राजयोग - १५

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
8 Jul 2018 - 11:51 am

रघुपतीने विचारलं, "काय चालू आहे हे?"

नक्षत्रराय डोकं खाजवत म्हणाला, "नाच चालू होता."

रघुपती तिरस्कारानं म्हणाला, "छि छि."

नक्षत्रराय अपराध्यासारखा उभा राहिला.

रघुपती म्हणाला, "उद्या इथून जायचंय. तयारीला लाग."

नक्षत्रराय म्हणाला, "कुठे जायचंय?"

रघुपती - "ते सगळं नंतर सांगेन. आता फक्त इथून जायचंय."

नक्षत्रराय - "मी इथेच ठीक आहे."

रघुपती - "ठीक आहे!? राजकुळात जन्म झालाय ना तुझा? तुझ्या सगळ्या पूर्वजांनी राज्य केलं आणि एक तू आहेस इथं या जंगलात कोल्ह्यांचा राजा झालायस! आणि म्हणे ठीक आहे!"

रघुपतीच्या कठोर शब्दांनी आणि लालबुंद डोळ्यांनी सिद्ध केलं की नक्षत्रराय ठीक नाहीये. त्याच्या चेहऱ्यावरच्या तेजामुळे नक्षत्ररायलाही थोडंफार तसंच वाटू लागलं. तो म्हणाला,"ठीक कसला! आहे आपला कसातरी. पण करणार तरी काय? काय उपाय आहे?"

"उपाय भरपूर आहेत, त्यांची काही कमतरता नाही. मी मार्ग दाखवेन, तू चल माझ्याबरोबर."

नक्षत्रराय - "एकदा दिवानजीला विचारलं असतं.."

रघुपती - "नाही."

नक्षत्रराय - "माझं सगळं सामान.."

रघुपती - "काही नको."

नक्षत्रराय - "माणसं.."

रघुपती - "गरज नाही."

नक्षत्रराय - "माझ्याकडे आता पुरेसे धन नाही."

रघुपती - "माझ्याकडे आहे. उगाच काही कारणं सांगून अळमटळम करू नकोस. झोपायला जा आता, उद्या सकाळी लवकरच निघायचं आहे आपल्याला."

असं म्हणून रघुपती कुठल्याही उत्तराची वाट न पाहता निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पहाटे नक्षत्रराय जागा झाला. गायक ललित रागातली मधुर गीतं गात होते. नक्षत्ररायने खिडकीतून बाहेर पाहिलं. पूर्वदिशेला सूर्योदय होत होता, सूर्याची बारीक रेघ हळूहळू वर येताना दिसत होती. दोन किनाऱ्यांवरच्या वृक्षराजीतून, लहान लहान गावांच्या सीमांना स्पर्श करीत ब्रह्मपुत्रेचं पाणी खळखळ आवाज करीत अव्याहतपणे वाहत होतं. हवेलीच्या खिडकीतून नदीकिनारी असलेली एक छोटी झोपडी दिसत होती. एक स्त्री तिथे अंगण स्वच्छ करीत होती. एक पुरुष तिच्याशी एक दोन गोष्टी बोलून, बांबूच्या मोठ्या काठीला एक झोळी अडकवून निश्चिन्त मनाने निघून गेला. मोठमोठ्या झाडांच्या घनदाट पानांनी भरलेल्या फांद्यांवर बसून पक्षी चिवचिवाट करीत होते. खिडकीतून बाहेर दिसत असलेलं दृश्य पाहून नक्षत्ररायने एक मोठा निश्वास सोडला, नेमक्या त्याच वेळी रघुपतीने मागून येऊन त्याला स्पर्श केला. नक्षत्रराय दचकला. रघुपती शांत गंभीर सुरात म्हणाला, "प्रवासाची सगळी तयारी झाली आहे!"

नक्षत्रराय हात जोडून अगदी काकुळतीला येऊन म्हणाला, "मला क्षमा करा ठाकुर! मला कुठेही जायचं नाहीये. मी इथेच ठीक आहे."

रघुपती काहीही न बोलता फक्त जळजळीत नजरेने त्याच्याकडे पहात राहिला. मान खाली घालून नक्षत्रराय म्हणाला, "कुठे जायचंय?"

रघुपती - "ते मी आता नाही सांगू शकत."

नक्षत्रराय - "मी दादाविरुद्ध काही षडयंत्र नाही करू शकणार."

रागाने फणफणत रघुपती म्हणाला, "तर!जरा सांग तरी, दादाने असे काय मोठे उपकार केलेत तुझ्यावर!"

नक्षत्र त्याच्याकडे पाठ करून नखे कुरतडत म्हणाला, "मला माहितीये, दादा खूप प्रेम करतो माझ्यावर."

रघुपती कोरडं हसत म्हणाला, "देवा परमेश्वरा!! काय प्रेम आहे! धृवला युवराज बनवण्यात काही बाधा नको म्हणून उगाच खोटं निमित्त करून तुला राज्यातून बाहेर काढलं, राज्यकारभाराच्या ओझ्याने हा मऊ लोण्यासारखा भाऊ वितळला तर! अरे मूर्खा, आता त्या राज्यात सहज परत जाऊ शकशील का?"

नक्षत्रराय - "मला काय एवढी साधी गोष्ट कळत नाही का? सगळं कळतंय मला. पण मी काय करू ठाकूर? काही उपाय नाही."

रघुपती - "तो उपायच तर सांगायचा आहे. म्हणूनच तर आलोय तुला शोधत. इच्छा असेल तर चल माझ्याबरोबर.नाहीतर बस या बांबूच्या वनात तुझ्या हितचिंतक दादाचं ध्यान करत. मी चाललो."

असं म्हणून रघुपती जायला निघाला. लगेच त्याच्या मागे जाऊन नक्षत्रराय म्हणाला, "मी येतो ठाकुर. पण दिवानजी येतो म्हणले आपल्यासोबत तर त्यांना येऊ देत का?"

रघुपती म्हणाला, "मी सोडून इतर कुणी नाही येऊ शकणार तुझ्यासोबत."

नक्षत्ररायचा पाय घरातून निघत नव्हता. हा सगळा सुखाचा डाव मोडून, दिवानजीला सोडून, न जाणो कुठे जावं लागेल रघुपतीसोबत! रघुपती जणू काही त्याचे केस पकडून त्याला ओढून नेत होता. नक्षत्ररायला या सगळ्या गोष्टींची थोडी भिती तर वाटतच होती, पण कुतुहलही वाटत होतं.

नाव तयार होती. नदीकिनारी आल्यावर नक्षत्ररायने खांद्यावर पंचा टाकून स्नानाला येत असलेल्या पितांबरला पाहिलं. नक्षत्ररायला पाहताच पीतांबर खुश होऊन उत्साहाने म्हणाला, "महाराजांचा विजय असो! मी ऐकलं काल कुठूनतरी आलेल्या धूर्त अवगुणी ब्राह्मणाने शुभ विवाहामध्ये विघ्न आणलं."

नक्षत्रराय बेचैन झाला. रघुपती गंभीर आवाजात म्हणाला, "मीच तो धूर्त ब्राह्मण."

पीतांबर खळखळून हसला आणि म्हणाला, "अरेरे! तुमच्यासमोरच तुमचं वर्णन करणं काही बरोबर नाही! माहीत असतं तर कुणाची हिम्मत झाली असती असं बोलायची? पण ठाकुर, वाईट वाटून घेऊ नका. लोक आपल्या मागे काय काय नाही बोलत! मला तोंडावर सगळे राजा राजा म्हणतात पण तेच माझं तोंड फिरलं रे फिरलं की पितु पितु म्हणून चिडवतात. तोंडावर असलं काही म्हणत नाहीत ह्यातच मी समाधानी आहे! खरं सांगू का, तुमचा चेहरा जरा जास्तच नाराज आहे, कुणाचाही असा चेहरा पाहिला की लोक त्याच्याबद्दल वाईटसाईट बोलणारच. महाराज, इतक्या सकाळी नदीवर?"

काहीसा हळवा होऊन नक्षत्रराय म्हणाला, "मी तर चाललो दिवानजी."

पीतांबर - "चाललात?कुठे?नवपाड्याला मंडल परिवाराच्या घरी?"

नक्षत्रराय - "नाही दिवानजी, तिकडे नाही.. खूप दूर."

पीतांबर - "खूप दूर? शिकार करायला पाईकघाट जाताय का?"

नक्षत्ररायने एक वेळ रघुपतीकडे पाहून फक्त उदासपणे मान हलवली.

रघुपती म्हणाला, "फार वेळ नाही आता. नावेवर चढ."

पितांबरला या सगळ्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. तो चिडून रघुपतीला म्हणाला, "तू आहेस तरी कोण रे ठाकुर? आला मोठा आमच्या महाराजांवर हुकूम गाजवायला."

नक्षत्रने बेचैन होऊन पीतांबरला एका बाजूला ओढून नेलं आणि सांगितलं, "ते आमचे गुरू ठाकूर आहेत."

पीतांबर म्हणाला, "असू देत की गुरू ठाकूर. त्यांनी आमच्या चंडीमंडपात रहावं. तांदूळ, केळी असा शिधा पाठवीन. मानसन्मानाणी रहावं. महाराजांशी त्यांचं काय घेणंदेणं?"

रघुपती - "वेळ वाया जातोय - मी चाललो."

पीतांबर - "जशी आज्ञा. उशीर करून कसं चालेल? महोदयांनी झटपट चालतं व्हावं. मी महाराजांना महालात घेऊन जातो."

नक्षत्रराय एक वेळ रघुपतीकडे आणि एक वेळ पितांबरकडे पाहून शांतपणे म्हणाला, "नाही दिवानजी, मी जातोय."

पीतांबर - "मग मी पण येतो. काही लोक बरोबर घेऊयात. राजासारखं चला. राजा जाणार आणि दिवानजी नाही?"

नक्षत्रराय रघुपतीकडे पाहू लागला.

रघुपती म्हणाला, "कुणी नाही येणार बरोबर."

पीतांबर रागावून म्हणाला, "हे बघ ठाकूर, तू.."

नक्षत्रराय घाईघाईने त्याला थांबवून म्हणाला, "दिवानजी मी जातो. उशीर होतोय."

पितांबरने निराश होऊन नक्षत्रचा हात पकडून म्हणलं. "बाळा, मी तुला राजा म्हणतो, पण तुला माझ्या मुलासारखं मानतो. मला माझं मूलबाळ नाही. तुझ्यावर मला काही हक्क नाही. तुझ्या मनात असेल जायचं तर मी तुला जबरदस्तीनं थांबवून नाही ठेऊ शकत. फक्त एक विनंती आहे माझी, जिथे कुठे जाशील तिथून मी मरायच्या आधी एकदा परत ये. आपल्या हातांनी इथला सगळा राज्यकारभार तुला सोपवला की मी डोळे मिटायला मोकळा. एवढी एकच इच्छा आहे माझी."

नक्षत्रराय आणि रघुपती नावेत बसले. नाव दक्षिण दिशेला जाऊ लागली. अंघोळ करायची विसरून, पंचा तसाच खांद्यावर टाकून अस्वस्थपणे पीतांबर घरी परत गेला. गुजुरपाडा जणू काही रिकामं झालं, त्याचा आनंद, उत्साह सगळं काही संपून गेलं. रोज फक्त निसर्गाचा उत्सव, पक्षांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि नदीच्या लाटांचा आवाज न थकता येत राहिला.

***

न संपणारा रस्ता. कुठे नदी, कुठे घनदाट जंगल, कुठे उन्हाने तळपती मैदानं - कधी नावेवर, कधी चालत, कधी तट्टू घोड्यावर - कधी ऊन, कधी पाऊस, कधी गोंगाटाचा दिवस, कधी रात्रीचा निस्तब्ध अंधार - नक्षत्रराय न थांबता चालत राहिला. किती देश, किती विविध दृश्य, विविध लोक पण नक्षत्ररायसोबत तोच एक सावलीसारखा दुबळा, उन्हासारखा प्रखर एकमेव रघुपती दिवसरात्र आहे. दिवसा रघुपती, रात्री रघुपती, स्वप्नात पण रघुपती.रस्त्यांवरून वाटसरू येत जात आहेत, रस्त्याच्या किनारी धुळीत मुलं खेळत आहेत, बाजारात हजारो लोक खरेदीविक्री करीत आहेत, गावात म्हातारी माणसं द्यूत खेळत आहेत, स्त्रिया घाटावर पाणी भरत आहेत, नाविक गाणी गात नावेतून जातायत - पण नक्षत्ररायच्या जवळ काटकुळा रघुपती सतत जागा आहे.
जगात चहूबाजूला काही न काही खेळ चालू आहे, विचित्र घटना घडतायत - पण या रंगभूमीवर चालू असलेल्या लीलेतून नक्षत्ररायचं कमनशिबी दैव त्याला ओढून नेतंय - आपली माणसं त्याच्यासाठी परकी झालीत, संसार म्हणजे फक्त आणि फक्त वाळवंट.

नक्षत्रराय थकून आपल्या सावलीला विचारतो, "अजून किती दूर जायचंय?"

सावली म्हणते, "खूप दूर."

"कुठे जायचंय?"

या प्रश्नाचं उत्तर नाही.

नक्षत्रराय उसासे सोडत चालत राहतो. झाडांच्या मधोमध गर्द सावलीतली टापटीप आवरलेली एखादी झोपडी पाहून त्याला वाटतं, 'मी या झोपडीचा मालक असतो तर!' संध्याकाळी गवळी काठी खांद्यावर ठेऊन गावातल्या रस्त्यांवर धूळ उडवत गाय वासरांना घरी घेऊन जात असतात, नक्षत्ररायला वाटतं,'मला त्यांच्यासोबत जाता येत असतं तर संध्याकाळी घरी जाऊन आराम केला असता.' दुपारच्या कडक उन्हात कुणा शेतकऱ्याने नांगर धरलेला पाहिला की नक्षत्रराय मनात म्हणे, 'आहा, किती सुखी आहे हा!'

प्रवासाच्या दगदगीमुळे नक्षत्रराय निस्तेज, मलूल झाला, तब्येत खालावली. तो रघुपतीला म्हणाला, "आता मी काही वाचत नाही."

रघुपती म्हणाला, "आता तू मरू शकत नाही."

नक्षत्ररायला वाटलं, रघुपतीच्या तावडीतून सुटल्याशिवाय मरणही त्याच्याकडे फिरकणार नाही. एक स्त्री त्याला म्हणाली होती, "देवा रे! कुणाचा मुलगा आहे हा? कोण याला असं दारोदार भटकवत आहे?" तिचं बोलणं ऐकून नक्षत्ररायचं मन भरून आलं, डोळ्यात आसवं जमा झाली. वाटलं त्या स्त्रीला 'आई!' म्हणून हाक मारावी आणि तिच्याबरोबर घरी जावं. पण जेवढ्या अधिक यातना रघुपती त्याला देत होता, तितकाच तो त्याच्या अधीन होऊ लागला. त्याचं सगळं अस्तित्व रघुपतीच्या तालावर नाचू लागलं.

चालत चालत नदीचं मोठं पात्र हळूहळू लहान होऊ लागलं. लाल रंगाच्या माती, खडकाळ जमीन, दूर दूर वस्त्या, तुरळक झाडं - दोन वाटसरू नारळाच्या बनाचा देश मागे टाकून ताडाची वनं असलेल्या देशात पोचले. अधेमधे मोठे मोठे बांध, सुकलेले नदीचं पात्र, दूरवर ढगांसारखे डोंगर दिसू लागले. हळूहळू शाहशुजाची राजधानी राजमहल(टीप) जवळ येऊ लागली.

क्रमशः

टीप:

(आतापर्यंत घडलेल्या घटनांचा संक्षिप्त गोषवारा)

त्रिपुराचे महाराज गोविंद माणिकय यांनी नर बळी/पशु बळी प्रथा बंद करण्याचा आदेश दिल्यावर भुवनेश्वरी देवीच्या मंदिरातील पुजारी रघुपती याने त्यांचा विरोध केला. या द्वंद्वात सापडलेल्या जयसिंह या रघुपतीच्या मानलेल्या मुलाचा नाहक बळी गेला. जीवबळी बंद न करण्याच्या हट्टाला पेटलेल्या रघुपतीने महाराजांचा धाकटा भाऊ नक्षत्रराय याला हाताशी धरून महाराजांना पुत्रवत असलेल्या लहानग्या धृवचे अपहरण करून त्याचा देवीसमोर बळी देण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी वेळेत जाऊन धृवला वाचवले. रघुपती आणि नक्षत्रराय या दोघांना या अपराधाची शिक्षा म्हणून आठ वर्षांसाठी त्रिपुरातून निर्वासित केले गेले. आषाढ चतुर्दशीला जेव्हा देवीची पूजा असते तेव्हा कुणीही बाहेर पडणे निषिद्ध आहे असा मंदिराचा दंडक होता. जर कुणी बाहेर पडले तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार पुजाऱ्याला होता. महाराज पूजेच्या रात्री धृवला वाचवायला बाहेर पडले याची शिक्षा म्हणून रघुपतीने त्यांना दोन लक्ष मुद्रांचा दंड दिला. महाराजांनी तो त्याला दिला.

सोळाव्या शतकात मुघल सम्राट शाहजहानचं राज्य होतं. त्याचा तिसरा मुलगा औरंगजेब दक्षिणेला विजापूरकडे आक्रमण करायला नियुक्त केला होता. दुसरा मुलगा शुजा बंगालचा राजा होता. त्याची राजधानी राजमहल हे शहर होती. सगळ्यात लहान मुलगा शहजादा मुराद गुजरातमध्ये राज्य करत होता तर सगळ्यात मोठा मुलगा दारा राजधानी दिल्लीतच रहात होता. शाहजहानच्या वयोमानानुसार सुरू झालेल्या तब्येतीच्या तक्रारींमुळे राज्यकारभाराचा सर्व भार दारावर पडला होता.

राजमहल हे बंगाल (आताचा बांगलादेश) मधील एक शहर. पूर्वीच्या बंगाल अंतर्गत अनेक छोटी छोटी राज्य समाविष्ट होती. त्रिपुरा हे त्यातलं एक. निर्वासनाची शिक्षा मिळाल्यावर रघुपती आधी बंगालमध्ये राजमहलला गेला. तिथं त्यानं त्याच्याजवळ असलेलं धन (राजा गोविंदमाणिकय यांनी दिलेला दंड) लपवलं. त्याचदरम्यान शाहजहान अंथरुणाला खिळल्याची बातमी बंगालमध्ये मिळाली. ते कळताच शुजा दिल्लीचं तख्त काबीज करायला निघाला. शहाजहानच्या मुलांमध्ये शहेनशाह पद मिळवायची चढाओढ सुरू झाली. दाराचा मुलगा सुलेमान शुजाचं आक्रमण रोखायला राजपूत सैन्य घेऊन आला. रघुपती शुजाचा पाठलाग करत त्याच्यामागे जात होता. त्याचा एकमेव उद्देश काहीही करून शुजाचं मन जिंकणं हा होता. शुजा विजयगढवर आक्रमण करणार असल्याचं रघुपतीला जंगलात सैनिकांनी शुजाच्या शिवीरात पकडून नेल्यावर समजलं. तिथून सहीसलामत बाहेर पडल्यावर तो विजयगढला (बहुदा आताच्या उत्तरप्रदेशमधील किल्ला) पोचला. गरीब काकासाहेबांकडून किल्ल्याचं रहस्य माहीत करून घेतलं आणि राजपूत सैनिकांनी शुजाला बंदी करून आणल्यानंतर शुजाची तिथून पळून जाण्यात मदत केली.
तिथून रघुपती ब्रह्मपुत्रेच्या किनारी गुजुरपाडा नावाच्या छोट्याशा गावात राहत असलेल्या नक्षत्ररायला बरोबर घेऊन पुन्हा एकदा शुजाकडे राजमहल या त्याच्या राजधानीच्या शहरात परत आला.

कथा

प्रतिक्रिया

गोषवारा दिल्याबद्दल आभार. कल्पना आवडली.

पुभाप्र.

अनिंद्य's picture

9 Jul 2018 - 10:58 am | अनिंद्य

वाचतोय.
गोषवारा देण्याची कल्पना आवडली - कथेच्या अगदी योग्य वळणावर
पु भा प्र

प्रचेतस's picture

10 Jul 2018 - 8:41 am | प्रचेतस

उत्तम लेखन.
कथा रंगतदार झालीय एकदम.

श्वेता२४'s picture

10 Jul 2018 - 10:52 am | श्वेता२४

उतकंठा वाढतेय

यशोधरा's picture

11 Jul 2018 - 7:45 pm | यशोधरा

वाचते आहे..

diggi12's picture

17 Jul 2018 - 7:20 pm | diggi12

Pudhcha bhag kevha

आनन्दा's picture

25 Jul 2018 - 12:35 pm | आनन्दा

पुभाप्र

अनिंद्य's picture

7 Aug 2018 - 1:11 pm | अनिंद्य

@ रातराणी,

अगदी रंगतदार वळणावर अचानक थांबलात तुम्ही.
आम्ही वाचक पुढच्या भागांची वाट पाहतो आहोत, कृपया लवकर टाका.
_/\_

अनिंद्य