भाग १ - http://www.misalpav.com/node/20503
भाग २ - http://www.misalpav.com/node/20510
इंन्स्पेक्टर राजवीर पाटील विनोद कडे खाउ का गिळू अशा नजरेने बघत होता; त्याचवेळी त्याला कोणकोणत्या कलमात लटकवता येइल याचाही विचार करत होता. पाटी उखडण्याबद्द्ल बरीच कलमे लावण्यासारखी होती. पण त्यापेक्षा पाटी उखडण्याबद्द्ल एकच कलम लावावं सरकारी मालमत्तेच्या नासधुशीचं. आणी बाकी सारी कलमं लावावी या निळ्या पत्रकाच्या केस साठी. पण एकच केस केली तर जादा लटकतील आणी जामीन पण लवकर होणार नाही. काही असो पण या भट बडव्याला सॉलिड लटकवायचा . हिंदू म्हणे ! कावाय साल्यांचा. बिनकामाचे भांडणं लावतात आणी शिवाजीचं नाव घेतात.....भट हरामखोर ठग. राजवीरचे आजोबा नेहमी म्हणायचे आपल्या तलवारीमुळे शेंड्या वाचल्या. पण उंदराच्या शेपटीवानी वेदोक्तात अडकल्या. शाहू महाराजांना वेदोक्त संस्कार करणार नाही म्हणणार्यांच्या अवलादींबद्द्ल एक घ्रुणाच होती राजवीरच्या मनात. त्यातही तो 'भीमरूपी महारूद्रा' वाला हिंदुत्ववादी असेल तर फारच लबाड. कितीही असले भ्रष्ट| तरी म्हणे आम्हीच श्रेष्ठ|| हिंदू मुस्लिम भांडणाच रा़जकारण करणारे पिंजर्यात पाठवायला हात शिवशिवत त्याचे. पण त्याचे शिवशिवणारे हात यावेळी तरी त्याला बहुतेक खिशातच ठेवावे लागणार होते.
त्याचा बॉस इंन्स्पेक्टर बनगोंडा खुर्चीतून उठून उभा राहिला होता. कारण जिन्यावर वाजणारी पावलं पोलिस स्टेशनच्या आत पोचली होती. त्या पावलांना आदर देण्यासाठी बनगोंडा ला उठणं भागच होतं. निष्णात कायदेपंडीत, बेळगावातल्या १८ हॉटेलांचे मालक, आर्य समाजाचे प्रमुख, माजी आमदार अॅड्व्हकेट एम के शिंदे. यावेळी फक्त ४३ मतांनी पडले ते, पण बेळगावची महापालिका त्यांच्याच खिशात होती. राजवीर त्याना ओळखत न्हवता त्याला जॉइन होउन महीनाही उलटला न्हवता म्हणून. पण अॅड. शींदेंच्या एकूण भारदस्त व्यक्तिमत्वाने तोही प्रभावित झाला होता. साडे सहा फूट उंची, अडीच फूट रुंद खांदे, कडक स्टार्च केलेला पांढरा झब्बा कूडता आणी त्यांच्या विस्तीर्ण भालप्रदेशावर शोभणारे केशरी अष्टगंध. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्यांनी हल्लीच (त्यांच्या लाडक्या एकुलत्या कन्यारत्नाला आवडत नसे तरीही) खांद्यावर भगवी शाल वागवायला आरंभ केला होता.
ताड ताड पावलं टाकत ते आत आले आणी राजवीरकडे पहात म्हणाले हे कोण हे ? नवीन का? मग त्यानी बनगोंडाकडे पहात विचारलं,किसने मारा मेरे छोकरेको? क्यों मारा ? बनगोंडाने मौन धारण केले होते. पण तरा तरा पुढे होत राजवीर म्हणाला. "टीपू सुलतान नगरची पाटी उखडत होते, कुदळ घेउन"
अॅड. शिंदेंच्या चेहर्यावर समाधानाची लकेर दिसली. हवालदाराने सरकवलेल्या खुर्चीवर बसत बसत त्यांनी आपला उजवा हात बनगोंडाच्या टेबलवर ठेवला. आणी पेपरवेटशी चाळा सुरू केला. पण विनोदला कळत होतं; शिंदे सर अत्ता रिलॅक्स दिसत असले तरी ते केवळ त्यांना अजून निळ्या पत्रकाच्या केस बद्द्ल कळलेले नाही म्हणून. त्या केसचा संबध फक्त शिंदे सरांशीच येणार न्हवता तर त्यांच्या मुलीशी - नियती शिंदेशीही हा विषय निगडीत होता. पेपरवेट हाताने गोल फिरवत - फिरवत आपल्या नेहमीच्या खर्ज्या आवाजात, शिंदे म्हणाले " कोण म्हणतं टिपू सुलतान नगर ? त्याच नाव बदललेलं आहे. ....आजपासून..... महर्षी दयानंद सरस्वती नगर असं त्याचं नामकरण झालेलं आहे. महापालिकेने नामकरणाचा ठराव काल केला. त्या भागातल्या नगरसेवकाने पाटी बदलण्यासाठी या पोराना कंत्राट दिलेलं होतं. त्यानुसार ही पोरं काल महापालिकेच्या कंत्राटावर काम करत होती. म्युन्सिपाल्टी के काँट्रॅक्टर समझे बन्गोंडा ? "
चक्क खोटं बोलत होते अॅड्व्हकेट शिंदे. ते साफ खोटं बोलतायत हे इंन्सपेक्टर बनगोंडाला ही कळत होतं आणि राजवीरलाही. पण अशी कागदपत्रं महापालिकेतून २ तासात बनवून आणणं हा शींदेंच्या डाव्या हातचा मळ होता. महापालिकेचे प्रशासन आणि नगरसेवक शिंदेनी सांगितलं तर रस्त्यात भांगडाही खेळायला कमी करणार नाहीत. हे बनगोंडा पुरता जाणून होता.त्यांच्या ताकदीची कल्पना न्हवती ती राजवीरला.
" मग सोडताय ना पोराना ? " शिंदेंचा करडा आवाज घुमला.
"नाही साहेब" राजवीरचं उत्तर हजर होतं. " पत्रकाची सिरीयस केस आहे त्यांच्यावर"
"कोणतं पत्रक ?" शिंदेनी चिंतायुक्त स्वरात विचारलं.
"ते कोर्टात हजर केलं जाईल" राजवीर.
"निळ्या रंगाचं का ? " शिंदेंच्या आवाजात मार्दव निर्माण झालं होतं.
" मी सांगायला बांधील नाही" राजवीर उत्तरला.
अॅड्व्हकेट मल्हारराव केशवराव शिंदे. मनात कितीही खळबळ उडालेली असली तरी चेहर्यावर दिसायचं नाही त्यांच्या. त्यांनी विनोदकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. त्यानं मानेनंच हो म्हटलं आणि आणि क्रुष्णा जाधवकडे पहात मान उडवली.
शिंदे काय समजायचं ते समजले. "पत्रक कुणाकडे मिळालं ?" त्यांनी इंन्स्पेक्टर राजवीर कडे पाहत विचारलं. " त्याला ठेवा उरलेल्याला सोडा."
" शक्य नाही. पत्रक आरोपी क्र २ कडे मिळालं आणी त्यावर आरोपी क्र १ ची सही आहे." चार्जशीट लिहिता लिहिता राजवीर म्हणाला.
" आरोपी ? " आता मात्र शिंदेचा पारा चढला होता. असल्या फालतू इंन्सपेक्टराशी वावदूकी करायची सवय नाही मला. बन्गोंड्या अभि के अभी छोडो दो इसे. नही तो म्युन्सिपाल्टी के काँट्रॅक्टर पर जानलेवा हमला करनेका केस लगाता हू तुझपर. कल सुबह ५ हजार कार्यकर्ता आपसे मिलने मोर्चा लेकर आयेंगे वो अलग. और बाकी बात मै कमिश्नर साब से कर लूंगा.
****************************************************************************************************
शिंदे आणि विनोद पोलिस स्टेशनच्या पायर्या उतरत होते तेंव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते. पत्रकाची केस फाइल झाली होती. क्रिश्ना पोलिसांच्याच ताब्यात होता. विनोदला सोडला होता. पण तारखेला कोर्टात हजेरी लावायची होती. जाता जाता राजवीर ला " फिर मिलेंगे" म्हणायला शिंदे विसरले न्हवते. राजवीरनही बिनदिक्कत उत्तर दिलं होतं " शौकसे ". पण त्यावेळी राजवीरला शिंदेंच्या ताकदीची कल्पना न्हवती आणी शिंदेनाही राजवीरच्या तीव्र बुद्धीमत्तेचा अंदाज आला न्हवता.
ड्रायव्हरने मर्सडीझचं दार उघडलं. आत बसता बसता शिंदेंनी विनोदला विचारलं " ही पाटीची भानगड काय आहे ? "
"सर मी आणि किश्या टिपू सुल्तान नगर च्या दाराशी उभे होतो. बाकीची पोरं पोचायची होती. किश्याच्या हातात कुदळ होती. माझ्याकडे पण रामपुरी होता पण पोलिस बघून मी तो त्या पाटीमागे लपवत होतो. माझे हात पाटीच्या मागे आणी किश्याच्या हातातली कुदळ बघून त्या माकड बनगोंड्याला वाटलं मी पाटीच उखडतोय ! तसली कामं बालवाडीत करायचो सर! पण पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानून मी पण बोल्लो बन्गोंड्याला चल उखड्तो पाटी...... काय उपटणार तू ? मग भरपूर आरडाओरडा
झाला. आपल्या तिथे येणार्या कार्यक्रर्त्यांनी तो ऐकला. आणी ते तुम्हाला कळवतीलच हे माहित असल्याने मी आणी किश्या हसत होतो. त्यावर पण उखडल बेनं आणी वाइट धुतला हो....." विनोद
शिंदे दरवाजा लावताना म्हणाले " चल आपण खरं कशासाठी जमणार होतो....ते तर समजलं नाही ना पोलिसाना ... बरं झालं. जाउन झोप आता. संध्याकाळी ये वाड्यावर "५५५" साठी . ती पत्रकाची केस बघू आपण .फार लागलं नाही ना ?"
"देश आणी धर्मासाठी काय पण सर ! " असं म्हणून विनोदने सरांना नमस्कार केला. रूमकडे जाताना तो विचार करत होता, - सराना वाटतंय तितकी पत्रकाची केस सोपी जाणारी नाही. कमित कमी आपल्याला आणी नियतीला तर नाहीच नाही. पण अती ताण आला की तो नियतीचा ,सरांच्या मुलीचा विचार करत असे. आणी सरांनी ''५५५'' साठी वाड्यावर बोलावलंय तेव्हा हजारात एक शक्यता अशीही होती की आपण पत्रकाच्या केस ला काही वेगळे वळण देउ शकू. असा पॉझीटिव्ह विचार करत करत विनोद त्याच्या रूम कडे चालत होता.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
25 Jan 2012 - 6:33 pm | दादा कोंडके
पुढच्या भागाची वाट बघतोय.
25 Jan 2012 - 6:34 pm | हंस
छान झालाय हा भाग!.
पु. भा. प्र.
25 Jan 2012 - 6:38 pm | मी-सौरभ
बोलल्याप्रमाणेच नविन वळण दिलयं कथेला तुम्ही....
पु.ले.प्र.
25 Jan 2012 - 7:10 pm | स्मिता.
कथेला नवीनच वळण मिळालंय आणि उत्सुकताही वाढलीये.
25 Jan 2012 - 7:48 pm | पैसा
उत्सुकतेने वाचते आहे.
25 Jan 2012 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा
वळणदार कथा.... :-)
परंतू आता पुढे खिंड येणार आहे... ;-)
उरलेली प्रतिक्रीया--- क्रमशः ;-)
25 Jan 2012 - 8:34 pm | तिमा
राखून ठेवण्यात येत आहे. सर्व भाग वाचून झाल्यावरच देऊ.
25 Jan 2012 - 10:04 pm | जाई.
सर्व भाग वाचले
जबरदस्त लेखन
पुभाप्र
25 Jan 2012 - 10:18 pm | शिल्पा ब
लेखनशैली आवडली. मस्त. पुढचे भाग येउद्या.
25 Jan 2012 - 10:37 pm | अर्धवटराव
अगदी सगळे भडक रंग उधळणार काय या कादंबरीत ? मराठी-कानडी झाला, भगवा झाला... आता निळा आणि हिरवा रंग उधळला कि झाला शिमगा...
जबरदस्त रंगतेय कथा.
अर्धवटराव
25 Jan 2012 - 11:52 pm | टुकुल
एकदम भन्नाट ..
--टुकुल.
26 Jan 2012 - 12:08 am | ५० फक्त
मस्त रे मजा येते आहे, कर्नाटकाच्या सिमेजवळ राहत असलो तरी या वादाचा फारसा संबंध आलेला नाही कधी.
26 Jan 2012 - 5:42 pm | श्रीरंग
मस्त लिखाण!
27 Jan 2012 - 10:07 am | प्यारे१
भारीच 'रंगपंचमी' सुरु आहे की.... :)
आन दो आन दो. ;)