राजयोग - ९

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
5 Jun 2018 - 12:31 pm

मंदिरात कोलाहल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आषाढ चतुर्दशी होती. आजच रात्री मंदिरात चौदा देवतांची पूजा संपन्न होणार होती. सकाळी ताडाच्या झाडांमागून सूर्य उगवला तेव्हा आकाशात कुठेही ढगांचा मागमूस नव्हता. सोनेरी किरणांनी उजळून निघालेल्या मंदिराभोवतीच्या बागेत जयसिंह जाऊन बसला. लहानपणी त्यानं इथं घालवलेले सुखद क्षण त्याच्या मनात रुंजी घालू लागले. याच मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर, इथेच गोमतीच्या घाटावर, या सुंदर बागेच्या थंडगार सावलीत त्यानं जो काही काळ घालवला होता, तो आता त्याला एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे वाटू लागला. त्याच्या चारीबाजूला लहानपणीची दृश्य नाचत होती, आठवणी त्याला पुन्हा पुन्हा साद घालत होत्या. जयसिंहाचं मन मात्र त्याला बजावून सांगत होतं, "मी आज इथून दूर जाणार आहे, सगळ्यांचा निरोप घेतलाय मी.आता इथे परत नाही येणार." मंदिर सूर्याच्या किरणांनी न्हाऊन निघालं होतं. उजव्या बाजूच्या भिंतीवर बकुळीच्या झाडाची सावली पडली होती. लहानपणी जसं त्याला हे मंदिर जिवंत वाटायचं, या पायऱ्यांवर खेळताना भान हरपत असे, आजही त्याला तसंच वाटत होतं. जयसिंह पुन्हा एकदा लहान झाला होता. आत मंदिरात असलेली देवी पुन्हा आई झाली होती. अभिमानाने त्याचे डोळे भरून आले.

रघुपतीला त्याच्याकडे येताना पाहून जयसिंहान डोळे पुसले. आपल्या गुरूला नमस्कार करून तो उभा राहिला. रघुपती त्याला म्हणाला, "आज आषाढ चतुर्दशी आहे, देवीच्या चरणांना स्पर्श करून घेतलेली शपथ लक्षात आहे ना."

जयसिंह उदासपणे म्हणाला, "हो."

रघुपती म्हणाला, "शपथ पूर्ण तर करशील ना?"

जयसिंह - "हो"

रघुपती - "हे बघ, सावध राहून काम कर. काहीही संकट येऊ शकतं. तुझं रक्षण करता यावं म्हणूनच मी लोकांना राजाविरुद्ध भडकवलं आहे."

जयसिंह काही न बोलता रघुपतीच्या चेहऱ्याकडे पहात राहिला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून रघुपती म्हणाला, "माझा आशीर्वाद तुझासोबत आहे. कार्य निर्विघ्न पार पडेल. तुझ्या हातून देवीची इच्छा पूर्ण होईल."

रघुपती तिथून निघून गेला.

दुपारनंतर महाराज त्यांच्या कक्षात बसून धृवबरोबर खेळत होते. धृव सांगेल तेव्हा मुकुट काढायचा, तो सांगेल तेव्हा घालायचा. महाराजांची उठणारी तारांबळ पाहून धृव खो खो हसत होता. महाराज किंचित हसून म्हणाले, "मी सवय करून घेतोय. शक्तीच्या आदेशाने मुकुट घालताही आला पाहिजे आणि काढताही. घालणं तर खूप सोपं आहे पण याचा त्याग करणं खूप कठीण."

धृव राजाच्या मुकुटाकडे तोंडात बोट घालून पाहत राहिला. मग विचार केल्यासारखी मुद्रा करून म्हणाला,
"तू लाजा.." र ला ल म्हणून, राजाच्या तोंडावर त्याला लाजा म्हणूनही धृवच्या चेहऱ्यावर काही पश्चाताप नव्हता. उलट आपण बोलू शकतो याचा अभिमानच त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

धृवने अशी काढलेली खोडी पाहून राजापण म्हणाले,

"तू लाजा.."

धृव म्हणाला, "तू लाजा.."

या वादविवादाचा अंत काही होत नव्हता. कोणाकडेही काही पुरावा नव्हता. वाद म्हणजे फक्त दंगामस्तीच सुरू होती. शेवटी राजाने आपला मुकुट काढून धृवला घातला. धृवला आता बोलायला काही उरलंच नाही. मुकुट घातल्यावर त्याचा अर्धा चेहरा त्याखाली झाकला गेला. तसंच आपलं डोकं हलवत त्यानं राजाप्रमाणे बोट दाखवत आदेश दिला,

"एक गोष्ट सांग"

राजा म्हणाला, "कोणती गोष्ट सांगू?"

धृव म्हणाला, "ताई सांगायची ती"

गोष्ट म्हणली की फक्त ताई सांगायची तीच असं धृवला वाटायचं. त्याच्यासाठी या जगात इतर कुठल्या गोष्टी नव्हत्याच.

राजा एक पौराणिक गोष्ट सांगू लागले. ते म्हणाले,

"हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता."

राजा शब्द ऐकून धृव लगेच म्हणाला, "मी लाजा." डोक्यावर विराजमान त्या मोठ्याशा मुकुटाच्या प्रभावाने त्यानं हिरण्यकश्यपूच राजा असणं पूर्णपणे अमान्य केलं.

हांजी हांजी करणाऱ्या एखाद्या मंत्र्याप्रमाणे त्याची समजूत काढत महाराज म्हणाले, "तू पण लाजा, तो पण लाजा."

पण धृवच त्यानंही समाधान झालं नाही. मान नकारार्थी डोलवत तो म्हणाला, "उंहु मी लाजा.."

शेवटी महाराज म्हणाले, "हिरण्यकश्यपू लाजा नई काय, तो लाक्सस" तेव्हा कुठे धृवच पूर्ण समाधान झालं.

त्याचवेळी नक्षत्रराय आत आला, महाराजांना म्हणाला,
"राज्याच्या काही कामासाठी तुम्ही बोलावल्याचा निरोप मिळाला, काय आज्ञा आहे?"

राजा म्हणाला, "थोडा वेळ थांब इथे, एवढी गोष्ट पूर्ण करू दे." गोष्ट पूर्ण झाल्यावर धृवनं "लाक्सस दुष्ट.." असं तात्पर्य लगेच सांगितलं.

धृवच्या डोक्यावरचा मुकुट पाहून नक्षत्ररायला काही बरं वाटलं नाही. तो आपल्याकडेच एकटक पाहतोय हे लक्षात आल्यावर धृवने त्याला गंभीरपणे सांगितलं,

" मी लाजा"

"छि छि.. असं नाही बोलायचं.."असं म्हणून नक्षत्रराय धृवच्या डोक्यावरचा मुकुट काढून राजाला द्यायला पुढे झाला. आता हा आपला मुकुट काढून घेणार या भितीने धृव खरा राजा असल्यासारखा ओरडू लागला. महाराजांनी नक्षत्ररायला थांबवलं, आणि येणाऱ्या संकटातून धृवची सुटका केली.

महाराज नक्षत्ररायला म्हणाले, "माझ्या कानावर आलंय, पुजारी रघुपती उलटसुलट गोष्टी सांगून प्रजेला भडकवत आहे. तू स्वतः नगरामध्ये जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लाव. खरं काय ते लवकरात लवकर मला सांग."

"जशी आज्ञा" अस म्हणून नक्षत्र कक्षातून बाहेर पडला, पण धृवच्या डोक्यावर विराजमान त्या मुकुटाचा सल काही त्याच्या मनातून गेला नाही.

पहारेकऱ्याने येऊन सूचना दिली, "महाराज, पुजारीजींचा सेवक जयसिंह आपल्याला भेटायची अनुज्ञा मागतो आहे."

महाराजांनी त्याला परवानगी दिली.

जयसिंह आत येऊन महाराजांना नमस्कार करून म्हणाला, "महाराज मी इथून दूर निघालोय, आपण माझे गुरू, माझे महाराज आहात, म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय."

महाराज म्हणाले, "कुठे जाणार जयसिंह?"

जयसिंह म्हणाला, "माहीत नाही महाराज.."

महाराज काही बोलणार इतक्यात जयसिंह म्हणाला,

"नाही म्हणू नका महाराज. तुम्ही नाही म्हणालात तर माझी यात्रा शुभ होणार नाही. मला आशीर्वाद द्या. माझ्या मनावर जे संशयाचं मळभ जमा झालं आहे, ते दूर होऊ देत. आपल्यासारख्याच पुण्यशील राजाच्या राजछत्राखाली राहायला मिळू देत, माझ्या मनाला शांती मिळू देत."

राजाने विचारलं, "कधी जाणार आहेस?"

"आज संध्याकाळी, मला आज्ञा द्या महाराज.."

जयसिंहने खाली वाकून राजाच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावली. त्याच्या डोळ्यातले अश्रू राजाच्या चरणांवर पडले.

जयसिंह जायला निघाला तेव्हा धृवने दुडूदुडू चालत जाऊन त्याचं वस्त्र ओढलं, आणि म्हणाला, "तू नको ना जाऊस."

जयसिंह हसत हसत मागे वळला, धृवला उचलून त्यानं कडेवर घेतलं. त्याच्या गालांवर आपले ओठ टेकवले आणि म्हणाला, "इथे कुणाजवळ राहू बाळा? कोण आहे माझं इथे?"

धृव म्हणाला, "मी लाजा.."

जयसिंह म्हणाला, "तू तर राजांचा राजा आहेस..तूच सगळ्यांना बंदी बनवून ठेऊ शकतोस."

धृवला कडेवरून खाली उतरवून जयसिंह मागे वळून न पहाता कक्षातून बाहेर पडला. महाराज बराच वेळ गंभीर होऊन विचार करत राहिले.

***

आज आषाढ चतुर्दशी. आकाशात ढगही आहेत, आणि चंद्रही उगवलाय. चंद्र ढगांच्या आड लपाछपी खेळतोय. खाली गोमती नदीच्या किनाऱ्यावरचं जंगल चंद्राचा हा खेळ पहात निश्वास सोडत होतं.

आज रात्री कुणीही बाहेर पडू शकत नाही असा नियम आहे. रात्रीच्या वेळेस तसंही या जंगलाच्या रस्त्यांवर कोण बाहेर पडणार? पण केवळ नियम असल्यामुळं नेहमीचेच सुनसान मार्ग आज अजून सुनसान वाटत आहेत. नगरातले लोकांनी आपल्या घरातले दिवे विझवून, दारं लावून घेतली आहेत. नेहमी एखाद्या वृक्षाखाली झोपणाऱ्या भिक्षुकांनी आज कुणाच्या न कुणाच्या गोशाळेत आश्रय घेतलाय. चोरसुद्धा आज बाहेर पडत नाहीत. जर कुणी खूप आजारी असेल तर लोक वैद्याला बोलवायलादेखील बाहेर पडत नाहीत. इतकंच काय कुणाचे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानात जायचं असेल तर लोक सकाळ व्हायची वाट पहात घरातच थांबतात.

रात्रीच्या वेळेस भटके कुत्रे नगराच्या मार्गांमध्ये फिरत आहेत. कुठे एखाददुसरा चित्ता घराच्या दाराशी येऊन वाकून पहात आहे. कुणीही माणूस बाहेर नाही, फक्त एक माणूस बाहेर पडलाय. अस्वस्थपणे काही विचार करीत नदीच्या किनारी एका दगडावर तो आपल्या चाकूला धार करतोय. चाकू घासताना होणारा हिस हिस आवाज त्याला शिकारीसाठी सज्ज झालेल्या एखाद्या हिंस्त्र श्वापदाच्या आवाजासारखा वाटत आहे. चाकूला पुरेशी धार तर केव्हाच झाली आहे, पण तरीही तो थांबत नाहीये. चाकूबरोबरच तो जणू काही आपल्या भावनांनाच धार करतोय. अंधारात समोर अंधाराचीच नदी वहात आहे. एकामागे एक रात्रीचे प्रहर ढळत आहेत. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊ लागली आहे.

शेवटी पाऊस सुरू झाला आणि जयसिंहची तंद्री भंग झाली. गरम झालेला चाकू म्यानात ठेवत तो उठला. पूजेची वेळ जवळ आली होती. त्याने घेतलेली शपथ आठवली. आता उशीर करून चालणार नव्हतं.

मंदिर आज दिव्यांनी उजळून निघालं होतं. तेरा देवतांच्या मध्यभागी रक्ताची तहान लागलेल्या काली मातेची मूर्ती होती. मंदिरातल्या इतर सेवकांना झोपायला पाठवून रघुपती एकटाच त्या चौदा मूर्तीच्या पूजेसमोर बसला होता. त्याच्यासमोर एक लांबसडक तलवार तळपत होती. दिव्यांच्या प्रकाशात चमचम करीत ती तलवार देवीच्या आदेशाची वाट पहात होती.

पूजा मध्यरात्री आहे. वेळ जवळ आली आहे. रघुपती बेचैन होऊन जयसिंहची वाट पहात आहे. अचानक वादळी वारं सुटून मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याने मंदिरात लावलेल्या दिव्यांच्या असंख्य माळा हलू लागल्या. रघुपतीसमोरची ती नागडी तलवार विजेप्रमाणे भासू लागली. चौदा देवता आणि रघुपतीची सावली मंदिराच्या भिंतींवर नृत्य करू लागली. वादळात एक पुरुष हेलकावे खात मंदिराच्या दिशेने येऊ लागला. कुठूनतरी दोन वटवाघुळ मंदिरात आले आणि एकामागे एक उडू लागले.

दुसरा प्रहर आला. आधी अगदी जवळच्या मग एकदम लांबलांबच्या कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येऊ लागला. वारंसुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून हु हु असा आवाज करत रडू लागलं. पूजेची वेळ झाली. काहीतरी अघटित घडणार या शंकेनं रघुपती बेचैन झाला.

त्याचवेळेस लखलखत्या विजेच्या वेगाने जयसिंहने अंधारातून त्या उजळलेल्या मंदिरात प्रवेश केला. त्यानं संपूर्ण शरीर मोठ्या चादरीने झाकून घेतलं होतं. सर्वांगातून पावसाचं पाणी निथळत होतं. त्याचा श्वास फुलला होता, डोळ्यात अंगार पेटला होता.

रघुपतीने त्याला धरलं आणि त्याच्या कानात हळूच विचारलं, "आणलंस, राजरक्त?"

त्याचा हात सोडून जयसिंह मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, "हो, हो आणलं आहे. तुम्ही दूर व्हा. मी स्वतः देवीला अर्पण करतो."

जयसिंहाच्या धारदार आवाजानं मंदिरही डळमळीत झालं.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

5 Jun 2018 - 12:46 pm | विजुभाऊ

सुंदर अनुवाद आहे. एकदम प्रवाही.
दुसर्‍या भाषेतले काही वाचतोय असे वाटतच नाही

इथे मिपावर एखादी कथा क्रमशः लिहीताना मिळणरे प्रतिसाद प्रत्येक भागा वर वेगळे असतात.
अशा प्रकारच्या क्रमशः लिखाणावर मत व्यक्त करायला काही सापडत नाही तेंव्हा सर्वसामान्य वाचक वाचून पुढच्या भागाची वाट पहातो. मत व्यक्त करीत नाही.
तुमचे लेखन छान होत आहे.
प्रतिसाद मिळाले किंवा नाही तरीही लेखन चालू ठेवा.
सुंदर लिहीताय

अनुवाद वाटत नाहीये. खूपच सहमत. पुभाप्र.

वाद्यमेळ उत्तम जुळून आलेल्या बंदिशीसारखी कथा पुढे सरकत आहे.
पु भा प्र

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2018 - 2:20 pm | टवाळ कार्टा

भारी

यशोधरा's picture

5 Jun 2018 - 2:29 pm | यशोधरा

उत्कंठावर्धक!

रातराणी's picture

5 Jun 2018 - 3:25 pm | रातराणी

सर्वांना धन्यवाद :)

प्रचेतस's picture

5 Jun 2018 - 7:21 pm | प्रचेतस

जबरदस्त एकदम.
नेमक्या क्षणाला क्रमश: आल्याने पुढे काय होणार ह्याची उत्सुकता दाटली आहे.
पुभाप्र

स्रुजा's picture

6 Jun 2018 - 6:08 am | स्रुजा

अप्रतिम !!