सिगरेट ओढणारे कधीही सिगरेट सोडत नाहीत..अॅट एनी कॉस्ट..
उगीच चारपाच अपवाद दाखवायचे वादासाठी....पण ते काही खरं नाही..
माझे बाबा सुद्धा तसेच..एकदा हार्ट अटॅक येऊन गेला..जिवावर बेतलं..कोणताही झुरका तुमचा शेवटचा ठरू शकतो इतकं स्पष्ट कार्डिओलॉजिस्टकडून ऐकल्यानंतर सुद्धा..
त्यांना जेव्हा बेड रेस्ट दिली होती आणि सिगरेट आणायला जाणं शक्य नव्हतं तेव्हा ते इतके हतबल झाले होते की त्यांनी तंबाखूची पुडी कुठूनशी (बहुतेक आजोबांकडून) मिळवली आणि चोरून ती चघळताना मी त्यांना पाहिलं..शाळकरी पोरगा होतो मी.. धक्का तर बसलाच बघून पण दयाच जास्त आली मला त्यांची..
मग नंतर त्यांची स्ट्रेस टेस्ट घेणार्या डॉक्टर मित्रानंच त्यांच्यासमोर सिगरेट धरली..आणि ते सगळं परत सुरु झालं..
माझ्या विनवण्या...
आपल्या लहान मुलाचं ऐकायचं असं ठरवून अनेकदा त्यांनी प्रयत्न केला.
त्या त्या क्षणी मनापासून गहिवरून येऊन "बेटा ही बघ मी सिगरेट सोडली" असं म्हणून "पाकीट फेकून देण्याचा" सीन झाला..
पण नाही..
पोराचं प्रेम..त्याला दिलेलं वचन..मृत्यूची भीती सुद्धा ते व्यसन थांबवू शकली नाही..
हार्ट अटॅक चालू असतानाही त्यांना सिगरेट हवी होती..
लगेच फार कालापव्यय न करता दुसरा अटॅक आला.. त्रेचाळीसच्या वयातच..त्यांना घेऊनच गेला..
बाबा जाताना फोर स्क्वेअरचं पाकीट मात्र न्यायला विसरले..
..नंतर त्यांच्या कपाटात राहिलेलं ते पाकीट खूप काळ दरवळायचं..मृत्यूचा वास..
..
नंतर मी थोडा मोठा झालो..
मग माझा काका..बाबांचाच छोटा भाऊ..
शेवटचे आठ दहा दिवस राहिले होते त्याचे..पंचेचाळीस वर्षाच्या पुरूषाचं वजन वीस किलो राहिलं होतं..
त्याला उचलून रिक्षात घालून मी घेऊन चाललो होतो..खूप महिन्यांनी तो घराबाहेर आला होता..आवाज खोल जाऊन घशात अडकून बसला होता..फुप्फुसाचा भाता क्षीणपणे हलत होता..खोकल्याची उबळही क्षीण झाली होती..
त्याने खूप वेळ खाणाखुणा करून मला सांगितलं..जणू शेवटची इच्छा..
"..जरा बाजूला थांब..मला प्लीज सिगरेट दे एक.."
त्याला दुसरी काही इच्छा राहिली नव्हती..
........
मी नाही दिली..
......
तीन दिवसांत तो ही गेला..
......
इतकं सगळं होऊन, बघूनही स्वतः तरुण होईपर्यंत काळाच्या वेगाने सगळे विचार मागे पडले आणि त्या स्टाईलच्या आकर्षणाने पाऊल पुढे टाकलं. कधीतरी उत्सुकता म्हणून एक ५५५ चं पाकीट आणलं..
ठसकत ठसकत बळजबरीनं थोडे झुरके घेतले..असह्य ठसका लागत होता..
मग जरा प्रॅकटीस झाली..
नंतर लक्षात आलं की यात खूप स्टाईल आहे.. फक्त सुरुवातीला...
मग ती एक प्रतिक्षिप्त क्रिया बनते..
माणूस ठरवून सिगरेट ओढत नाही...
त्याचा हात खिशात जातो..सिगरेट ओठांत येते..पेटते..धूर आत जातो..सिगरेट संपते..पायाखाली जाते..आणि तरीही त्या ओढणार्याला "जाणीवच" नसते की आपण सिगरेट ओढली..
गाडीचे गिअर टाकताना असते का जाणीव की "आपण आता तिसरा गिअर टाकला.."
श्वास घेताना असते का जाणीव की श्वास घेतला..
सिगरेट ही नुसती सवय, वाईट सवय किंवा व्यसन नाहीच आहे मुळी...
ती हळूहळू श्वासच बनून जाते..
रक्तात जाते ती..
कायमची..
बाकी केमिकल माहिती इथे काय करायची..?
रक्तात जाते.. बस..
हे उमजून मी घाबरलो..
बाबांची ट्रॅजेडीही इतक्या वर्षांनी लक्षात आली..
उरलेलं ५५५ चं पाकीट मग पडून राहिलं.. दमट होऊन गेलं..
.........
खूप खूप वर्षं त्यानंतरही झाली...
आता ऑफिसातला मित्र सिगरेट ओढताना दिसतो..अनेकदा सोडताना दिसतो..
सासरेबुवांना मी म्हणतो..सिगरेट सोडा..
कोणी बाजूला सिगरेट ओढत असला की मी विझवायला लावतो..
त्या सर्वांना मी कटकट्या वाटतो..
त्यांची सिगारेट जळत असते..ती मला दिसते..
बाजूला उभा मी जळत असतो ते त्यांना दिसत नाही..
....
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 1:25 pm | यशोधरा
ह्म्म...
5 Jan 2011 - 1:30 pm | मृत्युन्जय
छान लिहिले आहे गवि. आगतिकता पटली
5 Jan 2011 - 1:39 pm | छोटा डॉन
लेख मनापासुन आवडला.
ह्याहुन अधिक काही बोलण्यासारखे रहात नाही :)
- छोटा डॉन
5 Jan 2011 - 1:44 pm | नगरीनिरंजन
अगदी असेच म्हणतो.
5 Jan 2011 - 2:28 pm | खादाड अमिता
शब्दच उरले नाहि
5 Jan 2011 - 1:49 pm | निनाद
अगदी मनातून आलेले लेखन. खूप आवडले, भीडले.
5 Jan 2011 - 1:55 pm | स्वाती दिनेश
लेख मनापासून, आतून लिहिलेला आहे ते वाचताना जाणवत होते, लेख आवडला.
स्वाती
5 Jan 2011 - 5:38 pm | नंदन
--- अगदी असेच म्हणतो. प्रकटन आवडले.
5 Jan 2011 - 2:09 pm | पारा
लिखाण सुंदरच. अगदी जाणवून गेलं
5 Jan 2011 - 2:20 pm | स्मिता.
लेख खूप छान वाटला. शब्दन् शब्द मनापासून कळकळीने आल्याचं जाणवतंय.
5 Jan 2011 - 2:21 pm | विजुभाऊ
चांगलं लिहीले आहे.
सिगरेटच काय पण माणसाला इतरही बरेच गुण व्यसनी बनवतात.
माझे वडील मावा ( गुटखा) खायचे. न मिळाल्यास ते खूप अस्वस्थ व्हायचे. चिडायचे. काहीही कारण नसताना घरातले वातावरण तापत जायचे.
मुलांवर त्याचा परीणाम काय होतो ते व्यसनी माणसाला समजत नाही
6 Jan 2011 - 8:45 am | शिल्पा ब
बरोबर आहे...कोणत्याही व्यसनाने हीच अवस्था होते.
लेख आवडला. मनापासुन लिहिलाय हे जाणवते.
5 Jan 2011 - 2:21 pm | पाषाणभेद
सुंदर लेख
5 Jan 2011 - 2:41 pm | प्यारे१
आधी लेखाचे नाव वाचले.
.
.
लेख वाचायला घेतला.
.
.
लेख वाचता वाचता क्लिक झालं
.
.
लेखकाचं नाव वर जाऊन नीट वाचलं
.
.
अपेक्षा पूर्ण.
छानच.
नेहमीसारखेच.
5 Jan 2011 - 2:52 pm | बिपिन कार्यकर्ते
बोलायला जागाच नाही!
माझेही काही मित्र आहेत. काही अगदी तरूण वयातले, काही प्रौढ. काही सडेफटिंग, काही बालबच्चेवाले. प्रत्येकाला सांगतो सिगारेट ओढू नका. अगदी त्याच्या पोटच्या पोराची आठवण करून देतो. अजून पर्यंत तरी उपयोग झालेला नाही. पण एक ना एक दिवस उपयोग होईल या आशेने सांगत राहतो. मित्र मात्र ते सगळं हसण्यावारी नेतो, हातातून सिगरेट खेचून घेतली तर दुसरी काढतो, हातातून पाकिट खेचलं तर शांतपणे दुसर्या खिशातून किंवा बॅगेतून दुसरं पाकिट काढतो.
5 Jan 2011 - 5:31 pm | असुर
माझ्या दोन मित्रांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक! बिकांनी दोघांचेही नाव न घेता वर्णन केलेच आहे. मी वेगळे सांगायची गरज नाही!
बिका, त्या वेड्याला समजवा तुम्हीच काहीतरी! तुमचं ऐकलं तर ऐकेल कदाचित!!!
--असुर
5 Jan 2011 - 2:55 pm | गणपा
फार सुरेख गवी.
5 Jan 2011 - 3:02 pm | डावखुरा
गगनविहारी
मस्त ..अगदी आतुन आलेले लिखाण ...
एक जाहिरात आठ्वते..
त्यात एका चहाच्या टपरीवर एक आजोबा बसलेले असतात आणि एक तीस-पस्तीशीतील गृहस्थ असेल तो धुम्रपान करत असतो..
तर ते आजोबा बाजुच्या गाडीवरुन मिरचीची भजी आणुन त्याला खाउ घालतो..बळजब्री...
तो फुक्या वैतागतो...आणि आजोबांकडे त्रासिक नजरेने बघतो आणि काही बोलणार इतक्यात आजोबा त्याला म्हणतात...माझ्या ईच्छेविरुद्ध तु मला सिगरेट चा धुर दिलास आता माझ्याकडुन ही भजी घे..म्हणत अजुन एक भजी बळजब्री भरवतात,,,,
ही गांधीगिरी.....
5 Jan 2011 - 3:07 pm | स्वैर परी
गवि.. खुप सुंदर लिहिले आहे! अर्थातच नेहमीप्रमाणे!
माझ्या ही ऑफिसातल्या मित्रांना मी बरेचदा सिगरेट ओढु नका याबद्दल प्रवचन दिले! २ वर्षात त्यांची तब्येत किती खालावत गेली हे मी स्वत: पाहिले हि! परंतु कदाचित या अशा लोकाना समोरचा काय सांगत आहे, हे बहुदा समजुनच घ्यायचे नसते.
झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणार्याला जागे करता येत नाही हेच खरे!
5 Jan 2011 - 3:10 pm | ५० फक्त
गवि, अतिशय छान लिखाण.
आजपर्यंतच्या २०११ मध्ये मिपावर खुप छान लिखाण आले आहे, त्यात अजुन एकाची भर.
धन्यवाद.
5 Jan 2011 - 3:21 pm | सूर्यपुत्र
>>त्याचा हात खिशात जातो..सिगरेट ओठांत येते..पेटते..धूर आत जातो..सिगरेट संपते..पायाखाली जाते..आणि तरीही त्या ओढणार्याला "जाणीवच" नसते की आपण सिगरेट ओढली..
आत्त्ता सुद्धा असंच झालं.
मी मिपावर आलो. तुमचा लेख दिसला... त्यावर क्लिक केले... वाचन सुरू झाले... शब्द हॄदयापर्यंत आत गेले.... लेख संपला... फक्त पायाखाली न जाता खोल कोपर्यात गेला... वाचता-वाचता लेख कधी संपला याची "जाणीवच" झाली नाही. पण चटका मात्र लागला.....
5 Jan 2011 - 3:53 pm | मेघवेडा
अंतर्मुख करणार्या तुमच्या या लिखाणातून अगतिकता व्यवस्थित व्यक्त होते आहे.
छान.
5 Jan 2011 - 4:05 pm | मी ऋचा
सूपर्ब गवि!!
5 Jan 2011 - 4:09 pm | प्रसाद_डी
धन्यवाद गगनविहारी जी,
या लेखामुळे मी नव वर्षानीम्मीत्त केलेल्या संक्ल्पाला पुर्ण करायला नक्कीच मदत होणार आहे...
पून्ष्च धन्यवाद...
आणि हो ....
लेख छान आहे... वाचताना सगळ काही डोळ्या समोर घडते आहे असा आभास होत होता.
आप्रतीम..लेख .
5 Jan 2011 - 4:29 pm | समीरसूर
लेख छानच जमलाय. सिगारेट पिणार्याला दोन मिनिटे का होईना पण "सोडली आत्तापासून सिगारेट" असे वाटायला लावणारा लेख आहे. नेहमीच्या सिगारेटच्या धुराचा वास न दरवळता सिगारेट सोडण्याचा विचार मनात दरवळून जावा यातच लेखाचे यश आहे.
5 Jan 2011 - 4:51 pm | चिप्लुन्कर
मस्तच . तुमच्या या गोष्टीला मनात ठेऊन मी हि सिगरेट ओढणाऱ्या मित्रांना आता दमात घेणार आहे. ( चला नव्या वर्षी नवा संकल्प )
पण एकच शंका मनात येत आहे जर माझ्या भावाचे विडी तंबाखू चे दुकान असेल तर मी त्याच्या पोटावर पाय तर आणत नसेन ना.
पहिलीच प्रतिक्रिया आहे जरा सांभाळून घ्यावे हि विनंती
महा - ०८
चिपळूणकर
5 Jan 2011 - 5:02 pm | वारकरि रशियात
अतिशय परिणामकारक लेखन आणि अनुभव
अवांतर १) असं कोन करतय का राव?
२) विजुभाऊ, हे खरंच चिप्लुन्चे हैत का तुमचं गांववालं ? (जर्दा वालं...
5 Jan 2011 - 4:52 pm | प्रसन्न केसकर
चटका लावणारे लेखन. सिगरेट विरुद्ध बर्याच लोकांकडुन ऐकले, बर्याच लोकांनी लिहिलेले वाचले पण असा परिणाम कधीच जाणवला नाही.
5 Jan 2011 - 4:55 pm | स्पा
अतिशय सुंदर लेख गवि
माझे दोन तीन मित्र मजबूत सिगरेट फुकतात.. पण त्यांना काहीही झालेले नाही.. मस्त सणसणीत आहेत..
तसेच समोरच्या मजल्यावरचे आजोबा.. गेली ४० वर्ष ते पनामा ओढत आहेत, ते सुद्धा छान खुटखुटीत आहेत
त्यामुळे सिगारीटीने (जर आटोक्यात प्यायली तर )विशेष हानी होत असेल असे वाटत नाही...
5 Jan 2011 - 7:07 pm | अश्फाक
मित्रा अपवाद सगळी कडे असतात , आणि त्यांचे असने हे नियमाला मजबुती देते.
असो सिगारेट ओढल्याने शरिरावर वाईट परिणाम होतातच फक्त शरीर रचना आणि जेनेटिक पेटर्न मुळे
त्यांची तिव्र्ता कमी अधिक असु शकते .
डॉ.अश्फाक.
अवांतर = तसा मी लकिच माझ्या वडलांनी १५-१६ वर्षांची सिगरेट्ची सवय सोडली त्या घटनेला आता २० वर्ष होत आलेत.
5 Jan 2011 - 4:59 pm | पियुशा
लिखान शैलि अत्यन्त प्रभवि आहे !
5 Jan 2011 - 5:09 pm | रेवती
लेखन आवडले.
5 Jan 2011 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. धमाल मुलगा ह्यांची प्रतिक्रीया वाचण्यास उत्सुक आहे.
5 Jan 2011 - 7:22 pm | प्राजु
एक्झॅक्टली!!!!
माझ्या हेच आलं मनात एकदम.
लेख खूप तळमळीने लिहिलेला आहे.. खूप आवडला.
धम्या, कुठे आहे?
5 Jan 2011 - 11:17 pm | मी-सौरभ
झाली की नाही विडी फूकून???
5 Jan 2011 - 5:20 pm | मुलूखावेगळी
छान लिहिले आहे
भावना पोचल्या आहेत शब्दाशब्दातुन
5 Jan 2011 - 5:38 pm | आत्मशून्य
दीसत नाहीत तेच बरे आहे, एकदा त्यांना तूम्हाला जाळायचे व्यसन आवडू लागले तर ते सूध्दा सूटनार नाही.
वीशेषतः सिगारेट शीलगावून हे लोक पहीला झूरका घेतात तेव्हां त्यांचा डोळ्यात मला फार ऊर्मट भाव दीसतो जेव्हां मी वीचारले असे का होते तर मला सांगतात आरे तो ऊर्मटपणा नाही तर जी किक बसते त्यांमूळे बघणार्याला तसे वाटते... ह्या.......कैच्याकैच.......
मि सूध्दा जेव्हां मीत्रांना म्हणतो काय भेटते सीगारेट ओढून ? ते स्पष्टच बोलतात काहीच नाही, तूझे खरोखरच बरे आहे की तू असले काही करत नाहीस... पण ते बहूतेक फक्त तोंडावरच असते कारण साले स्वतः कधीच सिगारेट सोडत नाहीत... आणी हो जेव्हां मी बोलतो सोडा तर माझा वीचार फक्त हसून सोडून देतात....
5 Jan 2011 - 5:39 pm | प्रीत-मोहर
गवि अत्यंत प्रभाव्कारी लेखन ....मस्त...
5 Jan 2011 - 6:55 pm | sneharani
मस्त लेखन!
5 Jan 2011 - 6:58 pm | ज्ञानेश...
अतिशय सुरेख लेखन- अगदी खर्या अर्थाने 'जनातलं- मनातलं.'
फार आवडले.
5 Jan 2011 - 7:13 pm | चिगो
मी सिगरेट पीत नाही... आणि तुमचा लेख वाचल्यावर तर चान्सच नाही...
अतिशय प्रभावशाली लेख, गवि...
5 Jan 2011 - 7:15 pm | अप्पा जोगळेकर
अतिशय चांगला लेख गवि साहेब.
पण या निमित्ताने श्री. घासकडवी यांची याच विषयासंदर्भातील धाग्यावरची एक वेगळीच प्रतिक्रिया आठवली.
ते म्हणाले होते,"मधुमेह झालेल्या माणसाने खूप गोड खाउ नये हे मान्य. पण रोज एक चमचा साखर खायला हरकत नाही. तेवढीच गोडी राहते आयुष्यात."
5 Jan 2011 - 7:37 pm | गवि
Sorry to comment inbetween nice flow and discussion:
@Spa & Appa:
एकवेळ यातून कायमचे सुटलेले अपवाद दिसतील पण रोज फक्त एकच असा नियम करुन ओढणा-या एखाद्याचे तणावाच्या,निराशेच्या निमित्ताने अचानक एका रात्रीत वीस सिगरेट किंवा कालौघात हळूहळू डेली एक सिगरेट ते डेली एक पाकिट असे प्रमोशन झाले नाही असे उदाहरण पाहण्यात नाही.जेवणानंतर एक.मग दोन्ही जेवणानंतर एकेक,
मग प्रेशर येत नाही म्हणून उठताच एक.
मग प्रेशर आलं म्हणून एक..
5 Jan 2011 - 7:54 pm | सर्वसाक्षी
व्यसन सुटण्याबाबतीत आपण म्हणता ते खरे आहे. मात्र जे मनापासून सोडतात त्यांची सुटते हेही खरे. सुटत नाही याचे कारण त्या व्यक्तिने सोडायचे मनापासून ठरवलेले नसते. वास्तविक पणे सिगारेट ओढणार्याला एखाद दिवस वा काही दिवस ओढली नाही तरी अजिबात फरक पडत नाही पण एक चाळा म्हणुन ओढली जाते.
माझा अनुभव - आजकाल कचेर्या धुम्रपानास प्रतिकुल असल्याने आपोआप कमी होते. जर खिशात बाळगली नाही तर दिवसभरात अजिबात ओढली जात नाही कारण रोज कुणाकडे मागता येत नाही आणि तेवढ्यासाठी खाली उतरा, बाहेर जा , सिगारेट आणा, ओढा हेही नकोसे वाटते. गेले वर्षभर मी रोज संध्याकाळी कचेरीतुन बाहेर पडल्यावर एक सिगारेट ओढतो. मात्र काही विशिष्ठ दिवशी ओढत नाही. घरी कधीच नाही, मुळात मी सहसा एकाहून अधिक घेतच नाही. अपवाद बाहेरगावी जाताना. मात्र हेही खरे की घरच्यांबरोबर कुठे गेले असताना त्यांना चुकवुन काहीतरी काम काढुन त्यानिमिताने गुपचुप सिगारेट ओढायची वेळ येत नाही, किंबहुना सिगारेट नओढल्याची हुरहुर अजिबात जाणवत नाही.
मग रोज एक तरी का? उत्तर सरळ आहे. ओढाविशी वाटते म्हणुन.
न ओढणे उत्तम. जर पहिला झुरका घ्यायचा मोह आवरला तर पुढे कधीच धोका नाही.
5 Jan 2011 - 7:59 pm | अप्पा जोगळेकर
एकदम सही रीप्लाय आहे हा. आवडला. मी गेली तीन वर्ष दर शनिवारी आणि रविवारी सिगरेट पितो. वीकडेज मधे ट्चपण नाही करत.
5 Jan 2011 - 8:20 pm | कानडाऊ योगेशु
सिगारेट कधी पिऊ नये आणि दारू प्यायचीच असेल तर ती स्वतःच्या पैशाने कधीही पिऊ नये.व्यसन आटोक्यात राहते.
5 Jan 2011 - 8:38 pm | उल्हास
भावना सुंदररीत्या मांड्ल्या आहेत
5 Jan 2011 - 9:41 pm | दैत्य
खूप मनस्वी आणि उत्कट!
5 Jan 2011 - 9:58 pm | मुक्तसुनीत
लिखाण आवडले. ते धूम्रपानविरोधाविषयी कमी आणि अतिशय हळव्या कोपर्याबद्दल मुख्यत्वे आहे असे वाटले. हा हळवा कोपरा दाखवताना राखलेला पॉईझ हे या लेखाचे खरे शक्तीस्थान. आपल्यातल्या अशा वुईक पॉईंट्सकडे इतके तटस्थपणे पाहू शकणारे लिखाण विरळा.
सिगरेट न सुटण्याबद्दलचे मुद्दे पटले. एक रोचक गोष्ट सांगतो. अगदी गेल्या आठवड्यात एक स्मोकर मित्र सुटीनिमित्त राहायला आलेला होता. भर थंडीतसुद्धा , अगदी रात्री २ वाजता गप्पा रंगललेल्या असताना हा माणूस मागे डेकवर जाणार. मी सुद्धा गप्पा मारत गेलो. एका क्षणी राहावले नाही आणि गेली सुमारे वीस वर्षे ज्या गोष्टीला स्पर्श केला नव्हता त्या सिगरेटचा एक मोठ्ठा झुरका घेतला. वाफ आत कोंडली असतानाच्या जाणीवेने मन वीस वर्षे मागे गेले. कॉलेजचे दिवस. चुलतभावाने नाकातून धूर काढून दाखवल्यावर मी त्याला साष्टांग घालायचाच बाकी होतो. त्यानेच मग थोडी थोडी सवय लावली. कसलं अॅडव्हेंचर वाटलं होतं ! पण ते नाहीच टिकलं. गेलं ते. मात्र वीस वर्षांनंतर , भीषण थंडीत , आपल्या घराच्या मागे घेतलेला तो शेवटचा मोठ्ठा झुरका.... लिबरेटींग असते ती जाणीव. सार्वभौमत्व प्रस्थापित करणारी. बंधने झुगारणारी क्षणैक किक्.
आता जगलोवाचलो तर पुढचा झुरका वीस वर्षांनी.
5 Jan 2011 - 10:47 pm | शुचि
लेख टचिंग आहे. वाचून गलबलून आले.
5 Jan 2011 - 11:52 pm | वाटाड्या...
मुसु आणि साक्षी शेठ्शी सहमत...
मी सुद्धा लग्ना अगोदर सिगरेट प्यायचो म्हणजे प्यायचो...खंडीभर नाही तरी ओंजळभर तरी प्यायचो...पण आता २ - २ वर्ष सिगरेटकडे बघणंही होत नाही...
त्यामूळे मनावर ताबा आणि परिस्थीतीचं भान यामूळं विजय शक्य आहे..
- वा
6 Jan 2011 - 1:42 am | अर्धवटराव
आकाशी उडणार्या मालकांचा आणखी एक हृदयस्पर्शी लेख...
मी स्वतः सीगरेटचं व्यसन लाउन घ्यायचा खुप प्रयत्न केला. कित्येक मित्रांनी सांगीतल कि बाबारे स्मोकींग करत नाहिस तेच बरे, यु डोण्ट लूज एनि प्लेजर इफ यु डोण्ट स्मोक... पण मी नेटाने प्रयत्न केलेत. इन फॅक्ट गेली दोन वर्षे नव-वर्षाचा संकल्प असतो स्मोकींग सुरु करण्याचा. पण २-४ सिगरेटींपुढे आपली मजल जात नाहि. जी काहि सिगरेट पितो ति तोंडात धूर भरुन तसाच बाहेर फेकण्यासाठी... क्वचीतच "आत" वगैरे घेता येतो. मग उरलेलं पाकिट एखाद्या फुकाड्या मित्राला फुकट द्यावं लागतं :(
(फुकाड्यालक्षी) अर्धवटराव
6 Jan 2011 - 4:48 am | गोगोल
दिस आर्टिकल हिट्स क्लोज़ टू होम .. वेरी वेरी क्लोज़.
6 Jan 2011 - 8:58 am | शिल्पा ब
मी कुठेतरी वाचलंय कि मेंदूत oxytosin किंवा अजून कोणतेतरी हार्मोन्स कमी असतील तर या सवई ते स्त्राव उद्दीपित करण्यास मदत करतात आणि शांत (?) / बरे वाटते...कदाचीत म्हणुनच काही जण पाकीटावर पाकीट संपवतात आणि काहींना एकानेही फरक वाटतो.
6 Jan 2011 - 9:18 am | Pain
कमकुवत मनाचे हे लोक, त्यांचे सहानुभूतीदार आणि आजमावण्यास उत्सुक असलेले: खड्ड्यात का जाईनात...वाईट इतकेच की पॅसिव्ह स्मोकींगद्वारा जवळच्या लोकांनाही प्रसाद देऊन जातात.
धूम्रपान फक्त्त ठराविक कक्षांमधेच करू दिले पाहिजे म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही.
6 Jan 2011 - 10:32 am | आत्मशून्य
हा तर देश्द्रोहा इतका गंभीर गून्हा मानला गेला पाहीजे.
24 Oct 2013 - 3:52 pm | कपिलमुनी
छान मुक्तक आहे
24 Oct 2013 - 7:47 pm | दिपस्तंभ
आणि सर्वात सुंदर म्हणजे
मनाला भावले....