आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
1 May 2008 - 12:43 am

" ए ऊठ ए... बघ .. आनंद जिंकला... "
... सकाळी सकाळी विश्वेश हातात टाईम्स नाचवत ओरडत होता.... बातमी वाचताच मीही नाचू लागलो....सालं गेलं महिनाभर ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते घडलं होतं...आनंदने कास्पारोवला हरवलं होतं...

सप्टेंबर १९९५ मध्ये वर्ल्ड नंबर वन होण्यासाठी आनंद कास्पारोव्हच्या लढती चालू होत्या...फिडे मधून फुटून कास्पारोव्हने स्वतःची प्रोफेशनल चेस असोसिएशन काढली होती आणि न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये ही लढत चालू होती... बेस्ट ऑफ २० मॅचेस ... कास्पारोव्ह एकदम जोरात होता....अजिबात म्हणजे अजिबात हरायचा नाही कुठेही...
आणि उत्तम खेळाडू असण्याबरोबरच दबावतंत्रात फार वाकबगार होता ... म्हणजे मॅच सुरू होण्या आधी प्रेशर आणणारी स्टेटमेंट्स देणे वगैरे ....
१९९३च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल आधीच कास्पारोव्ह म्हणाला होता, " माय नेक्स्ट अपोनंट विल बी नाय्जेल शॉर्ट , अँड मॅच विल बी व्हेरी शॉर्ट..".... आणि फायनल ला त्याने शॉर्टला आरामात हरवलं होतं...( बहुतेक १२.५ - ७.५ असं)
...
मी तेव्हा डेन्टिस्ट्रीच्या तिसर्‍या वर्षात होतो...
विश्वेशची आणि माझी पैज लागली होती , तो म्हणाला होता, कास्पारोव्ह आनंदचा धुव्वा उडवणार....मी म्हणत होतो, आनंद टफ फाईट देणार्...आम्ही हॉस्टेलमध्ये रूममेट होतो...डीडी वर मॅचेस होत्या पण आम्ही रूमवर टीव्ही बाळगून नव्हतो...रोज टाईम्समध्ये येणारी बातमी आणि रघुनंदन गोखले यांचे परीक्षण यावरच आमची भिस्त होती...
पहिल्या आठ मॅचेस ड्रॉ झाल्या होत्या .... तसं आश्चर्यच होतं... कास्पारोव्ह इतका वेळ प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेण्यात वाया घालवत नाही... इतका वेळ खडाखडी झाल्यावर चक्क नववा गेम आनंद जिन्कला होता....
आनंद ५ गुण कस्पारोव्ह ४ गुण..... आनंद आघाडीवरती....दिवसभर खुशीत फिरलो भरपूर.....

आज नेटवर फिरता फिरता भटकंतीत यूट्यूबवरती आनंदचा हाच तो नववा गेम आणि त्याचं ऍनलिसिस सापडलं.... (कॉमेंट्री जरा भडक ओवरेक्सायटिंग आहे, पण गंमत आहे....)
कास्पारोव्हचे दबावतंत्र, स्टाईल्स, मध्येच उठून जाणे, ऍक्टिंग आणि त्या तुलनेत आनंदचे शांत, काहीसे नवखे हावभाव बरेच सांगून जातात... मॅच हारल्यानंतर तर कास्पारोव्हचे अस्वस्थ होणे आणि आनंदचे मनःपूर्वक शांत राहणे पाहून फार बरे वाटले...

http://www.youtube.com/watch?v=FutTQZfFDuI नवव्या गेमचा हा भाग एक

http://www.youtube.com/watch?v=nrkh9zCAWSo नवव्या गेमचा हा भाग दोन

मात्र आमचा आनंद फार काळ टिकला नाही... दुसर्‍याच दिवशी कळले की कास्पारोव्हने दहाव्या गेममध्ये पांढर्‍या मोहर्‍यानी आनंदला हरवले.... डिवचला गेलेल्या कास्पारोव्हने तो गेम अगदी खुन्नसने खेळला होता, आणि आनंदला काहीही संधी दिली नव्हती... मला आठवतेय रघुनंदन गोखले यांनी त्यांच्या परीक्षणात लिहिले होते की ही सेट द बोर्ड ऑन फायर...( हा दहावा गेमही यूट्यूबवर सापडतो दोन भागात).... मग अकरावाही जिंकला.... बाराव्या गेममध्ये कास्पारोव्ह जिन्कायचाच पण आनंद कसाबसा निसटला... ड्रॉ झाला...आनंद मग तेरावाही हरला आणि पुढच्या सगळ्या ड्रॉ होत गेल्या... आनंद हरला ती मॅच पण काय फाईट दिली त्याने....

मला आधी चेसमधले पीसेस आणि त्यांचे चलन सोडता फारसे कळत नव्हते पण १९९५ च्या त्या सप्टेंबरपासून मला चेसचा बराच नाद लागला, ( चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे, गेम सुरू होण्या आधी कास्पारोव्हची सर्व पीसेसना हात लावून नीट ठेवायची स्टाईल मारणे..असे बराच काळ चालले)...पुढचे सहा महिने माझ्या डोक्यावर हे भूत स्वार होतं... म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं....

या यूट्यूबने त्या धमाल दिवसांची आठवण करून दिली ....... आता विश्वेशला कळवायला हवी ती यूट्यूबची लिन्क... उद्या सकाळीच फोन करतो.
इथे कोणाला आठवताहेत का ते दिवस?

क्रीडाप्रकटनविचारआस्वादमाध्यमवेधअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

1 May 2008 - 1:33 am | चतुरंग

आमच्या लाडक्या खेळालाच हात घातलात की तुम्ही!;) धन्यवाद!

हो मला ते दिवस चांगले आठवतात. आनंद हरला पण त्याआधी त्याने कास्पारोवच्या बालेकिल्ल्यात घुसून त्याला हिसका दाखवला होता!
नंतर त्याचा अनुभव थोडा कमी पडला पण माझ्यासारख्या अनेक सामान्य भारतीयांच्या आशा त्याने पल्लवित केल्या हे खरे.

त्यानंतरच्या पुढल्या १० वर्षात आपल्याकडे बाल खेळाडूंची फौज तयार झाली. सध्या महाराष्ट्र, आंध्र इथले खेळाडू बरीच प्रगती करीत आहेत ह्याचे फार मोठे श्रेय आनंदला द्यायला हवे. आणि आता तर तो जगज्जेता आहेच. १९९७ पासून सातत्याने जगातल्या पहिल्या तीन खेळाडूत गणना होणे म्हणजे खायची गोष्ट नाही!:)

(अवांतर - आनंद बरोबरच माझा दुसरा आवडता खेळाडू मिखाईल ताल आहे. तो फार काळ जगज्जेता वगैरे नव्हता पण विलक्षण प्रतिभावंत होता. त्याच्या डावातल्या एकेक बलिदानांनी चक्रावून जायला होते. ८ ते १० खेळ्यांनंतर पटावर काय स्थिती असेल ह्याचा तो अचून अंदाज करु शके! त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

1 May 2008 - 1:46 am | भडकमकर मास्तर

त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.)
अरे बापरे...
मस्तच..लिहा लिहा ...या गेमबद्दलपण लिहा...

मन's picture

1 May 2008 - 1:35 am | मन

>>म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं....
द्या टाळी! एकाच माळेचे दिसतोय आपण.
अगदि गोखल्यांचे आर्टिकल्स वाचण्यापासुन ते आनंदवर पैज लावे पर्यंत!
म्या पामराकडे "बुद्धी" आणि "बळ" दोन्हीचा अभाव्!पण उत्साहाचा नाही.
गोखल्यांचे बरेच गेम्स वाचलेत.

सर्वात भन्नाट म्हणजे अगदि नवखा असताना कास्परोव ने आंतर राष्ट्रिय स्पर्धेत थेट तत्कालीन प्रथित यश
ग्रँड मास्टरला(बहुदा अनातोली कार्पोवच असावा तो.साल १९८५ च्या आस पास कधि तरी.) कसे चित पट केले ,ते पाहिलं तर मजा येइल.
पण आनंदने तो चेस चा विश्व चषक जिंकल्यापासुन आपण बेहद्द खुश आहोत.
अवांतरः- ज्या स्पर्धेत आनंद जगज्जेता झाला, त्यात टोपोलाव ला सामिल करण्यात आले नाही,ते कोणत्या निकषाखाली तेच कळले नाही.
नाही तर आणखिन जोर दार लढती बघाय्ला मिळाल्या असत्या.
निदान क्रॅमनिक पेक्षा तरी तो आनंद साठी "धोकादायक" सिद्ध झालाय.

अवांतरः-
आपण चेस्.कॉम चे सभासद आहात काय?

मन's picture

1 May 2008 - 1:59 am | मन

बरेचसे अभ्यासक सार्वकालिक सर्व श्रेष्ठ खेळाडु बॉबी फिशर ला मानतात ,असे वाचले आहे.
सलग काही काळ त्याचे एलो २७८० च्या आसपास होते.(ratings inflation गृहित धरले, तर हे सर्वाधिक आहे.)
पण त्याच्या खेळणे एका एकी बंद का झाले तेही कळत नाहिये.
आणि वेग वेगळ्या काळातील खेळाडुंची तुलना कशी काय करता येते तेही सम्जत नाहिये,कारण एलो पॉइंट्स तर
शेवटी "काल सापेक्ष" असतात.
म्हणजे त्या त्या काळातील ईतर प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही किती दण्क्यात हरवता ,यावर ते अवलम्बुन असतील्,
तर कार्किर्दीत साधारण २ दशक फरक असणार्‍या खेळाडुंची तुलना कशी काय करता येइल?
(कारण एवढ्या कालावधित बहुतांश प्रतिस्पर्धी बदललेले असातील )

रामदास's picture

3 May 2008 - 9:01 pm | रामदास

पण त्याच्या खेळणे एका एकी बंद का झाले तेही कळत नाहिये>
विस -एक वर्ष गायबचं झाला.
नंतर एकदा उगवला , परत गायब.
या वर्षी जानेवारीत कायमचा गेला.(आइस लँड मध्ये जिथे तो २००५ पासून राह्यला गेला होता.)

भडकमकर मास्तर's picture

1 May 2008 - 2:03 am | भडकमकर मास्तर

द्या टाळी! एकाच माळेचे दिसतोय आपण.
अगदि गोखल्यांचे आर्टिकल्स वाचण्यापासुन ते आनंदवर पैज लावे पर्यंत!

घ्या हो टाळी...मस्तच...
आपण चेस्.कॉम चे सभासद आहात काय?

होतो अशाच एका साईटचा मेम्बर मी..पूर्वी..आता जात नाही ..( घरी ब्रॊडबॆंड घेतल्यानंतर मला एकदा हे सापडले आणि मी त्यात ओळीने दोन रात्री रात्रभर चेस खेळत बसलो होतो...अट्टल जुगार्‍यासारखे झाले...पुढची मॅच तरी जिन्कू असे म्हणत म्हणत दोन्ही वेळा पहाट झाली...असल्या प्रकारांचा माझा फ़ार अतिरेक होतो अशा मी घरून नेहमी शिव्या खातो...)

चतुरंग's picture

1 May 2008 - 2:13 am | चतुरंग

शेवटी 'उजाडलं' म्हणा की!;) (एकदम ह.घ्या.);)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

1 May 2008 - 2:18 am | भडकमकर मास्तर

=)) =)) =))

अभिज्ञ's picture

1 May 2008 - 2:35 am | अभिज्ञ

चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे,
वगैरे प्रकार आम्ही अभियांत्रिकीच्या दुस-या/तिस-या वर्षाला असताना केले होते. निव्वळ वेडा झालो होतो अशाने.झपाटलेलाच म्हणा हवे तर.रात्रंदिवस डोक्यात बुद्धिबळाच्याच चाली येत रहायच्या.
आमचा आणिक एक उदयोग म्हणजे रविवार टाईम्स ~ओफ इंडिया मधला
प्रवीण ठिपसे ह्यांनि दिलेला बुद्धिबळातला डाव सोडवणे. तो हि एक नाद लागला होता.
ते सदर बहुतेक अजुनहि चालु आहे.(पण आमचा हा नाद सुटून बरीच वर्षे झालि आता.)

भडकमकर ,आपण दिलेल्या दुव्यांबद्दल धन्यवाद.

चतुरंगजी,
त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.

वा वा!
तुम्ही तो "डाव" लिहाच आता लवकर.
निश्चितच वाचायला आवडेल.

अबब

http://www.india-today.com/itoday/06101997/sport.html
१९९७ च्या इन्डिया टूडेतला लेख आहे हा...

यात आनंद आपण १९९५ मध्ये का हरलो याचं विश्लेषण करतो..हा एक उत्तम लेख आहे... (यात आनंदची अभ्यासाची पद्धत लिहिली आहे, त्याच्या अचाट मेमरीची टेस्ट घेतलेली आहे... वाचनीय)

रामदास's picture

1 May 2008 - 8:03 am | रामदास

मिपा वर समानधर्मा भेटल्याचा आनंद आज झाला.
फिशरच्या गेमची आठवण झाली.
टाइम मशीन मध्ये बसून परत ३५ वर्षं मागे गेलो.आठवणीनी चष्म्यावर धुकं दाटलं.
अमेरीकन स्वातंत्र्यवाद आणि रशिअन दडपशाही यांच्यातली लढत आठवली.
हा लेख एक सुन्दर ओपनींग आहे. चला पटाच्या मध्यावर जाउ या.
कालोह्यपी निरवधी विपुला च प्रुथ्वी. कोपी अस्ती मम समानधर्मा.
(चूका दुरुस्त कराव्या. न्यून ते पुरते करावे.)

भडकमकर मास्तर's picture

1 May 2008 - 3:18 pm | भडकमकर मास्तर

हा लेख एक सुन्दर ओपनींग आहे. चला पटाच्या मध्यावर जाउ या.

काय बोललात ... =D> +१

स्वाती दिनेश's picture

1 May 2008 - 2:06 pm | स्वाती दिनेश

आनंद वरचा लेख आवडला,
चतुरंगजी, तुमच्या लेखाची फार वाट पहायला लावू नका,लवकर लिहा,वाचायला उत्सुक :)
स्वाती

विसोबा खेचर's picture

1 May 2008 - 5:37 pm | विसोबा खेचर

वा वा! बुद्धीबळ हा आमचाही अत्यंत आवडता खेळ आहे. भडकमकरांनी दिलेले दोन्ही दुवे छान आहेत...

आपला,
(बुद्धीबळप्रेमी व कास्पारावभक्त!) तात्या.

मन's picture

1 May 2008 - 5:46 pm | मन

अहो वाचता काय?
पहिली मूव खेळली आहे ना आता?
आता टाका की ई५ (किंवा तुम्हाला योग्य वाटेल ती मूव)
येउ द्यात पुढला लेख्.आमचंही तेवढचं शिकणं होइल.