राजयोग - १०

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
6 Jun 2018 - 9:45 am

कालीमातेच्या मूर्तीसमोर उभा राहून जयसिंह म्हणाला,

"तुला खरंच आपल्याच मुलांचं रक्त हवंय, आई? राजवंशातलं रक्त मिळाल्याशिवाय तुझी तहान भागणार नाही? लहानपणापासून मी तुला आई म्हणत आलो, तुझी सेवा केली. इतर कुणाकडे पाहावं सुद्धा वाटलं नाही. तुझी सेवा हेच माझ्या जीवनाचं उद्देश्य आहे असं समजत आलो. मी एक राजपूत आहे, या धमन्यांमध्ये क्षत्रिय कुळाचं रक्त वाहतंय. माझे आजोबा राजा होते, माझ्या मामांचा वंश अजूनही राज्य करतोय.. राजरक्त हवंय ना तुला, मग घे हे.." जयसिंहने अंगावरची चादर काढून फेकली. कमरेला बांधलेल्या म्यानातून चाकू काढला. वीज चमकावी तसं क्षणार्धात त्यानं चाकू आपल्या हृदयाच्या आरपार नेला. मृत्यूची धारदार जीभ त्याच्या छातीला छिद्र पाडत गेली. जयसिंह मूर्तीसमोर कोसळला. पाषाणाची मूर्ती तसूभरही हलली नाही.

रघुपती ओरडला.. जयसिंहाला उठवायचा प्रयत्न करु लागला, पण तो उठला नाही. तसंच त्याच्या मृत शरीराला कवटाळून रघुपती आक्रोश करीत राहिला.. मंदिराच्या शुभ्र संगमरवरी फरशीवर रक्ताची धार वाहू लागली. हळू हळू एक एक दिवा विझू लागला. तिसऱ्या प्रहरी वादळ थांबलं आणि सगळीकडे भयाण शांतता पसरली. अंधारात फक्त एकाच व्यक्तीच्या श्वासाचा आवाज मंदिरात घुमत राहिला. रात्रीच्या चौथ्या प्रहरी ढगांच्या आड लपलेला चंद्र काहीवेळासाठी बाहेर आला. त्याचा प्रकाश जयसिंहाच्या पांढऱ्या फटफटीत चेहऱ्यावर पडला. चौदा देवता त्याच्या उशाशी उभ्या राहून त्याची निश्चिन्त मुद्रा न्याहाळू लागल्या. जयसिंह आईच्या कुशीत झोपलेल्या शांत बाळासारखा दिसत होता. सकाळ झाल्यावर जंगलातून प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. रघुपती जयसिंहाचं डोकं आपल्या मांडीवरून खाली ठेऊन उठला.

सकाळी राजाच्या आज्ञेनुसार प्रजेच्या असंतोषाचं कारण शोधायला नक्षत्रराय स्वतः बाहेर पडला. त्याला काळजी होती, मंदिरात कसं जायचं! रघुपती समोर आला की त्याची भितीने त्रेधातिरपीट उठते, स्वतःवर नियंत्रण रहात नाही. त्याला सामोरं जायची नक्षत्ररायची मुळीच इच्छा नव्हती. रघुपतीला चुकवून गुप्तपणे जयसिंहकडे जाऊन त्याच्याकडूनच काय ते जाणून घ्यावं असा विचार त्याने केला.

नक्षत्ररायने इकडेतिकडे कानोसा घेत जयसिंहाच्या झोपडीत प्रवेश केला. तेव्हढ्या धाडसानेही त्याला वाटलं आता इथून सहीसलामत परत गेलो तर नशिब! आत गेल्यावर पाहिलं तर जयसिंहचं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. त्याची पुस्तकं, कपडे सगळं काही चहुदिशांना विखुरलं होतं. मधोमध रघुपती बसला होता. जयसिंह कुठेही दिसत नव्हता. रघुपतीचे डोळे लालभडक होऊन अंगार बरसत होते, केस विस्कटलेले. नक्षत्ररायला पाहताच त्याचा हात रघुपतीने करकचुन धरला, त्याला जबरदस्तीने खाली बसवलं. नक्षत्ररायला वाटलं आज काही आपण वाचत नाही. अंगार बरसणाऱ्या त्या डोळ्यांनी नक्षत्ररायच्या हृदयाला जाळत रघुपती वेड्यासारखा त्याला विचारू लागला, "आणलंस, तू आणलंस रक्त?"

नक्षत्ररायला आपल्या अंगप्रत्यंगात सळसळणाऱ्या रक्ताची जाणीव झाली, भितीने त्याच्या तोंडून शब्दही फुटेना.

रघुपती मोठ्याने ओरडून त्याला म्हणू लागला.. "काय झालं तुझ्या प्रतिज्ञेचं? कुठेय रक्त, सांग कुठेय?"

नक्षत्रराय हातपाय झाडू लागला, रघुपतीच्या हातातून आपल्या कपड्यांचं एक टोक सोडवून ते ओढू लागला. काहीतरी करून रघुपतीने घातलेल्या विळख्यातून बाहेर पडावं म्हणून धडपडू लागला. नक्षत्रराय घामाने डबडबून गेला. कसंतरी करून तो "पुजारीजी.." एवढंच म्हणू शकला.

रघुपती म्हणाला, "आता देवीने स्वतः तलवार उचलली आहे. सगळीकडे रक्ताचे पाट वाहणार. तुझ्या वंशाचं एक थेंब रक्त शिल्लक नाही राहणार, तेव्हा बघूया तुझं बंधुप्रेम!"

"बंधुप्रेम !! हा हा.." नक्षत्रराय जास्त हसू शकला नाही. त्याचा घसा कोरडा पडला.

रघुपती पुढे बोलू लागला, "मला नकोय गोविंदमाणिकयच रक्त! गोविंदमाणिकयला प्राणांहून प्रिय असणारी व्यक्ती मला हवी आहे. त्याचं रक्त घेऊन मी ते माझ्या हातांनी त्याच्या शरीराला माखणार आहे. त्याची छाती लालभडक झाली पाहिजे, त्या रक्ताचा डाग काही केल्या पुसता येणार नाही. हे बघ, नीट डोळे उघडून बघ.." असं म्हणत त्यानं आपलं उत्तरीय बाजूला केलं. त्या कपड्यात जयसिंहाचा मृतदेह लपेटला होता. त्याच्या छातीवर ठिकठिकाणी रक्त जमा झालं होतं.

नक्षत्ररायच्या अंगावर काटा आला, त्याचे हातपाय थरथर कापू लागले. आपल्या मुठीत आवळलेला त्याचा हात अजून घट्ट दाबत रघुपती म्हणाला, "असं कोण आहे? कोण आहे असं ज्याला गोविंदमाणिकय स्वतःहून जास्त प्रेम करतो? कोण या जगातून गेल्यावर गोविंदमाणिकयच्या नजरेत सगळं जग स्मशानभूमी होईल, त्याच्या जीवनाचा उद्देश्य हरवेल? सकाळी उठताक्षणी कुणाचा चेहरा त्याला पहावा वाटतो, रात्री कुणाच्या आठवणीत तो निद्रेच्या अधीन होतो? त्याच्या हृदयात कोण विराजमान आहे? कोण आहे तो? तो तूच तर नाहीस?"

झेप घ्यायच्या आधी वाघ जसा थरथर कापणाऱ्या हरिणाच्या पाडसाकडे पाहतो, तसंच रघुपती नक्षत्ररायकडे एकटक पाहू लागला. "नाही, नाही मी नाही.." नक्षत्रराय गोंधळून म्हणू लागला. पण काही केल्या रघुपतीच्या मुठीतून आपला हात सोडवू शकला नाही.

रघुपती म्हणाला, "मग कोण आहे, सांग?"

नक्षत्रराय बोलून गेला, "तो धृव आहे.."

रघुपती - "धृव कोण?"

नक्षत्रराय -"एक छोटा मुलगा आहे.."

रघुपती म्हणाला, "मला माहितीये, मला माहितेय तो. राजाला स्वतःचं मुलबाळ नाही, त्यालाच आपल्या मुलासारखं वाढवतोय ना! आपल्या स्वतःच्या मुलांना लोक कसं प्रेम करतात भले मला माहित नसेल. पण आपल्या मानलेल्या मुलांवर प्राणांहून जास्त प्रेम करतात हे नक्की माहीत आहे..स्वतःच्या सुखापेक्षा, वैभवापेक्षा राजाला त्याच्या सुखातच आनंद वाटतो. मुकुट स्वतःपेक्षा त्याच्या डोक्यावर ठेवलेला शोभतो असं त्याला वाटतं.."

नक्षत्रराय आश्चर्याने म्हणाला, "बरोबर आहे!"

रघुपती म्हणाला, "बरोबरच असणार, नाही तर काय! राजा त्याला किती प्रेम करतो ते मला माहीत नाही?
मला समजत नाही? मला तोच हवाय!"

नक्षत्रराय आ वासून रघुपतीकडे पहात राहिला. मनातल्या मनात "तोच हवाय" असं म्हणू लागला..

रघुपती पुन्हा नक्षत्ररायचा हात दाबत म्हणू लागला, "त्याला आणलंच पाहिजे, आज रात्रीच आणलं पाहिजे..आज रात्रीच हवाय मला तो.."

नक्षत्रराय त्याच्या मागोमाग म्हणाला, "आज रात्रीच हवाय.."

रघुपतीने काही क्षण नक्षत्ररायचा चेहरा न्याहाळून पाहिला. नंतर हळू आवाजात समजावणीच्या स्वरात म्हणाला, "तो मुलगाच तुझा शत्रू आहे, कळतंय ना तुला? तुझा जन्म झालाय राजकुळात.. कोण कुठला मुलगा तो, ना त्याचं कुळ माहीत ना गोत्र, तो तुझ्या डोक्यावरचा मुकुट हिसकावून घेणार हे दिसतंय ना तुला? जे सिंहासन तुझी वाट पहात होतं, ते आता विनासायास त्याचं होणार आहे.. दोन दोन डोळे असूनही एवढं धडधडीत सत्य दिसत नाहीये का तुला?"

नक्षत्ररायला यातलं काहीही नवीन नव्हतं. त्याच्याही मनात हे विचार येऊन गेलेच होते.. बढाई मारत तो म्हणाला, "आता कसं सांगायचं ठाकूर तुम्हाला! मला काय एवढही कळत नाही का?"

रघुपती म्हणाला, "मग प्रश्नच मिटला..त्याला आणून दे. तुझ्या सिंहासनाच्या मार्गात आलेली ही बाधा दूर करतो. आता हे काही प्रहर कसेतरी करून काढतो.. त्यानंतर.. कधी आणशील त्याला?"

नक्षत्रराय - "अंधार पडल्यावर.."

जानवं हातात धरून रघुपती म्हणाला, "नाही आणलंस तर.. तर एका ब्राम्हणाचा शाप लागेल..ज्या तोंडाने बाता मारत ही प्रतिज्ञा केलीस, ती पूर्ण केली नाहीस तर तीन दिवसांच्या आत याच तोंडावरच्या मऊ लुसलुशीत मांसाला कावळे चोच मारून मारून खातील.."

नक्षत्ररायनं घाबरून आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आपल्या तोंडाचे लचके तोडणाऱ्या कावळ्यांची कल्पनाच त्याला सहन झाली नाही. रघुपतीला नमस्कार करून तो घाईघाईने तिथून बाहेर पडला. त्या झोपडीतून लक्ख सूर्यप्रकाशात, मोकळ्या हवेत आणि माणसांच्या गर्दीत गेल्यावर नक्षत्ररायला नवं जीवन मिळाल्याप्रमाणे शांत वाटलं.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Jun 2018 - 10:06 am | यशोधरा

..!!

अनिंद्य's picture

6 Jun 2018 - 10:54 am | अनिंद्य

जबरदस्त !
नाटकातही ह्या भागातला शेवटचा प्रसंग खास रंगतो.
पु भा प्र

काय ही भयानक महत्त्वाकांक्षा! एखाद्या निष्पाप कोवळ्या जीवाचा घास घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही!

वाचताना काटा आला अंगावर.

कहानीमे ट्विस्ट !
पुभाप्र

प्रचेतस's picture

6 Jun 2018 - 7:00 pm | प्रचेतस

हे असेच काहीतरी होणार हे अपेक्षितच होते मात्र ते ही वेगळ्याच प्रकारे सामोरं आलं.

छान प्रवाही भाषांतर करताय.

एकूण किती भाग असतील साधारण? मी ५ किंवा १० चा गठ्ठा करून वाचतेय.

रातराणी's picture

11 Jun 2018 - 11:13 am | रातराणी

एकूण पंचवीस भाग होतील असा अंदाज आहे.
सर्व प्रतिसादकर्त्यांना अनेक धन्यवाद.