राजयोग - ११

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
8 Jun 2018 - 11:40 am

त्याच दिवशी संध्याकाळी नक्षत्ररायला पाहताच धृव पळत पळत त्याच्याकडे गेला. त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालून आधी त्याच्या कपाळाला आपलं कपाळ लावलं. मग त्याच्या गालाला गाल लावून "काका!" म्हणत त्याला बिलगला.

नक्षत्र त्याला म्हणाला, "छि. असं नाही बोलायचं. मी तुझा काका नाहीये."

आजपर्यंत नेहमीच धृव त्याला काका म्हणून हाक मारत असे, आज अचानक नक्षत्ररायने त्याला दटावल्यावर धृवला आश्चर्य वाटलं. काही वेळ तो गंभीर चेहरा करून शांत बसला. मग आपले मोठे मोठे डोळे विस्फारून नक्षत्ररायला विचारले, "तू कोण आहेस?"

नक्षत्रराय म्हणाला, "मी तुझा काका नाहीये."

त्याचं उत्तर ऐकून धृव खळखळून हसू लागला, याहून अशक्य गोष्ट कधी ऐकलीच नसल्याप्रमाणे. हसत हसत तो म्हणाला, "तू काका आहेस." नक्षत्रराय जेवढं नाही नाही म्हणेल तेवढंच धृव त्याला काका काका म्हणून चिडवू लागला. नक्षत्र त्याला म्हणाला, "धृव, तुला ताईला भेटायचंय?"

पटकन नक्षत्ररायच्या गळ्यातून बाजूला होऊन धृव उभा राहिला, आणि विचारलं, "ताई कुठेय?"

नक्षत्र म्हणाला, "आईजवळ."

धृव म्हणाला, "आई कुठेय?"

नक्षत्र - "आहे एका ठिकाणी, आपण जाऊया हं तिकडे."

टाळ्या वाजवत धृव म्हणाला, "कधी जायचं काका?"

नक्षत्र, "आत्ताच.."

आनंदाने ओरडत धृवने नक्षत्ररायला मिठी मारली. त्याला कडेवर उचलून घेत नक्षत्रने त्याच्यावर एक चादर पांघरली आणि गुप्त मार्गाने महालाच्या बाहेर पडला.

संध्याकाळ सरून हळूहळू पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात विराजमान झाला. आज रात्रीदेखील कुणालाही बाहेर पडायला मनाई आहे. रस्त्यात ना कुणी वाटसरू आहे, ना पहारेकरी.

मंदिरात पोचल्याबरोबर नक्षत्रराय धृवला रघुपतीकडे सोपवू लागला. रघुपतीला पाहताच धृव नक्षत्रला अजूनच घट्ट बिलगला. रघुपतीने त्याला जबरदस्ती ओढून घेतलं. काका काका म्हणून धृव रडू लागला. नक्षत्ररायचे डोळे भरून आले, पण रघुपतीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्यात त्याला मोठा कमीपणा वाटला. आपण दगडच आहे अशी त्याने स्वतःचीच समजूत काढली. धृव रडत रडत "ताई ताई " अशा हाका मारू लागला, पण ताई कुठून येणार? रघुपती कडक आवाजात त्याला रागावला, धृव घाबरून रडायचा बंद झाला. थोड्या थोड्या वेळाने मुसमुसत राहिला. चौदा देवीदेवता असहाय्यपणे त्याच्याकडे पहात होत्या.

महाराज गोविंदमाणिकय स्वप्नात रडण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकून जागे झाले. खिडकीजवळ जाऊन पाहिलं तर केदारेश्वर खालून "महाराज महाराज" अशा हाका मारत होते.

महाराजांनी विचारलं, "काय झालं?"

केदारेश्वर म्हणाले, "महाराज, माझा धृव कुठे आहे?"

महाराज म्हणाले, "का बरं? त्याच्या बिछान्यावर नाही तो?"

"नाही."

केदारेश्वर पुढे सांगू लागले, "दुपारनंतर धृव कुठे दिसला नाही, म्हणून मी त्याला शोधत होतो. तेव्हा कुमार नक्षत्ररायच्या सेवकांनी सांगितलं की धृव त्यांच्या कक्षात खेळतोय म्हणून. ते ऐकल्यावर मी निश्चिन्त झालो. खूप रात्र होऊन गेल्यावरही धृव परत आला नाही म्हणल्यावर मला भीती वाटू लागली. पुन्हा चौकशी केली तर युवराज महालात नाहीत असं कळलं. मी पहारेकर्यांना फार प्रार्थना केली तुम्हाला भेटू देण्याची, पण त्यांनी येऊ दिलं नाही. रात्री अपरात्री तुमची झोपमोड केली, माझा अपराध माफ करा."

महाराजांच्या मनात एक विचार लक्खपणे चमकला. चार पहारेकर्यांना बोलावून सांगितलं, "सशस्त्र माझ्यामागे चला."

त्यातला एकजण म्हणाला, "पण महाराज आज रात्री बाहेर पडणं मना आहे."

महाराज म्हणाले, "ही माझी आज्ञा आहे."

केदारेश्वर बरोबर येऊ लागले, पण महाराजांनी त्यांना तिथेच थांबायला सांगितलं. चंद्राच्या प्रकाशात उजळलेल्या सुनसान रस्त्याने महाराज मंदिराकडे जाऊ लागले.

मंदिराचं दार उघडून महाराजांनी पाहिलं तर रघुपती आणि नक्षत्र तलवार समोर ठेऊन दारू पीत बसले होते. मंदिरात काळोख होता, एक छोटासा दिवा कोपऱ्यात फडफडत होता. धृव कुठेय? धृव काली मातेच्या मूर्तीसमोर झोपला होता. गालांवर ओघळलेल्या अश्रूंच्या रेषा सुकल्या होत्या. छोटे छोटे ओठ उघडले होते. त्याच्या चेहऱ्यावर भय नाही, चिंता नाही. इतका शांत दिसत होता की मंदिरातल्या फरशीवर नाही, ताईच्या कुशीत झोपला असावा. ताईने प्रेमाने जवळ घेत, आपल्या ओठांनी त्याचे अश्रू पुसले असावेत.

दारू पिल्यानंतर नक्षत्रला उसनं अवसान आलं होतं, रघुपतीमात्र शांत बसून पूजेच्या वेळेची वाट पहात होता. नक्षत्रच्या बडबडीकडे त्याचं जराही लक्ष नव्हतं. नक्षत्र म्हणत होता, "ठाकूर, तुम्ही आतल्या आत घाबरलाय ना? तुम्हाला वाटत असेल मीपण घाबरलोय! पण घाबरायचं नाही. कुणाची भिती? कशाची भिती? मी, मी तुमचं रक्षण करेन. तुम्हाला काय वाटलं मी महाराजांना घाबरतो? मी कुणालाच नाही घाबरत. मी शाहशुजाला पण नाही घाबरत. मी शाहजहानला पण नाही घाबरत.ठाकूर! तुम्ही सांगितलं का नाही, मी राजालाच पकडून आणलं असतं, देवीला खुश केलं असतं आपण! या एवढ्याशा पोरात असून असून किती रक्त असणार?"

त्याचवेळेस मंदिराच्या भिंतीवर सावली पडली, नक्षत्रने घाबरून मागे वळून पाहिलं तर , महाराज स्वतः! एका क्षणात त्याची सगळी नशा उतरली. स्वतःच्या सावलीपेक्षाही जास्त काळाठिक्कर पडला. मूर्तीसमोर झोपलेल्या धृवला कडेवर उचलून घेत महाराजांनी आज्ञा केली, "या दोघांना बेड्या घाला."

पहारेकर्यांनी मिळून नक्षत्रराय आणि रघुपती दोघांचे हात बांधून टाकले. धृवला छातीशी घट्ट कवटाळून महाराज महालात परतले. नक्षत्रराय आणि रघुपतीला त्या रात्री कारागृहात ठेवलं गेलं.

***

दुसऱ्या दिवशी न्यायालयात लोकांची गर्दी जमा झाली. न्यायाधीशाच्या सिंहासनावर महाराज विराजमान झाले. चारीबाजूला सभासद बसले होते. दोन्ही बंदी समोर उभे होते, त्यांचे हात मोकळे होते. फक्त सशस्त्र पहारेकरी त्यांना घेरुन उभे होते. रघुपती दगडाच्या मूर्तीसारखा निश्चल उभा होता, नक्षत्ररायने मान खाली घातली होती.

रघुपतीवरचा आरोप स्पष्ट करीत महाराज म्हणाले, "तुला काही बोलायचं आहे का?"

रघुपती म्हणाला, "माझा न्याय करण्याचा अधिकार तुम्हाला नाही."

राजा म्हणाले, "मग कोण करणार तुझा न्याय?"

रघुपती म्हणाला,"मी ब्राम्हण आहे, मी परमेश्वराचा सेवक आहे, तो परमेश्वरच माझा न्याय करू शकतो."

राजा - "वाईट कृत्याला शिक्षा, आणि चांगल्या कृतीला बक्षीस देण्यासाठी परमेश्वराचे अनेक सेवक या पृथ्वीवर कार्यरत आहेत. आम्हीही त्यातलेच एक आहोत. या विषयावर मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मी विचारेन तेवढंच सांग, काल रात्री बळी देण्याच्या हेतूने तू एका लहान बालकाचं अपहरण केलं होतंस की नाही?"

रघुपती म्हणाला, "हो!"

राजा म्हणाला, "तुला तुझा गुन्हा मान्य आहे?"

रघुपती - "गुन्हा? कसला गुन्हा? मी फक्त आईच्या आदेशाचं पालन करत होतो, तिचं कार्य करीत होतो. त्या कार्यात बाधा आणून अपराध तर तू केला आहेस. मी म्हणतो तूच आईचा अपराधी आहेस. तुझा न्याय तीच करेल."

राजा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला, "माझ्या राज्यात नियम आहे की जो कुणी बळी देईल किंवा द्यायचा प्रयत्न करेल त्याला या राज्यातून निर्वासित केलं जाईल. तुझ्यासाठी मी हीच शिक्षा ठरवली आहे. आठ वर्षांसाठी तुला या राज्यातून निष्कासित करण्यात येत आहे. माझे पहारेकरी तुला राज्याच्या बाहेर सोडून येतील."

पहारेकरी रघुपतीला सभेतून घेऊन जाण्यास सज्ज झाले. रघुपती त्यांना म्हणाला, "थांबा." राजाकडे पाहून म्हणाला, "तू माझा न्याय केलास, आता मी तुझा न्याय करतो. लक्ष देऊन ऐक. आषाढ चतुर्दशीला दोन रात्री चौदा देवतांची पूजा असताना राज्यात जो कुणी बाहेर पडेल, त्याला पुजाऱ्याकडून शिक्षा केली जाईल, हा मंदिराचा नियम आहे. या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार तू माझ्या शिक्षेला पात्र आहेस."

राजा म्हणाला, "तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे."

सभासद म्हणाले, "या अपराधासाठी फक्त धनाचा दंड दिला जाऊ शकतो."

रघुपती म्हणाला, "मी तुला दोन लक्ष मुद्रांचा दंड देतोय. तो आत्ता या क्षणीच भरावा लागेल."

काही वेळ विचार करून राजा म्हणाला, "तथास्तु." कोषाध्यक्षाला बोलावून महाराजांनी दोन लक्ष मुद्रा देण्याची आज्ञा केली. पहारेकरी रघुपतीला बाहेर घेऊन गेले.

रघुपती गेल्यावर महाराज नक्षत्ररायकडे पाहून म्हणाले,
"तुझा अपराध तुला कबूल आहे का नक्षत्रराय?"

नक्षत्ररायने पुढे जाऊन महाराजांचे पाय पकडले आणि म्हणाला, "मला मान्य आहे महाराज, मला क्षमा करा."

महाराजांच्या मनात चलबिचल झाली. नंतर स्वतःला सावरून म्हणाले, "उठ नक्षत्रराय. मी स्वतःच बनवलेल्या नियमांचं उल्लंघन मी कसं करू? जसा एक बंदीवान बंदी असतो तसंच न्यायाधीशसुद्धा बंदी असतो. एकाच गुन्ह्यासाठी एका व्यक्तीला शिक्षा आणि दुसऱ्याला माफी करावी, असा न्याय मी कसा करू शकेन? तू स्वतःच सांग."

सभासदांनी एकच गलका केला, "महाराज तो आपला भाऊ आहे, त्याला क्षमा करा."

राजाने कठोर स्वरात त्यांना सांगितलं, "तुम्ही सगळे शांत व्हा. जोपर्यंत मी या आसनावर बसलो आहे तोपर्यंत मी ना कुणाचा भाऊ आहे ना बंधू."

सर्व सभासद शांत झाले. राजा गंभीरपणे पुढे बोलू लागला, "तुम्ही सर्वांनी ऐकलंच आहे, माझ्या राज्यात हा नियम आहे की जो कुणी बळी देण्यासाठी जीव हत्या करेल किंवा तसा प्रयत्न करेल त्याला या देशातून निर्वासित केलं जाईल. काल रात्री नक्षत्ररायने पुजारी रघुपतीबरोबर मिळून एका लहान मुलाचं बळी देण्याच्या हेतूने अपहरण केलं. त्याला मी आठ वर्षांसाठी या देशातून निर्वासित करण्याची शिक्षा देत आहे."

पहारेकरी नक्षत्ररायला घेऊन जाऊ लागले तेव्हा महाराज आपल्या आसनावरून खाली उतरले. नक्षत्ररायला मिठी मारून म्हणाले, "ही शिक्षा फक्त तुला आहे असं समजू नकोस नक्षत्र. तुझ्याबरोबर मलाही ही शिक्षा भोगावी लागणार आहे. पूर्वजन्मी काहीतरी पाप झालं असणार माझ्याकडून. या देशापासून दूर असेपर्यंत देवीदेवता तुझ्याबरोबर राहू देत, सुखी रहा."

बघता बघता बातमी पसरली. अंतःपुरात रडारड सुरू झाली. राजाने आपल्या कक्षाचं दार लावून घेतलं आणि एकांतात कुणी बाधा आणू नये अशी आज्ञा केली. भावूक होऊन महाराजांनी डोळे मिटले, हात जोडून म्हणाले, "परमेश्वरा, माझ्याकडून कधी काही अपराध झाला तर मला मुळीच क्षमा करू नकोस. पाप केल्यावर त्याची शिक्षा भोगणं सोपं आहे, पण क्षमेचं ओझं वागवणं सोपं नाही!"

नक्षत्ररायच्या आठवणीने महाराज व्याकुळ झाले. छोट्या नक्षत्ररायचा चेहरा त्यांना सगळीकडे दिसू लागला. लहानपणी त्याने खेळलेले खेळ, त्याचं हसणं, त्याने केलेले उपद्व्याप सगळं काही काल घडल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यांसमोर येऊ लागलं. दिवस असो वा रात्र छोट्या नक्षत्ररायचा चेहरा काही केल्या महाराजांना विसरता येईना. महाराजांच्या डोळ्यातून आसवांची धार काही थांबेना.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

8 Jun 2018 - 11:54 am | शिव कन्या

रातराणी.....

वाचतेय वाचतेय.... भारी चालूय हा अनुवादाचा प्रवास..
अभिनंदन , आणि शुभेच्छा.

रातराणी's picture

8 Jun 2018 - 11:58 am | रातराणी

धन्यवाद ताई :)

फारच अल्पशी शिक्षा दिली त्यांना.

क्षमेचं ओझं वागवणं सोपं नाही.

हा भागही आवडला.

देशपांडेमामा's picture

8 Jun 2018 - 1:33 pm | देशपांडेमामा

धृव सुरक्षित आहे हे वाचून जीव भांड्यात पडला

पुभाप्र

देश

यशोधरा's picture

8 Jun 2018 - 1:48 pm | यशोधरा

वाचते आहे..

प्रचेतस's picture

8 Jun 2018 - 2:56 pm | प्रचेतस

वाचत आहेच.
आधी ही घटना प्राचीन काळातील असावी असे वाटत होते पण सुजा आणि शाहजहानचा उल्लेख वाचून तत्कालीन त्रिपुरातील राजघराण्यावर बेतलेली आहे असे दिसते.

सस्नेह's picture

10 Jun 2018 - 7:04 am | सस्नेह

वाचतेय

रातराणी's picture

11 Jun 2018 - 11:11 am | रातराणी

सर्वांना धन्यवाद :)

सिरुसेरि's picture

13 Jun 2018 - 2:02 pm | सिरुसेरि

मन दोलायमान असेल तर माणसाचं कसं माकड होतं याचे उदाहरण म्हणजे नक्षत्रराय