***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
कोकणीत गोवा म्हणजे गोंय.
ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला 'सिंदाबुर' या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर 'गोमंतक' म्हणजे 'गायींनी भरलेला' असा अर्थ आहे. जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, ही कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्यामागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही देवकी-कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. 'सिंदाबुर' हे नाव 'चंद्रपूर' या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी 'चांदोर' किंवा 'चांदर' म्हणून ओळखली जाते.
पण या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे 'गोंय'. भारतात आर्य लोक सगळीकडे पसरण्यापूर्वी प्रोटोऑस्ट्रोलॉईड / द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते. छोटा नागपूर पठारावरून कोळ, मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटकमार्गे गोव्याच्या, जंगलानी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत 'गोयंबा' म्हणजे भाताच्या लोंब्या. तर गुव्वा म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यानी 'गोंय' किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या!
या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी अनेक तर्क वितर्क असले तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद. सांगे तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हातकुर्हाडी सापडल्या आहेत. तर सत्तरी तालुक्यात 'म्हाऊस' आणि सांगे तालुक्यात रिवण-कोळंबच्याजवळ 'उसगाळीमळ-पणसईमळ' आणि 'काजूर' इथे प्रस्तरचित्रे अर्थात 'पेट्रोग्लिफ्स' सापडले आहेत.
यापैकी उसगाळीमळ आणि काजूर इथली अश्मयुगीन दगडी रेखाचित्रे आम्ही पाहिली आणि डोळ्याचे पारणे फिटले. काजूर इथली प्रस्तरचित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत. अनेक प्राण्यांचे आकार इथे सापडतात.
मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिवण-कोळंब जवळचे उसगाळीमळ-पणसईमळ. पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची झुआरी नदी. तिची एक उपनदी कुशावती. ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळंबजवळ तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट. ६ महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकार. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजानी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत, आज आपण काहीच सांगू शकत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस्स! रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरिणं वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेली एक मातृदेवताही आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्युह म्हणतात, तर या प्रस्तर चित्राना 'गुराख्यांची चित्रं' म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसर्या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो अर्धा बुजलाय. तिथे सरकारचा एक रखवालदार असतो असं ऐकलं पण आम्हाला काही तो भेटला नाही. या सगळ्या खडकावरची माती अद्यापही काढलेली नाही. आता साधारण १२५ आकृत्या दिसतात. माती नीट काढली तर कदाचित आणखीही काही सापडतील.
हा सगळा प्रदेश अजूनही दुर्गम आहे. सगळीकडे जंगल आहेच. कर्नाटकची सीमा जवळ आहे आणि लोहखनिजाच्या खाणींनी सगळा परिसर व्यापलेला आहे. या प्रस्तरचित्रांपासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर सध्या बंद असलेली एक खाण आहे. 'ती चालू करायचं उद्या जर कोणाच्या डोक्यात आलं तर?' या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.
या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण!
अश्मयुगातला हा आदिम रहिवासी हळूहळू शेती करू लागला. प्राणीपालन करू लागला. डोंगर उतारावर पाहिजे तेवढी झाडी, गवत काढून तिथे जरूरीपुरतं भात, नाचणी पिकवायची. पुढच्या वर्षी तो तुकडा रानासाठी सोडून देऊन दुसर्या जागी गरजेपुरतीच शेती करायची. अशा प्रकारची शेती गोव्यातले आदिवासी आता आता पर्यंत करत होते. या शेतीला कुमेरी असं नाव आहे. वारुळं, नाग, भूमी, लिंग, जागेचे राखणदार पुरुष अशी त्यांची दैवतं होती. या वारुळांना सांतेरी असं नाव आहे. गोव्यात सगळीकडे आढळणारी सातेरी देवी म्हणजे आता 'शांतादुर्गा'. पण सांतेरी हे नाव अजूनही प्रचारात आहे. तर वेताळ, पाईकदेव, रवळनाथ हे सगळे राखणदार देव. तर लिंगदेवांना नंतर शंकर हे नाव मिळालं. या नैसर्गिक देवतांना त्यांच्या भोळ्या भक्तांनी कोणत्याही उपचारांशिवाय केलेली पूजा मानवत होती. त्यांची देवळंही कुठे नव्हती. तर वारुळं, जमिनीतून वर आलेला एखादा दगड यातच त्यांना त्यांचे देव दिसत होते. सुरुवातीचे कोळ-मुंड म्हणजे नंतरच्या काळातले कुळ-मुंडकार आणि कोळी, गावडे-गावकार हे गोव्याचे आद्य रहिवासी.
काजूर इथे असंच एक पाइकदेवाचं देऊळ दिसलं. देऊळ म्हणजे साधीशी झोपडी. तेही नंतर कधीतरी बांधलेलं आहे. पण त्याच्या समोर चपट्या दगडांची एक वर्तुळाकार पुरातन रचना आहे. त्या रचनेच्या मधोमध एक गुळगुळीत गोल दगड आहे. हे नेमकं कशासाठी, आम्हाला कोणी सांगू शकलं नाही. बहुधा ही आदिम लोकांची स्मशानभूमी असावी. त्या दगडांच्या वर्तुळाच्या मधे उभं राहिलं तर कोणी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोललं तर भयंकर परिणाम होतात अशी गावकर्यांची श्रद्धा आहे.
अंदाजे इ.स. पूर्व ६००० वर्षे या काळात समुद्राची पातळी आणखी कमी झाली, आणि किनारपट्टीला आणखी भूमी उपलब्ध झाली. गोव्यातले द्रविड, कोळ मुंड आपल्या पद्धतीने जगत असताना नंतर म्हणजे साधारण इ.स. पूर्व ५००० वर्षे, लढायांमधे हरून सुमेरियन लोक समुद्रमार्गे गोव्यात आले. त्यानी येताना आपल्याबरोबर देवळांची संस्कृती आणली. आणि ते इथल्या मूळ समाजात मिसळून गेले. यांचे वंशज म्हणजे आताचे पद्दे आणि चित्पावन ब्राह्मण असा काही इतिहास संशोधकांचा समज आहे. आणखी काही काळातच, किंवा याच्या आगेमागे, उत्तरेकडून आर्य लोक सार्या भारतवर्षात पसरले. त्यांनी आपली चातुर्वर्ण्य व्यवस्था इथे रुजवली. त्या व्यवस्थेत मूळचे आदिवासी असलेले गावडे आणि महार लोक शूद्र झाले असावेत. परशुरामाने इथे येणार्या आर्यांचे नेतृत्व केले असावे म्हणून ही भूमी परशुरामाने निर्माण केली अशा प्रकारच्या कथांचा उगम झाला. आताचं 'रिवण' म्हणजे पूर्वीचं 'ऋषिवन'. आताचं काणकोण म्हणजे पूर्वीचं 'कण्वपूर' कारण तिथे कण्व ऋषींचा आश्रम होता. अशा नावांवरून गोव्यातल्या आर्यांच्या वास्तव्याची माहिती मिळते.
हळूहळू गावगाडा चालवणारी व्यवस्था अस्तित्वात आली. आताच्या पंचमंडळांसारखी काहीतरी ही व्यवस्था असावी. म्हणूनच गोव्यात अनेक ठिकाणी 'बाराजण' नावाची ठिकाणे आहेत. कर्नाटक सीमेवरच्या जंगलातल्या लहान गावांमधे असे पंच म्हणजेच 'बुधवंत' लोक गावातल्या गोष्टींबद्दल निर्णय करतात. हे एकूण शांतताप्रेमी लोक होते. इ. स. पूर्व सुमारे ५०० वर्षांच्या काळात गोव्यात जैन आणि बौद्ध धर्माचे प्रचारक येऊन पोचले. त्यांचेही गोव्यात स्वागत झाले. त्यांच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा तयार केलेल्या आहेत. साखळीजवळ हरवळे, फोंड्याजवळ खांडेपार इथे आम्ही अशा गुहा पाहिल्या. यापैकी हरवळे येथील गुहा या पूजास्थान वाटतात, कारण त्यांच्या आतमधे लिंगं आहेत. तर खांडेपार येथे केवळ रहाण्यासाठी गुहा तयार केल्या असाव्यात कारण त्यांत प्रत्येक गुहेच्या आत २ खोल्या केलेल्या आहेत.
आतापर्यंत गोव्यात एकछत्री असं कोणाचं राज्य नव्हतं. जशी उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात साम्राज्यं उदयाला आली, तसा त्यांचा गोव्यात हळूहळू शिरकाव झाला. गोव्याच्या इतिहासातला अशा साम्राज्याचा पहिला उल्लेख आहे, मौर्य साम्राज्याचा.
इ. स. पूर्व ३२२ मध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य मगधाच्या नंदांचा पराभव करून राज्यावर आला. पुढील २४ वर्षांच्या काळात त्याने आपल्या राज्याला साम्राज्याचे स्वरूप दिले. त्याचा पुत्र बिंदुसार याने हे साम्राज्य दक्षिण भारतातली द्रविड राज्यं वगळता पूर्ण भारतभर वाढवले. त्याच्यानंतर त्याचा महापराक्रमी पुत्र चक्रवर्ती अशोक सम्राट झाला. त्याने इ.स. पूर्व २३२ पर्यंत म्हणजे ४० वर्षे भारतावर राज्य केले. अशोकाने अनेक ठिकाणी शिलालेख लिहून ठेवले आहेत. या सम्राटांपैकी सम्राट चंद्रगुप्ताने उत्तर आयुष्यात जैन विचारसरणीचा अवलंब केला, तर अशोकाने कलिंगाच्या लढाईनंतर बौद्ध मताचा स्वीकार केला. या सर्व काळात गोव्यात मौर्यांचे राज्य होते. या काळात जैन तसेच बौद्ध धर्माचे प्रचारक सर्व भारतभर संचार करत होते. गोव्यात हरवळे सारख्या ठिकाणी जैन बैठक आढळते, तर बौद्ध भिख्खूंच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा आढळून येतात. यापैकी काही म्हणजे हरवळे, रिवण, खांडेपार इ. बर्याच ठिकाणी उत्खनन करताना इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक या काळातल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत.
इ. स. पूर्व २३२ मध्ये अशोकाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर, त्याचे साम्राज्य फक्त ५० वर्षे टिकले. आणि यानंतर पाटलिपुत्रावर सुंग घराण्याची सत्ता आली. या काळात मौर्यांच्या साम्राज्याची शकले झाली, आणि लहान राज्ये उदयाला आली. यानंतर सुमारे साडेचारशे वर्षे पैठण अर्थात 'प्रतिष्ठान' येथील सातवाहन कुलाची महाराष्ट्राबरोबरच गोव्यात सत्ता राहिली. या कुळात शककर्ता सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात "शालिवाहन" होऊन गेला. याच्या काळात गोवा हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध झाले, आणि इथून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या राजांसाठी अरबी घोडे समुद्रमार्गे आणायला सुरुवात झाली.
तिसवाडी, बारदेश आणि साष्टी या तालुक्यात ४५० वर्षे, तर इतर तालुक्यात सुमारे २०० वर्षे पोर्तुगीजांचे राज्य वगळता गोव्याचा इतिहास बराचसा महाराष्ट्राच्या इतिहासाबरोबर निगडित राहिलेला आहे. सातवाहन साम्राज्याच्या लयानंतर सुमारे २०० वर्षे गोव्यात अस्थिर परिस्थिती राहिली होती. या काळात दक्षिण भारतातील चुतु, महाराष्ट्री, हाळसीचे कदंब, कोल्हापूरचे कुरा इत्यादि घराण्यातील राजांच्या सत्ता एकामागून एक गोव्यावर येऊन गेल्या. यापैकी हाळसी-पळसिग्गे (पलाशिका) हे खानापूरजवळचे एक प्राचीन गाव. इथले कदंब घराणे गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. कारण याच घराण्याच्या एका शाखेने परत गोव्यावर सत्ता स्थापन केली ती इ. सनाच्या ११व्या शतकात. त्यावेळेला हे घराणे गोव्यात राहूनच गोव्यावर राज्य करत होते. आणि ती चारशे वर्षे गोव्याचा सुवर्णकाळ मानला जातो.
इ. स. ४०० च्या दरम्यान यादवकुळातल्या भोज राजांची सत्ता मध्य आणि दक्षिण गोव्यात प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी चंद्रपूर अर्थात चांदोर ही होती. चांदोर इथे उत्खनन करताना अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. या राजांचा कुलदेव म्हणजे चंद्रेश्वर भूतनाथ. चांदोर इथे सापडलेल्या अवशेषांमधे मोठा नंदी, राजवाड्याचे अवशेष इत्यादि आजही पहायला मिळतात. हे भोज राजे अतिशय उदार होते. त्यांनी अनेक मोठी देवळे बांधली, आणि या देवळांच्या उत्पनासाठी अनेक गावे इनाम म्हणून लावून दिली. त्यानी दिलेले ताम्रपट आणि शिलालेख गोव्यात अनेक ठिकाणी सापडले आहेत. या काळात चंद्रपूर सार्या जगभर प्रसिद्ध झाले. सुमारे २०० वर्षे या राजघराण्याने गोव्याची खूप भरभराट केली आणि आपल्या राज्याचा विस्तार कारवार बेळगाव या भागातही केला. यांच्या एका चेदी या उपकुलातील काही लोकांना पुढे पोर्तुगीजांनी बळाने ख्रिश्चन केले, पण ते स्वत:ला चाड्डे म्हणवीत राहिले. आणि आपापल्या कुलदैवताना वर्षासने द्यायचेही त्यानी सुरूच ठेवले. "गोव्यातल्या प्रत्येक ख्रिश्चन माणसाला आपले हिंदू असतानाचे आडनाव माहिती आहे" असे आम्हाला रिवण येथे भेटलेल्या एका ख्रिश्चन व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे हा टुरिझम मध्ये असलेला माणूस आम्हाला रिवणच्या जीवोत्तम पर्तगाळी मठात भेटला होता, आणि आसपासच्या अनेक, हिंदूंच्या दृष्टीने पवित्र, ठिकाणांची माहिती त्याने दिली होती. एवढंच नव्हे तर त्याने "पर्तगाळी मठातल्या झर्याच्या पाण्याने सगळे रोग बरे होतात कारण ते डोंगरावरच्या गणपतीच्या पायापासून आलं आहे" अशी माहितीही दिली! त्याशिवाय "वेताळाच्या देवळात दिवेलागणीच्या वेळी जाऊ नका, घाबराल." असा प्रेमळ सल्लाही दिला!
इ. स. ५२५ मध्ये घारापुरीच्या कोकण मौर्यांनी भोजांचा पराभव केला. आणखी ५० वर्षांत बदामीच्या चालुक्यानी कोकण मौर्यांकडून गोवा जिंकून घेतला. त्यांचे राज्य सुमारे २०० वर्षे टिकले. याच काळात पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, कीर्तिवर्मा इ. महान राजे होऊन गेले. आणि इ.स. ७६८ मध्ये दक्षिण कोकणातल्या शिलाहारांच्या वंशातल्या शानफुल्ल नावाच्या राजाच्या मदतीने राष्ट्रकूट घराण्याच्या कृष्ण राजाने गोवा जिंकला. या शिलाहारांचे जे वंशज बाटवाबाटवीच्या काळात सक्तीने ख्रिश्चन झाले, त्यानी नाव घेतले 'सिल्व्हा'! या शिलाहारांची सत्ता गोव्यात सुमारे अडिचशे वर्षे चालली. ते राष्ट्रकूटांचे मांडलिक राहिले. याच कालावधीत खांडेपार येथे सप्तकोटेश्वराचे पूर्ण दगडी बांधणीचे पहिले देऊळ बांधण्यात आले. अगदी साधे आणि लहानसे असे हे देऊळ वैशिष्ट्यपूर्ण दिसते ते त्याच्या कळसावरील जांभ्या दगडात कोरलेल्या बैल, हत्ती या प्राण्यांमुळे. या देवळातही चौकोनी पिंडिका आढळते.
राष्ट्रकूटांच्या, कल्याणी चालुक्यानी केलेल्या पराभवांनंतर, शिलाहारांचे राज्य दुबळे झाले आणि कदंबानी गोवा जिंकून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. लवकरच कल्याणी चालुक्यांनी म्हणजे दुसरा जयसिंह याने रट्टराज शिलाहाराचा पराभव करून गोव्यासकट पूर्ण सप्तकोकणावर आपली सत्ता प्रस्थापित केली, आणि इ. स. १०४२ पासून कंटकाचार्य अर्थात शष्ठदेव कदंबाने चालुक्यांचा मांडलिक म्हणून गोव्याचा कारभार पहायला सुरुवात केली. हा खर्या अर्थाने गोव्याच्या वैभवाचा काळ होता. हे तेच कदंब राजे, ज्यानी "श्रीसप्तकोटीश्वरलब्ध वीरवर" हे बिरूद अभिमानाने मिरविले आणि आपल्या नाण्यांवरही "श्री सप्तकोटीश्वरलब्ध वरप्रसाद" असे लिहून श्री सप्तकोटीश्वराबरोबर आपले नाव अजरामर केले.
क्रमशः
**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)
प्रतिक्रिया
11 Apr 2011 - 7:40 am | रेवती
दणकेबाज इतिहासाचं वर्णन आवडलं.
गोव्यावर बरेच राज्यकर्ते येउन गेले.
फोटू तर मस्तच आहेत.
कितीतरी आडनावांची मूळ गावे समजली.
जांभ्या दगडात कोरलेले वर्तुळ आवडले.
11 Apr 2011 - 8:58 am | प्रीत-मोहर
मी पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात गेले असता ह्या पेट्रोग्लिफबद्दल अजुन छान माहिती मिळाली. मी थोडफार सांगायचा प्रयत्न करते.
त्या प्रस्तर शिल्पांकडे पहाय्ची वेगळीच द्रूष्टी मला मिळाली. इंद्रा प्रभुदेसाई ही त्या क्षेत्रातली तज्ञ मला सांगते, की आपल्या वंशजांना शिकार करताना कोणत्या ठिकाणी हल्ला केला म्हणजे प्राणी लवकर जायबंदी होतो ह्याची ती माहिती असावी. प्रत्येक कोरलेल्या प्राण्यांमधे, आतील काही अवयवही कोरले आहेत. त्या जागी मारल प्राणी लगेच मरतो .हे आज संशोधक देखील सांगतात. असे बैल, सांबर, मासे, मोर हे काही आम्ही ओळखलेले प्राणी.
दुसर म्हणजे रेवती ताई म्हणाल्या ते वर्तुळ. याला स्थानिक लोक अभिमन्यूचे चक्रव्युह अस म्हणतात. हा मोराचा फ्रंट व्ह्यु देखील असु शकतो. ही आकृती आईच्या पोटातील बाळाची सुरवातीच्या काळातील अवस्थाही असु शकते. कारण ह्या काळात मातृदेवतेच्या पूजेला महत्व दिले जायचे.
अजुन व्यवस्थित माहितीसाठी पणजीतील गोवा संग्रहालयाला नक्की भेट द्या.
11 Apr 2011 - 6:27 pm | रेवती
वर्तुळाच्या कोरीवकामाबाबत माझा अंदाज असा होता की बाजूने वहात असलेल्या नदीमध्ये एखादा भोवरा पाहून त्याची आकृती केली असावी. टीम गोवाचे अभ्यासपूर्ण लेख प्रिंट घेऊन फिरल्यास स्थानिकांची मदन न घेताही बर्याच गोष्टी समजतील.
11 Apr 2011 - 9:16 pm | टीम गोवा
अधिक माहिती इथे पहा
11 Apr 2011 - 8:07 am | ५० फक्त
अतिशय छान भाग, आता या नंतर जेंव्हा गोव्यात येईन तो हा गोवा पाहायलाच. टिम गोवाचे किती आभार मानावेत ते कमीच आहेत.
या एका उत्तम लेखामालेला माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा.
11 Apr 2011 - 8:23 am | सहज
सुंदर लेख.
वाचत आहे.
11 Apr 2011 - 2:05 pm | पियुशा
हेच म्हनते :)
11 Apr 2011 - 8:37 am | आनंदयात्री
छान. माहिती विस्तृत आहे, वाचतांना स्तिमित व्हायला झाले. आर्य इकडुन आले वैगेरे खटकले पण मुळ लेखमालेच्या उद्द्येश वेगळा असल्याने त्यासंबधी चर्चा इथे नको हे पटते.
पुढचा लेख येण्याची वाट पाहीन.
11 Apr 2011 - 8:58 am | प्रचेतस
अतिशय सुरेख भाग, तपशिलवार वर्णन व त्याला सुरेख छायाचित्रांची जोड. गोव्याच्या वेगळ्याच अंगाची मुद्देसूद माहिती करून दिली आहे.
पोर्तुगीजांनी उद्धस्त केलेल्या सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असे वाचले आहे. त्याबद्दल अधिक माहिती तुमच्याकडून येईलच.
11 Apr 2011 - 10:05 am | मदनबाण
सुंदर लिहीत आहात...
वाचतोय... :)
11 Apr 2011 - 10:47 am | चिरोटा
चांगली माहिती. आणखी येवू द्यात.
11 Apr 2011 - 10:59 am | आमोद
गोव्याच्या प्रचलित प्रतिमेपेक्षा वेगळी अनवट माहीती दिल्याबद्दल आभारी आहे
11 Apr 2011 - 11:03 am | sneharani
चांगली माहिती! येऊ दे अजुन!
11 Apr 2011 - 11:43 am | प्रास
प्रत्यक्ष लेखमालेची उत्तम सुरुवात झालेली आहे असं म्हणायला पाहिजे. फारच सुंदर आणि माहितीपूर्ण लिखाण झालेले आहे. वर आनंदयात्री म्हणतात त्या प्रमाणे आर्यविषयक उल्लेख खटकतातच पण खरंच लेखमालेच्या दृष्टीने ते तेव्हढे महत्त्वाचे नाही. त्यासाठी वेगळा धागा निघू शकेल.
छायाचित्रे छान आहेत. प्रस्तरशिल्पे सुंदर. अशीच प्रस्तरशिल्पे मुंबईहून गणपतीपुळ्याला जाताना मध्ये पाहिल्याचे स्मरते.
टीम गोवा - येवू द्या पुढले लेख..... आम्ही वाचतोय!
धन्यवाद!
11 Apr 2011 - 11:49 am | यशोधरा
छान. वाचत आहे.
11 Apr 2011 - 12:06 pm | योगप्रभू
<<इ. स. ४०० च्या दरम्यान यादवकुळातल्या भोज राजांची सत्ता मध्य आणि दक्षिण गोव्यात प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी चंद्रपूर अर्थात चांदोर ही होती. चांदोर इथे उत्खनन करताना अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. या राजांचा कुलदेव म्हणजे चंद्रेश्वर भूतनाथ. चांदोर इथे सापडलेल्या अवशेषांमधे मोठा नंदी, राजवाड्याचे अवशेष इत्यादि आजही पहायला मिळतात. >>
हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. हे चांदोर मडगावजवळ आहे. तेथे पूर्वी सप्तमातृका मंदिरही होते. पोर्तुगीज राजवटीत ते पाडून त्याजागी १६४५ मध्ये चर्च ऑफ अवर लेडी ऑफ बेथलहॅम बांधले गेले, असे वाचण्यात आले. सप्तकोटीश्वर तर आदिलशाही राजवटीतच पाडले गेले होते. यावरुन एक दिसते, की गोपकपट्टणात शैव आणि शाक्त पंथांचा प्रभाव खूप होता. यादवकुलीन भोज राजांचे दैवत चंद्रेश्वर भूतनाथ म्हणजे शंकर. शिव आहे तिथे शक्ती आहे म्हणून गोव्यात मंगेश, नागेश, मल्लिकार्जुन याप्रमाणेच शांतादुर्गा, म्हाळसा आणि इतर देवींची मंदिरे प्रमुख. पण देवकी-कृष्ण मंदिर आणि काही अपवाद वगळता वैष्णव पंथाचे फार प्राबल्य दिसत नाही. महालक्ष्मी आहे मग नारायण का नाही, ही आपली माझी शंका.
सप्तमातृका उपासना गोव्यात प्रभावी होती. अलिकडेच जे मातृदेवतेचे शिल्प सापडले त्यावरुन दुजोरा मिळतो. सप्तमातृका शिल्पात शंकराबरोबर ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वराही, इंद्राणी, चामुंडी या शक्तीदेवता आहेत. याच देवी गोव्यात विविध लोकनावांनी पूजल्या जात असतील. त्याबद्दल विवेचन येईल, अशी अपेक्षा.
पुन्हा घाटावरुन आलेल्या सात बहिणी आणि व भाऊ खेतोबा यांच्या कथेचे आणि गोव्यातील उत्सवांचे गहिरे नाते आहे. सात बहिणी गोव्यात निरनिराळ्या ठिकाणी वसल्या (केळबाई मडगावला, महामाया मयेला, महालक्ष्मी म्हापश्याला वगैरे. मये तलाव हा भाऊ खेतोबाचे प्रतिक. या सांस्कृतिक मुळांचे सुरेख विवेचन इतिहासकार डॉ. प्रतिमा कामत यांनी केले आहे.
गोवा टीम. सुरवात एकदम छान झाली आहे. तुमच्या लेखनाचा आनंद लुटतोय. कीप इट अप.
11 Apr 2011 - 1:29 pm | यशोधरा
योगप्रभू, म्हाळसा नव्हे, महालसा. महालसा नारायणी. यद्नोपवीत धारण करणारी ही देवीची बहुधा एकमेव मूर्ती असावी.
11 Apr 2011 - 1:52 pm | योगप्रभू
हो तो उच्चार महालसा नारायणी असाच आहे. महालक्ष्मीचे नाव म्हणजे महालसा. मराठीत मात्र म्हाळसा म्हटले जाते. म्हाळसापती हे नाव (महालक्ष्मीचा पती तो नारायण) त्यावरुनच रुढ झाले. मी आपल्या मराठी पद्धतीने उच्चार केला. तरी दिलगीर आहे.
<<यद्नोपवीत धारण करणारी ही देवीची बहुधा एकमेव मूर्ती असावी.>>
वैदिक काळात स्त्रियांचे मौजीबंधन व्हायचे, त्यांना यज्ञोपवित म्हणजे जानवे धारण करण्याचा अधिकार असे. अर्थात मुंज हा संस्कार महिला व अन्य जातींतून कधी आणि का लुप्त झाला, हे सांगता येत नाही. पण देवीने यज्ञोपवित धारण करणे, हे निरीक्षण नक्कीच नोंद करण्याजोगे आहे.
11 Apr 2011 - 1:57 pm | यशोधरा
नाही, म्हाळसा आणि महालसा ही वेगळी रुपे आहेत.
>>म्हाळसापती हे नाव (महालक्ष्मीचा पती तो नारायण) त्यावरुनच रुढ झाले. >> हे बरोबर, पण महालसा म्हणजे तुम्हांला अभिप्रेत असलेली म्हाळसा नव्हे, असे वाटते. महालसा हा मोहिनी अवतार आहे. माझ्याकडे एक जुने पुस्तक आहे त्यामधे महालसेबद्दल काही माहिती आहे, वेळ झाल्यास इथे लिहीन.
11 Apr 2011 - 3:43 pm | योगप्रभू
महालसा म्हणजे महालक्ष्मी समजण्यात माझी गल्लत झाली. त्याबद्दल क्षमस्व..
महालसा म्हणजे विष्णुचा मोहिनी अवतार हे बरोबर आहे. पण पुढे हा अवतार शक्तीचे रुप कसा झाला ते मला म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचायला मिळाले. भागवत पुराण व ब्रम्हांड पुराणात महालसा म्हणजे मोहिनीरुप, हे नमूद केले आहे. एका लोककथेनुसार अमृतमंथनाच्या वेळी देव व दानव मोहिनीवर भाळले. त्यात शंकरही होता. त्याने मोहिनीशी विवाहाची इच्छा व्यक्त केली तेव्हा मोहिनीने 'तू जेव्हा मार्तंड भैरवाचा अवतार घेशील त्यावेळी मीही अवतार घेऊन तुझ्याशी विवाह करेन' असे कबूल केले. पुढे शंकराने तो अवतार धारण केला आणि मणी व मल्ल या दैत्याचा पराभव केला, म्हणून त्याचे नाव मल्लारि पडले (आमचा मल्हारी मार्तंड उर्फ जेजुरीचा खंडेराया तो हाच) मोहिनीने यावेळी तिमाशेठ याची मुलगी महालसा म्हणून जन्म घेतला होता. तिने मल्हारीशी विवाह केला.
याचा अर्थ म्हाळसापती म्हणजे विष्णू नसून शंकर आहे, असे दिसते. इथे गोंधळ कसा उडला ते बघा. एक तर महालसा नारायणी असे नाव आहे. नारायण म्हणजे विष्णू. त्याची नारायणी म्हणजे महालक्ष्मी. म्हणजे हे तिचेच रुप आहे, असे वाटते. प्रत्यक्षात पुराणे म्हणतात ते विष्णूचे मोहिनीरुप आहे. लोककथा म्हणतात, की ती शंकराची पत्नी आहे. म्हार्दोळ येथील मंदिराच्या संदर्भ पुराव्यांत ती शक्तीदेवता (शिव व ६४ योगिनी समूह) म्हणूनच उल्लेखली गेली आहे.
11 Apr 2011 - 4:20 pm | यशोधरा
म्हार्दोळ येथील मंदिराच्या संदर्भ पुराव्यांत ती शक्तीदेवता (शिव व ६४ योगिनी समूह) म्हणूनच उल्लेखली गेली आहे.
बर्याचश्या कथा व माहितीची सरमिसळ झाल्यासारखी वाटते. ६४ योगिनींची नावे पाहता, महालसा नारायणी योगिनींपैकी नसावी असे वाटते. असो. इथे विषयांतर नको.
11 Apr 2011 - 12:11 pm | आचारी
छान माहीति दिलित ...मलाहि या ठिकाणि जायाला आवडेन्ल क्रुपया मार्गदर्स्न करावे
11 Apr 2011 - 1:04 pm | गणपा
अतिशय माहितीपुर्ण लेख. लिहिण्याची शैलीही ओघवती असल्याने अजुनच मजा आली वाचायला.
ही एक संस्मरणीय मालिका होणार ही काळ्या दगडावरची रेघ. :)
11 Apr 2011 - 1:23 pm | पैसा
इथे आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल किंवा ते भारतातले की बाहेरचे याबद्दल आम्ही लिहित नाही. त्या मुद्द्यांवर अधिक चर्चा कोणी घडवून आणली तर आनंदच आहे. आम्हाला एवढंच लिहायचं होतं की "उत्तर भारतातून आर्य दक्षिण भारतात आले" आम्ही जेवढं वाचलं त्यात बहुतेक ठिकाणी असाच उल्लेख सापडला. लेखात लिहिताना अनवधानाने ते लिहायचं राहिलं. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
सर्वांच्या सूचनांची नोंद घेतो आहोत. जमेल तेवढा "गोवा" तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू!
11 Apr 2011 - 1:31 pm | नंदन
पहिला भाग फार सुरेख उतरला आहे. माहितीपूर्ण आणि रोचक. लेखासाठी घेतलेल्या मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडीच!
11 Apr 2011 - 2:08 pm | मेघवेडा
अगदी असेच म्हणतो. :)
11 Apr 2011 - 1:43 pm | स्मिता.
छान तपशीलवार आणि सुरेख माहिती आहे. सोबतची चित्रे सुद्धा छानच!
गोव्याच्या नेहमीच्या चर्च आणि समुद्रकिनारे याहून बरंच जास्त काही कळेल या लेखमालेतून.
पु. ले. शु.
11 Apr 2011 - 2:23 pm | आळश्यांचा राजा
एक अतिशय सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणत आहात. आभारी आहोत.
आडनावांचा इतिहास रंजक आहे.
जे वाचले ते बहुदा शेलार झाले! चेदीचे चाड्डे तसेच कदम्बांचे कदम आणि चालुक्यांचे चाळके, साळुंखे झाले असे ऐकून आहे. खरे खोटे इतिहासालाच ठावे.
छोटा नागपूर पठारावरचे आदिवासी समुद्रकिनार्यावरून दूर लॅण्डलॉक्ड कंट्रीसाइडकडे गेले,आणि आपल्या समुद्रकिनार्याच्या सर्व आठवणी त्यांनी पुसून टाकल्या हे जरासे पटण्यास अवघड वाटते खरे. पण आपण इतिहासतज्ञ किंवा इतिहास जाणकाराच्या भूमीकेतून लिहीत नाही आहात हे स्पष्ट आहे. त्यामुळे वादाचा प्रश्न नाही.
अतिशय रंजक पद्धतीने लिहीत आहात. वाचत आहे.
13 Apr 2011 - 4:15 am | चित्रा
खूप आवडला लेख. अतिशय सुरेख लेखमाला.
जे वाचले ते बहुदा शेलार झाले!
मीही असेच वाचलेले आहे.
छोटा नागपूर पठारावरचे आदिवासी समुद्रकिनार्यावरून दूर लॅण्डलॉक्ड कंट्रीसाइडकडे गेले,आणि आपल्या समुद्रकिनार्याच्या सर्व आठवणी त्यांनी पुसून टाकल्या हे जरासे पटण्यास अवघड वाटते खरे.
ह्याबद्दल विशेष माहिती नाही, पण मला या मूळस्थानांच्या कहाण्यांमध्ये हे इकडून आले, तिकडे गेले अनेकदा सांगोवांगीचे वाटते. अर्थात लोकांचे स्थलांतर झाले नाही, असे म्हणायचे नाही. आणि ह्या लेखात ह्या कथा यायलाच हव्या याबद्दल शंका नाही.
अतिशय आवडला लेख.
11 Apr 2011 - 4:08 pm | वाहीदा
वाचत आहे
11 Apr 2011 - 4:27 pm | असुर
सुरेख फोटो, सुरेख माहीती! अतिशय स्तुत्य लेखमाला!
--असुर
11 Apr 2011 - 4:42 pm | चावटमेला
ओघवता लेख आणि छान माहिती, वाचतो आहे
11 Apr 2011 - 7:18 pm | प्रभो
आवडला..वाचतो आहे.
11 Apr 2011 - 7:20 pm | स्पा
गोव्याबद्दल नवीन नवीन माहिती मिळाल्याने भूगोलाचे ज्ञान वाढत आहे
टीम गोव्याला परत शुभेच्छा.. पुढेचे भाग पटापट टाका
11 Apr 2011 - 8:51 pm | अनामिक
अतिशय ओघवता आणि सुरेख झालांय पहिला भाग. तुम्ही लेखासाठी घेतलेल्या मेहनतीचंही कौतूक वाटतंय.
11 Apr 2011 - 9:19 pm | प्रियाली
उत्तम, माहितीपूर्ण भाग आणि आढावा. चित्रांनी शोभा आणली.
नुकताच त्रिकाल हा चित्रपट पुन्हा पाहिला. त्यात नायिका आपल्या नातीचे लग्न ओळखीतल्या एका मुलाशी करण्यास नकार देते कारण त्यांच्या जाती वेगळ्या असतात. तसेच नातीच्या साखरपुड्याची घोषणा झाल्यावर मंगेशीला नारळ पाठवायला विसरू नका असेही सांगते त्याची आठवण झाली.
--
गोव्याच्या इतिहासासोबत काही भुताखेतांच्या गोष्टी आणि वदंताही येऊ द्या. एक स्पेश्शल भागच टाका त्यावर. :)
12 Apr 2011 - 2:05 am | धनंजय
थोड्या माहितीची आनंददायी उजळणी झाली, आणि कितीतरी माहिती नवीन मिळाली.
12 Apr 2011 - 2:17 am | प्राजु
खूप वेगळी माहिती समजली. नाहितर गोव्याच्या इतिहासात पोर्तुगीज आहेत इतकेच माहिती होते.
बरीच आडनावे कशी आली ते ही समजले.
येऊद्या अजून.
टीम गोवा..
अत्यंत स्तुत्य उप्रकर चालू केला आहे हा. माझ्यातर्फे भरपूर शुभेच्छा!
12 Apr 2011 - 1:42 pm | विसुनाना
गोव्याच्या इतिहासाच्या पूर्वार्धाची (?) ओळख करून देणारा लेख आवडला.
ही लेखमाला उत्तरोत्तर अधिक रंगतदार होत जावो आणि गोव्याच्या माहितीवरील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरो असे मनापासून वाटले.
'लॅबिरिंथ अथवा चक्रव्यूव्ह' पाहून विजयवाड्याजवळ एका पुरातन गुहा-विष्णूमंदिरात (ओंडावल्ली) हीच आकृती पाहिल्याचे स्मरले. जगातील विविध संस्कृतींनी हीच आकृती वेगवेगळ्या काळी वापरलेली आहे. म्हणजे ही आदिम मानवाच्या स्मृतींपैकी एक असावी हे नि:संशय!
18 Apr 2011 - 2:38 pm | पक्का इडियट
मस्त !!!
15 Sep 2013 - 11:27 pm | एस
देव बोरें करुं