गावाकडची गोष्ट (भाग 1)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
17 Aug 2016 - 10:44 pm

भाग 1

"आई शप्पथ सांगतो त्या झाडावर काहीतरी होत." दिघ्या थरथर कापत म्हणाला. 

" झाल... सुरु झाले याचे भास आणि आभास. दिघ्या साल्या चढली बहुतेक तुला. काहीतरी नाही कोणीतरी म्हण."जेटली हसत म्हणाला.

"म्हणजे?" डोळे विस्फारून दिघ्याने जेटलीकडे बघितले.

"हा हा हा! म्हणजे साल्या तुला हडळ दिसली असेल तिथे त्या झाडावर. अशक्य घाबरट आहेस तू. गपचूप पेग भर आणि तोंडाला लाव. आपण इथे इतक्या बाजूच्या व्हिलामध्ये आलो कारण कोणी डिस्टर्ब करायला नको. आणि नशिबाने खरच कोणी नाही इथे आजूबाजूला. तर तुला काहीतरी आणि कोणीतरी दिसतं आहे." जेटली वैतागत म्हणाला.

जेटलीच्या  पहिल्याच वाक्याने दिघे कमालीचा दचकला होता. पण ते जेटलीच्या लक्षात आल नाही. "जेटली... खरच रे! तू एकदा मागे वळून त्या झाडाकडे बघ तरी. हलत आहे कधीच काहीतरी त्या झाडावर." दिघ्या विनवणीच्या स्वरात म्हणाला.

"तो इतकं म्हणतो आहे तर बघ की रे जेटली." शांतपणे आपल्या ग्लासातल्या बर्फाच्या तुकड्याकडे बघत काणे म्हणाला.

"भडव्या तू बघ न. तू मात्र तुझ्या ग्लासातल्या बर्फाकडे बघतो आहेस ना?" जेटली काणेला टोचत म्हणाला. 

"अरे मी दिघ्याच्या वटवटीने डोक फिरू नये म्हणून बर्फाकडे बघत डोक शांत करतो आहे." काणेने दिघ्याला टोमणा मारला आणि जेटली आणि काणे मोठ्याने हसायला लागले.

"करा...... माझी चेष्टा करा. पण मग तुमची अवस्था माझ्या जुन्या मालकांसारखी.....नारायण रावांसारखी....झाली तर माझी जवाबदारी नाही." दिघ्या त्या झाडाकडे बघत जेटली आणि काणेला म्हणाला.

"त्यांची आणि आमची अवस्था सारखी कशी होईल? ते चार पेग नंतरही तुझी बकवास ऐकायला शुद्धीवर राहू शकतात का?" काणे बर्फावारची नजर उचलून थंडपणे दिघ्याला म्हणाला.

"राहीलं! तुम्ही दोघ संपवा तुमचा चौथा पेग. मग मी पुढचा भरतो. फक्त पीत राहूया हा आपण." दिघ्या चिडून म्हणाला. पण अजूनही त्याची नजर बाहेरच्या झाडावरून हलत नव्हती.

"दिघ्या........... भेनच्यो......"जेटलीने सुरवात केली.

"जेटली... शिव्या आवर.मी माणसांना नाही घाबरत समजल. तुझ्या शिव्याना मीसुद्धा शिव्यानीच उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेव. साल्या तू एसी वाल्या थंडगार खोलीत बसून कागदावर जे काम ठरवतोस ना ते मी कामगारांबरोबर  फ्लोरवर उभा राहून करून घेतो. त्यामुळे असली भाषा तू क्वचित बोलत असशील. माझी रोजचीच आहे." दिघ्या आता पेटला होता.

एकूण प्रकरण तापतं आहे हे लक्षात येऊन जेटली काही म्हणायच्या आत काणेने विषय बदलला. "दिघ्या आजकाल तू सारखा चिडायला लागला आहेस. चल सोड ते! बर, सांग बघू कोण ते तुझे नारायणराव? काय झाल त्याचं? बाकी आपल्या आऊटीग्स मध्ये एखादी इंटरेस्टिंग स्टोरी असलीच पाहिजे न. पण आज आपण असली सोय केलेली नाही. तेव्हा दिघ्याच्या नारायाणरावांच्या गोष्टीवर आज तहान भागावूया."

"ओके. मान्य. सॉरी दिघे साहेब. कृपया आपण माझे बोलणे मनावर न घेता आपली स्टोरी सांगाल का?" नाटकी अविर्भावात  जेटली म्हणाला. जेटलीच्या माघार घेण्याने वातारणातला तणाव थोडा कमी झाला; आणि  त्याला जरा जास्तच चढली आहे हे काणे आणि दिघे दोघांच्याही लक्षात आले. नाहीतर जेटली इतका सहज सॉरी बोललाच नसता. त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आणि अधूनमधून खिडकी बाहेरच्या झाडाकडे बघत दिघ्याने नारायणरावाची गोष्ट सांगायला सुरवात केली.

"मी पूर्वी जिथे नोकरी करत होतो ती नोकरी आणि गाव मी जरी सोडून आलो असलो तरी तिथल्या मालकाचा माझ्यावार खूप विश्वास होता." दिघ्या बोलायला लागला. पण अजूनही जेटलीची दिघेचा पाय खेचायची खुमखुमी गेली नव्हती. त्याने दिघेच वाक्य तोडल आणि म्हणाला,"हो... हो... तर! इतका विश्वास होता की त्याला वेड लागणार आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आल, तेव्हा  त्याने तुला मुद्दाम बोलावून नोकरी सोडायला सांगितलं. आणि फक्त नोकरीच नाही तर ते गाव सुद्धा. हो ना?"

काणेला वाटल आता परत दिघ्या उखडणार आणि दोघांची जुंपणार. कारण जरी दिघ्याने पहिला जॉब आणि ते गावही सोडला होत; तरी त्याने त्याचं कारण कधी सांगितल नव्हत. कायम एकच म्हणायचा की मालकाने सांगितल जायला म्हणून सोडल.  पण त्याच्या त्या जुन्या मालकाबद्दल मात्र तो खूप आदराने बोलायचा. खर तर त्याच्यामुळेच कमी शिकलेला दिघ्या त्यांच्या मल्टी नाशन्ल कंपनीमध्ये चांगल्या नोकरीला लागला होता. अर्थात जेटली जे म्हणत होता त्यात देखील सत्य होत. कारण दिघेचा पूर्वीचा मालक वेड लागून मेला होता. त्यावेळी ते प्रकरण वर्तमानपत्रातून खूप गजलं होत. स्वतःच्या कारखान्याला आणि बंगल्याला आग लावून मालकाने गळफास लावून आत्महत्या करून घेतली होती.

जेटलीच्या कॉमेंटमुळे दिघ्या भडकेल अस वाटून त्याला शांत करायला काणे काहीतरी बोलणार होता; पण त्यागोदार दिघे जेटलीकडे बघत शांतपणे म्हणाला,"हो जेटली. वेड लागणार हे त्यांना माहित होत म्हणूनच त्यांनी मला ते गाव आणि नोकरी सोडून जायला सांगितल. कारण मी जर तिथेच राहिलो असतो तर त्यांच्याप्रमाणे मलादेखील वेड लागल असत.... विचार करून करून."

आता मात्र जेटली आणि काणे चक्रावले. "दिघ्या ... साल्या.... वातावरण निर्मिती करतो आहेस की काय??" काणेने दिघेला विचारले.

"नाही... खरी घटना सांगतो आहे. मला माहित आहे तुमचा विश्वास बसणार नाही. पण तरीही... आज मला जेटलीला पटवून द्यायचं आहे की मला भास होत नाहीत. मी जे दिसत तेच सांगत असतो. तर....

कथा

प्रतिक्रिया

बापू नारू's picture

18 Aug 2016 - 3:00 pm | बापू नारू

छान जमलाय ,पुढचा भाग येउद्या लवकर..

किसन शिंदे's picture

18 Aug 2016 - 3:50 pm | किसन शिंदे

छान! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

राजाभाउ's picture

18 Aug 2016 - 3:57 pm | राजाभाउ

मस्त सुरवात !!!. पुभाप्र.

श्रीरंगपंत's picture

19 Aug 2016 - 3:29 pm | श्रीरंगपंत

छान सुरवात.. पुभाप्र. पुभालटं..