विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Aug 2012 - 6:37 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- १

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- २

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ३

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ४

अब्दूर रज़्ज़ाक – १४४३. (देवराया-२च्या राज्यकाळात.)
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या अब्दूर रज़्ज़ाकने त्याच्या ज्या आठवणी लिहिल्या त्याचे नाव मोठे मजेशीर आहे. “मतलाउस-सादैन वा मज्माउल बहारैन. याचा अर्थ होतो गुरू आणि शूक्र ग्रहांचा उदय आणि दोन सागरांचा संगम”. या माणसाचे पूर्ण नाव होते “कमलाउद्दीन अब्दूर रज़्ज़ाक बिन जलालूद्दीन इसाक –समरकंदी”

अब्दूर रज़्ज़ाक हा जलाउद्दीनचा मुलगा असून त्याचा जन्म इराणमधे हेरात येथे ६ नोव्हेंबर १४१३ साली झाला. त्यावेळी सत्तेवर असलेल्या सुलतान शहा रूख याच्या पदरी याचे वडील काझी म्हणून कामाला होते. मोठा विद्वान माणूस ! या अब्दूर रज़्ज़ाकने अझद्दूदीन याह्याच्या एका ग्रंथावर टिका लिहिली व ती त्या शहारूखला अर्पण केली म्हणून सुलतानाच्या हा नजरेत भरला. याच सुलतानाच्या कारकिर्दीत याला भारतात विजयनगर येथे त्याचा वकील म्हणून यायची संधी मिळाली.

शहारूखच्या मृत्यूनंतर त्याला मिर्झा अब्दूल लतीफ, मिर्झा अब्दूल्ला व मिर्झा अब्दूल कासीम या सुलतानांच्या दरबारातही त्याला मानमरातब मिळत होता. सुलतान अबू सैद्च्या काळात त्याची एका सूफीकेंद्रात अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तो तेथेच मरेतोपर्यंत त्याच पदावर म्हणजे ऑगस्ट १४८२ पर्यंत राहिला. त्याने जे काही लिखाण केले त्यातील सर्वात महत्वाचे विजयनगरचे वर्णन ज्यात आहे ते आहे.

अब्दूर रज़्जाक मस्कतच्या बंदरातून जहाजावर चढला आणि कालिकतला उतरला. कालिकहून मेंगलोर मार्गे तो विजयनगरच्या साम्राज्यात शिरला. वाटेत त्याला एक मंदीर लागले त्याचे वर्णन करताना तो म्हणतो “असे मंदीर मी जगात कुठेही पाहिले नाही. दहा गज रूंद आणि दहा गज लांब व पाच गज उंच अशा अचूक चौकोनी, चार टप्प्याचा चौथर्‍यावर हे मंदीर आहे, ज्याच्यात वर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. (पुढचे वाक्य फार महत्वाचे आहे) हा चौथरा पूर्णपणे पितळ्याचा आहे. सगळ्यात वरच्या टप्प्यावर एका माणसाची मूर्ती आहे. ती चक्क सोन्याची आहे. या मूर्तीच्या डोळ्याच्या ठिकाणी लाल माणके जडवलेली असून ती आपण कुठूनही बघितले तरी आपल्याकडे रोखून बघत आहे असे वाटते. नाजूक नक्षीकाम व अचूकपणा हे या देवळाचे वैशिट्य आहे. वाटेत एका ठिकाणी आम्ही एक उंच मंदीर बघितले. हे एवढे उंच आहे की कित्येक कोसावरून दिसते. याचे वर्णन केले तर माझ्यावर अतिशयोक्तीचा आरोप होईल अशी मला भिती वाटते. (काही इतिहासकारांचे म्हणणे हे बेदनूर असावे असे आहे, पण मला हे बेलूरच असावे असे वाटते. त्याने एखाद्या मंदीराचे गोपूर बघितले असणार.).
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या शहराच्या मध्यभागी इराणमधील कुठल्याही बगिच्याशी बरोबरी करेल असा बगीचा आहे. या बगिच्यात पाने जास्त का फुले असा मनात संभ्रम उभा रहातो. या येथे दोन तीन दिवस राहून तो विजयनगरला पोहोचला...

तेथे पोहोचल्यावर त्याच्या दृष्टीस एक अवाढव्य नगर पडले. “हे शहर अत्यंत सुपीक प्रदेशात वसले आहे. त्यांचा व्यापार तीनशे बंदरातून चालतो. (थोडी अतिशयोक्ती वाटती आहे....) या शहरात हजार पेक्षा जास्त हत्ती आहेत. या राजाच्या पदरी अकरा लाख सैनिक आहेत. एवढी मोठी सेना हिंदुस्थानात कोणाकडेही नाही. हा इतर कुठल्याही माणसांपेक्षा ब्राह्मणांना जास्त आदराने वागवतो. जगातील कुठल्याही पुस्तकापेक्षा लोकप्रिय समजले जाते ते अरबस्तानातील एक पुस्तक कालिला-व-दिम्ना, जे राजा आणि वज़ीर यांच्याबद्दल लिहिले आहे, ते याच ब्राह्मणांच्या जमातीने लिहिले आहे.
विजयनगरचे एक सामान्य दर्शन :
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
कालिला-व-दिम्ना: दोन हजार वर्षापासून खपत असलेले अरबस्तानातील हे पुस्तक काय आहे हे सांगितले तर आपल्याला मोठी मौज वाटेल. तिसर्‍या किंवा चौथ्या शतकात भारतात संस्कृतमधे ब्राह्मणांनी पंचतंत्राची रचना केली. पंचतंत्रात काय लिहिले आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर दोनशे वर्षांनी इराणच्या एका राजाने त्याच्या वैद्याला भारतात एका जडीबुटीचा शोध घेण्यासाठी पाठवले. या औषधाने तो म्हणे चिरतरूण होणार होता. हा वैद्य भारतात आला पण त्याला तशी जडीबुटी काही सापडली नाही. हात हलवत परत न जाता त्याने पंचतंत्र बरोबर नेले. त्याने राजाला सांगितले की हे पुस्तक त्या जडीबुटीपेक्षा भारी आहे कारण याने खरे ज्ञान मिळून माणूस खर्‍या अर्थाने शहाणा होतो....या कहाण्या त्या राजाला एवढ्या आवडल्या की त्याने त्याचे पेहलवीमधे भाषांतर करून त्याची राजवाड्यात स्थापना केली. इराण अरबांच्या राजवटीखाली आल्यावर एका नुकत्याच मुसलमान झालेल्या एका पारशी माणसाने याचे अरबी भाषेमधे भाषांतर केले. याचे नाव होते इब्न-अल्‍-मुकाफा. याचे नंतर इथोपिया, सिरिया, फारसी, तुर्कस्तान, मलाया,जावा-सुमात्रा, सयाम इत्यादि देशातून त्या त्या भाषेतून भाषांतर झाले. एकोणिसाव्या शतकात याचे परत हिंदीमधे भाषांतर झाले. पंचतंत्रचा सतराशे वर्षापूर्वी सुरू झालेला हा प्रवास असा संपला. अर्थात यात अनेक बदल होत गेले तेही स्वाभाविकच आहे. असो. हे अवांतर बरेच झाले.

“बिजानगर (तो विजयनगरला या नावाने संबोधतो) सारखे शहर मी सार्‍या जगात ना एकले ना पाहिले. या शहराला सात तटबंद्या आहेत. (काहीतरी गडबड आहे. इतर सगळे तीन म्हणतात). सगळ्यात बाहेरच्या तटबंदी नंतर मैदानात पुरूषभर उंचीचे दगडी खांब जमिनीत पुरले आहेत जेणेकरून ज्याला बाहेर जायचे आहे किंवा आत यायचे आहे तो एकाच रस्त्याने येईल. (मला आपल्या टोल नाक्याची आठवण झाली. आणि खरच या येथे टोलही गोळा केला जायचा) शहराच्या सगळ्या तटबंदींवर पहारे आहेत व जकात गोळा करण्यासाठी कारकूनही आहेत.”

यानंतर इराणमधील लोकांना अंतरांची कल्पना येण्यासाठी त्याने हेरातमधे ही अंतरे कशी मोजता येईल त्याची उदाहरणेही दिली आहेत. “बाहेरच्या तीन तटबंदीत शेते आहेत तर आतील तटबंदीत बाजार व महाल आहेत. रायाच्या महालाच्या जवळच गजबजलेले चार बाजार आहेत. यांच्या उत्तरेला राजाचे महाल आहेत. प्रत्येक बाजाराच्या शेवटी एक उंच देखणी इमारत उभी आहे पण राजाच्या महालाच्या पुढे या फारच सूमार वाटतात. बाजारातील रस्ते रूंद आहेत व फुलांच्या बाजारात उंच ओटे बांधलेले आहेत ज्याच्यावर फुलांचे ढीग असले तरी ती ओट्याच्या दोन्ही बाजूला विकता येतात. सुगंधीत फुले केव्हाही उपलब्ध असतात जणू काही या फुलांशिवाय ते जगूच शकत नाहीत. प्रत्येक व्यवसायासाठी बाजारात विशिष्ठ जागा राखून ठेवलेली असते. मोती, हिरे, रूबी यांचा व्यापार बाजारात बिनधास्तपणे उघड्यावर चालतो. या सगळ्या शहरात दगडी पाटातून अखंड पाणी खेळवले आहे.”

दगडी पाईप : हे जोडल्यानंतर बाजूची कड तोडून टाकत असावेत. जे भोक दिसते आहे ते अलाईनमेंट साठी असावे. हे माझे म्हणणे आहे. कारण यात जनावर तोंड घालू शकत नाही एवढे ते अरूंद आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अशा रितीने पाणी शहरभर खेळवून अनेक कुंडात सोडले आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

राजाच्या महालाच्या उजव्या बाजूला त्याच्या मंत्र्यांचे कार्यालय आहे जे अतिशय विशाल आहे. (याचे आता फक्त भग्न अवशेष दिसतात) या सभागृहाला चाळीस खांब आहेत व त्याच्या सभोवती व्हरांडा आहे ज्यात दस्तावेज जपले जातात. येथे दोन प्रकारे लिखाण केले जाते. नारळाच्या पानावर अणकुचीदार खिळ्याने किंवा काळ्या रंगाने रंगवलेल्या दगडावर पांढर्‍या दगडाने. (नारळाच्या पानावर नसणार. सध्या आपण जे नाडी पट्यांवर लिहिलेले बघतो तसे काहीतरी असणार किंवा धुरी दिलेली भुर्जपत्रे असणार. यात त्याने असेही म्हटले आहे की रंगीत दगडावर लिहिणे जास्त अधुनिक मानले जाते. )

या बेचाळीस खांबाच्या सभागृहात मध्यभागी एका उंच स्थानावर दानाईक नावाचा एक तृतीयपंथी सरदार बसलेला असतो. हा या राजाचा मूख्य कारभारी आहे.”

तुर्कस्थान व इतर मुसलमान राज्यांमधे हे तृतीयपंथी आपण समजतो तसे नसत. यांचे जननेंद्रीय अवयव लहानपणीच कापून त्यांना तसे मुद्दामहून तयार केले जायचे. सुरवातीला अर्थातच जनानखान्यामधे बायकांच्या संगतीत रहाणे व त्यांचे संरक्षण करणे हे त्यांचे काम असे. किंबहुना त्यासाठीच ते तयार केले जायचे. पण जे हुशार असायचे त्यांना इतरही कामे दिली जायची. त्यांची रंगमहालात व राणीवशामधे उठबस असल्यामुळे यांचा राजकारणात चांगलाच वचक असायचा. कित्येकवेळा ते राजावरही दबाव टाकायला कमी करत नसत. उदाहरणार्थ ओट्टोमन साम्राज्यात एक अत्यंत प्रभावशाली असा एक तृतीयपंथी सरदार होऊन गेला त्याचे नाव होते बशीर आगा. याच्या प्रभावाखाली येऊन सुलतानाने हनाफी इस्लाम त्याच्या साम्राज्यात प्रस्थापित केला होता. सांगायचा मुद्दा हा आहे की अशा कार्यालयात जो प्रमूख असे तो शक्यतो राजाच्या विश्वासातील माणूस असे. ज्याच्यावर आपला जनानखाना सोपवला आहे त्याच्यापेक्षा विश्वासू कोण मिळणार ? म्हणून यांना महत्वाची पदे देण्यात येत. रज़्ज़ाकला त्यामुळे हा दानाईकही तसाच तृतीयपंथी असेल असे वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लिहायचे कारण आपल्या येथे या लोकांना फक्त जनानखान्यात नेमण्याची पद्धत होती

“ज्याला कोणाला या सरदाराकडे काम असेल तो सशस्त्र सैनिकांच्या रांगांतून त्याच्या समोर जातो. तेथे गेल्यावर जमिनीवर माथा टेकवून त्याला एखादी छोटी भेटवस्तू प्रदान करून आपले गार्‍हाणे मांडायचे अशी रीत आहे. गार्‍हाणे ऐकल्यावर दानाईक कायद्यानुसार लगेचच निर्णय देतो. दानाईक जेव्हा कार्यालय सोडतो तेव्हा त्याच्यावर छत्र्या ढाळणारे पटकन पुढे होतात. तुतार्‍या वाजतात. येथून तो राजाला भेटायला जातो. राजाच्या महालात पोहोचेपर्यंत त्याला सात चौक्या/दरवाजे ओलांडावे लागतात. प्रत्येक चौकीवर दानाईक आपल्या काही रक्षकांना तेथेच थांबायला सांगतो. असे करत करत तो जेव्हा शेवटच्या चौकीपाशी पोहोचतो तेव्हा तो एकटाच आत जातो. तेथे रोजच्या कारभाराचा अहवाल सादर करून, थोड्यावेळ तेथे थांबून तो परत जातो. हा तेथेच राजाच्या महालाच्या मागे राहतो.

महालाच्या डाव्याबाजूला टांकसाळ आहे. तेथे सोन्याची नाणी पाडण्याचे काम चालू असते.
सोन्याची नाणी..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

शिपायांचा पगार दर चार महिन्यांनी केला जातो. या राज्यात लोकसंख्या इतकी दाट आहे की या लेखात त्याची कल्पना करून देणे शक्य होणार नाही. मी असे ऐकले आहे की राजाच्या खजिन्यात खोदलेले अनेक कप्पे आहेत ज्यात वितळवलेले सोने भरून ठेवले आहे. या राज्यातील प्रत्येक नागरिक मग तो कितीही का गरीब असेना, मोत्यांच्या माळा, सोन्याचे दागिने परिधान करतोच.”

“या कार्यालयाच्या समोर हत्तींचा हत्तीखाना आहे. (आज हत्तीखाना आहे पण कार्यालय उभे नाही). शहरात अनेक हत्ती आहेत पण मोठे हत्ती खास राजासाठी राखून ठेवलेले आहेत. या हत्तींना रोज पहाटे राजासमोर उभे केले जाते कारण ते एक शूभलक्षण समजले जाते. या हत्तींना धान्याचे शिजवलेले गोळे साखर, मीठ व लोण्यात घोळवून भरवले जातात. हा कार्यक्रम दिवसातून दोनदा होतो. प्रत्येक हत्तीला वेगळी खोली आहे. आत हत्तीला साखळदंडाने बांधायची सोय केली आहे. यानंतर त्याने जंगली हत्तींना कसे पकडले जाते याचे वर्णन केले आहे. जेथे हत्ती पाणी प्यायला येतात तेथे खड्डा करून सापळा रचला जातो. त्यात हत्ती पडला की दोन तीन दिवस त्याला उपाशी ठेवले जाते. चवथ्या दिवशी एक माणूस अचानक आत उतरतो आणि त्या हत्तीला लाठीने चांगले दणके देतो. लगेचच दुसरा माणूस उतरतो व त्या माणसाला बाहेर फेकतो व हत्तीला कोवळे गवत खायला देतो. असे तीन चार दिवस झाले की हत्तीला गवत देणार्‍या त्या माणसाबद्दल प्रेम वाटायला लागते व तो माणसाळतो. मग त्याच्या मानेत साखळदंड अडकवला जातो.
हत्तीखाना-पूर्ण छायाचित्र-
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अपराध्यांना हत्तीच्या पायात तुडवले जात असे. अशा हत्तींना वेगळे प्रशिक्षण देण्यात येई. राजाही हत्तींना शिकारीसाठी वापरतो.

या नंतर त्याच्या दृष्टीस विजयनगरमधील वेश्यावस्ती पडली. त्याचे वर्णन करताना तो म्हणतो “ या टंकसाळीच्या समोर शहराच्या कोतवालाचे कार्यालय आहे. या दलात बारा हजार सैनिक आहेत. यांचा सगळा पगार या वेश्यांच्या उत्पन्नावर जो कर बसवला आहे त्यातून केला जातो. या वस्तीचा झगमगाट, तेथील मनोरंजन करणार्‍या सौंदर्यवती, त्यांचे गोड बोलणे, लाडीगोडी, मादक कटाक्ष हे सगळे वर्णन करण्याच्या पलिकडले आहे. पण हे थोडक्यात सांगितलेच पाहिजे.”

"टंकसाळीच्या समोर कोतवाल चावडी आहे तर मागच्या बाजूला हा आगळा वेगळा बाजार आहे. यातील रस्ता वीस यार्ड रुंद असून त्याच्या दोन्ही बाजूला या सुंदर स्त्रियांची घरे (खाना) आहेत. सगळ्या घरांना पुढे व्हरांडे (सफाहा) आहेत. या घरांसमोर इतरत्र असतात तशी बाके नसून चांगल्या दगडातून कोरलेल्या आरामदायी खुर्च्या (खुर्सी) आहेत. प्रत्येक घराच्या बाजूला सिंह, चित्ते व इतर प्राण्यांच्या खर्‍या वाटणार्‍या मूर्ती कोरलेल्या आहेत. दूपारच्या प्रार्थना झाल्यावर (त्याला नमाज म्हणायचे असेल पण तसे काही तेथे त्यावेळी नव्हते.) त्या घराच्या दारात ही सुंदर स्त्री स्थानापन्न होते. प्रत्येक स्त्री दागिन्यांनी मढलेली असून, त्या तरूण, आकर्षक व फारच सुंदर असतात. तिच्या अवती भोवती तिच्या दासींचा गराडा पडलेला असतो व त्या गिर्‍हाईकाला पटवायचा प्रयत्न करत असतात. आत जाताना गिर्‍हाईकाला आपल्या सर्व वस्तू तेथील नोकरांकडे सुपूर्त कराव्या लागतात. यातील एक जरी परत मिळाली नाही तर त्या घरातील सगळ्यांना शिक्षेला सामोरे जावे लागते. या प्रकारचे अनेक बाजार या शहरात आहेत.”

अब्दूर रज़्ज़ाकची रहायची सोय एका महालात करण्यात आली ज्याची तुलना तो हेरात मधील राजाच्या एका इमारतीशी करतो. एवढ्या दिवसाच्या प्रवासात झालेल्या श्रमामुळे येथे त्याने अनेक दिवस विश्रांती घेतली आणि अशातच एक दिवस त्याला विजयनगरच्या राजाकडून बोलावणे आले.

“मी दरबारात गेलो आणि त्याला पाच उत्कृष्ट घोडे नजर केले. राजा त्या सभागृहात उच्चस्थानावर ऐटीत बसला होता व त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला ब्राह्मणांची रांग होती. (हा ब्राह्मण कसे ओळखायचा देव जाणे, बहुतेक वेषावरून असेल.). त्याच्या गळ्यात अस्सल मोत्यांच्या माळा होत्या ज्यात हिरे माणके गुंफलेली होती. त्याची किंमत करणे माझ्या ताकदीच्या बाहेरचे आहे. राजाचा रंग सावळा असून इतरांच्या मानाने तो उंच होता. त्याचे वय कमी होते कारण त्याच्या गालावर थोडाफार प्रकाश होता पण हनुवटीवर बिलकूल नव्हता. त्याच्या समोर मला उभे केल्यावर मी त्याला वंदन केले. माझे स्वागत करुन त्याने मला त्याच्या जवळ बसवून घेतले. मी आणलेले पत्र त्याने दुभाषाला दिले आणि तो म्हणाला ’आपल्या थोर राजाकडून आज आमच्याकडे एक वकील आला, त्यामुळे मला आनंद झाला आहे”. दरबारी कपडे आणि उकडत असल्यामुळे मला घाम फुटला होता. ते बघून राजाला माझी दया आली आणि त्याने एका नोकराला मला वारा घालायला सांगितला. त्यानंतर त्याने खुण केल्यावर एका तबकात विडे, पाचशे फनाम (नाणी) आणि कापूर देऊन माझी बोळवण करण्यात आली.

मला त्या नंतर राजाकडून रोज जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हायला लागला. दोन बकर्‍या, आठ कोंबड्या, पाच मण तांदूळ, एक मण लोणी, एक मण साखर व खर्चासाठी दोन सोन्याच्या मोहरा एवढे मला रोज मिळते. आठवड्यातून दोन वेळा संध्याकाळी मला राजाची भेट घ्यावी लागते. त्यावेळी तो मला इराण व इराणच्या राजाबद्दल माहिती विचारतो. निघताना प्रत्येक वेळी मला तबकातून विड्याची पाने, पाचशे फनाम व कापूर देऊन निरोप देण्यात येतो. अशाच एका भेटीच्या शेवटी राजा म्हणाला “ तुमचा राजा वकीलांना मेजवान्या देतो असे तुम्ही म्हणालात पण मी तुमच्याबरोबर जेऊ शकत नाही. हा नजराणा म्हणजे मेजवानी आहे असे कृपया समजा”.

या नंतर पानाच्या वर्णनासाठी त्याने बरेच शब्द खर्ची घातले आहेत. तो म्हणतो “ हे एक संत्र्याच्या पानाच्या आकाराचे पान आहे. या पानाला हिंदुस्थान, अरबस्तानाचा काही भाग व होर्मूझ येथे भयंकर मान आहे. ते अशा प्रकारे खातात. पहिल्यांदा सूपारी कातरून तोंडात टाकतात. पानाला थोडे पाणी लाऊन त्याला चूना फासतात व गुंडाळून तोंडात टाकतात. काही जण एकावेळी चार पानेही तोंडात टाकतात. पानाने चित्तवृत्ती उल्हासित होतात, पचनक्रिया सुधारते, श्वास दुर्गंधीमुक्त होतो आणि मी या ठिकाणी मी सविस्तर लिहू शकत नाही पण हे पान कामवर्धकही आहे.”

“राजाचा जनानखाना मोठा आहे. (या ठिकाणी त्याने हे त्या पानामुळेच हे शक्य असावे अशी शंका प्रदर्शित केली आहे) यात एकूण सातशे राण्या व इतर स्त्रिया आहेत. यांच्या महालांमधे दहा वर्षावरील कुठल्याही पुरूषास प्रवेश नसतो. प्रत्येक स्त्रीला स्वतंत्र खोली आहे. राज्यामधे कुठेही सुंदर मुलगी आढळली की तिच्या कुटुंबियांच्या संमतीने तिची उचलबांगडी या जनानखान्यात होते.. राजा या मुलीची व तिच्या आईची किंमत चुकती करून त्यांना जनानखान्यात आणतो. त्यानंतर तिचे नखही कोणाच्या दृष्टीस पडत नाही.

यानंतर देवरायचे घराणे व त्यांच्या मंत्रीगणांचे जे हत्याकांड राजाच्याच एका भावाने (रज़्ज़ाक भाऊ म्हणतो, नुनीझ पुतण्या म्हणतो) केले त्याचे सवीस्तर वर्णन त्याने केले आहे. त्यात नवीन घराच्या वास्तूशांतीला या सगळ्या मंत्र्यांना बोलावून त्यांना कसे ठार मारण्यात आले याचे वर्णन केले आहे. राजावरही हल्ला करण्यात आला परंतू आश्चर्यकारकरित्या तो त्यातून बचावला व परत गादीवर बसला...इ.इ. कहाणी सांगितली आहे. ही हकीकत मी थोडक्यात सांगतो.
देवरायच्या या भावाने नवीन महाल बांधल्यावर त्या निमित्ताने एका जंगी मेजवानीचे आयोजन केले होते. अर्थात सगळ्यांना आमंत्रण होतेच. सगळे जमल्यावर त्या राजपूत्राने त्याच्या बरोबर भोजन करायला व भेटवस्तू स्वीकारायला एकेकाला एका खोलीत पाचारण केले. तेथे गेल्यावर एकेककरून सगळ्यांची कत्तल केली. या कत्तलीदरम्यान आवाज येऊ नये म्हणून सभोवती वाद्याचा गोंगाट होईल अशीही व्यवस्था त्याने केली होती. राजा या मेजवानीला आला नसल्यामुळे या राजपूत्राने एक तबक घेतले व तो देवरायाच्या घरी गेला. त्या तबकावर एखाद्या भेटवस्तूवर किंवा पदार्थावर घालतात तसे एक रेशमी कापड टाकले होते मात्र आत खंजीर होता. मेजवानीला चलण्याचा आग्रह करताना त्याने या शस्त्राने देवरायावर सपासप वार केले व त्याला तेथेच टाकून तो बाहेर आला व त्याने सगळ्यांना सांगितले की आज पासून मीच राजा आहे. मी सगळ्यांना मारून टाकले आहे. त्याच्या दुर्दैवाने देवराय सिंहासनाच्या मागे जखमी होऊन पडला होता पण जिंवंत होता... या नवीन राजाने त्याच्या सत्ताग्रहणाची घोषणा करण्यासाठी दरबार भरवला पण त्याच्या दुर्दैवाने देवरायच तेथे हजर झाल्यावर त्याला सिंहासनावरून खाली खेचून त्याचे शीर उडविण्यात आले. या सगळ्यातून दानाईक सिलोनला गेला असल्यामुळे वाचला. त्याला ताबडतोब परत बोलावून घेण्यात आले...दानाइकाला ही हकीकत कळल्यावर त्याने येणार्‍या. महानवमीच्या उत्सवात विशेष बंदोबस्त ठेवला असाही उल्लेख त्याने आपल्या लिखाणात केला आहे. या नंतर येते ते या महानवमीच्या उत्सवाचे वर्णन..

“बिजानगरच्या राजाने त्याच्या सर्व सरदारांना व मंत्र्यांना हुकूम केला की त्यांनी राजाच्या महालात हजर व्हावे. हे सगळे जेव्हा जमले तेव्हा त्या शहरात झुलणार्‍या हत्तींच्या संख्येने काळा समुद्र उसळतोय असा भास होत होता. या हत्तींवर हौदे होते ज्यात धनुर्धारी व जळणारी रसायने फेकणारी माणसे बसली होती. ( हे बहुदा तोंडातून ज्वाळा बाहेर काढणारे कलकार असावेत). या हत्तींची गंडस्थळे सुशोभीत केली होती व त्यांनाही सोन्याचे अलंकार घातले होते. ही सगळी मंडळी व ब्राह्मणवर्ग एका मोठ्या मैदानावर जमले. या मैदानावर तर काळ्या समुद्राने आक्रमण केले आहे असा भास होत होता. या मैदानावर आकर्षक मंडप उभारण्यात आले होते ज्याची उंची बरीच होती. यावर अनेक चित्रकृती रंगवलेल्या होत्या. यातील काही मंडप तर असे होते की ते स्वत:भोवती फिरत होते ज्यामुळे त्यावर बसलेल्या सरदारांना प्रत्येकवेळी वेगळा नजारा दिसत होता. (सध्या आपण अशी हॉटेले बघतो. ही कल्पना शेवटी दुर्दैवाने आपल्याला युरोपियनांकडून उचलावी लागली..)
या सगळ्या मंडपांसमोर एक नऊ मजली चौथरा बांधला होता ज्याचे सौंदर्य अवर्णनीय आहे. राजाचे सिंहासन नवव्या टप्प्यावर आहे. माझी जागा सातच्या टप्प्यावर आहे व येथे फक्त मी व माझ्यासारखे काही लोक एवढीच गर्दी आहे. या महालाच्या आणि त्या मंडपांच्या मधे रग्गड मोकळी जागा सोडलेली आहे जेथे कलाकार आपली कला सादर करतात. नर्तकी व गायीका या तरूण व अती सुंदर आहेत....त्यांचे गाल चंद्रासारखे असून वसंत ऋतूसारख्या त्या फुललेल्या आहेत. सुवर्णालंकारांनी त्या मढलेल्या असून त्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. राजाच्या आणि मंडपांच्या मधे एका रेशमी पडद्याआड त्या असतात. एका क्षणी दोन्ही बाजूचे पडदे बाजूला झाल्यावर त्या त्यांच्या पायांची अशी मोहक हालचाल करतात की मन प्रसन्न आणि आश्चर्यचकित होते. ( हे नृत्य असावे) पाळलेल्या हत्तींचे खेळही मोठे धाडसाचे व तोंडात बोटे घालायला लावणारे आहेत. या सर्व कलाकारांना राजा उदार मनाने बक्षिसे वाटतो. हा असा उत्सव तीन दिवस चाललेला असतो. तिसर्‍या दिवशी जेव्हा राजा निघाला तेव्हा मला त्याच्या सिंहासनासमोर नेण्यात आले. ते सिंहासन भले मोठ्ठे असूनसुद्धा सोन्याचे होते. त्याच्या वर हिरे माणके जडवलेली असून असे सिंहासन जगात कुठल्या राजाकडे असेल असे वाटत नाही. सिंहासनाच्या समोर रेशमाचा मोत्याने नक्षिकाम केलेला गालिचा व त्याच्यावर गादी अंथरलेली आहे. उत्सवाचे तीन दिवस ही गादी व सिंहासन यावर राजा बसतो. या उत्सवा दरम्यान माझे भाग्य थोर की राजाने मला त्याच्या या महाली बोलाविणे पाठविले. तेथे चार मोठे चौथरे बांधलेले होते ज्याचे छत आणि भिंती सोन्याने व माणकांनी मढवलेल्या होत्या. हे सोन्याचे पत्रे चांगले जाडजूड व सोन्याचा वर्ख दिलेल्या खिळ्यांनी ठ्कलेले दिसत होते. माझे स्वागत केल्यावर त्याने मला इराणचा राजा खाकान-ए-सैद यांच्याबद्दल बरीच माहिती विचारली व तो आता त्यांना नजराणा पाठविणार आहे असेही सांगितले. तेवढ्यात एका मंत्र्याने मला ज्यावर तुम्ही बसला आहात ते आसन कसे आहे असे विचारले व असे आसन तुमच्या देशात बनते का असे विचारल्यावर मी विचार करून उत्तर दिले “असे माझ्या देशात तयार होऊ शकेल पण असे आसन वापरण्याची पद्धत नसल्यामुळे ते तयार करत नाहीत” माझे हे उत्तर ऐकून राजा खूष झाला व त्याने त्याच्या मंत्र्याला मला फनामच्या थैल्या देण्यास सांगितले.

त्या काळात विजयनगरच्या आसपास अनेक अरब, इराणी मुसलमान रहात होते. जेव्हा देवराय अब्दूर रज़्ज़ाकबरोबर इराणला नजराणा पाठवणार आहे याची कुणकुण इतर होर्मूझवासियांना लागली तेव्हा त्यांनी अब्दूर रज़्ज़ाकच्या बदनामीची मोहीम चालू केली ज्यात त्यांनी हा एक साधा व्यापारी आहे, इराणच्या बादशहाचा वकील वगैरे काही नाही असे सांगण्यात सुरवात केली. त्याच काळात त्याचा मित्र दानाईकही गुलबर्ग्याच्या मोहिमेवर गेला. त्याच्या जागी काम करणारा हंगामी सरदाराने बाकीच्यांचे ऐकून याला मिळणारी रोजची मदत व मानधन बंद केले व अब्दूर रज़्ज़ाकवर मोठ्ठाच बाका प्रसंग ओढवला. नशिबाने दानाईक जिंकून परत आल्यावर त्याने त्याचे मानधन परत चालू केले व त्याला टंकसाळीत नोकरीही दिली. पण संशयाचे वातावरण पसरायचे ते पसरलेच. याच्या विरूद्ध त्याच वेळी विजयनगरात राहणारे ख्वाजा मसूद, खुरासानचा ख्वाजा मौहम्मद यांना इराणच्या बादशहाला नजराणा द्यायचे काम देण्यात आले. दिल्लीच्या फिरोज शहा सुलतानाचा एक वंशज फताह खान यानेही एक निवेदन पाठविले. याची परिणीती अर्थातच अब्दूर रज़्ज़ाकची हकालपट्टी होण्यात झाली.

“मी जेव्हा राजाचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा राजा म्हणाला “त्यांनी (इतर मुसलमान सरदारांनी) आपण इराणच्या राजाचे राजदूत नाही अशी भुमिका घेतली आहे. तसे नसते तर आम्ही तुम्हाला याहूनही मानाची वागणूक दिली असती. आपण जर परत आलात तर तुमच्या राजाचे राजदूत म्हणून या मग मी मला शोभेल असे आपले स्वागत करेन”. इराणच्या शहासाठी माझ्याकडे दिलेल्या पत्रात राजाने हीच भुमिका मांडली आहे”.

अब्दूर रज़्ज़ाक नंतर होनावरला गेला तेथे एका छोट्या जहाजाने मस्कत व तेथून इराणच्या खुर्फाकन नावाच्या बंदरात उतरला. तेथून अंतर्गत भागातून होर्मूझला पोहोचला.....

विजयनगरच्या सुबत्तेचे अब्दूर रज़्ज़ाकने जे वर्णन केले आहे ते अतिशोयक्तीने भरलेले आहे असे क्षणभर मानले व त्याला शंभराने भागले तरीही येणारे उत्तर बघितल्यावरसुद्धा आपण विजयनगरच्या सुबत्ता, ताकद, इत्यादीची कल्पनाही करू शकणार नाही हे मात्र खरे आहे.

खरे तर आपल्या सध्याच्या परिस्थितीत आपल्यात जे वैचारीक खुजेपण आले आहे त्याचे ते द्योतक आहे....दुसरे काही नाही.........

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

मागच्या एका भागात दगड तोडण्यासाठी जी युक्ती वापरतात त्याचे एक छायाचित्र टाकले होते पण त्या पद्धतीने तोडलेल्या दगडाचे छायाचित्र सापडत नव्हते ते आता खाली देत आहे...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे ठिकाणलेखमाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Aug 2012 - 6:52 pm | पैसा

सगळं वर्णन वाचून थक्क व्हायल झालं. बरं हे कोणी भाटाने लिहिलेलं नाही तर परदेशी प्रवाशाने लिहिलंय. त्यामुळे विश्वासार्ह म्हणायला हरकत नाही.

मन१'s picture

26 Aug 2012 - 9:59 pm | मन१

कालिला-व-दिम्ना: व पंचतंत्र ह्यांचा प्रवास रंजक वाटला.
इराणी सम्राटांना भारतीय वैद्यकाचं विशेष आकर्षण वगैरे होतं काय? कारण अगदि उतारवयातही वाग्भट हे इरानच्या राजाचे उपचार करण्यासाठी गेले होते.(चरक्-सुश्रुत -वाग्भट हे आयुर्वेदातील pioneer म्हणावीत अशी नावे मानतात.)
.
नक्की पाणी कसं खेळवलं असेल? तेव्हा वीज वगैरेचा वापर नसायचा. मग उंचावरच्या टाकीतून गावभर सोडणं कसं जमलं असेल?
.
त्याचे वय कमी होते कारण त्याच्या गालावर थोडाफार प्रकाश होता पण हनुवटीवर बिलकूल नव्हता
म्हणजे??
.
दोन बकर्‍या, आठ कोंबड्या, पाच मण तांदूळ, एक मण लोणी, एक मण साखर व खर्चासाठी दोन सोन्याच्या मोहरा एवढे मला रोज मिळते.
रोज?? इतके? त्याच्यासोबत एखादे पथक आले होते का? त्या सगळ्यात मिळून हे सर्व रोज मिळे का?
.
पाचशे फनाम
दर भेटीला? मी येकदा भेटलो तरी जन्माचा खर्च निघेल साला.
.
व कापूर देऊन निरोप देण्यात येतो. अशाच एका भेटीच्या शेवटी राजा म्हणाला “ तुमचा राजा वकीलांना मेजवान्या देतो असे तुम्ही म्हणालात पण मी तुमच्याबरोबर जेऊ शकत नाही. हा नजराणा म्हणजे मेजवानी आहे असे कृपया समजा”.

शिवाशिव, स्पृश्य- अस्पृश्य कल्पना?
.
नक्की किती सालाच्या आसपास आलेला हा अब्दूर रझाक? १३५० च्या आसपास विजयनगर नावाचं शहर नुकतच उभं रहात होतं. इतक्या झपाट्याने ते वाढलं की काय?
.
आतिशयोक्तीबद्दलः- युरोपिअन प्रवाशांनी जितकं जग पाहिलं होतं, त्यामानाने अब्दूर रझाकचा reach कमी होता. त्याने तितकी भटकंती केली नव्हती. म्हणून "मोठ्या" गोष्टी त्याला "भव्य " वाटायच्या आणि "भव्य" गोष्टी अतिबह्व्य्/अवाढव्य. असं नेहरुंचं मत. शिवाय मोजून मापून्, अधिक अचूक लिहिणे ही तशीही त्याकाळात युरोपिअनांची सवयच बनत होती(अगदि फिबोनॅकी पासून ते मार्को पोलो सारख्या all time great प्रवाशापर्यंत.).
.
अवांतरः-
फक्त दोन चार आठवड्याखाली http://www.misalpav.com/node/22295#comment-414054 इथं मी "रायचूर बद्दल काही वाचायला मिळालं तर किती बरं होइल" अशी प्रकट केलेली इच्छा ह्या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण होताना पाहून बरं वाटलं.
माझी पुढची wish list :-
अल बेरुनी ह्या विद्वानानं सुमारे हजार - अकराशे वर्षापूर्वी त्रयस्थ दृष्टीकोनातून काय लिहिलय हे कुणी मराठीतून सांगितलं तर किती बरं होइल?(इब्न बतूता ह्याच्यावर आली तशीच मालिका होउन जाउ देत.)
मार्को पोलो च्या धाडसी सफरींबद्दलही वाचायला आवडेल.
पृथ्वीचा परिघ , त्रिज्या मोजायचे त्याकाळतले बानु मुसा, अल बेरुनी ह्यांचे प्रयत्नही वाचायला आवडतील.(गॅलिलिओ, कोपर्निकस ह्यांच्याही पाचेकशे वर्षे आधी आशियातील काही गणितींनी, खगोलाभ्यासकांनी हे केलं होतं, ते वाचायला आवडेल.)

जयंत कुलकर्णी's picture

27 Aug 2012 - 5:32 am | जयंत कुलकर्णी

// नक्की पाणी कसं खेळवलं असेल? तेव्हा वीज वगैरेचा वापर नसायचा. मग उंचावरच्या टाकीतून गावभर सोडणं कसं जमलं असेल?//

पाण्याची व्यवस्था हा एक अभ्यासाचा विषय आहे.
.
//त्याचे वय कमी होते कारण त्याच्या गालावर थोडाफार प्रकाश होता पण हनुवटीवर बिलकूल नव्हता////

तरूण असल्यामुळे हनुवटीवर गालाची सावली पडत नव्हती...असे असावे
.
//दोन बकर्‍या, आठ कोंबड्या, पाच मण तांदूळ, एक मण लोणी, एक मण साखर व खर्चासाठी दोन सोन्याच्या मोहरा एवढे मला रोज मिळते.
रोज?? इतके? त्याच्यासोबत एखादे पथक आले होते का? त्या सगळ्यात मिळून हे सर्व रोज मिळे का?////

त्या महालाचे नोकर चाकरही असणार. परत त्याच्या बरोबर लवाजमा होताच. त्याचा भाऊही होता पण तो मधेच प्रवासात आजारी पडून वारला.
.
.
//व कापूर देऊन निरोप देण्यात येतो. अशाच एका भेटीच्या शेवटी राजा म्हणाला “ तुमचा राजा वकीलांना मेजवान्या देतो असे तुम्ही म्हणालात पण मी तुमच्याबरोबर जेऊ शकत नाही. हा नजराणा म्हणजे मेजवानी आहे असे कृपया समजा”.////
शिवाशिव, स्पृश्य- अस्पृश्य कल्पना?////

नाही. विजयनगरमधे हजारो पाहूणे येत असत. सगळ्यांबरोबर जेवणे प्रोटोकॉल प्रमाणे बरोबरही नाही आणि शक्यही नाही. शिवाशिव नसावी कारण राजा उत्सवात सगळ्यांबरोबर जेवायचाच की.
.
// नक्की किती सालाच्या आसपास आलेला हा अब्दूर रझाक? १३५० च्या आसपास विजयनगर नावाचं शहर नुकतच उभं रहात होतं. इतक्या झपाट्याने ते वाढलं की काय?////

मनोबा चित्राच्या वर साल दिले आहे.

अतिशोयक्ती : इराण व अरबस्थानातील लेखकांच्या लिहिण्याच्या शैलीमुळे अतिशोयक्तीचा भास होतो. पण नंतरच्या दोन युरोपियन प्रवाशांनी जे लिहिले आहे तेही काही वेगळे नाही....

धन्यवाद !

ओघवत्या वर्णनशैलीमुळे वर्णन अप्रतिम जमले आहे. "कालाय तस्मै नमः" हा श्लोक आठवला.

प्रचेतस's picture

26 Aug 2012 - 9:41 pm | प्रचेतस

अप्रतिम मालिका सुरु आहे.

विजयनगरची राजभाषा कन्नड का संस्कृत?
नाण्यांवर काही देवनागरी अक्षरे दिसत आहेत.

शिल्पा ब's picture

26 Aug 2012 - 11:55 pm | शिल्पा ब

मालिका आवडत आहे.
मनोबांनी उपस्थित केलेले प्रश्न मलाही पडले आहेत. पण इतके दोन बकरे रोज खायचे म्हंटले तरी कीती माणसं त्याच्याबरोबर असतील? पण कदाचित असतीलही अशी समजुन करुन घेतली.

असो. हंपीला जेव्हा मोठ्ठाले दगड पाहीले तेव्हा खुप आश्चर्य वाटले होते. अन मंदीरं वगैरे त्या दगडातंच बांधलेली पाहुन मनोमन सलाम केला. हे सगळे दगड तिथे निसर्गत: च होते म्हणतात.

भव्यतेविषयी जे काही या प्रवाशाने लिहिलंय ते खरं असु शकेल कारण आजही तेथे प्रचंड मोठ्या मुर्त्या आहेत. विठ्ठल मंदीराचा भाग पाहीलात तर मंदीराच्या भव्यतेचा अंदाज येउ शकेल.

अर्धवटराव's picture

27 Aug 2012 - 10:15 am | अर्धवटराव

एव्हढं सुंदर, बहारदार, वैभवशाली वर्णन वाचुन आनंद व्हायचा सोडुन मनात राग दाटलाय. एव्हढं ऐश्वर्य, शक्ती असताना सुद्धा देशाचं रक्षण नाहि करु शकले हे लोक :( (त्या काळच्या देश वगैरे कल्पना गृहीत धरल्या तरी). असो. सध्यातरी काय मोठे पराक्रम करताहेत म्हणा.

अर्धवटराव

५० फक्त's picture

27 Aug 2012 - 11:52 am | ५० फक्त

उत्तम लेखमालिका, धन्यवाद.

आजपर्यंत या क्षेत्री जाणं टाळत आलो याचं बरं वाटतंय, हे सगळं एवढ्या सोप्या भाषेत वाचुन आता गेल्यावर सगळं समजायला फार सोपं जाईल.

धन्यवाद.

अत्यंत आवडीने वाचतोय ही लेखमाला.
लेख पुरेसे मोठे आणि नियमीत अंतराने येतायत ही आनंदाची बाब.

keep up the good work.

जयंतराव, हे लिखाण छापील पुस्तक स्वरुपात आणण्यचा विचार जरुर करा.