अन्यथा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
26 Jan 2013 - 12:14 pm

जीवना, भेट केव्हातरी
अंतरीच्या उमाळ्यापरी

आसवांच्या उधाणातही
पापण्यांच्या रित्या घागरी

भांडणावाचुनी व्हायची
भेट माझी-तुझी का खरी?

नाव मी भोवर्‍याला दिली,
साद देती किनारे जरी

जीवघेणा कडाका इथे,
सांत्वनाच्या तिथे चादरी !

पाचवीलाच मी पूजिली
शब्द झेलायची चाकरी

अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Jan 2013 - 2:44 pm | पैसा

शेवटच्या ओळी वाचून अंगावर काटा आला.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jan 2013 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त कविता गं तै.

किसन शिंदे's picture

26 Jan 2013 - 9:12 pm | किसन शिंदे

सुरेख!!

प्रत्येक शब्द अर्थपूर्ण.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2013 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा

+१

अग्निकोल्हा's picture

26 Jan 2013 - 9:21 pm | अग्निकोल्हा

अंत पाहू नको रे सुखा, साथ दे, अन्यथा जा तरी!

जबरदस्त हुकुमत आहे शब्दांवर....

बाकी कवितेच्या गाभ्याबद्दल काय बोलणार, खरोखर "निव्वळ आहे" म्हणजे एकदम "निव्वळच आहे"!

कवितानागेश's picture

27 Jan 2013 - 12:08 am | कवितानागेश

सुंदर. :)

इन्दुसुता's picture

27 Jan 2013 - 12:14 am | इन्दुसुता

कविता आवडली.

विसुनाना's picture

28 Jan 2013 - 2:21 pm | विसुनाना

गजल आवडली.

अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!

-वा! मस्त.

जीवना, भेट केव्हातरी

हा मिसरा 'जीवना, भेट आतातरी' असाही वाचून पहिला.

नाव मी भोवर्‍याला दिली,
साद देती किनारे जरी

इथे 'साद देई किनारा जरी' असे हवे होते का?
अलामत..!?

अक्षया's picture

28 Jan 2013 - 2:47 pm | अक्षया

छान कविता..भावस्पर्शी.

हासिनी's picture

28 Jan 2013 - 3:24 pm | हासिनी

सुरेख कविता!

क्रांती, सुरेख लिहिलं आहेस.

शैलेन्द्र's picture

28 Jan 2013 - 4:09 pm | शैलेन्द्र

मस्त.. आवडली

मूकवाचक's picture

28 Jan 2013 - 4:17 pm | मूकवाचक

+१

मनीषा's picture

29 Jan 2013 - 7:23 am | मनीषा

सुरेख गझल !

उपटसुंभ's picture

29 Jan 2013 - 3:09 pm | उपटसुंभ

छान..!

अज्ञातकुल's picture

29 Jan 2013 - 6:53 pm | अज्ञातकुल

मस्त :-)

तिमा's picture

29 Jan 2013 - 7:39 pm | तिमा

तरल कवितेला सलाम!

jaypal's picture

29 Jan 2013 - 9:56 pm | jaypal

आणि येताना एक सुरेख काव्य आमच्या साठी आठवणिने घेउन आलात, खुप खुप धन्यवाद

क्रान्ति's picture

29 Jan 2013 - 10:13 pm | क्रान्ति

मंडळी. मध्यंतरी बर्‍याच इतर उचापतींमुळे इकडे प्रत्यक्ष वावर कमी झाला होता, पण वाचन सुरू होतं. [कोणत्याही कारणांनी अस्वस्थ वाटत असेल, कसलाही त्रास होत असेल, डोकं फिरलं असेल, तर ते जागेवर आणण्याचा रामबाण उपाय म्हणजे मिपावर चक्कर मारणे! खमंग, खुसखुशीत पाकृ, अप्रतिम फोटो, सुंदर कलाकृती, भन्नाट धागे आणि अफाट प्रतिसाद म्हणजे मिपा!]
विसुनाना, आपण म्हणता त्याप्रमाणे किनारा हा बदल मूळ संहितेत केला आहे. अलामत पाहिलीच नव्हती त्या द्विपदीत. मतल्यात 'आतातरी' हे जास्त प्रभावी वाटतंय :)

सूड's picture

29 Jan 2013 - 10:16 pm | सूड

अंत पाहू नको रे सुखा,
साथ दे, अन्यथा जा तरी!

हे विशेष आवडलं !!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Jan 2013 - 10:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

असं लिहीता यायला हवे.
इतक्या कमी शब्दात इतकं सांगता यायला हवे.
इतकी सुंदर शब्दांची गुफंण जमायला हवी.
अशी बैठक पक्की बसायला हवी.

असं मी स्वताला बजावतोय....

अंत पाहू नको रे सुखा
साथ दे, अन्यथा जा तरी!

__/\__

विकास's picture

29 Jan 2013 - 10:49 pm | विकास

असं लिहीता यायला हवे...

सहमत

मस्त कविता!

नाव मी भोवर्‍याला दिली,
साद देती किनारे जरी

आवडले!!!

मदनबाण's picture

30 Jan 2013 - 9:54 am | मदनबाण

अप्रतिम !

दत्ता काळे's picture

1 Feb 2013 - 7:05 pm | दत्ता काळे

नाव मी भोवर्‍याला दिली,
साद देती किनारे जरी