ह्या आधीच्या मधुशालेच्या अनुवादात आणि ह्या भागात जास्त अंतर पडले आणि रसिकांना तिष्ठत रहावे लागले त्याबद्दल मी शरमिंदा आहे.
ह्यापुढील भाग नियमितपणे देऊन मी हा भावानुवादाचा यज्ञ पूर्ण करू शकेन अशी आशा आहे! असो. चला घेऊयात आस्वाद पुढल्या भागाचा.
--------------------------------------------------------
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८) - ह्याच भागात आधीच्या भागांचे दुवे दिलेले आहेत.
---------------------------------------------------------
निसर्गातली वेगवेगळी रुपके घेतघेत पुढे जात असतानाच अचानक वेगवेगेळ्या कलांमधूनही रुपकांची स्फूर्ती बच्चनजींना मिळावी ह्यात नवल ते काय?
वादक, राग-रागिण्या, वाद्ये त्याचबरोबर चित्रकार, चित्र, त्याचे रंग अशा रुपकांची खैरात पहिल्या दोन कडव्यातून करीत असतानाच तिसर्या कडव्यात ते पुन्हा निसर्गाकडे वळतात. बालकवी जसे आतूनच निसर्गप्रेमी होते तसेच काहीसे हे मला वाटते. हरिवंशराय सुद्धा त्यांच्या कल्पनेमधे निसर्गाशिवाय फार काळ दूर राहू शकत नाहीत. हिमाच्छादित पर्वतांना द्राक्षवेली संबोधताना ते पावन भारतभूमीला वंदन कधी करतात ते आपल्या लक्षातही येत नाही इतके सहज होऊन जाते!
आणि शेवटच्या पाचव्या कडव्यात तर ते ज्वलज्जहाल अशा क्रांतिपुत्रांची वर्णी लावून आपल्याला थक्क करुन टाकतात. मधुशालेच्या ह्या रुपकांचा विस्तार बघितला तर त्यांच्या प्रतिभेने अचंबित व्हायला होते!
(लागोपाठच्या कडव्यात एवढी टोकाची रुपके वापरणारी बच्चनांची प्रतिभा मला मिखाइल तालच्या बुध्दिबळातल्या प्रतिभेची आठवण करुन देते - सुरळित चाललेल्या लयबद्ध खेळात अचानक वजिराचे बलिदान देऊन पुढच्या काही खेळ्यात त्या डावाला अजरामर करुन टाकायचे! असेच काहीसे.)
वादक बन मधु का विक्रेता लाया सुर-सुमधुर-हाला,
रागिनियाँ बन साकी आई भरकर तारों का प्याला,
विक्रेता के संकेतों पर दौड़ लयों, आलापों में,
पान कराती श्रोतागण को, झंकृत वीणा मधुशाला।।४१।|
चित्रकार बन साकी आता लेकर तूली का प्याला,
जिसमें भरकर पान कराता वह बहु रस-रंगी हाला,
मन के चित्र जिसे पी-पीकर रंग-बिरंगे हो जाते,
चित्रपटी पर नाच रही है एक मनोहर मधुशाला।।४२।|
घन श्यामल अंगूर लता से खिंच खिंच यह आती हाला,
अरूण-कमल-कोमल कलियों की प्याली, फूलों का प्याला,
लोल हिलोरें साकी बन बन माणिक मधु से भर जातीं,
हंस मत्त होते पी पीकर मानसरोवर मधुशाला।।४३।|
हिम श्रेणी अंगूर लता-सी फैली, हिम जल है हाला,
चंचल नदियाँ साकी बनकर, भरकर लहरों का प्याला,
कोमल कूर-करों में अपने छलकाती निशिदिन चलतीं,
पीकर खेत खड़े लहराते, भारत पावन मधुशाला।।४४।|
वीर सुतों के हृदय रक्त की आज बना रक्तिम हाला,
वीर सुतों के वर शीशों का हाथों में लेकर प्याला,
अति उदार दानी साकी है आज बनी भारतमाता,
स्वतंत्रता है तृषित कालिका बलिवेदी है मधुशाला।।४५।|
-----------------------------------------------
भावानुवाद
वादक मधुविक्रेता देई मधुर सुरांच्या मदिरेला
बनुनी साकी रागिणि येती भरुनि तार्यांचा प्याला
विक्रेत्याच्या संकेतांवर धावत लय, आलापही ये
श्रोत्यांना स्वरपान करी मग झंकृत वीणा मधुशाला ||४१||
साकी बनुनी चित्रकार धरी करी कुंचला जणु प्याला
भरुनी देई त्यातुन मग तो बहु रस-रंगी मदिरेला
मदिरा पुन्हा पुन्हा ती घेता रंगुनि जाई चित्र मनी
चित्रामधुनी नाचे मग त्या एक मनोहर मधुशाला ||४२||
मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला
कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला,
बनुनी साकी झुळुका येती पुन्हा पुन्हा मधु घेऊन तो,
हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला ॥४३॥
हिम शिखरे जणू द्राक्षवेलही, हिमजल आहे जणु हाला,
अचपल सरिता बनुनी साकी, भरती लहरींचा प्याला,
करात कोमल घेऊन जाती हिंदोळत मग रातदिनी,
डोलत पिऊनी शेते वसती, भारत पावन मधुशाला ॥४४॥
शूरवीरांच्या रुधिराची त्या लालबुंद बनते हाला
मृत्युंजय त्या शूरशिरांचा घेऊन हाती जणू प्याला
दानशूर अन उदार साकी बनुनी मग भारतमाता
तृषित कालिका स्वतंत्रदेवी, अन बलिवेदी मधुशाला ||४५||
चतुरंग
प्रतिक्रिया
22 Aug 2008 - 12:40 am | नंदन
ब्याक!
(वाचून प्रतिक्रिया लिहितोच. त्याआधी वेलकम ब्याक लिहावेसे वाटले :))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Aug 2008 - 12:42 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या वातावरणात काहीतरी सुरेख , नवे , दर्जेदार मिळावे या सारखी दुसरी उत्तम गोष्ट नाही !
रंगरावांनी या आपल्या मालिकेला यज्ञाची उपमा दिली ती मोठी समर्पक आहे !
22 Aug 2008 - 12:50 am | नंदन
टिप्पणी, वर्णन, अनुवाद - सारेच आवडले. घन श्यामल चे मेघसावळ्या, रक्तिम रक्ताचे लालबुंद रुधिर हा खास मराठमोळा भावानुवादही मस्त. फक्त पहिल्या कडव्यातील शेवटच्या ओळीचा अनुवाद - श्रोत्यांना स्वरपान करविते, झंकृत वीणा मधुशाला - असे केले तर चालेल का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Aug 2008 - 1:08 am | चतुरंग
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
श्रोत्यांना स्वरपान करविते, झंकृत वीणा मधुशाला
हे नक्कीच चालेल.
पण मी 'करी मग' ह्या शब्दांमुळे अनायासे झालेला श्लेष तसाच ठेवला होता! (करी मग = मग हातात आणि करी मग = मग करीतसे ह्यानुसार)
चतुरंग
22 Aug 2008 - 1:04 am | धनंजय
देर है म्हणजे अंधेर नाही! ब्राव्हो! ब्राव्हो! ब्राव्हो!
४२, ४४, ४५ अप्रतिम जमल्या आहेत. ४५वी रुबाई या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कालानुरूपच आहे.
छिद्रान्वेष :
४१:
भरुनि तार्यांचा प्याला -
तारांचा प्याला, असे असावे. वीणेच्या तारा, तारे नव्हे.
हिंदीत विक्रेत्याच्या संकेतावर रागिण्या लयीत आणि आलापांत दौडत असाव्यात.
रागिनियाँ ... लयों आलापों में दौड़ ... श्रोतागणको पान कराती । असा वाक्याचा अन्वय असावा. पण धावणारे लय आणि आलाप अशी तुमची कल्पनाही काही वाईट नाही.
-
४३:
मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला
कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला,
बनुनी साकी झुळुका येती पुन्हा पुन्हा मधु घेऊन तो,
हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला ॥४३॥
मराठीतले रूपक समजले नाही :-(
हिंदीतले असे काही समजले.
द्राक्षवेल = गडद रंगांचे ढग
मदिरा = मानसरोवराचे पाणी
प्याला = अरुण=लाल रंगाची कमळे
साकी = मत्त झुळका ?लहरी
मतवाला = हंस
मधुशाला = मानसरोवर
-
४३ मध्ये "द्राक्षवेलींतून", ४५ मध्ये "शूरवीरांच्या" १-१ मात्रा अधिक झाली आहे.
22 Aug 2008 - 1:21 am | चतुरंग
नेहेमीप्रमाणेच चपखल!
तारांचा प्याला, असे असावे. वीणेच्या तारा, तारे नव्हे
येस, ही धडधडीत चूक आहे! अनुवाद करतांना अजिबात लक्षात आली नाही! धन्यवाद.
मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला
कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला,
बनुनी साकी झुळुका येती पुन्हा पुन्हा मधु घेऊन तो,
हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला ॥४३॥
मराठीतले रूपक समजले नाही
मी घेतलेला अर्थ असा -
द्राक्षवेल = गडद रंगांचे ढग
मदिरा = मानसरोवराचे पाणी
प्याला = लाल रंगाची अरुणप्रभा घेणारी फुले
साकी = मत्त झुळका, लहरी
मतवाला = हंस
मधुशाला = मानसरोवर
'प्याला' ची व्याख्या मी समजलो ती तुमच्यापेक्षा वेगळी आहे.
चतुरंग
22 Aug 2008 - 1:12 am | प्राजु
किती बरं वाटलं.. म्हणून सांगू चतुरंग तुम्हाला!!! खूप वाट पहायला लावलीत.
असो.. हा अनुवादही तितकाच सुंदर आणि तरल झाला आहे.
मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला
कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला,
काय कल्पना आहे.. खास!!
पण हिमश्रेणि... च्या जागी मेघ ठिक आहे का?? की, हिमरांगा किंवा हिमालय असे काहिसे??
शूरवीरांच्या रुधिराची त्या लालबुंद बनते हाला
मृत्युंजय त्या शूरशिरांचा घेऊन हाती जणू प्याला
दानशूर अन उदार साकी बनुनी मग भारतमाता
तृषित कालिका स्वतंत्रदेवी, अन बलिवेदी मधुशाला ||४५||
अत्युच्च!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Aug 2008 - 1:15 am | प्राजु
तुमचं बरोबर आहे... हिमशिखरे.. आणि मेघ सावळा..
वाचताना चूक झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Aug 2008 - 6:49 am | विसोबा खेचर
शूरवीरांच्या रुधिराची त्या लालबुंद बनते हाला
मृत्युंजय त्या शूरशिरांचा घेऊन हाती जणू प्याला
दानशूर अन उदार साकी बनुनी मग भारतमाता
तृषित कालिका स्वतंत्रदेवी, अन बलिवेदी मधुशाला ||४५||
वा! सुरेख...
'वेलकमब्यॅक' असे नंदनसारखेच म्हणतो....!
जियो चतुरंगा....!
(मधुशालाप्रेमी) तात्या.
22 Aug 2008 - 7:48 am | रामदास
लागले वाट बघणे.आज सकाळीच हंस मत्त झालो.
हा घाईत लिहीलेला प्रतिसाद आहे.
संध्याकाळी ऑन द रॉक्स हंस मत्त होऊन परत वाचतो.
22 Aug 2008 - 1:19 pm | स्वाती दिनेश
वाट पहायला लावलीत चतुरंग.. पण त्याचे सार्थक झाले.. अनुवादाचा हा भागही सरस झाला आहे.
स्वाती
22 Aug 2008 - 7:21 pm | सुमीत भातखंडे
उत्तम भावानुवाद.
सर्वच कडवी आवडली.
22 Aug 2008 - 8:05 pm | लिखाळ
फार उत्तम भाग ! आनंद झाला.
अवांतर : अचपल हा शब्द कसा काय बनला आहे?
रामदासांनी सुद्धा करुणाष्टकात 'अचपल मन माझे । नावरे आवरिता ॥ असे म्हटले आहे ते अचपल = चंचल याच अर्थी. चपला म्हणजे वीज (?). अचपल म्हणजे निश्चल असा अर्थ न बनता चपळ / चंचल असा अर्थ कसा बनतो? जाणून घ्यायची अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. इथे तो शब्द पाहिला म्हणून विचारतो आहे. विषयांतर वाटल्यास क्षमा करा. आणि कृपया खरडवहित सांगा ही विनंती.
-- (मत्त हंस) लिखाळ.
22 Aug 2008 - 8:16 pm | चतुरंग
धन्यवाद!
मराठीत 'अ' हा उपसर्ग म्हणून वापरला जातो जसे
अनर्थ, अभाव , अकारण , अनैतिक, अज्ञान इ. (ह्यात विरुद्ध अर्थ तयार होतो)
ह्या खेरीज "अ" अति याअर्थानेसुद्धा वापरला जातो
जसे आपण दिलेले उदाहरण "अचपल मन माझे।नावरे आवरीता"(करुणाष्टक)
अगणित, असंख्य, अजय, अजेय इ.
चतुरंग
22 Aug 2008 - 8:25 pm | लिखाळ
चतुरंगराव,
त्वरित उत्तरासाठी आभार.
शंका अजून फिटली नाहीये. विषयांतर टाळण्यासाठी मी खरडवहित लिहितो.
आपला,
--लिखाळ.
22 Aug 2008 - 8:26 pm | धनंजय
सहमत. "विरुद्ध" आणि "अति" हे संदर्भानुसार अर्थ आहेत.
फरक :
गणित, असंख्य, अजय, अजेय येथेही 'अ' चा उपयोग 'विरुद्ध' अर्थानेच होत आहे.
अ-गणित म्हणजे ज्याचे गणित नाही, अ-जेय म्हणजे जेय नाही, वगैरे.
"अति" या अर्थाने मला फक्त अचपळ हे एकच उदाहरण आता आठवते आहे. :-(
कदाचित "अपरोक्ष" शब्दाची अति-परोक्ष अशी नवी मराठी व्युत्पत्ती देता येईल. 'अचपल' सारखा याही शब्दाचा मराठी अर्थ संस्कृत अर्थाच्या उलट आहे.
22 Aug 2008 - 8:32 pm | लिखाळ
धनंजय,
आभार.
वर चतुरंग म्हणतात त्यात अजय वगैरे उदाहरणे सुद्धा विरुद्ध अर्थीच आहेत हे आपण म्हटलेच आहे.
अति या अर्थाने अजून कोणताच शब्द मला सापडलेला नाही.
"अपरोक्ष" शब्दाची अति-परोक्ष अशी नवी मराठी व्युत्पत्ती देता येईल.
खरे आहे.. नवी मराठी व्यत्पत्ती हा मार्ग चांगला आहे :)
--लिखाळ.
22 Aug 2008 - 8:20 pm | ऋषिकेश
सलाम!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
23 Aug 2008 - 3:01 am | चतुरंग
रंगलेल्या सर्व रसिकांचे आभार! ;)
चतुरंग
23 Aug 2008 - 1:24 pm | मनीषा
---
बनुनी साकी रागिणि येती भरुनि तार्यांचा प्याला
---
हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला
सुंदर..!!
हरिवंशराय यांचे काव्य तर सुंदर आहे... पण भावनुवाद छानच