विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Sep 2012 - 7:50 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- १

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- २

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ३

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ४

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ५

एथेनेशियस निकिटिन: -१४७३.
हा विजयनगरला प्रत्यक्ष गेला नव्हता पण याच्या लिखाणात त्याने बर्‍याच ऐकीव गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यात काही ठिकाणी विजयनगरचा उल्लेख येतो म्हणून याच्यावर दोन ओळी लिहाव्यात असे वाटते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कोंतीनंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी अफान्सी (एथेनेशियस) निकिटिन भारतात आला. तो या प्रवासाला का निघाला त्याचीही एक गोष्ट आहे. पंधराव्या शतकात एका दिवशी रशियाचा राजा तिसर्‍या इव्हॅनच्या दरबारात शिर्वानच्या खानाचा वकील हसन बेग त्याला भेटायला आला होता. रितीरिवाजानुसार त्याने बरोबर अनेक मुल्यवान भेटवस्तू आणल्या होत्या. इव्हॅननेही त्याचा वकील शिर्वानच्या दरबारात पाठविण्याचे ठरविले. त्याचे नाव होते पॅपीन. हा निकिटिनच्या त्वेर गावचाच होता. पॅपीन शिर्वानला जाणार म्हटल्यावर त्यागावातील काही व्यापारी व्यापाराची संधी साधण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. त्यात आपला निकिटिनही होता. ग्रॅंड ड्युक मिचेल बारिस्सोव्हिच व बिशप जेन्नाडिअस यांची परवानगी घेऊन ही मंडळी व्होल्गा नदीतून दोन गलबतातून निघाली. अशा प्रकारे एका प्रवासाला सुरवात झाली जो अनेक वर्षे चालणार होता. काही इतिहासकारांच्या मते तो १४६२ साली प्रवासास निघाला तर काहिंच्या मते तो १४६८ साली प्रवासास निघाला. पुणे जिल्ह्याच्या गॅझेटकर्त्याने त्याच्या प्रवासाचा काळ १४७८ ते १४७२ असा दिला आहे. अनेक अडचणींवर मात करत, लुटारू, चोर लफंग्यांना तोंड देत तो पर्शियामधील होर्मूझ बंदरात पोहोचला. होर्मूझ हे त्याकाळी पूर्वेकडचे सगळ्यात गजबजलेले व्यापारी केंद्र होते. तेथे त्याला हिंदूस्तानात घोड्यांची पैदास होत नाही व घोड्याला तेथे चांगली किंमत मिळते हे कळाल्यावर त्याने होर्मूझ येथेच एक घोडा घेतला व तो हिंदुस्तानला जाणार्‍या एका गलबतात चढला. त्याला तो घोडा विकून येनार्‍या पैशातून हिंदुस्तानातील माल विक्रीसाठी त्वेर येथे घेऊन जायचा होता. (त्याची येणार्‍या पैशाची काय कल्पना होती न कळे) सहा आठवड्यांनी त्याचे गलबत हिंदुस्तानच्या चौल बंदरात लागले. याचे प्रवास वर्णन नष्ट होता होता वाचले कारण तो त्वेर येथे पोहोचायच्या अगोदरच स्मोलेन्स्क येथे मृत्यू पावला. याला जुन्नरला सुलतानामुळे मुसलमान धर्म स्वीकारायला लागला होता ते त्याच्या मनास फारच लागले. त्याने लिहिलेले प्रवास वर्णन १४७५ साली मॉस्कोला आणण्यात आले. ते तुर्की भाषेत लिहिलेले होते. निकिटिन बिदर येथे येण्याआधी बहामनी साम्राज्याची राजधानी गुलबर्ग्यावरून तेथे हलविण्यात आली होती. तो विजयनगरला गेला होता याचा पुरावा हाती लागत नाही पण त्याने विजयनगरच्या दगडांचे वर्णन अचूक केले आहे हेही आश्चर्यच. तो बिदरला असताना महंद गवान व गुलबर्ग्याचा सुलतान या दोघांनी मिळून विजयनगरवर जी स्वारी केली होती त्यात ती कशी फसली व विजयनगरच्या राजाकडे किती प्रचंड सैन्य होते याचा उल्लेख आहे. तो विजयनगरच्या राजाचा उल्लेख कदंबवंशीय (कदम) म्हणून करतो त्यावरून सेवेलने त्याला ही माहिती तेथेच कुठेतरी मिळाली असावी असे अनुमान काढले आहे. विजयनगरला निकिटिन बिचेनगर असे संबोधतो.

लुडोव्हिको दी वार्थेमा. १५०३-१५०७.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पोर्तुगीज भारतात स्थिरस्थावर होण्याआधी थोड्या अगोदर हा प्रवासी हिंदूस्थानात येऊन गेला. हा ईटलीमधील बोलोना शहराचा रहिवासी असून त्याने हा प्रवास केवळ जिज्ञेसेपोटी केला. म्हणजे तो व्यापारी किंवा कुठल्या राजाचा प्रतिनिधी वगैरे नव्हता तर केवळ नवनवीन प्रदेशा पायाखालून घालून तेथील जनजीवनाचा अभ्यास करून आपल्या देशबांधवांना सांगावी व त्यायोगे प्रसिद्धी मिळवावी असा त्याचा हेतू होता. या हेतू मुळे त्याच्या वर्णनात बारीक सारीक गोष्टी अचूकपणे लिहिण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.
वारथेमाच्या प्रवासाचा मार्ग.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वार्थेमाने हिंदुस्थान आणि पुढे बराच प्रवास केला पण आपण फक्त त्याच्या विजयनगराच्या भेटीबद्दलच बघणार आहोत. असे दिसते की त्याने १५०२च्या आसपास युरोप सोडले व तो अलेक्झांड्रियामार्गे नाईलमधून कैरो येथे पोहोचला. तेथून त्याने सिरियाचे बैरूत गाठले. पूढे त्याने त्रिपोली ते अलेप्पो असा प्रवास करून तेथे विश्रांती घेतली. त्याच काळात केप ऑफ गूड होपला वळसा घालून हिंदूस्थानच्या मार्गाचा नुकताच शोध लागला होता पण त्याने तो मार्ग टाळला व भूमध्य भूमार्गानेच बिघाला. हामामार्गे, व द्राक्षासाठी त्याकाळीही प्रसिद्ध असलेल्या मेनीन शहरातून तो दमास्कसला आला. येथे त्याने कित्येक आठवडे विश्रांती घेतलेली दिसते. इतर प्रवाशांप्रमाणे त्यानेही येथे अरेबीक शिकण्याचा प्रयत्न केलाच ज्याचा त्याला पूढे उपयोग होणार होता. ८ एप्रिल १९०३ला एका मामूल्क सरदाराच्या हाज यात्रेच्या काफिल्याबरोबर त्याने मदीनेचा रस्ता पकडला. या मार्गाने हाज यात्रा करणारा तो एकमेव युरोपियन आहे. नंतर एडनला जाऊन त्याने हिंदुस्थानसाठी गलबत पकडले व दिव येथे उतरला. तेथून तो गलबतानेच गोव्याला गेला. तेथे त्याला युरोपियन लोक भेटले, ते होते पोर्तुगीज.

याच्या प्रवास वर्णनाचा बराचसा भाग कालिकतच्या वर्णनानेच भरलेला आहे.
वार्थेमा विजयनगरात आला तेव्हा नरसिंगराय राज्य करत होता हे स्पष्ट आहे. इतर लेखकांप्रमाणे याचेही डोळे विजयनगराच्या सुबत्तेने व राजाच्या श्रीमंतीने दिपून गेले होते असे म्हणायला हरकत नाही. अगोदर लिहिल्याप्रमाणे याने हत्तीचा वापर युद्धात कसा करतात, त्याच्या सोंडेला तलवारी कशा बांधतात याचे बरेच वर्णन केले आहे. त्याने एक महत्वाची गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे विजयनगरात कायदा व सुव्यवस्था इतकी चांगली आहे की कोणी कुठेही केव्हाही हिंडू फिरू शकतो.

दुआर्ते बार्बोस १५००-१५१६.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पृथ्वीला प्रदिक्षणा घालून ती गोल आहे हे सिद्ध करणारा पहिला युरोपचा दर्यावर्दी मॅगेलेन हा होता. दुआर्ते हा त्याचा चुलत भाऊ. (काही लोकांचे म्हणणे आहे की तो त्याचा मेव्हणा होता.) हे दोघेही जन्माने पोर्तुगीज होते.
वास्को-द-गामा -
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वास्को-द-गामाच्या पाठोपाठ मलबार/कालिकतच्या येथे परदेशियांची जी झुम्मड उडाली त्यात हे दोघेही सामील होते. विजयनगरच्या इतिहासात उल्लेख केल्याप्रमाणे दुआर्तेने मलबारातच काही वर्षे मुक्काम ठोकला होता. त्याने त्या काळात मल्याली भाषेचा चांगलाच अभ्यास केला. तो मल्याळी स्थानिक लोकांइतकेच चांगले बोलू शकायचा. (दुसर्‍या भाषा का शिकाव्यात याचे हे अजून एक उदाहरण) साधारणत: १५१८मधे तो पोर्तुगालला परत गेला व त्या पृथ्वीप्रदक्षिणेच्या मोहिमेत सामील झाला.

त्या काळातील कालिकत : तो हत्ती व इमारती बघितल्या का !
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१५२१ साली ते दोघेही फिलिपाईन्सच्या बेटांवर या दोघांचाही एका महिन्याच्या अंतराने वध झाला. याच्या प्रवास वर्णनाचे स्पॅनिश भाषेत कोणीतरी भाषांतर केले होते ते इंग्रजीमधे भाषांतर करण्यात आले. नंतर मुळ पोर्तुगीज प्रतही सापडली. पोर्तुगीज त्या काळात विजयनगर साम्राज्याला “नरसिंगाचे साम्राज्य” असा करत. यानेही त्याचा उल्लेख असाच केलेला दिसतो. याने विजयनगरचे वर्णन, तेथील चालिरिती यावर अगदी तपशीलवार लिहिले आहे. तो लिहितो –
.....या डोंगरातून पंचेचाळीस कोस प्रवास केल्यावर एक बिजानगर नावाचे गजबजलेले, मोठे शहर आहे. याला चहूबाजूने चांगली तटबंदी आहे. यात अनेक प्रासाद उभे आहेत व राजा याच प्रासादात रहातो. त्याचे नाव “राहेनी” आहे (हा कोण ते कळत नाही. कदाचित त्याने काहितरी चुकीचे लिहिले असेल. या नावावरून अशी शंका प्रदर्शित केली गेली की याने बरीच ऐकीव माहिती गोळा करून लिहिली असावी). या शहरात राजाचे अनेक बलाढ्य सरदारही मोठ्या प्रासादात रहातात.. या शहरात अफाट व्यापार चालतो व त्यमुळे जगातील सर्व देशांचे जमातींचे लोक येथे दृष्टीस पडतात. येथे हिरे माणकांची मोठी बाजारपेठ आहे ज्यात सेलानीतूनही (सिलोन) मौल्यवान हिरे माणके आणली जातात. या राज्यातही हिर्‍याच्या खाणी आहेतच. हे निर्यातीसाठी चौल व होर्मूझ येथे जातात....याच्या शिवाय रेशमी तलम कापडाचाही येथे व्यापार चालतो....

या साम्राज्याचे पाच भाग पडतात. त्यांची स्वत:ची अशी वेगळी भाषा आहे. त्यातील एका भागाचे नाव टुलिनाट असे आहे तर दुसर्‍याचे लेग्नी. तिसर्‍याचे टिसा, ज्यात यांची राजधानी बिजानगर आहे. अजून एका भागाचे नाव चोमेंडेल आहे. टुलिनाट मधे अनेक बंदरे आहेत. या प्रांतातून मेर्गिओ नावाची नदी वहाते ज्यातून बोटीने व्यापार चालतो. होनोर (होनावर) हे त्यातीलच एक मोठे बंदर आहे. त्याच्याखाली बाटिकल (भटकल) नावाचे अजून एक मोठे शहर व बंदर आहे. येथील व्यापार हा मुसलमानांच्या ताब्यात आहे. भटकल हे घोड्यांच्या व्यापाराचे मोठे केंद्र आहे.

याचा राजा हा नरसिंगाचा पुतण्या आहे. या राज्यात द्वंद्वाची खुलेआम पद्धत आहे. ते कुठल्याही किरकोळ कारणाने होऊ शकते. कोणीही कोणाला आव्हान दिले की राजा त्यांना त्यासाठी जागा व शस्त्रे पुरवतो. कुठल्याही प्रकारचे चिलखत न वापरता हे द्वंद्व होते. शंकेला वाव नको म्हणून ही एका सारखी एक शस्त्रे राजा पुरवतो. या राज्यात विजयनगरचीच नाणी चालतात. त्यातील एक सोन्याचे परदा नावाचे आहे तर दुसरे चांदीचे दाम नावाचे आहे. ( मराठीत दाम हा शब्द यातूनच आला असावा असे मला वाटते.) वजन हे भारामधे मोजले जाते. एक भार म्हणजे अंदाजे चार क्विंटल. (भार या मराठी शब्दाचाही उगम हाच असावा). राज्यात चार प्रकारचा तांदूळ पिकवला जातो. वर्षातून दोनदा पीक कापणी होते. नरसिंगाच्या राज्याला जाण्यासाठी डोंगराची रांग पार करून जावे लागते. ही रांग पार खालपर्यंत पसरली आहे व समुद्र व मुख्य जमिनीच्या मधे आहे. (सह्याद्री) यातील काही शिखरे स्वर्गाला टेकल्याचा भास होतो. या जंगलामधे रानडुक्करे, हरणे, अस्वले, वाघ, सिंह असे प्राणी सापडतात. फळे तर अनेक प्रकारची मिळतात. रानटी हत्ती व विपूल मौल्यवान खडे या डोंगरात आहेत.
बिजानगरमधे काळीमिरी प्रचंड प्रमाणात लागते. ती मलबारमधून बैलांवर लादून आणली जाते. बिजानगरची नानी सोन्याची असून हिंदुस्थानभर चालतात. नाण्याच्या एका बाजूला काही अक्षरे आहेत तर एका बाजूला एका पुरूषाचे व स्त्रीचे चित्र आहे.

राण्यांचे स्नानगृह.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

राजा याच शहरात त्याच्या प्रासादात राहतो व क्वचितच बाहेर पडतो. तो सगळी कामे त्याच्या सरदाराकडून करून घेतो. येथील लोक सावळे असून त्यांचे केस काळे व मऊ आहेत. बिजानगरचे पुरूष खाली तंग धोतर गुंडाळतात व वर एक मांड्यांपर्यंत येणारा लांब अंगरखा असतो. या दोन्हीचा रंग पांढरा व ते तलम कापडापासून किंवा रेशमापासून बनवलेले आहेत. त्यांच्या पायात चामड्याची उत्कृष्ट पायताणे असतात. त्यांच्या पाठीवर तलवार लटकवलेली असते ते रोज आंघोळ करतात व त्यांच्या अंगाला ते सुंगंधी द्रव फासतात. हे चंदन, कापूर, कस्तूरी व केशर गुलाबपाण्यात वाटून तयार केले जाते. प्रत्येकाच्या गळ्यात सोन्याची साखळी व त्यात रत्ने गुंफलेली असतात. त्यांच्या बोटात एखादी तरी अंगठी असतेच व कानात रत्नाची कर्णाभुषणे. त्यांच्या हातात उन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी नाजूक छत्री असते. या अशा युक्तीने बनवलेल्या आहेत की त्या मिटतात व उघडतात. येथील स्त्रिया कंबरेभोवती एक कापड गुंडाळतात व त्याचे एक टोक वक्षस्थळांवरून खांद्यावर टाकतात त्यामुळे त्यांचा एक खांदा उघडाच असतो. या कापडाची लांबी सहा क्युबिटपर्यंत असू शकते. त्यांचे केस छान विंचरलेले असतात व त्या केसांचा अंबाडा घालून न चुकता त्यात फुले माळतात. त्यांच्या नाकात त्या एक सुंदर दागिना घालतात. कानातही त्या सुंदर रत्नांनी मढवलेली आभुषणे घालतात. गळ्यात सोन्याच्या माळा, दंडावर सोन्याच्या पट्ट्या, हातात सोन्याच्या व मोत्याच्या बांगड्या, बोटात अंगठ्या असे दागिने नित्याचे आहेत. (त्याने कंबरेवर घालायच्या सोन्याच्या पट्यांचेही वर्णन केले आहे) एवढेच काय पायाच्या बोटातही त्या दागीने घालतात. त्या दिसायला सुंदर आहेत. पुरूष कितीही लग्ने करू शकतात पण हे फक्त सरदार व राजेच करतात......या बायकांमधे फार हेवेदावे असतात व त्याच्या कहाण्याही एकू येतात......

राजाकडे केव्हाही नऊशे हत्ती आणि वीस हजार घोडेस्वार तयार असतात. हे त्याचे वैयक्तिक सैन्य आहे व त्याने स्वत:च्या पैशातून तयार केलेले आहे. राजाच्या सैन्यात भरती व्हायला आलेल्या माणसाला पूर्णपणे नागडे करून तपासले जाते व त्याच्या कुळाचीही चौकशी केली जाते. एकदा भरती झाल्यावर त्याला घराचे दर्शन दुर्लभ आहे. पळून गेल्यास त्याला मोठी शिक्षा होते.

एखादा माणूस मेला तर त्याचे दहन होते व त्याच्या स्त्रीलाही त्या अग्नीत उडी मारावी लागते व ती हे मोठ्या आनंदाने व अभिमानाने करते. (त्याने सतीचे सविस्तर वर्णन केले आहे). सती जाताना ती उपस्थित असलेल्या पुरषांना उद्देशून म्हणते “तुम्ही तुमच्या पत्नीचे किती देण लागता ते बघा. जी तुम्ही मेल्यावर प्राणत्याग करते.” तर उपस्थित स्त्रियांना उद्देशून म्हणते “ बघा तुम्ही तुमच्या पतीचे किती देणे लागता ते ! मेल्यावरही त्याची साथ द्यायची असते”........असे म्ह्णत ती त्या आगीत उडी मारते त्याच बरोबर त्यात अनेक भांडी तेल ओतले जाते व त्या भडक्यात ती जळून भस्म होते..... यावेळी तिच्या चेहर्‍यावर कसलाही विषाद नसतो... सती जाताना ती आपल्या अंगावरचे दागिने आपल्या नातेवाईकांना एक एक करत वाटत जाते असेही त्याने एका ठिकाणी म्हटले आहे. याचे वेळी त्याने त्या काळात अस्तित्वात असलेल्या देवदासी पद्धतीबद्दलही लिहिले आहे. राजा जर मेला तर त्याच्या बरोबर त्याच्या दोनशे तिनशे बायकाही सती जातात.

ब्राह्मणांविषयी तो म्हणतो “ही अजून एक जमात आहे जी पुजार्‍याचे काम करते. हे मास खात नाहीत व आयुष्यात ते एकदाच लग्न करतात. त्यांच्या मुलांना त्यांची संपत्ती वारसाहक्काने मिळते. ब्राह्मण व्हायला ब्राह्मण म्हणूनच जन्माला यावे लागते. ते खांद्यावर तीन धागे परिधान करतात (जानवे). यांना राजा कसल्याही गुन्ह्यासाठी शिक्षा करत नाही व तेही कसल्या गुन्ह्यात भाग घेत नाहीत. येथे अजून एक प्रकारची जमात आहे ते गळ्यात एक दगड बांधतात (हे बहुदा लिंगायत असावेत) व त्याची पुजा करतात. यांनाही खूप मान असतो.
या राज्याच्या राजाचे दकनी राजाशी (विजापूर) व ओटिराशी (ओरिसा) सारखे युद्ध चालू असते. मोठ्या युद्धाला निघताना तो काही महाल सोडल्यास सगळे शहर जाळून टाकतो........

नरसिंगाच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करायचे स्वातंत्र्य आहे व न्यायदानात कोणाचाही धर्म आड येत नाही. कायदा व न्याय मोठ्या कठोरपणे राबवला जातो........

यानंतर आपण एका महत्वाच्या वृत्तांताकडे वळणार आहोत ज्याच्यात विजयनगरचे नुसते खूपच नाही तर अचूक वर्णन आलेले आहे. - डॉमिंगो पेस- १५२० ते १५२२.

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

सध्याच्या हंपीतील मला आवडणारे एक दृष्य.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire/a

हे ठिकाणलेखमाहिती

प्रतिक्रिया

हाही भाग आवडला.(जरा लहान वाटला).
.
वा
द्वंद्वाची खुलेआम पद्धत आहे.,
ते कुठल्याही किरकोळ कारणाने होऊ शकते.
आणि
राजा त्यांना त्यासाठी जागा व शस्त्रे पुरवतो.
एकत्र वाचलं.
ती पद्धत आजही आहे! भारतभर सर्वत्र आहे! एकमेकांची टाळकी फोडायला उत्सुक जनता आणि त्यांना हाणामार्‍यात गुंतवणारे , शस्त्रे पुरवणारे राज्यकर्ते आजही वेगवेगळ्या झेंड्याखाली आहेतच की. त्या प्रवाशानं भारताचं सर्वकलिक सत्य सांगितलय; "तक्तालीन परिस्थिती " वगैरे पुरतच ते मर्यादित नाही.
वास्तविक जीवनात काय नि आंतरजालावर काय द्वंद्वाची संधी कुणी सोडत नाही.
.
बिजानगरमधे काळीमिरी प्रचंड प्रमाणात लागते.
बरोबर.हिरव्या लाल मिरच्या तेव्हा भारतात अस्तित्वातच नव्हत्या ना. तिखट म्हणून काळे मिरेच वापरणार.
.

त्यांच्या हातात उन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी नाजूक छत्री असते.
हे मात्र अगदि नवीन. भारतात छत्र्यांचा वापर तेव्हापासून आहे? नंतर बंद पडलेला दिसतो.
.
राजाकडे केव्हाही नऊशे हत्ती आणि वीस हजार घोडेस्वार तयार असतात.
अग्गागा.... नउशे हत्ती? अगदि वैभवाच्या शिकहरावर असताअनाही मुघल सम्राटांकडे तरी इतके खाजगी हत्ती असतील का असा प्रश्न पडला.

मोठ्या युद्धाला निघताना तो काही महाल सोडल्यास सगळे शहर जाळून टाकतो........

स्वतःचे शहर जाळून युद्धाला निघतो की जिंकल्यानंतर शत्रूचे शहर जाळून टाकतो??
(रामरायाने निजामशाहीची कित्येक शहरे/शेते १५५७ च्या आस्पाअस जाळून बेचिराख केली होती. ज्यामुळे सूडाग्नी पेटला निजामशहाचा, नि त्यानीच सर्व शाह्यांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला सोलापूरच्या तहात्/बैठकीत.)
.

प्रचेतस's picture

7 Sep 2012 - 8:33 pm | प्रचेतस

अप्रतिम व ओघवते लेखन.

विजयनगरचा इतिहास कृष्णदेवरायापुरताच आणि तो सुद्धा अगदी थोडासाच माहीत होता.
पण तुमच्या लेखमालिकेमुळे इतरही राजांची चांगली ओळख होत आहे.

तुषार काळभोर's picture

8 Sep 2012 - 9:59 am | तुषार काळभोर

ते साम्राज्यही, तिथले सम्राटही, तिथे भेटी देऊन नोट्स काढणारे प्रवासीही आणि ते आमच्यापर्यंत पोचवणारे तुम्हीही... सर्व काही अदभूत...!

आवडेश.
राण्यांना आंघोळ करायला केवढा मोठा हौद बांधलाय ! अन हा हौद त्यांच्या महालापासुन बराच लांब आहे...पालखी, मेणा किंवा हत्तीवरुन वगैरे जावं लागत असणार !

हौदातलं पाणी रोज बदलंत असतील का? असतील तर मग एवढा मोठा पाण्याचा अपव्यय खुपच झाला नै ?

अन ते पाणी कुठे टाकत असतील? का सुएज सिस्टीम होती?

पैसा's picture

9 Sep 2012 - 5:48 pm | पैसा

हा पण भाग उत्तम आहे. ते राण्यांचं स्नानगृह अजून एवढ्या चांगल्या अवस्थेत आहे का?

छत्री आणि साड्या, तसंच बायकांची दागिन्यांची आवड याबद्दल वाचून मजा वाटली. तर सतीबद्दल वाचून उदास वाटलं. त्या काळातल्या प्रवाशांना भारत हा एक अद्भुत देश वाटत असणार हे नक्कीच!

मन१'s picture

9 Sep 2012 - 5:57 pm | मन१

मध्ययुगात(मागच्या हजार वर्षात) सरसकट सर्वच स्त्रिया सती जायच्या का? की ते ऐच्छिक होतं?
(शहाजीराजांनंतर जिजाबाई सती गेलेल्या नाहीत, रमाबाई मात्र माधवराव पेशव्यांनंतर सती गेलेल्या दिसतात. नक्की कोण जायचं, कुणाला थाम्बवता यायचं? मुलाने आईला थांबण्याची विनंती केली तर ती पुरेशी असे का? (वडील आधीच घालवले आहेत, आता मातृछत्रही घालवून का घ्यावे पोराने.)
दुसरे हे की सती प्रथा नक्की कधी सुरु झाली? प्राचीन भारताच्या इतिहासात हिचे उल्लेख सापडत नाही म्हणतात. (म्हणजे गौतम बुद्धाच्या पूर्वीचा व त्याच्या आसपासचा काळ)

पैसा's picture

9 Sep 2012 - 7:32 pm | पैसा

सतीची प्रथा नक्की कधी सुरू झाली याबद्दल तज्ञ लोक लिहितील. पण सती हा शब्द दक्षाची मुलगी सती, शिवाची पत्नी हिच्यावरून आला आहे हे नक्की. यामागे सतीने शिवाचा अपमान झाल्यामुळे यज्ञात स्वतःला जाळून घेतल्याची कथा आहे.

इतर संस्कृतींमधे इजिप्तमधे राजा मेल्यानंतर त्याच्या पिरॅमिडमधे त्याच्या बायका, दासी आणि इतर वस्तू पुरत असत.

सती जाणे हे ऐच्छिकच असावे. पण नवर्‍याच्या मागे बायकांचे हाल होतील अशा भीतीने किंवा शत्रूच्या सैन्याच्या हाती पडू नये म्हणून इच्छा नसताना सुद्धा काही स्त्रियांचे बळी जात असतील. याच भीतीमुळे राजस्थानातील राजे युद्धाला बाहेर पडले की त्यांच्या बायका जोहार करत असत.

शिवाजी महाराजांनी सती जायला निघालेल्या जिजाबाईंना थांबवले असे वाचनात आले आहे. पण त्याचवेळी पुतळाबाई यांना मूलबाळ कोणी नव्हते त्यामुळे त्यांना सती जाण्यापासून कोणी अडवले नसावे.

सती जाणे ऐच्छिक होते.
सतीची प्रथा तशी पुरातन आहे. सतीचा सर्वात जुना उल्लेख हा बहुधा शिवपुराणात आहे. दक्षाची कन्या सतीने शंकराचा अपमान सहन न झाल्यामुळे अग्नीकाष्ठे भक्षण केली. हे शिवपुराण गुप्तकाळात तयार झाले तेव्हा त्याकाळापासून सतीप्रथा सुरु असावी असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. (साधारण ५/ ६वे शतक)
त्याआधीच्या सातवाहनकाळात सतीप्रथा बहुधा नव्हतीच. प्रथम सातकर्णीची पत्नी नागनिका आणि गौतमीपुत्राची आई गौतमी बलश्री या वैधव्यावस्थेत जीवन कंठित होत्या याचे उल्लेख तत्कालीन शिलालेखात आहेत.

यादवकाळांत सतीशिळा उभारण्यास सुरुवात झाली. इस्लामिक आक्रमणानंतर (शुद्धता राखण्यासाठी) सती जाण्याचे प्रमाण वाढले होते. अगदी ब्रिटीशकाळापर्यंत ही प्रथा कायम होती. पण सक्ती नव्हती.

प्रचेतस's picture

18 Mar 2013 - 9:51 am | प्रचेतस

पुढचा भाग कधी?

चित्रगुप्त's picture

18 Mar 2013 - 10:32 am | चित्रगुप्त

आज हा सहावा भाग वाचला, आणि आधीचे सर्व भाग वाचायला हवेतच, हे जाणवले.
अश्या प्रकारचे लेख हे फार महत्वाचे असतात असे मला वाटते, आणि ते तुम्ही सातत्याने लिहीत आहात, याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच.
पुढील सर्व लेखांची वाट बघत आहे, आणि त्यासाठी शुभेच्छा.
क्रुसेड वरील लेखही फार छान होता, त्याचा पहिला भाग वाचला होता, त्यानंतरचे भाग लिहिले का? कळले नाही. असल्यास दुवा पाठवावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2013 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

आज सगळे भाग नीट वाचून संपवले... बर्‍याच प्रयत्नाने जमवलेली रोचक माहिती आहे.

पुढचा भाग लवकर टाका.

या भागाची तारीख 07/09/2012 अशी बघीतली... जर सातवा भाग अगोदरच टाकला असला तर कोणीतरी कृपया कळवावे.

चावटमेला's picture

20 Mar 2013 - 9:56 am | चावटमेला

मालिका खूप छान सुरू आहे. पुढील भाग लवकर येवूदेत.