राजयोग - ४

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
25 May 2018 - 12:41 pm

राजयोग - १

राजयोग - २

राजयोग - ३

भुवनेश्वरी देवीच्या मंदिराचा सेवक जयसिंह क्षत्रिय कुळातील होता. त्याचे वडील सुचेतसिंह त्रिपुराच्या राजमहालातले जुने सेवक होते. सुचेतसिंहांचा मृत्यू झाला तेव्हा जयसिंह लहान होता. वडिलांच्या पश्चात अनाथ झालेल्या या मुलाला राजाने मंदिरात काम करण्यास नियुक्त केले. मंदिराचे पुजारी रघुपती यांनीच त्याचे पालनपोषण आणि शिक्षण पार पाडले होते. मंदिरातच लहानाचा मोठा झाला असल्याने मंदिर हेच जयसिंहाचे घर होते. मंदिराच्या प्रत्येक पायरी, प्रत्येक दगडाशी त्याची ओळख होती. जयसिंहाची आई नव्हती पण भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीलाच तो आई मानत असे. तिच्या मूर्तीसमोर बसून तो तासनतास तिच्याशी बोलत असे.

अनाथ असूनही त्याला कधीच एकटेपणा जाणवला नव्हता. त्याचे भरपूर मित्र आहेत, मंदिराच्या बागेत असलेले कितीतरी वृक्ष त्याने आपल्या हातांनी मोठे केले होते. मंदिराच्या चारी बाजूंनी हे वृक्ष मोठे होत होते, त्यांच्या फांद्या फुलांनी डवरलेल्या होत्या. नाजूक वेली जागोजागी या विशाल वृक्षांच्या आधाराने विसावल्या होत्या. झाडांच्या पडलेल्या गडद सावलीमुळे शरीरच काय मनालाही तिथे विसावा मिळत होता. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्याप्रमाणे त्या बागेचं सौंदर्य परिपूर्ण वाटत होतं. पण हे सारं सौंदर्य जयसिंहाच्या हृदयातील प्रेमाचाच आविष्कार होता हे कुणालाच माहित नव्हतं. सर्वजण त्याला त्याच्या अद्वितीय पुरुषार्थ आणि साहसामुळेच ओळखत होते.

मंदिरातले काम संपवून जयसिंह त्याच्या झोपडीच्या दारात बसला होता. संध्याकाळ झाली होती. समोर मंदिराची बाग होती. आकाशात काळेभोर ढग जमा झाले होते आणि हलके हलके पाऊसही पडू लागला होता. पहिल्या पावसाच्या पानात जयसिंहाची झाडे स्नान करीत होती, त्यांच्या पानापानांवर आनंद निथळत होता. पावसाच्या पाण्याचे अनेक छोटे छोटे खळखळते प्रवाह तयार होऊन गोमती नदीत मिसळत होते. जयसिंह तल्लीन होऊन आपल्या बागेकडे पहात शांत बसला होता. काय सुंदर चित्र होते ते! चहूकडे काळ्यासावळ्या ढगांचा डोळे निववणारा अंधार होता, बागेत पसरलेली झाडांची तेवढीच दाट सावली होती, पाण्याच्या थेंबानी चमचमत्या पानाफुलांतुन ओसंडणारे तृप्त भाव होते, तालासुरात एकामागे एक ओरडत असलेल्या बेडकांचा आवाज होता आणि या मैफिलीत तंबोर्यासारखी अविश्रांत साथ देणारी पावसाची टप टप टप! असा पाऊस कोसळताना पाहून कुणाचा आत्मा शांत होणार नाही?

पावसात भिजत भिजत नेमके याच वेळेस रघुपती झोपडीजवळ आले. जयसिंह तत्परतेने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी आणि अंग कोरडे करण्यासाठी वस्त्र घेऊन आला.

रघुपती चिडून त्याला म्हणाले, "कपडे कशाला आणलेस?" अस म्हणून त्यांनी रागारागाने कपडे घरात फेकून दिले.

जयसिंह पाय धुण्यासाठी पुढे झाला असता पुन्हा ते म्हणाले, "थांब, ठेव तुझं पाणी." जयसिंहाने तांब्या ठेऊन देताच त्यांनी लाथ मारून पाणी सांडलं.

आपल्या गुरुजींच्या अशा वागण्याचे कारण न समजून जयसिंह आश्चर्यचकित झाला. कपडे उचलून तो ठेवणार इतक्यात पुन्हा रघुपती गरजले, "थांब हात लावू नकोस त्या कपड्यांना!" मग त्यांनी धुसफूसत जाऊन स्वतःच पाणी घेऊन पाय धुतले आणि कपडे बदलले.

जयसिंह अतिशय शांत स्वरात म्हणाला, "गुरुजी माझ्याकडून काही अपराध झाला आहे का?"

रघुपतीने त्यावर जवळजवळ खेकसतच उत्तर दिले, "कोण म्हणालं तू अपराध केलायस म्हणून?"

गुरुजींच्या कठोर स्वरांनी दुःखी झालेला जयसिंह शांत बसला.

रघुपती अस्वस्थपणे झोपडीत येरझार्या घालू लागले. खूप रात्र झाली होती. बाहेर अजूनही पाऊस पडतच होता. शेवटी जयसिंहाच्या पाठीवर हात ठेवून रघुपती अतिशय मायेने त्याला म्हणाले, "झोप बाळ तू आता. खूप रात्र झाली आहे."

रघुपतीने बोललेले प्रेमाचे दोन शब्द ऐकताच जयसिंह म्हणाला, "गुरुजी आधी आपण जाऊन झोपा, मग मी झोपेन."

"अजून मला वेळ आहे. हे बघ बाळ मी आज तुझ्याशी काहीसा कठोर वागलो. तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझं चित्त थार्यावर नाही आज. मी उद्या तुला सर्वकाही सांगतो. आता तू जाऊन झोप." रघुपती म्हणाले.

"जशी आज्ञा" अस म्हणून जयसिंह झोपायला गेला. रघुपती संपूर्ण रात्र अस्वस्थपणे फेऱ्या घालत राहिले.

सकाळी जयसिंह गुरुदेवांना नमस्कार करून त्यांच्या पुढे उभा राहिला. रघुपती म्हणाले, "जयसिंह मातेला आता इथून पुढे बळी नाही देता येणार."

जयसिंहाने आश्चर्याने विचारले, "असं काही का बोलता गुरुजी!"

"राजाने अशीच आज्ञा दिली आहे." - रघुपती

"कोणत्या राजाने?" - जयसिंह

काहीशा उदासीन स्वरात रघुपती उत्तरले, " असे किती राजे आहेत इथे? महाराज गोविंद माणिकय यांची आज्ञा आहे इथून पुढे मंदिरात जीव बळी दिला जाणार नाही."

"आणि नर बळी?" - जयसिंह

"कसं सांगू तुला! मी म्हणतो जीव बळी, तू ऐकतो नर बळी." - रघुपती

"म्हणजे कोणाही जीवाचा बळी दिला जाणार नाही?" - जयसिंह

"नाही" - रघुपती

"महाराज गोविंद माणिकय यांनी अशी आज्ञा दिली आहे?" - जयसिंह

"हो! हो , किती वेळा सांगू एकच गोष्ट?"

जयसिंह काही वेळ शांत बसला. तो विचार करीत होता, महाराज गोविंद माणिकय! त्याच्या मनात लहानपणापासून महाराजांविषयी अतिशय आदर होता. त्याच्यासाठी ते देवासमानच होते. आकाशातल्या पूर्ण चंद्राविषयी जसे लहान मुलांना कुतूहल असते, ओढ असते तशीच काही भावना महाराजांविषयी जयसिंहाच्या मनात होती. महाराजांचे शांत, सुंदर, तेजस्वी मुख पाहून जयसिंह जीव द्यायलाही तयार होता.

या शांततेचा भंग करीत रघुपती म्हणाले, "याचा विरोध तर करायलाच हवा."

जयसिंह म्हणाला, " हो अवश्य गुरुजी, मी आजच महाराजांकडे जाऊन प्रार्थना करतो की.."

"ते व्यर्थ आहे" - रघुपती

"मग काय करायला हवं?" - जयसिंह

काही वेळ विचार करून रघुपती म्हणाले, "ते मी उद्या सांगतो, तू ताबडतोब कुमार नक्षत्ररायकडे जाऊन मला गुप्तपणे भेटायला सांग."

दुसऱ्या दिवशी सकाळी नक्षत्रराय मंदिरात आला. रघुपतीला प्रणाम करून त्याने विचारले, "काय आज्ञा आहे, पुजारीजी?"

रघुपती म्हणाले, "तुझ्यासाठी मातेचा एक संदेश आहे. आधी मातेला प्रणाम कर."

दोघे गाभाऱ्यात गेले, जयसिंहही त्यांच्यासोबत गेला. नक्षत्ररायने भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर साष्टांग नमस्कार केला.

रघुपती नक्षत्ररायला म्हणाला, "कुमार, तू राजा होणार आहेस."

"मी राजा होईन? पुजारीजी, तुम्ही सांगताय ते कधी सत्य नाही होऊ शकणार."

रघुपती- "मी सांगतोय की तू राजा होशील."

नक्षत्रराय - "हो? तुम्हाला वाटतं मी राजा होईन?" असं म्हणून नक्षत्रराय पुन्हा मख्खपणे रघुपतीच्या चेहऱ्याकडे पाहू लागला.

रघुपती म्हणाले, "मी खोटं बोलतोय असं वाटतंय का तुला?"

नक्षत्रराय - "तुम्ही कसं काय खोटं बोलालं? मी काल रात्रीच एक बेडूक पाहिला होता स्वप्नात, काय होतं स्वप्नात बेडूक पाहिल्यावर?"

चेहरयावर आलेलं हसू आवरत रघुपती म्हणाले," अस्स! कसला बेडूक होता? त्याच्या डोक्यावर डाग तर नव्हता?"

नक्षत्ररायने अभिमानाने छाती फुलवीत उत्तर दिले, "हो तर, डाग होता तर! डाग नसेल तर काय उपयोग!"

रघुपती म्हणाले, "तो डाग तर राजटिळकाचं प्रतीक! म्हणून तर मी सांगतोय तुझ्या माथी राजटिळक लागणार!"

नक्षत्रराय पुन्हा म्हणाला," म्हणजे खरंच मला राजटिळक लागणार? तुम्ही म्हणताय म्हणून? आणि नाही लागला तर?"

"म्हणजे मी सांगितलेलं भविष्य खोटं ठरणार?"

"तसं नाही म्हणायचं मला, तुम्ही तर सांगतच आहात की मी राजा होईन, पण समजा कर्मधर्मसंयोगाने नाही झालो तर?"

"नाही नाही, मी सांगतोय तेच होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे."

नक्षत्रराय म्हणाला, "तुम्ही आता इतकं म्हणतायच तर होईन मी राजा! राजा झाल्यावर मी तुम्हाला मंत्री बनवेन."

रघुपती म्हणाला, "नाही व्हायचं मला मंत्री."

अतिशय उदार स्वरात नक्षत्रराय म्हणाला "ठीक आहे, मग जयसिंह? मी त्याला मंत्री बनवेन."

"त्या सर्व नंतरच्या गोष्टी आहेत. आता राजा होण्यासाठी तुला काय करावं लागेल ते ऐक. आईला राजघराण्यातील रक्ताची तहान लागली आहे. स्वप्नात मला हाच आदेश मिळाला आहे."

"राजघराण्याचे रक्त हवेय आईला! तुम्हाला स्वप्नात आदेश मिळाला आहे. ठीक आहे!"

रघुपती - "तुला गोविंद माणिकय राजांच रक्त आणावं लागेल."

नक्षत्ररायने हो म्हणण्यासाठी तोंड उघडले होते, ते तसेच उघडे राहिले, त्याच्या कंठातून आवाज काही आला नाही. आपण काही चुकीचं तर नाही ऐकलं असा विचार एक क्षण त्याच्या मनात तरळून गेला.

रघुपती धारदार स्वरात म्हणाले, "काय झालं? अचानक बंधुप्रेम उफाळून आले काय?"

काहीसे कृत्रिम हसत नक्षत्रराय म्हणाला, "हं! बंधुप्रेम! म्हणजे काय असतं?"

नक्षत्रराय अशा स्वरात बोलला जणू काही याहून अधिक लाजिरवाणी गोष्ट काही असूच शकत नाही, बंधुप्रेम! पण ईश्वरालाच माहीत होतं की त्याक्षणी खरोखरच नक्षत्ररायच्या मनात आपल्या मोठ्या भावाविषयी प्रेम दाटून आल होतं, हसून दुर्लक्ष करण्यासारखे ही गोष्ट नक्कीच नव्हती.

रघुपती, "मग आता काय करणार आहेस?"

नक्षत्रराय - "काय करू?तुम्ही सांगा!"

काहीशा ठाम सुरात रघुपती म्हणाले, "नीट लक्ष देऊन ऐक, तुला गोविंद माणिकयचे रक्त मातेच्या दर्शनासाठी आणावेच लागेल."

नक्षत्रराय भारावून जाऊन स्वतःशीच पुटपुटल्यासारखा पुन्हा म्हणाला, "गोविंद माणिकयचे रक्त आणावेच लागेल, मातेच्या दर्शनाला"

ते ऐकून काहीशा कुत्सित स्वरात रघुपती म्हणाले, "छे!जाऊ देत! तुझ्याकडून काही होईल असं वाटत नाही."

"का नाही होणार? तुम्ही जे सांगाल तेच होईल! तुम्ही आज्ञा तर करा." नक्षत्रराय काहीशा आवेशाने बोलला.

"मी तुला आज्ञा करतोय." रघुपती

"काय आज्ञा आहे आपली?"

गंभीरपणे रघुपती म्हणाले, "आईला राजघराण्यातले रक्त पाहण्याची इच्छा आहे. तू गोविंद माणिकयचे रक्त आईच्या दर्शनाला आणून ती इच्छा पूर्ण करावीस हीच माझी आज्ञा आहे."

नक्षत्रराय - "जशी आज्ञा, मी आजच जाऊन फतेह खानास हे काम सोपवतो."

घाईघाईने रघुपती नक्षत्ररायचा हात हातात घेत म्हणाले, "नाही नाही, इतर कुणाला या गोष्टीबद्दल काडीमात्रही कळता कामा नये. फक्त जयसिंहच तुला या कामात मदत करेल.उद्या सकाळी मी तुला हे कार्य कसे पार पाडता येईल याची योजना सांगतो."

नक्षत्रराय काही न बोलता, रघुपतीच्या हातातून आपला हात सोडवून घेत घाईघाईने मंदिरातुन बाहेर पडला.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

तिसर्‍या भागानंतर कथेला असेच काही वळण येईल हे अपेक्षितच होतं.

टवाळ कार्टा's picture

25 May 2018 - 1:13 pm | टवाळ कार्टा

बाब्बो

अभ्या..'s picture

25 May 2018 - 1:17 pm | अभ्या..

आहाहाहा,
भारी लिहित अहेस. सुरेख जमलाय अनुवाद.
.
महत्त्वाचे म्हणजे स्पीड पण वाखाणण्याजोगा. ;)

पद्मावति's picture

25 May 2018 - 1:27 pm | पद्मावति

सुंदर रंगतेय कथा. असेच मोठे भाग चांगले वाटतात वाचायला...फ्लो तुटत नाही.

अनुवाद वाटत नाहीये. आता थेट गुरुदेवांच्या पुस्तकातूनच अनुवाद करत आहात, तेव्हा मूळ लेखनातील सौंदर्य आणि तरलता अनुवादात उतरणारच. पुभाप्र.

सिरुसेरि's picture

25 May 2018 - 2:01 pm | सिरुसेरि

अनपेक्षित वळण . प्रभात फिल्मसच्या " अमृत मंथन " ची कथा अशीच होती .

नीलमोहर's picture

25 May 2018 - 2:03 pm | नीलमोहर

प्रथम तर वेगळे काही लिहीत आहेस त्याबद्दल अभिनंदन. असेच नवनवीन लेखनप्रकार तुझ्याकडून येत राहोत यासाठी शुभेच्छा..

आधीच्या भागांतील भाषा थोडी क्लिष्ट जड वाटत होती, आता व्यवस्थित वाटतंय, अर्थात भावानुवाद करणे सोपे नाहीच, मात्र शब्दशः भाषांतरापेक्षा थोडेफार स्वैर रूपांतरही छान वाटू शकेल असं वाटतंय.

सस्नेह's picture

25 May 2018 - 2:26 pm | सस्नेह

आधीच्या इपिसोडमध्ये भाषा थोडी अवघडलेली वाटत होती. यात चांगली जमलीय. कथानकही जरा वेग घेतेय. ठाकुरजींचं कथानक म्हणजे जबरदस्तच असणार.
एक वेगळेच जग आहे या कथेतल्या वातावरणाचे.

manguu@mail.com's picture

25 May 2018 - 7:35 pm | manguu@mail.com

छान