४) एका खेळियाने - दे कैझर

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
5 Jun 2010 - 2:55 pm

"यहीं है वो इलाका जहां लोग तुम्हें जानते हैं? शेरखान... अब न तो वर्दी है न कुर्सी.. और ना ही मैं ड्यूटी पर हूँ | इलाका तुम्हारा है और मैं अकेला हूँ |"
"जाओ पहले उस आदमीका साइन लेकर आओ जिसने मेरे बापसे साइन लिया था...पहले उस आदमीका साइन लेकर आओ जिसने मेरी माँको नौकरीसे निकाल दिया था... जाओ पहले उस आदमीका साइन लेकर आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था"
"मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता.."
"गोवर्धनसेठ समंदरमें तैरनेवाले कूओं और तालाबोंमे डुबकी नहीं लगाया करते |"

...भेंडी... काय स्टाइल आहे... काय डायलॉग डिलीव्हरी आहे...काय बॉडी लँग्वेज आहे...काय नजर आहे... टाळ्या .. शिट्ट्या... क आणि ड आणि क... "अमिताभ बच्चन रॉक्स". नक्कीच.. अमिताभ बच्चन एरवीच रॉक्स... काही वादच नाही. पण हे शब्द खरे कोणाचे? सलीम-जावेद, कादर खान, प्रकाश मेहरा.... किंवा असेच कोणाकोणाचे. पण पडद्यावर भाव खाऊन जातो बच्चन ! नथिंग टु टेक अवे फ्रॉम हिम... पण लेखक, दिग्दर्शक, मारामारी दिग्दर्शक शेट्टीमास्तर वगैरेपण अ‍ॅक्टर इतकेच भारी ना भौ?? आता मला सांगा "एइ कांचा.... साला बंदूकभी दिखाता है और पीछेभी हटता है..आंय?" हा डायलॉग विजय अरोराच्या तोंडी जितका पुचाट लागला असता तसंच "अबे हटा सावन की घटा...खा खुजा, बत्ती बुझाके सोजा निंटकले पिटुकले...कुल्ला घुमाके पच्छिमको पलटले... " वगैरे डायलॉग संजीव कुमारच्या तोंडी शोभले असते का? शेवटी सांगायचं काय.... चित्रपट हा शेवटी टीम गेम....हीरो जितका महत्त्वाचा तितकाच लेखक, दिग्दर्शक आणि पडद्यामागचा प्रत्येक कलाकार.

आता बघा ना... परवा आफ्रिकेत जगातल्या सर्वांत लोकप्रिय खेळाचा वर्ल्डकप सुरु होईल. क्रिस्तियानो रोनाल्डो, रूनी, मेस्सी, विला, काका ही नावं सगळ्यांच्या ओठी असतील.. कोण "गोल्डन बूट" मिळवणार ह्यावर पैजा लागतील..."अरे अमुक त्यानी कुठल्या कुठून गोल मारला" वगैरे कहाण्या ऐकवल्या जातील.... एरवी फुटबॉलमधला "फ" सुद्धा न कळणार्‍या मुली "ए तो काका किती क्यूट दिसतो ना?" वगैरे म्हणतील (एरवी त्यांच्या तोंडी काका ही ऑलमोस्ट शिवी वाटते) सगळे जण त्या त्या संघांच्या अ‍ॅटॅकर्सबद्दल तोंड भरून बोलतील. पण जीव तोडून आपल्या गोलचं रक्षण करणार्‍या डिफेंडर्सचं काय हो? त्यांच्या टॅकल्सबद्दल, विचारपूर्वक बांधलेल्या बचावाबद्दल, त्यांच्या अचूक "मार्किंग"बद्दल किती लोकं बोलतील? त्यांनी दिलेल्या लाँग पासेसकडे, "फीड्स"कडे त्यांनी मारलेल्या "अ‍ॅम्बुश स्प्रिंट्स"कडे किती लोकांचं लक्ष जाईल? अगदी तस्संच उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हटल्यावर मनात पहिली नावं कुठली येतात?? पेले, मॅराडोना, क्रायफ, रोनाल्डो, वॅन बॅस्टन, बॅटिस्ट्युटा..... धडाधड गोल मारणारी नावं. पण आमचा जॉन टेरी, पाब्लो माल्दिनी, नेस्टा, रोबेर्टो कार्लोस, लोथार मथायस हे ही तितकेच महान खेळाडू ना भौ. ह्यांच्या वैयक्तिक गोल्सच्या आकड्यांवर जाऊ नका... म्हणतात ना "great aggressive football starts from having a solid defence". ही लोकं मागे राहून फक्त समोरच्या संघाची आक्रमणं थोपवतच नाहीत तर प्रत्येक प्रतिहल्ल्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मारलेल्या गोलची सुरुवात ह्यांनीच केलेली असते. आपला आजचा खेळिया आहे तो अश्या डिफेंडर्सचा मेरुमणि.... आपल्या अनोख्या आणि शैलीदार खेळानीच नव्हे तर कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून रचलेल्या अचाट डावपेचांमुळे फुटबॉल रसिकांना मोहिनी घालणारा....खेळाच्या आणि परिस्थितीचा अचूक अंदाजानी खेळाची सूत्र हलवणारा, संघाची रणनीती बदलणारा कलंदर कर्णधार... लिबेरोसारख्या फुटबॉलमधल्या तांत्रिकदृष्ट्या केवळ भन्नाट पोझिशनचा जन्मदाता.... भल्या भल्या आक्रमक संघांना थोपवणारा महारथी.... अचानक आणि अनपेक्षितपणे कधी साथीदारांबरोबर तर कधी एकट्यानंच समोरच्या गोलक्षेत्रात जोरदार धडक मारणारा नेता.... खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून देखील फुटबॉलचा विश्वचषक उंचावणारा फुटबॉलचा खराखुरा "राजा"!

१९६९ मध्ये जर्मन लीगच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिककडून खेळताना आपल्या ह्या हीरोनी शॉल्के संघाच्या "king of Westphalia" रेनहार्ड लिबुडाला फाऊल करून पाडलं... प्रेक्षकांच्या आरडाओरड्याची जराही पर्वा न करता हा हीरो शॉल्केच्या गोलक्षेत्रात चेंडू घेऊन केला आणि arrogance personified - चक्क ३० एक सेकंद एका पायावर चेंडू बॅलन्स करत राजेशाही थाटात उभा राहिला. कॅमेर्‍यांचे फ्लॅशेस खटाखट उडत होते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी माध्यमांनी त्या अप्रतीम खेळाडूचं नामकरण केलं "देर कैझर" (सम्राट) "फ्रान्झ बेकेनबाउवर".

जर्मन फुटबॉलचा बादशहा... बायर्न म्युनिकचा आधी आधारस्तंभ, मग प्रशिक्षक आणि मग अध्यक्ष. केवळ अफलातून खेळाडूच नाही तर खेळाचं जबरदस्त "रीडिंग" असलेला मुत्सद्दी, "एम्परर फ्रान्झ" आणि "दे कैझर" सारखी अभिधानं मिरवणारा, खेळाचा प्रत्येक बारकावा, प्रत्येक कंगोरा माहिती असणारा महान कर्णधार. पश्चिम जर्मनी आणि बायर्न म्युनिकला फुटबॉलमधला प्रत्येक खिताब जिंकून देणारा एकमेवाद्वितीय खेळिया फ्रान्झ बेकेनबाउवर.

११ सप्टेंबर १९४५ रोजी दुसर्‍या महायुद्धात उध्वस्त झालेल्या म्युनिकमध्ये पोस्ट ऑफिसात काम करणार्‍या फ्रान्झ बेकेनबाउवर सीनियर आणि त्यांची पत्नी अन्तोनी ह्यांचा दुसरा मुलगा जन्माला आला - तो फ्रान्झ बेकेनबाउवर ज्युनियर. "चिमुकला फ्रान्झ पाळण्यात असतानासुद्धा खूप जास्त लाथा झाडायचा....इकडे तिकडे धावून आई - वडिलांच्या पुरते नाकी नऊ आणायचा. त्याचा खोडकर स्वभाव आणि चंचल वृत्तीवरूनच पुढे तो निष्णात फुटबॉलपटू होणार हे त्याच्या आईनी ताडलं" - असली काही कहाणी फ्रान्झची अजिबात नव्हती. बिचारा आपल्यासारखाच शाळेत जायचा (फार फार तर शेवटच्या बाकावर बसत असेल). सारखा फुटबॉल खेळण्याबद्दल बापाच्या शिव्या खायचा. आई पाठीशी घालायची... सगळं काही "नॉर्मल" होतं. १३व्या वर्षी तो तेव्हाच्या SC Munich फुटबॉल क्लबच्या युवा संघात दाखल झाला तो पहिल्यांदा सेंटर फॉरवर्ड म्हणून. प्रसिद्ध जर्मन स्ट्रायकर फ्रिट्झ वॉल्टर हा फ्रान्झचा आदर्श. पण काही दिवसांतच SC Munich मध्ये त्याचे आणि इतर काही मित्रांचे मतभेद झाले आणि त्यांना 1860 Munich हा क्लब जॉईन करायचा होता. पण ह्याच दोन संघातल्या एका अंतिम सामन्यात 1860 Munich च्या खेळाडूंनी खूप धसमुसळा खेळ केला आणि फ्रान्झ जखमी देखील झाला. म्हणून त्यानी 1860 Munich ला न जाता बायर्न म्युनिक ला जाण्याचा निर्णय घेतला. पुढच्या ३ वर्षांतच त्यानी आपली इंश्युरन्स एजंटची अर्धवेळ नोकरी सोडली आणि १७ व्या वर्षीच फ्रान्झ व्यावसायिक फुटबॉलपटू झाला. युद्धानंतरच्या बेचिराख झालेल्या जर्मनीत हा निर्णय घेणं मोठं धाडसाचं काम होतं.

फ्रान्झचं फुटबॉलमधलं कौशल्य निर्विवाद होतंच. खेळाची त्याची समज त्याच्या वयाच्या खूप खूप पुढची होती. आपल्या बायर्नमधल्या दुसर्‍या वर्षीच त्यानी पुढे येऊ घातलेल्या वादळाची चुणुक दाखवली. मधल्या फळीत खेळणार्‍या आपल्या या तरुण तुर्काच्या मोठ्या योगदानाच्या जोरावर बायर्न म्युनिक नुकत्याच निर्माण झालेल्या अव्वल साखळी Bundesliga साठी पात्र ठरला. फ्रान्झच्या असामान्य टॅलेंटची ताबडतोब नोंद घेतली गेली आणि त्याला लगेच पुढच्या वर्षीच पश्चिम जर्मनीच्या राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळालं. त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं ते ही अविस्मरणीय. स्वीडनविरुद्धच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या वर्ल्डकप पात्रताफेरीच्या सामन्यात फ्रान्झनी दाखवलेल्या परिपक्वतेचं आणि कौशल्याचं खूप कौतुक झालं. वर्ल्डकपची पात्रता त्या सामन्यावर ठरणार होती. अनुभवी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंची सुद्धा परीक्षा पाहणारा असा तो सामना होता. पण फ्रान्झ त्या तणावपूर्ण परिस्थितीतही सरस खेळला पश्चिम जर्मनी वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आणि स्वित्झर्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मधल्या फळीत खेळताना २ गोल करून फ्रांझ बेकेनबाउवरनी वर्ल्डकपमधे जोरदार पदार्पण केलं. आर्जेंटिनाशी ०-० बरोबरी करून आणि स्पेनला २-१ नी हरवून पश्चिम जर्मनी पुढच्या फेरीत पोचले. उरुग्वेला ४-० नी हरवून पश्चिम जर्मनी उपांत्य फेरीत पोचले. त्यात बेकेनबाउवरनी एक अफलातून गोल मारला. आणि रशियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही ! आपल्या पहिल्याच विश्वचषकात तरुण आणि अननुभवी बेकेनबाउवरनी आपला ठसा उमटवला होता.

इंग्लंडविरुद्धचा वर्ल्डकपचा अंतिम सामना... तो सुद्धा खुद्द इंग्लंडमध्ये! वेंब्ली स्टेडियमवरचा हा सामना बेकेनबाउवरच्या कारकीर्दीला वेगळं वेळण देऊन गेला. अंतिम सामन्यात बेकेनबाउवरची जबाबदारी होती ती मॅंचेस्टरचा महान खेळाडू बॉबी चार्लटनला "मार्क" करायची! कल्पना करा... वय वर्षं २१, उण्यापुर्‍या ३ वर्षांचा अनुभव, पहिला वर्ल्डकप, त्यात अंतिम सामना आणि त्यात प्रतिस्पर्धी संघातल्या सर्वोत्तम खेळाडूला रोखण्याची जबाबदारी. पण प्रशिक्षक हेल्मुट श्चॉनला पण बेकेनबाउवरबद्दल तितकाच विश्वास होता. बेकेनबाउवर पूर्ण सामनाभर सावलीसारखा चार्लटनमागे फिरत होता. जेफ हर्स्टच्या हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंड तो सामना अतिरिक्त वेळेत ४-२ असा जिंकले. पण बेकेनबाउवरनी आपल्या अष्टपैलू खेळानी सगळ्यांचीच मनं जिंकली. हा सामना पुढच्या इंग्लंड - पश्चिम जर्मनीच्या ऐतिहासिक द्वंद्वांची सुरुवात होती.

परत आल्यावर बायर्ननं ६६ आणि ६७ साली "जर्मन कप" जिंकला, ६७ मध्ये युरोपियन कप विनर्स कप जिंकला. सेप मायर सारखा उमदा गोलरक्षक आणि "द बॉम्बर" गेर्ड मोलरसारख्या खतरनाक स्ट्रायकर साथीदारांसह बायर्न म्युनिकचा नवा कर्णधार "दे कैझर" फ्रान्झ बेकेनबाउवरने युरोप दिग्विजय साकारला. बायर्ननी ६८ ची Bundesliga देखील त्याच्या नेतृत्त्वाखाली जिंकली. त्याच वर्षी पश्चिम जर्मनीसाठी इंग्लंडविरुद्ध तणावपूर्ण लढतीत विजयी गोल करून वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतल्या पराभवाची परतफेडदेखील केली. आता फ्रान्झचा खेळ अधिकच परिपक्व होत होता आणि बायर्न आणि पश्चिम जर्मनीच्या संघातल्या स्थानावर त्याची पक्की मांड होती. आणि ह्याच काळात बेकेनबाउवरनी आपल्या खेळात "रीसर्च अँड डेव्हलपमेंट" करायला सुरुवात केली.

४-४-२ च्या रचनेत खेळणार्‍या बहुतेक संघांत दोघे स्ट्रायकर्स दोन बाजूंनी खेळतात. तेव्हा आपला "सेंट्रल डिफेंडर" मोकळा राहातो. आता रोबेर्टो कार्लोस आणि बेकहमसारखे खेळाडू बाजूनी (विंग्समधून) आक्रमण करतात... बाहेरून येऊन आत आक्रमकांना "क्रॉस" देण्याची ही पद्धत. पण थेट बचावाच्या मधून सरळसरळ प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारण्याची कल्पना फक्त बेकेनबाउवरच करू जाणे. ही अत्यंत आक्रमक व्यूहरचना होती आणि फुटबॉलमध्ये आता अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या "लिबेरो" अथवा "स्वीपर" ह्या जागेचा जन्म झाला होता.

७० च्या वर्ल्डकपमध्ये पश्चिम जर्मनीनी पुन्हा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आणि पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी होता इंग्लंड! गतविजेत्या इंग्लंडचा आत्मविश्वास इतका दांडगा की त्यांनी बॉबी चार्लटनला उपांत्यफेरीसाठी विश्रांती दिली आणि सुरुवातीला त्याच्याजागी कॉलिन बेलला संधी दिली. थोड्याच वेळात इंग्लंडनी २-० अशी आघाडीदेखील घेतली. पण चार्लटनसारख्या दिग्गजाच्या गैरहजेरीचा फायदा न उठवला तर तो बेकेनबाउवर कुठला? आपल्या गोलक्षेत्रात बॉलवर ताबा मिळवून त्यानी बेधडक इंग्लंडच्या क्षेत्रात मुसंडी मारली.... आलेल्या एका "रीबाऊंड" वर अत्यंत थंड डोक्यानी गोलरक्षक बोनेट्टीच्या हाताखालून डाव्या कोपर्‍यात बॉल धाडला. इंग्लंड २ प. जर्मनी १.

घाईघाईत चार्लटनला मैदानावर आणलं गेलं... पण तोपर्यंत उशीर झाला होता. बेकेनबाउवरच्या गोलनं चेव चढलेला प. जर्मनी इंग्लंडच्या गोलवर समुद्राच्या रौद्र लाटांसारखा धडका मारू लागला. आणि जे व्हायचं तेच झालं. उवे सीलरनी हेडर जाळीत मारून प. जर्मनीला बरोबरी साधून दिली. आणि अतिरिक्त वेळेत मिळालेल्या गतीचा फायदा घेत गेर्ड "दे बॉम्बर" मोलरनी जर्मनीसाठी विजयी गोल मारला. ह्या सबंध वेळेत इंग्लंड आणि जर्मन गोलच्या मध्ये छातीचा कोट करून उभा होता फ्रान्झ बेकेनबाउवर. हरल्यात जमा झालेला सामना बेकेनबाउवरनी जवळपास एकहाती फिरवला होता.

त्या वर्ल्डकपची इटली - प. जर्मनी उपांत्य लढत ही सर्वांत ऐतिहासिक वर्ल्डकप लढतींपैकी एक समजली जाते. १-१ बरोबरी नंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. आणि अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच काही मिनिटांत बेकेनबाउवरच्या खांद्याला जबर दुखापत झाली. तरी पठ्ठ्याची बहाद्दरी बघा... खांद्याभोवती बँडेज लावुन तो पुन्हा मैदानात उतरला. बर्टिनी, रिवेरा, विएरी, ज्युलियानो सारख्या खंद्या खेळाडूंच्या इटलीकडून प. जर्मनी चिवट झुंज देत ४-३ अशी हरली खरी पण तोपर्यंत फ्रान्झ बेकेनबाउवर हे नाव फुटबॉलच्या इतिहासात कायमचं सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं होतं. त्या वर्ल्डकप नंतर बेकेनबाउवर जर्मनीचा कर्णधार झाला आणि त्याला आपला संघ आपल्या विचारांनी बांधायची संधी मिळाली. Leading from the front चं उदाहरण घालून देत "लिबेरो"च्या अति-महत्त्वपूर्ण जागी खेळायची जबाबदारी त्यानी स्वतःच्या समर्थ खांद्यांवर घेतली आणि आख्खा संघ त्याच्याभोवती खेळू लागला. त्याच्या नेतृत्त्वाखाली प. जर्मनीनी युरोपियन स्पर्धा जिंकली. इकडे "दे कैझर" च्या अधिपत्याखाली बायर्नचा अश्वमेधाचा वारू चौखूर उधळला होताच.

१९७४ च्या जर्मनीत झालेल्या वर्ल्डकपच्या वेळेस नेदरलॅंड्सच्या "टोटल फुटबॉल"नं जगाला वेड लावलं होतं. त्यांनी फुटबॉलचा चेहरा-मोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या वेगळ्या केशभूषेवर, त्यांच्या अफाट टॅलेंटवर, अदभुत समन्वयावर पूरी दुनिया फिदा झाली होती. जोहान क्रायफसारखी चालती-बोलती दंतकथा आपल्या कौशल्यानी फुटबॉलरसिकांना मंत्रमुग्ध करत होती.... त्याच्या साथीला जॉनी रेप, रॉब रेझेनब्रिन्कसारखे अवलिये होते....नीस्केल्स, हान, यॅन्सेन, हल्शॉफ, क्रॉल.. सगळेच देवाचं देणं लाभलेले खेळाडू ! "टोटल फुटबॉल" मध्ये गोलकीपरव्यतिरिक्त कुठलाही खेळाडू मैदानात कुठेही खेळत असे. त्यामुळे "मॅन टु मॅन मार्किंग" अशक्य होतं. आपल्या वादळी खेळानी पहिल्या सहा सामन्यांत १४ गोलचा धडाका लावत (आणि अवघा एक गोल स्वीकारत) नेदरलँड्सचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला.

अंतिम फेरीत त्यांचा सामना होता यजमान प. जर्मनीशी ! ह्या लढतीची जाहिरातच "क्रायफ वि. बेकेनबाउवर" अशी केली गेली होती. आतापर्यंत नेदरलँड्सनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पालापाचोळ्यासारखं उडवून लावलं होतं. आणि हे वादळ आता जर्मनीच्या भितीवर धडकणार होतं. दोन्ही संघ मैदानावर आल्या आल्याच बेकेनबाउवरनी पहिली अनेपेक्षित चाल खेळली. क्रायफसारख्या दिग्गजाला स्वतः रोखण्याऐवजी त्यानी बर्टी वोग्ट्स नावाची सावली क्रायफबरोबर जोडली. हा एक अत्यंत आक्रमक डाव होता... त्यामुळे बेकेनबाउवर स्वतः क्रायफच्या मागे न राहता आक्रमण करायला मोकळा राहणार होता. पण पहिल्या काही मिनिटांतच क्रायफला फाऊल करून अडवल्यामुळे मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून नीस्केल्सनी नेदरलँड्सचा पहिला वार करेपर्यंत एकही जर्मन पाय चेंडूला लागला देखील नव्हता ! ब्रायन ग्लॅनविलनी त्यानंतरच्या काही मिनिटांचं खूप सुंदर वर्णन केलंय. तो म्हणतो "For twenty-five minutes the Dutch did as they pleased against a stunned German team, rolling the ball about, making pretty patterns, bur creating no real opportunities. Dangerous indulgence against a host team; and so it was that West Germany got off the hook." दे कैझर सारखा सेनापति असताना जर्मनी शांत बसणार होते थोडेच? कैझरनी आपल्या आक्रमकांना मोकात सोडलं आणि धुमाकूळ घालण्याचा परवाना दिला. ताबडतोब पॉल ब्राइटनरनी मिळालेली एक पेनल्टी सार्थकी लावली आणि "बॉम्बर" मोलरनी दुसरा दणका देत प. जर्मनीला ४४ व्या मिनिटालाच आघाडीवर नेऊन ठेवलं. उत्तरार्धात अर्थातच जर्मनीच्या गोलरक्षक सेप मायरसमोर, ब्राइटनर, वोग्ट्स आणि बेकनबाउवर ह्या नावाच्या भिंती उभ्या राहिल्या नेदरलँड्सचा प्रत्येक हल्ला निष्प्रभ ठरवत आणि आपल्या हजारो चाहत्यांच्या साक्षीनी क्रायफच्या डच संघाला नमवून दे कैझर फ्रान्झ बेकेनबाउवरनी फुटबॉलचा विश्वचषक उंचावला !

बेकेनबाउवरनी नंतर बायर्न, न्यूयॉर्क कॉसमॉस आणि पश्चिम जर्मनी साठी अनेक स्पर्धा जिंकल्या. अगणित मानसन्मान मिळवले. ७७ साली तो आंतराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला तेव्हा १०३ सामन्यांत त्यानी - एक बचावपटू असताना १४ गोल्स मारले होते. अमेरिकेत न्यूयॉर्क कॉसमॉसकडून बेकेनबाउवर १९८३ मध्ये आपला शेवटचा मौसम खेळला. आणि १९८६ मध्ये कुठलाही प्रशिक्षकपदाचा अनुभव नसताना त्याची प. जर्मनीच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. म्हणजे जर्मन फुटबॉल महासंघाचा त्याच्यावर केवढा भरवसा होता बघा! तेव्हाचा प. जर्मनीचा सर्वसाधारण संघ मेक्सिको वर्ल्डकपसाठी पात्र ठरला ह्याच्याच आनंदात असणार्‍या चाहत्यांना त्या संघानी चक्क अंतिम फेरीत धडक मारून आश्चर्याचा धक्काच दिला! प. जर्मनी आर्जेंटिनाकडून ३-२ ने हरली. ९० च्या इटली वर्ल्डकप मध्ये पुन्हा तेच दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने उभे राहिले आणि ह्यावेळी मात्र जर्मनीनी विजेतेपदाला गवसणी घातली. फ्रान्झ बेकेनबाउवर कर्णधार आणि प्रशिक्षक दोन्ही म्हणून विश्वचषक जिंकणारा पहिला आणि एकमेवाद्वितीय ठरला! नंतर बेकेनबाउवर बायर्न म्युनिकचा प्रशिक्षक आणि मग तर अध्यक्ष झाला. २००६ च्या वर्ल्डकप संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कोण असावं ह्याबद्दल दुमत असायचं कारणच नव्हतं

खेळांत, मग तो कुठलाही असो सर्वसामान्य चाहत्यांना नेहमी "प्रेक्षणीय" ते आवडतं. बचावापेक्षा आक्रमण नेहेमीच प्रेक्षणीय असतं. म्हणून आपल्याला कदाचित द्रविडपेक्षा सेहवागचं कौतुक जास्त असतं, जिम कुरियरपेक्षा अगासी जास्त लोकप्रिय असतो आणि कार्लोस अल्बेर्टोपेक्षा पेले जास्त लक्षात राहतो, इतकंच काय भरवशाच्या मर्सिडीसपेक्षा फेरारी चकाचक वाटते ! आपल्याला गोल मारून शर्ट काढून आपले "सिक्स पॅक्स" दाखवणारा क्रिस्तियानो दिसतो पण तो गोल "घडवणार्‍या" लोकांकडे, त्याच्या बचावपटूंकडे आपलं लक्ष कुठे जातं? बेकेनबाउवर अफाट टॅलेंट असलेला खेळाडू होता. "मला स्ट्रायकर म्हणून खेळायचंय" असं तो म्हणाला असता तर त्याला कोणी अडवण्याचा प्रश्नच नव्हता. पण एक हाडाचा खेळिया असल्याने स्वतः मागे राहून आपल्या अचाट खेळानं आणि अफलातून डावपेचांनी बेकेनबाउवर जर्मन फुटबॉलचा खर्‍या अर्थानी आधारस्तंभ ठरला. केइर रॅडनेज त्याच्याबद्दल म्हणतो "He was the ultimate puppet master, standing back and pulling the strings which earned West Germany and Bayern Munich every major prize." कुठल्याही सांघिक खेळात puppet master बनण्यासाठी स्वतः सर्वोत्कृष्ट खेळाडू असण्यापलिकडे त्या खेळाची प्रचंड समज, तांत्रिक बाबींबद्दल अफाट ज्ञान, नेतृत्त्वगुण आणि आत्मविश्वास लागतो. आणि बेकेनबाउवर तर खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि संयोजक अश्या सगळ्यांच भूमिकांमध्ये अतिशय यशस्वी ठरला. म्हणूनच सर्वोत्कृष्ष्ट फुटबॉलपटू म्हणून जरी पेले आणि मॅराडोनाचं नाव घेतलं जात असलं तरी "संपूर्ण फुटबॉलपटू" ह्या अभिधानाला पात्र एकच खेळिया आहे "देर कैझर" फ्रान्झ बेकेनबाउवर !

क्रीडामौजमजाप्रकटनमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

5 Jun 2010 - 4:39 pm | Dhananjay Borgaonkar

ज ब र द स्त....
साहेब आपणांस साष्टांग दंडवत. लैच भारी लिहिता.
मागच्या लेखाच्या वेळी आपणांस विनंती केली होती फुट्बॉलपटू बद्दल.
लगेच तुम्ही लेखणी कर्लोसच्या वेगाने चालली.

लाख लाख धन्यवाद.
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

धनंजय बोरगांवकर

इन्द्र्राज पवार's picture

5 Jun 2010 - 6:15 pm | इन्द्र्राज पवार

मन प्रसन्न झाले...निव्वळ फूटबॉलमुळे नव्हे तर मैदानावरील आणि मैदानाबाहेरदेखील आपल्या सदैव हसर्‍या चेहर्‍याने वावरणार्‍या या "जर्मन हिर्‍या"ने जगभर केवळ प्रेम आणि प्रेमच मिळविले. ज्या हिटलरमुळे "जर्मनी" नाव जगात बदनाम झाले होते, त्याच देशाच्या या लाडक्याने श्री.मॉर्गन यांनी लिहिल्याप्रमाणे आपल्या निसर्गदत्त खेळ कौशल्याने जर्मनीकडे आदराने/कुतुहलाने आणि खिलाडू वृत्तीने पाहण्याची सवय सार्‍या जगाला लावली. (ज्या वर्षी "हिटलर" चा मृत्यु त्याच वर्षी "बेकेनबॉर" चा जन्म.... म्हणजेच एका नावामुळे सारे जग थरकापले तर दुसर्‍या नावामुळे जग आनंदले... हाही एक योगायोग !)

लेखकाने वर्णन केलेली ती मॅच (बेकेनबॉरच्या खांद्याला दुखापत, तरीही पूर्ण हात प्लास्टरमध्ये गुंडाळून हा पठ्ठ्या मैदानात उतरला आहे...) सीडीवर मी पाहिली आहे. तसेच बेकेनबॉरचा लेख हॉलंडच्या "क्रायप" शिवाय अपुरा राहिला असता, तो इथे लेखकाने आवर्जुन केला आहे, त्याचा मला विशेष आनंद झाला. बेकेनबॉरप्रमाणेच क्रायपदेखील त्याच्या देशाच्या गळ्यातील "माणिक" होते.

अतिशय सुंदर वर्णनशैलीबद्दल लेखकाचे अभिनंदन !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

राघव's picture

6 Jun 2010 - 12:33 am | राघव

एका जबरदस्त खेळीयाचे अप्रतीम वर्णन! नेहमीप्रमाणे दंडवत!! :)

रावसाहेब,
आपण मिपाची मनं जिंकली आहेत.
खूप सुंदर लेखमाला होतेय. मिपाच्या दौलतमंद खजिन्यात तुमच्या या लेखमालेला अढळ स्थान राहील याची खात्री बाळगा.
खूप छान लिहिता आहात. मुख्य म्हणजे जीव ओतून लिहिता आहात. तुमच्या भावना अगदी तुम्हाला हव्या तशा पोहोचवण्याचे कसब तुम्हांस लाभले आहे.
असेच लेख येऊ देत आणि आम्ही अशीच स्तुतीसुमने उधळत राहू देत - तुमच्या खेळीयांवर आणि त्यांची भावपूर्ण ओळख करून देणार्‍या तुमच्या कसबी लेखणीवर.
खूप खूप शुभेच्छा! :)

(भारावलेला) राघव

अनिल हटेला's picture

6 Jun 2010 - 6:03 pm | अनिल हटेला

अगदी अगदी सहमत !!! :)

________________/\__________________

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

जे.पी.मॉर्गन's picture

7 Jun 2010 - 1:05 pm | जे.पी.मॉर्गन

लई धन्यु राघव आणि अनिल. लेखमाला तुम्हाला आवडतीये ह्याचा आनंद आहे. अश्या प्रतिसादांमुळेच लिहायला अजून उत्साह येतोय! होप टु कीप धिस अप :)

जे पी

सहज's picture

6 Jun 2010 - 6:37 am | सहज

हाही लेख भारी.

बेकन्बौअर प्रमाणेच योहान क्राइफ द फ्लाईंग डचमनला देखील आपल्या लेखणीतुन उतरवा ही फर्माईश.

दुरदर्शनके जमानेमे रविवारी एक सिरीयल असायची १ तास एकेका नामांकित फूटबॉलपटूवर एक भाग त्याची आठवण झाली. (चार्लटन, पेले, क्राइफ, बेकन्बाउअर, मिशेल प्लॅटिनी इ इ ) १९९०च्या वर्ल्डकपच्या आधी बहुतेक दाखवली होती.

आशिष सुर्वे's picture

7 Jun 2010 - 6:20 pm | आशिष सुर्वे

वाचताना स्वर्गीय अनुभव आला..

बस्स अजून काही लिहिण्याची आवश्यकता वाटतच नाही!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

मी-सौरभ's picture

9 Jun 2010 - 6:16 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 7:35 pm | मदनबाण

दर्जेदार लेख... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget