रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू,
गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू.
उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही
कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू.
जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही,
कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू.
दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही,
आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू.
नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही,
कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.