जडण घडण - २७

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
26 Aug 2015 - 4:15 pm

नवं काम आवडू लागलं, त्यातही रूळले. या सगळ्या प्रवासात नोकरी देऊ करणाऱ्या कंपन्यांकडूनही वरचेवर कॉल यायचे. प्रामुख्याने कॉपी रायटिंग किंवा कंटेंट रायटिंगसाठी. पण बराच काळ फ्री लान्सींग सुरू होतं. वेगवेगळ्या क्षेत्रात, मनासारखं आणि वेळेच्या सोयीनुसार काम करता येत होतं, त्यामुळे पूर्णवेळ नोकरी करण्याकडे फारसा कल नव्हता. मुलाखतींसाठी गेले काही ठिकाणी, पण ते फारसं काही रूचलं नाही.

एकदा एका चांगल्या ॲड एजन्सीमध्ये कामाला सुरूवात केली. पहिल्या दोन दिवसातच भयंकर कंटाळले. मी वेळेत पोहोचायचे. काम फारसं नसायचं. क्रिएटिव्ह टीम निवांत यायची. दिवसभराचं जे काय असेल ते काम आटपून मी वेळेत जायला निघायचे, त्या वेळी इतर सगळे कामात प्रचंड व्यस्त असल्यासारखे दिसायचे. पण फक्त दिसायचे, प्रत्यक्षात असायचे नाहीतच. काम करत असल्याचा निव्वळ आभास. त्या मंडळींच्या बोलण्यामध्ये विद्वत्तेचा आव असला तरी मला ते सगळं गमतीदार आणि तरीही भंपक वाटू लागलं. ॲड एजन्सीचं काम कदाचित असंच चालत असावं. कोणत्याही किरकोळ गोष्टीचा विद्वत्तापूर्ण कीस काढत बसायचं आणि मग वैचारिक, बौद्धिक थकवा आल्याचं सांगत मूड फ्रेश करण्यासाठी बाहेर गावी टूरसाठी जायचं, मस्त भटकून यायचं, अशी तिथल्या मंडळींची एकंदर विचारसरणी. मालक सिंधी असावेत बहुतेक. अधिकांश जाहिराती शासनाच्या आणि ते शक्यतो जास्तीत जास्त जाहिराती पदरात पाडून घ्यायच्या कामात गुंतलेले. ऑफीसकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष. माणसं नेमलीत ना, ती करतील काम, असा खाक्या. ते वातावरण माझ्या काही पचनी पडेना.

तिसऱ्या दिवशी लंच च्या वेळेतच तिथल्या एच आरला जाऊन भेटले आणि यापुढे कंटिन्यू करता येणार नाही, असं सांगितलं. तिने अर्थात कारण विचारलं. ॲड एजन्सीचं कल्चर बहुतेक मला झेपणारं नाही, मला इथे फारच तिऱ्हाइतासारखं वाटतंय, त्यामुळे काम करावसं वाटत नाही, असं बोलण्याच्या ओघात तिला सांगितलं. माझ्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठी असावी ती. माझं बोलणं ऐकून घेतलं, हसली. मग म्हणाली, तू कसलाही त्रास करून घेतला नाहीस, तर हा जॉब तसा सुखाचा आहे. कंफर्टेबल आहे. मी म्हटलं, कदाचित या कंफर्टचाच त्रास होत असेल मला. आला दिवस, गेला दिवस इतकं सरधोपट काम आणि ते ही फारसं न करता उत्तम मोबदला देणारी ती नोकरी मला अगदीच निरस आणि त्याचमुळे त्रासदायक वाटू लागली होती. मी तिथे रूळू शकणार नाही, हे त्या एच आर च्या लक्षात आलं. भावी आयुष्यासाठी तिच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि बाहेर पडले तिथून.

मग पुन्हा मागच्या पानावरून पुढे. दिवस असेच सरकत होते आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या कंटेंट रायटरच्या नोकरीसंदर्भातला फोन. त्यांना शासकीय भाषेची माहिती असणारी व्यक्ती हवी होती. तिथल्या एच. आर. ने दोन-तीन वेळा फोन केला. किमान एकदा मुलाखतीला या. आम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तीची खरोखरच गरज आहे, हे वारंवार सांगितलं. मग म्हटलं, जाऊन पाहू या. ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली कॉर्पोरेट कंपनी. शासकीय विभागांशी संबंधित कामं करण्यात आघाडीवर. तिथले मुख्य अधिकारी अर्थात सीओओ हे पंजाबी गृहस्थ. त्यांच्या क्षेत्रातला भरपूर अनुभव त्यांना होता, मात्र शासकीय मराठीतला पत्रव्यवहार किंवा बैठकींचे इतिवृत्त अर्थात Minutes of meetings अशा गोष्टींचा त्यांनी चांगलाच धसका घेतला होता. जुजबी मुलाखतीनंतर त्यांनी शासकीय मराठी भाषेतलं एक पत्र माझ्या हाती इंग्रजी अनुवादासाठी सोपवलं. ते एकदा वाचून घेतलं, अनुवाद करून दिला. तो तिथल्या एका मराठी अधिकाऱ्याने पाहिला आणि ते स्वत:च उठून मुलाखत कक्षात आले. त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणं झालं. त्यांनी मी सध्या करत असलेल्या कामाचं स्वरूप विचारून घेतलं. त्यांना पूर्णवेळ काम करणारी व्यक्ती हवी होती आणि शासकीय प्रसारमाध्यमात सुरू असलेलं काम सोडायची माझी फारशी इच्छा नव्हती. मग या ठिकाणी आठवड्यातले काही दिवस किंवा अर्धवेळ काम करता येईल का, असं त्यांनी विचारलं. अर्धवेळ नाही, पण आठवड्यातले काही दिवस काम करता येईल, असं मी स्पष्ट केलं. मग मुख्य अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला कळवतो, असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं. मी तिथून निघाले.

मग अंतिम मुलाखतीसाठी बोलावणं आलं आणि मी पुन्हा त्या कंपनीत पोहोचले. आधी एच आर आणि नंतर सीओओ अशा दोघांशीही बोलणं झालं. मी सीओओं साठी स्वीय सहायक म्हणून काम पाहावं, असा एच आर चा आग्रह होता, पण मी सुरूवातीपासून कंटेट रायटर किंवा तत्सम कामाच्या दृष्टिकोनातून विचार करत होते, त्यामुळे त्याच कामाला माझं प्राधान्य राहिल, हे स्पष्ट केलं. सीओओं बरोबर बोलतानाही पुन्हा हा मुद्दा चर्चेला आला, पण त्यांनी फार ताणून धरलं नाही. मी तिथे पूर्ण वेळ काम करावं, असा आग्रह मात्र त्यांनी धरला. मला खूप काळ पूर्ण वेळ नोकरीची सवय नाही, शासकीय प्रसारमाध्यमातलं काम सोडायचं नाही, कार्यालयीन वेळ पाळणं मला शक्य होणार नाही, अशा सर्व बाबी सांगून झाल्या. त्यावर, तुम्हाला वेळेच्या काटेकोर बंधनात आम्ही अडकवणार नाही, इथल्या कामात आडकाठी येणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आवडतं काम सुरू ठेवलंत तर आमचा आक्षेप नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. क्षणभर विचार केला. मग म्हटलं, मी काही काळ काम करून बघते. रूळले तर ठीक. पण रूळता आलं नाही तर पूर्ण वेळ नोकरीचा पर्याय मला स्वीकारता येणार नाही.

आप काम शुरू तो कर लो, बाकी बाद में देखा जाएगा... आप बस जल्दी से जॉइन कर लो, असं त्या सरांनी हसतमुखाने, आग्रहपूर्वक सांगितलं. मग एचआर कडे वळत, आता यांच्या फॉर्मॅलिटीज लवकरात लवकर पूर्ण करा, अशी सूचनाही केली.

तिथून बाहेर पडल्यानंतर एचआर सोबत पुन्हा चर्चा. आम्ही ऑफर लेटर मेल करतो, ते वाचा आणि टाईमफ्रेम लक्षात घेत जॉइन व्हा. कामाच्या पहिल्या दिवशी लेटर ऑफ अपॉइंटमेंट दिलं जाईल, असं एच आर ने सांगितलं. त्यावर ठीक आहे, म्हणून मी निघाले.

नवऱ्याच्या कानावर हे सगळं घातलं. मोठी बहिण आणि लहान भावालाही सांगितलं. ऑफीस जॉब आणि कॉर्पोरेट क्षेत्र, दोन्हीचा अनुभव नव्हता मला. त्यामुळे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या या तिघांची मतं विचारून घेतली. तुझ्या आवडत्या क्षेत्रात काम करत राहता येणार असेल तर ऑफर लेटर आल्यानंतर काय तो निर्णय घे, असं नवऱ्याने सुचवलं. बहिण स्वत: खूप वर्षं एच आर म्हणून कार्यरत तर भाऊ सुरूवातीपासून कॉर्पोरेट क्षेत्रातला, त्यामुळे मी स्वत: विचारतेय म्हटल्यावर दोघांनी बारीक सारीक तपशील विचारले, सांगितले. तू पी ए /स्वीय सहायक म्हणून काम केलंस तर ते सुद्धा चांगलं, असं सुचवलं. ऑफर लेटर नीट बघून घे, त्यात अमक्या गोष्टी लक्षात घे, जॉब करताना तुझ्या आवडत्या क्षेत्रातलं काम सुरू ठेवणार असशील तर तशी लेखी परवानगी त्यांच्याकडून घे, अशा सूचना केल्या. सगळ्या सूचना समजून घ्यायचा प्रयत्न करत असतानाच तिथल्या एच आरचा फोन. तुम्ही कधी जॉइन करताय, सरांनी दोन-तीन वेळा विचारलं.

तुमचा ऑफर लेटरचा मेल अजून आलेला नाही, असं त्यांना सांगितलं. त्यावर, तुम्ही रूजू व्हा, मग ऑफर लेटर देतोच आम्ही, असं उत्तर आलं समोरून. ऑफर लेटर आल्यानंतरच पुढे सरकायचं, असं ठरवलेलं, त्यामुळे त्याच मुद्द्यावर कायम राहत, आधी ऑफर लेटर पाठवा, असं सांगितलं.

पुन्हा नवऱ्याशी, भावंडांबरोबर बोलले. त्यांनीही लेटर मिळाल्याशिवाय पुढे जायचं नाही, असं सांगितलं. माझी कामं नियमित सुरू होती, त्यामुळे या बाबतीत घाईघाईने निर्णय घ्यायचा नाही, असं मी ठरवून टाकलं. मध्ये चार दिवस गेले आणि पुन्हा तिथल्या एच आर चा फोन. आधीच्याच संवादाची पुनरूक्ती. मग मी म्हटलं, माझं काम व्यवस्थित सुरू आहे. गेली खूप वर्षं मी हे काम करतेय. तुमच्याकडे पूर्णवेळ रूजू व्हायचं म्हटलं तर मला इथलं काम कमी करावं लागेल. सध्या माझं सगळं व्यवस्थित चाललंय. ही छान बसलेली घडी मोडून तुमच्याकडे रूजू व्हायचं तर मला किमान ऑफर लेटर लागेलंच. त्याशिवाय मी नाही येऊ शकणार...

पण आम्ही तुम्हाला लेटर देणार आहोतच. तुम्ही रूजू तर व्हा...

ऑफर लेटर आधी द्यायचं ठरलं होतं, त्यानुसार ते मेल करा. मी ते वाचून घेते आणि मग रूजू होते, असं पुन्हा शांतपणे सांगितलं त्यांना...

पुढच्या दोन दिवसात पुन्हा एच आर चा फोन. तुम्हाला ऑफर लेटर पाठवलंय आत्ता. चेक करता का... आणि कधीपासून येऊ शकाल...

मी म्हटलं, बरं, मी पाहते. या महिन्यातल्या माझ्या तारखा गेलेल्या आहेत. त्यामुळे तुमचं लेटर पाहिल्यानंतर पुढच्या महिन्यात रूजू होता येईल का, ते कळवते.

पण लेटर तर पाठवलं ना तुम्हाला, मग आता लगेच रूजू का नाही होता येणार.. एच आर चा प्रश्न..

हे बघा, मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे पुढच्या महिन्याच्या तारखा आदल्या महिन्यातच संपलेल्या असतात. दिलेल्या तारखा रद्द करणं, मला पटत नाही. थोडा वेळ द्या मला. मी लेटर वाचते, मग तुम्हाला कॉल करते...
ठीक आहे, असं काहीशा नाईलाजाने म्हणत तिने फोन ठेवला.

मग मी ते ऑफर लेटर वाचलं. मला त्यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही. नवरा आणि भावंडांनाही दाखवलं. हे ठीक आहे, पण नेमणुकीचं पत्र आणि यात तफावत नसेल, हे तपासून घे, असं त्यांनी सांगितलं.

मग त्या एच आर ला फोन केला आणि पुढच्या महिन्यात १ तारखेला रूजू होतेय, हे सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरचं मोठ्ठं हसू फोनवरच्या आवाजावरूनही जाणवलं मला.

आतापर्यंत काम सुरू होतं, तिथे या नव्या कामाची पूर्वकल्पना दिली आणि मग ठरल्याप्रमाणे १ तारखेला रुजू झाले. छान स्वागत झालं. भलंमोठ्ठं चकचकीत ऑफीस, बऱ्याच अत्याधुनिक सोयी सुविधा. मोजके दहा-पंधरा अनुभवी आणि समवयस्क चेहरे. तरूणाईचा लक्षणीय भरणा. एच आर ने सगळ्यांची ओळख करून दिली. नावं आणि चेहरे लक्षात ठेवण्यात माझा नेहमी घोळ होतो. त्यामुळे किमान एचआर च्या नावात आणि चेहऱ्यात घोळ होऊ द्यायचा नाही, याची काळजी घेत मी सगळ्यांना भेटले. मग बैठक व्यवस्था दाखवून, तुम्हाला आवडेल तिथे बसा, असं सांगितलं. एकंदर वातावरण मनापासून स्वागत करणारं आणि सोबत काम करणारी मंडळीही उत्साही वाटली. मी ही थोडीशी सैलावले.

माझा पहिलाच दिवस, त्यामुळे संगणक (सिस्टम) लागला नव्हता. त्या दिवशी अनुपस्थित असणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या जागी बसायची विनंती करत लवकरात लवकर तुमची सिस्टम लागेल, किमान संध्याकाळपर्यंत नक्कीच, असं एच आर ने सांगितलं. मी ही फार ताणून धरलं नाही. पण दुसऱ्या दिवसापर्यंत सिस्टमचा पत्ता नव्हता. मग त्या दिवशी अनुपस्थित असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जागी बसायची नव्याने विनंती. ठीक आहे, म्हटलं मी. तर तिसऱ्या दिवशीही पुन्हा तेच... आता मात्र मी काहीशी वैतागले. दिवसाचा पूर्वार्ध संपला आणि नंतर मी माझ्या नियोजित जागेवर येऊन बसले. काही वेळाने एच आर ची फेरी.

अरे, तुम्ही त्या सिस्टमवर बसू शकता आज... काय झालं...

हो. पण मला नाही बसायचं. यासाठी मी हातातलं चांगलं काम सोडून तुमच्याकडे आले का... मी संगणकावर काम करणं अपेक्षित आहे. मी इथे रुजू व्हावं, यासाठी गेले कित्येक दिवस पाठपुरावा केलात तुम्ही आणि एक सिस्टम लागायला इतका वेळ लागतो? बरं... लागत असेल. पण मी यापुढे इतर कोणाच्या सिस्टमवर नाही बसणार. जेव्हा इथे सिस्टम लागेल, तेव्हा कामाला सुरूवात होईल.

अरे मॅडम, एकदम रागावलात तुम्ही...

नाही रागावत. पण यासाठी मी हातातलं चांगलं काम सोडून आले नाही, हे नक्की..

माझं बोलणं ऐकून एच आर बाई निघून गेल्या आणि पुढच्या अर्ध्या तासात आंतरजालाच्या आणि इतर सर्व जोडण्यांसह सिस्टम लागली. एच आर ने पुन्हा येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि ठीक आहे, म्हणत मी ही कामाला सुरूवात केली.

लेटर ऑफ अपॉइंटमेंट रूजू व्हायच्या दिवशीच मिळणं अपेक्षित होतं, पण त्याचाही थोडा पाठपुरावा करावा लागलाच..
मग हळूहळू सगळ्यांशी ओळखी. कामाचं स्वरूप वेगळं असलं तरी आवाक्यातलं होतं. इथेही शिकायला वाव होता. नंतरच्या काळात वेगवेगळ्या विषयांची संकेतस्थळं, त्यांचा इंग्रजी आणि मराठी भाषेतला मजकूर, नव्या सॉफ्टवेअरची माहिती देणारी सादरीकरणं, शासकीय विभागांशी पत्रव्यवहार अशी कामाची व्याप्ती वाढत गेली.

रिपोर्टींग थेट सीओओंना, त्यामुळे बरचंसं सोपं होऊन गेलं. इथल्या कामाबरोबर महिन्यातले मोजके दिवस शासकीय प्रसारमाध्यमात काम सुरू राहिलं. ओढाताण झाली थोडी, पण कामात शक्यतो तक्रार येऊ द्यायची नाही, हे तत्व सांभाळण्याचा सतत प्रयत्न राहिल्यामुळे सगळीकडेच वरीष्ठांची उत्तम साथ लाभली.

इथे सोबत काम करणाऱ्या सगळ्यांशीच छान मैत्री झाली. हळूहळू बहुतेकजण विश्वासाने आवर्जून मनातलं बोलू लागले आणि त्यातल्या कोणालाही ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर मिळालं नसल्याचं समजत गेलं. साधारण पाच महिन्यानंतर आम्हा सगळ्यांना ही दोन्ही लेटर्स देण्यात आली. (मला दुसऱ्यांदा, पण नव्या स्वरूपात) मी वगळता तिथल्या कोणीही इथल्या नोकरीत रूजू होताना केवळ एका पानाच्या अपॉइंटमेंट लेटरशिवाय आणखी कशाचाही आग्रह धरला नव्हता, हे तेव्हा स्पष्टपणे समजलं. आश्चर्यही वाटलं. तसं बोलून दाखवल्यानंतर बहुतेकांनी, हे असंच चालतं असं मत व्यक्त केलं.
क्रमश:

जडण घडण , , , , , , , , , १० , ११ , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १९ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २५ , २६

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

पुढे काय घडले हे वाचण्यास उत्सुक.

असंका's picture

27 Aug 2015 - 11:56 am | असंका

काय गुंतवून ठेवलंयत हो आम्हाला!!

सुरेखच लिहिलंयत.....

धन्यवाद!

नीलमोहर's picture

27 Aug 2015 - 12:23 pm | नीलमोहर

छान मांडले आहेत आपले अनुभव तुम्ही.

संपूर्ण मालिका निव्वळ अप्रतिम!

माधुरी विनायक's picture

4 Sep 2015 - 3:35 pm | माधुरी विनायक

थोडा उशीरा देतेय प्रतिसाद. स्वॅप्स, कंफ्युज्ड अकौंटंट,नीलमोहर, समीरसूर आमि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार.

नाखु's picture

4 Sep 2015 - 3:57 pm | नाखु

याला (च) जीवन ऐसे नाव !!

पुभाप्र.

खूप दिवसांनी वाचतेय, त्यामुळे तीन भाग एकदम वाचले.
तुमचं हे लिखाण वाचताना एका विशिष्ट वेगाने, एका लयीत, सतत वर वर चढत जाणारा आलेख जाणवतो.
पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

5 Sep 2015 - 10:21 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

पैसा's picture

5 Sep 2015 - 4:37 pm | पैसा

खूप सुरेख लिहिताय!

माधुरी विनायक's picture

10 Sep 2015 - 12:32 pm | माधुरी विनायक

नाद खुळा, उमा @ मिपा, मुक्त विहारि, पैसा आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार...