जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस
जॉर्डन – पश्चिम आशियातल्या धगधगत्या वाळवंटी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवलेला एक चिमुकला देश. उत्तरेकडे सिरीया, पश्चिमेकडे इस्रायल व पॅलेस्टाईन, दक्षिणेकडे सौदी अरेबिया, तर पूर्वेकडे इराक अशा सतत ‘चर्चेत’ असणाऱ्या देशांच्या मध्ये राहून जॉर्डनने मोठ्या हिमतीने एक सुस्थिर राष्ट्र निर्माण केले आहे. जर्मनीहून भारताकडे येताना एकदा एजंटने रॉयल जॉर्डानियन या विमान कंपनीची तिकिटे हातात ठेवली. नाताळच्या सुट्टीमुळे विमानाची तिकिटे महागच होती. त्यातल्या त्यात याच कंपनीची तिकिटे जरा परवडणाऱ्या दरात मिळत होती. मात्र अम्मान (जॉर्डन ची राजधानी) येथे १३ तासांचा स्टॉप-ओवर होता.