सारखं छातीत दुखतंय
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
बऱ्याच बायकांना सारखं ‘छातीत’, म्हणजे स्तनाच्या गाठीत, दुखत असतं. बरं दुखतंय म्हटलं आणि विशेषतः छातीत दुखतंय म्हटलं की बहुतेक बायकांना एकच आजार आठवतो, कॅन्सर!! मग त्या सैरभैर होतात. कुठेही खुट्ट वाजलं की छातीत धस्स होण्याची सवय असतेच काहींना. महत्वाचा मुद्दा एवढाच की, दुखणारी गाठ सहसा (९५% वेळा) कॅन्सरची नसते कारण कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही!!
अशाच एक बाई रात्रभर नवऱ्याला त्रास द्यायच्या. बाहेर काही वाजलं, कुत्रं जरा भुंकलं, वाऱ्यानी पत्रा जरी वाजला, तरी त्यांचं आपलं एकच टुमणं; ‘अहो ऐकलंत का, बाहेर काहीतरी आवाज येतोय. जाऊन बघा बरं.