लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.
गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.