जडण घडण - २८ - सप्रेम द्या निरोप...
शेवटचा किंवा अंतिम भाग असा उल्लेख टाळतेय, कारण एक व्यक्ती म्हणून माझी जडण -घडण सुरूच राहणार आहे. खरं तर हे मी लिहू लागले ते नवऱ्याच्या आग्रहामुळे. त्याला वाचायला अजिबात आवडत नाही. पण माझा हात लिहिता राहावा, असं मनापासून वाटतं. या निमित्ताने मी लिहू लागले आणि प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक भाग त्यानेही आवर्जून वाचला. क्वचित कधीतरी, हे मला नव्हतं माहीत... असंही सांगितलं...
या प्रवासात मिपाचं व्यासपीठ आणि मिपाकरांची साथ लाभणं, हे माझं सुदैव. संस्थळावर अशा प्रकारे व्यक्त होण्याची माझी पहिलीच वेळ. सुरूवातीच्या काही भागांनंतर आपण फारच निरस लिहितोय का, वाचणाऱ्यांचा वेळ वाया घालवतोय का, असंही वाटून गेलं. पण हात लिहिता राहू द्यात, असा दिलासा मिपाकरांनी दिला आणि ते मान्य करून मी लिहित राहिले.
आभार नाही मानायचे... हे ऋण जपू द्यात...
------------------------------------------------------------------------------------
कॉर्पोरेट कंपनीतला हा अनुभवही लक्षणीय. मी रूजू झाले तेव्हा मोजके पंधरा - वीस चेहरे असणाऱ्या कंपनीची या कार्यालयातली कर्मचारी संख्या चार वर्षात दोनशेच्या वर पोहोचलीय. क्लायंट लोकेशनवर काम करणारे वेगळे. दोन्ही भाषांमधल्या कंटेट चं काम करणारी मी एकटी, त्यामुळे जवळपास प्रत्येकाशी वैयक्तिक ओळख होत गेली. दरम्यानच्या काळात वेळोवेळी सहकारी बदलले, इतर विभागांमधले अधिकारी बदलले. प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांचं कामकाज जवळून पाहता आलं.
माझा मुख्य संपर्क सीओओं बरोबर. हे पंजाबी गृहस्थ साधारण 50-55 वर्षं वयाचे. समोरच्याला आश्वस्त करून टाकणाऱ्या मोजक्या लोकांत मी यांचा समावेश करेन. माझ्या कामाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली, जबाबदाऱ्याही वाढत गेल्या पण त्याबद्दल कधी चुकूनही कुरकूर नाही झाली, त्याचं मुख्य कारण हे सर होते. निवृत्ती जवळ आलेली, पण या वयातसुद्धा हा नवा संयुक्त उपक्रम मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांच्या अनुभवी खांद्यांनी समर्थपणे पेलली. समोरच्यावर किती विश्वास टाकायचा, डोक्यावर बर्फाची लादी ठेवून कसं बोलायचं हे यांचं वागणं बघून शिकता आलं. वडीलधारे होते, त्यामुळे काही प्रसंगी शुभेच्छा देताना त्यांचे आशिर्वाद घेतले जायचे. ते मात्र चटकन उभे राहात थांबवायचे... क्यू मुझे पाप का भागी बना रही है... हम बेटियों से पैर नही छुआते...
सोबत काम करणाऱ्या तरूणाईची मैत्रीही लोभस. निखळ मैत्रीचं सुरूवातीचं वातावरण काही काळाने बदलत गेलं. पण नात्यातला तो ओलावा अजून मनात उरलाय..
सुरूवातीपासून आमच्यासोबत असणारे एक प्रशासकीय अधिकारीही चांगलेच लक्षात राहिले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार. पण आय ए एस या तीन अक्षरांबरोबर अरेरावीही हातात हात घालून येत असावी. आपल्या हाताखालची मंडळी, भेटायला येणारे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, अगदी आमच्या कंपनीचे सी ओ ओ, सगळ्यांशी बोलताना मस्करीच्या थाटात अपमानकारक शाब्दिक चिमटे काढत बोलायची सवय होती त्यांना. सुरूवातीला मी सुचवलेल्या मराठी शब्दांवर त्यांनी बरेचदा आक्षेप घेतला. एखाद्या शब्दावर ते अडकले की मी माझी बाजू मांडायचे आणि शांत राहायचे. मला हे असं म्हणायचं आहे. निर्णय तुमचा.. अशा भूमिकेत असायचे मी.
एकदा काही शब्दांवर गाडी अडली. आगकाडी हा मराठी शब्द नाही, मराठी माणसाला कळणार नाही, असं त्यांचं मत होतं. तर, आपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसाचा विचार केला तर बहुतेकांना हा शब्द समजेल, असं मला वाटत होतं. पासवर्ड साठी परवलीचा शब्द त्यांना संस्कृत वाटत होता. एकातून एक शब्दांचा पसारा वाढत गेला आणि मग आमच्या क्षेत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द प्रमाणित करायचं त्यांनी ठरवलं. अशा शब्दांच्या विभागवार याद्या मी तयार केल्या. त्यानंतर मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आणखी दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अशा सर्वांबरोबर दोन दिवस चर्चा झाली. ही चर्चा चांगलीच मनोरंजक ठरली. शासकीय विभागांचे प्रतिनिधी एकेका शब्दाचा व्युत्पत्तीसह कीस पाडत होते तर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधले प्रतिनिधी ट्रान्सलिटरेशनवर भर देत होते. काही वेळा टोकाचे वादही झाले. मग बहुतेक मराठी प्रतिशब्द संमत झाले आणि काही तांत्रिक शब्द तसेच वापरायचे, असं ठरलं. त्यानंतर पुन्हा ती यादी घेऊन या अधिकाऱ्याने मला समोर बसवलं. अक्षरश: एक एक शब्द आणि प्रतिशब्द वाचून, वेळप्रसंगी त्यात बदल करून त्या यादीला अंतिम स्वरूप मिळालं.
एका अमराठी अधिकाऱ्याची ही आस्था बघून बरं वाटलं. पण त्या यादीत अनेक शब्द त्यांनी तसेच राहू दिले, ते खटकलं सुद्धा. अशा वेळी Boss is always right हे शब्द आठवायचे. मनस्ताप कमी होतो, हा स्वानुभव.
पण तरीही, इथे काम करणं आवडत गेलं. एकतर आवडीचं प्रसारमाध्यमातलं काम महिन्यातले मोजके दिवस करता येत होतं. त्याच बरोबरीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक गोष्टीही शिकता आल्या. सोबत काम करणाऱ्या तरूणाईमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सचा भरणा जास्त. त्यांची इंजिनिअरींग शिकतानाची भाषा आणि त्यांच्या पिढीची एकंदर बोलीभाषा, शासकीय विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काम करताना त्यांना येणारे अनुभव आणि रोजच्या भेटीतून, सोबत काम करताना सगळ्यांचं हळूहळू तयार होत गेलेलं मैत्रिपूर्ण नातं. हे सारंच खूप हवंहवंसं...
चार वर्षं होतील आता मला इथे. रूळले आहे, पण पुन्हा काही नवं जाणून घ्यावं, करून बघावं, अशी उर्मी मनात दाटतेय...
लहानपणी आपल्याला मोठी माणसं विचारतात, तुला मोठेपणी कोण व्हायचंय... आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना पाहून आपल्याला शिक्षक व्हायचं असतं, अक्षर ओळख झाल्यावर, वाचनाचं वेड लागल्यावर आपल्यालाही असं लिहिता यायला हवं, असं वाटतं... आई-बाबा किंवा ताई-दादा, काका यांना ऐटित ऑफीसला जाताना बघून आपल्यालाही मोठेपणी "जॉब " करायचा असतो, कधी डॉक्टर व्हायचं असतं, कधी इंजिनियर, कधी पत्रकार तर कधी ॲक्टरसुद्धा.
माझ्या सुदैवाने मला फारसं काही न ठरवताही बरंच काही करून बघता आलं. अत्यल्प काळासाठी मार्केटिंग, मग शिक्षकी पेशा, लेखन, भाषांतर, वार्तांकन, निवेदन अशी वेगवेगळी क्षेत्रं जवळून पाहता आली. खूप काही शिकता आलं, खूप माणसं जोडता आली.
हा प्रवास असाच पुढे सुरू राहणार आहे. पण आता पुढच्या क्षेत्रात लेखणी नको, काहीतरी पूर्ण वेगळं समोर यावं, असं वाटतं. बोटांना मातीची ओढ लागलीय बहुतेक...
आपण ठरवू तसंच होईल, याची खात्री नाहीच. मग नव्याने काय समोर येईल, याची उत्सुकता आहे. सध्या नवरा आणि दोन्ही लेकींच्या सोबत रोजचं जगणंही हवंहवंसं वाटतंय...
या वळणावर अभिलाषा नावाच्या एका विस्मरणात गेलेल्या मालिकेच्या लक्षात राहिलेल्या शीर्षक गीताच्या ओळी आठवताहेत... हवे हवे ची हाव सरेना किती हिंडशी गावे...
सुदैवाने ही हव्यासाची हाव नाही मनात. आता शांत निवांत जगायचंय. मान्य, वय फार नाही झालेलं. पण निवांत जगण्यासाठी फार वय झालेलं असावं, ही अट कशासाठी... तोपर्यंत आपण जगणार हे आपलं आपणंच गृहित धरायचं? त्यापेक्षा कशाच्याही मागे न धावता आला क्षण मनापासून जगता यायला हवा. जबाबदाऱ्या पूर्ण करायच्याच आहेत. पण कुठे थांबायचं, हे मनाने सांगताक्षणी तिथे थांबता यायला हवं...
सध्या कार्यालयातून परतीचा प्रवास सुरू झाला की माझी रोजची बस मला हायवेपर्यंत सोडते. तिथून पंधरा मिनिटं चालत घरी पोहोचता येतं. मधली वाट एका मोठ्ठ्या मैदानाशेजारून जाते. मैदान गजबजलेलं असतं मुलांनी. पावसात तिथे पाणी साचतं. कडेला आणि मध्ये मध्ये हिरवाई उमलते. मैदानाशेजारची वाट अशी सुखाची.
त्या दिवशी नुकताच पाऊस पडून गेला होता. श्रावणसर... मुलांच्या पळापळीने मैदानात मस्त चिखल तयार झालेला. लहान मुलं आणि क्वचित त्यांच्या सोबत आई-बाबाही मूल होऊन चिखलात मस्ती करत होते. लांबवर झोपाळा दिसला आणि मन लहान झालं चटकन. सात आठ वर्षाची मी दिसू लागले मलाच. आईने शिवलेला फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या दोन वेण्या, त्यावर आईनेच करून दिलेला अबोलीचा गजरा माळून आपल्याच नादात झोपाळ्यावर बसलेली, उंच उंच झोके घेत आपल्याच नादात गुणगुणणारी...
कुठूनतरी रात्री उशीरा घरी परतताना बसमध्येच झोपल्याचं सोंग घेणारी आणि बाबांनी उचलून घेतल्यानंतर किती वाट उरलीय, हे बघण्यासाठी मध्येच डोळे किलकिले करून बघणारी...
वाचनाचं वेड लागल्यानंतर तासन तास वाचनालयात, मग घरात ठिकठिकाणी पुस्तकात मान खुपसून बसलेली. पुस्तकांच्याच भिंती असलेलं घर हवं. तिथे टेबल-खुर्चीवर बसून, सोफ्यावर लोळत, झोपाळ्यावर झुलत, अंगणातून घरात शिरतानाच्या पायऱ्यांवर बसून आवडती पुस्तकं वाचायला मिळायला हवीत, असं स्वप्नं बघणारी...
हे असं इतकं नि:शंक होऊन जगायचंय...
माझी आई तिसऱ्या इयत्तेत असताना तिची आई देवाघरी गेली. आजोबांनी पुन्हा लग्न केलं नाही. या तीन बहिणी. मोठ्या दोघींची लग्न झाल्यानंतर आईचं शिक्षण नवव्या इयत्तेतंच थांबलेलं. घरचा पसारा मोठा. तो सावरता सावरता लग्न ठरून गेलं आणि मग तिचंही जगणं वेगाने पुढे झेपावत राहिलं. लवकरच आजोबांनाही देवाज्ञा झाली. मग वर्ष- दोन वर्षातून कधीतरी माहेरी जायचं. देवाला जायचं आणि परत यायचं, इतकंच माहेर लाभलं तिला. आम्हा मुलांच्या जन्मानंतरही हक्काचं माहेरपण नाहीच लाभलं... ते माहेरपण द्यायचंय आईला...
आधी मोठा मुलगा, मोठा भाऊ म्हणून आणि नंतर नवरा, बाबा म्हणून आपल्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडणाऱ्या बाबांना आमचं सुख बघून वाटणारं समाधान द्यायचंय...
भावंडांसोबत पुन्हा एकदा तितक्याच निरागसतेने गप्पा मारायच्यात... बहाव्याच्या का कसल्या काळपट चिक्कट शेंगा ठेचून त्यांचे बॉल बनवून ते आईच्या नकळत लपवून ठेवून, मग ते एकमेकांवर मारून बघायचेत... रंगपंचमीच्या दिवशी ओळखण्याच्या पलीकडे गेलेले चेहरे घेऊन घरी यायचंय, आई कडून नारळाची सोडणं रॉकेलमध्ये बुडवून खसाखसा घासून तो रंग काढून घ्यायचाय, दुसऱ्या दिवशी हुळहुळत्या चेहऱ्याचा उरलेला रंग वर्ग मित्र-मैत्रिणींना दाखवायचाय... रात्री आठ वाजताच जेऊन आई-बाबांसोबत हिरवळीवर फिरायला जायचंय... त्यांच्या गप्पा रंगलेल्या असताना हिरवळीवर लोळत पुन्हा एकदा आभाळभर विखुरलेल्या चांदण्यांमध्ये हरवून जायचंय...
कुठल्याही वळणावर निवांतपण न लाभलेल्या नवऱ्यासोबत काही मोजके क्षण नाही, तर उरलेलं सर्व आयुष्य निवांत जगायचंय...
हे सगळं होईल... नक्की होईल... प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, सुरू राहतील.. आजवरच्या प्रवासात जडण-घडण होत राहिलीय, यापुढेही होत राहील... शुभेच्छा असू द्यात...
-------------------------------------------------------------------------
जडण-घडण च्या 25 व्या भागाच्या प्रतिसाद देताना बहुगुणी यांनी म्हटलं होतं...
एकंदरीत प्रवास वाचून या टप्प्यावर काहीसं असं वाटलं असेल ना?
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुम्किन, उसे इक खूबसूरत मोड देकर, छोडना अच्छा!
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...
खरं तर या प्रवासात अनेकदा अनेक ओळी मनात उमटल्या. पण का कुणास ठाऊक, त्यांचा लिखाणात समावेश करावा, असं नाही वाटलं.. अशाच आवडलेल्या ओळी इथे देतेय.. संदर्भ नाही देत... आपल्या आवडीनुसार तो लागत जावा...
अभी अभी कुछ गुजरा है, लापरवाह, धूल में दौडता हुआ... जरा पलट कर देखू तो, बचपन था शायद.. ------------------------------------------------------------------
बचपन में जब चाहा हंस लेते थे, जब चाहा रो सकते थे.. अब मुस्कान को तमीज चाहिए, अश्कों को तनहाई...
------------------------------------------------------------
कुछ लोगों को लगता है उनकी चालाकिया मुझे समझ नही आती और मै बडी खामोशी से देखती हूं उनको अपनी नजरों से गिरते हुए
----------------------------------------------------------------------------------
किसी ने धूल क्या झोंकी आँखो में पहले से बेहतर दिखने लगा...
----------------------------------------------------------------------------------
अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो
----------------------------------------------------------------------------------
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
----------------------------------------------------------------------------------
उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी
एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी
मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहीं
----------------------------------------------------------------------------------
ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद
----------------------------------------------------------------------------------
मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो
थबकलो... जरासा - क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडुनी धागे
क्षण वळुन पाहिले... तुझा उंबरा मागे
----------------------------------------------------------------------------------
जिंदगी में ये हुनर भी आजमाना चाहिये.. अपनो से अगर हो जंग तो हार जाना चाहिये
----------------------------------------------------------------------------------
अपुल्या हाती नसते काही हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे
कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे...
----------------------------------------------------------------------------------
जडण घडण
१ , २ , ३ , ४ , ५ , ६ , ७ , ८, ९ , १० , ११ , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १९ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २५, 26, 27
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक अतिशय सुंदर चाललेली मालिका
हा कळसाध्याय ही
सुंदर लेखमाला
खूपच सुंदर मालिका. संपूच नये
संपूर्ण लेखमालिका येईल तशी
असेच म्हणतो
असेच म्हणतो
All good things must end?
... ते माहेरपण द्यायचंय आईला...क्या बात है! वाचतांना घशात आवंढा अडकला... एक अप्रतिम मन-उधळण या टप्प्यावर येऊन थबकली असेल, पण all good things must end? मी तर म्हणेन all good things must extend! तुमच्या प्रदीर्घ तरीही सहज-सुंदर, मनमोकळ्या मुक्तकाने किती मनांमध्ये पालवी फुलवली आहे याचा तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण त्या सर्व वाचकांच्या सदिच्छा तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्ती होईपर्यंत साथ देतील. तुमच्या लिखाणाबद्दल तुमचे आणि तुम्हाला उद्युक्त करणाऱ्या तुमच्या पतिराजांचेही मनापासून आभार!हेच!
पूर्णपणे सहमत!
सुरेख अन प्रांजळ निवेदन.
चांगलं लिहित होतात.
लेखमाला आवडली....
सुंदर लिहीलेत,
खुप छान लेखन्शैली आहे तुमची.
खूप सुंदर मालिका बंद होणार
मधुरी ताई....
खूप छान!
अतिशय सुंदर मालिका. आपले
खुपच सुरेख लेखमाला.कधीतरी शेवट होणारच होता, पण
उर्दू-मराठी काव्यपंक्ती
समीरसूर
उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहींसलाम..
लेखमाला संपली असली तरी मिपावर
सर्वच प्रतिसाद खास आहेत...
अत्यंत प्रांजळ आणि मनस्वी कथन
+१
अभिनॆदन. छान लेखमाला. एका
शेवटी क्रमशः असलेले लिखाण मी
छान लेखमाला
ही सगळी लेखमालिका मी वाचलीये.
खूप सुरेख
सगळी नसली तरी बर्यापैकी
धन्यवाद मंडळी...
धन्यवाद मंडळी...
फार सुरेख झाली लेखमाला
सुरेख लेखमाला
अभिनिवेश नसलेलं निर्मळ आणि उत्कट लिखाण