शोध आणि धागेदोरे: Research and References

Primary tabs

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
31 Mar 2021 - 10:39 pm

**********

माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership).

https://www.amazon.in/dp/B091FD93LS

त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे. आवडल्यास संपूर्ण कथा वाचण्यासाठी नक्की अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक वाचा, लिंक वरती दिली आहे, आणि वाचल्यावर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

**********

रेल्वेस्टेशनच्या आवारात तुरळक माणसं, शांत पुहडल्यासारखे दिसणारे रेल्वेचे फलाट. सकाळी अकराची वेळ दाखवणारं रेल्वेकडच्या भिंतीला वरच्या टोकाला टागलेलं ते थोराडं दिसणारं एकमेव घड्याळ, फलाट क्रमांक एकवर ट्रेनची वाट बघणारा 'तो' स्वतः आणि समोरच्या फलाट क्रमांक दोनवर..... तिथे कोणीच प्रवासी गाडीची वाट बघत नव्हता.... फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, त्यांच्या बाजूलाच रंगीबेरंगी पिसाच्या खुळखुळ्यासोबत नुसतंच खेळत असलेलं त्याचं ते निरागस एक-दीड वर्षोंच लेकरू ज्याच्यावर लक्ष ठेवायचं सोडून ते दोघं गाढ झोपी गेले होते, ते लहान बाळ खेळण्यात बेफाम गुंतून गेलं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे!! खेळता खेळता त्या लहान लेकराच्या हातातून आता एकाएकी तो खुळखुळा निसटत फलाटावरुन खाली रेल्वेरुळाच्या बाजूला घरगळत पडला आणि ते निष्पाप पोर लगोलग रेल्वे रुळाच्या दिशेने दुडूदुडू ओणवत ढोपरावर चालू लागलं, आणि समोरच्या फलाटावरून हा सारा प्रकार रेल्वेची वाट पाहत असलेला 'तो' स्वतः पाहत होता, इतक्यात खुळखुळा पडलेल्या फलाटाच्या दिशेने ट्रेन येत असताना दिसली, होत असलेला प्रकार आता उपस्थित असलेल्या तिथल्या तुरळक प्रवाशांच्याही लक्षात आला. सर्वजण जोरदार आवाज देत समोरून त्या जोडप्याला उठवू पाहत होते. अगदी 'तो' देखील बेंबीच्या देठापासून ओरडत होता पण पलीकडून परिणाम शून्य, आता ते मूलं एकदम फलाटाच्या कठड्यावर येऊन थांबलं, त्या लहानग्याला खुळखुळा नजरेस पडला आणि त्याचा चेहरा खुलला. इतक्यात त्याच रुळावरून जाणारी ट्रेन आता रेल्वेस्टेशनच्या आवारात येत असताना दिसली, एकच पर्याय समोर दिसत होता, कुणीतरी त्या लहान मुलाला तिथून दूर करणं!... आता त्या खुळखुळ्यासाठी पुढे होतं तो कोवळा जीव खाली पडणार आणि भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेन खाली सापडणार..... इतक्यात....!!!

**********

नजरेसमोरची दृश्य आता टीव्हीवर दाखवली जात होती, अगदी मागे पुढे सरकवत, एका एका क्षणाचं वर्णन वृत्तनिवेदक अगदी जोश्यात करत होता आणि 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं, आता घरात तो खाटीवर बसून होता, त्याच्या एका बाजूला त्याचा मित्र महेश बसला होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची विधवा आई रेवती बसली होती. घर म्हणालं तर विरारच्या सेवा नगर मधली बैठ्या चाळीतलं, दहा बाय दहाच्या मानवी खुराड्यातलं. सदानंदची विचारपूस करायला आलेला त्याचा मित्र आता जाण्यासाठी निघाला होता, "चल सदानंद, मी निघतो....भाऊंचा फोन येतोय.... एरियात रक्तदानाचं महाशिबीर भरवतोय, आपल्या भाऊच्या नावाने......नगरसेवक..... वाढदिवस आहे ना परवा....फुल जय्यत तयारी करायची....तब्येतीची काळजी घे...चला काकी मी निघतो...." , "अरे ते रक्तदानाचं ब्लडबँक वाले बघून घेतील तू भाऊंच्या बॅनरच्या फोटोच्या साईजकडे लक्ष दे" मित्र त्याला आलेला फोन उचलत पलीकडल्या माणसांशी बोलता बोलता निघून जातो. मित्र जाताच झालेल्या शांततेने आधीच दुःखात असलेला सदानंद प्रचंड हिरमुसून गेला होता, त्याने एक नजर त्याच्या प्लास्टर लावलेल्या हातावर फिरवली, आणि मग आईकडे बघितलं. आई त्याच्याकडे रागाने पाहत रडवेल्या स्वरात म्हणाली "काय गरज होती असा स्वतःचा जीव धोक्यात टाकायची, उद्या काही बर वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं याचा तरी विचार करायचा होतास... आता तुझ्याशिवाय मला उरलयं तरी कोण?"

**********

सदानंद. शहराने वाटून दिलेल्या, स्वतःच्या वाटेला आलेल्या परिघातच त्याला त्याच आयुष्य जगायचं नव्हतं, त्याला रोजच्या रहाटगाड्यातून निसटायचं होतं. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या या मायानगरीत सकाळची नऊ पाचची फास्ट लोकल पकडणं, त्याच डब्यातली तीच लोकं.....तीच मजाक मस्ती...तीच गर्दीने भरलेली ट्रेन.... विरार वरून निघायचं आणि चर्चगेटला पोचायचं...... दोन तास यायला आणि दोन तास जायला....रेल्वे स्थानकात ट्रेन आली की होणारी चेंगराचेंगरी... माणसांचा पाठमोरा दबाव....सकाळच्या चांगल्या प्रसन्न मूडची वाट लावून टाकत होता..... तेच ऑफिस.... अंकाऊट असिस्टंटचा जॉब करून घरी येणे....याने सदानंद खूप बोर झाला होता....त्याला एक आशा होती जी त्याला या बजबजपुरीतून बाहेर काढू शकेल, त्याला विश्वास होता, त्या विश्वासाची चमक अजूनही लखलखत होती...पण ती आता दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघाताने विझताना दिसत होती....त्याला लेखक व्हायचं होतं.... असा लेखक ज्यांच्या कथा कांदब-यांची चर्चा होईल, खूप सारा खप होईल..... थोडक्यात त्याला प्रसिद्ध लेखक व्हायचं होतं.....

प्रसिद्ध तर तो मागच्या दोन दिवसापासून झालाच होता, प्रत्येक न्यूज चॅनल वर त्याचंच तर नाव आणि चेहरा दाखवला जात होता पण कारण मात्र वेगळं होतं. आता त्याच्या घरी शेजार-पाजा-यांची, ओळखीच्यांची, नातेवाईकांची आणि मित्रांची उठबस दोन दिवसापासून वाढली होती ती आता काहीशी ओसरत आली होती. रात्रीचे दहा वाजले होते, सदानंद खाटेवर झोपला होता, आईने सदानंदच्या अंगावर असलेली चादर पायाच्या बाजूने नीट सरकवत म्हणाली "येईल सुदेश उद्या, झोप आता", ती ही आता खाली जमिनीवर अंथरलेल्या चटईवर झोपी गेली, सदानंदची एक नजर आता रात्रीच्या शांततेला तोडण्याऱ्या डोक्यावरच्या पंख्याकडे गेली, त्याला झोप अशी लागतच नव्हती, सतत काहीना काही विचार मनात घोघावतच होते. तशीच एक नजर खाली चटईवर झोपलेल्या आईकडे गेली, बहुतेक तिला झोप लागली होती. त्यांच्या डोळ्यात एकाएकी आसवं जमा झाली होती, ती पुसण्यासाठी तो गालावर हात फिरवणार इतक्यात त्याला हाताला प्लॅस्टर लावल्याची जाणीव झाली. झोपेसाठीच्या पुहडलेल्या अवस्थेततच तो जड झालेला हात सावरत होता, त्यांची ती फिरती नजर समोरच्या टेबलावर त्याने परवापर्यत हाताने लिहिलेल्या कागदावर गेली, जी हटायचं नावच घेत नव्हती. त्याला मनातल्या मनात आठवत होती चार महिन्यापूर्वीची ती घटना.....

**********

चार महिन्यापूर्वी,

रोजच्या सारखा फास्ट लोकलच्या डब्यात मजा-मस्करी करत असलेले चेहरे, सदानंदची जी काही दिवसाची सुरवात व्हायची ती या लोकांसोबतच...... राकेशबावा जो एक सेल्समॅन होता.... शंकरकाका जे एका फॅक्टरीत वर्कर होते.... त्यांच्या पुढच्या स्टेशनवर डब्यात येणारे रहीमचाचा, आपल्या डोक्यावरचा चष्मा नीट करत हातातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचणारा सुशांत त्रिवेदी.... आणि अंपग असूनही जनरल डब्यातून प्रवास करणारा दशरथ.... ज्यांची थट्टा मस्करी.... खेचण्यात...सगळ्याच्या तोंडून हसू फुटायचं.... दशरथ माणूसच तसा होता....दशरथलाही या सगळ्याची सवय झाली होती.... आणि ट्रेनच्या दरवाज्यापाशी प्रवास करणारे सदानंदच्याच वयाचे सडाफटिंग तरुण पोरं .... हेच जग होतं त्याच.....खरं म्हणजे त्याला असं दरवाज्याच्या कडेला उभे राहत प्रवास करणे म्हणजे मरणाच्या दारात उभा असल्यासारखं वाटायचं.....पण आता तो या सगळ्या माहौलाशी जुळुन गेला होता.....त्याला आता सवय झाली होती.....तो नेहमी दुःखीच असायचा....सदानंद डब्यातल्या सगळ्या या मजा मस्तीच्या वातावरणामध्ये गप्प राहत सगळ्याचं बोलणं ऐकायचा ....बघायचा आणि अनुभवायचा..... कोणी विचारलं तर हो किंवा नाही यामध्येच उत्तर द्यायचा, डब्यातल्या बाकी लोकांना त्यांच्या या सवयीबद्दल माहिती होतं, जास्तीत जास्त कधीकधी त्याचं रहीमचाच्याबरोबर थोडंफार बोलणं व्हायचं... कारण काय तर ते सुदधा यांच्यासारखे देव न मानणारे होते…. त्याच्या या घुम्या स्वभावामुळे कधीकधी त्याच्यावरही विनोद व्हायचे... तसं बघायला गेलं तर त्याचा कोणताही परिणाम सदानंदवर होत नव्हता, त्याला वाटायचं तो एकटाच आहे, विनाकारण आहे, बाकी लोकांच्या हसण्या-खिदळण्यामध्ये त्याला त्या लोकांच्या जगण्याचं कारण, हेतू, ध्येय सगळं दिसायचं... नाहीतर कधी कधी काही-काही लोक त्याला ठार वेडे वाटायचे... कोणतेही कारण नसताना...विनाकारण...मेलेल्या मुडद्यासारखे जगत असलेले... तो लोकांच्या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐके आणि कानांमध्ये साठवून आपल्या कोणत्यातरी कथेतल्या पात्रात उतरवत असे, आणि त्याच्या मनात चाललेल्या या द्वंद्वामुळेच लोकांना तो शांत वाटायचा.... पात्राच्या शोधाचा प्रवास नुसता ट्रेनच्या डब्यातच नाही तर ऑफीस, घर, गल्ली, रस्ते, जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी.... प्रत्येकवेळी....तो करत असे. तो नोकरी जरूर करत होता पण त्याच्या आतली अंतस्थ प्रेरणा तर काहीतरी वेगळेच सांगत होती त्याला लेखक बनायचं होतं, प्रसिद्ध लेखक… ज्याच्या नावाची.... पुस्तकांची..... दूर दूर पर्यंत चर्चा होईल..... कमीत कमी इतका पैसा यावा की विधवा आईच्या रोजच्या जास्तीच्या पैसे कमावण्याच्या कटकटी पासून सुटका व्हावी.... त्यांने प्रयत्न सुद्धा केले होते एकदा नाही दोनदा....पण त्यांनी लिहिल्या कादंबऱ्या काही विशेष कमाल दाखवू शकल्या नव्हत्या.

आणि आज तो जसा रेल्वेच्या डब्यात शिरला तसा त्याला सुशांतच्या समोरची सीट भेटली, सुशांत नेहमीसारखाच वर्तमानपत्रातल्या बातम्या लोकांना वाचून दाखवण्यात मश्गूल होता की एकाकी सदानंदची नजर वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानाच्या कोपऱ्यात छापलेल्या जाहिरातीकडे गेली. शहरातल्या प्रसिद्ध परमार प्रकाशनाने आपल्या पन्नासाव्या वर्षातल्या पदार्पणाच्या निमित्ताने नवोदित लेखकांसाठी कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती, जी पस्तीस वयाच्या आतील कोणत्याही एक कादंबरी प्रकाशित झालेल्या लेखकांसाठी होती, वयाची तर अट सहजच नियमात बसत होती आणि कादंबऱ्या म्हणाल तर सदानंदच्या दोन-दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. आणि बक्षिसाच्या स्वरूपात वीस लाख रुपये आणि कुटुंबासोबत भारतातल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी. नाव नोंदणीसाठी आठवडयानंतरच्या सोमवारी परमार भवनला जाणं आवश्यक होतं म्हणजे दोन दिवसानंतर, कथेचा प्रकार आणि स्वरूप यासंबंधीची माहिती तिथे गेल्यावरच कळणार होती. सदानंदने हे सगळं एका दमातच वाचून काढलं... आणि .... आणि त्याच्या हृदयाची धडधड अधिकच वाढू लागली. तो कितीतरी दिवसापासून अशाच संधीच्या शोधात होता. त्याच्या डोळ्यासमोर वीस लाख रुपये तरळू लागले. त्याने ते वर्तमानपत्र सुशांतच्या हातातून हिसकावून घेत, त्यातली ती जाहिरात पुन्हा पुन्हा वाचू लागला. वाचून वाचून एकदाच मन भरल्यावर त्याने पेपर परत केला, त्याला आतून आज कितीतरी दिवसानंतर बरं वाटत होतं, पॉझिटिव्ह म्हणतात ना तसलं काहीतरी..... आज त्याला वाटत होत की तो खरचं श्वास घेतोय, तो जगतोय.... आज तो दशरथवर होणाऱ्या प्रत्येक विनोदावर.... त्याच्या टेर खेचण्यावर हसत होता.....

कथालेखनावर फोकस करण्यासाठी सोशल मिडिया आणि मित्र परिवारापासून दूर राहण्याविषयी मनातल्या मनात ठरवुनही टाकलं.... नाही.... त्याने सोशल मिडिया अंकाऊटस डिलीटसुध्दा केली. आदल्या दिवशी त्याला नीटशी झोपही लागलेली नव्हती.... का तर दुसऱ्या दिवशी त्याला परमार भवनला जे जायच होतं. अशी कथा लिहिणं की दुनिया विचार करत राहिलं..... आणि एकदा का जिंकलो की हे रोजच मरत जगणं तर बंद होईल. मागच्या दोन दिवसापासून त्याचं मन असं कश्यात लागतच नव्हतं कधी एकदा परमार भवनला जातो आणि कथेचा विषय माहित पडतोय..... आणि त्यावर लिहायला घेतो.... त्यांच्या आतल्या आत बुलबुल तरंग वाजायला लागला होता... खूपशी उत्सुकता दाटून राहिली होती....

एकदाचा परमार भवनला जायचा दिवस उजाडला....

परमार भवनमध्ये सदानंदच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते, त्यामुळे तो थोडासा दुःखी झाला, काय माहित प्रत्येकजण त्याच्यासारखाच वीस लाखाच्या हव्यासापोटी आला असेल, तिथे आता लेखकांच्या आधी लिहिलेल्या कादंबरीची नोंद करून त्यांना आतल्या पायऱ्या चढून एका छोटेखानी सुंदर हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. सदानंद एकदम मागच्या बाजूला बसला कारण बाकी लोकांना आणि आजूबाजूच्या घडामोडीचा अंदाज घ्यायला बरं पडतं म्हणून. इतक्यात त्याच्या बाजूच्या खुर्चीशेजारी अजून एकजण येऊन बसला, तो ही लेखक असावा बहुतेक, कार्यक्रम सुरू व्हायला अजून वेळ होता. तिथे आजूबाजूला बसलेल्या लोकांमध्ये आता गप्पागोष्टी सुरु झाल्या, त्या बाजूवाल्या माणसाने सदानंदने विचारलं "तुम्हाला वाटतं, की हे वीस लाख देतील". सदानंदच्या मनात पण हाच विचार घोघावत होता. "काही कल्पना नाही" सदानंदने विषय न वाढवण्याच्या हेतूने म्हटलं. त्याला या हॉलमधला प्रत्येक माणूस त्यांचा दुश्मनच वाटत होता, पुन्हा त्या माणसाने बोलणं चालू ठेवण्याच्या हिशोबाने म्हटलं " मी असं ऐकलयं की जिकंणा-या कथेचा वापर सिनेमा बनवण्यासाठी होणार आहे, अर्धी रक्कम ते फिल्म प्रोड्युसर स्पॉनसर करतायत, नाहीतर नुसत्या परमार प्रकाशनची स्वतःची ऐपत कुठे ?", हे चित्रपटाविषयीचं बोलणं ऐकून त्यांच्या मनात अधिकचे लाडू फुटत होते, फ्लिमच्या पोस्टरवर लिहिलेलं असणारं " लेखक सदानंद सोहकर" सदानंदच तुटकतुटक बोलणं समोरच्या माणसाला खायला उठत होतं, त्या माणसाने बोलणं पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने अजून एक प्रश्न विचारलाच "तुम्हाला भीती नाही वाटत की तुम्ही लिहिलेली गोष्ट कोणीतरी चोरेल आणि स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल".

सदानंद आता उत्सुकतेने म्हणा नाहीतर नाईलाजाने काही बोलणार इतक्यात स्टेजवर रणजीत परमार येत असल्याचं सांगितलं गेलं, सगळं वातावरण गंभीर होऊन गेलं. "नमस्कार, गुड आफ्टरनून, सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली रुची प्रकट केली, आम्ही तुम्हाला संधी देत आहोत कथा लिहून वीस लाखाचे हक्कदार होण्याचे, त्यासोबत भारतातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना कुटुंबासोबत भेट देण्याची... मला अविवाहिताबद्दल दुःख वाटतयं....गंमत केली… तुम्ही तुमच्यासोबत कोणाही चार व्यक्तीनां घेऊन जाऊ शकता…”

या बोलण्याने वातावरण हलकफुलक झालं होतं, रणजीत यांच बोलणं चालूच होतं,

“कदाचित तुम्ही लिहिलेल्या कथानकावर सिनेमा ही बनू शकतो, तुम्हाला ठाऊकच असेल परमार पब्लिकेशन एकेकाळी त्यांच्या रहस्य कथांसाठी खूपच लोकप्रिय होतं, म्हणून पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने आम्हाला इथपर्यंत वाटचालीत साथ देणाऱ्या वाचकांना पुन्हा एकदा त्याचं कथाप्रकाराशी जुळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे..... काय असते रहस्य? जे उराशी बाळगून आपण एका वेगळ्या चेहऱ्याने जगत असतो, आणि ते समोर आल्यानंतर प्रत्येकांचा दृष्टिकोन बदलून जातो, भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलतो, माणूस एकदा वरच्या पदावर गेला की त्याच्या छोट्यातल्या छोट्या रहस्यालाही फार मोठी किंमत येते” वयाची पन्नाशी पार केलेला हा माणूस मोठया उत्साहाने बोलत होता.

रणजीत यांच्या धीरगंभीर आवाजाला सगळी आलेली कथालेखक मंडळी कान देऊन ऐकत असताना पाठीमागून कोणीतरी सदानंदला टोकत एक पेपरकार्ड हातात दिलं. सदानंदने पेपरकार्डवर नजर टाकली, पेपरकार्ड वर लिहिलेलं सगळं काही मोठ्या पडद्यावरही दाखवलं जात होतं.

रणजित परमार बोलत होते, आता तुमच्या हातात जे पेपरकार्ड दिलं जातयं तेच मुददे इथे समोरही मांडले आहेत ते पुढीलप्रमाणे, यांतला मराठीत लिहिलेला भाग हा कथानकासांठी महत्तवाचा आहे.

“Retain (Countine to hold)- कथा खिळवून ठेवणारी हवी.

Enroot (on the way)- कथेतील रहस्य भूतकाळातल्या कोणत्यातरी घटनेशी जोडलेलं असायला हवं.

Search ( For solutions)- रहस्याचा शोध कसल्यातरी समस्येच्या समाधानासाठी असायला हवा.

Engima ( something that quite difficult to understand/mystery)-काहीतरी वेगळं, सामान्यतेच्या पलीकडलं.

Articulate (To express something clearly)- योग्यप्रकारे तंतोतंत स्पष्टपणे कथा उपकथानकाशी जोडलेली हवी.

Res gestae (all the facts so connected with the facts in an issue so as to introduce it. Explain its nature, or form connection with it as to form one countional transaction- बंदिस्त असलेल्या कथानकातील एक असा पैलू जिथून कथा रहस्य उलगडायला सुरुवात होईल.

Countigency (Something that is done in view of any possible future incidence) - अशी एखादी गोष्ट भविष्यात होऊ शकते किंवा नाही.

Herald ( Announce the approach of something) शेवटी काहीतरी उद्घोषणा व्हावी जी रिसर्चच्या परिणामातून आली असेल.

आणि तुम्ही लक्षपूर्वक पहाल प्रत्येक इंग्रजी शब्दाच्या पहिल्या अक्षराला जोडलं तर Research हा शब्द तयार होतो, म्हणजेच कथा कोणत्यातरी रिसर्चवर आधारित असायला हवी.

खरं म्हणजे मी माझ्या सहकाऱ्यांना कथानकासाठी थीम बनवण्यासाठी सांगितलं होतं, पण त्यांना ते काही शक्य झालं नाही, म्हणजे त्यांनी प्रयत्न केले पण मला काही ते रुचले नाही, म्हणून मग मी माझ्या मुलाच्या एमबीएच्या पुस्तकातला एक पॅरेग्राफ कथानकाच्या थीमसाठी निवडला जो भाग इंग्रजीत लिहिलेला आहे, आम्हाला तर वेगळे काही सांगायची गरज नाही या दिलेल्या सगळ्या पॉईंटना ध्यानात धरून एक रहस्यकथा लिहायचीय, जी लिहिण्यासाठी केवळ चार महिन्याचीच मुदत आहे, तर लवकरात लवकर तुम्ही लिहलेली कथा आमच्या वेबसाईटवर अपलोड करा, बाकी नियम व अटी तुम्हाला तिथे देखील सापडतील, आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा अडचणी आल्या तर आमच्या ईमेल आणि सोशल मीडिया पेजला संपर्क करू शकता.... आणि…हो सगळ्यात महत्तवाचं…. कथेमध्ये खून होणे गरजेचे आहे... रहस्यासोबत.....”

या शेवटच्या वाक्याने सगळ्या हॉलमध्ये हलकसं का होईना हास्य पसरलं. पेपर कार्ड दिल्यावर ते वाचण्याच्या उत्सुकतेत गंभीर झालेलं वातावरण आता चुळबुळ वाढत जाऊन एकदमच बडबड सुरु झाली, पेपरकार्डवर लिहिलेले पॉईंट वाचल्यानंतर पाहिल्यानंतर सदानंद काहीसा गंभीर झाला होता, आता त्याला वीस लाखाच्या ईनामाची खरी किंमत कळाली होती. पण त्याच्या बाजूला बसलेल्या मघ्याच्याच इसमाच्या चेहऱ्यावर काही एक फरक जाणवत नव्हता, यावेळी मात्र सदानंदने त्याला प्रश्न विचारला, "तुम्हाला वाटत का की तुम्ही लिहू शकाल?" त्याच्या बाजूला बसलेला इसम हसत म्हणाला "काहीएक सांगता येत नाही, प्रयत्न तर नक्की करेन, पण तुम्ही माझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं", सदानंद लगेच म्हणाला "कोणत्या प्रश्नाचं?", "हीच की तुम्ही लिहिलेली कथा कोणी चोरली आणि स्वत:च्या नावाने प्रसिद्ध केली तर" त्यावर त्वरेने सदानंद म्हणाला “अजिबात नाही मी माझ्या कथा आजही हातानेच कागदावर लिहितो”, तो बाजूवाला माणूस आश्चर्याने म्हणाला " वा हाताने, आजच्या इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये, पण का?" सदानंद आत्मविश्वासाने म्हणाला " माझ्या मेंदूतील विचार थेट पेनातून कागदावर उतरतात, कागदावर लिहिण्याची मजाच काही वेगळी असते". त्या माणसाने पुन्हा एकदा कोड घातल्यासारखा प्रश्न विचारत म्हणाला "हा मी पण सुरुवातीला कागदावरच लिहायचो पण आता लॅपटॉपची सवय झालीय, समजा तुम्ही लिहिलेले कागदच कुणी चोरून नेले तर" " हे शक्य नाही, कारण माझं कागदावर लिहिलेलं अक्षर फक्त मलाच कळत" सदानंद हसत खुर्चीतून उठत म्हणाला. हॉलच्या बाहेर येत सदानंदने त्या इसमाशी हस्तांदोलन करत एकमेकांचा निरोप घेतला.

**********

पण आता ती वेळ येऊन ठेपली होती, सदानंदने लिहिलेली कथा अजून कागदावरच समेटून राहिली होती, तिला आता लॅपटॉपवर उतरवणार त्या अगोदरच तो असा अस्वस्थ होत पंलगावर पुहडला होता, स्वतःशीच तुटल्यासारखा ..... आणि आता फक्त चार दिवस राहिले होते कथा ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, कथा सुचून तिला प्रत्यक्ष कागदावर उतरवण्यातच बराच वेळ गेला होता, पण त्याला विश्वास होता की त्याने लिहिलेल्या कथेने त्याचं आयुष्य बदलू शकत, अपघाताने झालेल्या अवस्थेमुळे ना तो स्वतः टाईप करु शकत होता आणि फक्त सदानंदलाच कळणा-या हस्ताक्षरामुळे दुसरा कोणी एक-एकटाच टाईप देखील करु शकत नव्हता. सदानंदला अश्या एका माणसांची गरज होती जो कथा लिहिलेले कागद सदानंदने वाचल्यावर भराभर टाईप करेल आणि प्रूफ रिंडिगसुदधा म्हणजेच व्याकरण, अक्षरजुळवण आणि शुध्दलेखन तपासेल… हा एक व्यक्ती होती त्यांच्या ओळखीतली… त्यांच्या चांगल्या टाईपिग स्पीडच्या जोरावर चार दिवसांच्या आत कथा आनलाईन सबमिट केली जाऊ शकत होती, त्यांच्या मागच्या दोन कांदबरीच्या वेळी प्रूफरिडिंग करणारा इसम…

त्यांच्या आईला रेवतीला माहित नसायचं की सदानंद इतक रात्रीचं काय लिहित असतो, आईला वाटायचं की हा काही ऑफिसचं काम करत असेल, तसा त्यांच्या आईला वेळ तरी कुठे होता हे सगळं बघत बसायला, ती सुदधा कामाला जात होती, सदानंदने मागच्या दोन कांदब-या प्रकाशित झाल्याबदल कधीही आईला सांगितलच नव्हतं, एकतर तिला या जगाबददल काही माहित नव्हतं आणि कळतंदेखील नव्हतं, आणि सदानंदला सागावं अशी गरजही वाटली नव्हती, आणि आताही त्याने आईला काहीएक सांगितलं नव्हतं.

**********

तो हॉस्पिटलवरुन आल्यानंतर खाटेवर तसाच पुहडलेला असताना, मोबाईलवरुन कुणालातरी फोन करण्याचा त्याच झोपलेल्या अवस्थेतत हात जवळ नेत प्रयत्न करत होता, पण त्यांच्याने ते काही केल्या होत नव्हतं, हे सगळं पाहत असलेली त्यांची आई तावातावाने म्हणाली, “हे काय करतोयस, डोक्याला जखम झालीय माहित आहे ना, सांग कुणाला कॉल करायचायं, डॉक्टरने सांगितलयं जास्त शरीराची हालचाल ठीक नाहीय…” मग त्याला अधिकचा त्रास जाणवायला लागला आणि त्याने आईला सांगितलं. “प्लीज हा नंबर ट्राय कर मी दोन-तीनवेळा केला पण उचलत नाहीयं”. “काय सांगायचं?” आई लगेच म्हणाली, “सांग की एकशे वीस पान टाईप आणि प्रूफरिंडिग करायचीय, नेहमीपेक्षा जास्त पैसे घेतले तरी हरकत नाही पण घरी येऊन काम करावं लागेल”, “ठीक आहे, आता ही गोळी घे आणि निंवात झोप, काही एक टेशंन घेऊ नकोस, कसलं आफीसचं काम आहे काय?”

“हा आफीसचचं काम आहे”

“बरं बरं.. आता मी करते ट्राय नंबर… तू झोप…तुला जराही कशी काळजी नाही वाटली की मी तुझ्याशिवाय कशी जगू शकेन…” सदानंदच्या आईचं पालुपदं चालूच होतं.

तिला तिच्या रोजच्या रामरगाडयातून वेळ काढत सदानंदच्या लिखाणाकडे पाहत ‘हे काय आहे हे म्हणणासं’ ही फुरसत नसे, तिचं शिक्षण म्हणाल तर होत दहावी पास, पुढे शिकावसं वाटत होतं पण लग्न आणि बाकी संसार फार लवकरच आयुष्यात आला आणि बाकी गोष्टी मागे पडल्या, आणि आता तिला असं काही असतं यांची कल्पनाही राहिली नव्हती आणि या अश्या कथा-कांदब-याविषयी आपुलकी वाटण्यासाठी एक आतून असावी लागणारी उर्मी ही तशी रेवतीमध्ये नव्हती. ती या सा-या प्रकाराबददलच अनभिज्ञच होती.

सदानंद झोपेचा प्रयत्न करत होता पण झोप अशी काही लागतच नव्हती, त्यांच्या डोळ्यासमोर काही दिवसापूर्वीचा प्रंसग आठवू लागला, त्यातही तो विचारच करत होता.

त्याची आई जमिनीवर पसरलेल्या अंथरुणावर झोपली होती, सदानंदने गौतम बुद्धाच्या आयुष्यावरच "बोधिसत्व" नावाचं पुस्तक संपवलं आणि प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक Dr Micho Kaku यांची The Concept of Impossibility नावाची व्हिडिओ बघत होता, तो विचार करत होता आणि लगोलग विचाराची तंद्री देखील लागत होती, सदानंदच्या मनाचा एक हिस्सा त्यांच्याशी बोलत होता.

ती सदानंदच्या शरीराची काळी आकृती बोलत होती, "का जगत आहे मी असं जीवन, जेव्हा ते एकदाच जगायला मिळत, या विशाल ब्रम्हांडाच्या एका कस्पटासमान असलेल्या या मानवी शरीरासोबत का असाचं शेवट तुला पसंद आहे, जे पाहिजे ते कर, सोड ती नोकरी, रोजचं ते ट्रेनने येणं-जाणं, धक्के खात जगणं, चल बाहेर पड यातून, हे तू कोणत्या तुरुंगात स्वतःला अडकवून घेतलयस, सडवून घेत चालयास तू, सकाळपासून रात्रीपर्यंत जगण्यासाठीच्या रहाटगाड्याला जुंपण सोडून दे, तू हे सर्व काही करण्यासाठी नाही बनल्यास, तुझ्या आयुष्याची ध्येय इतकी सामान्य आणि तकलादू असूच शकत नाहीत, ते आकाशातले ग्रह- तारे बघ, आणि बघ किती तकलादू आहे तुझं आयुष्य.... तुझ्या पेक्षा तो राजा सिद्धार्थ बरा होता जो गौतम बनून दुःखाचं कारण शोधण्यासाठी राजसंसाराचा त्याग करून निघाला, काय विचार करत बसला आहेस, बघ तो वैज्ञानिक काय सांगतोय जे उघड्या डोळ्याने बघतोयस तेच अंतिम सत्य, नैतिकतेचा आचार-विचार नाहीय, ती केवळ आपण बनवलेली एक व्यवस्था आहे, तोड त्या सगळ्या बंधनांना, जग कोणाचीही पर्वा न केल्याशिवाय चाललयं” विचार करून करून सदानंदच डोकं गरगरायला लागलं. आणि एकदाची त्याची विचार शृंखला तुटली.

त्याची आई अंथरुणावर तशीच पडल्या पडल्या म्हणत होती "लाईटीच बिल आलंय सांगायलाच विसरले, उद्या कामावरून येताना भरून टाक.

**********

सदानंदने आईची मदत घेत जास्तीचे पैसे देण्याची, घरी येत कथा टाईप आणि प्रूफरिडिंग करण्यासाठी त्याला राजी केलाच, सुदेश कानोजिया... प्रूफरिडर आणि टाईपींग मास्टर... वयाची तिशी पार केलेल्या या माणसाला पैशाशिवाय दुसरं काहीच दिसत नसे. स्वतःची नोकरी सांभाळत सतत बाहेरची काम करत राहत पैसे जमवणं सुरू असायचं. सुदेशच्या घरी त्याचं येणं-जाणं असायचं… त्यामुळे सदानंदची आई रेवती त्याला ओळखत होती…

इतका रात्रभर विचार करुन देखील पण सदानंद सकाळी पाच वाजताच उठून तयार झाला होता. सुदेश घरात आला, सदानंदला असा खाटेवर बसलेला पाहून त्याच्या हाताला लावलेल्या प्लॅस्टरकडे पाहत म्हणाला, "ही काय हालत करून घेतलीयस सदानंद?" सुदेश सकाळी सात वाजताच लॅपटॉप घेऊन आला होता. आई त्यावर सदानंदकडे पाहत फणका-याने म्हणाली "जसं काही तुला काही माहितीच नाही? टी.व्ही…..पेपर… नाही बघितला का? दोन दिवसांपासून” पुन्हा सदानंदकडे पाहत सुदेश म्हणाला "हे काय डाव्या हाताला प्लॅस्टर, अक्सिस्टड झालं का? आईचा राग गेलाच नव्हता "मोठी लढाई जिकूंन आलायं ना!, रेल्वे स्टेशवर कोणा भिकाराच्या मुलाला वाचवलं याने, तो पण स्वतःचा जीव धोक्यात टाकून, काय गरज होती असं करायची, कमीत कमी घरी आपली एक विधवा आई आहे यांचा तरी विचार केला असतास, तुझा जीव गेला असता तर माझं एकटीच काय झालं असतं? हे तू पण बघ” तिने टी.व्हीचा रिमोट हातात घेतला होता, आईचा चेहरा रडवेला झाला होता आणि आता तिचे डोळेसुदधा पाणावले होते, आई आता टी.व्ही चालू करणार इतक्यात सदानंदने खूणेने तिला रोखलं.

“अच्छा तो तू होतास होय, ज्याने रेल्वेस्टेशनला भिका-याच्या मुलाला वाचवलं, मी पण ऐकलं लोकांकडून, आजकाल मी काय न्यूज बघत ही नाही आणि वाचतदेखील नाही, टाईमचं कुठे असतो? आणि वरुन हे न्यूज वाचून आपलं पोट थोडी भरणार आहे” सुदेश लॅपटॉप चालू करत म्हणाला.

तितक्यात आई म्हणाली “मला एक कळत नाही की तू गेलाच का होतास रेल्वेस्टेशनला? ते ही सुटटीच्या दिवशी” ती मग तावातावाने आत चहा बनवण्यासाठी गेली.

“मग सदानंद काय टाईप करायचयं, पैशाच्या गोष्टी ऑलरेडी क्लिअर झाल्यात, मी एक पैसा कमी घेणार नाही” सुदेश लॅपटॉपमधली नजर आता सदानंदच्या दिशेने रोखत म्हणाला.

संदानने ठीक आहे म्हणत, समोरच्या टेबलावरचे पेपर दयायला सांगितले. ते कथा लिहून ठेवलेले पेपर होते, सुदेश एका हाताने लॅपटॉप सावरत ते पेपर सदानंदला देत असता एकाएकी ते पेपर खाली जमिनीवर पडले.

“संभाळून” सदानंद जागच्या जागी बसूनच उठायची उत्सुकता दाखवत पण पुन्हा एकदा हाताला लागलेला मार आणि प्लॅस्टर लागल्याची जाणीव होत हतबल होत म्हणाला. मग सुदेशने लॅपटॉप आपल्या मांडीवरुन समोरच्या खाटेवर ठेवला आणि तो ते जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले सगळे पेपर जमा करु लागला, तितक्यात सदानंद काहीसा नाराज होत म्हणाला “अरे यावर नंबरदेखील टाकले नव्हते, आता ते सगळेच पेपर एकमेंकात मिक्स झाले असतील”

“त्याला काय होतेय, टाईप तर करायचं ना! आणि काय बरं लिहिलयं यामध्ये” सगळे पेपर जमा करत ते एकत्र करत एकसमान करण्यासाठी समोर भिंतीवर तो गठठा हाताने ठोकू लागला.

“काही नाही कथा लिहिलीयं, मी वाचतो तू टाईप करत जा, काही प्रूफरिंडिगवाला प्रॉब्लम असेल तर त्याचवेळी सोडवून टाकू, फक्त तीन दिवसात कथा आनलाईन सबमिट करायचीय” सदानंद आता खाटेवर टेकू शोधत मांडी घालून बसत म्हणाला.

“तीन कशाला दोन दिवसात करुन टाकू, मला ही आज-उदयाच सुटटी आहे, शनिवार-रविवार…. लॅपटॉप माझाच यूझ करु, मला यांच्यावरच सवय आहे, ठीक आहे ना!” तितक्यात सुदेशने बोलणं चालू असताना लॅपटॉपवर कथा टाईप करण्यासाठीचं सॉफ्टवेअर उघडलं.

“ही चाय घे सुदेश, नाश्ता-जेवण करुन घ्या…. सदानंद… डाव्या हाताने त्रास होईल थोडा पण सगळं संपव…सुदेश आहेस ना दिवसभर इथे…” जेवढे काही संदेश दयायचे होते ते एका दमात देत सदानंदची आई कामाला निघून गेली. सदानंदची आई रेवती एका खाजगी इस्पितळात रुग्णसेविका म्हणून काम करत होती, ती आता थेट संध्याकाळी घरी येणारं होती.

आता तिथे गठठा करुन ठेवलेल्या कागदामधला सगळ्यात वरचा कागद हातात घेत सदानंद म्हणाला “कथा टाईप करायला सुरवात कर… स्टार्ट”

**********

मर्डर (खून) -

दिनांक. 23 एप्रिल, 2016, वेळ रात्रीचे साडेआठ वाजलेत, सांताक्रूजच्या हिलवाडी वस्तीच्या जवळच्या बसस्टॉपवर बसची वाट बघत रांगेत उभा असलेला सूरज. तिथं तो मोबाईलवर उत्साहित होत बोलत होता, “तुम्हाला आता कोणी पुरावा नाही विचारणार, तुम्ही क्रांतीच्या तटावर उभे आहात…this is fucking Revolutions बाय…” सूरजने प्रोफेसर रॉय नावाने चालू असलेला तो कॉल कट केला सरळ नंबर ब्लॉक केला. त्याने जोराने स्वतःच्या मानेला हिसका दिला, तो खूप जास्तच उत्साहाने सळसळत होता. तिथं आसपास रांगेतले लोक पुटपुटत होते, “कुठे टाईमावर येते बस आजकाल, आता आठला येणारी बस अजून आली नाहीय….” सूरजच्या पाठीमागे लागलेली रांग वाढतच चालली होती. सांताक्रूज रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या बसस्टॉपवर सूरजही मागच्या अर्ध्या तासापासून रांगेत बसची वाट बघत...........................

**********

पुढची गोष्ट डायरेक्ट अमेझॉन ईबुकवर, नक्की वाचा!!! अभिप्राय कळवा. !!!

**********

माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership).

https://www.amazon.in/dp/B091FD93LS

–लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यसंगीतधर्मवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानविचारप्रतिसादआस्वादलेखअनुभवमतप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 5:35 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक सुरुवात.
लेखन नेहमी प्रमाणेच सरस, ओघवते, उत्सुकता जागवणारे !

हार्दिक शुभेच्छा !

एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले.

खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत.

"""
'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं
"""

दुसरे उदाहरण -

"""
फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे!
"""

इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो.

अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते.

असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय.

आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल.

"तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.