राजयोग - ५

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
28 May 2018 - 10:12 am

राजयोग - १

राजयोग - २

राजयोग - ३

राजयोग - ४

***

नक्षत्रराय निघून गेल्यानंतर जयसिंह म्हणाला, "गुरुदेव, इतकी भयानक गोष्ट मी आजवर कधी ऐकली नव्हती. तुम्ही मातेच्याच समोर, तिचेच नाव पुढे करून भावाने भावाची हत्या करावी असं षडयंत्र रचताय. इथं उभं राहून मला ते ऐकावं लागतंय."

रघुपती म्हणाले, "मग दुसरा काही उपाय आहे का तुझ्याकडे? तू सांग."

जयसिंह उत्तरला, "उपाय? कशासाठी उपाय?"

रघुपती - "तुझ्यावर नक्षत्ररायची सावली पडलेली दिसते, त्याच्यासारखाच वागत आहेस. आता एवढा वेळ तू काय ऐकत होतास?"

जयसिंह - "जे मी ऐकलं ते ऐकण्याच्या योग्य नाही, ते ऐकून नक्कीच पाप लागेल."

रघुपती - "पाप पुण्याच्या गोष्टी तुला काय समजणार?"

जयसिंह - "इतके दिवस मी तुमच्याकडूनच विद्या प्राप्त केली आहे, मला पाप पुण्यातलं काहीच समजत नाही?"

रघुपती - "ऐक बालका, आता तुला अजून एक गोष्ट शिकवतो. पाप-पुण्य असं काहीच नसतं. पिता कोण आहे, कोण भाउ आहे? या जगात कोण कुणाचं आहे? जर हत्या पाप असेल तर सर्व प्रकारच्या हत्या समान असायला हव्या. पण कोण म्हणतं हत्या पाप आहे? हत्या तर रोजच कोणत्या न कोणत्या रुपात होत असते. कुणाची डोक्यावर दगड पडून, कुणाची पुराच्या पाण्यात बुडून, कुणी असाध्य रोगाने तर कुणा एखाद्याची मनुष्याकडूनच चाकूने! आपल्या पायाखाली चिरडून रोज असंख्य मुंग्याची हत्या होते. त्यांच्यापेक्षा आपण काही प्रमाणात श्रेष्ठ म्हणून ह्या क्षुद्र जीवांच्या जीवन मृत्यूचा खेळ खेळू शकतो. यात त्या महाशक्तीचा काही संकेत नाही? काळ स्वतः एक महामाया आहे. तिच्यासमोर रोज लाखो करोडो जीवांचा बळी दिला जातो. चारी दिशांनी विविध प्राण्यांचं रक्त येऊन मातेच्या पात्रात सतत पडत असत. मी या पात्रात फक्त एक थेंब तर टाकला आहे. राजाचा बळी तर त्या काळरूपी महामायेन एक न एक दिवस घेतलाच असता, मी फक्त मध्ये येऊन निमित्तमात्र झालो आहे."

गुरुदेवांचे हे बोलणे ऐकून उद्विग्न झालेला जयसिंह मातेच्या मूर्तीकडे तोंड करून म्हणाला,

"यासाठी तुला सगळं जग आई म्हणतं का?बोल देवी! तुझं काळीज दगडाचं आहे का गं? सगळ्या जगातलं रक्त पिऊन पोट भरण्यासाठी तू ही लाल जीभ बाहेर काढली आहेस का? माया, प्रेम, ममता, सौंदर्य, धर्म - सगळंच खोटं? फक्त आणि फक्त तुझी रक्ताची तहान खरी? तुझं पोट भरण्यासाठी एक माणूस दुसऱ्या माणसाचा गळा कापणार, भाऊ भावाचा खून करणार, पिता-पुत्र एकमेकांचे वैरी होणार? इतकी कशी निष्ठुर तू, मग पाण्याऐवजी रक्ताचा पाऊस का नाही पाडत तू? त्याच रक्ताच्या नद्या होऊन रक्ताच्याच लालभडक समुद्राला का नाही जाऊन मिळत? नाही, तू स्वतः सांग, ही सर्व शिकवण चूक आहे, हे शास्त्र खोटं आहे. माझी आई न म्हणता, तुला कुणी आपल्याच मुलाबाळांचं रक्त पिणारी राक्षसी म्हणावं हे कसं सहन करू मी.."

जयसिंहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भावनेच्या भरात आपण जे बोललो त्याचा तो पुन्हा मनात विचार करू लागला. इतके कठोर विचार त्याच्या मनात कधीच आले नव्हते, जर रघुपतींनी त्याला हा नवीन उपदेश केला नसता, नवीन शास्त्र शिकवले नसते तर त्याच्या मनात असे विचार चुकूनही आले नसते.

रघुपती हसून म्हणाले, "मग तर बलिदानाची प्रथा बंद झालीच पाहिजे."

जयसिंहान लहानपणापासूनच रोज देवीच्यासमोर बळी दिलेला पहिला होता. अशाप्रकारे मंदिरातील बळीची प्रथा कधी बंद होईल, किंबहुना ती बंद झाली पाहिजे, हा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. असं खरोखर झालं तर या विचाराने त्याला धक्का बसला.

रघुपतीला उत्तर देत जयसिंह म्हणाला, "पण तो वेगळा विषय आहे, त्या प्रथेचं काही उद्देश्य आहे. त्यात काही पाप नसेलही, पण म्हणून त्या प्रथेसाठी भाऊ भावाची हत्या करणार? त्यासाठी महाराज गोविंद माणिकयना..गुरुजी मी आपले पाय पकडतो, मला या चूक आणि बरोबरच्या द्वंद्वात ढकलू नका. माझ्या भावनांशी खेळू नका...खरोखरच देवीने स्वप्नात राजघराण्यातील रक्त पाहिल्याशिवाय तिचे समाधान होणार नाही असे सांगितले?"

काही क्षण शांत राहून रघुपती म्हणाले, "खरं नाहीतर काय खोटं सांगतोय मी? तुझा माझ्यावर विश्वास नाही?"

रघुपतीच्या चरणांना स्पर्श करून जयसिंह म्हणाला, "गुरुदेव तुमच्याप्रति माझा विश्वास दृढ आहे, परंतु नक्षत्ररायसुध्दा राजकुळातच जन्मले आहेत ना?"

रघुपती म्हणाले, "देवीचं स्वप्न म्हणजे फक्त संकेत असतो. सगळ्याच गोष्टी अगदी उलगडून नाही सांगत देवी. काही गोष्टी आपल्या आपणच समजून घ्यायच्या असतात. सद्य परिस्थितीत हे स्पष्टच दिसतंय की देवी गोविंद माणिकयवर असंतुष्ट झाली आहे. देवीच्या असंतोषाचे सर्व कारण गोविंद माणिकयनेच निर्माण केले आहेत, मग देवीने राजरक्त मागितले तर ते गोविंद माणिक्याचेच मागणार."

जयसिंह म्हणाला, "जर हेच सत्य आहे तर मीच आणतो राजघराण्याचे रक्त. नक्षत्ररायच्या हातून बंधु हत्येचे हे पाप मी नाही होऊ देणार."

रघुपती - "देवीच्या आज्ञेचे पालन करण्यात काही पाप नाही."

जयसिंह - "पुण्य तर आहे ना गुरुजी, मग ते पुण्य मी मिळवणार."

रघुपती - "तुला खरं काय ते ऐकायचंच आहे का? तर ऐक, तुला मी माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे मोठा केला आहे, माझ्या प्राणाहूनही तू प्रिय आहेस मला. तुला जर काही झालं तर मी कुणाकडे पाहून जगायचं? नक्षत्रराय गोविंद माणिकयची हत्या करून राजा झाला तरी त्याला कुणी काही म्हणू शकत नाही, पण तू राजाच्या शरीराला बोट जरी लावलेस तरी तू मला पुन्हा भेटणार नाहीस."

जयसिंह म्हणाला, "प्रेम!माझ्याविषयी प्रेम! मी तर एक क्षुद्र जीव आहे. माझ्या प्रेमासाठी आपण एका मुंगीलाही इजा नाही करणार.. आणि त्याच प्रेमापोटी जर तुम्ही पापात भागीदार होत असाल तर त्याचा मी कधी समाधानाने उपभोग नाही घेऊ शकणार. या प्रेमाचा परिणाम काही चांगला नाही होणार."

रघुपती लगेच म्हणाले,"ठीक आहे, आपण पुन्हा या विषयी बोलू. उद्या नक्षत्रराय आल्यावर काही न काही मार्ग काढुयात."

जयसिंहाने मनातल्या मनात प्रतिज्ञा केली, की मातेसाठी राजरक्त तो स्वतःच आणेल. मातेच्या नावाने किंवा गुरुदेवांच्या नावाने भावाकडून भावाची हत्या नाही होऊ देणार.

***

ती संपूर्ण रात्र जयसिंहान तळमळत घालवली. ज्या कारणामुळे तो त्याच्या गुरुबरोबर वाद करून आला होता, बघता बघता ते कारण महाकाय पर्वताप्रमाणे त्याला भासू लागले. मनात असंख्य विचारांची गर्दी झाली. कोणत्याही कामाची सुरुवात आपण करू शकतो, त्याचा शेवट कधी होईल, कसा होईल हे काही आपल्या हातात असेलच असं नाही. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे चिंता. एकदा का एखाद्या गोष्टीची चिंता करायला आपण सुरुवात केली की ती कधी संपेल हे काही आपण सांगू शकत नाही. लहानपणापासून ज्या गोष्टींवर जयसिंहनी विश्वास केला, त्या विश्वासाला आजच्या घटनांनी मुळापासून हादरवून टाकलं.

एखादं वाईट स्वप्न जसं संपता संपत नाही, तसेच काही जयसिंहाच्या मनातील विचारांचे झाले. ज्या देवीला आपण आजवर 'आई' म्हणून हाक मारत आलो, गुरुदेवांनी किती सहज तिचं आईपण हिरावून घेतलं! किती सहज तिला दगडाचं काळीज असलेली निष्ठुर मूर्ती बनवलं. शक्तीचा संतोष-असंतोष म्हणजे नक्की काय? जे घडतंय ते पहायला तिला डोळे आहेतच कुठे, ऐकायला कान आहेत? ती तर एखादया विशाल रथाप्रमाणे त्याच्या हजारो चाकांखाली सगळ्या जगाला चिरडत चालली आहे. कुणी तिचा आधार धरून चाललंय, कुणी तिच्याखाली सापडून चिरडून गेलंय, कोण तिच्या रथात बसून आनंदी तर कोण दुःखी, शक्तीच्या या गोष्टी कुणाला कळल्यात? तिच्या रथाला कुणी सारथी नाही, तरीही हा जगाचा गाडा अविरत चालू आहे, अखंड! पृथ्वीवरच्या निष्पाप, असहाय जीवांचा बळी देऊन तिची तहान भागवणं हेच माझं कर्तव्य आहे का? पण ते तर ती स्वतःच करू शकते. तिच्याकडे दुष्काळ आहे, पूर आहे, भूकंप आहे, म्हातारपण आहे, असाध्य रोगराई आहे, क्षणात भस्मसात करेल असा अग्नी आहे. हे सर्वही कमी पडतील तेव्हा निर्दयी लोकांच्या मनात हिंसा तर आहेच! मग तिला माझ्यासारख्या छोट्या लोकांची आवश्यकताच काय?

दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता. प्रसन्न वातावरण होते. सूर्याची किरणे पावसाच्या पाण्यात धुऊन स्वछ, शीतल झाली होती. कोवळ्या उन्हात जिकडेतिकडे चमचमणारे पावसाचे थेंब मोत्यांच्या माळा लावल्यासारखे वाटत होते. पांढरीशुभ्र कमळाची फुले उमलावीत असा शुभ्र प्रकाश आकाशात, नदीच्या पाण्यावर, जंगलावर पसरला होता. इंद्रधनुष्याच्या कमानीने आकाश व्यापले होते. त्याखालून पक्ष्यांचे थवे उडत होते. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडया मारत खारी खेळत होत्या. कुठेतरी एखादा भित्रा ससा हळूच झुडपांमधून बाहेर येऊन पुन्हा लपायची जागा शोधत होता. उंचच उंच पहाडांवर चढून इवली इवली कोकरे गवत खात होती आणि तृप्त, समाधानी भाव चेहऱ्यावरुन ओसंडून जात असलेल्या गायी मैदानात अस्ताव्यस्त विखुरल्या होत्या. त्यांच्यामागे आलेले गुराखी गाणी म्हणत होते. पाणी आणायला चाललेल्या आईचा पदर पकडून लहान मुलेमुली बाहेर पडली होती. काही वृद्ध मंडळी पूजेसाठी फुलं गोळा करत होती. स्नानासाठी आलेल्या लोकांचा आवाज नदीच्या अविश्रांत खळखळ आवाजात मिसळत होता. आषाढ महिन्यातल्या अशा सुंदर सकाळी, जीवन आणि आनंदाने भरभरून गेलेल्या त्या परिसराला आपल्या डोळ्यात, मनात साठवत, एक मोठा नि:श्वास सोडून जयसिंहाने मंदिरात प्रवेश केला.

मूर्तीच्या समोर उभं राहून, तिला नमस्कार करीत तो म्हणाला,

"आज एवढी रुष्ट का माते? एक दिवस तुला बळी दिला नाही, तुझीच संतान असलेल्या या जीवांच रक्त तुला दिसलं नाही म्हणून अशी उदास? आमच्या हृदयात पाहिलंस? कुठे कमी पडली आमची भक्ती? तुझ्या भक्ताने प्रेमाने अर्पण केलेल्या हृदयाने तुझं समाधान नाही होणार का? का तुला निरपराध प्राण्यांचं रक्तच हवंय? एक गोष्ट खरोखर सांग, पुण्यवान गोविंद माणिकय राजांना या पृथ्वीतलावरून घेऊन जाऊन इथं पापाचं राज्य यावं ही तुझीच इच्छा आहे? जर आज तू मला उत्तर नाही दिलंस तर मी काहीही करून राजाची हत्या नाही होऊ देणार. मी विघ्न बनून मध्ये उभा राहीन. बोल आई, ही खरंच तुझी इच्छा आहे, सांग, हो की नाही?"

त्या शांत, स्तब्ध मंदिरात आवाज घुमला, "हो!"

जयसिंहाने चकित होऊन मागे पाहिले. मागे कुणाची तरी सावली हलल्याचा त्याला भास झाला. पण मंदिरात तर त्याच्याशिवाय कुणीच नव्हते. तो आवाज ऐकून त्याला आधी वाटलं हा तर गुरुदेवांचाच आवाज! पण पुन्हा विचार केला, देवीने गुरुदेवांच्या आवाजात आपल्याला आदेश तर दिला नाही? मूर्तीला नमस्कार करून आपले शस्त्र घेऊन तो बाहेर पडला.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

28 May 2018 - 11:08 am | अनिंद्य

सुंदर !

अनुवाद ओघवता आहे. पुभाप्र.

पद्मावति's picture

28 May 2018 - 2:01 pm | पद्मावति

अतिशय सुंदर ओघवता अनुवाद. अनुवाद इनफॅक्ट वाटतच नाहीये इतकं सुरेख आहे.

शिव कन्या's picture

28 May 2018 - 10:08 pm | शिव कन्या

लिखते राहो... वाचत आहे...

प्रचेतस's picture

28 May 2018 - 10:26 pm | प्रचेतस

अप्रतिम आहे कथा, आणि तुम्ही केलेला अनुवादही सरस.

यशोधरा's picture

29 May 2018 - 8:40 pm | यशोधरा

पुढला भाग कधी?

रातराणी's picture

30 May 2018 - 4:01 am | रातराणी

सर्वांना अनेक धन्यवाद.

सहावा भाग इथे आहे,

https://www.misalpav.com/node/42702