गावाकडची गोष्ट (भाग २ )

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
20 Aug 2016 - 12:08 am

गावाकडची गोष्ट (भाग 1): http://www.misalpav.com/node/37022

मी बीड जिल्ह्यातल्या एका आड गावात नोकरीला होतो. मी काही फारसा शिकलेलो नाही. त्यामुळे मी कधीच मोठ्या शहराची, मोठ्या कंपनीतल्या मोठ्या पगाराची स्वप्न बघितली नाहीत. वडील लहानपणीच गेले होते. त्यामुळे आई बरोबर कष्ट करून जितकं शिकता आल तितक शिकलो आणि ती गेल्यावर गाव सोडून जिथे नोकरी मिळेल तिथे रहायचं अस ठरवून निघालो. बीडमध्ये नोकरी शोधताना मला कळल की जवळच्या एका गावात एक छोटासा लाकडाचा कारखाना आहे आणि तिथे मला नोकरी मिळू शकते. त्यामुळे मग मी फारसा विचार न करता तिथे गेलो आणि त्या कारखान्याच्या मालकांना जाऊन भेटलो.

त्यांनीही मला फार काही प्रश्न विचारले नाहीत. मी सडा फटिंग होतो त्यामुळे वेळेचं बंधन मला नव्हत हा त्यांच्या दृष्टीने मोठाच प्लस पॉईंट होता. त्यात तरुण होतो आणि मुख्य म्हणजे गरजू होतो. त्यांनी मला त्यांच्या कारखान्यात ठेवून घेतले. जंगलातली लाकडे आणून घेणे आणि ती कापून विकणे असा तो एकूण व्यवसाय होता. सुरवातीला मी येणाऱ्या ट्रक्स मधून आलेले लाकूड वजन करून उतरवून घेण्याचे काम करत होतो. पण त्या आड गावात जवाबदारीने काम करणारं कोणीच नव्हत. बिनडोकपणे काम करणारे अनेक कामगार मिळायचे. पण ते रोजंदारीवर. आज येतील तर उद्या नाही. हातात पैसे पडले की दारू पिणे एवढच आयुष्य असणारे लोकं होते तिथे. म्हणून मग मीच आपणहून एक एक काम अंगावर घ्यायला सुरवात केली. लाकड नीट उतरवून घेतली जातात की नाही; कापण्यासाठी मशीनवर किती घेतली आहेत; नको असणारी फळकुटं कारखाना बंद होण्या अगोदर निट लॉक केली आहेत ना... सगळच बघायला लागलो.

मी मुद्दाम केवळ साहेबांचा विश्वास मिळवायला अस काही करत नव्हतो; आणि मी असं काही मनात ठेवून काम करतो आहे अस म्हणण्यासाठी कोणी नव्हतच. कामगार सोडले तर एकूण कायमचा स्टाफ असा कमीच. एक स्टेनो. ती सुधा बोलावल्यावर यायची. कारण रोज काही काम नसायचं. तीच अकौंटस बघायची. दुसरा म्हणजे ऑफिसमध्ये असणारा जीवा. त्याला ऐकू कमी यायचं. तो सकाळी नऊ म्हणजे नऊला हजार व्हायचा आणि साहेबांचा दुपारचा चहा तीन वाजता झाला की निघून जायचा.

मी नोकरीला लागलो आणि हळू हळू माझ्या कामात रमून गेलो. गावात मी कोणाला ओळखत नाही हे माहीत असल्याने मला साहेबांनी राहण्यासाठी त्यांच्या आउट हाउसमध्ये जागा दिली होती. एका माणसाच्या मानाने भरपूर जागा होती. लहानस स्वयंपाक घर आणि एक खोली. मी खुप खुश होतो माझ्या आयुष्यावर. फार काही स्वप्न नव्हतीच. लाकडं भरलेले ट्रक्स रात्रीचा प्रवास करून पहाटेच यायचे. ट्रक ड्रायव्हर्सना लाकडं उतरवून लगेच जायचं असायचं. त्यामुळे मी सकाळी पाच-सहा जशी गरज पडेल तसा कारखान्यावर जायचो. लाकडं मोजून उतरवून घ्यायचो आणि परत येऊन झोपायचो. मग थोडं उशिरा म्हणजे दहा पर्यंत परत जाऊन कामगारांना एकत्र करायचो आणि मशीनवर कोणती आणि किती लावायची त्याची यादी द्यायचो. सगळ काम दुपार पर्यंत आटपून जायचं. तीन-चार नंतर तर काहीच काम नसायचं. जीवा गेला की थोड्या वेळाने मी देखील निघायचो. आठ-दहा दिवसातून एकदा लाकडं असलेल्या ऑर्डर प्रमाणे रवाना करायची असायची. मालक फक्त त्यात लक्ष घालायचे. एकूण मस्त चाललं होतं माझं. खुश होतो मी माझ्या कामावर.

लहानसं आड बाजुच गाव असल्याने फार काही करण्यासारख नसायचं. म्हणून मग कामावरून परतून आणि अंघोळ करून रोज संध्याकाळी मी गावातल्या देवळात जायला लागलो. त्यामुळे हळू हळू ओळखी देखील व्ह्यायला लागल्या. लोक मला आडून आडून माझ्या मालकाबद्दल विचारायचे. कसा आहे माणूस; गावात कोणाशी बोलत नाही तर तुमच्याशी तरी बोलतो का? एकदा मात्र एका गावकऱ्याने विचारले,"का हो तुम्ही बंगल्याच्या आवारातील जागेत राहाता ना? मग तुम्ही त्याच्या पत्नीला बघितल आहे का...?" मी या प्रश्नाने गोंधळून गेलो. मुळात मालकांच लग्न झालं आहे किंवा नाही ते मला माहित नव्हत. आणि झालंच असलं तरी त्यांच्या पत्नीला मी कसा आणि का बघेन? असा मलाच प्रश्न पडला. पण यावर काही चर्चा सुरु होण्या अगोदरच मंदिराचे पूजारीबुवा प्रसाद घेऊन आमच्यात येऊन बसले आणि कसा कोण जाणे पण तो विषय तिथेच राहिला. अर्थात जरी त्या अगाऊ माणसाने विषय चालू ठेवला असता तरी मी काय सांगणार होतो त्यांना? मलाही फारशी माहिती नव्हतीच. मालकांनी मला नोकरी दिली होती. चांगला पगार होता. कामाच्या वेळेचं बंधन नव्हतं. रोज कटकट करणारं कोणी नव्हत. त्यामुळे मालकांच्या वय्यक्तिक आयुष्यात लक्ष घालून मी कशाला माझ सुखाच आयुष्य दु:खात घालू?

रोज साहेब यायचे साडे नऊ दहाला. ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असायचे. कधी फोनवर बोलत असायचे तर कधी मान खाली घालुन काही-बाही लिहीत असायचे. दुपारचा चहा झाला की जायचे. तेच ऑर्डर्स मिळवायचे आणि फोन करून स्टेनोला बोलावून सगळी पत्र करून घ्यायचे. बास! त्यांचं प्रत्येकाच्या कामावर बारीक लक्ष्य असायचं. पण फार कोणाशी बोलायचे नाहीत. सुरवातीला मशीनवर काम चालू असताना फेऱ्या मारायचे. पण मग बहुतेक त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. कारण त्यांनी हळुहळू कारखान्यात खाली मशीनकडे येण कमी करत बंदच केल. मला ऑफिसमध्ये बोलावून सगळी माहिती घ्यायचे... याहून जास्त तर मलाही साहेबांबद्धल काही माहित नव्हत.

मी मात्र संध्याकाळी रोज देवळात जायचो. गावातले सगळेच तिथे रोज असायचे असं नाही. पण देऊळ असल्याने पूजारीबुवा मात्र असायचेच. त्यामुळे देवळातल्या पुजारीबुवांची चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी माझी बरीच चौकशी केली माझ्याकडे. पण मी एकटाच आहे ; याव्यतिरिक्त माझ्याकडे माझ्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नव्हत. कधीतरी असच गप्पा मारताना पुजारीबुवांनी त्यांच्या कुटुंबाची माहिती मला दिली. त्यांच्या दोन मुली होत्या. एकीच लग्न झाल होत म्हणे. दुसरीच लग्नाचं वय होऊन गेल होत पण पैशाअभावी लग्न होत नव्हतं. त्यांनी माहिती सांगितली आणि मी ऐकून घेतली.... माझ्यासाठी विषय इथेच संपला होता. पण पूजारीबुवांसाठी मात्र ती सुरवात होती.

असेच दिवस जात होते. मला त्या गावात नोकरी लागून दोन-चार महिने झाले असतील, पुजारीबुवांनी एकदा मी एकटाच असताना विषय काढला.

"अच्युतराव लग्नाचा काही विचार आहे की नाही? अहो तुमच वय होऊन चालल न लग्नाच." पुजारीबुवा म्हणाले.

त्यांचा रोख न कळल्यामुळे मी म्हणालो,"बुवा, कोण देणार मला मुलगी. असा सडाफटिग माणूस मी. तिशी उलटली आहे. बरी नोकरी आहे... ती ही आता लागली आहे. ना गावाचा पत्ता... ना नातेवाईकांचा. स्वतःची अशी रहायची जागा देखील नाही. मालकांच्या कृपेमुळे छत आहे ते नशीब. त्यामुळे मी लग्न हा विषय माझ्या आयुष्यातून पुसून टाकला आहे."

"अहो अस काय म्हणता. आत्ता तरुण आहात म्हणून अस बोलता आहात. वय वाढलं की कोणीतरी सोबत असावं अस वाटत सर्वांनाच. त्यावेळी काय कराल?"

"खर आहे बुवा. पण आता मी कुठे माझ्याचसाठी मुलगी शोधायला जाऊ? आणि आपणहून कोण मला मुलगी द्यायला बसलं आहे?" मी विषय संपवायचा म्हणून म्हणालो.

"अच्युतराव तुम्हाला मालिनी; माझी मुलीगी माहीतच आहे." हे खर होत. मालिनी अनेकदा देवळात पुजारीबुवाना मदत करायला यायची. त्यामुळे मी तिला बघितले होते. मालिनी दिसायला अत्यंत सुंदर आणि सालस होती. पुजारीबुवा बोलतच होते,"तुमच्याच वयाची आहे. एखाद-दोन वर्ष पुढे मागे. दिसायला देखील चांगली आहे हो. पण या छोट्या गावातल्या देवळातून अशी काय कमाई असणार माझ्यासारख्याची. त्यामुळे तिच लग्न झालेलं नाही. तुम्ही देखील एकटेच आहात. बघा विचार करून... पटल तर हो म्हणा; पण जर नसेल इच्छा तर कृपा करून मी हा विषय तुमच्याकडे बोललो हे गावात कोणाकडे बोलू नका. बिचारी मालिनी तशीच दु:खात असते. आता या वयात 'नकार आला' अशी चर्चा गावात झाली तर जीव देईल ती." खालच्या मानेने पुजारीबुवा बोलत होते. त्यांनी अचानक समोर ठेवलेल्या प्रस्तावामुळे मी एकदम चक्रावून गेलो.

"विचार करून कळवतो." अस तुटक बोलून मी उठलो आणि चालू पडलो. रात्रभर मी विचार करत होतो. माझ्यासारख्याला कोण मुलगी देणार होतं आता. मालिनी तर दिसायला खरच खुप सुंदर होती. मी तिला देवळात हार करताना बघितले होते. इतक्या सुंदर मुलीच लग्न केवळ पैशांमुळे झाल नाही ही खरच दुःखाची गोष्ट होती. पण माझ्यासारख्या नुकत्याच त्या गावात आलेल्या माणसाला स्वतःची मुलगी द्यायला पूजारीबुवा तयार झाले होते; यात त्यांचा काही अंतस्थ हेतू तर नसेल न... माझ्या मनात आलं. मग माझ्या लक्षात आलं की पुजारीबुवा म्हणाले होते की मालिनी माझ्याहून एखाद-दोन वर्ष पुढे मागे आहे... म्हणजे कदाचित् ती माझ्याहून मोठीच असावी. पण गरिबी पोटी पूजारीबुवांनी मला विचारले असावे. हे मनात आलं आणि मी शांत झालो. त्या बाबतीत माझी काहीच हरकत नव्हती. पण प्रश्न हा होता की मी मालकांच्या आउट हाउस मध्ये राहत होतो. माझ स्वतःच अस घर नव्हत. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर मला मालकांना विचारण आवश्यक होत. रात्री डोळा लागायच्या अगोदर ठरवून टाकल की मालकांना उद्या विचारायचं आणि लगेच पुजारीबुवांकडे जायचं.

दुसऱ्या दिवशी दुपारी मालकांच जेवण झाल आणि ते थोडे निवांत वाटले म्हूणून हिंमत करून मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो.

"बोला दिघे..." ते मला माझ्या पहिल्या नावाने कधीच हाक मारायचे नाहीत.

"मालक... एक विचारायचं होत." विषय कसा सुरु करावा ते मला सुचत नव्हत.

"काय... लग्नाचा बार उडवता आहात का दिघे? वा वा! चांगल आहे." मालक हसत म्हणाले.

मी पुरता चक्रावून विचारल, "तुम्हाला कस कळल मालक?" त्यावर मालक हसत हसत म्हणाले... "अहो, लग्न न झालेला मुलगा नोकरी लागल्यानंतर काही महिन्यात जर मालकाचा मूड बघून काही विचारायला आला तर त्याचा अजून काय अर्थ होऊ शकतो? बर, कोण मुलगी आहे? याच गावातली की तुमच्या गावाकडची?" मी लाजलो. "मालक, गावातले पुजारीबुवा आहेत ना... त्याची मुलगी... मालिनी." मी म्हणालो. ते एकताच मालकांनी माझ्याकडे दचकून बघितले. क्षण दोन क्षण ते शांत बसले आणि म्हणाले,"चला बर झाल. तस मालिनीच लग्नाच वयही उलटून चालाल होतं. बर, पण तुम्हाला हे माहित आहे का की पुजारीबुवांच्या दुसऱ्या मुलीशी मी लग्न केलं आहे." त्यांच्या त्या वाक्याने मी उडालोच. म्हंटल,"नाही मालक. मला अस काहीच नाही बोलले पुजारीबुवा." त्यावर मालक समजुतीच्या सुरात म्हणाले,"अहो तुमचा होकार आला की सांगतीलच. उगाच घरातल्या गोष्टी अगोदर कशाला कोणी सांगेल. बर, मग कधी करता आहात लग्न?" मी यावर काय बोलणार. म्हणालो,"मालक माझ स्वतःच अस घर नाही. तुमच्या आउट हाउस मध्ये रहातो ते तुमची मेहेरबानीच आहे. लग्न करून बायकोला कुठे आणू?"

"दिघे, अहो, तुम्ही आल्यापासून मला कारखान्यात काहीच काम नसत. तुम्ही सगळीच जवाबदारी चांगली पार पाडता. मेहेरबानी कशाबद्दल? अहो अशा आड गावात असा कोणी विश्वासू आणि चांगला माणूस मिळण फक्त अवघड नाही तर अशक्यच आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच ठेवू नका. उरकून टाका लग्न." मालक म्हणाले.

त्यांच्या या बोलण्याने मला हायसं वाटलं. कारण ज्या क्षणी त्यांनी मला सांगितलं की ते देखील पूजारीबुवांचे जावई आहेत त्याच क्षणी मी ठरवलं होतं की आपण या विषयातून अंग काढून घ्यायचं. पण त्यांनी आपणहून लग्नाला परवानगी दिली म्हणजे त्यांची काही हरकत नाही हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांना नमस्कार केला आणि मनापासून म्हणालो"तुम्ही मला नोकरी दिलीत आणि आता या लग्नाला परवानगी दिलीत; अजून काय हव? खूप उपकार झाले मालक."

त्यादिवशी संध्याकाळी छान तयार होऊन मी थोडा लवकरच देवळात गेलो. अजून गावकाऱ्यापैकी कोणी बसायला आलं नव्हतं. मी पूजारीबुवाना गाठलं आणि माझा होकार सांगितला. बुवांचा चेहेरा खूप आनंदी झाला. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहील. माझा हात धरून ते म्हणाले,"अच्युतराव तुम्ही हो म्हणून माझ्या मनावरच ओझ उतरवलत. चला असेच घरी. मालिनीच्या आईला सांगू ही बातमी." पण अजूनही पूजारीबुवानी मला सांगितल नव्हत की त्यांच्या दुसऱ्या मुलीच लग्न मालकांबरोबर झाल आहे. मीदेखील ठरवलं की आपणहून विषय काढायचं नाही. पूजारीबुवा सांगतीलच न! म्हणून मग काही न बोलता मी त्यांच्या बरोबर त्यांच्या घराकडे निघालो.

कथा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

20 Aug 2016 - 6:51 am | एक एकटा एकटाच

चांगली आहे

आता पुढचे भाग लवकर येउ दयात

अरुण मनोहर's picture

20 Aug 2016 - 9:00 am | अरुण मनोहर

उत्सुकता वाढली आहे.

छान लिहिलंय. पुभाप्र.

सिरुसेरि's picture

24 Aug 2016 - 4:54 pm | सिरुसेरि

रंगतदार भाग आहे