कविता

ते आपलेच असतात...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

ते आपलेच असतात...

त्यांना माहीत असतात,
आपले दुखरे कोपरे!
आणि कोपऱ्यातील लपलेले घाव...

त्यांना माहीत असतात,
आपल्या मनाचे कप्पे!
आणि कप्प्यांतील सुकलेले भाव...

म्हणून जास्त जखमा करणारे...
ते आपलेच असतात!
आणि जखमेवर मीठ चोळणारे...
ते आपलेच असतात!

परक्यांना काय माहित...
आपले हळवे कप्पे अन् कोपरे?
आपल्या जखमांची खपली काढणारे...
ते आपलेच सगे अन् सोयरे!

इंद्रधनू

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

इंद्रधनू

रक्तकेशरी सूर्यदिशा मी समजून घे रे कधी मलाही,
कसा कळेना तुला आवडे मावळतीचा रंग गुलाबी..

अवखळ हसरा झरा होऊनी बागडते मी तुझ्यासभोती,
निळी जांभळी कोसळते मी शोधतोस तू शब्द गुलाबी..

हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून,
मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी..

धम्मक पिवळी होऊन येईन, बंध जगाचे तोडून येईन,
अंतर सारे मिटवू जाता होईन मी आरक्त गुलाबी..

राधा पुन्हा निघाली..

कलम's picture
कलम in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

राधा पुन्हा निघाली..

आयुष्य खर्च झाले कर्मास न्याय द्याया
कर्तव्यपूर्ती केली वचनांसवे दिलेल्या
दृष्टी अधू तरीही नजरेत आस वाहे
कान्हा तुझ्याचसाठी देहात प्राण आहे
शरीरात त्राण नाही, गात्रे शिथिल झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

प्रेम

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

प्रेम

प्रेम असतं गाणं
दोघांच्या मनात!
प्रेम असतं भिजणं
चिंब पावसात!!
प्रेम असतं नाचणं
आनंदाच्या भरात!
प्रेम असतं जगणं
भान विसरून जीवनात!!
प्रेम असतं चांदणं
पडलेलं अंगणात!
प्रेम असतं मोहरणं
मोगऱ्याच्या सुगंधात!!
प्रेम असतं फिरणं
मोहरलेल्या चैत्रबनात!
प्रेम असतं बहरणं
शिशिरानंतरच्या वसंतात!!

क्षण कण कण..

यशोधरा's picture
यशोधरा in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

क्षण कण कण..

काळोखाची चाहूल,
एकांडा पक्षी,
घरट्याच्या शोधात.

बहराशी फटकून,
शिशिराच्या आठवणीत,
निष्पर्ण चिनार.

निजल्या आसमंतात,
एकुलती जाग,
कोणत्याशा खिडकीत.

विस्मृत समाधी,
सभोवताल पाचोळा,
सुकलेला फुलोरा.

आकाशाचा भरवंसा,
समुद्राच्या साथीने,
गलबताचा प्रवास.

एकुलता सोबती,
लवलवत्या चितेचा,
नि:शब्द नदीकाठ.

अनाहूत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

अनाहूत

अज्ञाताच्या देशातून कोणी अनाहूत येतो
जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो
धगधूर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो
रस रंग नाद गंध सरमिसळ करतो
विझणार्‍या रोमरोमी ज्योती पेटवू बघतो
लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो
मन ओथंबून येता सरसर बरसतो

अज्ञाताच्या देशातून कोण अनाहूत येतो?
कवितेच्या गावातून शब्द अनवट येतो!
भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो...

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - क्रान्ति यांच्या काही कविता

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2

कवयित्री:- क्रान्ति

अभिवाचन :- यशोधरा
आपल्या प्रतिभेने आणि दर्जेदार कलाकृतींनी मिपा आणि मिपा बाहेरच्या साहित्यिक जगात आपला खास ठसा उमटवणार्‍या क्रांती यांच्या काही कविता सादर करत आहेत यशोधरा:

ऐल पैलः