मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Jun 2010 - 11:27 am

मास्टर मदन
मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२)

२८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७.

अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया.

हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”. देवाने याच्या जन्मासाठी गाव सुध्दा कसे निवडले ते बघा. हे गाव सम्राट अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांपैकी एक, ज्याचे नाव अब्दूल रहीम खान-ई-खान, त्याने वसवले होते. हा स्वत: मुसलमान असून कृष्णभक्त होता आणि त्याने कृष्णावर बरीच पद्ये रचली होती. या माणसावर परत केव्हातरी मी लिहीनच. याची एक हकीकत सांगतात. हा दानधर्मासाठी बराच प्रसिध्द होता. पण त्याची दानधर्म करायची पध्दत विचित्र/वेगळी होती. तो दानधर्म करताना याचकाच्या नजरेस कधी नजर द्यायचा नाही. याची त्या वेळी नजर नेहमीच खाली झुकलेली असे. हे कळल्यावर कबीराने एक दोहा त्याच्यावरही लिहीला तो असा –
देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन.
सदासर्वकाळ देणारा खरा दुसराच कोणीतरी ( दिन रैन)
मी देतो असे वाटू नये म्हणून माझी नजर ही नेहमी झुकलेली असते. ( तासो निचे नैन).
असो. हे विषय निघाला म्हणून सांगितले.

ब्रिटीश राजवाटीत हे गाव लाकडावरील हस्तिदंताच्या कोरीव कामासाठी प्रसिध्द होते. याच गावात मदनचे आजोबा रामसींग यांनी आसरा घेतला. १९२८ साली त्या गावात त्यांनी एक छोटेसे घर बांधले त्याचे नाव त्यांनी ठेवले “मोहन निवास”. त्या गावातले बुजुर्गांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात त्या गावाच्या पंचक्रोशीतले अनेक कलाकार हजेरी लावत आणी मग मैफिली रंगत. हे काही दिवसाने बंद पडले कारण मदनच्या वडिलांनी म्हणजे सरदार अमरसिंग यांनी ते गाव सोडले आणि ते सिमल्याला स्थायीक झाले. त्यांना सिमल्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली आणि त्या कुटूंबाचा आपल्या गावाशी संपर्क तुटल्यातच जमा झाला. अमरसिंग हे स्वत: संगीताचे उत्तम जाणकार होते आणि पेटी आणि तबला उत्कृष्ट वाजवायचे. त्यांची पत्नी म्हणजे मदनची आई श्रीमती पुरणदेवी, या एक अत्यंत धार्मिक बाई होत्या आणि मदनवर झालेल्या धार्मिक संस्काराचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मदनला एक मोठा भाऊही होता त्याचे नाव मोहनसिंग. या दोघात जवळ जवळ १३ वर्षाचे अंतर होते. हाही स्वत: व्हायोलीन उत्तम वाजवायचा आणि उत्तम गायचा देखील. मदनला एक मोठी बहीण होती तिचे नाव होते शांतीदेवी. ही एक उत्तम गायिका होती आणि तिनेच मदनला त्याच्या दुसर्‍या वर्षापासून गाणे शिकवायला सुरवात केली. मदनला गळ्याची आणि गाणे समजण्याची दैवी देणगी असल्यामुळे त्याने गाण्यातील बारकावे लवकरच आत्मसात केले. त्यानंतर त्याची गाणे शिकण्यासाठी पंडीत अमरनाथ यांच्याकडे रवानगी करण्यात आली. भावाबरोबर गाण्याचा रियाज़ आणि शाळेतले शिक्षण चालूच होते. जरी शाळेत तो एक हुषार मुलगा म्हणून ओळखला जायचा तरी मदन हा काहीसा अबोल, कोणात न मिसळणारा मुलगा होता. त्याचा वेष चांगला असायचा आणि अंगावर क्वचित त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दागदागीने आणि डोक्यावर चमकणारी पगडीही असायची.

याच काळात प्रसिध्द गायक सैगल हे ही सिमल्यात रेमींग्ट्न टाईपराईटर कंपनीमधे नोकरीला होते आणि ते आपली पेटी घेऊन मोहनच्या घरी बर्‍याच वेळा भेट द्यायचे आणि मदनबरोबर ते दोघे मस्त मैफिल जमवायचे. अर्थात मदन त्यावेळी फक्त ऐकायचेच काम करायचा कारण त्याचे त्या वेळेस वय होते फक्त दोन. सैगलचे या घराशी स्नेहबंध चांगलेच जुळले होते. शांतीदेवींनी त्याच्या एका काल्का ते कलकत्ता या प्रवासाची आठवण सांगितली आहे, या प्रवासभर ते गातच होते आणि सहप्रवासी त्याचा आनंद लुटत होते. सैगल यांना लहानग्या मदनबद्दल ममत्व होते आणि त्यांना त्याच्या या गाण्याच्या दैवी देणगीचे फार कौतूक होते. सैगल यांनी न्यू-थिएटर्समधे कलकत्याला नोकरी पकडली तरी पण जेव्हा जेव्हा मास्टर मदन किंवा त्यांचे कुटुंबीय कलकत्याला येत, तेव्हा त्यांची काळजी सैगलच घेत.

रेडिओ आणि चित्रपटगृहांचा नुकताच जन्म झाला होता. जाहीर कार्यक्रम हाच जनसामान्यांसाठी संगीत ऐकण्याचा मार्ग होता. त्यामुळे अशा संभांना अलोट गर्दी होत असे. खाजगी मैफिलीही होत असत पण त्या संस्थानिकांकडे. त्यातल्या त्यात उत्तरेला पतियाळा संस्थान तर दक्षिणेला म्हैसूर संस्थान हे कलाकारांचे उदार आश्रयदाते होते.

मास्टर मदनचा पहिला जाहीर कार्यक्रम १९३० सालच्या जून महिन्यात धरमपूर सॅनेटोरियम मधे झाला. त्यावेळी त्याचे वय होते अवघे साडेतीन वर्षे. जे हजर होते ते त्याच्या गायनाने अवाक्‌ झाले. त्या वेळी त्याने ध्रूपदमधे “हे शारदा नमन करू.....” हे म्हटले होते. टाळ्यांच्या कडकडाटात हजर असलेल्या इतर कलाकारांनी या आवाजाचा आणि या जगाचा काही संबंध नाही असे जाहीर केले आणि असे काही आत्तापर्यंत ऐकले नव्हते असे नमूदही केले. या कार्यक्रमाची बातमी एखाद्या वणव्यासारखी भारतात पसरली आणि या कार्यक्रमाला त्या वेळेच्या सर्व वर्तमानपत्रातही जोरदार प्रसिध्दी मिळाली. दुरवरच्या मद्रासच्या हिंदूमधे देखील त्याचे छायाचित्र छापून आले. एका रात्रीत मास्टर मदन किर्तीच्या शिखरावर पोहोचला आणि त्याला सगळीकडून कार्यक्रमासाठी बोलावणे येऊ लागले. सिमला तर त्याचे गावच होते आणि तिथल्या संस्थानिकाचा तो लाडका गायक झाला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो एका महिन्यात सरासरी वीस कार्यक्रम करु लागला. त्या काळात त्याच्या भावाला व्हायोलीनच्या साथीसाठी ऐंशी रुपये तर त्याला २५० रुपये मिळायचे. पण मास्टर मदन हा पैशासाठी गात होता असे ना त्याचे टिकाकार म्हणत ना त्याचे मित्र म्हणत. तो गात असे कारण गाणे ही त्याची आता मानसीक गरज बनली होती. त्यातच त्याला खरा आनंद मिळायचा.

भारतातल्या घरादारात मास्टर मदनचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. जगातले आश्चर्य म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मैथिली शरण गुप्तांनी त्यांच्या भारत भारती मधेही त्याचा उल्लेखही केलेला आपल्याला आढळेल. मास्टर मदनची त्याच्या गुरूंवर (संत नंदसिंगजी महाराज) आतोनात श्रध्दा होती. या गुरूंनी म्हणे त्याच्या अकाली मृत्यूचे भाकित करुन ठेवले होते. खर खोटे माहीत नाही, एकदा या गुरुंच्या उपस्थितीत त्याने जोनपूरी राग इतका भक्तिभावाने आळवला होता की श्रोत्यांना त्या सभेत परमेश्वर हजर असल्याचा भास होऊ लागला. तो भास किंवा आभास म्हणा मास्टर मदनने भैरवी आळवल्यावरच दूर झाला. या लहान वयात त्याची धार्मिक वृत्ती इतकी वाढली की तो आता सतत गुरु नानक यांची प्रतीमा जवळ बाळगायला लागला. एवढेच नाही तर कधी कधी झोपायच्या ऐवजी तो समाधीत जायला लागला.
रेडिओवर आता त्याचे नियमित कार्यक्रम होऊ लागले. त्याची किर्ती ऐकून मुंबईहून त्याला सिनेमाता काम करण्याची विनंती करण्यासाठी माणसे येऊ लागली. पण त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यावेळेस सिनेमात काम करणे सभ्यपणाचे समजत नसत. याचा त्यांना पुढे फारच पश्चत्ताप झाला. कारण जर त्यांनी यासाठी परवानगी दिली असती तर त्याची चित्रफित असती आणि त्यात त्याची प्रतिमा अजरामर झाली असती.

१९४० साली महात्मा गांधी सिमल्याला गेले होते सभेसाठी. ती सभा ओस पडली कारण आख्खे सिमला मास्टर मदनच्या गाण्याला गेले होते.

मास्टर मदनचे शेवटचे गाणे कलकत्यात झाले. त्या कार्यक्रमात त्याने जवळ जवळ दीड तास राग बागेश्वरी आळवला. एका श्रोत्याने बक्षीस म्हणून लगेचच ५०० रुपये दिले- त्या काळात ही रक्कम फारच मोठी होती. परत येताना मदन दिल्लीला त्याच्या बहिणीकडे उतरला. तेथेदेखील दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवर त्याला जावे लागायचेच. या छोट्याला त्याचा मेहूणा सायकलवर घेऊन अलिपोर रोडवर जायचा.
याच मुक्कामात मदनला ताप चढला. पण त्याने रेडिओ स्टेशनवर जायचे चालूच ठेवले होते. वैद्यकीय उपचारांनी ताप काही उतरायची लक्षणे दिसेनात तेव्हा त्याने सिमल्याला प्रस्थान ठेवले. या हवा बदलाचाही काही फायदा झाला नाही. काही दिवसांनी एक चमत्कारिक घटना घडली. त्याचे कपाळ आणि सांधे चमकायला लागले. तेव्हा त्याच्यावर पार्‍याचा विषप्रयोग झाल्याची शंका बर्‍याच जणांनी प्रदर्शित केली. किंवा त्याच्या नातेवाईकांच्या अती हव्यासाचाही हा परिणाम असावा. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच गेली.

या जगाचा जुन ६ रोजी त्याने निरोप घेतला. त्यावेळी साल होते १९४२.
आपल्या चुकीची दुरुस्ती “त्याने” बरोबर १४ वर्षाने केली आणी या गंधर्वाला परत बोलावून घेतले.

मास्टर मदन गेल्याला आता ७० वर्षे होऊन गेली पण त्याच्या ताकदीचा आणि संगीताची जाण असलेला गायक अजून या क्षेत्रात जन्मायाचा आहे. सागर निझामीच्या दोन गज़ला आणि काही गाणी एवढीच त्याची संपत्ती आपल्याकडे आहे. एवढी रेडिओ रेकॉर्डींग असताना त्यातले काहीही आपले सरकार मिळवू शकले नाही ही अत्यंत बेजबाबदारपणाची आणि दुर्दैवाची बाब आहे.या थोर स्वर्गिय बालगंधर्वाच्या दोन गज़ला आपण ऐकणार आहोत आणि त्याचा अर्थही समजून घेणार आहोत. सागर निझामीची ही गज़ल -

यूँ न रह रह कर हमें तरसाईये
आइये आ जाईये आ जाईये...

फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर मेरी आग़ोश में गिर जाईये

मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये

ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
जी में आता है यहीं मर जाये
-सागर निझामी.

दोन प्रेमी जिवांच्या मनात काय काय काय चाललेले असते हे त्यांना जन्म देणार्‍या परमेश्वरालासुध्दा कळणे मुष्कील.
कधी त्याची ओढ तर कधी त्याचा तिरस्कार. कधी अबोला तर कधी प्रेम. कधी क्षमा तर कधी नाही.
सागर काय म्हणतोय ते बघूया.

मला का सारखा तडपवतो आहेस?
ये ना ! एकदाचा ये !
मला सोडतोस, परत परत बाहेर ठोकरा खातोस, काही हरकत नाही,
माझ्या बाहूत तुझा हक्काचा आसरा आहे.

माझ्या जगात तुझी केव्हा पासून प्रतिक्षा आहे.
तुझे जग सोडून ये, माझ्या जगात ये.
नाहीतर ---
ही मदमस्त हवा, हे चांदणे,
तू नाहीस तर मला वाटते की
इथेच मरून जावे.

ही गज़ल इथे ऐका.

आता दुसरी ऐकवतो.
हैरत से तक रहा जहान\-ए\-वफ़ा मुझे
तुम ने बना दिया है मुहब्बत में क्या मुझे

हर मंज़िल\-ए\-हयात से गुम कर गया मुझे
मुड़ मुड़ के राह में वो तेरा देखना मुझे

कैफ़ ख़ुदी ने मौज को कश्ती बना दिया
होश\-ए\-ख़ुदा है अब न ग़म\-ए\-नख़ुदा मुझे

साक़ी बने हुए हैं वो `साग़र’ शब\-ए\-विसाल
इस वक़्त कोई मेरी क़सम देखता मुझे
-सागर निझामी.

माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने हे जग अवाक झाले आहे,
बघ माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने माझे काय काय झाले आहे.

माझ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या मंज़ील मधेच मी हरवलो,
या प्रवासात तुझे माझ्याकडे वळून वळून बघणे.....
किंवा - माझ्या या तुझ्यावरच्या प्रेमाने मला माझ्या अंतीम ध्येयापासून वंचित ठेवले आहे

बघ माझ्या अहंकाराने, बुध्दीने मी या लाटांचीच नाव केली होती...
पण मला आता शुध्द आली आहे आणि हे नाखव्या मला आता कसलेही दु:ख नाही.
किंवा मला आता नावाड्याला जो असतो तसला कसलाही ताण तणाव नाहीत.

सागर म्हणतो, या मिलनाच्या रात्री, ती “ते” आता साकी झाले आहेत,
यावेळी शपत, या अवस्थेत, मला कोणीतरी बघायला पाहिजे....

ही गज़ल इथे ऐका.

मास्टर मदन... एक आपल्या जगाला पडलेले स्वप्न...

संगीतगझलभाषाइतिहासलेखमाहितीआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Jun 2010 - 2:43 pm | विसोबा खेचर

सुरेख लेख..!

गजला सवडीने ऐकतो..

तात्या.

स्मिता चावरे's picture

23 Jun 2010 - 3:25 pm | स्मिता चावरे

मास्टर मदन यांचे नाव ऐकले होते. पण तुमच्या लेखातून अधिक माहिती मिळाली.गजला ऐकल्या ... त्या अलौकिक आवाजाचे काय वर्णन करावे? ईश्वराला त्या बाल गंधर्वाचा विरह सहन झाला नाही बहुदा,म्हणूनच इतक्या लवकर स्वतःच्या दरबारी बोलवून घेतले.
सुंदर लेख आणि गजलांबद्दल आपले आभार!

सहज's picture

23 Jun 2010 - 3:33 pm | सहज

छान

नितिन थत्ते's picture

23 Jun 2010 - 6:04 pm | नितिन थत्ते

कामचोर नावाचा राकेशरोशन आणि जयाप्रदा यांचा चित्रपट होता. त्यात आळशी राकेशरोशन श्रीमंत जयाप्रदाला गटवण्यासाथी मास्टर मदन यांची रेकॉर्ड भेट म्हणून देतो असे दाखवले आहे. ते हेच मास्टर मदन असावेत का?

(प्रत्यक्षात राकेश रोशन जी रेकॉर्ड ऐकवतो ती सैगल टाईपच्या आवाजात होती.....तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और)

गाणे उत्तमच आहे. आवडले.

नितिन थत्ते

प्रभो's picture

23 Jun 2010 - 7:06 pm | प्रभो

सुंदर लेख....

मदनबाण's picture

23 Jun 2010 - 7:08 pm | मदनबाण

तुमच्या या लेखामुळे एका अनोख्या कलाकाराशी ओळख झाली. :)

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

वरील दोन्ही गझल मास्टर मदन ह्याच्याच आहेत काय?
खुपच सुंदर आवाज आहे.
वेताळ

रामदास's picture

23 Jun 2010 - 7:37 pm | रामदास

ही एकच गजल आतापर्यंत ऐकली होती.
मौजेच्या (बहुतेक) एका दिवाळी अंकात लेख वाचला होता.तो पण आज तुम्ही लिहीलेल्या लेखापेक्षा छोटा होता.
आपल्या अभ्यासाची दाद देतो आणि मागणं पण करतो की आणखी असेच लेख येऊ द्या.

१) पंजाबी गाणे: बागांविच पिंगन पैंया

" alt="" />

२) मन की मन मे

३) मोरी बिनती मानो कान्हा रे

४) गोरी गोरी बैंया शाम सुंदर

५) बहुधा आणखी एक पंजाबी गाणे: रावी दे पार्ले कांदे

मीनल's picture

24 Jun 2010 - 1:24 am | मीनल

खूप माहिती मिळाली.
गझल मस्त आहेत.
युट्युबवर सुध्दा ऐकायला मिळाले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jun 2010 - 1:40 am | बिपिन कार्यकर्ते

कुलकर्णी साहेब... सुंदर लेख, सुंदर गाणे... मला गाणे कळत नाही, पण या गाण्यातली गायकी, शब्दोच्चार वगैरे उच्च आहेत एवढे कळते आहे मला. असेच येऊ द्या अजून.

बिपिन कार्यकर्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Jun 2010 - 4:20 am | अक्षय पुर्णपात्रे

सुंदर लेख, सुंदर गाणे.

वाटाड्या...'s picture

24 Jun 2010 - 2:03 am | वाटाड्या...

छान लेख. माहीतीत छान भर घातलीत. निश्चित आवाजात दम होता. एवढ्या लहान वयात ही जाण म्हणजे देणगीच.

- वा..

शिल्पा ब's picture

24 Jun 2010 - 2:27 am | शिल्पा ब

असेच म्हणेन.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सुनील's picture

24 Jun 2010 - 5:13 am | सुनील

छान मा॑हिती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत's picture

24 Jun 2010 - 7:42 pm | नीलकांत

लेख खुप छान आहे. खुप आवडला !

- नीलकांत

रामजोशी's picture

22 Feb 2011 - 8:06 pm | रामजोशी

हाही चान आहे. हे लेखक हल्ली मिपावर दिसत नाहीत .

स्वर्गीय आवाज..

(कानसेन) - गणा

विनोद१८'s picture

17 May 2015 - 4:27 pm | विनोद१८

सुंदर लेख जयंतराव,

'मास्टर मदन' यांची ओळख दोन ते अडीच वर्षांपूर्वी अचानकपणे तू-नळीवर काही ठुमर्‍या शोधताना झाली होती. त्यांच्या त्या बालवयातील गायकीबद्दल काय बोलावे.........!!!! त्यांची 'यूँ न रह रह कर हमें तरसाईये' तर तेव्हा ऐकलीच होती, केवळ अप्रतिम.

तीच सगर निझामी यांची गजल 'डॉ. राधिका चोप्रा, दिल्ली.' यांनी गायलेली तेव्हा सापडली होती, तिचा दुवा खाली देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=mi0uWmKRn2U

धन्यवाद,

अप्रतिम लेख! स्वर्गीय आवाज.
लेख आलां तेव्हा मिपा माहीतच नव्हते , पण नंतरही कधी वाचला नव्हता.
वर आणल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर लेख! छान माहिती. गझला नंतर ऐकेन..

लेख वर आणल्याबद्दल विनोद१८ यांना धन्यवाद !