हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
15 Mar 2022 - 1:06 am

कटाक्ष:
भाषा- हिंदी (मूळ बंगाली)
लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय
प्रकाशन- डायमंड बुक्स
प्रथमावृत्ती- १९३१
पृष्ठसंख्या- २०८
किंमत- ₹१५०
ISBN : 978-81-7182-917-1

ओळख:
कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ. मुळे सभ्य समाजात कमलची सतत अवहेलना केली जाते.‌ परंतु आपल्या तर्कशुद्ध प्रतीवादांनी कमल या मंडळींना वारंवार त्यांच्या धारणांचा पुनर्विचार करण्यास बाध्य करते. बंगाली मंडळी सांस्कृतिक-धार्मिक परंपरा, 'भारत जगद्गुरु' (आजच्या भाषेत विश्वगुरू!) यांच्या‌ सर्वोच्च महत्तेचे गुणगान करत असताना कमलच्या भूमिकेतून दोन्ही बाजूंनी समाधान होणार नाहीत असे प्रश्न उभे राहतात तेच 'शेष प्रश्न'. त्यांचे समाधान होते का? तात्त्विक भूमिकांना व्यवहारी जगात जीवंतपणा कसा प्रदान करावा? आणि काहीतरी जुना, काळाच्या कसोटीवर तपासून स्थिर झालेला विचार सर्वांनी आज जसाच्या तसा स्वीकारावा हे योग्य की अयोग्य? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या नजरेतून स्त्री मनाचे अंधारे कोनाडे जाणून घेण्यासाठी वाचायला हवे - 'शेष प्रश्न'.

शिल्लक:
ही कादंबरी रूढी प्रियतेवर घाव घालणारी असून जीवनात व्यक्तीगत पातळीवरील विचारांना ती समाजमान्यतेच्या बरोबरचे किंबहुना जास्तीचे महत्व देते. ज्यांना कथेत नाट्य आवडते त्यांच्यासाठी ही कादंबरी नाही. कथा निरस होणार नाही एवढे नाट्य पुरेशा प्रमाणात असले तरी 'शेष प्रश्नां' भोवतीची चर्चा हा या कादंबरीचा आत्मा आहे. १९३१ साली नायिकेच्या हातात प्रागतिक विचारांची मशाल देणे ही एक क्रांतिकारी घटना होती. आजच्या स्त्रीवादी (फेमिनिस्ट) चळवळीने अंगीकारावेत असे अनेक विचार या शतकभर जुन्या कलाकृतीत पदोपदी आढळतात. केवळ मनोरंजन म्हणून वाचण्यासाठी हे पुस्तक नाही.

तळटीप:
'श्रीमान योगी' च्या प्रस्तावनेत (जे मुळात नरहर कुरुंदकरांनी रणजित देसाई यांना लिहिलेले पत्र होते) "शिवाजीला कुणी बालमित्र असतील, असे वाटत नाही. ‘शेषप्रश्न’ या कादंबरीत सव्यसाचीची अशी स्वभावरेखा आहे, त्याच्याशी मिळतीजुळती शिवाजीची आहे. .... सव्यसाची एकवार बारकाईने वाचावा, अशी सूचना आहे." असा एक उतारा आहे. परंतु 'शेष प्रश्न' मध्ये सव्यसाची नावाची व्यक्तिरेखाच नाही. येथे कुरुंदकरांना शरच्चंद्र बाबुंची 'पथेर दाबी' (१९२६) ही राजकीय कादंबरी आणि तिचा क्रांतिकारक नायक सव्यसाची अभिप्रेत असावा. स्मरणातील गोंधळाने 'शेष प्रश्न'चा चुकीचा संदर्भ दिला गेला असण्याची शक्यता आहे. आज 'श्रीमान योगी'च्या एकतिसाव्या (२०१६) आवृत्तीतही ती चूक सुधारली गेली नाही याचे आश्चर्य वाटते.

धोरणमांडणीवाङ्मयसाहित्यिकआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

अनुस्वार's picture

19 Mar 2022 - 3:19 pm | अनुस्वार

तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत.

https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9...

https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-sh...

अर्धवटराव's picture

22 Mar 2022 - 10:05 pm | अर्धवटराव

सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो.

सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

तेवढ्या कादंबऱ्यांना वाव अधिक.

कर्नलतपस्वी's picture

15 Mar 2022 - 8:23 am | कर्नलतपस्वी

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते.
छान लिहिलय.

भागो's picture

15 Mar 2022 - 8:27 am | भागो

शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या.
पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत.
त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले.
नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य's picture

16 Mar 2022 - 1:44 pm | अनिंद्य

समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही.

'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस's picture

16 Mar 2022 - 3:34 pm | कंजूस

कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो?
सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत.
पुन्हा काळ मागे चालला.

पुन्हा काळ मागे चालला.+१

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2022 - 8:46 pm | चौथा कोनाडा

सुंदर ओळख.
लेख आवडला.
वाचावे लागेल हे पुस्तक.