सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

३) एका खेळियाने - फ्लोट लाइक अ बटरफ्लाय.....

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
27 May 2010 - 4:28 pm

.... एकचक्रा नगरीच्या वेशीबाहेर आल्यानंतर भीम त्याच गाड्यातल्या अन्नाचे बकाणे मारू लागला... तिकडून बकासुर आला आणि आपले अन्न खाणार्‍या भीमाला चिडून म्हणाला..."अरे यःकश्चित मानवा, मी तुला खाल्ल्यानंतर तु खात असलेले हे अन्न माझ्याच पोटात जाणार आहे हे न समजण्याइतका तू मूर्ख कसा?..".. आजोबा आम्हाला एकदम 'हरितात्या' स्टाईल गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे मोठ्ठे करून भीमपराक्रमाच्या कथा ऐकायचो. ही म्हणजे "बच्चनगिरी" झाली. कुलुप लावायचं... चावी खिशात टाकायची आणि वर म्हणायचं "है कोई माय का लाल..." वगैरे वगैरे. पण त्या वयात भीमाच्या ह्या लीळांनी आम्ही भयंकर खुष व्हायचो... तोंडाचा "आ" मिटायचं भान राहायचं नाही. पण मोठेपणी मनात विचार यायचा...च्यायला भीम लई म्हंजे लई शक्तिमान होता... तसाही तो बकासुराला भारी पडलाच असता... मग असं "धतिंग" करायची गरजच काय? कशाला उगाच "नडायचं"? उगाच समोरच्याच्या "डोक्यात जाण्याची" कामं कशाला करायची? तुला बकासुराला मारण्याची सुपारी दिलीये ना? जा, लढ, मार आणि गपगुमान परत ये! उगाच त्याचं अन्नच खा... गाड्याचे बैलच सोडून दे... आजुबाजुची झाडंच काय उपट... कुणी सांगितल्यात नसत्या भानगडी?

पण आत्ता समजतं, ती म्हणजे काही लुटुपुटुची कुस्ती नव्हती हो.... त्यानी बकासुराची पाठ टेकवली की लोकं भीमावर बक्षिसाचा वर्षाव करणार नव्हती, बकासुर काही "में अब कहीं मूँह दिखाने के लायक नहीं रहा" म्हणून एकचक्रेतून तोंड काळं करणार नव्हता. ती जीवन-मरणाची लढाई होती. लक्ष विचलित झालेला एक क्षण जीवघेणा ठरणार होता. आणि भीम नेमकं तेच करायचा प्रयत्न करत होता. मूळ लढाईवरून त्याचं लक्ष भलत्याच गोष्टींनी विचलित करायचं! युद्धात असो वा कुस्ती, ज्यूडो, बॉक्सिंगसारख्या contact sports मध्ये असो, सर्वांत महत्त्वाचं सूत्र असतं "Relax - you are fighting" डोक्यात विचारांच काहूर उठलेलं असताना तुम्ही तुमच्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला मारूच शकत नाही. त्यासाठी प्रचंड एकाग्रता लागते आणि एकाग्रतेसाठी लागतं शांत चित्त. तुमचा प्रतिस्पर्धी हा नेहेमीच तुमच्यासाठी बकासुर असतो. त्या बकासुराची एकाग्रता भंग करणं हे गरजेचं असतं. कारण तुम्ही त्याचं नाक फोडलं नाही तर तो तुमचं डोकं फोडेल !

ज्यूडो, कुस्ती, बॉक्सिंगचा विचार करायला लागलो आणि पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते अर्थातच "महंमद अली"! Sports Illustrated, बीबीसी, जीक्यू चा sportsman of the century! The Greatest, The Champ, The Louisville Lip, अशी बिरूदावली मिरवणारा.... float like a butterfly, sting like a bee ह्या वाक्याशी एकरूप झालेला, आपल्या प्रतिस्पर्ध्याला आधी आपल्या शब्दांनी आणि मग आपल्या ठोश्यांनी नामोहरम करणारा... सर्वकाळचा सर्वश्रेष्ठ मुष्टियोद्धा..... The undisputed heavyweight champion of the world.... मुहंम्मssssssssssssssssssssद अली !

आपण वर भीमाच्या बाबतीत बघितल्या ना- प्रिसाइजली ह्याच सगळ्या गोष्टी "धतिंग" "नडायचं" "डोक्यात जायचं" समोरच्याच्या! बाउटच्या आधी प्रतिस्पर्ध्याबद्दल वाट्टेल ते बोलायचं, त्याची टवाळी करणार्‍या कविताच काय करायच्या, "मी ह्याला अमूक अमूक राउंडमध्ये नॉक आउट करणार आहे" वगैरे विधानं काय करायची, प्रतिस्पर्ध्यांना 'अस्वल', 'माकड' वगैरे म्हणून.... लढतीच्या आधी त्या प्राण्याची चित्रं असणारे कपडे घालून त्यांची चेष्टा काय करायची...मी सर्वश्रेष्ठ आहे"... "Ain't no reason for me to kill nobody in the ring, unless they deserve it".. अशी तद्दन सवंग वाटणारी विधानं करायची ... अगदी लढतीच्या वेळी सुद्धा प्रतिस्पर्ध्याला नको नको ते बोलून हैराण करायचं....सगळी सगळी कामं अली करायचा. पण निव्वळ एका तोंडाळ, वाचाळ, थिल्लर, टवाळ खेळाडूपेक्षा अली एका बाबतीत खूप खूप वेगळा होता - तो खरंच सर्वोत्कृष्ट होता !

१७ जानेवारी १९४२ रोजी केंटाकी मधल्या लुईजविल शहरात ओडेसा क्ले आणि कॅशियस मार्सेलस ह्यांच्या पोटी जन्माला आलेला कॅशियस क्ले अगदी स्वच्छंद बालपण जगला. बाप पेंटर आणि आई गोर्‍यांकडची मोलकरीण असली तरी कॅशियस आणि त्याच्या धाकट्या भावाला त्यांनी कधी तोशीस पडू दिली नाही. कॅशियस बॉक्सिंग करायला लागला तो मात्र अपघातानी. १२ वर्षांचा असताना त्याची नवीन कोरी "श्विन" सायकल चोरीला गेली. जो मार्टिन नावच्या पोलिस ऑफिसरकडे तक्रार करायला गेल्यावर तारुण्यसुलभ आवेषानी (हो... तिथे जर १४व्या वर्षी पोरगा बाप बनत असेल तर १२ व्या वर्षी "तरुण" असणारच ना?) हा मार्टिनला "एक एक को चुन-चुन के मारूंगा" किंवा "मैं उस कमीने चोर का खून पी जाऊंगा" अश्या अर्थाची काही इंग्रजी वाक्यं बोलला असेल... मार्टिन त्याला म्हणाला "अरे रेड्या (हे आपलं उगीच माझ्या मनचं वाक्य हा!)... येवढीच जर रग असेल तर बॉक्सिंगमध्ये जिरव ना!".. आणि दुसर्‍या दिवशीपासून कॅशियस मार्टिनच्या जिममध्ये जायला लागला ! आधीच अंगापिंडानी धष्टपुष्ट असलेला कॅशियस व्यायाम आणि बॉक्सिंगमुळे प्रचंड ताकदवान बनला. पण खरंतर त्याची रग जिरली नाही.... कॅशियस नेहेमी आपण किती बलवान आहोत... समोरच्याला कसे ठोकू, फोडू करू अशीच बडबड करायचा. मुष्टियुद्धासाठी लागणार्‍या "एनर्जी"चं कॅशियस जणू गोदाम होता. मुष्टियोद्ध्यांचे काही प्रकार असतात. Inside-fighters हे प्रतिस्पर्ध्याच्या अगदी जवळ राहून भक्कम बचाव आणि ताकदवान "हुक्स" आणि "कट्स" (हात कोपरात वाकवून मारलेले फटके) च्या साहाय्याने प्रतिस्पर्ध्याला जेरबंद करतात. (उदा: टायसन, जो फ्रेझियर वगैरे) Brawler प्रकारचे लढवय्ये एका जागी उभं राहून आपल्या असुरी ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवतात (रॉकी मार्शियानो, सॉनी लिस्टन, जॉर्ज फोरमन वगैरे) आणि Out-fighters हे प्रतिस्पर्ध्यापासून लांब राहून योग्य वेळी आघात करतात, कॅशियस अति चपळ हालचाली करायचा... त्याच्या हालचाली आणि "रिफ्लेक्सेस" अतिजलद होते. त्यामुळे त्याची Out-fight ची पद्धत विकसित होत गेली. आणि पुन्हा साहेबांचा माज असा की सामान्य बॉक्सरसारखा हात चेहर्‍यासमोर नाही तर कमरेपाशी ठेऊन लढणार...जणू काही समोरच्याला हिणवतोय "तू काय मला मारणार लेका??"

१९६० सालापर्यंत (वयाच्या १८ व्या वर्षीपर्यंत) कॅशियसनी शिकागोच्या "गोल्डन ग्लव्ह" स्पर्धेसकट अमेरिकेतली प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा जिंकली होती. आणि अश्या दैदिप्यमान कामगिरी नंतर त्याची रोम ऑलिंपिक्ससाठी निवड झाली नसती तरच नवल होतं. रोमला जाताना मात्र कॅशियसला प्रचंड तयारी करावी लागली..... विमानाची भीती घालवण्यासाठी. माजलेल्या खोंडाला लोळवण्याची ताकद असलेला कॅशियस विमानातून उडायला मात्र जाम घाबरायचा. त्याच्या कोचनी नकाशे दाखवून दाखवून आणि बाबा-पुता करून त्याची खात्री पटवली की अमेरिकेहोऊन रोमला जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नाही. तेव्हा कुठे कॅशियस विमानात बसायला तयार झाला. ते पण पाठीवर स्वतः खरेदी केलेलं पॅराशूट घेऊनच !!!

रोमला पोहोचल्यानंतर मात्र कॅशियस पुन्हा आपल्या रंगात आला... "मी जग जिंकणार आहे".... "I am going to whup my opponents" असल्या विधानांमुळे बाकीचे खेळाडू त्याला "ऑलिंपिकनगरीचा महापौर" म्हणू लागले. बेल्जियन, रशियन आणि ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत कॅशियस "लाईट हेवीवेट" गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला. सुवर्णवेध घेण्यासाठी त्याला पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्कीला (तुम्हाला वाचायला इतका त्रास होतोय तर मला लिहायला किती झाला असेल?) हरवावं लागणार होतं. पीर्त्रझकोवस्की (हे सरळ कॉपी-पेस्ट केलंय) २०० पेक्षा जास्त लढती खेळला होता. पण अवघ्या १८ वर्षीय कॅशियसनं पीर्त्रझकोवस्कीला हरवलं... हरवलं म्हणजे असं की लढतीच्या शेवटी पीर्त्रझकोवस्कीची शॉर्टस त्याच्या रक्तानी माखलेली होती. आपल्या पहिल्याच प्रयत्नात क्लेनं चक्क ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलं ! रोमहून कॅशियस परत आला ते व्यावसायिक हेवीवेट मुष्टियोद्धा बनण्याचं ठरवूनच. अमेरिकेला परत आल्या आल्या क्ले ला "लुईजविल स्पॉन्सरशिप ग्रुप" नं $१०,००० देऊन करारबद्ध केलं. क्ले "व्यावसायिक" झाला. आता क्ले आणि त्याच्या प्रायोजकांचा शोध सुरू झाला तो एका योग्य प्रशिक्षकासाठी.

आर्ची मोरच्या कँपमधून क्ले पळून आला कारण मोरनी त्याची शैली बदलायचा प्रयत्न केला... आणि खरंतर घरकामं वगैरे करायला लावली (म्हणजे क्लेला माणसाळायचा प्रयत्न केला). मग क्ले कशाला मोरकडे राहातोय?? मायामीला अँजेलो डन्डी कडे प्रशिक्षण घ्यायला लागल्यावर काहीच दिवसांत क्लेची लढत झाली ती आपल्या पूर्व प्रशिक्षकाशी... आर्ची मोरशी! क्लेनं अर्थातच त्याला धूळ चारली. १९६३ मध्ये क्लेचं व्यावसायिक रेकॉर्ड होतः १९ लढती, १९ विजय आणि त्यातले १६ नॉकआउट्स !

आणि मग सुरु झाला क्लेच्या जीवनातला सर्वांत महत्त्वाचा अध्याय ! क्लेनं आव्हान दिलं ते तेव्हाच्या world heavyweight champion सॉनी लिस्टनला ! सॉनी आधी कैदेत राहिलेला होता... आपल्या रानटी ताकदीच्या जोरावर त्यानं फ्लॉइड पॅटरसनसारख्या अव्वल मुष्टियोद्ध्याला अवघ्या २ मि. आणि ६ सेकंदात फोडलं होतं. विशेषज्ञांच्या मते क्लेला लढत जिंकण्याची जराशी ही संधी नव्हती. पण नियतीच्या आणि क्लेच्या मनात काही वेगळंच होतं. पहिल्या राउंडपासूनच क्ले लिस्टनच्या भोवती उड्या मारत होता. हातोड्यासारख्या आपल्या हातांनी ठोसे मारण्याची संधीच लिस्टनला मिळाली नाही. कारण क्ले नेहेमीच त्याच्या टप्प्याच्या बाहेर राहात होता. पण लिस्टनची पापणी लवायच्या आत विजेच्या चपळाईने त्याच्यावर हल्ला करून आपल्या "जॅब्स" आणि डाव्या-उजव्या हातांच्या होरदार प्रहारांनी त्याला हैराण करायची एकही संधी क्ले सोडत नव्हता. सातव्या फेरीत लिस्टननं पुढे लढायला नकार दिला! तेव्हा रिंगभर नाचत क्ले ओरडून आपल्या टीकाकारांना जाब विचारत होता "now who is the greatest? Eat your words. I say eat your words."

ह्याच लढतीनंतर क्लेनं इस्लाम स्वीकारल्याचं जाहीर केलं. त्यानी आता नाव धारण केलं ते "महंमद अली"! ह्याबद्दल त्याच्यावर खूप टीका झाली, खूप वाद झाले. पण क्ले... माफ करा.. "अली" अश्या गोष्टींना भीक घालणार होता थोडाच? त्यावेळी एमी टेरेली नामक त्याचा प्रतिस्पर्धी त्याला लढतीआधी उचकवण्यासाठी मुद्दाम होऊनच "क्ले" म्हणून संबोधत होता. त्याच्याविरुद्धच्या लढतीत त्याला हाणता हाणता प्रत्येक ठोश्यागणिक अली त्याला विचारत होता.... "So...What's my name?!!" टेरेलीची शंभरी भरली होती हे सांगणे न लगे! त्यात पुढे अलीनी व्हिएतनाम युद्धासाठी अमेरिकन सैन्यात भरती व्हायला साफ नकार दिला ! एक वेगळाच अली लोकांना दिसला... तो म्हणाला "Why should they ask me to put on a uniform and go 10,000 miles from home and drop bombs and bullets on Brown people in Vietnam while so-called Negro people in Louisville are treated like dogs and denied simple human rights? No I’m not going 10,000 miles from home to help murder and burn another poor nation simply to continue the domination of white slave masters of the darker people the world over." अलीची विधान त्याच्या व्यक्तिमत्त्वासारखीच जहाल होती. त्याच्यावर बंदी घालण्यात आली.... त्याचा जगज्जेत्याचा खिताब काढून घेण्यात आला.... त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मार्च १९६७ ते ऑक्टोबर १९७० अशी साडेतीन वर्षं अली व्यावसायिक बॉक्सिंगपासून दूर होता.

मार्च १९७१ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये अलीची "fight of the century" झाली ती "स्मोकिन जो" - जो फ्रेझियरशी. साडेतीन वर्षांच्या सन्यासानं अलीच्या हालचाली मंदावल्या होत्या... त्याचं floating like a butterfly पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. तरीही अलीनी फ्रेझियरला जीवाच्या करारानी लढत दिली. पण अलीला आपल्या तब्बल ३१ व्यावसायिक लढतींनंतर आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला ! पण १९७४ मध्ये क्ले पुन्हा फ्रेझियरशी लढला तेव्हापर्यंत त्यानी अजून १२ लढती जिंकल्या होत्या आणि केन नॉर्टनकडून एक पराभव पत्करला होता. पण 'थकलेल्या' अलीनी आपल्या आधीच्या पराभवाचं उट्टं काढलंच ! आणि मग आली ती मुष्टियुद्धाच्या इतिहासातली सर्वांत बहुचर्चित आणि अविस्मरणीय लढत "Rumble in the Jungle".. तेव्हाच्या झायर आणि आताच्या काँगो मध्ये. योद्धे होते तत्कालीन जगज्जेता जॉर्ज फोरमन आणि माजी जगज्जेता मुहंमद अली ! दोघांनीही झायरमध्ये खूप दिवस मेहनत केली होती. अलीनी थोडी जास्त... कारण त्यानी लढतीआधी फोरमनसाठी खास कविता रचली !

You know I’m bad.
just last week, I murdered a rock,
Injured a stone, Hospitalized a brick.
I’m so mean, I make medicine sick.
I’m so fast, man,
I can run through a hurricane and don't get wet.
When George Foreman meets me,
He’ll pay his debt.
I can drown the drink of water, and kill a dead tree.
Wait till you see Muhammad Ali.

तिथे फोरमनही काही कमी नव्हता... बोलण्यातच नव्हे तर लढण्यातही. फोरमनची कारकीर्दही अली इतकीच दैदिप्यमान.... दोघेही ६ फूट ३ इंच उंच.... दोघांचीही वजनं शंभर किलोच्या वर...दोघांच्याही बाहूंत अमर्याद ताकद.... दोघांचीही शरीरं मुशीतून शिश्याच्या मूर्ती काढाव्यात तशी ... बलदंड....फोरमन २५ वर्षांचा तर अली ३२... दोघांनीही ऑलिंपिक सुवर्णपदकं जिंकली होती....दोघांचीही वृत्ती मुष्टियोद्ध्याला साजेशी.... पाशवीच ! फोरमननी जगज्जेत्या फ्रेझियरला अवघ्या २ मिनिटांत नॉक आउट करून जगज्जेतेपद पटकावलं होतं. त्याआधीच्या तब्बल ४० लढतींत फोरमन अजिंक्य राहिला होता... पण अलीनीही फ्रेझियर, नॉर्टन, लिस्टनसारख्या धुरंधरांना अस्मान दाखवलं होतं... तंत्रशुद्ध खेळ आणि चपळाई ही अलीची खुबी तर अमानवी ताकद ही फोरमनची जमेची बाजू !!! दोघांच्यात डाव-उजवं ठरवणं कठीण - नव्हे अशक्य होतं. ह्या लढतीची प्रचंड जाहिरात झाली होती. ह्या युद्धाचा विजेता जागतिक मुष्टियुद्धाचा अभिषिक्त सम्राट बनणार होता. ३० ऑक्टोबर १९७४ रोजी किंशासाचं माइ २० स्टेडियम ६०,००० लोकांनी खचाखच भरलेलं होतं....अमेरिकेतच नव्हे तर जगभर लाखो करोडो रसिक टीव्हीवर हे अभूतपूर्व द्वंद्व पाहात होते. आव्हानवीर म्हणून प्रथम महंमद अली रिंगणात उतरला...."अली - बुम्मा ये" (Ali - kill him) च्या जोरदार घोषात अलीचं स्वागत झालं... मग जागतिक विजेत्या जॉर्ज फोरमनचं आगमन झालं... दोघे पर्वतकाय मल्ल एकमेकांसमोर उभे राहिले.... अली आपल्या टोमण्यांनी, प्रक्षोभक बोलण्यानी फोरमनची एकाग्रता भंग करायचा प्रयत्न करत होता.... पण फोरमनला हे सगळं नवीन नव्हतं... त्या क्षणी तो मुष्टियुद्धाचा बादशहा होता.... आणि मुष्टियुद्धातल्या "न भूतो न भविष्यति" अश्या लढतीला सुरुवात झाली.

अलीनी सुरुवातीलाच आपल्या जॅब्स आणि "काँबिनेशन्स"नी फोरमनवर घणाघाती हल्ला चढवला. पण काहीच क्षणांत फोरमन सावरला.. नुसता सावरलाच नाही तर त्यानेही अलीवर जोरदार प्रतिहल्ला डागला. अलीच्या लक्षात आलं की नेहेमीसारखं खूप हालचाली करणं म्हणजे आपलीच जास्त दमछाक करून घेणं. दुसर्‍याच फेरीत अलीनी आपला "गियर" बदलला. फोरमनवर वार करण्यापेक्षा तो रोप्सला रेलून फोरमनचे पंचेस झेलू चुकवू लागला. ही "रोप-अ-डोप" योजना कमालीची यशस्वी ठरली. फोरमन सगळी ताकद पणाला लावून अलीवर हल्ला चढवत होता... पण अली मात्र आपल्या चपळ हालचाली आणि "रिफ्लेक्सेस"च्या मदतीनी फोरमनचे बहुतेक ठोसे चुकवत होता... प्रत्येक वेळी "they told me you could punch, George!" असं म्हणून त्याला चिथावत होता आणि संधी मिळताच फोरमनवर आपल्या ताकदवान जॅब्सचा वर्षाव करत होता. गेल्या कित्येक लढतींत फोरमनला सहा मिनीटांच्या वर लढावं लागलं नव्हतं... थोड्या वेळानं फोरमन थकला... ती संधी साधून अलीनी नव्या जोमानी त्याच्यावर ठोसे हाणायला सुरुवात केली....पण फोरमनही तितकाच लढवय्या होता. अलीच्या ठोश्यांनी त्याचा चेहरा पुरीसारखा सुजला होता. समोरचं नीट दिसतही नव्हतं... पण हार मानेल तर तो फोरमन कसला? त्यानीही आपल्या हुक्स आणि क्रॉसेसनं अलीला जेरीस आणलं होतं. सिंह आणि हत्तीच्या ह्या युद्धात हार तरी कोण मानणार?? दोघेही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत झुंज देणारे खंदे वीर होते. कोणीच इंचभरही मागे हटायला तयार नव्हतं. ठोश्याला ठोसा, फटक्याला फटका दिला-घेतला जात होता. दोघं एकमेकांपेक्षा अणूभरही कमी नव्हते - ताकद, दमसास, जिद्द, चिकाटी, तंत्र, त्वेष, माज - कुठल्याच बाबतीत.

आठव्या फेरीच्या सुरुवातीला मात्र दोघेही प्रचंड दमले होते. फोरमननं अलीवर पुन्हा एकदा हल्ला चढवला... अलीनी आपल्या रणनीतीला अनुसरून रोपचा आसरा घेतला. फोरमनचे काही ठोसे खाल्ल्या आणि हुकवल्यावर अचानक अलीनी जीवाच्या करारानी फोरमनवर निकराचा मारा केला. डाव्या हाताच्या एका "हुक" नं फोरमनचं डोकं वर उचललं गेलं. दुसर्‍याच क्षणी अलीचा एक ताकदवान उजवा "पंच" फोरमनला चेहर्‍यावर बसला आणि फोरमन हादरला.... त्या जगज्जेत्याचे बुरूज ढासळले.... तटबंदी भेदली गेली. भेलकांडत फोरमन आपल्या पाठीवर पडला. तो उठून परत आपल्या पायावर उभा राहीपर्यंत वेळ टळून गेली होती. नवा जागतिक विजेता हेवीवेट मुष्टियोद्धा होता "महंमद अली"!!! त्या सामन्याच्या ह्या चित्रफितीवरून तुम्हाला त्या लढतीच्या तीव्रतेची कल्पना येईल

ही लढत म्हणजे महंमद अलीच्या झळाळत्या कारकीर्दीवरचा सुवर्णकळस होता. नंतर अली बर्‍याच लढती खेळला. अगदी जो फ्रेझियरला देखील त्याने "Thrilla in Manilla" म्हणून प्रसिद्ध झालेल्या लढतीत हरवलं (ह्याच लढतीवरून पुढे Rocky चित्रपट बनवण्यात आला), ७६ मध्ये आधी त्याला हरवलेल्या केन नॉर्टनला हरवलं. पण Rumble in the Jungle च्या वेळेचा अली पुन्हा बघायला नाही मिळाला. लिऑन स्पिंक्स, लॅरी होम्स आणि शेवटी ट्रेव्हर बर्बिककडून हरल्यावर मात्र अलीनी निवृत्ती जाहीर केली.

वैयक्तिक आयुष्यात अलीला फार हालापेष्टा जरी सोसाव्या लागल्या नाहीत, तरी १९५० च्या सुमाराचा वर्णद्वेष थोड्याफार प्रमाणात वाट्याला आलाच. निवृत्त झाल्यावर अलीनी आपलं आयुष्य लोकसेवेत घालवलं. अफगाणिस्तान, इराक, क्यूबा, मेक्सिको, मोरोक्को आदि अनेक देशांत अमेरिकन सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सदिच्छा दौरे केले. १९९४ मध्ये त्याला पार्किनसन्स झाला. १९९६ मध्ये अली-फोरमनच्या Rumble in the Jungle वरच्या लघुपटाला मिळालेलं ऑस्कर घेताना त्याचा एकेकाळचा कडवा प्रतिस्पर्धी आणि आताचा परममित्र जॉर्ज फोरमन पार्किनसन्सग्रस्त अलीला आधार देत होता ! ह्याला म्हणतात "खेळाडू".

महंमद अली नावाच्या या एका खेळियाने कविता केल्या, चित्रपटांत कामं केली, जगभरातल्या अक्षरशः कोट्यवधी गोरगरीबांसाठी देश, पंथ, वर्ण.. कसलाही मुलाहिजा न ठेवता मदत केली आणि प्रचंड निधी जमवला, पार्किनसन्सग्रस्तांसाठी "मुहंमद अली पार्किनसन सेंटरची" स्थापना केली. आपल्या प्रतिस्पर्ध्याची टर उडवण्यार्‍या कविता करणार्‍या अलीचे आताचे शब्द होते "We all have the same God, we just serve him differently. Rivers, lakes, ponds, streams, oceans all have different names, but they all contain water. So do religions have different names, and they all contain truth, expressed in different ways forms and times. It doesn't matter whether you're a Muslim, a Christian, or a Jew. When you believe in God, you should believe that all people are part of one family. If you love God, you can't love only some of his children."

आपल्या सबंध कारकिर्दीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मारणारा ठेचणारा, भलेबुरे बोलून आणि आपल्या विध्वंसक खेळानी त्यांना खच्ची करणारा अली आपल्या आयुष्यातल्या उत्तरार्धातल्या कतृत्त्वानं "एक महान मुष्टियोद्धा"ह्या पलिकडे सुद्धा महान माणूस बनला. एका सच्च्या खेळियाचा citius altius fortius हा धर्म त्यानी तंतोतंत पाळला आणि भेदापलिकडे जाऊन दुर्लक्षित, दुर्बल आणि दुर्दैवी समाजघटकांना मदत करण्यात आपला वाटा उचलला. आज "float like a butterfly, sting like a bee" हे वाक्य वाचताना आमच्या डोळ्यासमोर उभा राहातो एक सर्वार्थानी उत्तुंग, विशाल आणि वादळी खेळिया - महंमद अली !

क्रीडामौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर!

एक खेळीयाचे वर्णन तेवढ्याच ताकदीच्या लेखणीतून! हॅट्स ऑफ जेपी.

अदिती

कानडाऊ योगेशु's picture

27 May 2010 - 4:57 pm | कानडाऊ योगेशु

योग्य शब्दपेरणी..भीम-बकासुर कथेचा सुरेख प्रोलोग..
आणि अली आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यामधल्या लढतीचे थरारक वर्णन..
अप्रतिम लेखमालेतील अजुन एक अप्रतिम लेख.. !

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

स्वाती२'s picture

27 May 2010 - 5:18 pm | स्वाती२

सुरेख!

भडकमकर मास्तर's picture

27 May 2010 - 5:19 pm | भडकमकर मास्तर

ह खेळ आम्हाला आवडत नाही... अजिबात आवडत नाही...

पण लेख आवडला...
हा आपला जिभेचा व्यायाम...हं म्हणा रे......

झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्की ......

शैलेन्द्र's picture

27 May 2010 - 7:50 pm | शैलेन्द्र

एक शरदीनीका येवु देत ना यावरं

बाकी लेख.... अप्रतिम.

प्रमोद्_पुणे's picture

27 May 2010 - 5:25 pm | प्रमोद्_पुणे

जे. पी. पुन्हा एकदा सही परिचय.. मस्तच..

झकासराव's picture

27 May 2010 - 5:43 pm | झकासराव

जबरदस्त लेख परत एकदा. :)

Dhananjay Borgaonkar's picture

27 May 2010 - 6:28 pm | Dhananjay Borgaonkar

जबरदस्त लेख्..अलीच्या पंच एवढाच ताकदीचा.
तुमच्या लेखणीत जादु आहे मालक.
अली आणि फोरमनच्या लढतीच पुर्ण सजिव चित्र डोळ्यासमोर उभ केलत.
आपल्या पुढील लेखास शुभेच्छा.

(आता फुट्बॉल वल्ड्कप चालु होतोय्..एखाद्या फुट्बॉल पटु बद्दल लिहाल काय?)

शानबा५१२'s picture

27 May 2010 - 6:38 pm | शानबा५१२

छान

***************************************************

There are 3 kinds of people in this world...those you want things to happen, those that make things happen, and those who just wonder what the hell happened!

प्रभो's picture

27 May 2010 - 6:47 pm | प्रभो

एक नंबर झालाय रे लेख जेपी...

लेख मस्त झालाय

'फ्लोट लाइक अ बटरफ्लाय'

हे वाचुन मला प्रथम वाटलं की मायकल फ्लेप्स्वर लेख आहे की कोणा एयर ग्लायडींग / कार रेसिंग करणार्‍यावर.

चेतन
अवांतर: मला बॉक्सिंगमधलं काहीच कळत नाही पण डब्लुडब्लुफ् मात्र जाम आवडतं

गणपा's picture

27 May 2010 - 7:08 pm | गणपा

L)
१ नंबरी लिखाण.

टारझन's picture

28 May 2010 - 7:03 am | टारझन

वाईल्ड वाईल्ड वेस्ट !!
मॉर्गन मॉर्गन बेस्ट !!

बॉक्सिंगचे सामने पहाताना हाताच्या मुठी ऑटोमॅटीक आवळल्या जातात , अंगात एक स्फुर्ती चढते , एकदा तर मी म्याच बघताना भावालाच ठोसा लगावला होता .... असेच काहीसे रोमांच लेख वाचताना आले .

- या आलि (रेहेम आली... या आली )

सहज's picture

28 May 2010 - 7:32 am | सहज

नॉक आउट लेख!

टार्‍या एचआरमामाला घेउन बॉक्सींग मॅच बघायला जा!

भारद्वाज's picture

27 May 2010 - 7:11 pm | भारद्वाज

व्वा,अप्रतिम लेख.

शुचि's picture

27 May 2010 - 8:07 pm | शुचि

खेळ रानटी आहे.
लेख सुंदर.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अनिल हटेला's picture

27 May 2010 - 8:07 pm | अनिल हटेला

वरील सर्वाशी सहमत...

:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

ज्ञानेश...'s picture

27 May 2010 - 8:32 pm | ज्ञानेश...

मी इतके दिवस याला पाकिस्तानचा बॉक्सर समजत होतो. :O
याची मुलगी- लैला अलिसुद्धा बॉक्सर होती ना?

एक मात्र नक्की झालंय,
मॉर्गनरावांच्या प्रत्येक लेखावर वाचनखूण ठेवावी लागते.

जियो मॉर्गन.
(महम्मद अलिने इस्लाम का बरे स्वीकारला असावा, असा प्रश्न पडला ! हाच प्रश्न मायकल जॅक्सनच्या बाबतही पडला होता. असो.

मेघवेडा's picture

27 May 2010 - 8:40 pm | मेघवेडा

एकदमसे क आणि ड आणि क लेख रे जेप्या!!

>> Relax - you are fighting डोक्यात विचारांच काहूर उठलेलं असताना तुम्ही तुमच्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला मारूच शकत नाही.

लाख लाख वेळा सहमत! कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग सारखे कॉन्टॅक्ट स्पोर्टसच काय, प्रत्येक खेळाचं हेच सूत्र असतं! प्रत्येक खेळात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिकताही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते! आपल्या क्रिकेटसारख्या खेळात तर मानसिक क्षमताच जास्त महत्त्वाची असं माझं ठाम मत आहे! तुझ्या वर उल्लेखलेल्या वाक्याचं क्रिकेटमधील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद-सोहेल चा चॅप्टर! कोणत्याही संघासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि खासकरून त्या दौर्‍यावरील कसोट्या म्हणजे त्यांच्या मानसिकतेचीच कसोटी असते नाही का? मुळात कसोटी सामने खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमतेचेही कसोटी पाहतातच! कणखर मानसिक क्षमतेचे खेळाडूच यशाची सर्वोच्च शिखरे पार करतात, नाही का! याच कणखर मानसिक क्षमतेच्या बळावर आपला सचिन शारीरिक क्षमतेच्या सर्व मर्यादा ओलांडत २०० धावा काढू शकला, आपला अनिल जबडा फाटलेला असतानाही सलग १४ ओव्हर्स टाकून लाराची विकेट काढू शकला! याच कणखर मानसिकतेच्या आधारावर लान्स आर्मस्ट्राँग सात सात वेळा 'टूर' जिंकू शकला, दोन्ही कानांचे टायसनने तुकडे काढले असूनसुद्धा होलिफील्ड परत रिंगणात लढायला उतरला तो याच कणखर मानसिकतेच्या बळावर!

असो. तुझ्या वर उल्लेखलेल्या वाक्यातून विचारांचं चक्र सुरू झालं! धन्यवाद रे जेपी. असेच उत्तमोत्तम लेख येऊदेत!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

जे.पी.मॉर्गन's picture

28 May 2010 - 10:27 am | जे.पी.मॉर्गन

तू दिलेल्या प्रत्येक उदाहरणाशी सहमत. सगळ्याच खेळात शांत राहाणं महत्त्वाचं असतं. पण बॉक्सिंगसारख्या रानटी खेळात, जिथे येवढा adrenaline rush असतो, असं थंड डोकं ठेवणं महाकठीण आहे रे! थंड डोक्यानी समोरच्याला हाण हाण हाणायचं म्हणजे विकृती आहे राव! पण त्या निमित्तानी "टेंपरामेंट" चा विषय काढलास.... वोइच तो फर्क होता है अच्छे और महान खिलाडी में !! खरं ना?

जे पी

मेघवेडा's picture

28 May 2010 - 2:00 pm | मेघवेडा

वोइच तो फर्क होता है अच्छे और महान खिलाडी में !!
अरे एकदम लाख मोलाची बात! 'चांगले' खेळाडू पुष्कळ येतात आणि जातात पण एखादा सचिन, आर्मस्ट्राँग, शूमाकर, सॅम्प्रसच कायम स्मरणात राहतो!

>> सगळ्याच खेळात शांत राहाणं महत्त्वाचं असतं.
खरंय. एफ वन सारख्या खेळात तर जरा डोक्यावरचा ताबा सुटला तर परिणाम जीवघेणे ठरू शकतात! असा एक गुणी पण आततायी ड्रायव्हर मला आठवतो तो तुझा अभिधानबंधू ;) 'जेपी मोन्टोया'! किती तरी वेळा 'ओव्हर अ‍ॅग्रेशन' मुळे अ‍ॅक्सिडंट्स झाले होते त्याचे! तसंच गोरान इव्हानिसेविचचं. एक अत्यंत गुणी खेळाडू पण एकदम गरम डोक्याचा! त्यामुळेच जास्त ग्रँड स्लॅम्स नाही जिंकू शकला!

बाकी बॉक्सिंगसारख्या खेळात डोकं थंड ठेवून समोरच्याला हाणणं कर्मकठीण आहे हे पटलं!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 8:48 pm | इन्द्र्राज पवार

जेपी जी.... तुमच्या या इतक्या सुंदर, सचित्र आणि माहितीपूर्ण लिखाणाला सलाम करून "अली" च्या जीवनातील फक्त एकच बाब यात "अ‍ॅड" कराविशी वाटते... जी तुम्हाला निश्चितच माहित असेल, पण अन्य सदस्यांनादेखील ती माहित व्हावी म्हणून इथे देत आहे.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी "रोम ऑलिम्पिक" मध्ये "गोल्ड मेडल" चा बहुमान मिळवून अमेरिकेला आल्यानंतर त्याचे कौतुक प्रामुख्याने झाले ते निग्रो लोकांच्याकडून आणि "बॉक्सिंग" या खेळाकडे "पैशाचे कुरण" म्हणून पाहणार्‍या गोर्‍या धंदेवाइकांकडून. १८ वर्षाच्या अलीला आपण आता "हिरो" झालो असे वाटणे नैसर्गिकच होते, पण त्याला "रंगभेदा"चा फटका बसला तो काही गोर्‍यांनी त्याला एका हॉटेलमधून हाकलून लावल्यानंतर. त्यांच्या व्याख्येत "अली" हा प्रथम "काळा" व नंतर "बॉक्सिंग विजेता" असल्याने ते हॉटेल केवळ गोर्‍यासाठी राखीव होते. काऊंवरमागील वेटरने तर त्यांना पेय देण्याचेही नाकारले होते. अलीने त्या गोर्‍या धटींगणांशी चार हात केले, पण त्यावेळी तेथील पोलीस फोर्सदेखील "आपल्या" लोकांची बाजू घेण्यात पटाईत होता (पाहा : "मिसिसिपी बर्निंग").

अपमान आणि संतापाने फणफणत बाहेर आलेल्या अलीला त्याच्या बरोबरीच्या काही मित्रांनी गावात असलेल्या "काळ्या-गोर्‍यांच्या" भेदभावाबाबत चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला..... गाडीतून ते ओहिओ नदी जवळ आले.... अलीने गाडी थांबविली आणि मित्रांच्याकडे पाहत म्हणाला, "कशासाठी मी हे सुवर्ण पदक कमावले? जर हा देश आम्हाला अशी हीन दर्जाची वागणूक देतो तर या देशासाठी मिळवलेले हे मेडल का गळ्यात घालून फिरू....". (त्यावेळी तो जाईल तिथे गळ्यात मेडल घालूनच फिरे....) असे म्हणत एका झटक्यात अलीने ते मेडल काढले आणि ओहिओ नदीच्या पात्रात भिरकावून दिले.

१९९६ पर्यंत या भेदाची तीव्रता फारच कमी झाली होती.... आणि त्या वर्षीच्या "अटलांटा ऑलिम्पिक" मध्ये श्री. मोहमद अली यांना समितीने पुनश्च १९६० चे सुवर्णपदक एका खास कार्यक्रमात प्रदान केले ते त्यांनी आभारपूर्वक स्वीकारले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

जे.पी.मॉर्गन's picture

28 May 2010 - 10:37 am | जे.पी.मॉर्गन

पवारसाहेब ! (नको.... दुसरं नाव तुम्हीच सुचवा बुवा.. पवारसाहेब अगदीच कॉपीराइटेड वाटतं)... हा किस्सा माहिती होता.. विल स्मिथचा "अलि" बघितला होता. पण मिसिसिपी बर्निंग बद्दल ठाऊक नव्हतं.... बघायलाच हवा !

खूप खूप धन्यवाद.

जे पी

इन्द्र्राज पवार's picture

28 May 2010 - 1:53 pm | इन्द्र्राज पवार

"....पवारसाहेब अगदीच कॉपीराइटेड वाटतं...."

नक्कीच ! त्यामुळे पुन्हा टाईप करायचा प्रसंग कधी आलाच तर साधे स्वच्छ "इन्द्र".... ऑलवेज वेलकम...!

......आणि हो मी मूळ प्रतिक्रियेतच लिहिले होते की, "सुवर्णपदक" ओहिवो नदीत फेकून देण्याचा किस्सा व कारण तुम्हाला माहित असणारच... पण मी त्याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, आपल्या वाचकांना अलीच्या आयुष्यातील हा एक महत्वाचा निर्णय ठाऊक असणे गरजेचे आहे... सर्वसाधारणपणे 'अली म्हणजे एक जगज्जेता मुष्ठीयोध्दा' अशीच सर्वांची कल्पना असते, पण आपल्या रंगामुळे स्वतःवर आणि आपल्या जमातीवर होणार्‍या अन्यायाबद्दल चीड व्यक्त करण्यासाठी त्याने अंगीकारलेला मार्ग काय होता हे देखील माहित होणे आवश्यक आहे.

("मिसिसिपी बर्निंग" चुकवू नका.... तुमच्या सारख्या अभ्यासकाने असे चित्रपट पाहिलेच पाहिजेत असा हा "रंगभेदा"वरील ज्वलंत चित्रपट आहे.... मात्र बघायचा असेल तर तो रात्रीच्या नि:शब्द वातावरणातच पहा.... तोही मोबाईल बंद करून !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

इन्द्र्राज पवार's picture

28 May 2010 - 2:01 pm | इन्द्र्राज पवार

"मिसिसिपी बर्निंग" बद्दल एक मुद्दा राहिला..... हा चित्रपव सत्य घटनेवर आणि "केकेके" या संघटनेच्या "अमेरिका ओन्ली फॉर व्हाईट्स...." या चळवळीवर आधारित आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मदनबाण's picture

27 May 2010 - 9:36 pm | मदनबाण

सु रे ख ले ख . . . :)
या निमित्त्याने बॉक्सिंग प्रमोटर डॉन किंग आणि त्याची हेयर स्टाईल सुद्धा आठवली !!! ;)

मदनबाण.....

Jealousy is nothing more than a fear of abandonment.

राघव's picture

28 May 2010 - 1:17 am | राघव

पुन्हा एकदा हॅट्स ऑफ! दोघांनाही!!

स्वगतः राघवा, काय सारखी हॅट काढून दाखवायची?? एकदाच काढून सरळ जेपीच्या पायांशी ठेवून दे कसा!! :)

राघव

प्राजु's picture

28 May 2010 - 2:20 am | प्राजु

जबरदस्त शैली! जबरदस्त लेख...!
वाह!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बेसनलाडू's picture

28 May 2010 - 1:56 pm | बेसनलाडू

(जबरदस्त)बेसनलाडू

चतुरंग's picture

28 May 2010 - 7:24 am | चतुरंग

(रॉकी)चतुरंग

Pain's picture

28 May 2010 - 10:40 am | Pain

लेख मस्त आहे...आणि खेळसुद्धा !

चक्रमकैलास's picture

28 May 2010 - 11:35 am | चक्रमकैलास

जे.प्या. एवढी सगळी माहिती मिळवतोस तरी कशी रे....मस्त लेख आहे...

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

मी-सौरभ's picture

30 May 2010 - 12:55 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

अप्पा जोगळेकर's picture

30 May 2010 - 11:31 am | अप्पा जोगळेकर

जब्राट लिवलंय. पण तरी नॉक आउट लेख मात्र पहिलाच होता असं वाटलं. तो लिअँडर पेस वाला. ही लेखमालिकाच सॉलिड आहे. सकाळी खेळायला जाण्याआधी वाचलं पाहिजे. दोन - चार स्मॅश खटाखट बसतील. कोण म्हणतं बॉ की ह्यो खेळ रानटी आहे ?

अनिकेतपन्त's picture

9 Nov 2011 - 8:18 pm | अनिकेतपन्त

स्मोकिन् जो फ्रेजर च्या निधनाच्या बातम्यात सारख सारख सान्गत होते ते ऐकुन त्या लोकांची 'थ्रिला इन मनिला' डाउनलोड करुन बघितली.. ती बघुन आपली तर साइड पक्की झाली.
"जो फ्रेझर" >> "मुहम्मद अली"

जरूर पहावी ही डोक्युमेंट्रि...

जे.पी.मॉर्गन's picture

10 Nov 2011 - 1:09 pm | जे.पी.मॉर्गन

ज्यो फ्रेझियर ग्रेट होता ह्यात वादच नाही रे मित्रा... पण अश्या दोन महान बॉक्सर्समध्ये तुलना कशाला करायची? लताबाई भारी की आशाताई ह्या प्रश्नाचं आपल्याला करायचंय काय? फ्रेझियर फ्रेझियर होता आणि अली अली होता.... ह्यो बी भारी न त्यो बी भारी.... हाय काय न नाय काय !

जे.पी.

अतिशय उत्कृष्ट वर्णन... खरी श्रद्धांजली आहे हा लेख... पोरांना वाचून दाखवला.. rumble in the jungle ची तुम्ही दिलेली लिंक चालत नाही आहे... मग चार भागात विभागलेली फाईट सापडली..तुम्हाला मनापासून धन्यवाद...RIP for the boxing genius... आणि हो, धर्म आणि नाव बदलानंतर एका ठिकाणी क्ले नाव राहिलंय... उगाच त्या बॉक्सरचा आत्मा चवताळायच्या आधी संपादित करून घ्या...

अप्पा जोगळेकर's picture

5 Jun 2016 - 3:15 pm | अप्पा जोगळेकर

आज पुन्हा एकदा हा लेख वाचला. जस्ट ग्रेट.

महामाया's picture

5 Jun 2016 - 6:25 pm | महामाया

मला अली बाबत अगदीच जुजबी माहिती होती.

हा लेख वाचून अली कळला...

मार्मिक गोडसे's picture

6 Jun 2016 - 5:23 pm | मार्मिक गोडसे

जबरदस्त लेख!

अभिजीत अवलिया's picture

9 Jun 2016 - 10:06 am | अभिजीत अवलिया

जबरदस्त लिहिलेय.