राजयोग - ७

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
31 May 2018 - 10:40 am

तिथून निघाल्यावर जयसिंह निर्जन रस्त्याने मंदिराकडे परत जाऊ लागला. तसं तिथून मंदिर फार दूर नाही पण आज जयसिंहला परत तिकडे जावंसं वाटत नव्हतं. किनाऱ्यावर एक मोठं झाड पाहून तो त्याखाली बसला. शरीराच्या थकव्यापेक्षा त्याच्या मनाला थकवा आला होता. आज पहिल्यांदाच त्याला अगदी एकटं एकटं वाटत होतं. विचारांचा ताण असह्य व्हायला लागला तेव्हा त्यानं आपला चेहरा हाताच्या ओंजळीने झाकून घेतला. त्याला वाटलं, आजचा एक प्रश्न तर मिटला पण इथून पुढे माझ्या मनातला संशय कोण दूर करणार? चूक काय, बरोबर काय कोण सांगणार? एखाद्या आंधळ्या मनुष्याची मार्गदर्शक काठी तुटली तर त्याला जसे वाटेल तसेच काही जयसिंहाला त्याक्षणी वाटत होते.

जयसिंह तिथून उठला तेव्हा पावसाला सुरुवात झाली होती. तसाच भिजत भिजत नाईलाजाने मंदिराच्या दिशेने जाऊ लागला. मंदीर जवळ येताच त्याला लोकांचे छोटे छोटे घोळके गोंगाट करीत मंदिराकडे निघालेले दिसले.

कुणी म्हणत होतं, "आमच्या वाडवडीलांनी सुरू केलेली ही प्रथा! अशी काय विपरीत बुद्धी झाली राजाला! आता आम्ही स्वर्गात पूर्वजांना काय तोंड दाखवणार?"

कुणी म्हणत होतं, "आता मंदिरात यावंस वाटत नाही, आधीसारखी पूजेची मजा कुठे?"

एक स्त्री म्हणत होती, "काहीतरी अनर्थ होणार निश्चितच."

तर दुसरी म्हणाली, "हो तर, पुजारीजी सांगत होते तीनच महिन्यात या देशात रोगराई पसरून सर्वनाश होणार."

कुणी म्हणाली, "माझे सासरे दीड वर्ष झालं आजारी असूनही हिंडूनफिरून होते, बळीची प्रथा बंद झाली आणि अचानकच वारले."

तिची मैत्रीण म्हणाली, "तेच का अगं, माझ्या दिराचा मुलगा नाही? ध्यानीमनी नसताना गेला. नुसतं तीन दिवस तापाच निमित्त झालं."

कुणी व्यापारी म्हणाला, "त्यादिवशी बाजारात आग लागली आणि सगळी दुकानं जळून राख झाली, एकाचंही दुकान वाचलं नाही."

शेतकरी चिंतामणी त्याच्या मित्राला म्हणाला, "यावर्षी धान्य केवढं स्वस्त झालंय, इतकं स्वस्त कधी झालं होतं का? सगळ्यात जास्त हाल आपल्या शेतकऱ्यांचेच होणार बघ."

बळीची प्रथा बंद झाल्यावर जर काही चांगलं घडलं असेल तर ते हे की प्रथा बंद झाल्यानंतर किंवा त्याआधीही लोकांचं जे काही नुकसान झालं होतं, ज्या समस्या होत्या त्यांचं खापर फोडायला त्यांना आयतं कारण मिळालं. आता इथं राहण्यात काही राम नाही असा निष्कर्ष प्रत्येक चर्चेच्या शेवटी निघत होता. पण तो फक्त निष्कर्षच राहत होता, कृती कुणाकडूनही होत नव्हती.

जयसिंह त्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करीत उदासपणे मंदिराजवळ पोचला. देवीची पूजा आटपून रघुपती मंदिराच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यांच्याजवळ जाऊन हळव्या पण तरीही काहीशा दृढ स्वरात जयसिंह म्हणाला,

"आज सकाळी मंदिरात मी जेव्हा देवीची आज्ञा घेण्यासाठी प्रश्न केला होता तेव्हा तुम्ही का उत्तर दिलंत त्याचं?"

रघुपतींनी सारवासारव करीत उत्तर दिले, "देवी तर माझ्याच तोंडून तिचे आदेश सांगत असते, ती स्वतः तिच्या मुखाने काहीच सांगत नाही."

जयसिंह म्हणाला, "तुम्ही मला समोर येऊन का नाही सांगितलंत? मागे लपून मला फसवलंत का?"

रघुपती चिडून म्हणाले, "गप्प बैस! मूर्खांसारखं काहीही बरळू नकोस! मी काय विचार करून वागतो हे तुला समजणार नाही! तुझं काम आहे मी जे सांगेन ते करणं. उगीच नसत्या शंका काढत बसू नकोस."

जयसिंह शांत झाला. त्याचा संशय कमी व्हायच्याऐवजी वाढला. काही वेळाने तो रघुपतीला म्हणाला,

"मला अंदाज आलेला सकाळीच की मातेच्या आडून तुम्हीच माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं आहे. अशा परिस्थितीत महाराजांना सावध करणं माझं कर्तव्य होतं. मी आत्ता त्यांना नक्षत्ररायपासून सावध रहा असा इशारा देऊनच येतो आहे."

हे ऐकताच रघुपती रागाने थरथर कापू लागले. काही क्षणांनी आपल्या रागावर नियंत्रण करून ते जयसिंहला म्हणाले,

"मंदिरात चल."

रघुपती आत गाभाऱ्यात जाऊन उभे राहिले. जयसिंह त्यांच्यामागे गेला. देवीच्या मूर्तीकडे हात करून रघुपती म्हणाले,

"मातेच्या चरणांना हात लावून शपथ घे, आषाढ चतुर्दशीला मी स्वतः राजरक्त घेऊन येईन."

जयसिंह खाली मान घालून शांत बसला. गळ्यात दाटून आलेला आवंढा मागे ढकलत मातेच्या चरणांना स्पर्श करून काही वेळाने म्हणाला, "आषाढ चतुर्दशीला मी स्वतः राजरक्त घेऊन येईन. "

***

महाराजांनी महालात येऊन त्यांचं नेहमीच कामकाज आटोपलं. दुपार होऊन गेली होती. आकाशात जमा झालेल्या पावसाळी ढगांनी दिवसाच अंधार पडला होता. महाराज उदास झाले होते. नेहमी नक्षत्रराय राजदरबारात येत असे, पण आज आला नव्हता. महाराजांनी नंतर त्याला त्यांच्या कक्षात बोलावणं पाठवलं तर त्यानं आजारी असल्याचं कारण सांगून टाळलं. महाराज स्वतः त्याच्या कक्षात गेले. नक्षत्रराय त्यांच्या नजरेला नजरही देत नव्हता. महाराजांनी प्रेमाने त्याला विचारलं, "तुला काय झालंय नक्षत्र?" उगीच हातात काहीतरी कागद घेऊन ते वाचत असल्याचं दाखवून तो म्हणाला, "कुठे काय? काही नाही झालं, असंच जरा काम होतं."

आपण चुकीचं बोलून गेलो हे लक्षात येताच हातातला कागद उलटसुलट करत म्हणाला, "हो हो, जरा कणकण वाटत तर होती, पण तसं काही विशेष नाही, ठीक आहे, थोडं कामच आहे आज जरा.."

नक्षत्ररायचा उडालेला गोंधळ पाहून महाराज अजूनच दुःखी झाले. उदास चेहऱ्याने ते त्याच्याकडे पाहू लागले. नक्षत्ररायची त्यांच्याकडे तोंड वर करून पहायचीदेखील हिंमत होत नव्हती. महाराज विचार करीत होते, शेवटी प्रेमाच्या घरट्यात हिंसा आलीच, साप जसा लपूनछपून आपला विळखा घट्ट करत जातो, कुणाच्याही नजरेस न पडता तशीच ही नक्षत्ररायच्या मनातली हिंसा लपून बसतेय. आपल्या जंगलामधे हिंस्त्र प्राण्यांची कमी आहे का? की आता माणसाला माणसाचीच भीती वाटू लागेल. भाऊ भावाजवळ संशय न घेता बसू शकणार नाही. हिंसा लोभ, यांचंच महत्व इतकं वाढलंय की आता प्रेम,माया,ममता या सर्व पुस्तकात वाचायच्या गोष्टी राहिल्या आहेत. हा माझाच भाऊ, एकाच अंगणात खेळत आम्ही मोठं झालो, एका ताटात जेवलोयदेखील, एका घरात राहून आता हाच मला मारायची योजना बनवतोय. महाराजांना सगळं जगच हिंस्त्र श्वापदांनी भरल्यासारखं वाटू लागलं. सगळीकडे अंधार आणि त्या अंधारात दिसत होती फक्त महाराजांवर रोखून धरलेली तीक्ष्ण दात, नखे. एक मोठा निश्वास सोडून महाराजांनी विचार केला, या हिंसक राज्याच्या सिंहासनावर बसून मी हिंसेला, लोभाला अजून खतपाणी घालतोय. या सिंहासनाला चारी बाजूंनी माझ्याच प्रियजनांनी शिकारी कुत्र्यांप्रमाणे घेराव घातला आहे, हळूहळू आपले दात घासत, नख्या सरसावून ते माझ्यावर तुटून पडण्याच्या संधीची वाट पहात आहेत. यांच्या हातून असं कुरतडून मरण्यापेक्षा, त्यांची रक्ताची तहान भागवण्यापेक्षा आपणच इथून दूर निघून गेलेलं बरं.

सकाळी महाराजांनी जी प्रसन्नता अनुभव केली होती, ती कोण जाणे कुठे हरवली.

आपल्या आसनावरून उठून उभे रहात दृढ स्वरात महाराज म्हणाले,

"नक्षत्र आज तिसऱ्या प्रहरी आपण दोघे गोमतीच्या किनारी असलेल्या निर्जन वनात फिरायला जाऊ."

राजांनी अशी गंभीरपणे दिलेली आज्ञा ऐकून नक्षत्रराय काही बोलू शकला नाही. त्याच्या मनात अनेक शंकाकुशंका येऊ लागल्या. महाराजांचे त्याच्यावर रोखलेले डोळे पाहून त्याला वाटलं आपल्या मनाच्या अंधारात किड्यांप्रमाणे वळवळत असलेले सगळे वाईट विचार त्या डोळ्यांच्या प्रकाशाने दिपून बाहेर आले आहेत. नक्षत्ररायने घाबरत घाबरत महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच अस्वस्थ करणारी शांतता होती, रागाचा लवलेशही नव्हता.

तिसऱ्या प्रहरी महाराज नक्षत्ररायसोबत जंगलाच्या दिशेने चालू लागले. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. संध्याकाळ व्हायला अजून वेळ होता, पण ढगांमुळे संध्याकाळ झाल्यासारखेच वाटत होते. पक्षी घरट्यांकडे परतत होते. एखाद दुसरी घार अजूनही आकाशात घिरट्या घालीत होती. महाराजांसोबत जंगलात प्रवेश करताच नक्षत्ररायची भितीने गाळण उडाली. मोठे मोठे वृक्ष घोळक्याने उभे राहिले आहेत, इतके स्तब्ध की जणू काही खालून जाणाऱ्या किड्यामुंग्यांचेदेखील आवाज ऐकू यावेत. काहीसे खाली झुकून हे वृक्ष जणूकाही स्वतःचीच सावली पहात आहेत की काय असा त्याला भास झाला. झाडांची गर्द सावली आणि कातरवेळी जंगलावर पसरत चाललेलं अंधाराचं साम्राज्य त्याला एखाद्या विवराप्रमाणे वाटू लागले. मनात आलं असतं तर नक्षत्ररायला तिथून धूम ठोकणंही शक्य होतं. पण पाय उचलून चालण्याची शक्तीही आपल्यात नाही. हातपाय बांधून कुणीतरी आपल्याला त्या विवरात ओढून घेऊन जातंय असं काहीसं त्याला वाटू लागलं. महाराज काही बोलतही नाहीत. आज कधी नव्हे ते इतके शांत आहेत. इतक्या गूढ, निर्जन ठिकाणी घेऊन येण्याचा महाराजांचा एकच उद्देश असू शकतो, आपल्याला शिक्षा करणं! आता आपली सुटका नाही.

जंगलाच्या मधोमध थोडीशी मोकळी जागा आहे. पावसाच्या पाण्याने इथं एक छोटं तळं तयार झालं आहे. त्या तळ्याच्या किनारी फिरून महाराज एक ठिकाणी थांबले आणि नक्षत्ररायला म्हणाले, "इथेच थांब"

नक्षत्रराय जिथे होता तिथेच थांबला. त्यांची ती गंभीर आवाजातली आज्ञा ऐकून जणू काळ स्तब्ध झाला, मोठमोठाले वृक्ष खाली मान घालून उभे राहिले, खालून धरती आणि वरून आकाशही श्वास रोखून आता काय होणार हे पाहू लागले. पक्षी चिडीचूप शांत बसले. जंगलात इतर कोणताच आवाज नव्हता, निरव शांतता होती. त्या शांततेत महाराजांचे "इथेच थांब" एवढे शब्द मात्र पानापानांवर, फांद्याफांद्यावर आदळून सगळीकडे पसरत गेले. महाराजांच्या आवाजाचा गुंजारव बराच वेळ ऐकू येत राहिला. नक्षत्रराय एखाद्या झाडाप्रमाणे स्थिर होऊन उभा राहीला.

राजाने आपली मर्मभेदी दृष्टी नक्षत्ररायच्या चेहऱ्यावर स्थिर करीत शांत, धीरगंभीर आवाजात विचारले, "नक्षत्र, तू मला मारून टाकणार आहेस का?"

नक्षत्रराय चकित होऊन पहात राहिला, उत्तर देण्याचेही भान त्याला राहिलं नाही.

राजा म्हणाला, "का मारणार आहेस? राज्यासाठी? तुला काय वाटतं, सोन्याचं सिंहासन, हिऱ्यांचा मुकुट आणि राजछत्र मिळालं की राजा होता येतं? तुला माहितीये, या मुकुटाचं, या राजछत्राचं, राजदंडाच ओझं किती असतं? हजारो लोकांची चिंता या मुकुटाखाली झाकून ठेवलेली असते. तुला राजा व्हायचंय? मग हजारो लोकांच्या दुःखाला स्वतःच दुःख समजायला शिक, हजारो लोकांच्या समस्या स्वतःच्या समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न कर, हजारो लोकांचे दारिद्र्य स्वतःचे समजून त्याचा भार आपल्या खांद्यावर घेऊन बघ - जो असं करू शकतो नक्षत्र, राजा तोच असतो, मग भले तो एखाद्या झोपडीत रहात असो की राजमहालात. जो माणूस जगातल्या प्रत्येकाला आपलं मानतो, लोकही त्याला आपलं मानतात. जो जगातल्या प्रत्येक दुःखाला मिटवू पहातो, तोच या जगाचा राजा. ज्याला राजा होऊन फक्त या जगातलं रक्त आणि संपत्ती मिळवायची आहे तो राजा नाही, तो तर या जगाचा दास! हजारो दुर्दैवी जीवांच्या अश्रूंनी त्याला सतत अभिषेक होत राहील, जगातलं कुठलंही राजछत्र त्याला या अभिशापाच्या धारेपासून वाचवू शकत नाही. राजभवनात बसून तिन्हीत्रिकाळ चविष्ट भोजनाचा तो आस्वाद घेईल त्यात कितीतरी लोकांची भूक दडली असेल, तो सोन्याचे अलंकार घालून मिरवेल त्यासाठी कितीतरी अनाथांच दारिद्र्य उगाळलं जाईल, त्याच्या उंची राजवस्त्रांमध्ये कितीतरी लोकांचे मळके, फाटके कपडे असतील. राजाचा वध करून राजा नाही होता येत नक्षत्र, सर्वांची मनं जिंकून राजा व्हायचं असतं."

गोविंद माणिकय शांत झाले. संपूर्ण चराचर जणू त्यांच्याबरोबर स्तब्ध झालं. नक्षत्रराय मान खाली घालून उभा राहिला.

महाराजांनी म्यानातून तलवार काढली, नक्षत्ररायच्या समोर धरून म्हणाले,

"नक्षत्र, इथे एकही माणूस नाही, कुणीही नाही साक्षीला, भावाला जर भावाच्या छातीवर तलवार चालवायची असेल तर त्यासाठी याहून योग्य जागा नाही, योग्य वेळ नाही. कुणी अडवणार नाही तुला इथे, तुझी कुणी निंदा करणार नाही. आपल्या दोघांच्याही धमन्यामध्ये एकच रक्त वाहतंय, एकाच वडिलांचं, तेच रक्त तुला सांडायच आहे ना? अवश्य सांड. पण जिथं लोक रहातात, मनुष्यवस्ती आहे अशा ठिकाणी नको. जिथं हे रक्त पडेल तिथे अदृश्यरूपात भावाभावातलं प्रेमाचं बंधन सैल होईल. कुणास ठाऊक पापाचा शेवट कसा होईल. एक पापाचा वृक्ष लावला तर बघता बघता त्याचे हजारो वृक्ष होतील. मानवी अस्तित्वाच्या खुणा नाहीशा होतील, या देशाचं जंगल होईल. नगरात जिथं निःशंक मनाने भाऊ भाऊ आनंदात रहातात त्या भावांच्या घरात हे रक्त सांडू नकोस. म्हणूनच आज मी तुला जंगलात घेऊन आलोय."

राजाने तलवार नक्षत्ररायच्या हातात दिली, ती त्याच्या हातातून गळून खाली पडली. दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून नक्षत्रराय स्फुंदु लागला. रडवेल्या आवाजात तो म्हणाला, "माझा काही दोष नाही दादा, माझ्या मनात असले विचार कधीच नाही आले.."

त्याला मिठीत घेऊन शांत करीत महाराज म्हणाले, "हे काय मला माहीत नाही असं वाटलं का तुला? तू मला कधीच इजा करू शकणार नाही, काही लोकांनी तुला चुकीचा सल्ला दिलाय."

नक्षत्रराय म्हणाला, "मला फक्त रघुपतीने असा सल्ला दिला आहे."

महाराज म्हणाले, "रघुपतीपासून दूर रहात जा."

नक्षत्रराय म्हणाला, "सांग कुठे जाऊ? मला नाही रहायचं इथे.. इथून .. रघुपतीपासून खूप दूर जायचंय मला.."

राजा म्हणाले,"तू माझ्याजवळच रहा, अजून कुठेही जायची गरज नाही, काय करेल रघुपती?"

नक्षत्ररायने राजाचा हात घट्ट धरून ठेवला, रघुपतीने आपल्याला महाराजांपासून ओढून नेलं तर अशी शंका त्याच्या मनात आली.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

प्रत्येक भागापासून अनुवाद आणखीनच रसाळ होत चालला आहे. पुभाप्र.

प्रचेतस's picture

31 May 2018 - 9:29 pm | प्रचेतस

अगदी हेच म्हणतो.
ओघवता अनुवाद.

यशोधरा's picture

31 May 2018 - 11:11 am | यशोधरा

कथानाकातील कुतूहल वाढतच चाललेय.

टवाळ कार्टा's picture

31 May 2018 - 11:31 am | टवाळ कार्टा

पुभाप्र

सस्नेह's picture

31 May 2018 - 12:28 pm | सस्नेह

आता कथानकात रंग भरू लागला आहे.
पुभाप्र.

राजाभाउ's picture

31 May 2018 - 2:02 pm | राजाभाउ

अनुवाद आहे असे वाटतच नाही इतका सहज सुंदर आहे. पुभाप्र.

अभ्या..'s picture

31 May 2018 - 5:00 pm | अभ्या..

सुरेख.
मस्त इंप्रुव्ह होत चाललाय अनुवाद. प्रत्येक भागागणिक उत्सुकता आणि समाधान वाढत चाललेय.
जियो रारा.

पद्मावति's picture

31 May 2018 - 6:36 pm | पद्मावति

अप्रतिम रंगतेय कथा. खास रारा रंग बहरत चाललाय.

अस्वस्थामा's picture

1 Jun 2018 - 6:35 pm | अस्वस्थामा

अनुवाद खासच जमलाय आणि कथापण पकड घेतेय आता.
पण.. टागोरांच्या बहुतेक कथा का कोण जाणे खूपच बाळबोध आणि काळ्या पांढर्‍या रंगात पात्रे रंगवणार्‍या वाटल्या आहेत. साने गुरुजींच्या काही काही गोष्टींसारख्या. त्या खूपच कृत्रिम वाटायला लागतात आता तर. असो..
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.. :)