गावाकडची गोष्ट (भाग 3)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 7:37 pm

भाग ३

पुजारीबुवा देवळाच्या बाजूलाच फर्लांगभर अंतरावर राहात होते. घराच्या आजूबाजूला बरीच फुलझाडं होती. पेरू, चिक्कू, आवळे अशी थोडी बहुत फळझाड देखील दिसत होती. ते बघून मी म्हणालो,"बुवा झाडं बरीच आणि छान आहेत. बाग छान ठेवली आहे तुम्ही." त्यावर ते हसत म्हणाले,"अहो मी काही करत नाही. मालिनीला झाडांची खूप आवाड आहे. फुल झाडं आणि फळझाडं सगळी तिनेच लावली आहेत. मागे विहीर आहे त्यातून दहा-पंधरा बादल्या पाणी काढावं लागत रोज या झाडांसाठी. नाहीतर इथल्या हवेला कसली जगतात ही झाडं. पण मालिनीला अजिबात कंटाळा म्हणून माहित नाही. रोज सकाळी उठून ती फुलं काढते आणि सगळ्या झाडाना पाणी घालते. त्यामुळेच माझ्या देवळातल्या देवांना बारा महिने उत्तम फुलांचे हार असतात बरं." लेकीच कौतुक करताना पूजारीबुवांचा चेहेरा फुलून गेला होता. काही मिनिटापुर्वीची अस्वस्थता अजिबात नाहीशी झाली होती.

ओवारीवरूनच त्यांनी मालिनीच्या आईला हाक मारली. "ऐकलत का... अच्युतराव आले आहेत. साखर घेऊनच बाहेर या... मालीनिसाठी त्यांनी होकार दिला आहे."

"अग्गोबाई... आलेच" असा आवाज आला आणि मालिनीची आई बाहेर आली. त्यांनी बुवांच्या आणि माझ्या हातावर साखर ठेवली. "चहा ठेवू का?" त्यांनी बुवाना विचारल.

"नको... आता वेळ टळून गेली आहे चहाची. तुम्ही जेवणाची तयारी करा. आज अच्युतराव इथेच जेवतील." पुजारीबुवा म्हणाले.

"अहो बुवा नको. मी जातो घरी. उगाच कशाला तुम्ही घोळ घालता आहात." मी संकोचून म्हणालो.

"अच्युतराव अहो तुम्ही लग्नाला होकार देऊन माझा मेल्यानंतरचा स्वर्गाचा मार्ग मोकळा केला आहात. आता आज तुम्ही कशालाच नाही म्हणू नका. आमच्याकडे काही पक्वान्न नाहीत हो. पण तरीही आज तुम्ही थांबाच. आम्ही जी काही भाजी भाकरी खातो त्यातलीच थोडी तुम्हीदेखील खाल, अजून काय?" बुवा म्हणाले. मला त्यांचा आग्रह मोडता आला नाही. आणि मग घरात मालिनी आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. मी आणि बुवा बाहेर गप्पा मारत बसलो.

रात्रीची जेवणं आटपली आणि मी निघालो. मला सोडायला बुवा देवळापर्यंत आले. मी निघताना मला म्हणाले,"अच्युतराव मला माहित आहे की कदाचित् तुम्हाला कल्पना असेल. पण तरीही मी आपणहून तुम्हाला सांगावं अस वाटत म्हणून सांगतो आहे" बुवा असं म्हणताच मला वाटलं ते त्यांच्या लग्न झालेल्या मुलीबद्दल आता सांगणार आहेत. पण त्यांनी दुसराच विषय काढला. म्हणाले,"अच्युतराव आमची मालिनी तुमच्यापेक्षा वर्षभराने मोठी आहे." त्यांनी हे सांगताच माझा थोडा अपेक्षा भंग झाला. पण स्वतःला सावरत मी बुवांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो,"बुवा मला अंदाज होता. अहो पण आता या वयाला आणि माझ्यासारख्या आगा-पिछा नसलेल्या माणसाला कोण मुलगी देणार होतं. मी तर लग्न हा विषय माझ्या आयुष्यातून काढूनच टाकला होता. त्यामुळे माझी काहीच हरकत नाही. मला तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे आणि तुम्हाला माझ्या. त्यामुळे आता यावर फार चर्चा नकोच. तुम्ही मुहूर्त बघा आणि आपण या आपल्या देवळातच लग्न उरकून टाकू. माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही बुवा. उलट जो काही खर्च होईल तो मीच करणार. ठीक?"

"अजून एक होत...." बुवा चाचरत बोलायला लागले. मी त्यांना थांबवल. कदाचित त्यांच्या एका मुलीच लग्न माझ्या मालकांशी झाल आहे हे सांगताण त्यांना अवघड वाटत असावं अस मला वाटल म्हणून मी म्हणालो,"बुवा जितकी चर्चा करू तितके प्रश्न उभे राहातील. त्यामुळे आता फक्त दिवस ठरवा.......... माझी एकच विनंती आहे की मालिनीची या लग्नाला खरच तयारी आहे का हे मला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे मला एकदा फक्त तिला एकटीला भेटायची परवानगी द्या... अर्थात तुमची हरकत नसली तर."

बुवांच्या डोळ्यात पाणी उभं राहील. "आमची काही हरकत नाही. उद्या गुरुवार आहे. दत्ताच्या पुढ्यात भजन आहे संध्याकाळी. त्यामुळे फुलांचा हार घेऊन मालिनी येईलच तिथे. त्यावेळी तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. माझ्या मनातही होतच. पण तिच्या आईला पटणार नाही म्हणून मी काही बोललो नाही. आता तुम्हीच म्हणता आहात म्हंटल्यावर ती काही म्हणायची नाही." ते डोळे टिपत म्हणाले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मालिनी देवळात आली. ती पूजारीबुवाना मदत करत होती. त्यामुळे त्यावेळी तिच्याशी जाऊन बोलावं हे मला प्रशस्त वाटलं नाही. म्हणून मग मी थांबलो देवळाच्या पायऱ्यांवरच. हळू हळू लोक जमायला लागले. आता मालिनीशी कस बोलावं ते मला कळेना. थोडंसं गोंधळून मी तिथेच पायऱ्यांवर बसून राहिलो. येणारी प्रत्येक व्यक्ति मला आत येण्यासाठी सांगत होती आणि मी 'आलो', 'येतोय', असं सांगून आत जाणं टाळत होतो.

शेवटी एकदाची भजनाला सुरवात झाली आणि मालिनी देवळाच्या कामातून मोकळी होऊन तिच्या घराकडे निघाली. त्यावेळी मात्र सगळा धीर एकवटून मी तिला गाठले. मागूनही तिचा कमनीय बांध लक्षात येत होता. वय वाढल असलं तरी मालिनी अजूनही अप्रतिम सुंदर दिसत होती. तिच्या मागे चार पावलांवर चालत मी हळूच म्हणालो,"मालिनी, मला तुमच्याशी बोलायचं होत थोड." तिने थबकून मागे वळून बघितलं. ती थांबलेली बघून मी अंतर राखून उभा राहिलो. तिची मान खाली होती. ती काहीच बोलत नव्हती. क्षणभर मला कशी सुरवात करावी ते सुचेना. पण मग मनाचा हिय्या करून मी तिला थेट प्रश्न केला. "तुमचा या लग्नाला होकार आहे का मालिनीजी?" तिने मानेनेच हो म्हंटले. मला बरे वाटले. आणि मग उगाच कोणी बघितले तर चर्चा होईल म्हणून मी लगेच मागे फिरलो आणि निघालो. पण मालिनीने मागून हळुवारपणे हाक मारली,"अहो.... एक मिनिट." मालिनीने हाक मारली हे लक्षात येऊन मी वळून बघितले. आता ती थेट माझ्याकडे बघत होती. "तुम्हाला माहित आहे का की माझ्या बहिणीच लग्न तुम्ही जिथे काम करता त्या कारखान्याच्या मालकांशी झाल आहे." स्वतःबद्दल किंवा माझ्या बद्दल न बोलता हे अचानक बहिणीच्या लग्नाबद्दल ती का बोलत होती ते माझ्या लक्षात आल नाही. मी शांतपणे 'हो' म्हंटल. त्यावर ती म्हणाली ,"हम्म... कदाचित बाबांनी सांगितल असेल नसेल म्हणून मी बोलले. पण मला वाटत नाही की तुम्हाला हे माहित असेल की माझ्या धाकट्या बहिणीशी त्यांनी लग्न केलंय. तस सांगायचं तर तुमच्या मालकांनी अगोदर मला मागणी घातली होती. पण लग्नाच्या दिवशी त्यांनी बाबांना सांगितल की त्यांना माझ्याशी नाही शालिनीशी लग्न करायचं आहे. बाबांना मोठा धक्का बसला. पण अस स्थळ परत नसतं आलं याची आम्हाला सर्वाना कल्पना होती. बाबांना आमच्या दोघींचंच काय एकीच लग्न कारण सुद्धा परवडणार नव्हत. त्यात त्या लग्नाचा संपूर्ण खर्च तुमचे मालकच करत होते. उत्तम कपडे, दागिने, खाणं-पिणं सगळा खर्च त्यांनी केला होता. मग अस चांगल स्थळ का सोडायचं. मी बाबाना समजावलं किमान एकीच्या जवाबदारी मधून तर सुटाल. आणि जर माझ्या नशिबात लग्न असेल तरकधी ना कधी नक्की होईल. आई-बाबांना पटल. शालिनी एकूणच माझं लग्न ठरल्यापासून शांत होती. मालकांच्या मागणीनंतरही ती शांतच होती. अर्थात तिला तिची इच्छा विचाराण्यासारखी परिस्थिती देखील नव्हती. म्हणून मग तुमच्या मालकांनी इच्छा व्यक्त केल्या प्रमाणे त्यांच आणि शालिनीच लग्न बाबांनी लावून दिल. मात्र त्यादिवासानंतर आम्ही शालिनीला कधीच भेटलेलो नाही. का कुणास ठाऊक पण तिने कधीच आमच्याकडे काही निरोप धाडला नाही किंवा कधी भेटायला आली नाही. बस! एवढच सांगायचं होत मला." अस म्हणून ती वळली आणि निघून गेली.

मी एकूणच सगळ एकून चक्रावून गेलो होतो. थोडा विचार केल्यावर लक्षात आल की कदाचित काल बुवाना हेच सांगायचं असेल. पण आपण बोलू दिल नाही त्याना. अर्थात मालकांनी अस का केल... किंवा आता त्यांच्या पत्नीने माहेरच्या माणसांशी काहीच संबंध का ठेवलेला नाही... हे प्रश्न असले तरी त्याची उत्तर शोधायची माझी इच्छा नव्हती. शेवटी हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो अस म्हणून मी तो विषय तिथेच सोडला.

आठ दिवसानंतरचा एक मुहूर्त बुवांनी काढला. ना माझ्याकडे पैसा होता ना बुवांकडे... मोठ लग्न, जेवणावळी हे आम्हाला दोघांनाही परवडणार नव्हत. त्यामुळे गावातल्या कोणाला बोलावल नाही. पण गावकरी देखील चांगले होते, त्याना माझ्या आणि बुवांच्या परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी देखील समजून घेतल. आम्हाला केवळ आशीर्वाद देण्यासाठी गावातली मोठी जाणती मंडळी लग्न लागल्यानंतर काही वेळानी आली आणि हातावर एक पेढा तेवढा घेऊन निघून गेली.

खर तर लग्न झाल तरी माझ्या आयुष्यात फार फरक पडला नव्हता. मी तसाच रोज पहाटे उठून कारखान्यात जात होतो. त्यावेळी करण्यासारखं काहीही नसल्याने मालिनी देखील तेव्हाच उठायची आणि तिच्या बगीच्याकडे जायची. झाडाना पाणी घालणे, देवांचे हार करणे वगैरे नेहेमीची कामे उरकून परत घरी यायची. घरातली थोडीवार आवराआवर करून थोडं उशिरानेच माझ जेवण करून माझी वाट बघायची. लग्न झाल आणि मी दुपारी घरी जेवायला जायला लागलो होतो. साधारण दोन-अडीच ला यायचं; जेवून थोडं पडायचं आणि तीन पर्यंत परत कामावर जायचं. त्यामुळे मला आता घरी परतायला साधारण पाच वाजत होते. कामावरून घरी गेलो की मग मात्र आम्ही दोघेही देवळाकडे जायचो. मालिनी आईला भेटून यायची त्यावेळी मी देवळात बसायचो. इतर गावकरी देखील असायचेच. मालिनी आली की मग आम्ही घरी जायचो. लग्न झाल आणि खरच आयुष्याला एक वेगळ वळण लागल अस मला वाटायला लागल होत. खूप सुखी होतो मी. मालिनी देखील आहे त्यात सुख मानणारी होती. असेच दिवस जात होते. त्यावर्षीची दिवाळी आली. तस बघितल तर आमचा पहिला सण. पण ना माझ्याकडे काही होत ना बुवांकडे काही देण्यासारख! त्यामुळे आम्ही पाडव्याला बुवांकडे जेवायला गेलो इतकंच. तेही रोजचच साधस जेवण.

जेवण झाल आणि मी आणि बुवा पाय मोकळे करायला बागेत फेऱ्या मारत होतो. मालिनी आईला आवरा-आवर करायला मदत करत होती. बुवाना काय वाटल कोणास ठाऊक त्यांनी अचानक बोलायला सुरवात केली. म्हणाले,"जावईबापू, कदाचित आतापावेतो मालिनी तुम्हाला बोलली असेलच की माझ्या धाकट्या मुळीच लग्न तुमच्या मालकांशी झाल आहे. तिने लग्नाच्या वेळचा प्रसंग देखील सांगितला असेल. तुमच्या मनात प्रश्न देखील असेल की मालकांनी अस का केल असेल... किंवा आता आमचा त्या घराशी काहीच संबंध का नाही.... आज का कोणजाणे मला तुम्हाला त्याबद्दल सांगावस वाटत आहे. मालिनी जशी शांत आणि दिसायला सोज्वळ आहे तसाच तिचा स्वभाव आहे. मात्र शालिनी तशी नाही. म्हणजे शालिनी आणि मालीनी दिसायला अगदी सारख्या आहेत. जवळ जवळ उभ्या राहिल्या तर कोण शालिनी आणि कोण मालिनी ते कळणार नाही. पण शालिनी फार ढालगज स्वभावाने. एका गरीब पुजाऱ्याच्या घरातल्या मुलीला परवडणार नाही अशी तिची स्वप्न होती. तिने घरात कधीच काहीच काम केल नाही. कायम स्वतःच सौंदर्य मिरवत गावातून फिरत असायची. तुमच्या मालकांच्या पहिल्या पत्नी कायम आजारी असायच्या. त्यांची सेवा करायला माझी पत्नी जायची. कधी कधी मालिनी देखील तिला मदत करायला जायची. तेव्हाच कधीतरी मालकांनी मालिनीला बघितली असेल. त्यामुळे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी मालिनीला मागणी घातली. तुम्ही आमची परिस्थिती पाहातच आहात. त्यामुळे आम्ही नकार देण्याचं प्रश्नच येत नव्हता. परंतु मालिनीच लग्न ठरलं आणि शालिनी खूप अस्वस्थ झाली. तिने लग्नाच्या दोन दिवस अगोदर देवळात मला गाठल आणि म्हणाली की तिला कारखान्याच्या मालकांशी लग्न करायचं आहे. परंतु ते माझ्या हातातच नव्हत तर मी तिला काय सांगणार? ती खूप चिडली... संतापली आणि तरातरा निघून गेली...... त्यानंतर लग्नाच्या दिवशी झालेला तो घोळ. शालिनी मला भेटायला देवळात आली होती आणि तिने तिची जी इच्छा बोलून दाखवली होती ते मी आजवर कोणालाच सांगितल नव्हत. अगदी मुलींच्या आईलादेखील नाही. पण मला मनातून ही गोष्ट खात होती. मन मोकळ करायचं होत. तुमच्याजवळ बोलून खूप बर वाटल."

त्यांनी जे सांगितल ते एकून मला खूप आश्चर्य वाटल. पण मी तस काहीच दाखवलं नाही. बुवांच्या खांध्यावर थोपटून मी म्हणालो,"बुवा मी तुमच्या मुला सारखाच आहे. माझ्याशी बोलून तुम्हाला हलक वाटत असेल तर मोकळेपणी माझ्याशी बोलत जा. मी कधीही कोणालाही यातल काही बोलणार नाही. बर! आमची निघायची वेळ झाली आहे. घराकडे जाऊया का?" अस म्हणून मी घराकडे वळलो. त्यावेळी बुवांनी मला थांबवल आणि म्हणाले,"जावईबापू, गैरसमज करून घेऊ नका पण एक सांगू का?" त्याचं अस विचारण मला विचित्र वाटल. म्हणालो,"बोला बुवा... अस का म्हणता? मोकळेपणी सांगा काय ते." "जावईबापू, तुम्हाला जर कधी तुमच्या मालकांच्या बंगल्यावरून बोलावण आल तर कृपा करून जाऊ नका किंवा मालिनीला देखील पाठवू नका." मला त्याचं बोलण एकून आश्चर्य वाटल. मी म्हणालो,"बुवा अस का म्हणता? अहो तुमचीच मुलगी आहे शालिनी. त्यावेळी ती काशिका वागली असेना का... पण लग्नानंतर सगळे बदलतात. ती देखील बदलली असेल. सर्वात महत्वाच म्हणजे मालिनीला तुमची आणि शालीनीची देवळातली भेट माहित नाही. त्यमुळे जर शालिनीने मालिनीला बोलावलं आणि बहिणीने बोलावल म्हणून मालिनीने जायचं ठरवल तर मी कस अडवू तिला?" त्यावार मात्र गंभीर होत बुवा म्हणाले,"जावईबापू, शालिनीला मालिनीच सुख कधीच बघवल नाही. तिने सख्खी बहिण असूनही मालिनीला कायम पाण्यात बघितल आहे. माला संशय आहे की शालीनिनेच काहीतरी करून मालकांच मन वळवल आणि त्यांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडल. तिला कदाचित वाटल असेल की मालिनीच लग्न आता होणारच नाही. पण तुमच्या रूपाने मला देवच पावला. आणि आता मालिनीच्या चेहेऱ्यावरून ती खूप सुखात आहे ते मला कळत आहे. त्यामुळे आता मालिनीच्या सुखात शालिनीने विष कालवू नये अस मला वाटत इतकच." बुवा मनापासून अगदी पोटतिडकीने बोलत होते. त्यामुळे मी त्यांना शांत करत शब्द दिला की मी किंवा मालिनी कधीच शालिनीला भेटायला जाणार नाही. माझ्या त्या एका वाक्याने ते शांत झाले आणि आम्ही घराकडे वळलो.

मी आणि मालिनी दोघे घरी आलो आणि बंगल्यावरून निरोप आला की मला आणि मालिनीला मालकांनी बोलावल होत. मला खूप आश्चर्य वाटल. नेमक दुपारीच माझ आणि बुवांच याच विषयावर बोलण झाल असण आणि त्याचवेळी मालकांच्या घरून बोलावण येण हा काय योगायोग असावा ते मला कळेना. आता माझी अवस्था कात्रीमध्ये असल्यासारखी झाली होती. मी बुवाना शब्द दिला होता की मी किंवा मालिनी कधीच बंगाल्य्वर जाणार नाही आणि नेमक आजच आमंत्रण आल होत. मी ठरवलं होत की एक दोन दिवसात एखादी बनावट गोष्ट तयार करून मालिनीला सांगायची आणि आपणद दोघांनी वाड्यावर कधीही जायचं नाही हे तिला पटवून द्यायचं. त्यात बुवाना शब्द देताना मझ्या मनात होत की आजवर मालकांनी कधीच त्यांच्या घरी बोलावल नव्हत. किंवा माझ लग्न झाल तरी कधी त्याविषयी ते माझ्याशी बोलले नव्हते.लग्न झाल्यवर लगेच जर बोलावलं नाही तर आता इतक्या महिन्यांनंतर कशाला मालक किंवा मालिनीची बहिण आम्हला बोलावेल. पण माझे सगळेच विचार फोल ठरले होते. आणि मी काही निर्णय घ्यायच्या आत मालिनी आनंदाने तयार होऊन निघाली सुद्धा होती. आता मात्र मला काहीच पर्याय उरला नाही. तिला काही समजावाव इतका वेळ देखील नव्हता. मात्र बंगल्यावर पोहोचण्याअगोदर मी मालिनीला एवढेच म्हणालो,"मालिनी, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आपण लगेच निघायचं आहे. तिथे अजिबात रेंगाळायचं नाही." मालिनीला माझ बोलण एकूण खूप आश्चर्य वाटल. तिने का म्हणून विचारल. तिला काय कारण सांगाव हे न सुचल्याने मी थोडा आवाज चढवून म्हणालो,"मी म्हणतो म्हणून. प्रत्येकवेळी मी तुझ्या प्रश्नाला उत्तर दिलच पाहिजे अस नाही." लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच मी माझा आवाज मालिनीवर चढवला होता. त्यामुळे माझ अस आवाज चढवून बोललेलं एकूण मालिनीला खूप आश्चर्य वाटलं. ती थोडी नाराज देखील झाली. पण त्यावेळी तिला काही समजावण मला शक्य नव्हत. त्यामुळे मी गप राहिलो.

आम्ही बंगल्यावर पोहोचलो. मालक दिवाणखान्यातच बसलेले होते. त्यांनी शांतपणे आमच स्वागत केल, बसायला सांगितल आणि आत निघून गेले. मालक गप्पिष्ट स्वभावाचे नव्हतेच. पण माझ्याशी जेव्हा जेव्हा बोलले होते त्यावेळी मला ते मोकळ्या स्वभावाचे वाटले होते. त्यामुळे त्याचं अस स्वतःच बोलावून आत निघून जाण मला थोड विचित्र वाटल, पण मी काहीच बोललो नाही. थोड्या वेळाने एक नोकर खूपसे फराळाचे जिन्नस आणि तीन-चार प्रकारचा गरम-गरम नाश्ता घेऊन आला. आणि आमच्यापुढे ठेऊन आत निघून गेला. आम्ही गोंधळून एकमेकांचे चेहेरे बघत बसून राहिलो. असाच थोडा वेळ गेला. आता माझ्या मनात चलबिचल सुरु झाली होती. आणि तेवढ्यात आतून शालिनी बाहेर आली. तिला पाहून माझा श्वासच अडकला. बुवा म्हणाले होते की शालिनी मालीनिपेक्षा दिसायला काकणभर कमी होती.... की जास्त चांगली होती? की दोघी सारख्याच दिसतात? काय म्हणाले होते बुवा? मला काहीच आठवत नव्हते. मात्र समोर उभी असलेली आमच्या मालकांची पत्नी आणि मालिनीची धाकटी बहिण म्हणजे संगमरवारातून घडवलेल्या अप्सरेच्या मूर्तीसारखी अप्रतिम सुंदर होती. तिने उंची साडी नेसली होती आणि अनेक दागिनेदेखील घातले होते. परंतु तरीही तिचे उपजत सौंदर्यच जास्त उठून दिसत होते. तिला पाहाताच मालिनी उठून उभी राहिली आणि आनंदाने तिच्या जवळ जाऊन तिने शालिनीला मिठी मारली. तिने शालिनीचा हात हातात घेतला आणि म्हणाली,"शालिनी किती सुंदर दिसते आहेस. लग्न छानच मानवल आहे ग तुला. आपण दोघी पूर्वी सारख्याच दिसायचो हे कोणाला सांगूनही खर वाटायचं नाही आता." शालिनीच्या चेहेऱ्यावर मंद हास्य होत. तिने मालिनीचा हात हातात घेतला आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट तिला विचारल,"कशी आहेस ताई? तुझ लग्न ठरल आणि झालसुद्धा. पण मला मात्र तू बोलावल नाहीस ह. ताई, पण आज तुझा दिवाळसण म्हणून मी मुद्दाम तुला बोलावण पाठवल. मला माहित होत की मी बोलावल आहे हे कळल तर तुझे पती कदाचित येणार नाहीत. म्हणून मग ह्यांच्या नावाने निरोप पाठवला. मी आले ही असते ग तुला भेटायला या अगोदर. पण मला या बंगल्यातून बाहेर पडायची परवानगी नाही." अस म्हणून ती क्षणभर थांबली आणि मग म्हणाली;"... म्हणजे... यांना माझी काळजी वाटते न! त्यामुळे त्यांनी मला एकटीने बाहेर पडू नकोस म्हणून सांगितल आहे." मग माझ्याकडे वळून ती म्हणाली,"भाऊजी कसे आहात?" मी काहीतरी उत्तर देणार होतो. पण त्याअगोदर तीच बोलायला लागली,"अरे तुम्ही काही घेतलं नाहीत का? अहो, घ्या ना. तुमच्यासाठी मुद्दाम गरम-गरम नाश्ता बनवून घेतला आहे." तिच एकूण वागण आणि बोलण खूपच सोज्वळ आणि शांत होत. आता मात्र मी पुरता गोंधळून गेलो. आजच बुवांनी मला सांगितल होत मी शालिनी ढालगज स्वभावाची होती आणि तिलाच मालकांशी लग्न करायची तीव्र इच्छा होती. पण माझ्या समोर जी शालिनी उभी होती, ती आपल्या बहिणीचा मत्सर करणारी वाटत नव्हती. ती ज्या पद्धतीने माझ्याशी बोलली होती आणि मालिनीची आस्थेने विचारणा करत होती त्यावरूनही ती मनाने वाईट असेल अस वाटत नव्हत. अर्थात समोर उभी असलेली शालिनी खरी की बुवांनी वर्णन केलेली शालिनी खरी हा प्रश्नच होता. कारण आपणहून कोणी वडील आपल्या मुलीबद्दल वाईट सांगणार नाहीत, अस माझ मन मला सांगत होत. पण डोळ्यांना जे दिसात होत ते मात्र खूप वेगळ होत.

माझ्या मनात विचारांची आवर्तन सुरु होती. त्यामुळेच कदाचित्ए मी गप्प बसलो होतो. पण मालिनीला वाटलं की मला मुळात वाड्यावर यायचं नव्हत; कदाचित म्हणूनच मी शांत आहे. तिला बहुतेक माझ मन दुखवायचं नव्हत. म्हणून मग एकदा माझ्यकडे बघून मालिनी म्हणाली,"शालू अग आम्ही नुकतेच आई-बाबांकडून जेऊन आलो आहोत. त्यामुळे खायला काहीच नको. तुझ लग्न झाल्यापासून तुझी भेट नव्हती झाली. त्यात तूच बोलावण पाठवल असशील अशी माझी खात्री होती. म्हणून फक्त तुला भेटायला आले आहे ग मी. बर! निघू का आम्ही आता? तस आता आपण जवळच राहतो आहोत. आज भेटण झालच आहे तर भेटूच की परत."

"खरच भेटू न ताई आपण? येशील माझ्याकडे? येत जा ह." शालिनी मालिनीचा हात हातात धरून म्हणाली. बोलताना तिचा गळा भरून आला होता.

आम्ही निघणार होतो म्हणून मी उठून दाराकडे वळलो होतो. इतक्यात मला मालिनीचा आवाज एकायला आला. "नक्की भेटूच. आता तर भेटलच पाहिजे तुला परत एकदा." मालिनी म्हणाली. तो आवाज नक्की मालीनिचाच होता याची मला खात्री होती. पण तरीही त्या आवाजात काहीतरी वेगळ होत. म्हणून मी गर्कन मागे वळून बघितल.मालिनीची माझ्याकडे पाठ होती आणि शालीनिकडे चेहेरा. मी बगितल की तिने अस म्हणताच शालिनी दचकली होती आणि भेदरून तिने मालीनिकडे बघितल. मग माझ्याकडे बघितल आणि मालिनीचा हात सोडून दोन पावलं मागे झाली. तिने हात सोडताच मालिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली,"चलूया का? आपला पहिला दिवाळसण आहे. घरी देवासमोर दिवा लावायचा आहे मला." मी मानेनेच होकार दिला आणि आम्ही निघालो. माझ्या समोर आलेली मालिनी शांत होती. पण क्षणभर मला वाटल की ही माझी नेहेमीची मालिनी नाही. अर्थात मी फार विचार करत थांबलो नाही.

मात्र मी बंगल्याच्या दारातून बाहेर पडताना सहज मागे वळून बघितल तर शालिनीने तिच्या साडीचा पदर डोळ्यांना लावला होता. तिच संपूर्ण अंग थरथरत होत. बहुतेक ती रडत होती... किंवा खूप घाबरली होती. घरी गेल्यावर शालीनिबद्दल मालिनीला विचाराव अस मी मनात ठरवल. आम्ही घरी आलो आणि मालिनी देवाला दिवा लावणे वगैरे कामाला लागली. त्यामुळे मग बंगल्यावरच्या भेटीबद्दल आमच्यात काहीच चर्चा झाली नाही आणि मग तो विषय राहूनच गेला. शालीनिशी बोलतानाचा मालिनीचा तो वेगळा आवाज मी एकला होता त्याचाच विचार मी करत होतो. पण परतल्या नंतर मला एकूणच मालिनीच्या वागण्यात कोणत्याच फरक जाणवला नाही. त्यामुळे मलाच काहीतरी भास झाला असेल असा विचार करून मी तो विषय तिथेच सोडून दिला.

असेच दिवस जात होते. दिवाळीची ती भेट माझ्या मनातून पुसली गेली होती. माझ आणि मालिनीच नेहेमीच रुटीन सुरु झाल होत. एक दिवस मालक सकाळीच कारखान्यावर आले. त्यांना एवढ्या लवकर आलेले बघून मला खुप आश्चर्य वाटल. पण कारखाना त्यांचा... झाली असेल इच्छा म्हणून आले असतील; असा विचार करून मी आपल्या कामाला लागलो. त्यादिवशी बरीच लाकड आली होती. त्यामुळे ती उतरवून घेऊन त्यांचा हिशोब करून मशीनवर चढवायची यादी कारण आणि बाकीची लाकड निट गोदामात ठेवून घेण हे सगळ मार्गी लावेपर्यंत खूप उशीर झाला. मला क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. त्यामुळे मी घरी जेवायला देखील गेलो नव्हतो. आता जवळ जवळ चार वाजून गेले होते. मला कडकडून भूक लागली होती. मालिनीसुद्धा माझ्यासाठी थांबून राहिली असेल हे मनात येत होत. पण जीवा अजूनही इथे तिथे घुटमळत असलेला मला सारखा दिसत होता म्हणजे मालक देखील कारखान्यातच होते... मालक गेल्याशिवाय तो जाणार नाही याची मला खात्री होती. अर्थात माझ काम आटपल होत त्यामुळे मी निघायची तयारी करायला लागलो. हात पाय धुवून मी मागे वळलो तर मालक समोर उभे. त्यांना अस अचानक समोर बघून मी दचकलोच. त्यांनी मला त्यांच्या मागून येण्याची खुण केली आणि ते वळून चालू लागले.

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

21 Aug 2016 - 7:53 pm | ज्योति अळवणी

अनावधानाने अगोदरच्या लिंक्स तिसऱ्या भागाच्या सुरवातीला जोडायच्या राहून गेल्या. त्या इथे देत आहे.

भाग १: http://www.misalpav.com/node/37022

भाग २: http://www.misalpav.com/node/37041

सामान्य वाचक's picture

21 Aug 2016 - 8:01 pm | सामान्य वाचक

भारी सस्पेन्स आहे
पुढचा भाग लवकर टाका

क्षमस्व's picture

21 Aug 2016 - 8:27 pm | क्षमस्व

क्रमशः आहे ना!
आणि खूप मस्त लिहीत आहात,
अगदी गोविंदराव दातारशास्त्री यांची आठवण झाली.

रहस्य छान खुलवलंय. येऊद्या पुढचा भाग लवकर.

अमितदादा's picture

21 Aug 2016 - 10:37 pm | अमितदादा

मस्तच..

भिंगरी's picture

21 Aug 2016 - 11:17 pm | भिंगरी

+१

एक एकटा एकटाच's picture

22 Aug 2016 - 12:15 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

स्रुजा's picture

22 Aug 2016 - 12:37 am | स्रुजा

थरारक ! रहस्य कथा लेखनात तुमचा हातखंडा दिसतोय.

ज्योति अळवणी's picture

22 Aug 2016 - 8:07 am | ज्योति अळवणी

धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मिपाकर फारच चोखंदळ वाचक आहेत याचा अनुभव आहे. त्यामुळे 'हरवलेलं विश्व' नंतर लगेच ही कथा इथे टाकावी की नाही याचा विचार करत होते. आपल्या सर्वांना कथा आवडते आहे हे वाचून खूपच बर वाटल.

@स्तृजा... इतरही काही विषयांवर कथा लिहिल्या आहेत. पुढे त्यादरखील मिपा वर टाकिनच. परंतु आपल्या विशेष प्रतिसादाबद्दल धन्यवाद

रातराणी's picture

28 Aug 2016 - 11:09 am | रातराणी

मस्त! कथा आवडली!