सुगरण..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
31 Oct 2011 - 1:36 pm

दोनतीन हॉटेलं वाईट निघाल्यामुळे आता पुढचं किमान बरं निघावं अशी इच्छा होती. लाऊंज, बिस्त्रो, फाईन डाईन, कॅफे अशा टाईपच्या हॉटेलिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या झणझणीत आणि खानावळवजा ठिकाणावर धाड टाकायची ठरवली.

कुठेतरी ऐकलेल्याच्या आठवणीवरून पुण्यात पेरुगेट पोलीस चौकीजवळ असलेलं सुगरण गाठायचं ठरवलं आणि गल्ल्या शोधत तिथे पोहोचलोसुद्धा..

एका गाळ्याएवढा एंट्रन्स दिसत होता. माझ्यासारख्या प्रशस्त माणसाला बसायलातरी पुरेशी रुंदी असलेली जागा आत असेल का असं वाटत वाटत आत शिरलो. वरती बोर्ड लावला होता त्यावर "सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज" असं लिहिलं होतं.

entrance
दारातच असलेल्या काउंटरवर "क्षमस्व, जेवण संपले" अशी पुणेरी आहारगृहात आवश्यक अशी लहानशी पाटी ठेवली होती. सुदैवाने "जेवण संपले" ची बाजू आतल्या दिशेने होती. याचा अर्थ जेवण चालू होतं. माझं नशीब चांगलं होतं.

आत शिरलो तर एक जेवणाची छोटी खोली दिसली. त्यात बसायला काहीशी जागा होती.

Outer room

पण ती खोली ओलांडून आत जाताच बरीच ऐसपैस अंगणासारखा मोठ्ठा ओपन एअर जेवणाचा एरिया दिसला.

inner area

स्थानापन्न होऊन मेनूकडे नजर टाकली. "सुगरण"चं ब्रीदवाक्य असं होतं की, "फक्त तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे, कोल्हापुरी ही एक चव आहे.." हे वाक्य मेनूवरही होतंच.

मेनू छोटाच होता. बराचसा भर कोल्हापुरी पद्धतीच्या चिकन आणि मटणावर दिसत होता. फिशचाही वेगळा सेक्शन होता. थाळी किंवा आवडते पदार्थ वेगवेगळे मागवण्याची सोय दिसत होती.

-गावरान चिकन करी
-गावरान चिकन फ्राय
-गावरान चिकन हंडी
-गावरान चिकन बिर्याणी
-पापलेट आणि सुरमई फ्राय
-पापलेट आणि सुरमई करी

व्हेज लोकांसाठी थाळीचा ऑप्शन अजिबातच नव्हता. एखाद दोन व्हेज भाज्या आणि त्यासोबत चपाती, एवढ्यामधेच व्हेजवाल्यांची सोय केली होती. याचाच अर्थ व्हेज व्यक्तीला इथे घेऊन येण्यात काहीही अर्थ नाही.

पुरेपूर कोल्हापूर किंवा अन्य कोल्हापुरी हॉटेलांतली नॉनव्हेजवाल्यांनाही मोहात पाडेल अशी व्हेज थाळी आठवली. पुरेपूर कोल्हापूरवाल्या व्हेज थाळीचा फोटो इथे उगीच रेफरन्ससाठी.

purepoor thaali veg

नॉनव्हेज थाळीचे मात्र इथे भरपूर प्रकार होते. अधिक संशोधनांती असं लक्षात आलं की मला हवेसे वाटणारे त्यातले पदार्थ एकत्र करुन तिथे ऑलरेडी एक "कोल्हापुरी स्पेशल थाळी" होतीच.

मग टेस्टिंग सुरू झालं..

सोलकढीने सुरुवात. इथे स्टीलच्या साध्या ग्लासातून थंड सोलकढी समोर आली.

solkadhi

या सोलकढीला मी दहापैकी अकरा मार्क्स देऊ इच्छितो, कारण इतकी परफेक्ट सोलकढी मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. नॉर्मली मिरमिरणारी, आंबट होत चाललेली, अति तिखट किंवा पाणी वेगळे झालेली अशी असण्याची शक्यता बरीच असते. पण अशी ताजी एकजीव आणि घशाला परफेक्ट हवी तेवढीच "लागणारी" सोलकढी फार कमी वेळा प्यायलो आहे.

मग एक चिकन फ्राय मागवून पाहिलं.

chickenfry

मऊ शिजलेलं चिकन. पण मसालेदार आणि चमचमीत टेस्ट होती. केएफसीवर पोसलेल्या जिभांना झटका देणारं हे रसरशीत फ्राईड चिकन होतं.

मग एकामागून एक ट्रायल्स चालू झाल्या. सुकं मटण.. हेही अत्यंत मस्त मऊ शिजलेलं होतं. रबरासारखं वातड चिकन किंवा मटण शिजवणार्‍या हॉटेलांविषयी कायमची अढी मनात बसते आणि उलट नीट आवश्यक तेवढं शिजलेलं मांस वाढणार्‍यांविषयी मनात कायमची आवड तयार होते.

सुक्के मटण:

frymutton

गरमागरम कोल्हापुरी मटणरस्सा:

rassa

मटणात मसाल्याचं आणि तेलाचं प्रमाण सढळ होतं.. पण आवडेल इतकंच. ढप्पळभर तवंग नाही. जस्ट परफेक्ट.

या दोन्ही मटणांत कोल्हापुरी चव अगदी पुरेपूर उतरली होती. त्यासोबत भाकरी आणि चपातीचा ऑप्शन होता. मटणासोबत जाडजूड आणि गरम चपाती हा माझा नेहमीचा चॉईस असल्याने तोच घेतला. चपाती (अशा सणसणीत प्रकाराला पोळी म्हणवत नाही) ही अगदी गरम आणि मटणासोबत लागते तश्शी जाड पण खुसखुशीत होती. मटणरस्सा जरा तिखट होता. पण कोल्हापुरात अनेक ठिकाणच्या खानावळींमधे यापूर्वी खाल्लेला रस्सा आठवून त्यामानाने हा बराच स्केल डाऊन केलेला वाटला.. आणि ते चांगलंच होतं. खातानाच आगीचा बंब बोलावण्याची इच्छा होणे ही माझ्यामते चांगल्या अन्नाची खूण नव्हे. त्या तिखटानेही मजा यायला हवी.. जीव घाबरा होऊ नये..

या कसोटीला इथलं मटण उतरलं.

पांढरा आणि तांबडा रस्सा हा कोल्हापुरी जेवणाचा जीव. तो इथे अनलिमिटेड उपलब्ध होता. वाफाळणारा गरमागरम रस्सा पुन्हापुन्हा आणून वाढत होते. तांबडा रस्सा अफलातून टेस्टी होता. पांढर्‍या रश्श्यामधेही एरवी हमखास कमी किंवा जास्त पडणारी लवंग इथे योग्य प्रमाणात घातलेली होती आणि त्याचा सुखद होईल इतपतच स्वाद आणि चटका घशाला लागत होता.

तांबडा आणि पांढरा रस्सा:

pandharaa_rassaa

थाळीमधे भाताचेही एकदोन ऑप्शन्स होते.

बराच वेळ हे झणझणीत खाल्ल्यावर तोंड भाजल्यामुळे काहीतरी गोड मागवण्याची इच्छा झाली. तसं वेटरला बोलल्यावर मला त्याने स्पष्ट सांगितलं की इथे कोणतीही स्वीटडिश मिळत नाही. काही म्हणजे काही नाही.. हवे तर कोल्ड्रिंक घ्या.

यांना बहुतेक आपली झणझणीत चव जिभेवर दीर्घकाळासाठी घेऊनच गिर्‍हाईक हॉटेलबाहेर पडावे अशी इच्छा असावी. काहीच गोड नाही हे काही मला आवडलं नाही.

या उपरिनिर्दिष्ट बर्‍याचश्या डिशेसचं कॉम्बिनेशन असलेली ही स्पेशल मटणथाळी:

thaalee

या थाळीत छोट्या वाटीत खिमाही देतात. तो काही मला खास उल्लेखनीय वाटला नाही.

व्हेज लोकांसाठी खानापूर्ती. पनीर बटर मसाला:

pbm

हे ठिकाण रेकमेंड करण्याविषयी:

नॉनव्हेज अन्न अत्यंत टेसदार. पैसा वसूल.

किंमती अत्यंत वाजवी. सर्वात उच्च थाळीही दोनशेमधे. बाकीच्या थाळ्या शंभर ते दीडशे.

मात्र, व्हेज पार्टनर सोबत असेल तर इथे जाऊ नका. लहान मुलांनाही फारसं झेपेल असं वाटत नाही. "पुरेपूर कोल्हापूर्"मधे खास लहान मुलांसाठी थाळी मिळते. हे सुगरणवाल्यांनी घेण्यासारखं आहे.

स्वीटडिश नसल्याने आग आग होत असलेलं तोंड घेऊन बाहेर पडावं लागतं. ते आवडत असेल तर पसंद अपनी अपनी.. पण तरी हे लक्षात ठेवा आणि सोबत एखादी आंबावडी, चॉकलेट वगैरे ठेवून आत जावा.

बाकी "सुगरण" हंड्रेड परसेंट रेकमेंडेड....

शिवाय या लिखाणानिमित्ताने आपल्या माहितीतली अशीच झणझणीत झटका ठिकाणं सांगून सर्वांना मजा आणावी ही विनंती...

..................

जीवनमानराहणीमौजमजाविचारमतप्रतिसादशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

31 Oct 2011 - 1:53 pm | सुहास झेले

मस्तच.. गेल्या वर्षी फोटोग्राफर्स @ पुणे प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा गेलो होतो इथे :) :)

यावर्षी पण जाणार २-३-४ डिसेंबरला ...

*|| फक्त तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे || कोल्हापुरी ही एक चव आहे ||*

त्यावेळची झलक :)

जेवुन झाल्यावर... ;)

सुहास झेले's picture

31 Oct 2011 - 2:01 pm | सुहास झेले

काय माहित काय लोचा झाला फोटो दिसत नाही आहेत..:(

फोटोवर राईट क्लिक करून टॅबमध्ये बघता येतील....

छोटा डॉन's picture

31 Oct 2011 - 2:23 pm | छोटा डॉन

फोटो दुरुस्त केले आहेत.
शेवटचा पानाचा फोटो ज्याम आवडला ;)

- छोटा डॉन

सुहास झेले's picture

31 Oct 2011 - 2:38 pm | सुहास झेले

धन्स रे भावा :) :)

दादा कोंडके's picture

31 Oct 2011 - 1:56 pm | दादा कोंडके

तुम्ही देत असलेल्या सगळ्या हॉटेल्सची महिती लिंक करून खवयांसाठी एक एन्सायक्लोपिडिआ तयार होईल!
पुण्यात गेल्यावर नक्की जाणार.

मोहनराव's picture

31 Oct 2011 - 7:44 pm | मोहनराव

सहमत!!
गवि साहेब खुष केलत!!

प्रचेतस's picture

31 Oct 2011 - 2:05 pm | प्रचेतस

गवि पुढचे ठिकाण आता शाकाहारीच आले पाहीजे.
आम्ही पामरांनी काय करावं बरं?

विलासराव's picture

31 Oct 2011 - 2:13 pm | विलासराव

आमच्याकडेही आहे गवी अशी खाणावळ.
'समर्थ'.
व्हेजवाल्यांसाठी ईथे एकच थाळी मिळते. बाकी नॉन-व्हेजसाठी चांगले असावे. नेहमीच नंबरला उभे रहावे लागते.

तुमचा आनंद's picture

31 Oct 2011 - 2:16 pm | तुमचा आनंद

सुगरणस म्हणजे... खाण्याची नाजुक बाजू आहे....
सुहास ,मी आणि मित्रांनी जो फडशा पाड्ला होता तो अजुनही आठवतो...
पुण्यात खादाडी म्हणजे सुगरणस हे समीकरण आहे आमचं...

पोस्ट भन्नाट... सुगरणस बद्दल सांगताना ही लिंक नक्की पुढे करण्यात येईल.. :-)

रेवती's picture

31 Oct 2011 - 7:32 pm | रेवती

आता पुढला धागा शाकाहारी हाटेलावर येऊ द्या गवि.

धमाल मुलगा's picture

31 Oct 2011 - 8:59 pm | धमाल मुलगा

सुगरणवाल्यांची थाळी म्हणजे काय बोलायचं कामच नाही म्हाराजाऽऽ!
मटण असो किंवा चिकन, फडतूस पिसेस अजिबात येत नाही. कसं काय मॅनेज करतात कोण जाणे बॉ.
चवही एकदम झक्कास! हां, जरा पुणेकरांच्या तबियतीकडं पाहून तिखट कमी करतात, पण चव आहे! चव आहे.

अगदी उकळता म्हणावं असा गरमागरम तांबडा-पांढरा रस्सा, गरम असलेल्या चपात्या (ह्या चपात्यांना पोळ्या म्हणणं गविप्रमाणे मलाही पटत नाही :) ) मटण लोणचं.....नाऽदखुळा रे! :)

सुगरणमध्ये पोटाला तडस लागेपावतो हादडून झालं रे झालं, की डुलत डुलत बाहेर येतो न येतो तोच मिश्राची पानाची गादी वाट अडवतेच. ह्याच्याकडचं 'कलकत्ता सादा' खाऊन पहावं. हैऽ तिथं उभ्याउभ्या ब्रम्हज्ञानाचा साक्षात्कारच होतोय म्हाराजा. :)

@ डानरावः पानाचे फोटू बघून काय खुष होतायसा? लेको, त्या मिश्राच्या गादीसमोरच तासनतास गप्पांचे अड्डे जमवलेत की आपुन. तुमची गुलकंदवाली मसाला पानं, नीलकांतला दरवेळी लागणारी सुपारी आणि त्यामुळं उचक्या आणि आमचं लवंगीचं 'सिझलर पान' विसरलात काय?

श्रावण मोडक's picture

1 Nov 2011 - 1:01 am | श्रावण मोडक

हं. माहितीची नोंद घेतल्या गेल्या आहे.

प्रशांत's picture

3 Nov 2011 - 12:54 pm | प्रशांत

लवंगीचं सिझलर पानाबद्द्ल ना..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Oct 2011 - 9:06 pm | निनाद मुक्काम प...

गवी तोंडाला पाणी सुटले .
पण झणझणीत अभक्ष भक्षण केल्यावर तीच चव जिभेवर रेंगाळत ठेवून निघणे ह्या संकल्पनेशी १०० % सहमत .

Mrunalini's picture

31 Oct 2011 - 9:14 pm | Mrunalini

अरे का असं करताय.... आज सकाळपासुन सगळे फक्त जीव काढायच्या मागे आहेत.

मस्त धागा.. मुंबईवरुन शिवनेरीने शिवाजीनगरला उतरायचं.. आणी तत्काळ ऑटोने 'सुदामा' मध्ये बीअर दोन बीअर रिचवायच्या. नंतर पुन्हाएकदा ऑटोवाल्यांना खिसा कापायची संधी देऊन सुगरण गाठायचं आणि मटणावर आडवा हात मारायचा, असा आमचा प्लॅन असतो महिन्या दीड महिन्यात.

सदर माहितीपुर्ण धाग्यांच्या मालिकेबद्दल गवि यांचे आभार.

रेवती's picture

1 Nov 2011 - 6:58 am | रेवती

वाटलं नव्हतं असा असशील.;)

इंटरनेटस्नेही's picture

1 Nov 2011 - 9:01 pm | इंटरनेटस्नेही

वाटलं नव्हतं असा असशील.

तुम्हाला कदाचित वाटलं असेल, मी बीअर पेक्षा जहाल पेयपान करणारा बिघडलेला बाळ आहे असं? ;)

प्रचेतस's picture

1 Nov 2011 - 8:18 am | प्रचेतस

आणी तत्काळ ऑटोने 'सुदामा' मध्ये बीअर दोन बीअर रिचवायच्या.

मी बीअर मारलेली तुम्ही माझ्या घरी सांगणार तर नाही ना? ;)

इंटरनेटस्नेही's picture

1 Nov 2011 - 9:04 pm | इंटरनेटस्नेही

मी बीअर मारलेली तुम्ही माझ्या घरी सांगणार तर नाही ना?

=))
आजकाल घरची मंडळी आमच्या कलाने घेतात, वल्ली! सो नो इश्युज. :)

कच्ची कैरी's picture

1 Nov 2011 - 4:21 pm | कच्ची कैरी

व्वा गवि नॉन व्हेज पदार्थांचे फोटो बघुन तर तोंडाला पाण्याचा पूरच आला आणि सुहासने टाकलेल्या फोटोंमध्ये ,जो शेवट्चा पानाचा फोटो आहे त्याने तर जिवच घेतला

मैत्र's picture

3 Nov 2011 - 12:41 pm | मैत्र

पुण्याला येण्याचा आणि बाहेर जाउन मटण / चिकन हादडण्याचा योग फार काळ येणार नसल्याने वर्णन आणि विशेषतः एक नंबर फोटो पाहून प्रचंड जळजळ झाली आहे...
त्यामुळे गविंचा तीव्र निषेध !!