भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520
भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532
भाग ५ - http://www.misalpav.com/node/20541
भाग ६ - http://www.misalpav.com/node/20603
भाग ७ - http://www.misalpav.com/node/20892
भाग ८ - http://www.misalpav.com/node/21028
भाग ९ - http://www.misalpav.com/node/21091
पेग पाचवा
"विनोदपंत जरा चढलिय तुम्हाला." शिंदेच्या या उद्गारांवर विनोद म्हणाला - " मी कुठला पंत ? मी तर जंत सर... भरा पेग. पण सर खासदार होणारच आपण. कितिपण पैसे खर्च करू. माझा एक काँटॅक्ट आहे मुंबईत. लय भारी टॉप सिक्रेट. तुम्हाला सांगेन नंतर त्याविषयी ... "
पाचव्या पेग ला दोघांनी पुन्हा चिअर्स केलं. थरथरत्या हातांनी विनोदने पुन्हा एका दमात ग्लास संपवला आणी तळहाताने ओठ पुसले. कडक स्कॉच जठर जाळत धमन्यांत शिरली मेंदूत पसरली. भास. शौर्याचे भ्रम. नियतीचे विभ्रम. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. शिंदे सर बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल गोल घोळवत होते. विनोदच्या अर्धोन्मलित डोळ्या समोर दिसत होती - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. स्कॉच चा महाप्रचंड ग्लास. कट्यावर बसावं तसं आपण ग्लासच्या कडेवर बसलोय. बर्फाचे मोठमोठे क्युब दोन्ही हातानी उचलून ग्लासात फेकतोय. त्यामुळे स्कॉच मधे ऊठतायत तरंग - तवंग - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद नी बर्फाचे धोंडे जोरजोरात ग्लासात फेकायला आरंभ केला. आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड । आज जंग की घडी की तुम पुकार दो ॥ धाडड बर्फाचा मोठाला धोंडा नियतीच्या डोक्यात आदळला. आयला तिनं तर आधीच त्या वर्तुळात फेर धरला होता. बर्फाच्या खड्याबरोबर नियतीपण ग्लासात वितळून गेली. तिनं विनोदची साथ सोडली. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.
विनोदला गरगरू लागलं. तो उभा राहिला. पाय लटपटत होते. म्हणाला - " मी निघतो सर " विनोदची पाउलं जिन्याच्या दिशेने पडली. विनोदची धडपडती पावल जिन्यावर वाजत होती. डोक्यात घण वाजत होते. दारूच्या नशेत मुंबईच्या काँटॅक्ट बद्दल बोलण्याची घोडचूक घडली होती. त्याच्या पावलांचा आवाज बंद होइस्तवर शिंदे ग्लासातले खडे घोळवत होते. आवाज बंद झाला. विनोद घराबाहेर पडलाय याची खात्री झाली. शिंदेनी मोबाईल उचलला. एक नंबर डायल केला. पहिल्याच रिंग ला तिकडच्या व्यक्तीने तो उचलला. - " पोती पोचली ? .... अच्छा, अच्छा. जपून ठेव. फार तर १० दिवस माल पोलिसांपासून लपवून ..... अच्छा, अच्छा. त्यानंतर त्याचा वापर. ..." शिंदेनी प्रसन्न चित्ताने हसत मोबाइल बंद केला. "सोन्या जेवण लाव" शिंदेनी हुकूम सोडला.
*********************************************************************************************************
दिल्ली
रामशरण पांड्या साहेबाचे बूट चकाचक पॉलिश करत होता. काटेकोर व्यवस्थितपणाच दुसरं नाव म्हणजे मेजर शीलवर्धन. पस्तीस वर्षाचा हा तरणाबांड ऑफिसर. अविवाहित. कारण त्याच पहिलं लग्न झालं होतं घड्याळाशी. दुसरं हातातल्या टॅबलेट पीसी शी. आणी तिसरं लग्न सतत जवळ असणार्या एस एल आर कॅमेर्याशी. चौथ्या बायकोला द्यायला त्यापाशी वेळ शिल्लक न्हवता.
अव्यवस्थितपणा खपवून घेतला जात नाही हे रामशरणला पक्कं ठावूक होतं. सकाळी बरोब्बर ६ वाजून तीस मिनिटानी मेजर शिलवर्धन च्या टॅबलेट पीसी चा मॉर्नींग अलार्म भूणभुणत असे. पण त्याआधी एक सेकंद शिलवर्धनचे डोळे उघडलेले असत. तंतोतंत ६:३५ ला रामशरण बेड टी आणून देई. सकाळच्या सहा वाजून पंच्चावन्न मिनिटांनी; मेजरसाहेब ब्रेकफास्टच्या टेबलावर हजर असत. तीन उकडलेली अंडी, कडक भाजलेले चार ब्रेड टोस्ट आणी १ मोठा मग भरून स्ट्राँग काळी कॉफी. गेली ३ वर्षे न्याहारीत किंवा वेळेत फरक पडलेला रामशरणने पाहिला न्हवता. पाच मिनिटाच्या आत ब्रेड आणी अंडी संपलेली असत. त्यापुढचा मोजून अर्धा तास शीलवर्धनची बोटे टॅबलेट पीसी वर फिरत. विविध देशांच्या अनेक वर्तमानपत्रांच्या ई - पेपरचे झपाट्याने वाचन चालू असताना मे़जर ब्लॅक कॉफीचे घुटके घेत राहतो. त्यावेळी आवाज झालेला त्याला खपत नाही हे माहिती असल्याने रामशरण तो अर्धा तास बागेतल्या झाडाना पाणी घाली. साडे सात वाजता टॅबलेट पीसी पुन्हा भुणभुणायचा - त्यावेळी चकाचक पॉलिश केलेले बूट तयार ठेवणे हे रामशरण पांड्याच्या अंगळवणी पडले होते.
मेजर शीलवर्धन बूट चढवून खाड खाड पावले टाकत ऑफिसकडे चालू लागला. चालताना पहिल्यांदा टाच मग चवडा. बरोबर २३५० पावले चालून ; नेहमीप्रमाणे १२ मिनिटात तो ऑफिसला पोचला आणी सकाळी आठ वा़जण्याआधी काही मिनिटे त्याने कामाला सुरुवात केली. बरोबर एक वाजता तो खुर्चीवरून उठला. लंच साठी घरी जायला निघाला. ह्या प्रवासाला मात्र त्याला कधी २० मिनिटे लागत तर कधी एक तास.
वाटेतल्या झाडांचे, फुलांचे, कीटकांचे, दगडधोंड्यांचे फोटो काढत - काढत शीलवर्धन घरी जाई. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तीच झाडं, तसलेच पक्षी. पण प्रत्येक फोटो मात्र निराळा. कधी छायाप्रकाशाचा खेळ तर कधी ऑब्सर्व्हर्ची जागा बदलेली. कधी ऋतु बदलेला. एकाच दगडाचे किती वेगवेगळे फोटो निघू शकतात हे पहायच असेल तर मेजरसाहेबांच्या घरच्या भिंती पहा ! एकच वस्तू वेगवेगळ्या द्रुष्टीकोनातून पहाणे हा शीलवर्धन चा छंद होता; आणी एकच घटना वेगवेगळ्या अंगाने समजून घेणे हा व्यवसाय ! ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी. अॅनालिसिस डिपार्टमेंट. इंटलिजन्स ब्यूरो.
अॅनालिटिक बुद्धीमत्ता आणी सम्यक निरिक्षणक्षमता या त्याच्या गुणांमुळेच डायरे़क्टर श्रीवास्तवांनी त्याला आय बी त डेप्यूट केला होता. त्याआधी इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधील त्याच्या कामाबद्दल त्याला, अतिविशिष्ट सेवा पदकानेही गौरवण्यात आले होते. तो दिसायला काळासावळा, अंग़काठीने किरकोळ तर होताच. पण सैनिकी पेशात आवश्यक अशी नेमबाजीही त्याला फारशी येत नसे. इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधे त्याचं काम होतं पकडलेल्या दहशतवाद्याकडून माहिती वदवून घेणे. पण त्यान कधी कुणाला साधी कानफडित सुद्धा मारली नव्हती. दहशतवाद्याच्या मनसिकतेचा व्यवस्थित अभ्यास करून तो त्याला असे काही प्रश्न विचारी, की खच्चीकरण झालेला कैदी धडा - धडा बोलू लागे.
आज वाटेत एकही फोटो न काढता तो घरी पोचला. डोक्यात विचारांची चक्र फिरत होती. आजच त्याच्या हातात ट्रान्सफर लेटर पडलं होतं
ड्यु टी पोस्ट : बेळगाव
मराठा लाइट इंन्फेंट्री.
श्रीवास्तव साहेबांनी आपली बदली का केली असावी ? तीही बेळगावला ?
(क्रमश : )
प्रतिक्रिया
30 Apr 2012 - 8:58 pm | पैसा
बरेच दिवसानी लिहिलत, पण कथा रंगते आहे.
1 May 2012 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा
पार्टी संपली आणी वेगळाच अंक सुरु झालाय... विट्रेस्टिंग...! विट्रेस्टिंग...! विट्रेस्टिंग...! अब आएगा मजा :-)
डॉ... फकस्त लै येळ नका हो लाऊ,फुडचे भाग टाकायला... अठवडी रतीब चालू द्या.. :-)
1 May 2012 - 8:17 am | बोलघेवडा
अतिशय विस्कळीत कथा. ओढून ताणून संबंध लावल्यासारखे वाटत आहे.
28 Dec 2015 - 3:33 pm | भिंगरी
मध्यंतर फारच मोठा झाला.
28 Dec 2015 - 3:33 pm | भिंगरी
मध्यंतर फारच मोठा झाला.
28 Dec 2015 - 3:34 pm | भिंगरी
मध्यंतर फारच मोठा झाला.
28 Dec 2015 - 5:08 pm | अत्रुप्त आत्मा
डॉक्तर येतील का परंतूण! ?
29 Dec 2015 - 3:36 pm | निनाद मुक्काम प...
खूप दिवसांनी लिहिलेले वाचून बरे वाटले
3 Jan 2016 - 10:19 am | हेमंत लाटकर
लेखातून काय सांगायचे आहे हे कळले नाही. एकीकडे शिवरायांची थोरवी, दुसरीकडे भटांवर कुरघोडी, मुस्लिम जिहादवर प्रहार.