मराठी गझल

बेरीज

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
4 Feb 2013 - 11:55 pm

पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी
झेलण्या केले खुले काळीज मी

भेटुनी जाते त्सुनामीसारखी
मिरवतो आयुष्यभर ती झीज मी

आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी

पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी

ठरवले आहेस तू उत्तर तुझे,
की चुकीची मांडतो बेरीज मी?

-- उपटसुंभ

कवितागझलमराठी गझल

विदूषक

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
29 Jan 2013 - 3:17 pm

काय माझ्या रेखिले आहे कपाळी
व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी

मागते आहेस का आषाढ श्रावण
वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी

स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या
काळजामध्ये किती जपशील जाळी

लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता
दुःख येते प्रत्यही शोधीत आळी

आसवांवर तेवते आयुष्य माझे
वेदनांची साजरी करतो दिवाळी

फुंकरी घालू नका जखमांवरी या
मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी

-- उपटसुंभ

गझलमराठी गझल

अन्यथा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
26 Jan 2013 - 12:14 pm

जीवना, भेट केव्हातरी
अंतरीच्या उमाळ्यापरी

आसवांच्या उधाणातही
पापण्यांच्या रित्या घागरी

भांडणावाचुनी व्हायची
भेट माझी-तुझी का खरी?

नाव मी भोवर्‍याला दिली,
साद देती किनारे जरी

जीवघेणा कडाका इथे,
सांत्वनाच्या तिथे चादरी !

पाचवीलाच मी पूजिली
शब्द झेलायची चाकरी

अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!

गझलमराठी गझल

घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
23 Jan 2013 - 4:18 pm

घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना
नाही जमेस काही आयुष्य मोजताना

भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या
काळीज सागराचे घेऊन हिंडताना

ना घातली हवा तू राखेस एकदाही
सारी हयात गेली अंगार शोधताना

आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी
आवाज होत नाही स्वप्नात बोलताना

होतो बर्‍याचदा मी माझाच हाडवैरी
बेभान अक्षरांचे आसूड ओढताना

- उपटसुंभ

गझलमराठी गझल