शब्द झाले मोती...

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
29 May 2015 - 2:22 pm

बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा

खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ?

बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही..
आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले...

एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल

मुक्तकविचारमतप्रश्नोत्तरेवादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस मात्र शनिवार - रविवार असले तरी मनाचा सुट्टीचा दिवस शुक्रवार ...
शुक्रवारी मन खुप मुक्त पणे भरकटते... कधी ते असेच सरळ त्या काळसर डोंगरावर चढुन जाते... कड्या-कपारीतुन फिरुन येते... उन्हातान्हातुन .. सावलीतुन हळुच गिरकी घेवुन येते
कधी झाडांच्या फांदीवरुन.. पानांवरुन हलकेच परत येते...
कधी मिट्ट काळोख्या रात्रीतील त्या अमुर्त स्वप्नाला अलगद मिठी मारुन येते...
कधी हलकेच घराच्या खिडकीतुन पहात राहते...
खिडकी.. खिडकी ही मनाची अशी जागा.. की त्यातुन दिसणार्‍या इवल्याशा आभाळावर ही मन आपले राज्य प्रस्तापित करु पाहते...
तासन तास त्या आभाळाच्या तुकड्यावर प्रेम करत, ताटकळत उभे असते... आपले अस्तित्व त्या आभाळाकडे जणु ते सुपुर्त करुन देते... मनाचे अस्तित्व कोणी मान्य करो वा न करो .. त्या आभाळाने कदाचीत ते मान्य केले असेल .

------- २९/५/२०१५, १४:३२

आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं आभाळ फार आवडतं कारण त्यातूनच बर्‍याच वेळा पाऊस येतो. मागच्या पावसाळ्यात कुठे बाहेर भटकणं झालंच नाही फारसं. याखेपी मात्र भरपूर फिरायचा विचार आहे. मी विचार फारसा करत नाही असे लोक म्हणतात. काही लोक तर तुम्ही निरथक अत्मरंजन करताय असंही म्हणत असतात. निरर्थक अत्मरंजनातूनच माणूस भ्रमवादाचा बळी ठरतो. हल्ली तर आत्मकुंथित भ्रमवादाची मोठी फ्याशन आहे....

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2015 - 2:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

आम्ही कामगार वर्गात मोडत असल्यामुळे शुक्रवार हा आमच्या साठी आठवड्याचा पहिला दिवस.
कालच्या दिवसभरात बायकोनी हातात टेकवलेल्या यादीमधली कोणकोणती कामे राहीली आणि ती आता कशी करायची, पुढच्या गुरुवारवर काय ढकलायचे, त्याचे हिशेब मांडत, आणि आज दिवसभरात ऑफिसमधे काय करायच ते ठरवत पोचले की समोर दुसरेच काहीतरी (साहेबांच्या मते) अतिमहत्वाचे वाढुन ठेवलेले असते.

त्यातच वाया जाणारा शुक्रवार दिसत असतो.

आपण आपल्यावरच (आणि साहेबावर) चडफडत काम सुरु करावे तर गणेशा सारख्या कोणत्या तरी मित्राचा फोन येतो "शनिवार रविवारचा काय प्लॅन आहे? येतोस का राजगडावर?"

मग आम्ही ओशाळावाणे हसत त्याला सांगतो आम्ही दत्तभक्त आहोत म्हणून.

"अरे हो.. तू सांगीतले होतेस मागच्या वेळी. सॉरी विसरलोच. पण च्यायला बर आहे रे तुझे, गुरुवारी सुट्टी असल्या मुळे बाहेरची कामे तरी होतात. आम्हाला बाहेरची कामे कराची तर एक हाफ डे तरी वाया घालवायलाच लागतो." अशी मुक्ताफळे उधळत मित्र फोन ठेवतो.

आणि आम्ही परत कामाचा ढिगारा उपसायला लागतो.

पैजारबुवा,

मस्त लिहितोयस रे भावा! सुंदरच! काही क्षण मी तू लिहिलेलं मनातच अनुभवलं.

गणेशा's picture

29 May 2015 - 2:40 pm | गणेशा

अरे बाबा
अस्तित्व कोठे कोणास असते .. त्या सुगंधाला ही माहीत नाही .. त्याचे अस्तित्व काय आहे ? .. त्या वार्‍याला ही माहित नाही त्याचे अस्तित्व कोठे आहे ..
पण मग हे आकाश काय आहे.. त्याच्या अस्तित्वाची पुसटशी रेघ म्हणुन का क्षितिजापाशी ते खाली वाकलेले आहे...
का निसर्ग त्याचे अस्तित्व दाखवत आहे....
अश्या नेक प्रश्नांची शृंखला मनात घर करुन आहे... कधी वाटते.. मनाप्रमाणे वागावे.. वाट्टेलसे.. पण कधी वाटते.. आपण उलट निट वागत आहोत.. समाजातील ह्या चालीरीती.. नियम आपण पाळत आहोत.. मन उगाच भरकटलेले आहे.. कधीही कुठेही कसे ही गेले तर चालेले का ? प्रत्येक प्रश्न .. त्याचे अस्तित्व यांना उत्तर खरेच द्यावे का ?
मनाचे अस्तित्व मान्य केले तरी मनाप्रमाणे वागले तर कदाचीत येथे आपण वेडे ही ठरु शकु .. आपण नकी काय विचार करत आहे हेच आता कळत नाही.. मनापासुन आपण आचरणाचे नियम पाळत आहोत .. की आचरण करताना मनापासुनच आपण थोडे लांब चालत आहोत ....

--- २९/५/२०१५, १४:४०

गणेशा's picture

29 May 2015 - 2:54 pm | गणेशा

प्रश्नांच्या या पानगळीत...
उत्तरे दवबिंदुंसम ओली..
हलकाच स्पर्श ओळखीचा...
मग उरतात फक्त रिक्त जागा...

उडुन गेली अशीच उत्तरे..
त्या प्रकाश किरणांसंगे..
जो दाखवे वाट जगाला..
त्यातच उत्तरे विलीन जाहली..

मग प्रश्न का उरले येथे..
का अस्तित्व ना मिटले काही..
का ओळखीच्या खाणाखुणा
शोधतो जणु मी त्यावरी

असेच सरली वर्षे ..
असेच संपले सारे..
आयुष्याच्या शेवटाला तरी
प्रश्न का उरतोच आहे ?

----- २९/५/२०१५, १४:५४

गणेशा's picture

29 May 2015 - 2:59 pm | गणेशा

आभाळ भरुन आलं की.. मला गच्च हुंदक्यांची आठवण येते.. का कोणास ठावुन .. तन भिजवणारा पाऊस माझं मन कदाचीत भ्हिजवत नाही.. कोरड्याच मनाने मी पाहतो मग .. भरुन आलेल ते आभाळ.. ते गच्च आभाळ.. कधीतरी मनाची कोरडीच वीज चमकते .. आणि उठतो आगडोंब मनात... हे मानाचे काहुर ... कसे थांबवावे .. काहीच कळत नाही...

हलकेच नंतर पाहताना .. आभाळ निवाळलेलं असत< मनात मात्र तेच आभाळ पुन्हा पुन्हा भरुन येत राहते .. बस्स असेच पुन्हा पुन्हा भरुन येते...

गणेशा's picture

29 May 2015 - 3:08 pm | गणेशा

शनिवारी ..रविवारी सगळी मित्र मंडळी.. अशीच फिरायला जातात... आमच्या गुरुवारच्या सुत्टीमध्ये कामे होतात म्हणुन म्हणे त्यांना कौतुकेच जास्त असतात..
डोंगरावरच्या मैनीची ओढ बाकीच्यांना असते.. काटेरी झुडपात तीची अवस्था मात्र आपल्यासारखीच असेल असे सहज वाटुन गेले...
आज मी असाच काम करत होतो ...
ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "

मी : का गं ?

ती : अरे त्याच्याबरोबर ट्रेकिंगला चालले आहे शनिवार- रविवारी, तुला सुट्टी असते गुरुवारी मला खुप कामे आहेत नेमकी ऑफिसला .. तु करशील का ?

मी.. हो ..

मी (मनात) : दत्त गुरु हे बरे नव्हे .. हलकेच फुलपाखरु जवळ यावे.. आणि ते पुन्हा दूसर्याच्या कळपात शिरावे... हे फक्त तुमच्या ह्या वारामुळे ....
तुम्ही तरी हे मनाचे दु:ख समजुन घेताल का ?

--- २९/५/२०१५, १५:०८

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2015 - 3:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "

च्या ऐवजी

ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "

असे हवे होते का?

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2015 - 3:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रश्र्णांची भिजकी पाने
पाठीवर माझ्या पडता
उरफोडून धावत सुटतो
फिरुनी क्षणही न बघता

गलितगात्र मग एक पळी
मी कोसळता धरणी वरती
देवाचा धावा करतो
मी मज तारुन नेण्यासाठी,

देवावर ठेवून भिस्त
मी दबकत दबकत वळतो
पाचोळा पाहून मागे
मी क्षणभर मलाच हसतो,

पैजारबुवा,

जडभरत's picture

23 Jul 2015 - 5:49 pm | जडभरत

मस्तच पैजारबुवा!

गणेशा's picture

29 May 2015 - 3:46 pm | गणेशा

@ पाचोळ्या:

पाचोळ्या, मी पाहिलं तुला, डोंगरकडेवरुन तु स्वताला झोकुन देत होतास ... पण का ? कश्यासाठी ?
मी असाच फिरत होतो ... तुला मी मुक्त वाटतो .. पण मी स्वैर भतकत असतो.. मलाही नाही कुठलीच दिशा...
असेच अस्तित्व वेदणेचे मी पंखांवर घेवुन फिरतो डोंगरदरयामध्ये.. झाडातुन.. पानांतुन..
अनी मित्रा तुझ्या सोनेरी पाउलवाटेवरुन ही..
रोज सकाळी तुला वाटते.. कोण बरे ही असंख्य दवरुपी आसवे तुझ्या अंगावर ठेवुन जातो ... तो मीच आहे.. माझ्याच अस्तित्वाच्या त्या विखुरलेल्या खुणा आहेत..

तर हा , तुला पाहिले मी त्या दोंगरमाध्यावरती.. मी अलगद आलो .. तुला झेलण्यासाठी.. तु हळुच वार्‍यासंगे डुलत खाली चालला होता... मी आलो तुझ्यापाशी .. तर तु पुन्हा चिंब ओला झाला होता....
मग हातात हात घेवुनी आपण तेथेच विसावलो त्या तिथल्या झाडाखाली...
असंख्य तुझ्या प्रश्नांना मी प्रश्नांचीच उत्तरे देत होतो ..
आठवते ना तुला ?

-------- २९/५/२०१५, १५:४५

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2015 - 3:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

साले आभाळही आता पहिल्या सारखे आपले राहिलेले नाही
त्याच्या कडे बघताना आता मन पहिल्या सारखे प्रसन्न होत नाही

उलट तिच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा मात्र ओल्या होतात
आणि मग ढगाच्या एखाद्या तुकड्या मधे तिचा चेहरा शोधू लागतात

तेवढ्यात सूर्यावर एखादा काळा कुळकुळीत ढग येतो
तिच्या सोबतीने भिजलेल्या पहिल्या पावसाची आठवण करुन देतो

त्या नंतर जोरदार वार्‍याची आणि कडाडणार्‍या विजेची पाळी असते
क्षणभर चमकणार्‍या त्या उजेडामधे मला घट्ट बिलगलेली ती मला दिसते

.... क्षणभरच....मग...

अंगावरची शाल आणि कानटोपी आणखीनच घट्ट लपेटत मी उठतो
आणि दारे खिडक्या बंद करुन डोक्यावरुन पांघरुण ओढून झोपतो

नातवंडे म्हणतात म्हातारपण फार वाईट, अजोबांना आजकाल काहीच सहन होत नाही
मी मनातच म्हणतो, खरच वाईट कारणजे सहन होत नाही ते कोणाला सांगताही येत नाही.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

29 May 2015 - 3:58 pm | प्रचेतस

पैजारबुवा....जबरीच.

असा शिल्लक रिप्लाय देणार नव्हतो .. पण ही कविता आता पर्यंतच्या सर्व रिप्लायमधील एक हिरा आहे, अत्यंत उत्कट .. निस्सिम ... याला उत्तर लिहिणे अवघड आहे..

सहज आठवले आधीचे

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष
पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

चिनार's picture

1 Jun 2015 - 4:49 pm | चिनार

लय म्हणजे लयच भारी !!!

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 3:51 pm | प्रसाद गोडबोले

हा फार डेंजरस प्रकार आहे .

जयंत कुलकर्णी's picture

1 Jun 2015 - 7:13 am | जयंत कुलकर्णी

त्या दुरच्या डोंगरातून,
शांतता पसरत खाली येते आणि मी
माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे,
वेध घेत कशाचा ?
त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे
माझे विचार भविष्यात ( ?) तर
परावर्तित होत नसतील ना ?

गणेशा's picture

29 May 2015 - 4:08 pm | गणेशा

तुझ आभाळ मला दे ..
माझ आभाळ तुला ..

झाकोळल ज्या हाताने सूर्याला तो जख्मी झालेला सुर्य ही मावळताना मला सोनेरी किनार परिधान करतो..
असंख्य तांबडे पिवळे रंग माझ्यावरती टाकतो ...
बघ तु जेंव्हा माझ्याकडे पाहतो , तेंव्हा मी तुला अशीच दिसते का रे ...
तांबडे कुकू कपाळावर ल्यालेली .. सोनेरी किनारेची साडी नेसलेली ..

सांग ना .. अगद्दी तसीच का रे आहे मी अजुन तुझ्या डोळ्यात ..
अन मग बरसतो पाऊस तुझ्या माझ्या डोळ्यात ...

अंधुक होतात काळाचे पडते ... अन .. ते काळे क्षणही...
फक्त क्षणभर ... मग ...

तू पुन्हा सकाळी उठलेला असतो .. सूर्याच्या जखमा कधी कोणास दिसल्यात का ?
बस्स .. माझे रुप पाहण्यासाठी तो मात्र त्याचे रक्त त्या जखमांमधुन संध्याकाळी असेच सांडवत असेल ... तुझ्यासारखेच

------ तुझी ती
२९/५/२०१५, १६:०७

मयुरMK's picture

19 Jan 2016 - 10:32 am | मयुरMK

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2015 - 4:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

निखारा नेहमी दुसर्‍याच्या तळहातावरच तेजस्वी भासतो
मग आपण अशा पुरुषाची देव म्हणुन भक्ती करु लागतो

खरेतर नियती प्रत्येकालाच समान संधी देत असते
पण त्यावेळी बहुतेकांना वाळूत तोंड खुपसायला आवडते

पैजारबुवा,

गणेशा's picture

29 May 2015 - 5:01 pm | गणेशा

धन्यवाद... आता निघतो आहे, सोमवार-मंगळवारी पण सुट्टी टाकली आहे, तरी नेट गावाला चालल्यास येतो अधुन मधुन ... उद्या असेल शक्यतो थोडावेळ...

पुन्हा लिहितो आल्यावर.. तो पर्यंत आनखिन रिप्लाय येवुद्या ... छान आहे सर्व ..
पैजारबुवा खुप आभारी आहे तुमच्याशिवाय ही शृंखला जमलीच नसती असे वाटते.. तुमच्या आभाळ हे मनातील उत्कट भावनांचे चित्रण हे आजचे फलित ...

सर्वांचे आभार ... आनखिन रिप्लाय येवोत ही इच्छा !

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 May 2015 - 7:09 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ...मन रमत नाही यात...त्या खळाळणार्या रेवेत दिसणारं ओथंबलेलं आभाळ परत कधी दिसणार म्हणुन वाहणारे डोळे नक्की कशाची चाहुल देत होते...तुझ्या गमनाची वार्ता होती त्या आकाशाला....म्हणुनच नुसते भरुन आले होते ते....पुर्ण प्रवासात नर्मदेपेक्षा रेवाच जवळची वाटली रे....तीचेच प्रतीरूप.तरीही वेगळे अस्तीत्व दाखवणारे...आपलेही असेच नाही का?तुला माझ्यातुन वगळले तर बाकी काय उरेल...पण उरलेय अजून..तुझ्याशिवायचे सगळे ऋतु अनुभवत...फक्त आता तीचा राैरव नाही..अन् तुझी गाजही..पण आभाळ गाभूळतंच रे त्याच्या काळात...फक्त अनुभवायला तु नसतोस सोबत....असतो एक तुकडा आभाळाचा...मी आपला समज करुन घेते की बघतोयस तु..त्या आभाळाच्या झरोक्यातून..

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2015 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

नर्मदा किंवा रेवा सतत प्रवाही असतात, कुणासाठी थांबत नाहीत कारण माहित आहे?....
वहात रहाणे महत्वाचे हे त्यांना माहीत आहे... सतत वहात रहाणे...
जगात केवळ एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे बदल......
काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा हा सूर्यही अस्तित्वात नव्हता तेव्हाही मी होतोच....
आजूबाजुला कितीही काहिही बदलले तरी.....
कालही मी होतोच आजही मी आजही आहे आणि उद्याही असणारच आहे....निरंतर रहाणार आहे....
नर्मदाही मी आणि रेवाही मी, आभाळही मी आणि चारही़ ऋतू म्हणजेही मी, सूर्यही मी आणि काळही मीच.
मी केवळ स्वतः कडे निरनिराळ्या कोनांमधून पहात राहिलो आणि हा खेळ बघता बघता वाढतच गेला.....
कधी कधी मीच माझ्या या खेळात गुरफटून जातो......
आणि स्वतःच स्वतःला शोधत रहातो....
फार मजा येते असा स्वतःचा शोध घेताना.....

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2015 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जियो.

-दिलीप बिरुटे

स्रुजा's picture

12 Jun 2015 - 2:08 am | स्रुजा

वाह ! अप्रतिम ..

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2015 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त रे गणेशा!

या प्रकारच्या लेखनाचा हा विचारच भारी आहे. उस्फुर्त म्हणजे एकदम उस्फ़ुर्तच ! त्यासाराखे दुसरे भारी काहीही नाही. कारण त्याला कसलेही बंधन नाही. ना विषयाचे, ना वेळेचे, ना कोणाला आवडेल/नावडेल का? असल्या विचारांचे!

मनात आले ते उतरवून गेलो.
पुसले जाइल की राहील याची तमा न बाळगता!

कोणाला आवडो नावडो ,स्वच्छंदि लिहिन मी
कुणी जवळ थांबतय की नाही याची अर्थातच..तमा न बाळगता!

एक ओळ होवो,वा एक पान भरो
वाचलं गेलं तरी लिहिन , न गेलं तरीही!.. अगदी कुणी उघडून पाहिलं की नाही? याचीही तमा न बाळगता

मग उस्फ़ूर्ततेचे उद्यान होइल, स्वच्छंदि बागडणाय्रा फ़ुलपाखरांसाठीचे!
तिथे फ़ुलं असतील? ,नुसतीच पानं? ,की काटेहि??? .. निश्चितच! याचीही तमा न बाळगता!

गणेशा's picture

31 May 2015 - 12:29 am | गणेशा

@ पैजार बुवा...@ भाग्यश्री

प्रवाह .... आहे ना ... गती आहेच.. पण हे वर्तुळ ...त्याचा परिघ... मला ओलांडताच येत नाहिये..
त्या गाभुळलेल्या आठवणी अजुनही पिंगा घालतात सभोवताली... त्या प्रत्येक क्षणांचे ओरखडे .. हो ओरखडेच आणि ते अजुनही काळाच्या पडद्याआड लपुन हळुच माझ्याकडे पाहुन खुदकन हसतात ... माझ्या मनाच्या झरोक्यातुन पुन्हा ते काळाला छेदुन जुन्या दिवसात जातात.. आणि माझे मन असे असंख्य ओरखडे घेवुन पुन्हा खालमानेने गपचुप निघुन येते... परिघ ओलांडण्याची किंमत माझ्या मनाला माहितेय... मी मात्र अजुनही त्या परिघावरील एक बिंदु बनुन राहिले आहे.. जगासाठी मी त्याच वर्तुळावर रोजचेच प्रवाही आयुष्य जगते आहे... आणि तुझ्यासाठी... हा तुझ्यासाठी मी अजुनही तेथेच आहे... त्या जागीच... त्या परिघावरच तुझी अजुनही वाट पहाते आहे...

गणेशा's picture

31 May 2015 - 12:57 am | गणेशा

काल रात्री पुन्हा पाऊस आला होता.. मी गच्चीत झोपलो होतो... त्याच्या त्या येण्याने झोप मोडली ...
पण मग असे वाटले बरेच झाले... भरलेल्या आभाळाची ती मजा रात्रीत तरी मला निटशी घेता आली नसली तरी भटकण्याची एक चाहुल तेथे ही होती.. आजकाल असच होते... मनाच्या कप्प्यात असंख्य वादळे दाटलेली असतात.. आणि मग त्या करुन कहाण्यात आपण कधी ओढलो जातो ते कळतच नाही... पण त्या कप्प्यांमध्ये आत्ताचा स्पर्ष ही न झालेले कोवळे आभाळ ही बसु शकेल ना..? हा एक नविन कप्पा मला आता केलाच पाहिजे.. अगदी मनसोक्त भटकायच.. पाउस असाच झेलत पुढे चालत रहायचे.. निसर्ग..त्याचे विहंगम चित्रे पुन्हा पुन्हा या नव्या कप्प्यात साठवायचे... काय माहीत पुन्हा केंव्हा तरी हा कप्पा हळुच उघडला की एक निसर्गाचा देखावा कायम पहाता येइल ..
पण या कप्प्यात फक्त मी आणि निसर्ग नकोय ... तु पण असशील का ग सोबत...
मी.. तू आणि निसर्ग ....

नूतन सावंत's picture

31 May 2015 - 8:23 am | नूतन सावंत

पैजारबुवा._/\_

गणेशा's picture

1 Jun 2015 - 12:29 am | गणेशा

आज १ जुन, वडिलांचा वाढदिवस .... बारामतीला आलोय ... पाउस पडलाय आज... वातावरण शांत ... बर्याच गोष्टी आठवुन जातात... वाढदिवस तसा आम्ही कोणाचाच साजरा करत नसु.. पण घरात गोड - धोड केले जाई.. आज ही असाच बेत आहे...
प्रत्येक वाढदिवशीच सारे काही आधीचे आठवते असे काही नाही...पण या दिवशी त्या आठवणींना थोडा भावनेचा स्पर्श जास्त असतो ..

संस्काराची शिदोरी अशीच .. त्या पिढीकडुन आपल्याकडे आली... प्रामाणिक पणा, चिकाटी... सतत कार्यरत राहणे या गोष्टी त्यांच्याकडे पाहुनच आपण शिकत आलो... नाही असे नाही.. बर्याच गोष्टीत वेगळे विचार-- हेतु आहेच .. पण सारासार विचार करता ते जास्त बरोबर ... सुख हे पैश्याच्या श्रीमंतीवर नाही.. तर मनाच्या समाधानावर अवलंबुन असते...

समाधान आणि सुख ह्या खरे तर वेगळ्या गोष्टी... आपल्या कडे जास्त चैनीच्या गोष्टी म्हणुन आपण सुखी.. पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान जास्त ... दूसर्‍यांप्रति असणारा आदरयुक्त भाव... स्वता हालाअपेष्टा सोसुन घरातील प्रत्येकाला स्व-कर्तुत्ववान बनवण्याची धडफड .. निरपेक्ष प्रेम... स्वता पेक्षा इतरांच्या सुखा साठी आयुष्यामधील अनेक क्षण वेचले असल्याने ते जास्त समाधानी...

बर्याच दा मनात येते .. माणसाने समाधानी असावे... सुख त्या समाधानाकडे आपोआप खेचले जातेच ... आपण उलटे करतो .. समाधाना पेक्षा सुखाकडे आपला कल जास्त असतो.. त्यामुळे कधीच आपले समाधान होत नाही.. आणि सुखाची एक एक पायरी आपण वाढवत जात राहतो ... नक्की आपण कुठल्या पायर्‍या चढतो आहे हे जेंव्हा जाणवते .. तेंव्हा समाधानाच्या सिमेरेषेपासुन आपण बरेच पुढे आलेलो असतो ... मग आपल्याला कळते आपला रस्ता चुकीचा आहे.. हे कळणे ही कदाचीत महत्वाचे..

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2015 - 2:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

पळत्याच्या पाठी | लागू नये कधी|
हाती लागे अंती| काही नाही||

शेजार्‍याच्या चार | अलिशान कार|
आपली स्कूटर | खरी असे ||

शेजार्‍याची भार्या| दिसते ऐश्र्वर्या|
तुझे रुप आर्या|अभिषेक नाही||

सुख समाधान |असती समान
जेव्हा तुझे मन| स्थिर असे||

अंतरीचे ध्यान | पहावे करुन
खरे समाधान| चित्ती वसे||

बुवा म्हणे राम| नामाचे भजन
दुर करी भ्रम| अंतरीचा||

नन्दादीप's picture

1 Jun 2015 - 3:07 pm | नन्दादीप

Pavasala

पाउस.....आठवणी...भावना...समाधान....सुख....रस्ता चुकणे..सह्यगिरीप्रति आदरयुक्त भाव

sahyadri

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2015 - 1:40 pm | प्रसाद गोडबोले

वा मस्तच !!

असे हिरवेगार फोटो पाहुन मनाला फार आल्हाददायक , आणि एकदम शांत वांट्तं !!

धन्यवाद :)

गणेशा's picture

2 Jun 2015 - 12:04 am | गणेशा

पाऊस मला वाटते नेहमी तरुणच असावा... त्याला पाहिले की त्या सर्व मोहक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींप्रमाणे पावसालाही चिरतारुण्याचे वरदान मिळालेले असेल असेच वाटते....

वर्षातला पहिला पाउस मला पहिल्या प्रेमाप्रमाणेच भासतो...उत्कट ..निर्मळ..अतिव...हवाहवासा...
त्या चिरतरुण आठवणींचे मेघ हा असाच दरवर्षी माझ्यावर बरसवत असतो... मग मला जयश्री आठवते... माझं पहिले प्रेम... निर्मळ ...निरागस... तासनतास मारलेल्या गप्पा....ती स्वप्ने ... त्या अनाभाका.... कॉलेजला एकत्र केलेला अभ्यास...
तो हवाहवासा स्पर्श ... ते हळुच लाजणे... हवाहवासा वाटणारा हा चिरतरुण आठवणींचा काळ आणि पहिला पाऊस यांचे नातेच एकदम घट्ट...

पहिल्या पावसानंतर पावसाच्या आणि आठवणींच्या अनेक सरी बरसतच असतात ... बेलगाम... स्वैर.. मुक्त... बेभान... या तारुण्याच्या कित्येक छटा या पावसात मला आठवतात.. तारुण्याच्या या स्वैर..मुक्त..बेभान आठवणी समोरुन झरकण पुढे सरकतात.. गच्च हिरव्या रानातुन जसे पाण्याचे असंख्य झरे वाहत असतात.. तसेच मनाच्या कड्यांवरुन अनेक विचार... अनेक गोष्टी अश्याच उड्या टाकत होत्या हे आठवते ... असंख्य झरे.. असंख्य ओल्या वाटा... गर्द धुक्यात फक्त आपण ..मुक्त.. स्वच्छ...

शेवटी वळवाचा पाऊस येतो...अफाट...अचाट...असह्य..अचानक आलेला... तारुण्यातील या गर्द धुक्यातुन .. असंख्य वाटातुन आपला रस्ता आपल्याला त्यात शोधावाच लागतो ... नाहीतर एकदा हरवलो की आपलाच थांग लागणे कठीण... वळवाच्या पावसाचे ही असेच ... अचानक..अफाट... वळवाचा पाऊस असाच जीवनाचा हमरस्ता शोधुन देण्याचे काम करतो... गच्च हिरव्या रानातील असंख्य आपल्याशा वाटणार्या वाटा असह्य पणे आपल्याला सोडुन द्याव्या लागतात.. कधी कधी अचानक समोर काहीच दिसत नाही... तरीही घट्टपणे मनाशी आपली वाट पक्की करुन आपण चालत रहायचे बस्स...

रातराणी's picture

2 Jun 2015 - 4:15 am | रातराणी

आज पाउस यावा असं वाटतंय!
मरगळलेल्या मनाला त्यानं स्वच्छ धुऊन जावं,
मुळूमुळू रडत येण्यापेक्षा आज गर्जना करीत यावं,
सभ्यपणाची शाल आज त्यान घरीच ठेवून यावं!

आज पाउस यावा असं वाटतंय!
मळभाची काळी चादर आज त्यान फाडून यावं,
प्रेमाची भीक देण्यापेक्षा, मुक्त हस्ताने उधळीत यावं,
माझ्या उधारीचा हिशोब आज तरी विसरून यावं!

आज पाउस यावा असं वाटतंय!
तहानलेल्या सृष्टीला आज त्यान मिठीत घ्यावं,
चिंब चिंब भिजवून तिला तृप्त तृप्त करावं,
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज त्यानच मिटवीत जावं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2015 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

क्या बात है रातराणी फारच सुरेख.
मस्तच
आवडली कविता.

पैजारबुवा,

सुरेख कविता,रातराणी!जीयो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2015 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं.

-दिलीप बिरुटे

वारामागुन वार येतो अन तसाच निघुन जातो. हल्ली कशाचं काहीच वाटत नाही जे सोमवारचं ते च रवीवारचं. पाऊस येतो पडुन जातो, फुले फुलतात सायंकाळी कधीतरी मग नंतर माना मुरगाळुन तशीच पडुन राहतात. मी मात्र तसाच बसुन असतो. धुंदीत जगत असल्या सारखा. टेकडी वरून दीसनारा सुर्यास्त पाहुन किती दिवस झाले हे तर आठवत सुद्धा नाही. कधीतरी लहर येते पावसात भिजायची, मोठ्याने आरोळी ठोकायची. वाटतं वेडं वाकडं धावावं, पाण्यामधे डुंबावं. पन ही इच्छा सुद्धा मनात कुठेतरी जिरून जाते. कुठेतरी विटी दांडु अन लगोरी- गोट्या असले काहीतरी चालुच असते, मी मात्र मान ताठ करून निघुन येतो. पडनारा पाऊस तुषार, वर्षाव, शिडकावा,श्रावण धारा असलं काही का असेना मी त्याला चिकचीकच म्हणतो. खिडकीवर आलेलं पाखरू सुद्धा आताशा किलबील करने सोडुन कलकलाट करू लागलय
तरी बरं मला अजुन माझाच त्रास होत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2015 - 1:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

विहिरीच्या काठावर उभा राहून आजकाल मी विहिरीत नूसते डोकावून बघतो
पाण्यात पाय घालायला सुध्दा नको वाटते,
काही वर्षांपूर्वी मी सहज विहीरीच्या तळाशी टाकलेले नाणे घेउन येत असे,
माझा मुलगा मात्र बिनधास्त उडी मारुन विहिरीतून नाणे काढून आणतो,
तो वर येई पर्यंत मी विहिरीचा काठ घट्ट धरुन,
पाणी कधी हलतय त्याची वाट बघत पाण्याकडे एकटक पहात उभा असतो,
अगदी माझे बाबा उभे असायचे तसाच, मी त्या वेळी बाबांना हसत असे,
आणि आज माझा मुलगा आणि माझे बाबा दोघे मला हसतात,

आजकाल माझे हे असे का होते?

काही वर्षांपूर्वी अमर्यादीत थाळी देणार्‍या हॉटेल मधेच आवर्जून जाणारा मी,
आजकाल अर्धा वडापाव टाकून देतो, जात नाही म्हणून,
"टाकु नका मी खातो" असे म्हणताना माझा मुलगा दात दाखवत मला हसत असतो,
आणि माझे बाबा कवळी सांभळत त्याला साथ देत असतात,

आजकाल माझे हे असे का होते?

रात्री उशीरा पर्यंत झोप येत नाही,
डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात,
त्या वेळी माझा मुलगा एकाग्रपणे अभ्यास करत बसलेला असतो,
आणि बाबा मनलावून कोणता तरी जाडजुड ग्रंथ वाचत असतात,
मी मात्र तळमळत इकडून तिकडे फेर्‍या मारत असतो,
ते दोघे डोळे मिचकावून एकमेकांकडे बघत, मला हसत असतात,

आजकाल माझे हे असे का होते?

पैजारबुवा,

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Jun 2015 - 4:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आजकाल माझे हे असे का होते?

मनाच्या गाभार्‍यातुन उमटणारे
गुढ प्रश्न आत आत दाबून टाकावेत
मनमुक्त होऊन उधळून झुगारावेत
असचं वाटत असतांना
पायात एक अनामिक बेडी जाणवत राहते
असं कां?
---
साधी कागदी होडी बादलीतल्या पाण्यावर
तरंगतांना बघून लेकीच्या डोळ्यात
आलेली लकाकी बघून
मन हरखुन जाते
पुढच्या क्षणी तिच्या
स्वप्नांची होडी तिराला लागेल की नाही
या विचाराने जीव कासाविस होतो..
असं कां?
-----
अल्याड मी असतो
पल्याड स्वप्न असतात
मध्ये भला मोठ्ठा जलाशय
कधी मन उचल खातं
म्हणतं चल मार उडी..
परत तेच मन हात धरुन
मागे ओढत राहतं
असं कां?
--------------------------------------------

काय लिहीलय मी माहीत नाही.. सहज सुचल.
बाकी धाग्यावर नजर ठेवून आहेचं.
येईन परत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2015 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैजारबुवा आणि मिका तुम्हाला एक एक बियर. :)

आजकाल माझे हे असे का होते ?

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

2 Jun 2015 - 1:31 pm | यशोधरा

मस्त आहे हे! सुरेख!

क्या बात हे

वाचन खुण साठवतोय

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Jun 2015 - 5:04 pm | भाग्यश्री कुलकर्णी

रोजचा आला दिवस सरताना मागे काही ठसा ठेऊन जातो.कधी ठळक कधी पुसट..काही बोचलेले शब्द काही रेंगाळणारी गुपिते.तर कुठे मनाच्या कोपर्यात जपलेला हिरवा गारवा.काहीही मागे ठेवायचे नाही म्हणताना लेकीची गळामिठी प्रेमाचा ठसा ठेऊन जाते.आणि मी मात्र लांब दिसणारं धुसर चित्र जणू हातात आल्यासारखी नादावते...परत उगवणारा उद्या पायातल्या मणामणाच्या बेड्या संभाळत कोलु पिसु लागतो.अखंड चालणारा हा अविरत घाणा.सुखाचे वंगण अन दुःखाची धार लावुन पळत राहतो.दिसामाजी कापलेले अंतर बघु गेलो तर मागे उरतो माझ्याच पायानी बनलेल्या वतृळाचा ठसा....

पैसा's picture

10 Jun 2015 - 9:44 pm | पैसा

प्रवास सुरू झाला तेव्हा कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. अर्धा रस्ता संपला तरी अजून कुठे जायचं हे माहीत नाही अन किती चालायचं हेही माहीत नाही. पावलं तीच, मीही तीच, रस्ताही तोच. सुरुवात झाली तेव्हा लहानशी पायवाट होती. बाजूंनी फुलं होती सगळी. आणि डोक्यावर गर्द सावली. हळूहळू झाडी विरळ झाली. फुलं सुकली आणि डोक्यावर ऊन भाजू लागलं. तरी वाट सरता सरेना. कधीतरी वार्‍याची झुळूक ह़ळूच येऊन गालावर रेंगाळून जाते. माथ्यावर ढग दुरून जराशी सावली देतो अन कधीतरी एखादी पावसाची सरही. आताशा सावलीही पायातळी आली आहे.

सुरुवात कशी होती तेही आज धूसर चित्रासारखं आठवतं आहे. शेवट कसा असेल माहीत नाही. आज, आता इथे आहे एवढंच खरं. पण एकच माहीत आहे की मला चालायचं आहे. बाकी सगळे निघून गेले तिथे जाण्यासाठी. पाय साथ देतील तोपर्यंत.

ती ज्वारीची शेते .... पाणांवर दवबिंदू ल्यालेली शहारलेली कोवळी पाने... गावाचा तो शेतावरला बांध... काळीकुट्ट जमीन.. आणि त्या काळ्याश्या ठिसुळ ढेकळाला हळुवार पणे भिजवत पुढे चाललेले पाणी....
ती दगडी भिंतीची ओबढ शाळा.... सुंदर झाडलेले आणि सभोवताली अशोकाची उंचच उंच झाडे असलेले पटांगण ...
ती पळसाकडील विहीर... तासनतास मारलेल्या गप्पा.. एकत्र केलेला अभ्यास....
ती अनामिक हुरहुर .... सुगंधाचे क्षण.. फुलांचे सांजेला मोहक लाजणे... तो चंद्र ....
तो अनामिक दूरावा... ते सैल झालेले मायेचे पाश... त्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा.... ते ओठांआड थांबलेले शब्द .. ते हिरव्या बांगड्यांचे लेणे घेतलेले पण त्या क्षणी अतिव ओढीने थरथरणारे हात....

तो अंगणातील पारिजात... रात्री पडलेला फुलांचा सुगंधीत सडा... ती पहिल्यांदाच न उजाडू वाटणारी सुरेख ..गुलाबी सकाळ...
ते इवलेसे टोपडे... इवलेसे स्वेटर... मऊ मनाला आनंदित करणारा स्पर्श... जीवनाचा सर्वोच्च आनंदी क्षण....
ती सकाळची गडबड ... ते कुतुहल.. दप्तराच्या ओझ्यांची चिंता... बंद केलेला टीव्ही ... ती काळजीळतली परिक्षा...

हे अर्धे आयुष्य सरले आहे आता.. आयुष्याच्या ह्या एक एका फ्रेम ने मन अगदी काठोकाठ भरुन गेले आहे...
पुढच्या प्रवासाची एक अनाम ओढ ... इवल्याशा काळजाच्या तुकड्यात गुंतलेला श्वास... आणि श्वासागणिक वाहिलेले वाहिलेले हे आयुष्य ..पुन्हा तो अंगणातला पारिजात...........

गणेशा's picture

3 Jun 2015 - 12:55 pm | गणेशा

@मिका..

कागदी होडी वरुन आठवले... गावाकडे अंगणात... पावसात.. पाणीच पाणी साठायचे... अश्या वेळेस क्रिकेट खेळता येत नव्हते म्हणुन मन नाराज होत असे... आणि मग आम्ही मोर्चा वळवत असु कागदी होड्या बनवण्याकडे...
आम्ही म्हणजे मी आणि तायडी(ताई) ...
तायडी या एकाच शब्दात कीती माया साठवलेली असते ना... या शब्दाच्या उच्चाराने पण मन प्रसन्न झाले...
हा..तर या होड्या बनवायचो मी.. तीला पण मीच बनवुन द्यायचो .. तीला बनवायला येत नसत.. मग तासन तास त्या पाण्यात आम्ही खेळत असु..कोणाची होडी लांब जाते त्यावर पैजा लावत असु.. कसलीच चिंता नसायची तेंव्हा... कपडे खराब होण्याची.. अभ्यासाची... भविष्याची.. कसलीच नाही.. कीती मस्त दिवस होते ते.... आणि आता त्या पावसाची आपण वाट पाहत आहे.. पण त्या कागदी होड्यांप्रमाणे त्या बालपणीच्या आठवणींचे आपण काहीच करणार नाही का ?
मला वाटते.. लेकीच्या रुपाने ते दिवस पुन्हा आपल्याकडे येवु पाहत आहेत.. तर मग तीच्या सोबत पुन्हा तेच दिवस जगायला आपण सुरुवात केली पाहिजे असे वाटते... कसलीच चिंता न करता.. म्हणुन मी पण आता पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे...

सहज मला आवडणारे गाणे आठवले यावरुन...

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी

मधुरा देशपांडे's picture

3 Jun 2015 - 1:27 pm | मधुरा देशपांडे

फार आवडलाय हा धागा.

नाखु's picture

3 Jun 2015 - 2:15 pm | नाखु

खरच लहानाबरोबर लहान होणं सोपं असतं का? नसतंच कारण ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मी लहान होतो आहे तेव्हांच तुमचं बाल्य हरवलेलं असतं. बाल्य कसे पाहिजे मित्रांअम्ध्ये दिलखुलास शेर्‍याला, हजरजबाबीपणाला आपोआप टाळी देणारा-घेणारा हात जसा उस्फुर्त आतून असतो अगदी तसाच. एकदा का तुम्ही बाल्यपणात आपोआप घुसलात की त्या नजरेने जग सुंदर दिसतं अगदी पुस्तकातल्या चित्रा सारखं स्वच्छ, निर्मळ. थोडी कट्टी थोडी बट्टी ,खोटा खोटा स्वयंपाक भातुअकलीच्या भांडयातून दिलेले बेदाणे-शेंगदाणे आपण फार मोठा चविष्ट पदार्थ खातोय असा भाव केल्याबरोबर डोळ्यांत ओसंडणारा आनंद, मध्ये लुड्बुड केली तर लटका राग हे खाली बसून बरोबरीने अनुभवायची गंमत आहे.
कपड्यांची धुळीअगोदर, मोठेपणाची वस्त्रे झटकली तरच मस्ट.
मी एका वर्षी दिवाळी किल्ल्यासाठी लेकीला आणि लेकाला माती-चिखलात हात घालून किल्ल्यासाठी मदत घेतली तेव्हा किल्ला कसा झालाय त्याहीपेक्षा ही नदी/हा डोंगर मी केलाय याचेच त्या दोघांना खूप अप्रूप होते.(अजून ही चित्रे माळावर आहेत) ह्या दिवाळीत काढावीच बाहेर, आपण का अड्वायच आपल्यातल्या !!!!

ताईदादाचा बापूस
नाखु

गणेशा's picture

3 Jun 2015 - 3:49 pm | गणेशा

आपल्या मनातील आपले विचार.. सहजपणे जेंव्हा असे बाहेर येवु लागतील.. आपल्याच लिखानातुन एक एक रुप घेवु लागतील, तेंव्हा त्यांना आपल्याला तठस्थपणे पाहता येवु शकेल... मग कुठल्या विचारांचे रुप आपल्याला बदलायचे.. कुठले चित्र कसे निट करायचे.. हे आपल्यालाच समजेल... आपणच आपल्या विचारांचे चित्रकार.. मुर्तीकार... कुठला टाका कुठे टाकायचा हे ठरवणारे ही आपण .. आणि कुठला रंग कुठे भरला की उठुन दिसेल हे ठरवणारे ही आपण.. निसर्ग ही असाच असेल नाही ?. प्रत्येक वेळेस एक वेगळीच निर्मिती साकारण्याचे सामर्थ्य ही त्याच्यात असेच आले असेल... स्वताच्याच निर्मितीस तठस्थपणे पाहणे ही पण एक कलाच...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jun 2015 - 5:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे सुरांनो चंद्र व्हा!
काय रचना आहे... विरहणी म्हणजे काय ते हे गाणं ऐकून कळते. परीपूर्ण रचना.. अप्रतिम संगीत आणि अभिषेकीवुबा तर बिनतोड...
एकाकी दुर माळरानावर ती उभी आहे.
पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आहे, आणि तिच्या मनातून उमटलेल्या वेदनेतून या रचनेने जन्म घेतलाय.
पण वेदना कशी पोहचवणार? तर ती सुरांनाच सांगते, तुम्हीच चंद्र व्हा आणि चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा. काय कल्पना आहे ना? जीवघेणा प्रकार आहे.
तसाच काहीतरी विचार डोक्यात ठेवून हे लिखाणः
----------------------
दूर तिथे त्या माळरानापलिकडे
माझा जिवलग
एकाकी...
मी इथे एकाकी
---
वाट भरकटून अंधारात
चाचपडत चाचपडत त्याच्याकडे
पोहचण्याचा निष्फळ प्रयत्न माझा
फसलाच परत एकदा
---
वेदनेला शब्द सापडतात कधी
कधी नि:शब्द तडफड
एका क्षणात आकाश व्हावे
सगळी वेदना कृष्ण मेघात
भरावी आणि
बरसावे... रिक्त होईस्तोवर
---
आज परत एकदा पौर्णिमा आली
आता अधीरता अगतिकता झाली
बेचैनी रिक्ततेकडे झुकली
अन् वेदना जिवावरचे दुखणे झाले
तरीही
दूर तिथे त्या माळरानापलिकडे
माझा जिवलग
एकाकी...
मी इथे एकाकी
---
हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा....

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jun 2015 - 5:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम.

अभिशेकीबुवांच्या गाण्याचा प्रश्र्णच नाही, त्याला काही तोडच नाही, पण हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली ती मुग्धा वैशंपायन

https://www.youtube.com/watch?v=1qFJtCMqcK0

पैजारबुवा,

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jun 2015 - 6:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम.

अहो कोणाच्या पंक्तित बसवयतात... ?? माझी लायकी तरी आहे कां?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2015 - 7:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है पैजारबुवा, माझी सकाळ सुंदर झाली. आभार.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

12 Jun 2015 - 9:10 pm | किसन शिंदे

व्वाह!!

काही काही ठिकाणी घेतलेल्या हरकती जबराट आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2015 - 10:28 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

पैसा's picture

3 Jun 2015 - 5:11 pm | पैसा

काय सुंदर धागा आहे हा!

जयंत कुलकर्णी's picture

3 Jun 2015 - 5:59 pm | जयंत कुलकर्णी

मिका, या झाल्या एका विरहिणीच्या व्यथा पण पुरुषांचे त्यांची प्रेयसी, पत्नी कुठे गावाला गेल्यावर काय कमी हाल होतात का ? हे बघा काय म्हणतो पास्तरनाक.....

दरवाजातून आत बघितले
माझेच घर मला ओळखू येईना
अचानक तिच्या जाण्याने
घराचा आणि मनाचा कसा
गोंधळ उडाला आहे भयानक.

ठणकणार्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू
समजून नाही देत या अवस्था
झालेल्या जखमा कशा
मोजता येतील आणि कशाने ?

मनात एक तीव्र कळ ऊठली.
मी जागा होतो का स्वप्नात ?
का माझ्या डोळ्यातील पाण्याने
माझ्या बुद्धीवर मात केली आहे ?

धुरकटलेल्या काचांमुळे का
डोळ्यांतील पाण्याने
हे जग मला पार तुटलेले वाटते आहे.
मनोवेदनेत माझ्या
का दिसत आहेत मला
राक्षसी लाटा आणि तुटलेली घरे ?

ती जशी होती तशीच मला
प्रिय होती, लोभस होती.
जसा समुद्राला किनारा प्रिय
आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण.
समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती,
तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर
माझ्या आत्म्यामधे कुठेतरी
खोलवर जपून ठेवले आहे मी.

त्या उध्वस्थ घरात फिरताना
तिच्या कपड्याचा वास घेताना
माझे मन अजूनच हळवं होतं
तिच्या केसाची पीन
टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध
फुटून गेले. फुटून गेले...........

पैसा's picture

3 Jun 2015 - 6:02 pm | पैसा

...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jun 2015 - 6:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

त्या उध्वस्थ घरात फिरताना
तिच्या कपड्याचा वास घेताना
माझे मन अजूनच हळवं होतं
तिच्या केसाची पीन
टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध
फुटून गेले. फुटून गेले

व्वाह...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2015 - 1:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ती जशी होती तशीच मला
प्रिय होती, लोभस होती.
जसा समुद्राला किनारा प्रिय
आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण.
समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती,
तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर
माझ्या आत्म्यामधे कुठेतरी
खोलवर जपून ठेवले आहे मी.

सुरेख.

-दिलीप बिरुटे

शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे अनिमिष नेत्रांनी बघत फ़क्त आस्वाद घेत राहावं....
शांतपणं मनाच्या खोल तलाशयात या रत्नाना साठवत राहावं...
सरस्वतीच्या या पुत्रांना नतमस्तक होत निव्वळ न्याहाळत राहावं...
एकेका मुक्तकासाठी/ कवितेसाठी तुम्हाला एक एक पार्टी लागू!
मिपा वरचा अप्रतिमोत्तम वरचा क्रमांक असलेला एक धागा

गणेशा's picture

3 Jun 2015 - 6:55 pm | गणेशा

@ मिका आणि जयंत जी.
एकोळी रिप्लाय ह्या धाग्यावर खरे तर द्यायचे नाही ठरवलेले आहे, पण तुम्हा दोघांच्या या अतिउच्च विचार/लिखाना ला सलाम तर करावा लागतोच ....
तरीही जाता सुचेल ते लिहितोच.

इतरांना मात्र एक विनंती
एकोळी रिप्लाय शक्यतो नको.. वा.. छान ही नको.. त्या उलट शब्दांच्या थव्याने तुम्ही येथे या.. मनसोक्त जे वाट्टेल ते लिहा.. त्याची खरी गरज आणि एकदम धागा वाचताना ही मग मध्येच थांबल्या सारखे होणार नाही.. फक्त रिप्लाय किती पेक्षा किती मुक्तके/कविता/चित्रे ते महत्वाचे..

उत्तर लिहितो असेच...

गणेशा's picture

3 Jun 2015 - 7:48 pm | गणेशा

@ मिका @ जयंत जी...

तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ?
अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता...
मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे...
शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्‍या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. पाटाचे पाणी पण हबकुन वाहते...
काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च...
पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...

कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि वार्याबरोबर उडून गेलेला तिचा सुगंध,
आता पुन्हा ती बहरेल का?

मोडून पडलेला विश्वास आणि बाहेरून आत शिरू पाहणाऱ्या वादळांची धिटाई,
आता पुन्हा ती जळेल का?

रुतलेली अदृश्य जखम आणि श्वासांचही ओझ झाल्यासारखा तुझा अनोळखी अबोला,
आता पुन्हा ती हसेल का?

तू गाशील विरहाचे गाणे आणि ती सोडवत बसेल आठवणींचा गुंता,
खर सांगा, आता पुन्हा ती जगेल का?

( हे अगदीच काहीतरी आहे पण आमच्या हाताला खाज फार!)

कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या भावना यावर सहजतेन हळुवार फुंकर घालनारी तु पहील्याच भेटीमधे मनाला अलगद स्पर्ष करून गेली नसतीस तर मला साहजिकच नवल वाटलं असतं.
दररोज तुझ्या मनाचे ऊलगडनारे नवे नवे पदर
मला कळत नकळत तुझ्या जवळ खेचत होते. तुझा अल्लडपना तर खुप गोड वाटायचा.मी इतका गुंतत चाललो होतो की तुझा थोडासा विरह देखिल मला खुप अस्वस्थ करून जायचा.
तु हाती न लागनारे मृगजळ कधीच न्हवती, मात्र तरीही सहज साद्ध्य ही न्हवती. आयुष्याचं प्रतयेक वळन आजही तुझी साथ मागतं. निवांत अशा एकांतामधे तर मनाला खोल खोल जखमा होऊन जातात. कधी कधी तर तुझ्या आठवणीने इतका वेडा होऊन जातो, माझं मलाच भान रात नाही. वाटलेलं तुझी आठवण मनाला मोरपीसासारखी सुखावत राहील, मऊ पीसाला इतकी धार येईल हे मात्र स्वप्नातही वाटलं न्हवतं

मदनबाण's picture

4 Jun 2015 - 11:55 am | मदनबाण

तिच माझ्यावर प्रेम होत
पण व्यक्त करण जमल नाही तिला
सर्व मला उमगल होत
पण तसं दाखवण जमल नाही मला...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swift

नाखु's picture

4 Jun 2015 - 12:57 pm | नाखु

तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली

त्या उध्वस्थ घरात फिरताना
तिच्या कपड्याचा वास घेताना
माझे मन अजूनच हळवं होतं
तिच्या केसाची पीन
टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध
फुटून गेले. फुटून गेले...........

जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी..
तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको.

आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो.
आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला.

अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात.

एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही.
शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे.

काकाश्रींचा पंखा
नाखुस

गणेशा's picture

4 Jun 2015 - 3:27 pm | गणेशा

@ बाबुदादा...

हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो ....
----------------

तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले...
लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ...
तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की...
खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला...
काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच...

तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम...
मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते...

किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते...
नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच ..

तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...

मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती....
त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल..

मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ...
असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती..

आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की...

बालगीत

झाडावरती घरटे चिऊताईचे ...
पानांआड दडलेले.. ....
घास भरवती पिल्लांना
आपल्याच इवल्या चोचीने

पंखाना बळ देती ती
छडी हातात घेवुनी ...
आकाशा ला मिठीत घेवू
ही प्रार्थना तिच्या शाळेची...

एक दिवस आला असा ..
परिक्षा संपली पटकन
चिऊताईची शाळा संपली
पिल्ले उडाली भुर्रकन

मनीषा's picture

4 Jun 2015 - 6:08 pm | मनीषा

उपक्रम चांगला आहे.
असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं.
ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .

मनीषा's picture

4 Jun 2015 - 8:59 pm | मनीषा

ओथंबलेलं आकाश
बरसतच नाही कधीचं
मनात दाटलेलं मळभ
पसरत राहतं आभाळावर
संध्याकाळच्या कृष्णछाया
पसरतात घरावर

घराच्या या भिंती
माझ्या एकांताच्या साक्षी
सारे भोग ..... सा-या वेदना
जपल्या आहेत त्यांनीच
हळुवार होणारं मन
सावरलं आहे त्यांनीच
कसं सांगु? ........आणि काय सांगु?
नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच
घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच
आणि आतल्या प्रकाशावर
पडू दिली नाही अंधाराची छाया कधी
म्हणूनच तर आहेत त्या
माझ्या जीवाच्या जीवलग
निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात
जगाच्या सा-या तापांपासून दूर

कधीतरी वाटतं मलाही
पहावं .... काय चाललं आहे बाहेर?
मग उघडते मी एक छोटासा झरोका
बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता

त्यातुनच येतात मग
जुन्या नव्या आठवणी
काही सुखावणा-या ....
तर .. काही रडवणा-या
त्यांच्याशी बोलत राहते मी कधी
---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही

बाहेरचा कोलाहल मला अगदी
----- नवा नवा वाटतो
त्यात एखादा ओळखीचा
सूरही असतोच
त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात
------ मग सगळे चेहरे
एकमेकात मिसळतात
अन त्यांचा बनतो एकच चेहरा
त-हेत-हेच्या भाव-भावनांचे
आविष्कार दाखवणारा
त्यातून मग अनेक रंग विखूरतात
त्यातले काही मला भावतात देखील ...
मग मी त्या रंगांना निरखून पाहते
त्यांना एक आगळा वेगळा
गंध असतो ....
तो गंध माझ्या कणाकणात भिनतो
मनावर एक अनोखी धुंदी चढते ----
त्या गंधांची ........ त्या रंगांची
मग त्या चार भिंतीतलं
माझं एकटेपण जणू नाहीसं होतं

अनेक भावनांचे रंग...
त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी
कशी माहित नाही ...
पण मला ती आवडते
त्या नक्षीच्या बिलोरी काचा
सा-या घरभर पसरतात
त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात
माझं मन मोहून जातं
त्या कवडशांना हातात घ्यावं
त्यांना जवळून पहावं ...
असं वाटतं ......
पण त्यांना हातात घ्यायला मी जाते
.... तशी ते माझ्यापासून लांब जातात
असा खेळ ----------
कितीतरी वेळ चालतो
शेवटी मी थकून जाते
एका जागी बसून
त्या कवडशांकडे पहात राहते

हळूहळू उन, आपली पावलं
मागे घ्यायला लागतं
तसे सारे कवडसे सुद्धा
त्याच्या मागे धावतात
मग तिथे काहीच रहात नाही
दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो
शांत ..... सुस्थीर .... अश्वासक.......
मनाला दिलासा देणारा
काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा
माझं मन शांत होतं

पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र
हरवूनच जातात

माझ्या मनात राहतात मग
फक्त त्यांच्या आठवणी

त्या आठवणी मी माझ्या मनात
जपून ठेवते

आता त्या आठवणींना
माझ्याकडे यण्यासाठी
झरोक्याची आवश्यकता नसते
त्या चार भिंतींच्या अवकाशात
त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी
माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या
सोबती असतात ..

जयंत कुलकर्णी's picture

5 Jun 2015 - 6:04 am | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ओथंबलेलं आकाश
बरसतच नाही कधीचं
मनात दाटलेलं मळभ
पसरत राहतं आभाळावर

मनीषा's picture

9 Jun 2015 - 9:36 am | मनीषा

धन्यवाद !

सुरेख फोटो ..

यशोधरा's picture

4 Jun 2015 - 10:00 pm | यशोधरा

सुर्रेख लिहित आहात सगळे.

गणेशा's picture

5 Jun 2015 - 12:47 am | गणेशा

आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ...

आठवणी त्या सुखाच्या
बालपणीच्या ... भातुकलीच्या ...
बाहुलीच्या केसांसारख्या..
मखमली सोनेरी रंगांच्या...

नववारीतील आज्जीच्या
गोष्टीतल्या परीसारख्या...
अंगणातल्या अबोलीच्या.
आठवणी त्या सुखाच्या ...

पहिल्या रिकाम्या दप्तराच्या...
पाटीवरील पहिल्या अक्षराच्या...
आठवणी त्या सुखाच्या....
बालसंवगड्यांशी खेळण्याचा...

माळलेल्या गजर्‍याच्या
आठवणी त्या सुखाच्या...
पाहिलेल्या नजरेच्या...
मुक्या स्पर्श भावनांच्या...

आठवणी त्या सप्तपदीच्या
प्रितीतल्या गोडव्याच्या
तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या
आठवणी त्या सुखाच्या ...

अवांतर..

५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..

तुमची उत्स्फुर्त कविता छानच आहे.

सनईचौघडा's picture

5 Jun 2015 - 7:22 am | सनईचौघडा

गणेशा ; पैजारबुवा __/\_/\

उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात ..
आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ...

आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या ....
मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ...

बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे...
खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार...
हे मला आता कळते आहे...
जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा..
पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे...
कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...

बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2015 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

साधुची झोळी का पडली?

नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता,
तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता,
नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता,
आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता,

अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली,
एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली,
हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली
जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली,

त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते,
तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते,
तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते,
आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते,

इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती,
आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती
डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती
दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती

इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली,
मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली,
मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली,
अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली,

हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली,
साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली,
तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली,
आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली,

स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते,
तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते,
तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते,
ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते,

बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला,
कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला,
घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला,
बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या,

साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली,
तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली,
चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली,
परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली,

पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले,
"ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले,
याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले,
आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले,

ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते,
आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते,
सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते,
जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते,

"महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली,
बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली,
पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली,
तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली,

एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते,
हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते,
कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते,
"देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते,

"पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले,
त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले,
पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले,
एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले.

पैजारबुवा,

मनीषा's picture

9 Jun 2015 - 9:43 am | मनीषा

अप्रतिम !

अशी तटस्थं वृत्ती प्राप्तं झाली- म्हणजेच त्या साधुबाबांची साधना सफल झाली.

गणेशा's picture

8 Jun 2015 - 12:12 pm | गणेशा

@ पैजारबुवा ...

समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jun 2015 - 3:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें ।
मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ - रामदास स्वामी

जडभरत's picture

23 Jul 2015 - 8:58 pm | जडभरत

वाः बुवा वाः
लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!!
हा श्लोक पाठ करत आहे.

देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही..

स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना...

कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही...

हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....

गणेशा's picture

9 Jun 2015 - 12:57 pm | गणेशा

आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले....

च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात.
तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात

"तू अशीच हसत रहा...
सर्वांचे मन मोहत रहा...
माझी नसताना पुन्हा...
माझीच होत रहा... "

तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ...

"
---
---
आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार..
ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार
तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार
खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार

यही सच है शायद मैने प्यार किया
हा हा तुमसे मैने प्यार किया ... "

आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु..
स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे.....
स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते.....
त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...