता व मोठा हुशार माणूस होता....
क्रमशः

जयंत कुलकर्णी.

हे ठिकाणविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

gaikiakash's picture

23 Aug 2012 - 11:35 pm | gaikiakash

अत्यंत रोचक माहिती, खुप छान लेखमालिका.
धन्यवाद

आकाश

मन१'s picture

24 Aug 2012 - 12:00 am | मन१

चमचम करत असतात. या काठ्यांच्या टोकावर एक माणूस बसलेला असतो. हा त्या नागरिकांसाठी परमेश्वराची पार्थना करत असतो. त्याच वेळी जनता खालून त्याला संत्री, लिंबे अशा अनेक प्रकारची फळे फेकून मारत असतात. वरचा माणूस शांतपणे या फळांचा मार सहन करत असतो. (हा महानवमीचा उत्सव असावा. नवरात्रीमधे येणार्‍या नवमीला महानवमी म्हणतात व विजयनगरमधे ही नवमी फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर साजरी करायची परंपरा होती.)

नक्कीच नक्कीच. आजही जगभरात प्रसिद्ध असलेला दसर्‍याचा राजेशाही उत्सव कुठे असेल तर तो म्हैसूरमध्ये. तो त्या राजघराण्याचा उत्सव आहे. निदान मागची सहाशे वर्षे अव्यहातपणे सुरु आहे. म्हैसूर हे त्याकाळात विजयनगरचेच संस्थान्/जागिर असल्याने हा तिथूनच इनहेरिट होउन आला असावा. किंवा विजयनगरचा ह्याहून मोठा असावा.
आजही म्हैसूरला दसर्‍याच्या उत्सवाला फार मोठी गर्दी असते म्हणतात.
ह्या लेखातले पॉइंटर्स पाहून शहाजींवरही एखादी मालिका झाली तर फार बरं होइल. शिवाजींबद्दल बरचसं वाचायला,बोलायला ऐकायला मिलतं. शहाजींबद्दल तसं कमीच, म्हणूनच म्हणतोय.

gaikiakash's picture

24 Aug 2012 - 12:12 am | gaikiakash

मनोबा-
राजा शहाजी ही शिरीष गोपाळ देशपांडे ह्यांनी लिहिलेली कादंबरी आहे, जमल्यास जरुर वाचावी. शहाजींच्या जीवनावर अत्यंत माहितीपूर्ण कादंबरी आहे.
धन्यवाद,

आकाश

इतिहास आणि कादंबरी यात बराच असतो.

बरेचदा कादंबरीकार इतिहासाची पार वाट लावून टाकतात.

बॅटमॅन's picture

24 Aug 2012 - 2:31 pm | बॅटमॅन

+१००.

रामपुरी's picture

24 Aug 2012 - 3:51 am | रामपुरी

वाचतोय!

इरसाल's picture

24 Aug 2012 - 9:25 am | इरसाल

प्रत्येक लेखाची वाचनखुण साठवत आहे.

अप्रतिम लेखन आणी लेखमालाही.

आणि लाखो धन्यवाद !
अतिशय सुंदर लेखन . हे अन्य लोकांपर्यंत ( नॉन मिपाकर )पोहोचवण्यासाठी काही करता आहात का ?
हे खरेतर जगभर पोहोचले पाही़जे..
आणि ज्या पाशवी शक्तिनी याचा विध्वंस केला त्यांची ही माहीती जगाला व्हायला हवा..

- विटेकर

आनन्दा's picture

24 Aug 2012 - 10:14 am | आनन्दा

अप्रतिम लेखन आणी लेखमालाही.
यातला बराचसा ढोबळ इतिहासही मला माहीत नव्हता..
धन्यवाद.

गोंधळी's picture

24 Aug 2012 - 11:21 am | गोंधळी

अप्रतिम लेखमाला

जोयबोय's picture

24 Aug 2012 - 2:28 pm | जोयबोय

हिन्दुस्थानच्या प्रचिन इतिहासावर एखादी लेख्माला होउन जाउद्या साहेब.

निकोलो दि कोंतीचे प्रवासवर्णन वाचताना तर अक्षरशः अंगावर काटा आला ! त्या शांत कोपर्यावर तुमची अवस्था काय असेल याची पुरेपूर कल्पना वाचताना येते.
गोनीदांचे शिवकाल वाचताना शहाजी-विजयनगर यावर थोडासा जो कवडसा पडतो तो या लेखमालेमुळे प्रकाशात आला. जयंत काका, कृपया शहाजींवर एक लेखमाला होऊन जाऊदे, अंतर्जालाशी ओळख झाल्याचे सार्थक होईल !
शतशः धन्यवाद !

गणपा's picture

24 Aug 2012 - 2:41 pm | गणपा

एक चांगली लेखमाला चालु केल्या बद्दल.
हे क्रमशः थांबुच नये असं वाटतय.

जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2012 - 3:23 pm | जयंत कुलकर्णी

//हे क्रमशः थांबुच नये असं वाटत/////

:-)

तिमा's picture

24 Aug 2012 - 7:01 pm | तिमा

जयंतराव,
निपक्षपाती व वस्तुनिष्ठ लेखमाला लिहिल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक भाग बारकाईने वाचत आहे.

जसा आपण आपला जन्म स्वीकारतो तसाच इतिहासही स्वीकारावा लागतो कारण दोन्हीही आपल्या हातात नसतात.
ह्या गृहीतकाला आता भविष्याचीही जोड द्यावी की काय असे वाटते. हल्लीच्या व्यवस्थेत भविष्यकाळही आपल्या हातात उरला नाही असे वाटू लागले आहे.

पैसा's picture

24 Aug 2012 - 7:11 pm | पैसा

पूर्ण लेखमालिका मस्त होतेय. परदेशी प्रवाशांच्या नजरेतून जुना भारत पाहताना मजा वाटली!

मन१'s picture

25 Aug 2012 - 5:36 pm | मन१

मालिकेचा पुढच अंक कधी येणार?