आदरणीय तात्याराव,
आमची पिढी ही जास्त पत्रलेखनावर भर देत नाही. सरळ सरळ जाऊन बोलण्यावरच आमचा भर असतो... खरंच हे पत्र नं लिहिता सरळ तुम्हाला भेटणंच शक्य असलं असतं तर?? असा एक विचार मनातून चमकून गेलाय आत्ताच.. आणि त्याच विचाराला अधिष्ठान मानून हे पत्र लिहीत आहे. तात्या, एका शब्दप्रभूला शब्दांनीच आदरांजली वाहणे आणि तीही मराठा भाषेच्याच दिनी योग्य म्हणून हा यथाशक्ती पत्रप्रपंच.
तात्या, २६फेब्रुवारी १९६६ रोजी तुम्ही प्राणोत्क्रमण केलेत, त्या दिवशी जी काही प्रचंड मोठी अंत्ययात्रा दादरला निघाली होती, ती अंत्ययात्रा दोन चिमुकले डोळे त्याच्या घराच्या सज्ज्यातून अनुभवत होते. ते दोन डोळे माझ्या आईचे होते. माझे बाबा, तुम्ही आमच्या कुर्डुवाडीच्या घरात आल्याची पुसटशी आठवण सांगतात. निदान माझ्या आईबाबांनीतरी तुम्हाला काहीअंशी अनुभवलंय. त्यामुळे तसा सुदैवीच... मी लहान होतो तेंव्हा घरात दूरदर्शन होतं पण सरकारी वाहिनी सोडली तर दुसरी कोणतीही वाहिनी नव्हती. त्यामुळे वाचनाची गोडी लागली. आणि तुम्ही भेटलात. लहान होतो, जाणिवा विकसित झालेल्या नव्हत्या म्हणून कदाचित असेल पण तुमच्या कर्तुत्वाचा अंदाज यायला खरंच वेळ लागला...
"स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" हे नाव घेतलं कि छातीत वादळं भरु लागतात. तुमची असंख्य रूपे डोळ्यासमोर तरळू लागतात. चाफेकरबंधूंना फाशी झाल्यावर पेटून उठलेला विनायक; भगवतीसमोर "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी प्रतिज्ञा घेणारा देशभक्त विनायक; वयाच्या सोळाव्या वर्षी "जयोस्तुते जयोस्तुते" सारखं अजरामर काव्य लिहणारा विनायक; राष्ट्रभक्तसमूह ते मित्रमेळा ते अभिनव भारत स्थापणारे संघटक सावरकर; "आमचा इतिहास हा पराभवाचा नसून तो जाज्वल्य देशाभिमानाचा आहे" म्हणून इतिहासाची चिकित्सा करून युवकांसमोर इतिहासाची सोनेरी पाने मांडणारे इतिहासचिकित्सक सावरकर; अंदमानचा नरक, तब्बल ११ वर्ष, भारतमातेचे स्तोत्र गात सहन करणारे एक धीरोदात्त सावरकर; स्थानबद्धतेत समाजसुधारणा करणारे सुधारक सावरकर; पराकोटीचे नास्तिक आणि तितकेच कट्टर विज्ञाननिष्ठ हिंदूत्वाचे प्रणेते सावरकर; मराठी भाषेला कित्येक नवीन शब्दाची भेट देऊन तिला समृद्ध करणारे भाषाप्रभू, कवी, नाटककार, लेखक सावरकर; आयुष्याचा यज्ञ करून स्वातंत्र्यासाठी त्यामध्ये सर्व सुख, समाधानाच्या समिधा मुक्तहस्ते अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर;स्वतंत्र भारतात बहिष्कार, स्थानबद्धता, टोकाची उपेक्षा, अवहेलना, मालमत्ता जप्ती पुन्हा नव्याने भोगणारा एक शापित क्रांतिकारक; हे सर्व "प्रतिकूल तेच घडेल" ह्या एकाच सूत्रात बांधणारे तत्वज्ञ सावरकर... आणि सरतेशेवटी मृत्यूलाच आमंत्रण देणारे मृत्युंजय सावरकर...
काय काय नि काय काय.... तुमचं वर्णन करायला शब्द पण तोकडे पडतात.... आणि तुमच्यावर माझ्यासारख्याने काही बोलणे म्हणजे सूर्यालाच आरसा दाखवण्यासारखे आहे, ह्याचे मला पूर्ण भान आहे...
तात्याराव एक प्रसंग माझ्या वाचनात आला होता, एका पत्रकाराने तुम्हाला विचारलं होतं, कि स्वतंत्र भारतात तुम्हाला काय व्हायला आवडेल? खरं तर तो प्रश्न कुचक्या मनोवृत्तीचं प्रतीक होता... पण त्याला तुम्ही अत्यंत वेगळं आणि स्तिमित करून टाकणारं उत्तर दिलं होतंत कि, "मी लेखणी टाकून देईन आणि खडू उचलेन". पण स्वतंत्र भारतानं तुमच्यातला लोकशिक्षक मारला ना? त्यानंतरच्या पिढीचं नं भरून येणारं नुकसान झालं.
तुमची "हिंदू" शब्दाची व्याख्या ना त्या त्यावेळेसच्या धर्मनिरपेक्ष सरकारला कळाली ना आजच्या धर्मनिरपेक्ष सरकारला कळतीये. एक देश, एक धर्म, एक भाषा हाच तुमचा आग्रह होता ना? आणि त्याच पार्श्वभूमीवर "आसेतुहिमाचल हि ज्याची 'पितृभूमी" असेल तोच हिंदू" ही तुमची हिंदूची व्याख्या आज आम्ही इतकी क्लिष्ट करून टाकलीये कि त्या नादात "एक देश, एक धर्म, एक भाषा" ही परिस्थिती स्वप्नातसुद्धा आमच्या नजरेसमोर येत नाही.
तात्याराव, क्षणोक्षणी तुमची आठवण आम्हाला येते. तुम्ही उभी केलेली हिंदू महासभा आणि आजची हिंदू महासभा बघितली कि आजच्या हिंदूमहासभेच्या नेत्यांच्या कानाखाली सणकन वाजवायला तुमच्यासारखं कोणीतरी आज हवंय....
तुमच्या काळातले प्रश्न आजही तस्सेच आहेत तात्याराव. तुमच्यावेळेसची बोरीबंदरची थेरडी (टाइम्स ऑफ इंडिया) आता गल्लोगल्ली माजली आहेत. अजूनही प्रसारमाध्यमे तश्शीच पक्षपाती वागत आहेत जशी तुमच्या काळात वागत होती. तात्याराव आज दहशतवाद्याची अंत्ययात्रा अशी निघते कि वाटावं कोण्या समाजसुधारकाची अंत्ययात्रा निघाली आहे. सैनिकांवर दिवसाढवळ्या आरोप केले जातात. समाजवादी आणि साम्यवादी त्यांच्या पातळ तत्त्वज्ञानाखाली दहशतवाद्यांचंही समर्थन करायला मागेपुढे बघत नाहीत. विशिष्ठ जातीचा किंवा धर्माचा कोणी जर मारला गेला तर अख्खा देश पेटवला जातो आणि तेव्हढ्याच तत्परतेने मात्र हिंदूंच्या हत्येकडे आणि हिंदूंच्या अन्यायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते... अजूनही ह्या देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचाच बळी दिला जातोय...बर्याच हिंदूंना हिंदू असण्याची लाज वाटते. इतिहासाची हवी तशी तोडफोड चाललीये...आणि म्हणून क्षणोक्षणी तुमची आठवण येते..
तात्या... साधारण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी एसएम जोशी म्हणाले होते कि, १९२२ चे सावरकर त्यांना पटतात. तेंव्हा सुधीर फडके लगेच म्हणाले होते कि १९२२ चे सावरकर पटायला तुम्हाला ४०-४५ वर्षे लागली. नंतरचे सावरकर पटायला अजून बरीच वर्षे लागतील... दुर्दैवाची गोष्ट अशी कि तात्याराव तुम्ही अजूनही आम्हाला समजला नाहीत...
स्वातंत्र्यवीर तुम्ही परत या... असे आवाहन मी करणार नाही... कारण तुमच्याएव्हढा नास्तिक हिंदू मी नाही. मला तुमचा तो विचार खरंच पेलवत नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे... गीतेतल्या "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि"च्या तत्वज्ञानावर विश्वास आहे.. तुमचा तो तेजस्वी आत्मा नक्कीच कुठल्यातरी चांगल्या जन्मात जाऊन तिथेही भव्यदिव्य कर्तृत्वाचं उदाहरण निर्माण करत असेलच फक्त ते आम्हाला ओळखता येत नाही हे आमचे करंटेपण....
तात्या लहानांनी थोर माणसांची उणीदुणी काढू नयेत असा एक संकेत आहे... तरी माझी एक तक्रार आहे, तुम्ही तुमचा उत्तराधिकारी नेमायला हवा होता निदान त्याच्या रूपाने तरी तुम्ही आमच्या अजून जास्त काळ राहिला असता. मोठ्या वृक्षाच्या सावलीत लहान रोपटी वाढतात आणि ती लहानंच राहतात. जेंव्हा तो मोठा वृक्ष नाहीसा होतो तेंव्हा ती लहान झाडे तग नाहीत धरू शकत. बहुधा ती मरतातंच. तुमच्याबाबतीत तसंच काहीसं झालं.... आणि हि सल माझ्या मनात बराच काळ सलत राहील...
असो... तात्या तुमच्या साहित्यातून तुम्ही आम्हाला भेटताच. भेटत रहाल ह्याची खात्री आहे. कोणी कितीही नाकारो पण तुमचं कर्तृत्व हे आमच्यासारख्यांसाठी समुद्रासारखं आहे. समुद्राचे पाणी बाटलीत घेऊन जर कोणाला दाखवले तर समुद्राची भव्यता त्याच्या लक्षात कशी येईल? हे पत्र काहीसे तस्सेच आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे....
समुद्राला जर अर्घ्य द्यायचं असेल तर समुद्राचंच पाणी वापरतात... अगदीं त्याचप्रमाणे जे काही शब्द मला ह्या मायमराठीने दिले त्याच शब्दांनी तुम्हाला आदरांजली वाहतो... आणि थांबतो.
तुमचा भक्त
चेतन....
.... वंदे मातरम...!!!
© Chetan Dixit
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
3 Mar 2017 - 12:39 pm | अत्रन्गि पाउस
ताशा योग्यतेचा कुणी असायला तर हवा ....आणि बऱ्याचशा दिग्ग्ज लोकांचा तितकाच प्रभावी उत्तराधिकारी असा कुणी नसतोच ....
उदाहरणे विचारू नका ...
3 Mar 2017 - 12:42 pm | विशाल कुलकर्णी
आवडले !
स्वातंत्र्यवीर सावरकर बहुतांश लोकांना फारसे उमजलेच नाहीत ही खंत मान्यच !
3 Mar 2017 - 1:09 pm | स्वीट टॉकर
तुमची शब्दसम्पत्ती आणि ती वापरायची हातोटी वाखाणण्यासारखी आहे!
'तुमचा तो तेजस्वी आत्मा नक्कीच कुठल्यातरी चांगल्या जन्मात जाऊन तिथेही भव्यदिव्य कर्तृत्वाचं उदाहरण निर्माण करत असेलच ' +१०००
तात्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला तेव्हां मी लहान होतो मात्र तेव्हां आमच्या सार्या सोसायटीवर दु:खाची अवकळा आली होती हे स्पष्टपणे आठवतय.
3 Mar 2017 - 9:42 pm | यशोधरा
आवडलं. तात्यारावांचं उत्तराधिकारीपण कोणाला पेलेल? त्यांनी असे काही केले नाही, तेच उत्तम झाले.
4 Mar 2017 - 5:27 am | दिगोचि
भारत स्वतन्त्र झाल्यावर सावरकरानी नेहरुना एक पत्र लिहुन त्यात काय करयला हवे ते लिहिले होते असे मी एक ठिकाणी वाचले. त्यात आपल्या सन्रक्षणाची काळजी घ्यायला हवी हे सान्गितले होते परन्तु पाकिस्तान्धार्जिण्या नेहरुनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याची फळे आपण भोगत आहोत.
4 Mar 2017 - 5:28 am | दिगोचि
भारत स्वतन्त्र झाल्यावर सावरकरानी नेहरुना एक पत्र लिहुन त्यात काय करयला हवे ते लिहिले होते असे मी एक ठिकाणी ऐकले. त्यात आपल्या सन्रक्षणाची काळजी घ्यायला हवी हे सान्गितले होते परन्तु पाकिस्तान्धार्जिण्या नेहरुनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याची फळे आपण भोगत आहोत.
4 Mar 2017 - 10:19 am | संदीप डांगे
कुठं वाचलं बरं हे, सांगाल काय?
5 Mar 2017 - 7:04 pm | अभ्या..
पत्र वगैरे पाठवल्याचे माहीत नाही पण एका छोट्या मुलाखतवजा भेटीत स्वा. सावरकरांनी वेर्णेकरशास्त्रींना नेहरुंचे परराष्ट्र संबधी विचार कसे चूक आहेत, तिबेट नेपाळ आदी कीलकराष्ट्र (बफरस्टेट) म्हणून कसे उपयोगी आहेत, इ. विधाने आणि आगामी कालखंडासंबंधी काही भाकीते केल्याचे वाचल्याचे स्मरते.
(सा. विवेकने प्रकाशित केलेला स्वा. सावरकर विशेषांक)
5 Mar 2017 - 6:54 pm | अभिजीत अवलिया
नेहरू -- > पाकिस्तानधार्जिणे ?
4 Mar 2017 - 10:26 am | पैसा
लेख आवडला.
4 Mar 2017 - 9:20 pm | ज्योति अळवणी
खूप योग्य शब्दात लेख लिहिला आहात. आवडला
5 Mar 2017 - 7:13 pm | गवि
हे बहुधा टिळकांनी म्हटलं होतं. सावरकरांनी नव्हे. ते उलट संधी मिळती तर सक्रिय राजकारणात उतरले असते असं म्हणतात.