पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
16 Mar 2011 - 12:12 am

ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली.

हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते. ते पुन्हा येथे ठेवत आहे.

(सामान्य जनतेला पुर्वांचलाची ओळख होणे गरजेचे आहे.
एकतर तेथिल काही राज्यांत चालू असलेल्या घुसखोरी,धर्मांतर इ.इ मुळे तेथिल जनतेत संभम आहेच , त्यातही आपल्याकडे तेथिल लोकांकडे बघण्याचा दॄष्टीकोनही चुकिचा आहे.
सरसकट आपल्याकडे चपट्या, गोर्‍या रंगाच्या चेहरेपट्टीच्या लोकांना नेपाळी,तिबेटी अगदी चायनीजही समजले जाते.त्यांना वागणूकही परदेशी असल्यासारखी दिली जाते.पुर्वेकडच्या राज्यांतली कितीतरी मुले मुंबैतल्या चायनिजच्या गाड्यांवर वगैरे कामाला असतात, त्यांना सरसकट नेपाळी,कांचा संबोधन नकळत दुरावा वाढवत असतो आपण लोक.)

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग.

गेल्या तिन चार आठवड्यात पुर्वांचलाबद्दलचे दोन चांगले लेख वाचनात आले.

पुर्वांचल हा भाग जरी भारताचाच असला तरी जरासा उपेक्षीत आहे. भारतातील इतर भागात रहाणा-या अनेकांना (माझ्यासकट) फारच थोडी माहिती असते. याभागातिल भौगोलीक, राजकीय आणि सामाजीक परिस्थीतीविषयी फारच त्रोटक माहिती आहे.

हया दोन्ही लेखातील काही भाग आणि त्यांच्या लिंक येथे ठेवत आहे.

या भागाबद्दल आलेल्या दोन लेखांमुळे अजून माहिती मिळवायची जिज्ञासा जागृत झाली. या विषयाबद्दल माहिती असण्या-यांनी यावर आपली मते/ माहिती ठेवुन इतरांना update करावे.

ह्या भागात अनेक स्वयंसेवी संस्था काम करीत असतात. त्यांच्या माध्यमातुन थोडीफार (खरेतर थोडीच) माहिती मिळत असते. अश्या संस्थांच्या कामाविषयी माहितीसुध्दा द्यावी ही अशी अपेक्षा आहे..

सुनील देवधर मेघालयात सात वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यानंतर या निसर्गसुंदर पण दुर्लक्षित राज्यांबद्दल त्यांनी महाराष्ट्रभर दीड हजारावर भाषणं दिली. त्यांच्या पुढाकारानं २००५मध्ये स्थापन झालेली 'माय होम इंडिया' ही स्वयंसेवी संस्था ईशान्येशी असणारा अपुरा संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. देवधर या खास लेखमालेत ईशान्येतील आठ राज्यांचे आजवर न झालेले दर्शन घडवत आहेत...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दुराव्याच्या दरीतले देखणेपण!
(हा लेख ३ जानेवारीच्या म.टा. मधे आला होता.)

घरातला देव्हारा ईशान्येकडे असावा, असे वास्तुशास्त्र सांगते. ईशान्य भारताचा विचार करता हा संकेत यथार्थ वाटतो. या भागावर निसर्गाने केलेली संपत्तीची उधळण पाहता येथे नारायणाच्या जोडीला लक्ष्मीचाही वास असल्याचे दिसते. सुरुवातीपासूनच या भागाचे महत्त्व ब्रिटिशांच्या लक्षात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात उभ्या भारतावर व्हाईसरॉयचे नियंत्रण असायचे. पण ईशान्य भारत याला अपवाद होता. इंग्रजांच्या काळात ईशान्य भारत 'आसाम इलाका' म्हणून ओळखला जाई. आजच्या अरुणाचल प्रदेशाचा यात समावेश नव्हता. 'नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' या नावाने तो ओळखला जाई. भारताच्या राजकीय नकाशात सध्या हा भाग आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा व सिक्कीम म्हणून ओळखला जातो. 'क्राऊन कॉलनी' असे नामकरण करून इंग्रजांनी याचे नियंत्रण थेट राणी व्हिक्टोरिया यांचे हाती ठेवले. याच काळात शिलाँग सारखे हिल स्टेशन विकसित करण्यात आले. अत्यंत सुंदर पण डोंगराळ असल्याने दुर्गम झालेल्या शिलाँगमधील आखीव-रेखीव रस्ते पाहिले की ब्रिटीशांच्या पीडब्ल्यूडीला मनोमन नमन करावेसे वाटते. ब्रिटीश शिलाँगच्या इतके प्रेमात होते की त्यांनीच शिलाँगचे 'स्कॉटलंड ऑफ ईस्ट' असे नामकरण केले. इथले सौंदर्य हे ईशान्य भारतावर असलेल्या प्रेमाचे एकमेव कारण नव्हते. म्यानमार, चीन (तेव्हाचा तिबेट) या देशांशी भिडलेल्या या भागाचे सामरिक महत्त्व त्यांच्या लक्षात आले होते. दुदैर्वाने, ब्रिटिशांची दूरदृष्टी आपल्या नेत्यांना अभावानेच असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिली काही दशके ईशान्येच्या वाटेला उपेक्षाच झाली. ही उपेक्षा इतकी भयंकर होती की शत्रूची या भागावर विखारी नजर पडलेली आहे, याचा आपल्याला चिनी आक्रमण होईपर्यंत पत्ताही नव्हता.

निवडक भाग- २
विविधता म्हणजे काय 'भानगड' असते हे अनुभवायचे असेल तर ईशान्य भारताला एकदा अवश्य भेट द्यायला हवी. १८० हून अधिक जनजाती, तितक्याच भाषा व वेशभूषा. बोली भाषांची संख्या हजारांहून अधिक. काही जमातींची एकूण लोकसंख्या तर पाच हजारांहून कमी. स्वाभाविकच त्यांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व नगण्य. त्यांच्या हक्कांबाबत बोलणारा कोणी नसतो. बहुसंख्याक जमातीच्या नेत्यांकडे राज्याची सूत्रे असल्यामुळे अल्पसंख्य जमातींना चेपले जाते. मेघालयाचा मुख्यमंत्री नेहमीच 'खासी' जनजातीचा. 'गारो' जमातीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. स्वाभाविकच गारो हिल्स पेक्षा खासी जयंतिया हिल्सचा विकास लवकर होतो. यातून मग आयडेन्टिटी क्रायसिस निर्माण होतो. काबीर्, बोडो, डिमासासारख्या छोट्या जनजाती देखील अस्तिव टिकवण्यासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करतात.

'पूर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याच्या बांगलादेशाच्या निमिर्तीमुळे स्वातंत्र्यप्राप्तीबरोबरच ईशान्य भारत एकाकी पडला. आठ राज्यांचा हा समूह ३५ ते ८० किलोमीटर इतक्याच चिंचोळ्या भौगोलिक पट्टीने उर्वरित भारताशी जोडला गेलाय. चिकन नेक हे नाव या जोडपट्टीला यथार्थ वाटतं. भारताची ९६ टक्के आंतरराष्ट्रीय सीमा ईशान्य भारताला लाभली आहे. २लाख ६२हजार १८९ चौरस किलोमीटर लांबीच्या भूतान, चीन, म्यानमार व बांगलादेश या चार देशांना भिडलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेमुळे इथे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 'अरुणाचल'वर चीनचा डोळा, म्यानमार सीमेवर होणारी ड्रग्ज व शस्त्रास्त्रांची तस्करी जशी धोकादायक आहे तशीच बांगलादेशामधून होणारी घुसखोरीही. भूतानमधील दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प भारताच्या दट्ट्यामुळे बंद झालेत हीच काय ती समाधानाची बाब. युरेनियमसंपन्न असलेला हा भाग भारतापासून तोडण्यात अमेरिकेलाही रस आहे.

निवडक भाग- 3
परंपरागत संस्कार टिकवलेल्या जनजातींमध्ये जिथे आजही महिलेला नुसता सन्मानच नाही तर समान दर्जाची वागणूक आहे, देशभर असणारी उतरंडीची जातिव्यवस्था नावालाही नाही. लोकांच्या गरजा कमी आहेत. असा सुंदर निसर्ग व स्वच्छ मनाच्या लोकांचा हा प्रदेश खरोखरच सर्व दृष्टींनी देखणा आहे. तो टिकवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये प्रत्येक भारतीयाने आपला वाटा उचलणं देशाच्याच भल्याचे आहे.
............................................................................................................
हा संपुर्ण लेख येथे वाचा.

समाजजीवनमानभूगोलप्रकटनविचारलेखमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

हम्म विचार करण्याजोगे आहे खरच.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Apr 2013 - 6:18 pm | श्री गावसेना प्रमुख

बांग्लादेशी घुसखोरांबद्दल राजकारण सोडुन खरेच विचार कराण्याची गरज आहे,इकडे नक्षलवादी वर पाकीस्तानी अतिरेकी,अन तिकडे बांग्लादेशी घुसखोर ...

पैसा's picture

14 Apr 2013 - 11:18 pm | पैसा

उत्तम लिंकबद्दल आणि अपरिचित भारताच्या चांगल्या ओळखीबद्दल धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2013 - 5:15 am | श्रीरंग_जोशी

ईशान्येच्या राज्यांबरोबर उर्वरीत भारतातील लोकांचे अधिक संबंध येणे ही काळाची गरज आहे.

याच विषयावर जागृती करण्यासाठी व्याख्याने देत फिरणार्‍या श्री रविंद्र आपटे यांचे व्याख्यान ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी गेल्या वर्षी मिळाली होती.