वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - भारत विरुद्ध इंग्लंड
२०११ चा वर्ल्डकप हा १९८७ आणि १९९६ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेल्या तिसरा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत - पाकिस्तान - श्रीलंका आणि प्रथमच बांग्लादेशला बहाल करण्यात आलं होतं, पण २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे यजमान म्हणून पाकिस्तानची हकालपट्टी करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये होणार्या मॅचेस उरलेल्या ३ देशांत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तानने बराच थयथयाट करुन पाहिला, अगदी आयसीसीला कोर्टाची नोटीसही पाठवली, पण आयसीसीने त्याला अजिबात भीक घातली नाही.