मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
13 May 2008 - 1:43 am

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ७)
भावानुवादाच्या आधीच्या भागांचे दुवे सातव्या भागात मिळतील.
--------------------------------------------------
सातव्या भागात आपण सुंदर रुपकांनी सजवलेला मधुशालेचा अवतार बघितलाच आहे.
आता तसेच थोडे पुढे जाऊयात. इथेही मधुशाला निसर्गातल्या रुपकांची साथ सोडत नाहीये!
सकाळ, संध्याकाळ आणि रात्र ह्या निसर्गचक्रातल्या नेहेमीच्या गोष्टीतही कवीला मधुशाला दिसते आहे.
आणि नुसती दिसतेच आहे असे नव्हे तर ती इतकी भावली आहे की त्याचं वर्णन करताना बच्चनांच्या प्रतिभेला कमालीचा बहर आलेला आहे!
निसर्गातल्या विभ्रमांशी आपल्या अनुभवातून इतके तादात्म्य होणे ही असामान्य प्रतिभेची देणगीच आहे!
(आईसक्रीम खाताना लहान मुलांकडे जर तुम्ही एकटक पाहिलंत तर ती त्या आईसक्रीम मधे मनाने अक्षरशः घुसलेली दिसतील!
त्यांच्या चेहेर्‍यावरचे ते भाव, विस्फारलेले डोळे, एकटक आईसक्रीमकडे लागलेली नजर ह्यातून त्यांना आत्मानंदच मिळत असतो. आजूबाजूचे लोक, बरबटलेले तोंड, हात आणि कपडे ह्याचं त्यांना भान नसतं, ती तादात्म्य पावलेली असतात!)
कवी निसर्गाशी असाच तादात्म्य पावलेला आहे आणि एवढे कमी म्हणून की काय योगेश्वर कृष्ण आणि त्याच्या मुरलीतही त्याला मधु आणि मधुशालाच भासते आहे, दिसते आहे!
निसर्गातल्या विभ्रमांशी एकरुप झालेल्या मधुशालेतली एकेक रुबाई वाचत पुढे जाताना शेवटच्या रुबाईत भल्याभल्यांना आपल्या इशार्‍यावर नाचवणार्‍या मधुशालेचे वर्णन करतानाच आपल्याला लौकिकातून पारलौकिकाकडे घेऊन जाण्यात कवी यशस्वी झाला आहे की नाही ते तुम्हीच ठरवा!

चला घेऊयात आस्वाद - रुबाया ३६ ते ४० -
---------------------------------------
मधुशाला -

साकी बन आती है प्रातः जब अरुणा ऊषा बाला,
तारक-मणि-मंडित चादर दे मोल धरा लेती हाला,
अगणित कर-किरणों से जिसको पी, खग पागल हो गाते,
प्रति प्रभात में पूर्ण प्रकृति में मुखिरत होती मधुशाला।।३६।

उतर नशा जब उसका जाता, आती है संध्या बाला,
बड़ी पुरानी, बड़ी नशीली नित्य ढला जाती हाला,
जीवन के संताप शोक सब इसको पीकर मिट जाते
सुरा-सुप्त होते मद-लोभी जागृत रहती मधुशाला।।३७।

अंधकार है मधुविक्रेता, सुन्दर साकी शशिबाला
किरण किरण में जो छलकाती जाम जुम्हाई का हाला,
पीकर जिसको चेतनता खो लेने लगते हैं झपकी
तारकदल से पीनेवाले, रात नहीं है, मधुशाला।।३८।

किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देती हाला
किसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देता प्याला,
किसी ओर मैं देखूं, मुझको दिखलाई देता साकी
किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।।३९।

साकी बन मुरली आई साथ लिए कर में प्याला,
जिनमें वह छलकाती लाई अधर-सुधा-रस की हाला,
योगिराज कर संगत उसकी नटवर नागर कहलाए,
देखो कैसों-कैसों को है नाच नचाती मधुशाला।।४०।
-------------------------------
भावानुवाद

पहाट होता येती साकी, होऊन अरुण-उषाबाला,
तारक-मंडित वस्त्र अर्पुनी धरती घेई मदिरेला
किरण-करांनी अगणित, पिउनी विहंग वेडे गाती हो,
प्रभातकाली सृष्टी इथे जणु येई बनुनि मधुशाला ||३६||

नशा उतरता त्या मदिरेची, अलगदते संध्याबाला,
नित्य घेऊनी येत असे ती अन् मादकशा वारुणिला,
करुन सुरेचे पान जीवनी शोक, ताप जाती सारे,
सुरेत सुप्तचि होत मद्यपी, राहे जागृत मधुशाला ||३७||

अंधकार हा मधुविक्रेता, शशि सुंदर साकीबाला,
किरणा-किरणातुन हिंदोळे निद्रा-मदिरेचा प्याला,
धुंदच होती, डुलकी घेती, पिऊन मादक मदिरेला,
तारकांतुनी प्राशुन घेती, निशा नाही, जणु मधुशाला ||३८||

कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला,
पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला,
बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी,
जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९||

हाती घेऊन प्याला मुरली बनुनी आली मधुबाला,
हिंदोळत जणु घेऊन येई अधर-सुधा-रस मदिरेला,
योगेश्वर तो कृष्णहि बनुनी जाई नर्तक तिच्यासवे
कुणाकुणाही पहा नाचवी कैसी येथे मधुशाला ||४०||

चतुरंग

हे ठिकाणआस्वादप्रतिभाभाषांतर

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

13 May 2008 - 9:00 am | केशवसुमार

चतुरंगशेठ,
उत्तम..बर्‍याच अंतराने आलेला हा भाग ही उत्तम आहे..उरलेले भाग ही लवकर येऊदेत.. =D>
चालीत गुणगुणताना काही ठिकाणी अडखळायला होते आहे त्या कडे जरा लक्ष द्यावे ही विनंती... :B
(आस्वादक)केशवसुमार
(स्वगतः बरेच दिवसात कुठल्या मधुशालेत चकणा खाल्लेला नाही.. 8} काही तरी करायला हवे :W )
(चकणे बहाद्दर)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 10:06 am | विसोबा खेचर

हाती घेऊन प्याला मुरली बनुनी आली मधुबाला,
हिंदोळत जणु घेऊन येई अधर-सुधा-रस मदिरेला,
तिच्या संगती योगिराजही पोचुन जाई महत्पदी,
कुणाकुणाही पहा नाचवी कैसी येथे मधुशाला ||४०||

वा! नेहमीप्रमाणेच अप्रतीम!

तात्या.

कलंत्री's picture

13 May 2008 - 2:18 pm | कलंत्री

चतुरंग : एकदा की सर्व भावानुवाद झाला की काव्यवाचनाचा समारंभ ठेवा. यातून खरा आनंद मिळेल.

शुभेच्छा,

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 5:12 pm | विसोबा खेचर

एकदा की सर्व भावानुवाद झाला की काव्यवाचनाचा समारंभ ठेवा. यातून खरा आनंद मिळेल.

मथुरादासांशी सहमत आहे!

रंगा,

भारतात आलास की ठाण्याला अवश्य भेट दे. मी स्वत: काही रसिक श्रोत्यांसमोर तुझ्या या मराठी मधुशालेच्या वाचनाचा कार्यक्रम ठेवीन. काही निवडक रुबायांचे वाचन व सोबत ओघवत्या वाणीतला त्यांचा रसास्वाद, असा हा कार्यक्रम रसिकांना निश्चितच आवडेल याची मला खात्री वाटते...

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2008 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावानुवाद मस्तच झाला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय's picture

14 May 2008 - 12:26 am | धनंजय

आणखी एक उत्तम भाग.

काही बारीकसारीक प्रश्न :
३६:
"प्रकृति" शब्दाचा हिंदी अर्थ "निसर्ग" हा प्रसिद्ध आहे. मराठीत "तब्येत" हा अर्थ अधिक प्रसिद्ध आहे. भावानुवादात "निसर्ग" शब्द बसवता येईल का?

३७:
हिंदीत
> सुरा-सुप्त होते मद-लोभी जागृत रहती मधुशाला।।३७।।
मराठीत मात्र
> सुरेत लुप्तचि होत मद्यपी, राहे जागृत मधुशाला ||३७||
मराठीतही "सुप्त" असेच ठेवा अशी माझी फर्माईश आहे. "सुप्त-जागृत" ही जोडी "लुप्त-जागृत" पेक्षा प्रभावी वाटते.

३८:
>किरण किरण में जो छलकाती जाम जुम्हाई का हाला,
याचा भावानुवाद
> किरणा-किरणातुनि हिंदोळे बघ मद्याचा जणु प्याला,
बच्चनांची "जुम्हाई" भावली नाही का? हिंदीतल्या रुबाईत जुम्हाई घेणारा "तू"="पीनेवाला" आहे. म्हणून तिथे शेवटच्या ओळीचा अर्थ लागतो -
> तारकदल से पीनेवाले, रात नहीं है, मधुशाला।।३८।
रात ही जर मद्यप-रूपक असती, तर "पीनेवाली" असे बच्चन म्हणाले असते. "पीनेवाले" म्हणजे "तू", "जुम्हाई"ची मदिरा पीत आहेस, चंद्राची कोर किरणांनी ती मदिरा तुझ्या ओठात छलकत आहे.

आणखी एक छोटेसे कोडे:
बच्चन म्हणतात -
> सुन्दर साकी शशिबाला
भावानुवाद
> शशि सुंदर साकीबाला
"साकी सुंदर शशिबाला" किंवा "सुंदर साकी शशिबाला" असेही वृत्तात बसते... बच्चनांची चंद्र-बालिका तुम्हाला पटली नाही का?

सारांश : या रुबाईचा तुमचा भावार्थ बच्चनांच्या रुबाईपासून खूप वेगळा वाटत आहे. (तरी भावार्थ सुंदर आहे, हे सांगणे नलगे.)

३९ :
> किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।।३९।।
>जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९||
मुळात मधुशाला ही "सखी" नाही, चराचर सृष्टी आहे. तुमच्या भावार्थात "सखी" आहे, आणि अर्थ सुंदरच आहे. (पण मुळातला अर्थ भावला नाही का?)

४० :
> योगिराज कर संगत उसकी नटवर नागर कहलाए,
याचे
> तिच्या संगती योगिराजही पोचुन जाई महत्पदी,
म्हणजे आमचा आवडता मुरलीधर कृष्ण हाकलला की तुम्ही :-( ;-)

बासरीच्या संगतीने योगिराज कृष्ण नटवर = उत्कृष्ट नट ("नाच्या") होतो. अशा प्रकारे ही मुरली साकी असलेली मधुशाला भल्याभल्यांना नाचवते. असा काही अर्थ हिंदी रुबाईत आहे, तो मराठीत जरा स्पष्ट करावा, ही फर्माईश.

आणि ब्रेव्हो! मस्त चालू आहे. आगे बढो, चतुरंग - हम तुम्हारे साथ हैं!

नेते आहे तेव्हां त्याचे आभार मानून मी परकेपणाचा भाव तिथे निर्माण करु इच्छित नाही. धन्यवाद!

३६: पटले - योग्य बदल केलाय.

३७: हेही पटले आणि तसा बदल केलाय.

३८: 'जुम्हाई' ह्या शब्दाचा 'जांभई' असा अर्थ मला न लागल्यामुळे माझ्या भावानुवादात तो गोंधळ जाणवला. नवीन अर्थ कळल्यानंतर मूळ रुबाईची खुमारी अधिकच जाणवली आणि योग्य तो बदल घडविल्याशिवाय चैन पडेना. 'जांभई' सारखा पद्यहानी करणारा शब्द अनुवादात घालवेना तेव्हा थोडा बदल करण्याचे स्वातंत्र्य घेऊन 'निद्रेचा' समावेश केलाय.

'शशि सुंदर साकीबाला' हे मात्र मला अधिक भावले म्हणून ते तसेच ठेवले.

३९: 'सखी मधुशाला' हाही अर्थ मला अधिक भावला त्यामुळे त्यातही काही बदल नाही.

४०: इथेही योगिराज कृष्णाला हाकलले नव्हते पण मी केलेल्या अनुवादातून पुरेसा स्पष्ट अर्थ ध्वनित होत नाही असे जाणवल्यावर योग्य बदल घडवून पुन्हा अनुवाद पेश केला आहे.

चतुरंग

प्राजु's picture

14 May 2008 - 2:29 pm | प्राजु

धुंदच होती, हरवुनि जाती, पिऊन मादक मदिरेला,
तारकांतुनी प्राशुन घेती, निशा नाही, जणु मधुशाला

क्या बात है....

कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला,
पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला,
बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी,
जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९||

अतिशय सुंदर..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डॉ.साहेब, कलंत्री तुम्हा सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तुम्हा ही वाटचाल सुरु ठेवायला मला बळ मिळते आहे. तुम्हा सर्वांना आणि इतरही सर्व अप्रकट मिपाकर रसिकांना धन्यवाद!
काव्य आता हळूहळू कठिण होते आहे त्यामुळे जरा वेळ लागू शकेल तेव्हा सबुरी असावी.

चतुरंग

मदनबाण's picture

19 May 2008 - 4:27 am | मदनबाण

कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला,
पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला,
बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी,
जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला

व्वा मस्तच.....

मदनबाण.....