डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
29 May 2011 - 12:07 am

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....

"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते. "हो हो, तेवढी मिळाली तरी चालेल ना." असे म्हणून आम्ही इकडे तिकडे पहात, ह्या ठिकाणाहून चाललेल्या कामाचा आवाका समजावून घेण्याचा प्रयत्न करतो....

चेन्नईहून साधारण २० किमी दूर, सोलिंगनल्लूर जवळच्या चेम्मणचेरी नावाच्या उपनगरातली एक भव्य आणि आधुनिक वास्तू. इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीज असा भलामोठा बोर्ड आपले स्वागत करतोय. वास्तूच्या चोहोबाजूंनी झाडी लावलेली असल्याने मधे शिरताच उत्साहवर्धक थंडावा आपल्याला प्रफुल्लित करून जातो... ह्या इमारतीत पहिल्या मजल्यावर तिचे मालक आणि संचालक डॉ. जी. जॉन सॅम्युएल बसतात... एक द्राविड भाषाभ्यासक पंडीत म्हणून जॉन सॅम्युएल आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त आहेत. विशेषत: द्राविड भाषा, त्यांच्या लिपी ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी प्रसिद्ध केलेले भलेमोठे प्रबंध नुसते अभ्यासायचे म्हटले तरी काही वर्षे जातील. त्यांचे अनेक शोधग्रंथ आत्तापर्यत प्रकाशित झालेले आहेत. भिंतीवरती सगळीकडे जॉन सॅम्युएल यांनी विविध देशात गाजवलेल्या सेमिनार्स मधले फोटो टांगले आहेत. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, मलेशिया, इंग्लंड, कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, श्रीलंका अशा विविध देशातल्या भाषाभ्यासकांशी चर्चा करताना, तेथील सभा संमेलने गाजवतानाचे त्यांचे ते फोटो तमिळ घरातील देवघराची आठवण करून देतील इतक्या दाटीवाटीने सगळीकडे लावलेले दिसतात. पदका-पारितोषिकांचे तर पेवच फुटले आहे, ज्यावरून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सभा-संमेलनात त्यांचा गौरव झाल्याचे सहज कळावे.

भव्य काचेच्या खोलीमधे भल्या मोठ्या चकचकीत एग्झिक्युटीव्ह टेबलामागे डॉ. जी. जॉन सॅम्युएल विराजमान असतात. एका बाजूला ते जागतिक महत्त्वाच्या कामात गढलेत, दुसर्र्या बाजूला त्यांचा स्टाफ विविध कामाचे आदेश घेण्यास येरझार्याम मारतोय. त्यांचे पी.ए. मधूनच त्यांच्या मोबाईलवर ऍपोंईंटमेंट्स फिक्स करतायत. आपल्या सरांना काय हवे, काय नको याची सेवाभावाने यथोचित काळजी घेतली जातेय. त्याच वेळेला, आगंतुक पाहुण्यांनी त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून हटकले जातेय, बाहेरच थांबवून आत साहेबांचा मूड कसा आहे ते पाहून थोडा वेळ भेटीकरता आत सोडले जातेय. "काय आहे, कित्येक नवखे अभ्यासक सरांच्याकडे स्वत:चे निबंध वगैरे आणून देतात. त्यांच्या टेबलावर अनेक तमिळ, इंग्लिश, जपानी व अन्य भाषेतील प्रकाशित - अप्रकाशित ग्रंथांच्या चवडीच्या चवडी सरांची नजर पडावी म्हणून खोळंबलेल्या असतात. ते तमिळ भाषेचे तज्ज्ञ मान्यवर आहेत ना, ते म्हणतील ती पूर्व दिशा". त्यांच्या कार्याची प्रारंभिक ओळख करून द्यायला त्यांचे शिष्य तत्पर असतात.

मी डॉ. सॅम्युएल आणि माझ्यासोबत असलेल्या एका व्यक्तीची एकमेकांशी ओळख करून देतो. हळूहळू त्या दोघांचे संभाषण इंग्रजीऐवजी तमिळमधून होऊ लागते. तमिळमधून बोलणे साधल्याने संभाषणात आणखी रंग भरतोय असे वाटते. शब्दांवरून मी अंदाज लावतोय, बहुतेक प्राचीन तमिळ वाङ्मयापासून सुरुवात करून तिरुकुरल, संगम तमिळ, चोळा तमिळ, अशी विविध काळांमधे घडलेली भाषेची स्थित्यंतरे चर्चिली जाताएत. तमिळ भाषेचा दक्षिण पूर्व आशियाई देशांतील प्रचलित भाषा आणि त्यांचा इतिहास, लिपीवर पडलेला प्रभाव, तमिळ देशाच्या इतिहासाचे भारताच्या इतिहासातील महत्त्व, द्राविड देशांची भौगोलिक रचना आणि संस्कृती आदि त्यांच्या आवडत्या विषयांवर आधारित चर्चा रंगलीए. एकमेकांना विविध भाषेतील उदाहरणे वगैरे दिली चालली आहेत.. एकमेकांच्या मतांचे यथेच्छ खंडन-मंडन चालल्यासारखेही वाटते, एकमेकांशी संदर्भांची देवाणघेवाण चाललीए. एकूणात डॉ. जी. सॅम्युएल आणि ती व्यक्ती दोघेही रंगलेली दिसतात.

दिलेली १५ मिनिटांची वेळ संपूनही एखाद-तास होऊन गेला असावा. तेवढ्यात डॉ. जी. सॅम्युएल पाणी, कॉफी वगैरे आदरातिथ्याखातर मागवतात. अव्वल मद्रासी कडक्क कॉफीपान चाललेले असतानाच, स्वत:चा नुकताच प्रकाशित झालेला एक ग्रंथ पुढे करत डॉ. जी. सॅम्युएल म्हणतात, "हे बघा ह्या विषयावरचे माझे नवे पुस्तक. अशोककालीन समाजात, तमिळ लोकांचा व्यापार उद्यम सार्याय जगात पसरलेला होता असे म्हणतात ते कशावरून ते मी यात दाखवले आहे." त्या व्यक्तीने पुस्तक हातात घेतले, आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या शिलालेखाच्या चित्राला उद्देशून म्हटले, "हीच मी मगाशी सांगितली ती ब्राह्मी लिपी." असे म्हणत ती व्यक्ती एकदम त्यातील अक्षरे वाचायला सुरुवात करते.... "सम्राट अशोकाच्या सुप्रसिद्ध शिलालेखाचा हा एक भाग आहे... बहुधा कलिंग युद्धानंतर तिथले काही लोक दक्षिणेत आले त्या काळातला असावा... बघा ना, त्या अक्षरांत निव्वळ ब्राह्मीच नाही तर कल्याणी, ग्रंथ लिपींमधलीही काही वळणे आहेत... बघा मी दाखवतो..."

एव्हाना डॉ. सॅम्युएलांचे डोळे मोठ्ठे झालेले असतात. ते स्वत:च त्या पुस्तकाचे लेखक असूनही त्याचे मुखपृष्ठ जणू काही पहिल्याप्रथमच पाहत आहेत असा निरागस चेहरा करून म्हणातात, "ही लिपी ब्राह्मी असावी, पण त्यात नेमके काय म्हटले आहे, हे मला आज तुमच्यामुळे ज्ञात होत आहे." माझ्याकडे वळून डॉ. जी. सॅम्युएल म्हणतात, "येस्स, कमांडरा, यिट यिस्स् यिण्डीड भ्रामी आन्ड ग्रंतम् स्क्रिप्ट्... बट्ट वर्डींङ्स् व्यार नॉट्ट क्ळ्यार टु मी... ऐयाम् ळऽर्निंङ् यिट् फ़ार् फ़र्स्ट् टैम् टुडे...!!" असे ते म्हणत असतानाच, ती व्यक्ती "सर, देऽर यिस्स् सम्थिङ् मोऽर् वेऽयिटिङ् फ़ार् यू टुडे..." असे म्हणत, स्वत: लिहिलेला एक शोधप्रबंध त्यांच्यासमोर ठेवते. हात न उचलता केलेले लेखन तमिळभाषेतही आहे; हे दाखवणारा, तमिळ भाषेच्या आतापर्यंत माहिती नसलेल्या एका लिपीप्रकारावरचा तो विस्तृत शोधप्रबंध मग विविध उदाहरणांसह चर्चिला जातो.

डॉ. जी. सॅम्युएल आनंदलेले असतात. लगोलग त्यांच्या इंडॉलॉजीवर काम करणाऱ्यास व उपसंस्थेचे सदस्य होण्यासही सुचवतात. रीतसर कॉफीपान झाल्यावर खूष झालेले डॉ. सॅम्युएल त्यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीजने विविध अंगांनी केलेल्या अभ्यासावर आधारित अनेक ग्रंथ-पुस्तके मागवतात. त्यातली काही पुस्तके सप्रेम भेट म्हणून बरोबर नेण्याचा आग्रह धरतात. पुढील आंतरराष्ट्रीय तमिळ साहित्य संमेलनाचे निमंत्रण पाठवण्यासाठी म्हणून आमचे पत्ते लिहून घेतात.

...नंतर काही काळाने ताडपट्ट्यांवरील तमिळ भाषेतील कूटलिपीलेखन - अन्वयार्थ ह्या नावाने एक थिसिस पेपर २०११ सालच्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी सादर करण्यासाठी पाठवला जातो. नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे... असा अभिप्राय त्यातून मांडला जातो.

...हे सर्व शोधकार्य करणारी, डॉ. जी. जॉन सॅम्युएलना भेटलेली, भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांचा खंदा समर्थक असलेली ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत....

धोरणसंस्कृतीभाषासाहित्यिकमौजमजाप्रकटनआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2011 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

द्रवीड भाषाभ्यासक डॉ. सॅम्युएल आणि वकीलसाहेबांच्या एका भेटीचे वर्णन झकास झाले आहे.
बाकी, नाडीपट्टीवरुन भविष्याचा वेध घेण्याऐवजी पट्टीवरील लिपीचा भाषिक दृष्टीकोनातून अभ्यासाचा विचार मला बॉ पटला.........!

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

29 May 2011 - 11:30 am | शशिकांत ओक

नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...

विचार मला बॉ पटला.........!

.... चला प्रा. डॉ. ना तरी आत्ता पटले.... इतरांना आणखी काही काळाने ...
हे ही नसे थोडके!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 May 2011 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>इतक्या उशीरा ?
नाडीपट्टीवरील असलेल्या लेखनाचा म्हणजे लिपीचा भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून व्याकरण-उच्चाराचे शास्त्र, वगैरे अभ्यास करावा असे म्हटले आहे, माझ्या प्रतिसादातून 'नाडीपट्टीवरुन भविष्य कथन प्रकाराचा ' अभ्यास व्हावा किंवा अशा गोष्टीला मान्यता आहे, असा अर्थ घेऊ नये एवढीच नम्र विनंती. :)

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

7 Jun 2011 - 12:34 pm | शशिकांत ओक

प्रा. डॉ. बिरुटे सर,

'नाडीपट्टीवरुन भविष्य कथन प्रकाराचा ' अभ्यास व्हावा किंवा अशा गोष्टीला मान्यता आहे, असा अर्थ घेऊ नये एवढीच नम्र विनंती.

ऐतिहासिक रुमालातून लिपी अभ्यासकांचे एका मोडीपत्रावर शोधकार्य चालले होते. त्यातील मजकुराचा अर्थ लावल्यावर कळले की त्यातील मजकूर मुत्सुद्देगिरीचा अद्वितीय नमुना म्हणून नंतर मानला गेला.
भाषेच्या अंगाने अभ्यासकार्यातून मजकुराचा जो काय शोध लागेल तो देखील अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हे आपल्याला मान्य होईल.
म्हणून आपल्याला नाडीग्रंथांतील भविष्यकथन मान्य आहे असे मी घाईने म्हणणार नाही.
काही काळाने अधिक अभ्यासांती आपले मत बदलले तरी हरकत नाही आणि बदलले नाही तरी हरकत नाही.

शशिकांत ओक's picture

29 May 2011 - 11:40 am | शशिकांत ओक

नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...

विचार मला बॉ पटला.........!

.... चला प्रा. डॉ. ना तरी आत्ता पटले.... इतरांना आणखी काही काळाने ...
हे ही नसे थोडके!

नंबर वर मिसकॉल दिला आहे .. चला मिसकॉल मिसकॉल खेळु .. मला रिकामा वेळ आहे थोडा :)

- (मिसकॉल पट्टू ) टारिलायन्स

शशिकांत ओक's picture

7 Jun 2011 - 12:37 pm | शशिकांत ओक

यथेच्च गप्पा झाल्या. नाडीवरील संभ्रम दूर झाले असे पारंब्यावर झोके घेत म्हटले गेले. माझा वेळ बरा गेला....

आत्मशून्य's picture

6 Jun 2011 - 12:23 am | आत्मशून्य

.

शशिकांत ओक's picture

7 Jun 2011 - 12:39 pm | शशिकांत ओक

कट्टयावर आला नाहीत...
नाही तर हैयोंची आणखी ओळख झाली असती.